डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उतरंडीतला वरचा खालच्याला हाणतो नि खालचा त्याच्याही खालच्याला हाणतो, या हाणामारीत जातीय आणि धार्मिक दंगे पेटतात. माणसांचे मुडदे पडतात. पुरुष नि स्त्रियांच्यात संख्येपासून दर्जापर्यंत असमतोल निर्माण होतो. स्पर्धा करण्याची कुवत निर्माणच न झालेला निस्तेज समूह, राष्ट्र म्हणून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मूठभर लोकांकडे एकवटलेल्या बुद्धिसंपतेच्या जोरावर जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्नं पाहतो... झोप न उडाल्याचंच हे लक्षण!

शरीराची नव्यानं ओळख होते तेव्हाचं वय तसं विलक्षण असतं. हे हुळहुळं असतं नि खुळंही असतं. छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावलं जातं तसंच मोहरतंही... बदल नुसते शरीरातच नाही होत.... मनातही मोठी उलथापालथ माजलेली असते. शरीराची वळणं बदलतात... मनाला असंख्य वाटा फुटतात.. स्पर्शाचं सुख सरसरून डोकं वर काढतं... भोवतालच्या चौकटी काचायला लागतात. भिंती फोडून मनातलं वादळ सोसाटू पाहतं... अवघ्या व्यक्तिमत्त्वालाच उधाणाची भरती येते...

मना-शरीराला अशी भरती आली की किनाऱ्याकडे नेणारी प्रत्येक नाव आपली वाटू लागते. कित्येकदा धरून ठेवायला छोटं फळकुटही पुरतं. पलीकडचं कुणीतरी साद घालत असतं. निदान तसं वाटत तरी असतं...

निसर्गानं भरभरून दिलेलं हे दान माणूस वगळता बाकीची चराचर सृष्टी पुरेपूर स्वीकारते. माणसाच्या जातीला मात्र नियमांची असंख्य कुंपणं असतात. जन्मापासून मरेपर्यंत व्यवहार पुरलेले असतात. भूक पोटाची असो की स्पर्शाची, ती कशी भागवायची ते ज्याच्या-त्याच्या सामाजिक ऐपतीवर ठरते. भारतासारख्या देशात ते जाती पातीच्या उच्च- नीचतेवरही ठरतं. बाई-माणसाच्या जन्माला आलं तर मग ही कुंपणं अधिकच काटेरी होतात. स्पर्शाची जाणीव भारतीय स्त्रियांसाठी क्वचितच मखमली असते. वाट्याला येतं ते जात- पातीचा आणि पतीच्या कुटुंबाचा विस्तार करण्याचे काम, स्पर्शाची पहिली पालवी फुटली रे फुटली की त्याच्या ओढीत पोरीनं कुटुंबाचे नि गाव,समाजाच नाक कापण्याआधी तिच्यावर मालकीहक्क प्रस्थापित झालेला बरा, कुणीतरी तोंड घालायच्या आधी शेताला कुंपण घातलेलं बरं, अशा विचारानं तिला संसाराच्या रगाड्याला जोडले जातं.

पाहणी-अभ्यास सांगतात की, छोट्या वयात लग्न होण्याचे प्रकार जगभरच घडतात, पण आफ्रिकन आणि आशियाई देशांत त्याचं प्रमाण हादरवून सोडणारं आहे. दक्षिण आशियात वयाची 18 वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच 48 टक्के मुलींची लग्नं होतात. भारतात हे प्रमाण 50% आहे. मध्यप्रदेश या राज्यात 1998 साली केल्या गेलेल्या एका पाहणीत शंभरातल्या 14 मुलींची लग्नं 10 ते 14 या वरयोगटात होतात. काही प्रमाणात दक्षिणेकडील राज्यं वगळता इतरत्र, अगदी महाराष्ट्रातही थोडयाफार फरकानं हेच चित्र आढळतं; आणि काही पुढारलेल्या जातींचा बारीकसा अपवाद वगळता सर्व जातींच्या लोकांना त्यात काही वावगं आहे असं वाटत नाही.

पंधरा-सोळाव्या वर्षी संसाराला लागलेल्या या मुलींचे शिक्षण आपसुकच थांबतं. दर दिवशी पुढं पुढं सरकणाऱ्या जगाचा नि तिचा अर्थाअर्थी काही संबंधच उरत नाही. तारुण्यात पदार्पण केलेल्या पण थोडंसं बालपण अजून मागं रेंगाळलेल्या या पोरीच्या ओटीत नव्या घरात रुळेस्तो छोट्या बाळाचं दान पडतं. ते रांगू लागेस्तो दुसरं.... मग तिसरं... चौथं... बाळंतपणाच्या चक्कीत पोर पिसून निघते. तिच्या हाती काहीच नसतं. तिच्या नकाराला किंमत नसते. आणि होकाराची दखल नसते. शरीरसुख, साहचर्य, मातृत्व कशाचा काही अर्थ उमगण्याची संधीच मुळी उपलब्ध नसते. मूल होऊ न देणं, दोन मुलांत अंतर ठेवणं, नवऱ्याच्या 'इच्छे'ला नाही म्हणणं... काही म्हणजे काही तिच्या हाती नसतं.

ऐन पंचविशीत ही पोर चाळीशीची दिसू लागते. तिच्या शरीराची चाळण तर होतेच; पण एका पाठोपाठ जन्मलेली तिची बाळही अशक्त असतात. अनारोग्याचं एक चक्र कुटुंबात नि समाजात फिरत राहतं. पंधराव्या वर्षांत लग्न झालेल्या मुली बाळंतपणात मरण्याची शक्यता पाचपटींनी जास्त असते आणि अशा मुलींना झालेली बाळं वयाचं पहिलं वर्ष गाठण्याच्या आत मरण्याची शक्यताही तेवढीच असते. मग बालमृत्यूंचा प्रश्न उग्र बनतो नि दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या नऊशेच काय, अगदी साडेसातशेपर्यंत घसरते! अशा समाजात लैंगिक सुखाविषयीच्या कल्पनाही वेगळ्या वाटेनं धावू लागतात. उपभोग म्हणजे सत्ता गाजवणं असं समीकरण बनतं. कुटुंबात ही सत्ता नवऱ्याची असते. समाजात ती उच्चवर्णीय नि धनिक सत्ताधाऱ्यांची असते. या सत्ताचक्रात बाईमाणसाचं शरीर पार पिळवटून निघतं. दुःखांच्या आणि वेदनांच्या मालिका तिच्या वाट्याला येतात. बाई म्हणजे तिचं शरीर अशीच धारणा रुजते आणि शरीर म्हणजे वापरून चोळामोळा करून टाकून देण्याची गोष्ट असल्याबद्दल कोणालाच काही शंका नसते.

या देशातल्या न्यायव्यवस्थेलाही हे गणित सुटत नाहीसं दिसतं. मुलीनं वयाच्या पंधराच्या वर्षी लग्न केलं तर हरकत नाही असं या देशातलं सर्वोच्च न्यायालयच म्हणतंय. वयात आलेल्या मुलीनं आपल्या मर्जीनं लग्न केलं तर हरकत घेण्याचे काही कारण नाही, असा युक्तिवादही करतंय. मुला-मुलींच्या विवाहपूर्व शारीरिक आकर्षणाला मान्यता जाऊच दे, पण ती भावना समजूनही घ्यायला नकार देणाऱ्या समाजात, लग्न हे शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचे एकमेव साधन वाटतं. अशा लहान वयातल्या लग्नांचे पुढचे परिणाम लक्षातही घेतले जात नाहीत. किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीरसुखाविषयीच्या उमलू पाहणाऱ्या भावना लक्षात घेऊन, त्या पूर्ण करण्याच्या गरजेतून त्यांना एकत्र येऊ देण्याच्या हेतूनं ही लग्न होत नाहीत. एकोणीस वर्षांच्या मुलाला आणि पंधरा-सोळा वर्षांच्या मुलीला लैंगिकता, सहजीवन याची पूर्ण माहिती होऊ देण्याचीही उसंत इथं नाही. कारण ती कल्पनाच त्यामागं नाही. व्यक्ती म्हणून आपल्या मुलांना परिपक्कता यावी हा तर विचारही नाही.

अशा लग्नांमधला नवरा मुलगाही काही फारसा मोठा नसतोच. लग्नानंतर त्याचीही बाकीची वाढ थांबते. चार पैसे तो कमावू लागतो खरा, पण जगात वेगानं होणारे आर्थिक- सामाजिक बदल कळण्याची कुवत त्याच्यात येत नाही. या बदलात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य तर त्याच्या ठायी बिलकुलच नसतं. किमान साक्षरताही शंभर टक्के नसलेल्या या देशात प्रगतीच्या परीघाबाहेर फेकलं जाण्याची जीवघेणी प्रक्रिया सुरू होते. जातीपाती आणि गोतावळ्याच्या गुंत्यात पाय अडकल्यानं या साऱ्यापासून पळही काढता येत नाही. उतरंडीला वरचा खालच्याला हाणतो नि खालचा त्याच्याही खालच्याला हाणतो, या हाणामारीत जातीय आणि धार्मिक दंगे पेटतात. माणसांचे मुडदे पडतात. पुरुष नि स्त्रियांच्यात संख्येपासून दर्जापर्यंत असमतोल निर्माण होतो. स्पर्धा करण्याची कुवत निर्माणच न झालेला निस्तेज समूह, राष्ट्र म्हणून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मूठभर लोकांकडं एकवटलेल्या बुद्धिसंपतेच्या जोरावर जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्नं पाहतो... झोप न उडाल्याचंच हे लक्षण!

Tags: लैंगिक शिक्षण ग्रामीण भारतीय समाज बाल विवाह sex education rural Indian society child marriages weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके