डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

व्रती संपादक कै. अप्पासाहेब खाडिलकर

श्री यशवंतराव चव्हाण यांनी खिन्न मनाने श्री नीलकंठ खाडिलकरांना स्वतः लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे : ‘गेले बरेच दिवस ते आजारी होते परंतु शेवट असा जवळ होता असे वाटले नव्हते. माझ्या गेल्या भेटीत त्यांना भेटण्याचे राहून गेले याची खंत आता मला नेहमीच लागन राहील.

'नवाकाळ' दैनिकाचे भूतपूर्व संपादक श्री यशवंत कृष्ण खाडिलकर-आप्पासाहेब या नावाने उभ्या महाराष्ट्राला परिचित होते. त्यांच्या निधनानंतर असंख्य शोकसंदेश आले. अजूनही येत आहेत. त्यांतील काही लोकोत्तर व्यक्तींचे शोकसंदेश अप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर एक वेगळाच प्रकाश टाकून जातात. पाटण्याच्या मार्गावर असता दिल्ली येथे प्रा. मधू दंडवते यांच्या निवासस्थानी श्री एस् एम् जोशी यांना अप्पासाहेबांच्या निधनाची बातमी समजली. प्रा. दंडवते व श्री एस्. एम्. यांच्या सहीने एक छोटासाच शोक संदेश देण्यात आला. त्यात म्हटले आहे : 

‘गांधीयुगातील एक योर देशभक्त आणि लोकमान्यांच्या परंपरेत तयार झालेले एक थोर संपादक श्री अप्पासाहेब खाडिलकर यांना काळाने आपल्यामधून नेले ही बातमी ऐकताच मन शोकाकुल झाले.’ 

श्री यशवंतराव चव्हाण यांनी खिन्न मनाने श्री नीलकंठ खाडिलकरांना स्वतः लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे : ‘गेले बरेच दिवस ते आजारी होते परंतु शेवट असा जवळ होता असे वाटले नव्हते. माझ्या गेल्या भेटीत त्यांना भेटण्याचे राहून गेले याची खंत आता मला नेहमीच लागन राहील. 

श्री अप्पासाहेबांनी माझ्याशी अतिशय लोभ व स्नेह ठेवला होता. असे अकृत्रिम आणि अकारण स्नेह देणारे क्वचित लाभतात. ते थोर देशभक्त होते व स्वतःचे सामर्थ्य असणारे संपादक होते. थोर, नामवंत व यशस्वी पित्याच्या पोटी जन्म घेणाऱ्या सुपुत्राला आव्हाने तशी मोठी असतात. तुमच्या आजोबांच्यानंतर 'नवाकाळ' चालवणे तसे सोपे नव्हते, पण ते काम अप्पासाहेबांनी व्रत म्हणून चालू ठेवले. राष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून हिंदुस्थानात सुरू झालेली व आजवर चालू असलेली राष्ट्रभक्त कुटुंबांची अशी जी दोन चार पत्रे आहेत, त्यांपैकी 'नवाकाळ' आहे. ही अखंड धारा वाहती ठेवून तुमचेपर्यंत ती त्यांनी आणून पोचवली याबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव कृतज्ञ राहील.' ‘नवाकाळ' वर अकृत्रिम लोभ असणारे तिसरे ख्यातनाम नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे. ते स्वत:च आजारी त्यांनीही यशवंतरावांप्रमाणे आपल्या हस्ताक्षरांत पत्र लिहून वेदना प्रकट केली. ते लिहितात : अप्पासाहेबांच्या निधनाची वार्ता ऐकून मोठाच धक्का मला बसला.

आमचे उभयतांचे परस्पर संबंध अगदी वेगळ्या प्रकारचे होते हे तुला (निळूभाऊंना) ठाऊक असेलच. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा पहिली असहकाराची चळवळ सुरू झाली, तेव्हा असहकारवादी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका शाळेत मी शिक्षक झालो होतो व मॅट्रिकसच्या वर्गात अप्पासाहेब माझे विद्यार्थी म्हणून दाखल झाले होते. मराठ्यांच्या इतिहासावर त्यावेळी मी जे पाठ घेतले ते अप्पासाहेबांना फार आवडले आणि त्याची अप्पासाहेबांनी आपल्या वडिलांपाशी खूप खुप प्रशंसा केली. 

थोडक्यात, मी एका चांगल्या विद्यार्थ्याला आणि मित्राला आता मुकलो असून देश एका सत्प्रवृत्त प्रामाणिक पत्रकाराला अंतरला आहे. अप्पासाहेब जो विषय हाती घेत त्याची सर्व बाजूंनी वैचारिक छाननी करीत. खरेखुरे तर्कपण्डित होते ते. एखादी समस्या निखळ युक्तिवादाने (डायलेटिक्सने) मांडण्याची हातोटी त्यांना साधली होती. 'धर्मराज' या विषयावरील त्यांचे लिखाण वाचत असता अनेक ठिकाणी याची प्रचीती येते. त्यांची पत्रकारिता जनहिताच्या प्रचारास वाहिलेली होती, पोटार्थी नव्हती. मला खात्री वाटते की महाराष्ट्र अप्पासाहेबांना विसरणार नाही. एस् एम्, यशवंतराव व काॅ. डांगे या त्रिमूर्तीस 'नवाकाळ' च्या लेखी फार मोठे स्थान होते.

'नवाकाळ चे जुने ‘फ्लॅटबेड रोटरी मशीन' काढून 'स्पीडीरोटरी' मशीन बसवण्यात आल्यानंतर उद्घाटनाच्या समारंभास याच त्रिमूर्तीना उत्सवमूर्ती म्हणून बोलावण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्र या तिघांनी आणला अशी अप्पासाहेबांची भावना होती. आणखीही एक शोकसंदेशपर पत्र येये उद्धृत करावयास हवे. सध्या शरीर स्वास्थ्यासाठी घटप्रभा (कर्नाटक) येथे कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये  असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक श्री पु. ल. देशपांडे यांनी ते लिहिले आहे : वर्तमानपत्र चालवणे हा धंदा नसून व्रत आहे असे मानले जाण्याच्या काळातली ही माणसं. नुकतेच काकासाहेब नवरे गेले, आता अप्पा गेले. या माणसांनी स्वखुषीने लोकशिक्षणाची, समाज भलं करण्याची वगैरे व्रते घेतली आणि कसल्याही मान सम्मानाची अपेक्षा न ठेवता किंवा सार्वजनिक हित महत्वाचं वाटत असेल तेव्हा कुणाच्या वैयक्तिक राग लोभाची तमा न बागळता त्या व्रताचं पालन केल अशी माणसं यापुढे दिसतील असं वाटत नाही. 

अप्पांचे वय झाले होते हे खरे असले तरी असल्पा वडीलधाऱ्या माणसाचे नुसते अस्तित्व देखील मनाला आधार असतो!' 

अप्पासाहेबांनी 1929 साली नवाकाळचे संपादकत्व स्वीकारले ते त्यांच्याकडे चालतच आले, परवा एका जाणकाराने बोलताना सांगितले की काकासाहेब खाडिलकर यांच्या मनातून 'नवाकाळची' संपादकीय सूत्र अप्पासाहेबांचे बंधू विनायकराव यांच्या हाती द्यावीत असे होते पण अप्पासाहेबांच्या मातुश्रींच्या मनातून ती अप्पासाहेबांकडे द्यावीत असे असल्याने अखेर अप्पासाहेब संपादक झाले. 

आपण संपादक कसे झालो याचा किस्सा खुद्द अप्पासाहेबांनीच एकदा तीर्थरुपांच्या आठवणी लिहिताना सांगून टाकला आहे. तो असा : 

1929 साली काकांच्यावर (काकासहेब खाडिलकर) राजद्रोहाचा खटला झाला. त्या वेळी हायकोर्टात खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वी एक दिवस त्यांनी मला (अप्पासाहेबांना) ‘नवाकाळचे' व दत्तात्रेय छापखान्याचे डिक्लेरेशन तुझ्या नावाने करून ये असे सांगितले. त्याप्रमाणे डिक्लेरेशन करून आलो. ‘हे पत्र (संपादक) यांनी... स्थळी प्रसिद्ध करून तेथेच आपल्या दत्तात्रय छापखान्यात छापले' असा डिक्लेरेशनचा तर्जुमा होता. मी नवाकाळचा मृद्रक, प्रकाशक आहे की संपादकही आहे हे मला कळेना. त्याचप्रमाणे छापखान्याच्या नावापूर्वी  ‘आपल्या' असा जो शब्द होता तो छापखान्याचे मालक काका असल्यामुळे काढायचा काय, असाही प्रश्न मला पडला होता. पण इथल्या तपशिलाने काकांशी बोलण्याची पद्धत नव्हती आणि छातीही नव्हती. तेव्हा मी विचारले, 'तुमच्या नावा ऐवजी माझं नाव टाकायचे एवढाच फरक करायचा काय? त्यावर त्यांनी सांगितले की, माझ्या नावाऐवजी तुझे नाव टाकायचे एवढाच फरक करायचा. त्याचवेळी त्यांनी नतर असे ही सांगितले की, मी या बाबतीत गंगाधरराव देशपांडे, वासुकाका जोशी यांच्याशी बोललो आहे व त्यांची संमती आहे. अशा रीतीने नवाकाळच्या संपादकत्वावर मी अनपेक्षितपणे आलो. काकांनी ती जबाबदारी माझ्यावर स्वहस्ते सोपवली.' अप्पासाहेबांच्या या कथनात ‘अनपेक्षितपणे’ हा जो शब्द आला आहे त्यावरून जाणकाराने दिलेली माहिती खरी असावी असे वाटते. 

‘नवाकाळ' विपन्नावस्थेत आहे असे पाहून तो खरीदण्याच्या भांडवलदारी काव्यांची अप्पासाहेबांनी मुळीच डाळ शिजू दिली नाही. फार मोठ्या रकमेवा एक चेक काँग्रेसमधील प्रस्थांकडून आला तो अप्पासाहेबांनी आपल्या स्पष्टोक्तीचे लेबल वर चिकटवून परत पाठवला. त्यांनी सांगितले, नवाकाळ विकत घेण्यासाठी इसार म्हणून हा चेक पुढे करण्यात आला असेल तर तो पाठवणाऱ्यानी हे लक्षात ठेवावे की, लोकांनी वाचावा म्हणून ‘नवाकाळ’ काढला आहे; कुणाला तरी तो विकून टाकण्यासाठी नव्हे.' ही घटना घडली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर. पण असे प्रलोभन कुणी दखवलेच तर कसे वागावे याचा आदर्श अप्पासाहेबांना खुद काकासाहेबांनीच घालून दिला होता. अप्पासाहेबांनी त्याची हकिगत एका लेखात सांगितली आहे ती अशी:

1930 साली सविनय कायदेभंगाची चळवळ जोरात आसताना नवाकाळ व स्वाधीन भारत या पत्रांचा खप खुपच वाढला होता. पण चळवळ ओसरू लागताच नवाकाळ व स्वाधीन भारत याचा खपही कमी होत चालला. त्याच सुमारास अर्ध्या आण्यात आठ पाने देण्याची चढाओढ मराठी वृत्तपत्रात सुरू झाली व नवाकाळला ती झळ चांगलीच जाणवली. त्यावेळी एक पत्रचालक काकासाहेबांना त्यांच्या सांगलीच्या मुक्कामी जाऊन भेटले व नवाकाळ विकत घेण्याच्या गोष्टी ते करू लागले. त्यावेळी, 'तुमच्या पत्रात तुम्हाला काय फायदा होतो? असा प्रश्न काकासाहेबांनी त्यांना विचारला. दीड-दोनशे रुपये सुटतात' असे त्यांनी उत्तर देताच काकासाहेबांनी त्यांना सांगितले की, आम्ही आमच्या सहसंपादकाला तेवढा पगार देतो. काकांनी 'नवाकाळ' यांच्या ताब्यात देण्यास नाराजी दाखवलीच पण शेवटी ते म्हणाले की, तुम्ही असे करा. मुंबईत जाऊन अप्पांना भेटा. नवाकाळ त्यांनी चालवायचा आहे. 

अप्पासाहेब दोन्ही प्रसंगी ताठ मानेने वागले यात आश्चर्य नाही. कारण खाडिलकर घराण्याची ती परंपराच आहे. अप्पासाहेबांनी लिहिलेली कॉपी लावून वाचण्याचे कसब नवाकाळच्या कंपोझिंग विभागात एक-दोघांनाच साधले होते. त्यांचे अक्षर मुळात चांगले असावे पण असहकार आंदोलनात आझाद मैदानावर त्यांच्या डोक्यावर लाठी बसली व तो प्रहार एवढा जबरदस्त होता की त्यांचा उजवा हात वळणदार अक्षरास कायमचा मुकला. 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळातील त्यांचे तेजस्वी अग्रलेख निवडून मुंबई मराठी पत्रकारसंघाने एक पुस्तक प्रसिद्ध करावे अशी सूचना आता जाहीरपणे झाली आहे आणि ती अमलात आल्यावाचून राहणार नाही. व्रती संपादक लिहीत अक्षत तरी कसे, असा प्रश्न त्यामुळे केवळ व्यवसायनिष्ठ असणाऱ्यांना भावी काळात पडणार नाही.

एक खरे की, अप्पासाहेब सदैव काकासाहेबांचे सिंहासन आपणास सांभाळायचे या भावनेने लेखन करीत. त्यांचा 'धर्मराज' या विषयावरील प्रबंधही त्याच भावनेने लिहिला होता. त्या प्रबंधाच्या प्रस्तावनेत अप्पासाहेबांनी म्हटले आहे,

‘कित्येक वर्षे मनात घोळत असलेला हा विषय वडिलांच्या सूचनेप्रमाणे हातावेगळा केला आहे.'

‘श्री व्यास महाकवींनी जय नावाचा ग्रंथ लिहिला. ही जयकथा नरनारायण कृष्णार्जुनाची नाही, पुरुषार्थी भीष्म कर्ण-द्रोणाची नाही, विजयार्थी वीर पुरुषांची नाही, राज्यार्थी दुर्योधन-धृतराष्ट्राचीही नाही, जो सतत परोपकारी पुण्याकर्माच्या जोरावर बाहेरच्या व श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे अंतर्मानस युद्धात शेवटच्या क्षणापर्यंत कसोटीस उतरला त्या धर्मराजाच्या विजयाची आहे.’ हा सिद्धांत प्रतिपादन करण्यासाठी अप्पासाहेबांनी महा भारतातील उतारे मदतीला घेऊन जवळपास शंभर पृष्ठे केलेला युक्तिवाद वाचीत असता अण्णासाहेब एक थोर तत्त्वचिंतकही होते याविषयी शंका उरत नाही.

गेल्या नो्हेंबरमध्ये अप्पासाहेबांना अगदी सौम्यसा हृदयविकाराचा झटका येऊन उंचावरची पुस्तके काढता-काढता ते पडले आणि फ्रॅक्चर झाले. डॉ. बावडेकर यांच्या उपचारामुळे ते काहीसे तंदुरुस्त झाले तरी पुढे पुढे उठून बसणेही त्यांना अशक्य झाले होते. अशाही स्थितीत देशाला सर्वस्व अर्पण केलेले, आपल्या शरीराचेही दान हॉस्पिटलला करून अंत्यसंस्काराची आवश्यकता न ठेवलेले आपले मित्र श्री बा. ल. साठे यांचे निधन झाल्याचे कळताच अप्पासाहेबांना त्यांच्यावरील मृत्युलेख लेखनिकास सांगितला. तो दिवस 30 जानेवारीचा होता. हा आणखी एक योगायोग ! अप्पासाहेबांनी नवाकाळसाठी लिहिलेला हा शेवटचा अग्रलेख.

आमरण आपला बाणा,आपले व्रत न सोडणारी अप्पासाहेब खाडिलकरांसारखी माणसे यापुढे आढळणे खरोखरीच कठिण, त्यांच्या स्मृतीस प्रणाम!

Tags: पत्रकार संपादक नवा काळ अप्पासाहेब खाडिलकर Journalis Marathi Journalism Editor Appasaheb Khadilkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके