डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्यासाठी नेताजींनी हिटलरची मदत घेण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट परळकरांना आक्षेपार्ह वाटते. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन अडचणीत सापडलेला असताना भारतीय स्वातंत्र्यासाठी या संधीचा लाभ घेण्याऐवजी सर्व राष्ट्रीय नेते शांत बसलेले होते तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची हिंमत सर्वप्रथम नेताजींनीच दाखविली होती. हे कोण अमान्य करू शकेल?

मी डॉ. प्रगती पाटील. धुळे येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असणारी 23 वर्षांची एक एम.बी.बी.एस. डॉक्टर आणि 'अंनिस'ची कार्यकर्ती. डॉ. दाभोलकरांमुळेच मी 'साधना’चे नियमित वाचन करू लागले. 'साधना'मुळे वैचारिक प्रगल्भता वाढण्यात मदत होत असली, तरी काही लेखकांची काही मते मला अत्यंत आक्षेपार्ह वाटली. उदा. 3 डिसेंबरच्या अंकात 'आगळे वेगळे वागळे' या लेखात अवधूत परळकरांनी मालवण निवडणुकीसंदर्भात आपली मते मांडताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जो संदर्भ दिलाय, तो अत्यंत चुकीचा व आक्षेपार्ह आहे. या अगोदरही 25 जूनच्या साधनात 'वाट चुकलेला दिग्दर्शक' या लेखात परळकरांनी नेताजीविषयी अयोग्य वक्तव्ये केली असता, त्याचा प्रतिवाद करण्यासाठी मी 'साधना’ला पत्र पाठविले होते. 'साधना'सारख्या पुरोगामी, वैचारिक साप्ताहिकात माझ्या मतांची दखल घेतली जाईल, असे मला वाटत होते. पण जेव्हा ते पत्र 'प्रतिसाद'मध्ये प्रसिद्ध झाले नाही, तेव्हा निराशा झाली. 3 डिसेंबरच्या अंकात परळकरांनी नेताजीविषयी त्याच स्वरूपाची आक्षेपार्ह विधाने केल्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींचे योगदान व त्यांची वैचारिक भूमिका यांवर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. 

ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्यासाठी नेताजींनी हिटलरची मदत घेण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट परळकरांना आक्षेपार्ह वाटते. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन अडचणीत सापडलेला असताना भारतीय स्वातंत्र्यासाठी या संधीचा लाभ घेण्याऐवजी सर्व राष्ट्रीय नेते शांत बसलेले होते तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची हिंमत सर्वप्रथम नेताजींनीच दाखविली होती. हे कोण अमान्य करू शकेल? ‘दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरची मदत घेणे भारतातील अनेकांना आवडण्यासारखे नसतानाही तुम्ही हा निर्णय का घेतला', असा प्रश्न नेताजींना विचारला असता ते म्हणाले होते, "मला त्याची कल्पना आहे. पण अशा गोष्टीत भावनाविवश होऊन चालत नाही. हवी असते ती रोखठोक वास्तववादी दृष्टी, माणूस अडचणीच्या वेळी कुणाकडे जातो? जिथून मदत मिळण्याची शक्यता असते त्याच्याकडेच.

इथं हुकूमशाही आहे, हे मला माहीत नव्हतं असं नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीत आपल्याला जर कोणी मदत करणार असेल तर हिटलरच करू शकतो, हे कसं नाकारता येईल? इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं नसतं, तर मी इथं मुळीच आलो नसतो. इंग्लंडचा ज्याच्याविरुद्ध संघर्ष सुरू झालेला असेल त्याच्याकडे गेलो असतो. ज्यांना आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे भान असतं ती माणसं अशीच वागतात. मग तो क्रांतिकारकांचा क्रांतिकारक मानला गेलेला लेनिन का असेना! त्यानं तर आपल्या झारविरुद्ध जर्मनीच्या कैसरची मदत घेतली. चर्चिल स्वतःला लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता म्हणवतो. पण उद्या तो आणि स्टॅलिन एकत्र आले तर मला नवल वाटणार नाही. राष्ट्राच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवला की शहाणे नेते वैचारिक वैर विसरून जातात. म्हणून उद्या मला या बाबतीत कुणी नावं ठेवली तरी मी त्यांची फिकीर करणार नाही. हिंदुस्थानचं हित इतरांना कळतं आणि मला समजत नाही, असं मानायचं मुळीच कारण नाही. खरं सांगू का, ज्यांना काही करायचं नसतं तेच असल्या वादंगांची वादळे उठवत असतात." (संदर्भ ‘नेताजी', पृष्ठ क्र. 397, लेखक वि. स. वाळिंबे) हिटलरची मदत घेण्यामागे नेताजींची मनोभूमिका ही अशी होती! 

रासबिहारी बोस यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या आझाद हिंद सेनेचे नेतेपद नेताजींनी स्वीकारले. त्यासाठी त्यांना जर्मनी आणि जपानची मदत घ्यावी लागली; पण नेताजींनी त्यांना स्पष्टपणे बजावले होते की आझाद हिंद सेना फक्त हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीच लढेल. सेनेविषयीचे सर्व निर्णय भारतीय सैनिकच घेतील आणि जपान किंवा जर्मनीच्या कुठल्याही उद्दिष्टांसाठी आझाद हिंद सेना लढणार नाही. ब्रिटनच्या गुलामीत खितपत पडूनही जे भारतीय सैनिक महायुद्धात ब्रिटनच्याच बाजूने लढत होते, त्या सैनिकांना स्वतःच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्रथमतः लढायला लावले ते नेताजींनीच. इतकेच नव्हे तर नेताजींनी राणी झांशी रेजिमेंट उभारून महिलांनाही भारतीय स्वातंत्र्यासाठी सढण्यास प्रेरित केले. कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे, 'महिलांच्या शक्तीवर नेताजींचा पूर्ण विश्वास होता. महिलांना संधी दिली गेली तर त्या कोणतेही अशक्य काम शक्य करून दाखवतील, असे ते म्हणायचे. त्यांच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष ही समाजाची दोन समान अंगे होती. म्हणूनच या स्वातंत्र्यलढ्याकडे डोळेझाक न करता स्त्रियांनी त्यात सक्रिय सहभागी व्हायला हवे, यामुळे एका दगडात दोन पक्षी मारले जातील, असे त्यांचे मत होते. यामुळे परकीय साम्राज्यवादी शक्तींचा बिमोड होईल; पण त्याचबरोबर पुरुषप्रधान समाजाकडून होणाऱ्या स्त्रियांच्या शोषणावर आणि त्यांच्या परावलंबित्वावर विजय मिळविता येईल.

समान अधिकारांची मागणी करण्याबरोबरच पुरुषांकडून होणारी स्त्रियांची पिळवणूकही संपविता येईल.' (संदर्भ - इन्कलाब झिंदाबाद, पृष्ठ क्र. 47, लेखक कॅप्टन लक्ष्मी सेहगल.) भारतीय लष्करामध्ये महिलांचा समावेश होण्यास त्यानंतर पन्नास वर्षे जावी लागली. 1992 पासून भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जातो. पण अद्यापही त्यांना प्रशासकीय, प्रशिक्षणाची कामेच दिली जातात. प्रत्यक्ष सीमेवर लढायला पाठविले जात नाही. राणी झांशी रेजिमेंटमधील महिला सैनिकांनी मात्र ब्रिटिशांविरुद्धच्या लहानसहान चकमकींमध्ये भाग घेतला होता व दोन महिला सैनिकांनी रणांगणावर प्राणार्पणही केले होते. स्वतंत्र भारतातील सैन्याने महिलांना जी संधी, जो सन्मान अद्यापही दिलेला नाहीये, ती संधी, सन्मान नेताजींनी राणी झांशी रेजिमेंटमधील वीरांगनांना दिला होता.

काँग्रेसच्या नेत्यांकडून नेताजीच्या वाट्याला विरोध आणि उपेक्षेचे हलाहलच आले. गांधी नेताजींच्या हिंदुस्थानवरील स्वारीचे विरोधक होतेच, पण 'सुभाषबाबू जर जपान्यांच्या साहाय्याने हिंदुस्थानवर चाल करून आले, तर मी सुभाषबाबूंशी लढेन’ असे पंडित नेहरू यांनी घोषित केले होते.

जनसामान्यांकडून मात्र नेताजींना भरघोस पाठिंबा होता. नेताजींची मोहीम लौकिकार्थाने अपयशी ठरूनही तिचे भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम झाले. 1946 मध्ये नौसैनिकांनी नेताजी आणि आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊनच ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. भूतपूर्व नौसैनिक राजगुरू द. आगरकर यांनी नौसैनिकांच्या उठावावर 'वडवानल' हे पुस्तक लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'उठावाचे वृत्त दि. 18 फेब्रुवारी 1946 रोजी इंग्लंडमध्ये समजले आणि दुसऱ्याच दिवशी सेक्रेटरी ऑफ स्टेट्स फॉर इंडिया, लॉर्ड पेथिक लॉरेन्स यांनी हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आणि पंतप्रधान अॅटली यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये, त्रिमंत्री शिष्टमंडळ नेमल्याची घोषणा केली. ही घोषणा करीत असताना अॅटलींनी सभागृहात सांगितले की भारतात आपण ज्वालामुखीच्या तोंडावर आरूढ झालो आहोत, कॅबिनेट मिशनची (त्रिमंत्री शिष्टमंडळ) घोषणा 19 ला करणे हा योगायोग नव्हता. कारण भारतात नौदलाच्या उठावाने परिस्थिती गंभीर झाली आहे, याची कल्पना अ‍ॅटलींना आली होती. दि. 15 मार्च 1946ला कॅबिनेट मिशनच्या सदस्यांना निरोप देताना अँटलींनी सांगितले,

"हिंदुस्थानात आज प्रचंड तणाव निर्माण झाला आहे आणि ही परिस्थिती खरोखरच गंभीर आहे… 1946 मधले वातावरण 1920, 1930 किंवा 1942च्या वातावरणापेक्षा तप्त आहे.... युद्धात प्रशंसनीय सेवा बजावलेल्या सैनिकांमध्येही राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली आहे."

पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर पाच वर्षांनी अॅटली भारत भेटीवर आले होते. त्यांच्या कलकत्त्याच्या मुक्कामात कलकत्ता उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि बंगालचे हंगामी राज्यपाल पी. बी. चक्रवर्ती यांनी अॅटलींना विचारले होते, 'गांधींचे छोडो भारत आंदोलन 1947च्या कितीतरी अगोदर विरून गेले होते. इंग्रजांनी इथून ताबडतोब निघून जाये, अशी काही तेव्हाची परिस्थिती नव्हती, तरी तसे का ठरवले?’

‘अनेक कारणे होती, पण त्यातले सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि त्यांची सेना. हिंदी सैनिकांसंबंधी खात्री देता येऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळून आल्यावर आम्हांला दुसरा मार्गच राहिला नव्हता.’

‘भारत सोडून जायच्या तुमच्या निर्णयावर गांधीजींच्या आंदोलनाचा कितपत परिणाम झाला होता?’

अ‍ॅटली एकेक अक्षर संथपणे उच्चारत उत्तरले, 'फारच कमी.’ (संदर्भ - वडवानल, पृष्ठ क्र. 8, लेखक - राजगुरू 6. आगरकर.)

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींच्या योगदानाबद्दल आक्षेप घेणाऱ्यांसाठी अ‍ॅटली यांचे हे सूचक वक्तव्य पुरेसे आहे, असे मला वाटते.

Tags: महात्मा गांधी आझाद हिंद सेना स्वातंत्र्यलढा जपान जर्मनी हिटलर नेताजी सुभाषचंद्र बोस mahatma gandhi germany japan azad hind sena hitler subhashchabdra bose netaji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके