डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अण्णा आणि नानासाहेब आम्हां समाजवादी परिवारातील धडपडणाऱ्या मुलांची दैवतं. मुलांच्या निकोप वाढीसाठी आई आणि वडील दोघांचीही जी गरज असते ती नानासाहेब आणि अण्णांनी भागवली. कोण आई आणि कोण वडील? दोन्हीही भूमिका दोघेही वठवित होते.

किती तुमची भिन्न व्यक्तिमत्त्वं? किती वेगवेगळ्या तुमच्या सवयी, आवडीनिवडी! पण भिन्न भिन्न प्रकृतीचे असूनही, परस्परविरोधी गुणांचा समुच्चय तुमच्यात असूनही ते गुण एकमेकांस पूरक आणि आपल्या परिवारासाठी तारक होते.

“त्या दिवशी पहाटे अगदी लवकर फोन खणखणला. मनात धस्स झालं. खरं तर वेळी अवेळी फोन खणखणणं हे आम्हाला काही नवं नाही. पण त्या दिवशी तसं झालं खरं. अशीच एका वर्षी 17 जानेवारीला रात्री फोनची घंटी खणखणली आणि नाथच्या निधनाची बातमी समजली आणि आता नानासाहेबांच्या आकस्मिक मृत्यूची.दुःखद बातमी फोनने दिली. तुमच्या दृष्टीने तुमचा मृत्यू माणसाला यावा तसा म्हणजे 'अनायासेन' असला तरी आमची त्यासाठी तयारी नव्हती.

तुमचं वय, तुमची प्रकृती लक्षात घेता आम्ही तुमच्या निरोपासाठी तयार असायला हवं होतं. पण तुमचा सततचा प्रवास, तुमची तळमळ आणि तुमची प्रखर बुद्धी यांना कुठेही वयाची बाधा झालेली नसल्यामुळे अजून बरीच वर्ष तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभेल असे वाटले होते. आजूबाजूला अंधकार दाटत असताना, आयुष्यभर जपलेली मूल्यं धडाधड कोसळत असताना संभ्रांत मनाला नानासाहेब, तुमच्या मार्गदर्शनाची फार आवश्यकता असताना तुम्ही गेलात. सर्व जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर सोडून, पण ज्यांच्या खांद्यावर धुरा दिलीत त्यांचे खांदे ही जबाबदारी पेलू शकण्याइतके कणखर आहेत का? काळ फार बाका आहे.

अण्णा आणि तुम्ही आम्हां समाजवादी परिवारातील धडपडणाऱ्या मुलांची दैवतं. मुलांच्या निकोप वाढीसाठी आई आणि वडील दोघांचीही जी गरज असते ती तुम्ही आणि अण्णांनी भागवली, कोण आई आणि कोण वडील? दोन्हीही भूमिका तुम्ही दोघेही वठवित होता.

किती तुमची भिन्न व्यक्तिमत्त्वं? किती वेगवेगळ्या तुमच्या सवयी, आवडीनिवडी!

पण भिन्न भिन्न प्रकृतीचे असूनही, परस्परविरोधी गुणांचा समुच्चय तुमच्यात असूनही ते गुण एकमेकांस पूरक आणि आपल्या परिवारासाठी तारक होते.

तुम्ही तसे गंभीर प्रकृतीचे. विद्वान पण रसिक, चोखंदळ आणि निग्रही. तुमच्या शिस्तप्रिय- काटेकोर वागण्यातून- तुमच्या तर्क शुद्ध विचारसरणीमुळे अनेकांचा तुमच्याविषयी गैरसमज होत आला आहे. कार्यकर्ते तुमच्याजवळ यायला दबत. कठोर दिसणाऱ्या या ऋषितुल्य माणसाच्या हृदयात वाहणाऱ्या कोमल भावनांचा स्पर्श ज्यांनी अनुभवला त्यांनाच तुमच्या अंतःकरणाचा ठाव लागला.

तुम्हांला अघळपघळपणा आवडत नसे की भावनांचे प्रदर्शन खपत नसे. पण त्याचा अर्थ तुम्ही शुष्क होता असे नव्हे.

कर्तव्यनिष्ठा आणि प्रेमळपणा यांचा सुंदर संयोग पहाण्याचा योग आम्हाला तुमच्याजवळ मिळाला, सुमतीबाईंची तुम्ही केलेली सेवा आमच्या तथाकथित पुरोगामी कार्यकर्त्यांनी आदर्श समजून त्याचे अनुकरण केले पाहिजे.सुमतीबाईच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी केलेले हट्ट किती शांतपणे न कुरकुरता तुम्ही पुरवलेत! आपल्या खडतर जीवनातली सहधर्मचारिणी लौकर थकली तर तुम्ही तुमचे बलवान हात पुढे करून त्यांना आधार दिला.

त्या आजारी असतानाही आणीबाणी- विरोधी लढ्यात तुम्ही पुढे झालात. सुमतीबाई गेल्या तेव्हा तुम्ही ज्या धैर्याने आपला शोक आवरलात, जो बांध तुम्ही अमेय राखलात, तो नानासाहेब, अण्णांच्या आजाराने ठिसूळ झाला.

मातृमंदिरमध्ये घेतलेल्या शिबिराला मी हजर होते. अण्णा पहाटे संडासात जाताना कोसळले आणि मग त्यांना बिछानाच गाठावा लागला. त्या नंतरच्या अभ्यासवर्गाच्या वेळी नानासाहेब, तुम्हांला हुंदका आवरेना. तुमच्या तोंडातून शब्द फुटेनात. अण्णांच्या चिंतेने तुम्हाला ग्रासलं होते. त्यांच्याबद्दलच्या तुमच्या कोमल भावनांची तीव्रता त्या वेळी आम्हांला जाणवली. सुमतीबाईंचा निरोप घेताना जो संयम तुम्ही पाळलात, अश्रू अडवण्यासाठी जो बांध तुम्ही घातलात तो अण्णांच्या काल्पनिक वियोगाच्या कल्पनेनेही ढासळला.

बाहेर कठोर दिसलात, थोडेसे अलिप्त वाटलात तरी कार्यकर्त्यांच्या अडचणींकडे तुमचं एखाद्या घारीसारखे लक्ष असे. तुम्ही कार्यकर्त्यांच्या अडचणींना कसे उपयोगी पडला हे फक्त तुम्ही आणि ते कार्यकर्ते जाणीत. मी तो प्रसंग कसा विसरू? जनता पार्टीच्या सरकारला शेवटची घरघर लागली होती. आमचे समाजवादी मित्र फूट पाडण्यात आघाडीवर होते. सरकार कसं वाचवावं ह्याची खलबतं चालली होती.

आमच्या घरी दिवस-रात्र सभा चालल्या होत्या. सभेबरोबर अर्थातच चहा-पाणी जेवणखाण होतंच.

नानासाहेब, कुणाच्याही लक्षात आली नाही अशी गोष्ट तुम्हाला जाणवली. अण्णा आणि तुम्ही दोघेही आमच्याकडेच होता. तुम्ही मला आपल्या खोलीत बोलावून घेतलंत आणि एक पाकीट देऊ केलंत, मला समजेना पाकीटात काय आहे ते. त्यात पैसे होते. मी घेण्याचं अर्थात नाकारलं, नानासाहेब, तुम्ही किती रागावला माझ्यावर त्या वेळी. म्हणालात, "हा खर्च तुम्हांला कसा झेपणार? हे काय तुमच्या घरचं कार्य आहे? हे पक्षकार्य आहे. या सभा ही आमचीही जबाबदारी आहे आणि तू आम्हांला आपल्याच कुटुंबाचे वडीलधारे मानत असशील तर ही फुलाची पाकळी तू स्वीकारलीच पाहिजेस." माझा नाइलाज झाला.

आमचं लग्न झाल्यापासून तुम्ही दोघेही दिल्लीत किंवा मुंबईत आमच्याकडेच उतरत होता. तुमच्या आगमनाची किती उत्सुकतेने आम्ही वाट पाहत असू! अगदी आमचे नोकर चाकरही. तुमच्या आवडी-निवडी जपण्यात, तुमचं पथ्यं पाणी सांभाळण्यात खूप आनंद वाटे.तुम्ही चोखंदळ त्यामुळे थोडीशी भीतीही वाटायची. पण मुख्य म्हणजे किती प्रश्न मला विचारायचे असायचे. कितीतरी शंकांचं निरसन करून घ्यायचं असायचं. जेवताना, खाताना, फिरायला जाताना, अगदी सिनेमा पाहून येतानाही आपल्या चर्चा चालत. त्यावर माझं मन पुष्ट होत असे. दिवस कसे भरभर पळत आणि मग तुमचा जाण्याचा दिवस उगवे.

महिला दक्षता समितीच्या कामात तुम्ही आणि अण्णांनी मला नेहमीच उत्तेजन दिलं. आपल्या व्यथा सांगायला माझ्याकडे स्त्रिया येत. त्यांच्या कहाण्या ऐकून तुम्हीही हेलावले जाते.स्त्री-जीवनाविषयी किती चर्चा आपण केल्या?

नानासाहेब, एकदा गर्भपाताविषयी तुम्ही बोललात तेव्हा मीही सर्दच झाले. तुम्ही म्हणालात, "गर्भपाताचा कायदा म्हणजे स्त्रीमुक्तीचे द्वार आहे. अर्थासहित मातृत्व नाकारण्याचा अधिकार स्त्रियांना त्यामुळे मिळेल, मातृत्वाचा अवास्तव गौरव करत योनिशुचितेच्या कल्पनेचं लोढणं स्त्रीच्या गळ्यात धूर्त पुरुषांनी बांधले आणि तिच्यावर स्वामित्व प्रस्थापित केले. या कायद्यामुळे स्त्री भयमुक्त होऊ शकेल. जास्त आत्मनिर्भर होईल."

लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाने जी वेगवेगळी गर्भविसर्जनाची शास्त्रीय साधनं पुढे येत आहेत ती पाहिल्यानंतर गर्भपाताने स्त्री मुक्त होते आहे की ती पुरुषांच्या लैंगिक वासनेची शिकार बनून पुन्हा पुरुषच आपल्या जबाबदारीलून मुक्त होतोय, तेच समजत नाही. त्याविषयी तुमच्याशी पुन्हा बोलायचं होतं.

तुमच्या सहवासात- परीस स्पर्शाने माझे सोनं झालं की नाही मला माहीत नाही, पण राधाला पाहिलं, तिच्या भाचीला पाहिले की तुमच्या परीस स्पर्शाची जाणीव होते.

नानासाहेब, तुमच्या सर्वच गोष्टी आखीव- रेखीव. तुमचे भाषण मुद्देसूद तसंच लेखन बांधेसूद. कुठे म्हणून उणेपणा नव्हता. त्यामुळेच पैशांच्या बाबतीतही तुम्ही काटेकोर होता. अनाठायी खर्च करणं तुम्हांला रुचत नव्हतं म्हणून गरजू कार्यकर्त्यांना मदत करताना तुम्ही हात आखडला नाहीत. दानही सत्पात्री असावे हा तुमचा कटाक्ष, काही जणांना तो आक्षेपार्ह वाटे. म्हणूनच स्वतःची सर्व संपत्ती आणि मालमत्ता तुम्ही सार्वजनिक कार्यासाठी वाटून दिलीत. देहदानाची इच्छा मात्र अपुरी राहिली.

तुम्ही म्हणत असा की आमच्या पिढीची स्वप्न साकारलेली बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, श्रम साफल्याचा अनुभव आमच्या वाट्याला आला, स्वातंत्र्यासाठी लढलो, देश स्वतंत्र झाला. गोवामुक्तीसाठी झटलो, गोवा स्वतंत्र झाला. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला पाहिला. आणीबाणीविरुद्ध लढलो लोकशाहीचा विजय झाला. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढलो.इंदिरा गांधी, राजीव गांधी सत्तेवरून दूर झाले. सामाजिक न्यायाची स्वप्नं पाहिली. मंडल कमिशनला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. पण ज्यासाठी म्हणून तुम्ही लढला, त्या लढायांच्या शेवटी जन्मभर जतन केलेल्या मूल्यांची होळी होताना तुम्ही पाहिली ना? ज्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही सर्व हयात खर्च केली तेच स्वातंत्र्य गहाण टाकण्याचे प्रयत्न होताना तुम्ही पाहिलेत ना? नानासाहेब, सध्या मी संभ्रान्त आहे. माझ्या मनात अनेक शंका आहेत. अनेक ग्रन्न आहेत. त्यांचे निरसन करायला तुम्ही नाहीत ह्याची राहून राहून जाणीव होते.

समाजवाद्यांना फुटीचा शाप आहे. आजपर्यंत समाजवादाच्या अस्सलतेवरून आमच्यात मतभेद झाले. पण आता जागतिकीकरणाच्या नावे जगभर विकासवादाच्या बाटलीत भरलेला चंगळवाद विकला जातोय. व्यापाराधिष्ठित नवी अर्थव्यवस्था भारतासारख्या तिसन्या जगतातील जनतेसाठी गळफास ठरणार की वरदान ह्याविषयी निर्माण केल्या गेलेल्या गदारोळात मार्ग कुंठित झाला आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता हयांवावत तडजोड नाही ही आपली भूमिका. स्वावलंबनासाठी रोजगार आणि रोजगारापासून स्वाभिमान याची महती पुन्हा गावी का? मूठभरांच्या सुखासाठी बहुसंख्यांचा बळी घायचा का? का विकासाच्या संकल्पनाच बदलायच्या? मला समजत नाही. नानासाहेब, ह्या यादंगापासून बाहेर निघायला हवे. तुम्ही असता तर तुमच्याकडे उत्तर मागायला आले असते. आता काय करू?

माझ्यासारख्या अनंत संभ्रान्त सेवा दल सैनिकांना मार्ग कोण दाखवणार?

'मुळूमुळू रडू नका, पुन्हा धैर्याने वाटचाल करा', असे तुम्ही सांगणार!

पण आम्हाला चाचपडायचं नाही. डोळस निर्णय घ्यायचा आहे. कोण दाखवील आम्हांला मार्ग?”

Tags: जनता पार्टी. प्रमिला दंडवते Janata Party #Pramila Dandwate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके