डिजिटल अर्काईव्ह

नेलगुंडाच्या शाळेसंदर्भात सर्वांत धाडसी पण महत्त्वाची गोष्ट मला वाटली, ती शाळेच्या भाषा माध्यमाची. पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा संपूर्णपणे इंग्रजी माध्यमाची आहे. या विषयावर समीक्षा आमटे यांची भूमिका पटणारी आहे. या मुलांची बोली मराठी नाही, ती माडिया आहे. त्यांच्यासाठी मराठी असो की इंग्रजी, दोन्ही भाषा परकीयच आहेत. शिक्षणक्रमात या मुलांना पुढे इंग्रजीलाच सामोरे जावे लागणार आहे. लोकबिरादरीच्या हेमलकसाच्या शाळेचा अनुभव पाठीशी आहेच. म्हणून शाळेच्या दैनंदिन व्यवहारात माडिया आणि इंग्रजीचा जाणीवपूर्वक वापर सर्व विद्यार्थी व शिक्षक करतात, असे दिसले.

नेलगुंडा. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस किलोमीटरवर असलेले एक छोटेसे आदिवासी खेडे. हेमलकसाच्या लोक बिरादरी प्रकल्पाची एक आगळीवेगळी शाळा नेलगुंडाला आहे. त्या शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर लिहिले आहे, ‘चुकते कई बातल आयो.’ मी समीक्षा आमटेंना विचारलं, ‘‘ह्याचा काय अर्थ?’’- ‘‘ह्याचा अर्थ- चुकलं तर चुकलं, काळजी नको!’’ या उत्तरामागे अनेक संदर्भ कसे दडलेले आहेत, ते पुढे ती जिवंत शाळा बघताना लक्षात आले.

हेमलकसाच्या या वेळच्या भेटीत नेलगुंडाच्या साधना विद्यालयाला भेट देता येईल, असे वाटले नव्हते. पण अनिकेत आमटे यांच्या सूचनेवरून समीक्षा आमटेंच्या गाडीतून गेलो. हेमलकसा ते नेलगुंडा अंतर फार नसले, तरी रस्ता फार खडतर. पण इसुकी या जपानी गाडीमुळे प्रवास थोडासा सुखकर झाला. जाताना तिथल्या जंगलाविषयी आणि माडिया आदिवासी जीवनासंबंधी आमच्या चर्चा सुरू होत्या. एका ठिकाणी समीक्षाने गाडी अचानक थांबवली आणि एक दृश्य दाखविले. एका झाडाला वानर टांगलेले दिसले. अर्थात ते पेंढा भरलेले होते. माडिया गोंड अशुभनिवारण म्हणून अशा प्रकारे झाडावर ते टांगतात. त्या अनुषंगाने आदिवासींच्या प्रथा-परंपरा, लोककला, लोकगीते-लोककथा याविषयी बोलणे होत होते. जाता- जाता मुंग्यांची वारूळे, झाडाझाडांतून सूर मारणारे विविध पक्षी यांची त्या ओळख करून देत होत्या. मी स्वतः गडचिरोली जिल्ह्यातील असलो, तरी माझी बरीचशी माहिती पुस्तकीच.

खरे तर वरोरा येथील महारोगी सेवा संस्था बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी व पुनर्वसनासाठी स्थापन केली होती. हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प त्याच ट्रस्टचा एक भाग. पूर्वी भामरागडच्या घनदाट अरण्यात दळणवळणाच्या कोणत्याच सोई नव्हत्या. रोगराई आल्यास किंवा जंगली जनावराने हल्ला केल्यावर आदिवासींकडे भगत आणि मंत्रतंत्र याशिवाय कोणताच इलाज उपलब्ध नव्हता. उपचाराअभावी मृत्यूलाच तोंड द्यावे लागे. डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांनी हेमलकसाच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या आरोग्यसेवेतून लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले. पण त्या भागात मुलांच्या शिक्षणाच्या सोईही फार नव्हत्या, म्हणून त्यांनी लोकबिरादरी शाळा सुरू केली. शाळाखात्याच्या अनेक अडथळ्यांना पार करावे लागले. या शाळेतून बाहेर पडलेले काही माडिया विद्यार्थी खूप पुढे गेले. अहेरी येथे आरोग्यसेवा देत असलेले डॉ.कन्ना मडावी हे एक उदाहरण.

तर पुढे ‘हेमलकसाच्या दूरवर असलेल्या खेड्यातील लहान मुलांच्या शिक्षणाचे काय?’ असा प्रश्न लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ.दिगंत आणि अनिकेत आमटे यांना पडला. त्याचे उत्तर म्हणून कदाचित नेलगुंडा या गावाची निवड केली असावी आणि 2015 मध्ये तिथे आगळीवेगळी एक शाळा साकार झाली. या शाळेची जबाबदारी समीक्षा आमटे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे, असे कुणाला न विचारातही आपल्या लक्षात येते. जाताना नेलगुंडाच्या शाळेबद्दल समीक्षा भरभरून बोलत होत्या. आजूबाजूच्या दहा-बारा गावांतील मुलं या शाळेत येतात. पण सगळ्या वाटा जंगलातूनच आहेत, त्यामुळे जंगली प्राण्यांची भीती असते. एकदा तर मुलांच्या मागे अस्वल लागले होते. आता त्यांच्यासाठी सायकली घेतल्या आहेत.

आमच्या गाडीला एका मुलीने अचानक समोर येऊन थांबवले. तिच्या बरोबर कडेवर मूल आणि एक गाठोडे घेतलेली एक माडिया तरुण स्त्री होती. मुलगी म्हणाली, ‘‘ताई, या बाईला समोरच्या गावी जायचे आहे, तुमच्या गाडीत न्याल का?’’ अर्थातच समीक्षाताईंनी गाडीचे दार उघडून त्या बाईला बसवलं. तिची भरपूर चौकशी केली. त्या परिसरात कुठलीच वाहनव्यवस्था नसल्याने त्या लोकांचे कसे हाल होतात, ते मला सांगितले. रस्ता खरोखरच फार दुर्गम होता. मोठमोठे खड्डे आणि दगड- धोंडे चुकवत गाडी चालवणे सोपे नव्हते. अतिशय कौशल्याने समीक्षा गाडी चालवत होत्या. एका वेळी एक वाहन जाऊ शकेल, असा एक पक्का पूल मात्र एका जागी दिसला. पण एकूण प्रवास खडतरच. रस्त्याचा आणि शिक्षणाचादेखील.

6 जून म्हणजे नेलगुंडा शाळेचा शेवटचाच दिवस होता तो. भामरागड परिसरात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुढे दोन महिने शाळा बंद असणार होती. नेलगुंडाची शाळा ही पहिली ते पाचवीपर्यंतची होती. शासनाची मान्यता असली तरी विनाअनुदान होती, कारण ती पूर्णपणे इंग्रजी माध्यमाची होती. पण त्यामुळे आम्हाला पठडीतील शाळेपेक्षा आमच्या पद्धतीने चालवता येते याचा आनंद आहे, असे समीक्षा म्हणाल्या. उदाहरणार्थ- जून, जुलैमध्ये पाऊस असल्याने शाळा बंद ठेवता येते. शाळाखात्याचे धोरण एकसूत्री असते. त्यात स्थानिक गरजांचा आणि लोकांच्या समस्यांचा विचार कसा केला जात नाही, यावर आमची बरीच चर्चा झाली. पावसाबरोबरच आदिवासींच्या लोकजीवनात काही विशिष्ट सण-समारंभांना फार महत्त्व असते. याउलट ज्या दिवशी सरकारी सुट्‌ट्या असतात, त्यांचे त्यांना तसे महत्त्व नसते. येथील आदिवासींचे जीवन, त्यांच्या गरजा आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून शाळा त्यांच्या सोईची कशी होईल, ते बघतो. शाळा जर अनेक अडचणी निर्माण करीत असेल, तर मुलांना पाठविण्याचा उत्साह त्यांच्यात असणार नाही.

नेलगुंडाची शाळा चालवताना आमटे कुटुंबीयांनी घेतलेल्या या भूमिकेला दोन पदर आहेत. ‘शिक्षण’ ही स्वतंत्र गोष्ट नाही. अध्यापन आणि मूल्यांकनासाठी राज्य शासनाने स्वत:ची एक प्रणाली निर्माण केली आहे. नेलगुंडाची शाळा स्वायत्त नाही, पण स्वतंत्र आहे. हे एक प्रकारे राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हानच आहे. दुसरीकडे आदिवासींच्या सामाजिक व भौगोलिक परिस्थितीशी जुळवून त्यांच्यापर्यंत शिक्षण घेऊन जाणे, ही एक गोष्ट आहे. मला ही दुसरी गोष्ट महत्त्वाची वाटते. यात उदारमतवाद व बहुसांस्कृतिकता आहे. त्या-त्या समूहाचे भाषिक आणि सांस्कृतिक अस्तित्व मान्य करणे आहे. लोकशाहीच्या शुद्ध रूपाकडे जाणारा तो प्रवास आहे. शिक्षणाच्या एकाच मध्यवर्ती साच्यात सर्वांना कोंबण्यापेक्षा, शेवटच्या स्तरावरील समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणताना त्याचे सत्त्व जपण्याची ही मौलिक भूमिका रवीन्द्रनाथ टागोर यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे.

नेलगुंडाच्या शाळेसंदर्भात सर्वांत धाडसी पण महत्त्वाची गोष्ट मला वाटली, ती शाळेच्या भाषा माध्यमाची. पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा संपूर्णपणे इंग्रजी माध्यमाची आहे. या विषयावर समीक्षा आमटे यांची भूमिका पटणारी आहे. या मुलांची बोली मराठी नाही, ती माडिया आहे. त्यांच्यासाठी मराठी असो की इंग्रजी, दोन्ही भाषा परकीयच आहेत. शिक्षणक्रमात या मुलांना पुढे इंग्रजीलाच सामोरे जावे लागणार आहे. लोकबिरादरीच्या हेमलकसाच्या शाळेचा अनुभव पाठीशी आहेच. म्हणून शाळेच्या दैनंदिन व्यवहारात माडिया आणि इंग्रजीचा जाणीवपूर्वक वापर सर्व विद्यार्थी व शिक्षक करतात, असे दिसले. जैवविविधतेप्रमाणे मानवी अस्तित्वासाठी भाषिक विविधताही महत्त्वाची आहे. किंबहुना, कला आणि  जीवनमूल्यांचा विचार केला, तर भाषिक विविधता अधिक महत्त्वाची ठरते. एखाद्या भाषिक समूहाचे हजारो पिढ्यांचे ज्ञान त्यांच्या भाषेतच दडलेले असते. ते त्यांच्या जैविक आणि सामाजिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग असते. त्यामुळे माडिया मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मायबोलीच्या कोशाचा आधार कायम असणे गरजेचेच असते.

नेलगुंडा शाळेच्या परिसरात प्रवेश करताच ती शाळा आहे असे वाटतच नाही. जपानी पॅगोडासारखे सर्व बाजूंनी मोकळे असलेले सुंदर डोम आहेत. भोवतालच्या झाडीमुळे हवेशीर छपराखाली बसतंना मुलांना बंदिस्त वर्गात बसल्यासारखे वाटतच नाही. काही ठिकाणी पायऱ्या चढून उंचावर वर्गखोली, तर नुसत्या बांबूपासून बनविलेली एक अतिशय सुंदर झोपडी. मुलांना बसायला चौरंगासारखी आसने. शिक्षकालाही तसेच. त्याच उंचीवर फळा. मुलांना खेळा-बागडायला खूप-खूप मोकळी जागा सोडली आहे. मुळातल्या लहान-मोठ्या झाडांच्या आधारे जुन्या टायरसारख्या वस्तूंनी झुले बनविलेले दिसतात. विटा- सिमेंटचे बांधकाम कमी करण्याचा प्रयत्न दिसतो. पहिल्याच पावसाने सगळीकडे हिरवेगार दृश्य होते.

मोकळेपणा हा केवळ तेथील वर्गखोल्यांमध्येच नाही, तर एकूणच सगळ्यांच्या बोलण्या-चालण्यातून सहजपणे जाणवत होता. आम्ही तिथे जाऊन पोहोचलो, तर चौथीतला एक मुलगा हळूच समीक्षाच्या मागे गेला, पाठीवर धपाटा दिला आणि कसे चकवले म्हणून खो-खो हसायला लागला. एका ठिकाणी एकाच वेळी दोन वर्ग सुरू होते. काही मुलं फळ्यासमोर बसलेली, तर काही मागे चित्र काढत किंवा मातीकाम करीत असलेली. काही मुलं बाहेर नुसतीच हुंदडताना दिसत होती. खूप मुलं बाहेर मातीत खेळत होती. एका मुलाला कुठे तरी लागलं, तो रडत-रडत आला. सगळी मुलं गोळा झाली. समीक्षाने त्याला समजावलं. समजावताना भाषा माडिया आणि इंग्रजी. सगळी मुलं इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. एकूणच वातावरण अत्यंत उत्साही आणि प्रसन्न होते. एरवीच्या सरकारी शाळांमधील मुलांमध्ये कोंडवाड्यात कोंबलेपणाचे दिसणारे भाव एकाही मुलाच्या चेहऱ्यावर नव्हते.

लोकबिरादारी प्रकल्प हा केवळ गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे आरोग्य व शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. गांधीवादी वृत्तीने सेवाभाव जपणाऱ्या महानगरी तरुण पिढीच्या आदर्शाचा एक भाग झाला आहे. म्हणूनच नेलगुंडाच्या साधना विद्यालयात मुलांना शिकवायला मुंबई-पुण्याचे हायटेक क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण सातत्याने तिथे मुक्कामाला असतात. मी गेलो तेव्हा शाळेत ठाण्याचा कल्पेश झुंजारराव आणि डोंबिवलीचा विजय चांगण वर्ग घेताना भेटले. सामाजिक बांधिलकी आणि सेवेचे घेतलेले व्रत यांचा एका शब्दानेही उच्चार न करता ते त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते.

Tags: विजय चांगण डोंबिवली कल्पेश झुंजारराव ठाणे भौगोलिक परिस्थिती सामाजिक आदिवासी डॉ.दिगंत आमटे डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे कुष्ठरोग बाबा आमटे महारोगी सेवा संस्था लोकगीते-लोककथा लोककला प्रथा-परंपरा माडिया आदिवासी अनिकेत आमटे साधना विद्यालय समीक्षा आमटे लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा गडचिरोली नेलगुंडा Tribal Stories Tribal Songs Vijay Changan Kalpesh Jhunzarrao Dombivali Thane Geographical Situation Geography Sociological Dr. Digant Amte Dr. Manda Amta Dr. Prakash Amte Baba Amte Magarogi Seva Sanstha Culture Tribal Area Madiya Tribes Aniket Amte Sameeksha Amte Samiksha Amte Lokbiradari Project Hemalkasa Maharashtra Gadchiroli Nelgunda weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके