डिजिटल अर्काईव्ह

आप्पासाहेब सा. रे. पाटील : सामाजिक दृष्टीचा प्रयोगशील भूमिपुत्र

आप्पासाहेब सा. रे. पाटील, सामाजिक विकासाची ओढ असणारा हा उमदा माणूस. विकासाचा ध्यास आणि नाविन्याचा वेध घेणारी दृष्टी या जोरावर त्यांनी जयसिंगपूर परिसराचा कायापालट घडवला. या आप्पासाहेबांच्या कार्याविषयी आणि विविध पैलूंविषयी...

आंतरिक ऊर्मीला परिश्रमाची आणि दूरदृष्टीची जोड लाभली तर काय घडू शकतं याचं चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे आप्पासाहेब सा. रे. पाटील. वरील गुणांच्या त्रिवेणी संगमातून आप्पासाहेबांचं स्वतःचं जीवन तर बहरलंच; शिवाय त्यांच्या भोवतालचा परिसरही समृद्ध झाला. प्पासाहेबांशी माझा खरा परिचय झाला तो 1965 साली. तत्पूर्वी मी त्यांना ओळखत होतो ते, राष्ट्र सेवादलाच्या प्रेरणेने भारलेला, अडल्या-नाल्यांना मदत करण्यासाठी तत्पर असलेला एक हाडाचा शेतकरी म्हणून. राष्ट्र सेवादलाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा मी तेव्हा सेक्रेटरी होतो. इस्रायली शेतीप्रयोगांचा अभ्यास करण्यासाठी शेतीची पार्श्वभूमी असलेले सेवादल सैनिक इस्रायलला पाठवावे, असं एक आमंत्रण तेव्हा आलं होतं. त्यासाठी स्कॉलरशिपही मिळाली होती. जयसिंगपूरचे आप्पासाहेब पाटील, धुळ्याचे दशरथ पाटील आणि कोपरगावचे भास्करराव बोरावके हे शेतीची उत्तम जाण असलेले तिघेजण निवडले गेले. अडचण एक होती. शेतकीमध्ये पारंगत असलेल्या या तिघांचंही इंग्रजी शिक्षण झालेलं नव्हतं. निव्वळ भाषेच्या अडचणीमुळे इतक्या गुणी लोकांची संधी हुकावी हेही बरोबर वाटत नव्हतं. अडचण दूर करण्याचा एक उपाय होता; दोन्ही विषयांची जाण असलेल्या व्यक्तीचा या अभ्यासगटात समावेश करणे. नाशिकच्या श्रीमती कुसुमताई पटवर्धन यांच्यासारख्या सुयोग्य व्यक्तीची जोड या अभ्यासगटाला करून दिली आणि इस्रायली पद्धतीच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी ते चौघे रवाना झाले. राष्ट्र सेवादलाने दिलेल्या या संधीचं आप्यासाहेबांनी सोनं केलं. मुळात दृष्टीच होतीच; ती अधिक विस्तारली. त्यांचं क्षितिज रुंदावलं. इथून पुढे त्यांचा माझा परिचय अधिक गाढ होत गेला.

इस्रायल दौऱ्यातून प्रेरणा
गावी परतल्यावर शेतीतला पहिला प्रयोग आप्पासाहेबांनी हाती घेतला. त्यावेळी चांगल्या बियाण्यांची तीव्र टंचाई होती. उपलब्ध बियाण्यांत भेसळ असे. खात्रीच्या बियाण्यांची सरकारला गरज होती. ही गरज भागवण्याची हमी आप्पासाहेबांनी घेतली. गावकऱ्यांना ही कल्पना समजावून दिली. गावकऱ्यांचा आप्पासाहेबांवर पूर्ण विश्वास होता. प्रयोगासाठी सगळे सिद्ध झाले. पाण्याची मात्र कमतरता होती. आप्पासाहेबांनी पाईपलाईन टाकून लांबवरून पाणी आणलं. त्या वर्षी सर्वांनी हेच पीक घेतलं. ठरल्याप्रमाणे सरकारने सर्व बियाणं विकत घेतलं. मेहनतीचं चीज झालं. गावकऱ्याच्या हातांत चांगला पैसा आला. नोकरीधंद्यासाठी गाव सोडून भटकंती करावी लागत असे, ती वाचली. स्रायल दौऱ्यात फळाफुलांची शेती आप्पासाहेबांनी पाहिली. ते फार प्रभावित झाले. इस्रायलसारखा चिमुकला देश वाळवंटी रखरखीत प्रदेशातून इतकी प्रगती करू शकतो; मग आपल्याला हे का साधणार नाही? नक्कीच साधेल, हा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. तिथे त्यांनी नवे प्रयोग पाहिले होते. इथे नवं काही सुरू करायचं होतं. आप्पासाहेबांनी अंधानुकरण केलं नाही. आपला देश, आपलं हवामान, आपली माती, पाण्याची उपलब्धता या सगळ्यांचा कसून अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. पंजाब, हरियाणाचा सुजल सुफल प्रदेश, राजस्थानचं वाळवंट, गुजरातमधील काळीशार उपजाऊ जमीन, माडांनी झुलणारी हिरवीगार किनारपट्टी, चहा-कॉफीचे मळे सर्वांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. या भ्रमंतीत त्यांची साथ केली त्यांचे पुत्र गणपतराव यांनी णपतराव त्यावेळी कोल्हापूरला कॉलेजमध्ये शिकत होते. शेतीव्यवसायाकडे वळण्याचा पर्याय वडलांनी समोर ठेवला. कॉलेजचं रंगीत जीवन सोडून परत गावी परतायचा धाडसी निर्णय गणपतरावांनी घेतला, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. पहिल्या वर्षी त्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि विक्रमी पीक घेतलं. ओसाड माळरानावर नवनवे प्रयोग करीत गणपतरावांनी द्राक्षं, ऊस, पपई, चिकू, नारळ, आंबे अशा विविध फळबागा फुलवल्या.

आदर्श साखर कारखाना
घरच्या शेतीची जबाबदारी गणपतरावांकडे सोपवून आप्पासाहेबांनी आपलं लक्ष सहकार क्षेत्राकडे केंद्रित केलं. सहकार चळवळीतून आदर्श समाजरचना उभारण्याचा त्यांना ध्यास होता. या क्षेत्रातही त्यांनी अनेक प्रयोग केले. सहकारी तत्त्वावर लॉजिंग-बोर्डिंगही सुरू केलं, वर्तमानपत्र चालवलं, पोल्ट्री काढली, दुधाची डेअरी काढली. असे वेगवेगळे प्रयोग करत करत आप्पासाहेबांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ या आदर्श साखर कारखान्याची स्थापना केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दररोज सात हजार मेट्रिक टन उसाचं गाळप करू शकणाऱ्या या साखर कारखान्याने जयसिंगपूर परिसराचा रंगच पालटून टाकला, साखर कारखान्याच्या अनुषंगाने इथे किती निरनिराळे प्रकल्प उभे राहिलेत! कारखान्याचा समृद्ध परिसर मन थक्क करणाराच आहे. किनारपट्टीची मक्तेदारी असणारी माडांची झाडं इथे घाटावर डौलात उभी आहेत. गुलाबाचे ताटवे वाऱ्यावर डोलताहेत. मऊ मखमली हिरवळ आणि सकाळच्या कोवळ्या हिरवळीत आपलं अन्न टिपणारे चिमणे पक्षी हे दृश्य तर अपूर्वच, परिसरातील झाडं-फुलं आणि अद्ययावत ग्रीन हाऊस निसर्गशोभा तर वाढवतातच पण त्याबरोबरच कारखान्यामुळे होणारं प्रदूषण आटोक्यात ठेवून पूरक उत्पन्नही मिळवून देतात. बायोगॅस राखेतून उत्कृष्ट दर्जाचं कंपोस्ट खत तयार होतं. इथला अतिशय नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणजे को-जनरेशन पद्धतीने केलेली वीजनिर्मिती. 

सहकारी साखर कारखाना क्षेत्रातला देशामधला हा पहिलाच प्रकल्प आहे. आप्पासाहेबांची सामाजिक बांधिलकी कारखान्याच्या कार्यपद्धतीतही उमटली आहे. तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं तांत्रिक शिक्षण देणारं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, भोवतालच्या लोकांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं आरोग्यकेंद्र ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. सलग सहा वर्षे या साखर कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार आणि विशेष प्रशंसा प्रमाणपत्र मिळवलं आहेच, शिवाय भारत सरकारचं प्रथम पारितोषिक आणि विशेष प्रशंसापत्रही मिळवलं आहे. दर्याचा आनंद लुटण्यासाठी आप्पासाहेबांच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देणारी कारखान्याच्या ऑफिसची इमारत अत्यंत देखणी आहे. इमारत बांधणीच्या वेळी बांधकामावरचा खर्च पाहून अनेकांनी टीका केली. त्यावर आप्पासाहेबांनी प्रतिवाद केला. 'गावातल्या लोकांना सुंदर गोष्टी बघण्याची संधी मिळाली पाहिजे.' आसपासच्या विद्यार्थ्यांनी ही इमारत पाहावी, रेखीव सुंदर बागेचा, जलबिंदूंचा शिडकावा करणाऱ्या कारंज्याचा, ग्रीन हाऊसमधील जरबेराची मोहक फुलं आणि लाल, जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगी सिमला मिरच्या, त्यांची निर्यातही होते, यांचा आनंद लुटावा, हा त्यांचा खास प्रयत्न असतो. आपण जगप्रवास केला, नाना गोष्टी पाहिल्या, त्यांतून आपल्याला नव्या प्रेरणा मिळाल्या, मग खेड्यांतून वाढणाऱ्या मुलांनाही ही संधी का मिळू नये? उपेक्षित जीवन जगणाऱ्या मुलांच्या वाट्याला आयुष्यातील ही सौंदर्यस्थळं कुठून आणि कशी येणार? ही भावना या प्रयत्नांमागे असते.
 

Tags: Adarsh sugar factory Israel tour Prabhubhai Sanghvi experimental Bhumiputra of social vision आदर्श साखर कारखाना Appasaheb Sa. Ray. Patil इस्रायल दौरा प्रभुभाई संघवी सामाजिक दृष्टीचा प्रयोगशील भूमिपुत्र आप्पासाहेब सा. रे. पाटील weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी