डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला त्यांचा एक मोठा गुणविशेष भावला होता. आपली मतं जुळणाऱ्या लोकांना तर ते जाऊन भेटायचेच; पण मतभेद असणाऱ्यांनादेखील भेटायचे. मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये म्हणून ते प्रयत्न करायचे, आणि आता हा गुण फार दुर्मीळ झालेला आहे. आता मतभेद असणाऱ्याला आपला शत्रूच समजण्याची पद्धती रूढ झालेली आहे. ‘सरदार सरोवर व्हायला पाहिजे’ असं यदुनाथजीचं मत होतं, तर ‘सरदार सरोवर होऊ नये’ या मताचे बाबा होते. आणि त्यासाठी तिथं मध्य प्रदेशात जाऊन काही दिवस राहून बाबा आंदोलनातही सहभागीही झाले होते. पण यदुनाथजी तिथंही बाबांना भेटायला गेलेले होते. त्यांच्या परस्परविरोधी मतांचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नाही. 

आम्ही लहान असताना यदुनाथजी आनंदवनात आलेले होते. तेव्हा लोकांमध्ये कुष्ठरोग्यांविषयी गैरसमज होते. तो संसर्गजन्य रोग आहे असं लोकांना वाटायचं. समाजाच्या, नातेवाईकांच्या विरोधात जाऊनच बाबा ते काम करत होते. मित्रमंडळींनासुद्धा वाटत होतं की बाबांनी हे काय मागे लावून घेतलंय. तरीही थोड्याच दिवसांत बाबा आपल्या बायको-मुलांनासुद्धा आनंदवनात घेऊन आले. जमीनदाराचा मुलगा ते समाजसेवक हे बाबांचं परिवर्तन एव्हाना झालेलं होतं.  पण अजूनही बाबांचं काम लोकप्रिय किंवा समाजमान्य झालेलं नव्हतं. त्याच काळात कधीतरी यदुनाथजी आनंदवनात आले. मग त्यांनी साधनेत बाबा आणि आनंदवन यांच्याविषयी अधूनमधून लिहायला सुरुवात केली. साधनेचा वाचकवर्ग कमी असेल- पण जे होते ते चांगले लोक होते. त्यामुळं यदुनाथजींचं ते लिखाण अनेक मान्यवरांपर्यंत पोहोचलं.

यदुनाथजींविषयी माझं पहिलं इम्प्रेशन हे की हा एक हसतमुख आणि साधा माणूस आहे. इस्त्रीचे कपडे वापरणारे ते नव्हते. खादीचे चुरगाळलेले कपडे ते वापरायचे. बाबा आणि यदुनाथजी यांच्यामध्ये गांधीविचार आणि खादी हीसुद्धा एक कॉमन गोष्ट होती. महाराष्ट्राला आनंदवनाची ओळख करून देणाऱ्या काही लोकांमध्ये यदुनाथजींचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

बाबांचं काम सुरू झालं. तेव्हा सुरवातीला तिकडं कोणी फिरकत नव्हतं. मग अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे काही गांधीवादी लोक यायला लागले. साधनेतून ‘ज्वाला आणि फुले’ या सदरात बाबांची एकेक कविता छापून यायला लागली. वरोऱ्यामधले शिक्षक रमेश गुप्ता यांच्या पुढाकाराने त्या कविता आल्या. दरम्यान 1964 मध्ये साधनेत बाबांचा सत्कारसुद्धा झालेला. बाबांनी कधी वाढदिवस साजरा नाही केला. परंतु यदुनाथजींच्या आग्रहाखातर असेल- ‘अर्धशतक पूर्ती’ अशा नावाने तो सत्काराचा कार्यक्रम बाबांच्या पन्नासाव्या वर्षी झालेला. आणि त्याच नावाने तेव्हाचा साधनेचा विशेषांकसुद्धा यदुनाथजींनी काढला. त्याच्या आधी किंवा नंतर बाबांनी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. किंवा ते इतरांनादेखील त्या निमित्तानं काही विशेष करू द्यायचे नाहीत. पण तेव्हा ते साधनेत येऊनही गेले होते. 

1967 मधली गोष्ट असेल. एव्हाना आम्हां दोघा भावांना (विकास आणि मला) मेडिकलला प्रवेश मिळालेला होता. तेव्हा पु.ल. देशपांडे यांनी एक प्रदीर्घ पत्र लिहिलं. ‘प्रिय आमटे गुरुजी’ असं. बाबांना हे ‘गुरुजी’ नाव कसं पडलं होतं माहीत नाही. पण सुरुवातीला त्यांना लोक आमटे गुरुजी म्हणायचे. त्या पत्रात पुलंनी उल्लेख केलेला आहे की, साधनेत मी तुमची एक कविता वाचली, तोपर्यंत माझा एक समज होता की तुम्ही एक गांधीवादी आहात. त्याआधी पुलंचं ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटक आलेलं. त्यात त्यांनी गांधीवाद्यांची खिल्ली उडवली होती. ‘आम्हांला हे चालत नाही , ते चालत नाही, पथ्य पाणी अमुक तमुक’ असं म्हणत विधायक कार्याची जोड नसणाऱ्या या गांधीवाद्यांविषयी ते भाष्य होतं. आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे ते समाजापासून दूर गेले, असं पुलंचं मत होतं. बाबा आमटेदेखील त्यांपैकीच एक असावेत असं तोपर्यंत पुलंना वाटत होतं. ‘क्रांती ही सीतेसारखी असते, ती वनवासी रामाची साथ करते. आणि तो पुरुषोत्तम राम जेव्हा सत्तारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते.’ अशा अर्थाची बाबांची एक कविता पुलंनी साधनेत वाचलेली. एक गांधीवादी क्रांतीची अशी व्याख्या करतोय याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्या कवितेचा उल्लेख करत ते दीर्घ पत्र बाबांना पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि मग भेटीची वेळ ठरवून ते आनंदवनात आले. पुढे ते बाबांशी व आनंदवनाशी कायमचे जोडले गेले. पण ते पहिल्यांदा बाबांच्या संपर्कात आले त्याला निमित्त यदुनाथजी आणि त्यांची साधनाच ठरली असं म्हणावं लागेल. पुलं येऊन गेले आणि नंतर त्यांनी ‘किर्लोस्कर’मध्येे आनंदवनावर लेख लिहिला. ‘विज्ञानवादी बाबा’ असं काहीसं त्या लेखाचं नाव होतं.  तेव्हा किर्लोस्करचे वाचक खूप होते.

बाबांच्या ‘भारत जोडो’ आंदोलनामधे पूर्ण वेळ यदुनाथजी बाबांसोबत होते. 1985 आणि 88 मध्ये निघालेल्या दोन्ही (चार-पाच महिन्यांच्या) यात्रांमध्ये यदुनाथजी होते. तेव्हा ‘श्रमदान’ हाच शब्द बहुतांश वापरला जायचा. पण तासभर काम करायचं न करायचं आणि त्याला ‘दान’ म्हणायचं, हे योग्य नाही. शिवाय, तिथे श्रमाचं दान होत नाही तर श्रम करणाऱ्यावर श्रमाचे संस्कार होतात, म्हणून बाबा आणि यदुनाथजी यांनी ‘श्रमसंस्कार छावणी’ असं नाव ठेवलं. पुढं यदुनाथजींनी तेच ‘आंतरभारती श्रमसंस्कार छावणी’ करण्याविषयी सुचवलं. बाबा असेपर्यंत दरवर्षी 15 मे ते 22 मे या ठरलेल्या तारखांना ती व्हायची. यदुनाथजी येताना कोणी सहकारी, समविचारी यांना सोबत आणायचे. असेच त्यांच्या सोबत एकदा ना.ग. गोरे आले, एकदा एस.एम. जोशी आले. त्या काळातले सगळे समाजवादी एकेकदा तरी येऊन गेलेच. ही सगळी माणसं आनंदवनाशी जोडली गेली त्याला निमित्त यदुनाथजीच.

1970 मध्ये मी डॉक्टर झाल्यावर बाबा आम्हांला हेमलकसाला पिकनिकसाठी घेऊन आले, तेव्हाच मी तिथं काम करायचं ठरवलं. 1971 मध्ये बाबांनी 40-50 तरुणांना घेऊन आलापल्लीपासून हेमलकसापर्यंत पदयात्रा काढली. त्याला शिरुभाऊ लिमये, अनिल थत्ते आणि यदुनाथजी हेसुद्धा होते. आमची इंटर्नशिप चालू होती त्यामुळे आम्ही नव्हतो. बाबांच्या इच्छेनुसार आम्ही हेमलकसाला काम सुरू केलं. तेव्हा हेमलकसाला यायला रस्ता असा नव्हताच. होता तोसुद्धा पावसाळ्यात बंद व्हायचा. मग पावसाळा संपला की, बाबा ट्रक पकडून यायचे. सुरुवातीच्या तिथल्या पाच-सहा वर्षांमध्ये यदुनाथजीसुद्धा हेमलकसाला आलेले होते. त्यानंतर त्यांनी  त्यावर ‘तरुणाई’ नावाने एक लेख हिंदीमध्ये लिहिला होता.  आणि नंतर साधनचा हेमलकसावर त्यांनी एक संपूर्ण विशेषांक काढला.

मला त्यांचा एक मोठा गुण विशेष भावला होता. आपली मतं जुळणाऱ्या लोकांना तर ते जाऊन भेटायचेच; पण मतभेद असणाऱ्यांनादेखील भेटायचे. मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये म्हणून ते प्रयत्न करायचे, आणि आता हा गुण फार दुर्मीळ झालेला आहे. आता मतभेद असणाऱ्याला आपला शत्रूच समजण्याची पद्धती रूढ झालेली आहे. ‘सरदार सरोवर व्हायला पाहिजे’ असं यदुनाथजीचं मत होतं, तर ‘सरदार सरोवर होऊ नये’ या मताचे बाबा होते. आणि त्यासाठी तिथं मध्य प्रदेशात जाऊन काही दिवस राहून बाबा आंदोलनातही सहभागीही झाले होते. पण यदुनाथजी तिथंही बाबांना भेटायला गेलेले होते. त्यांच्या परस्परविरोधी मतांचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नाही.

दुर्दैवाने माझा आणि यदुनाथजींचा घनिष्ठ संबंध आला नाही. नागपुरातले संघवाले बाबांना समाजवादी समजायचे तेही यदुनाथजींमुळेच. पण बाबांनी स्वतःला असं काही लेबल लावून घेतलं नाही. आनंदवन सर्वांसाठी खुलं असायचं. त्यामुळं वेगवेगळ्या पक्षांतले वेगवेगळ्या विचारसरणींचे लोक खासकरून तरुण आनंदवनात यायचे, राहायचे. बाबांनी स्वतःला लेबल लावून न घेतल्यामुळे कुणाला आनंदवनात येताना संकोच वाटला नाही. तसंच यदुनाथजी जाहीरपणे समाजवादी असूनही कुठल्याही विचारसरणीच्या लोकांना भेटताना त्यांना संकोच वाटायचा नाही इतके ते साधे होते. आजच्या काळात असे निरनिराळे लोक भेटले की लोकांना ती कॉन्स्पिरसी वाटते.

आणीबाणीच्या वेळी आम्ही एकदा पुण्याला गेलो होतो. तेव्हा यदुनाथजी साधनेतून आणीबाणीच्या विरोधी सतत लिहीत होते. आणि ते अंक गोपनीयता राखून वाटत होते.  त्या वेळी हमीद दलवार्इंना अटक करून जेलमध्ये ठेवलेलं. यदुनाथजी त्यांना भेटून साधनेचा अंक देणार होते. इतक्या कडक बंदोबस्तात त्यांना भेटायला जाऊन अंक देण्याची हिंमत यदुनाथजी करत होते. तेव्हा त्यांनी आपल्या जॅकेटमधे साधनेचा अंक लपवला आणि मला घेऊन जेलमध्ये गेले. दलवाईचं तेव्हा किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालेलं होतं. ते यदुनाथजींना म्हणाले, ती दारूवालाची किडनी लावल्यापासून स्वतःच स्वतःचा जीव घ्यावा असं कधी कधी वाटतं. माझा आणि दलवार्इंचा आधी परिचय नव्हता, तीच आमची पहिली भेट.

यदुनाथजींच्या पत्नी जान्हवीताई आनंदवनात येऊन गेल्या होत्या. मंदावर त्यांचा जीव होता. जान्हवीतार्इंच्या आईसुद्धा आनंदवनात राहून गेलेल्या आहेत.

यदुनाथजी शेवटी अर्धांगवायूने आजारी होते तेव्हा पत्रकार नगरमध्ये त्यांना बघायला आम्ही गेलो होतो. त्यांनी बाबांना आपल्या परीने शक्य ती सर्व मदत केली. प्रत्यक्ष बाबांच्या बरोबर राहून त्यांच्या कामात सहभागी होणं शक्य नसेल तर त्यांच्या कामाविषयी लिहावं, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवावं, त्यासाठी मदत मिळवावी असा यदुनाथजींचा विचार असावा. बाबांच्या नव्या नव्या कल्पनांना ते साधनातून हायलाइट करायचे. बाबांना त्यांचं कौतुक होतं. बाबांनी त्यांना ‘माझ्या स्वप्नांचा सहोदर’ म्हटलेलं आहे. ‘माझ्या स्वप्नपूर्तीसाठी माझी साथ देणारा तो माझा मित्र,’ असं त्यांना म्हणायचं असावं.

(शब्दांकन : मृद्‌गंधा दीक्षित)

(बाबा आमटे आणि यदुनाथ यांच्यातील मैत्रीपर्व, डॉ.प्रकाश आमटे यांनी जवळून अनुभवले आहे.  साधना परिवार आणि आनंदवन परिवार यांच्यातील 1960 ते 80 या दोन दशकांतील नात्याचाही त्यातून अंदाज येतो.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके