डिजिटल अर्काईव्ह (2010-2020)

‘माणूस’ म्हणून एकमेकांकडे बघण्याची विचारधारणा देणारं हे नाटक केवळ ऐतिहासिक कालखंडातलं न राहता वर्तानाशी नाळ जोडतं. सामाजिक विचार मांडणारी कला मला सादर करायला मिळाली, याचं मूल्य माझ्या लेखी खूप जास्त आहे. ह्या प्रवासात कितीतरी आनंददायी क्षण वाट्याला आले. ज्यांचं काम आपण बघतो, ज्यांना अनुसरतो अशा दिग्गज नाट्यकर्मींनी आपलं नाटक पाहावं, कौतुक करावं हा अनुभव शब्दांत कसा मांडायचा? पहिला प्रयोग पाहिल्यानंतर, दीपाताई श्रीराम यांनी ‘अगं कुठे होतीस इतके दिवस?’ असं कौतुक केल्यावर जो काही आनंद झाला तो शब्दांत कसा व्यक्त करू? लोकांनी केलेलं कौतुक, प्रोत्साहन यामुळे कोणाला बरं वाटणार नाही! आत्मविश्वास दुणावला. 

गेल्या वर्षभरात ‘सत्यशोधक’बरोबर मैलोन्‌मैलांचा प्रवास केला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असंख्य ठिकाणी प्रयोग केले. हे नाटक करत असताना या नाटकाबद्दल, या एकूण प्रवासाबद्दल मला जाणवलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न. यात कुठल्याही प्रकारचं गुणगान न करता माझ्या नजरेतून मला जे दिसलं ते मांडतेय. 

मी मूळची सोलापूरची, व्यवसायाने आर्किटेक्ट. शाळा-कॉलेजमध्ये असताना नृत्य-नाटक यांत भाग घ्यायचे. नाटकात काम करावं असं तेव्हापासूनच वाटायचं. पुणे-मुंबईइतकी सोलापुरात नाटकं होत नाहीत. ज्या संस्थांकडून नाटकं केली जातात त्यांच्याबरोबर शिक्षणामुळे काम करणं जमलं नाही. पुरुषोत्तम, फिरोदिया यांसारख्या स्पर्धा तिथे होत नाहीत. त्यामुळे कॉलेजमध्येच असताना नाटकासाठी असं व्यासपीठ मिळत नाही. (मी कॉलेजमध्ये असेपर्यंत तरी हीच स्थिती होती.) पुण्यात नोकरीसाठी आल्यानंतर ठरवलं होतं की, नाटक करायचं. पी.डी.ए. या संस्थेबरोबर नेपथ्य, अभिनय, निर्मिती, व्यवस्थापन असं थोडंबहुत काम केलं. नोकरी सांभाळून नाटक करण्याची धडपड चालू होती. ‘सत्यशोधक’साठी स्त्रीसूत्रधाराचा शोध सुरू असताना ओंकारने नाव सुचवलं आणि मला काम करण्याची संधी मिळाली. (नोकरी नुकतीच सोडलेली असल्यामुळे ही संधी स्वीकारता आली) आणि माझ्या वाट्याला आलं एक वेगळं नाटक... वेगळ्या लोकांबरोबर... वेगळ्या जाणिवेचं! विलक्षण असा अनुभव देणारं! 

अजूनतरी मी टीव्ही किंवा सिनेमा या माध्यमांध्ये काम केलेलं नाही. पण प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारं नाटक हे माध्यम मला कमाल ताकदीचं वाटतं. रोजचा प्रयोग हा वेगळा असतो आणि त्याचं प्रेक्षकांबरोबर बनणारं समीकरणही वेगळं. संहिता ते प्रयोग यामध्ये घडणाऱ्या अनंत गोष्टी. प्रयोग बांधेसूद व्हायचा असेल तर त्याची उभारणी अत्यंत महत्त्वाची. नाटकासाठी जसं ते उत्तम लिहिलेलं असावं लागतं, तसंच नाटक चांगलं होण्यासाठी दिग्दर्शकीय कौशल्यातून निर्माण झालेलं नाटकाचं डिझाईनही तितकंच महत्त्वाचं. नाटक हे थ्री डायमेन्शनल डिझाईन असतं असं मला वाटतं. रंगमंचावरच्या अवकाशाला परिमाण देण्याचं काम ते करतं. नेपथ्य, प्रकाशयोजना ह्या गोष्टी तो परिणाम अधिक गडद करण्यासाठी पूरक ठरतात. 

आमच्या ह्या नाटकाला तर नेपथ्यच नाही. मिनिमॅलिझम ह्या तत्त्वाचा जणू पुरेपूर वापर. त्यामुळेच हे नाटक कोणत्याही ठिकाणी होऊ शकतं आणि झालंही. स्टेज प्रॉपर्टी म्हणाल तर फक्त दोन खुर्च्या आणि एक काळा पडदा एवढंच काय ते सामान. एक काळा पडदा पार्श्वभूमीला ठेवून हे नाटक सादर होतं. काळा पडदा त्याच्या रंगगुणांसह न्यूट्रल बॅकग्राऊंड देतो. नेपथ्याविनाच रंगमंचावर घर, शाळा, मोर्चा, रस्ता, सभा या सगळ्या जागा दाखवल्या जातात. मूव्हमेंटस्‌ तर अशा दिल्या आहेत की एका स्थळातून दुसरी जागा निर्माण होते, स्थळ-काळ बदललेला तर जाणवतोच, पण मधला ब्लॅक-आऊटचा वेळही वाचतो. एवढी बेमालूम अशी गुंफण. उदा. सावित्रीबार्इंवर शेण फेकण्याचा प्रसंग. सावित्रीबाई शाळेतून बाहेर पडतात. उजव्या बाजूच्या पहिल्या विंगेच्या दिशेने त्या जात असतात. त्याच वेळी diagonally opposite बाजूला उभे असलेले ब्राह्मण शेण फेकतात. सावित्रीबाई तो मारा चुकवत पहिल्या विंगेतून जाऊन शेवटच्या विंगेतून सरळ प्रवेश करत सरळ रेषेत रंगमंचाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन थांबतात. त्याच रेषेत पुढे येऊन घरात प्रवेश करतात. ब्राह्मण आणि सावित्रीबार्इंधला तणाव हा अदृश्य अशा कर्णरेषेतल्या ताणलेल्या प्रतलातून अधोरेखित होतो. रंगमंचाचा वापर असा की, शाळा ते घर असं कापलेलं अंतरही दिसतं आणि त्याचबरोबर स्थळही बदलतं. त्याचप्रमाणे मोर्चाचं दृश्य. अण्णासाहेब आणि जोतिबांच्या चर्चेनंतर लगेच उजव्या बाजूच्या पहिल्या विंगेतून प्रवेश करून सरळ डाव्या-बाजूच्या विंगेतून मोर्चा जातो. अवघ्या दहा-बारा माणसांध्ये शंभर-दीडशे माणसांचा आभास निर्माण होतो. 

त्याचबरोबर रंगमंचावरील व्यक्तींचं कम्पोझिशन आणि मूव्हमेंटस्‌ त्या त्या दृश्यातील भावना दर्शविण्यासाठी सूचक, असं मला तरी वाटतं. उदा. सावित्रीबाई आणि जोतिबांधला एक प्रसंग. जोतिबा खुर्चीवर बसले आहेत आणि सावित्रीबाई खुर्चीलगतच उभ्या आहेत. जणू काही जोतिबांना असलेला सावित्रीबार्इंचा खंबीर पाठिंबा आणि आधार जाणवतो. त्यांच्या नात्याची घट्ट वीण प्रतीत होते. पूर्ण नाटकाद्वारे रंगमंचावरचा प्रत्येक भाग वापरला जातो. प्रकाशयोजना ह्या सगळ्यांचा परिणाम गडद करते. वेषभूषेतून त्या काळातली माणसं दिसू लागतात. दिग्दर्शकाच्या अनुभवातून आणि डिझायनर व्हिजनमधून निर्माण झालेल्या ह्या गोष्टी म्हणजे कमाल! 

ह्या नाटकाच्या निमित्ताने मला एका वेगळ्याच ग्रुपबरोबर काम करायला मिळालं. ज्यांनी कधी आयुष्यात ‘नाटक’ केलेलं नाही आणि बघितलंही नाही अशा लोकांबरोबर. मी नाटकात येण्याआधी चार-पाच महिने तालीम सुरू होती. आरोग्यसंवाद, नाट्यवाचन, कार्यशाळा ह्या गोष्टी झाल्या होत्या. दृश्यं, गाणी बसली होती. पहिल्या दिवशी मी गाणी ऐकली तेव्हा जाणवले ते त्यांच्या आवाजाचे पोत. गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेली ही माणसं काय कमाल गातात! म्युझिकमुळे या गाण्यांना साज चढतो. नाटकाचा वेगळा विषय, वेगळे कलाकार, गाणी, संगीत... मजा येणार आपल्याला, असं वाटून गेलं त्या वेळी. 

उशिरा येऊनही या सगळ्यांबरोबर मिसळायला मला फार वेळ लागला नाही आणि त्यांनीही मला लवकर सामावून घेतलं. आता तर आम्हा सगळ्यांचं एक कुटुंबच झालंय. तसा विचार केला तर, नाटक नसतं तर सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ह्या लोकांशी माझा कितपत संबंध आला असता? आमची कार्यक्षेत्रं पूर्ण वेगळी. या नाटकामुळे मला ह्या लोकांचं जगणं, त्यांचे प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना कळाले. शिक्षणाचा अभाव, आरोग्याची हेळसांड, त्यामुळे निर्माण झालेली दुखणी, समाजात वावरताना निर्माण होणारे प्रश्न, अडीअडचणी, आजूबाजूचं राजकारण हेच तर सगळं या नाटकात मिसळून व्यक्त होत होतं. 

‘सत्यशोधनाच्या वाटा दुर्घट!’ असं नाटकात वाक्य आहे. आमच्या या शंभर प्रयोगांच्या प्रवासात ‘सत्यशोधक’च्या वाटा दुर्घट असा अनुभव कित्येकदा आला. महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या अनेक गावांध्ये आमचे प्रयोग झाले. त्या निमित्ताने अनेक नाट्य मंदिरांची व्यवस्था (आणि अवस्था!) पाहायला मिळाली... खरं तर योग्य उंची- रुंदीचा रंगमंच, रंगमंचाच्या बाजूला- मागे पुरेशी जागा, प्रेक्षागृहाची सुयोग्य रचना, वेशभूषेसाठी खोल्या, स्त्री-पुरुष प्रसाधनगृहं या तांत्रिक बाबींचा विचार; किमान या गोष्टी नाट्यमंदिरात हव्यात. पण दुर्दैवाचा भाग म्हणजे यांतील बऱ्याच गोष्टींचा अभाव आम्हांला आढळला. योग्य निगा न राखल्यामुळे रंगमंचावरच्या फळ्या तुटलेल्या होत्या. म्हणजे कलाकाराने तिथे वावरताना आपला पाय तर अडकत नाहीये ना याकडे जास्त लक्ष द्यावं. 

बऱ्याच रंगमंदिरांत मुख्य पडदा कामच करत नव्हता. आणि जर तो काम करत असेल तर त्याच्या विशिष्ट मंदगतीने कुरकूर आवाज करत उघडायचा. जिथे दिवे टांगायला बार्स नव्हते, झालरी नव्हत्या तिथे कॅटवॉक ही संकल्पनाच किती दूर! विंगा असल्या तरी त्यांचं योजलेलं काम करतीलच असं नाही. प्रेक्षकांना रंगमंचावर प्रवेश करणारे कलाकार आधीच पॅसेजमध्ये सरळ दिसतील अशी काहीशी बाब. बरं विंगा सरकवायला गेलो तर लटपटून पडतील की काय अशी भीती. रंगमंचाच्या बाजूला पॅसेज असतात ते तर कित्येक ठिकाणी नव्हतेच. ग्रीनरूमचे दरवाजे थेट विंगांपाशी उघडायचे. म्हणजे एन्ट्री थेट त्या ग्रीनरूममध्ये! ग्रीनरूमच्या तर विविध तऱ्हा! आरसे नाहीत, दिवे नाहीत. कोपऱ्याकोपऱ्यांत थुंकलेलं. ओल लागून भिंतींचे पोपडे उडालेले. आरसा असेल तर पारा उडालेला. दरवाजाला कडी नसणं ही तर नित्याची बाब. काही ठिकाणी तर ग्रीनरूम म्हणजे मोकळी खोली. तुम्हांला हवी तशी तुमची सोय तुम्हीच लावून घ्या असं सांगणारी. बरं, इथे खिडक्यांना तावदानं नाहीत. सगळा आरपार मामला. 

प्रसाधनगृह! यावर लिहावं तेवढं कमी, इतकी दुर्दैवी अवस्था. अक्षरश: आम्हा स्त्री वर्गाध्ये चर्चा व्हायची की आज कोणत्या दिव्याला सामोरं जावं लागणार आहे? एखाद्या वेळी स्वच्छता दिसली की ‘आज सद्‌गदित झाले’ असं आम्ही एकमेकींना म्हणायचो. 

जिथे नाट्य मंदिरं नाहीत अशा ठिकाणीही आम्ही प्रयोग केले. शाळेच्या आवारांत, मंगल कार्यालयांत, मैदानांत. इथे स्टेज बांधण्यापासून ती जागा आपल्याला अनुकूल करून घेण्यापर्यंतच्या कसरती. लहानसहान गावांचं सोडा, पण हिंगोलीसारख्या मोठ्या गावातही एखादं नाट्यगृह नसावं ही किती दु:खद बाब. नाट्यगृहं नाहीत तर नाटकं येणार कशी? वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टी कशा  रुजणार? सांस्कृतिक वारशाचे गोडवे गात असताना ह्या गोष्टी कशा नजरेआड केल्या जातात? त्यामुळेच आमचं नाटक अशा ठिकाणी झालं हे मला महत्त्वाचं वाटतं. त्या निमित्ताने वर्षानुवर्षं नाटक पाहायला न मिळणाऱ्या लोकांना नाटक पाहायला मिळालं, नाटक काय असतं हे कळलं. नाटकाचा विचार रुजला. न जाणो तिथली काही मुलं नाटक करायला उद्युक्त होतील. आपल्या मातीतील समस्यांचं, जाणिवांचं नाटक करतील. नाट्यचळवळ फोफावेल. 

नाटकाचे काही प्रयोग तर विलक्षण होते! दिल्लीतल्या ‘जनम’ या सफदर हाश्मींच्या स्टुडिओधला प्रयोग. छोटेखानी जागा आणि हातभर अंतरावर पायऱ्यांवर बसलेले प्रेक्षक. प्रेक्षकांध्ये अरुंधती रॉय, सुधन्वा देशपांडे, हाश्मींच्या चळवळीशी निगडित माणसं. डहाणूला आदिवासी भागातील मुलांसमोर केलेला प्रयोग. नसिरुद्दीन शहांच्या फार्म हाऊसवर केलेला प्रयोग. माणगावचा प्रयोग तर वेगळाच! खासच! उल्का महाजन आणि तिथे जमलेल्या विविध प्रांतांतल्या कार्यकर्त्यांसमोर सादर केलेला. स्टेज, दिवे वगैरे काही नाही. दोन झाडांखाली सतरंजी टाकून स्वच्छ सूर्यप्रकाशात केलेला. ग्रीनरूम म्हणजे बांधलेले तंबू. समोर बसलेल्या सगळ्याच प्रेक्षकांना मराठी समजत होतं असं नाही, पण त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्याकडून, आणि त्यांच्याकडूनही तितकाच चांगला प्रतिसाद. पूर्ण शांततेत, नेटाने ऐकत लोक बसले होते. प्रयोग संपल्यावर एक दक्षिण भारतीय बाई येऊन, ‘तुमच्या हावभावांवरून काय म्हणत होता हे कळत होतं’ अशी पावती देऊन गेल्या. असा प्रत्येकच प्रयोग वेगळा अनुभव देणारा. 

या नाटकामुळे या वर्षभरात किती वेगवेगळ्या लोकांना भेटले. उल्का महाजन, अतुल देऊळगावकर अशी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळींत काम करणारी माणसं. ज्यांच्या सामाजिक चळवळीबद्दल वाचलं होतं अशा उल्का महाजनांना भेटण्याचा, बोलण्याचा योग आला. शांत, मृदुभाषी वाटणारी ही व्यक्ती काय तडफेने काम करते. केवढं झोकून देऊन काम करतात ह्या! केवळ विलक्षण! आमचा प्रवास हा फक्त त्या जागी जाऊन नाटक करणं ह्यापुरताच सीमित नव्हता, तर शक्य असेल तिथे आम्ही तिथल्या प्रसिद्ध जागा, वास्तू बघायला जायचो. औरंगाबादला होतो तर आम्ही वेरूळची लेणी पाहिली. सगळ्यांना त्याबद्दल माहिती देताना पुन्हा माझा अभ्यास झाला. कलकत्त्याला तर एक अख्खा दिवस कलकत्ता दर्शन, जळगावला बहिणाबाईचं घर, म्हैसूर दर्शन इत्यादी. वेगवेगळ्या कला बघता याव्यात, त्यातून त्यांचा आस्वाद कसा घ्यावा याची माहिती सगळ्यांना मिळावी, एकूणातच अभिरुचिसंपन्न असा दृष्टिकोन निर्माण व्हावा ह्यासाठीच ही सरांची धडपड असायची. 

तालीम चालू असतानाही किंवा प्रवासातही आम्ही हसायचो, टिंगल करायचो, एकमेकांना टोपणनावांनी हाक मारायचो, मजा करायचो. कधीकधी दौऱ्यावर असताना मैफिल जमवायचो. मग शाहीर नागनाथ काका, भीमराव काका यांची गाणी, शेखर काकांच्या गझला, संतोषची फुल फॉर्ममधील ढोलकी, अतुलसरांनी  केलेली मिमिक्री... कलकत्त्याला नाट्यमहोत्सवानंतर सावित्रामावशीचं बिनधास्त नाचणं, म्हैसूरला रात्री मिळालेली बासरीवादन, पखवाजवादन यांची मेजवानी... केवढा आनंद! 

अतुल सरांबरोबर काम! बाप रे! हा एकच शब्द पटकन तोंडातून येईल. केवढी अफाट ऊर्जा आहे ह्या माणसामध्ये. ‘मी माझ्याशी...’, ‘दलपतसिंग येती गावा...’ ही त्यांची आधीची नाटकं मी पाहिली होती. वेगळ्या धाटणीचं काम करणारा दिग्दर्शक हे माहिती होतं, आणि त्यांच्याबरोबर काम करताना ते जाणवलंही. तुमच्या कलेतून जगणं दिसलं पाहिजे, राजकीय-सामाजिक भान असलंच पाहिजे ह्या धारणेचा हा दिग्दर्शक. तालमीच्या वेळी किंवा प्रवासात त्यांचं बोलणं, एखाद्या गोष्टीचे असंख्य पदर उलगडणारं. विषय फक्त नाटक एवढाच नसून साहित्य, संगीत, आर्किटेक्चर, दैनंदिन घटना, राजकारण ह्या सगळ्या विषयांवरचं. एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी, त्या गोष्टीचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण ह्या गोष्टी उलगडून सांगणारं. अफाट वाचन असलेल्या ह्या माणसाचं बोलणं, ऐकणं, विचारांना एक वेगळं बळ देणारं. 

नाटक हे फक्त काही काळापुरतं सीमित न राहता त्यातून जगणं बदललं पाहिजे, उन्नयन झालं पाहिजे या विचारांचा हा माणूस. वाचा, ऐका, शिका, धडपडा आणि ‘तयार व्हा’. प्रत्येक प्रयोगाला मार्किंग झालंच पाहिजे, काळा पडदा नीट लागलाच पाहिजे, अगदी चपलासुद्धा नीट रांगेत ठेवल्याच पाहिजेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी ट्रंका नीट लागल्याच पाहिजेत ह्याकडे जातीने लक्ष देणार. चिडणार, रागावणार, ओरडणार, पण नंतर राग शांत झाल्यावर जवळ येऊन हात हातात घेऊन रागावण्याचं कारण समजावणार. नाटकाच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जात नाही. आमचा दिग्दर्शक एवढा खमका म्हणून तर आमचे प्रयोग अनेक अडचणींवर मात करून विनासायास पार पडले. इतक्या विविध गावांध्ये प्रयोग पोचणं ही निश्चितच सोपी बाब नाही, पण ते शक्य झालं ते अतुलसरांच्या दांडग्या लोकसंग्रहामुळे! माणसं जोडण्याची कला शिकण्यासारखी. 

कोणतीही कला माणसाला अधिक संपन्न करते, बहुआयामी बनवते. मी खरं तर नाटक हौस म्हणून किंवा व्यवसाय म्हणून करत नाही, तर नाटक करणं मला आवडतं. गरजेचं वाटतं. या नाटकामुळे मला पैसा नाही मिळाला, प्रसिद्धी नाही मिळाली, पण मोलाचं असं शिक्षण मिळालं. दौऱ्यावर असताना प्रवास, त्यानंतर प्रयोग, पुन्हा प्रवास आणि पुन्हा प्रयोग करत असताना आपली ऊर्जा टिकवणं आणि ती प्रयोगात वापरणं हे जमायला लागलं. रंगमंचावरचा आत्मविश्वास आणि शांतता मिळाली. माझा आवाज चांगला नाही, असा मला असलेला गंड दूर झाला. या सगळ्याचा फायदा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या कार्यशाळेसाठी गेले होते तेव्हाही मला झाला. सुरुवातीला मी सूत्रधाराचं काम करतेय समजल्यावर काहीजण ‘अच्छा म्हणजे फक्त निवेदन का? ॲक्टिंग नाही?’ असं जरा संमिश्र सुरात म्हणालेही. वाईट वाटायचं, पण मला हे नाटक आवडलं, पटलं म्हणून मी ते स्वीकारलं आणि ती संधी न सोडल्याचा आनंद लाखपटींनी जास्त आहे. 

हे नुसतंच ऐतिहासिक घटनांवर, व्यक्तींवर आधारलेलं नाटक नसून, त्यातून आजमितीला घडणाऱ्या राजकीय, सामाजिक गोष्टींशी नातं जोडणारं आहे. आडनावावरून जात विचारणारी, ओळखण्याचा प्रयत्न करणारी माणसं मला भेटलीच नाहीत असं नाही. त्यांच्या अशा वागण्याने मनाला त्रासही झाला. मनामनांत जात किती घट्ट चिकटून बसलीय हे जाणवलं. रोजच्या जगण्यात, आजूबाजूला असलेलं राजकारण ‘मला राजकारण आवडत नाही’ असं म्हणून मलाच काय, कोणालाही टाळता येत नाही. म्हणूनच ‘माणूस’ म्हणून एकमेकांकडे बघण्याची विचारधारणा देणारं हे नाटक केवळ ऐतिहासिक कालखंडातलं न राहता वर्तमानाशी नाळ जोडतं. सामाजिक विचार मांडणारी कला मला सादर करायला मिळाली, याचं मूल्य माझ्या लेखी खूप जास्त आहे. 

ह्या प्रवासात कितीतरी आनंददायी क्षण वाट्याला आले. ज्यांचं काम आपण बघतो, ज्यांना अनुसरतो अशा दिग्गज नाट्यकर्मींनी आपलं नाटक पाहावं, कौतुक करावं हा अनुभव शब्दांत कसा मांडायचा? पहिला प्रयोग पाहिल्यानंतर, दीपाताई श्रीराम यांनी ‘अगं कुठे होतीस इतके दिवस?’ असं कौतुक केल्यावर जो काही आनंद झाला तो शब्दांत कसा व्यक्त करू? लोकांनी केलेलं कौतुक, प्रोत्साहन यामुळे कोणाला बरं वाटणार नाही! आत्मविश्वास दुणावला. 

‘सत्यशोधक’च्या प्रवासात माझ्या अभिनयात उत्क्रांती झाली असं मी अजिबात म्हणणार नाही, पण वेगळा विचार दिला. अडीअडचणींवर मात करून कोणत्याही परिस्थितीत चोख प्रयोग झालाच पाहिजे, अभिनेत्याने आपल्या सुदृढतेबद्दल सजग असलंच पाहिजे, नाटक हे तेवढ्यापुरतं सीमित न राहता जीवनदृष्टी व्यापक झाली पाहिजे, असं आणि आणखी बरंच काही पोटतिडिकीने सांगणाऱ्या नाटकवेड्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव दिला. नाट्यशाळेत जाऊन शिकायला मिळालं नसतं इतकं अतुलसरांकडून व प्रयोगांधून मिळालं. या शिक्षणाने अधिक समृद्ध केलं, कोणत्याही जागी मी प्रयोग करू शकते हा आत्मविश्वास दिला. नाटक करणं माझ्याकडून खचितच सुटणार नाही. पुढचं काम काय असेल हे माहीत नाही, पण अधिकाधिक चांगलं काम करत राहण्याची ऊर्मी ‘सत्यशोधक’ने दिली. वेगळ्या गावातून आलेल्या, व्यवसायाचं क्षेत्र वेगळं असलेल्या, नाटक करू पाहणाऱ्या नव्या जाणिवांसह ही वाट चोखाळण्याचं बळ दिलं! 

Tags: सावित्रीबाई फुले महात्मा फुले वेगळं भान देणारा प्रयोग सत्यशोधक नाटक अतुल पेठे प्राजक्ता पाटील Savitribai Phule Mahatma Phule Vegal Bhan Denara Pryog Satyshodhak Natak Atul Pethe Prajkta Patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात