डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वर्गलढा आणि वर्णलढा एकत्र येऊ शकत नाही वर्गयुध्दातून वर्ग नष्ट होऊ शकतात. हाती सत्ता घेता येते. सर्वात छोट्या जाती आहेत त्यांना घेऊन जातीयुध्द केले तर जाती पक्क्या होतात. जातींच्या लढ्यात मिळालेल्या जातींना घेऊन सत्ता घेता येत नाही, म्हणून जाती निर्मूलन हा सर्वात अंतिम लढा. जात विसरणे हे सर्वांत कठीण काम आहे. आताच नाही का प्राध्यापक अरुण कांबळे यांनी मला ‘सहन करण्यावरून टोकले!’ कॉ. डांगे यांच्यासारखा निखळ मार्क्सवादी माणूस, पण त्यांचीही लगेच जात आठवते!

दुसरे स्वातंत्र्य आणि समतेचा लढा : एक परिसंवाद

दोन मार्च 1930! बरोब्बर पन्नास वर्षांपूर्वी नासिक येथे काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या आशीर्वादाने श्री. दादासाहेब गायकवाड यांनी जो समता संगर पेटवला त्याची सुवर्णमहोत्सवी स्मृती मुंबईच्या राष्ट्रसेवादलाने एका परिसंवादाचे आणि प्रदर्शनाचे आयोजन करून जागवली. या ऐतिहासिक संग्रामाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्षच दोन मार्चपासून सुरू झाले. या सबंध वर्षांत असेच आणखी काही कार्यक्रम सेवा दलातर्फे आयोजिण्यात येणार आहेत.

आगळे दृश्य

परिसंवादाचा विषय होता ‘दुसरे स्वातंत्र्य आणि समतेचा लढा.’ नियोजित अध्यक्ष प्रा. य. दि. फडके यांना मुंबईबाहेर जावे लागल्याने श्री. बाळासाहेब दंडवते यांनी अध्यक्षस्थान भूषवले. सेवादलाने योजलेला कार्यक्रम ठीक वेळेवर सुरू झाला नाही, एवढे एक वैगुण्य सोडले तर सुमारे सव्वादोन तास चाललेला हा कार्यक्रम प्रबोधनाचे फार मोठे कार्य करून गेला असे म्हणावे लागेल. दलित बांधव, कॉलेजमधील युवक युवती आणि तथाकथित पांढरपेशा यांनी हॉल टिच्चून भरला होता. प्रा. अरुण कावळे यांचे शब्द वापरून म्हणायचे तर समतानिष्ठ सवर्ण आणि दलित खांद्यास खांदा लावून तेथे उपस्थित होते.

खरे स्वातंत्र्य अद्याप दूरच

अध्यक्ष बाळ दंडवते यांनी अध्यक्षीय भाषण सुरुवातीलाच करून गृहराज्यमंत्री श्री. भाई वैद्य यांना समारोपात्मक बोलण्याची संधी आयतीच उपलब्ध करून दिली. सभेच्या नियमास हे धरून झाले असेल असे म्हणवत नाही पण श्री. भाई वैद्य अन्य एका कार्यक्रमाहून विलंबाने येणार तर त्यांना शेवटीच ठेवलेले बरे, असा पोक्त व्यवहार श्री. दंडवते यांनी योजला असावा. श्री. दंडवते म्हणाले, पहिले स्वातंत्र्य, दूसरे स्वातंत्र्य असे शब्दप्रयोग आपण करत असलो तरी खरे स्वातंत्र्य अजून यायचेच आहे आणि समतेवर आधारित समाजव्यवस्था झाल्याशिवाय ते आले असे म्हणता येणार नाही. 63 साली चीनने आपल्या देशावर आक्रमण केले. त्यावेळी एक रिपब्लिकन नेते म्हणाले, ‘आम्ही कशासाठी लढायचे? चीन आमचे नेऊन नेऊन काय नेणार? गाडगा नी मटकीच ना? आम्ही तर या देशात गुलामीचेच जिणे हजारो वर्षे जगत आहोत!’

अजब उदाहरण

धर्म बदलूनही जात जात नाही. यासंबंधी नगरमधली एक सत्यकथा त्यांनी सांगितली. दंडवत्यांच्या लहानपणी त्यांच्या घरी एक ख्रिस्ती गृहस्थ आले, त्यांनी धर्मांतर केले होते. ब्राह्मण कुटुंब ख्रिस्ती झाले होते. त्यांच्या मुलीसाठी दंडवत्यांच्या वडिलांनी एखादे स्थळ सुचवावे म्हणून ते आले होते. वडील त्यांना म्हणाले, “एवढा ख्रिश्चन समाज आहे त्यात नाही का मुलीस योग्य असा वर?” त्यावर ते ख्रिस्ती म्हणाले, “अहो पण आम्ही ब्राह्मण ख्रिस्ती ना? इतर बहुतेक सगळे पूर्वाश्रमीचे महार! त्यांच्याशी कशी होईल सोयरीक; आमची मुलगी तिकडे कशी जाणार!”

दाहक वास्तवता

ज्या महापालिका कर्मचारी युनियनचे श्री. दंडवते सेक्रेटरी आहेत तेथेही त्यांना चमत्कारिक अनुभव आले आहेत. कचरागाडी चालवणारा ड्रायव्हर कधी तशी गरज पडल्यास मैलागाडी चालवावयास कबूल होत नाही! ते काम आमच्या जमातीचे नव्हे, असे म्हणून मोकळा होतो! बेकार ब्राह्मण मुलगा 400 रुपये मासिक वेतन मिळण्याची हमी असताही झाडूवाला बनण्यास तयार होत नाही याउलट महापालिकेच्या ड्रेनेज खात्यात, कचरा काहून नेण्याच्या खात्यात काम करणारा सेवा निवृत्तीपूर्वी दोन वर्षे युनियनकडे येतो व मुलगा पदवीधर झाला असला तरी त्याला ड्रेनेज खात्यांत आपल्या जागी लावून घ्या असे म्हणतो, कारण त्यामुळेच त्याची टीचभरची हक्काची खोली त्याच्या कुटुंबाकडे कायम राहू शकते! 

श्री. दंडवते यांनी आणखी एक सत्य घटना सांगितली. श्री. शांतिलाल शहा मंत्री असताना एकदा महापालिकेत आले. रामजीराय नावाचा द्वाररक्षक तेथे होता. त्याने मंत्री म्हणून शांतिलालजींना सलाम केला. श्री. शांतिलाल यांनी त्याच्याविरुद्ध त्या वेळच्या आयुक्तांकडे तक्रार केली की सदर द्वारपालाने चिरीमिरीसाठी सलाम केला! मंत्र्यांनी तक्रार करताच आयुक्तांनी क्षणाचाही विचार न करता रामजीरायला बडतर्फ केले. स्वाभाविकपणेच रामजीरायने युनियनकडे धाव घेतली व 24 तासांच्या आत रामजीरायला पुन्हा कामावर घेण्यात आले, नाही तर सर्व महापालिका कर्मचारी संपावर जातील, असा दबाव आणावा लागला. त्यामुळेच तो अन्याय चालू शकला नाही. आम्ही विजयी झालो पण अशा उदाहरणांवरून सामाजिक अन्यायाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका कामगार संपावर जातील असा निष्कर्ष कोणी काढू शकेल तर तेवढी तयारी झाली नाही हे कबूल करावे लागेल. 

विषमतेवर आधारलेली समाजरचना नष्ट झाली पाहिजे, हा आवाज दलितेतरांच्या बाजूने वाढेल तेव्हाच दलित आणि दलितेतर यांची व्यापक एकजूट होऊन हा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल. सेवादल त्यासाठी क्रियाशील आहे ही अभिनंदनीय गोष्ट होय! 

काळा राम मंदिर सत्याग्रह

जाहीर झालेल्या वक्त्यांत श्री. दिनकर साक्रीकर नव्हते, पण ते परिसंवादास उपस्थित असल्याने त्यांना ऐनवेळी पाचारण करण्यात आले. श्री. साक्रीकर 12 वर्ष वयाचे असताना नासिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला. रोज शाळेतून आल्यावर पटांगणात खेळावयास जाण्याची ओढ असणाऱ्या दिनकरला आई सांगे ‘खेळून येताना काळ्या रामाला जाऊन नमस्कार करून येत जा.’ पण बाल साक्रीकरला त्या गोष्टीचे कधीच अगत्य वाटले नाही या सत्याग्रहाच्या वेळी तो प्रचंड मोर्चा गोदावरीच्या वाळवंटातील ती पेटलेल्या चुलींची रांग वगैरे बघून बाल साक्रीकरांच्या मनात विचार आला: आपली आई आपणास रोज काळ्या रामा बद्दल सांगते, पण आपल्याला त्या मंदिरात जाण्याची इच्छाही होत नाही आणि ही हजारो माणसे त्यासाठी सत्याग्रह करण्यास तयार होतात, गावातील सनातन्यांशी संघर्ष करतात, हे काय आहे? असे का व्हावे? आईला पण त्यासंबंधी विचारले असता, ती मंडळी अस्पृश्य आहेत असे आईने सांगितले, पण त्यावरून काहीही बोध झाला नाही! 

लढ्याची फेरआखणी हवी

ही सगळी आठवण सांगून श्री. साक्रीकर यांनी समतेचा लढा जिंकण्याच्या आंदोलनात कोणते दोष गेल्या 50 वर्षांत निर्माण झाले त्याची साक्षेपाने तपासणी केली. समतासंघर्ष दलित आणि दलितेतर यांनी मिळून करावा हा डावपेच बरोबर नव्हे. हा लढा समताविरोधी सवर्ण आणि समतानिष्ठ सवर्ण यांत झाला पाहिजे! सवर्णांनीच तो संघर्ष चालवला पाहिजे, कारण हा अन्याय सवर्णांनीच केला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला व ‘हा लढा आमचा आहे तो आम्हीच लढला पाहिजे. दलितांना यात ओढू नका.’ हे गांधीजींचे वचन उद्धृत केले. मराठवाड्यातील झगड्यात एखाद्याही समतानिष्ठाचा बळी का पडला नाही, असा सवालही त्यांनी या संदर्भात विचारला.

हे अपयश नव्हे काय? 

कामगारांच्या एकजुटीचा नारा देणारे आणि वर्गीय संघटना बांधणारे कम्युनिस्ट, सोशलिस्ट, कापड गिरणी धंद्यात कापड खात्यात महार कामगारांना प्रवेश नसतो. या मुद्यावर सवर्ण कामगारांशी संघर्ष करायला उभे राहिले नाहीत! वर्गलढ्याच्या अग्निकुंडात जात जळून जाईल, जातीविरुद्ध वेगळी लढाई देण्याची गरजच उरणार नाही, असे हे नेते सांगत आले! पण प्रत्यक्षात जात कायमच राहिली. हे सोशलिस्टांचे नि कम्युनिस्टांचे अपयशच नव्हे काय? असाही सवाल साक्रीकरांनी केला.

जातीय दृष्टिकोनातून उमेदवार उभे करायचे पद्धतशीर कार्य गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाने केले व राष्ट्रवादी पक्षही समता संघर्षाच्या लढ्यात केवळ वाचिवीर, केवळ दांभिक ठरला असे सांगून साक्रीकर म्हणाले, या पायाभूत दोषांवर सत्ता मिळवणार्‍या आम्हाला वर्णविद्वेषी दक्षिण आफ्रिकेला दोष देण्याचा काडीभर तरी नैतिक अधिकार पोचतो काय?

कालमहिमा

प्रा. अरुण कांबळे घणाघाती वक्तव्य करतात. त्यांचे व्यापक वाचन त्यांच्या व्याख्यानात छाप उठवतेच, पण अन्यायाविरुद्ध सात्त्विक संताप त्याहून परिणामकारक असतो. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह ही मानवमुक्ती आंदोलनाची नांदी आणि त्या संदर्भात नासिकचा लढा हे त्या आंदोलनाचे अंग होय, येथपासून त्यांनी विषय मांडण्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह हा धर्मसंगर होता. त्यात केवळ डॉ. आंबेडकर नव्हते, पर्व होते; अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे मनुस्मृती जाळण्यात होते, कारण हा लढा मानवतेच्या स्थापनेसाठी होता. असे सांगून ते म्हणाले, त्याआधी समता संघर्ष झालाच नाही, असे समजण्याचे कारण नाही. चातुर्वर्ण्य हा भारतीय संस्कृतीचा कणा, या चातुर्वर्ण्य संस्कृतीने तथागत बुद्धाला वैशिष्ट्यहीन बनवले, त्याही आधी चार्वाकांची ग्रंथसंपत्ती नष्ट केली. ‘चातुर्वर्ण्यम् मया सृष्टम्’ म्हणून सांगणारी गीता हीदेखील दुसरी मनुस्मृतीच! या चातुर्वर्ण्याविरुद्ध चार्वांकापासून जे जे लढले ते ते पराभूत झाले! अगदी नावे घेऊन सांगायचे तर चार्वाक, तथागत गौतम बुद्ध, कबीर, लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर, यांची घ्यावी लागतील. डॉ. आंबेडकरांच्या लढ्याला या सर्वांच्या लढ्याची पार्श्वभूमी होतीच, पण डॉक्टर आंबेडकर ज्या काळात जन्माला आले तो काळ भारतीय प्रबोधनाचा होता, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे.

श्रमिकांची विभागणी

ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम इतकेच काय, चोखामेळ्याचा मुलगा यांपैकी कोणाही संताने चातुर्वर्ण्याला मुठमाती देण्याची भाषा केली नाही, उलट ब्राह्मणाचा गौरवच केला, असे अनेक वचने उद्धृत करून सांगून प्रा. कांबळे म्हणाले, वर्णव्यवस्था ही ‘डिव्हिजन ऑफ लेबर’ नव्हे, ती श्रमविभागणी नसून श्रमिकांची कायमची विभागणी होय! म्हणून आज वर्गलढ्याला हात घालायचा तर प्रथम वर्णव्यवस्थेविरुदध उभे राहावे लागते. अस्पृश्यता हे या वर्णव्यवस्थेचे सर्वात जहरी, कटू फळ, मार्क्स ज्याला सर्वांत तळचा वर्ग म्हणतो तो दलित वर्गच. आधी सामाजिकदृष्ट्या तो दलित आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या दलित यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही बाजूने जा, जातीयतेचा राक्षस डोक्यावर आहेच. आज शहरात सामाजिक (सामूहिक) पातळीवर जाती नसतील, पण व्यक्तिगत पातळीवर त्या आहेतच म्हणून दलित बांधव खेड्यांतून शहरांत आले म्हणजे त्यांच्या समस्या संपत नाहीत.

वर्णलढा जिंकल्याशिवायच आपण वर्गलढा जिंकू, असे साम्यवादी म्हणत, पण पुढे त्यांचाही लक्षात आले की वर्णलढा आणि वर्गलढा एकत्र लढल्यावाचून समता येणार नाही आणि असा तो लढवताना दलितांच्या बाजूने उभे राहिलो तर दलितेतर श्रमिकांच्या विरोधात उभे राहावे लागेल! बुद्धाची अहिंसा ही बलवन्ताची अहिंसा होती आणि त्यांचा लढा हा मानवतेचा लढा होता, हे सांगून प्रा. कांबळे म्हणाले, आज आमचादेखील शक्तिप्रदर्शनावर विश्वास नाही, पण आमच्यावर हल्लाच झाला तर आम्ही पळून जाणार नाही. 1941 साली गांधीजींनी अहमदाबादच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी अहिंसेचा जो अर्थ सांगितला तो आचरणात आणू.

उधळ क्रांतिकारकता

दुसर्‍या स्वातंत्र्याचा उल्लेख न करता ते पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे वेगळा अनुभव येईल असे वाटले होते, पण बाटली बदलली तरी दारू तीच, हा अनुभव येत आहे. दलितांवरील अत्याचार कमी न होता वाढले आहेत. जयप्रकाशजींच्या रिहायात जे तरुण आणीबाणीविरुद्ध लढले त्यांपैकी एकाला कोणीतरी विचारले की तू दलित मुलीशी लग्न करशील काय? त्याने हा आपल्या व्यक्तिगत आवडी निवडीचा प्रश्न आहे असे सांगितले असते तरी एकवेळ समजू शकलो असतो, पण तो असे म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे की, ‘मी नीच जातीच्या मुलीशी लग्न करणार नाही!’

न्यायालयाच्या कल्पना

आज बिहारात अस्पृश्यतेचा प्रश्न वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतो. राखीव जागांच्या प्रश्नाबाबत मी विस्ताराने आकडेवारी देऊन बोलत नाही, कारण राष्ट्रसेवादलाने एक बोलके प्रदर्शन बनवून तो प्रश्न जनतेपुढे नीट मांडला आहे आणि माझे काम हलके केले आहे. पण आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या सर्वांनाच सवलती मिळाल्या पाहिजेत, असे अट्टाहासाने म्हणणार्‍यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, ही मागणी करता तेव्हा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही काय? खरे तर दलितांच्या सवलतीसाठीचा लढा हा त्या सवलतीपुरता नाहीच, तो मानवमुक्तिसंग्रामाचा एक भाग आणि म्हणून दलितांना देण्यात येणार्‍या सवलतीविरुद्ध उभे राहणारे प्रतिक्रान्तीचा लढा लढत आहेत असेच म्हटले पाहिजे.

प्रतिक्रांतीवाद्यांचे प्रश्न

मराठवाडा विद्यापीठाच्या नामान्तराचा लढा हा देखील विशाल मानवतेच्या लढ्याचे एक अंगच आहे. त्यांत प्रतिक्रांतीच्या बाजूने उतरलेल्यांनी नामांतर हे निमित्त केले. डॉ. आंबेडकरांनी नवशिक्षित दलितांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र दिला. त्याप्रमाणे वागू बघणार्‍यांना दडपण्याचा प्रयत्न मराठवाड्यात झाला. ‘तुम्ही चांगले कपडे का घालता? पितळेची भांडी का वापरता? आपली मुले शाळेत का धाडता? जोहार न म्हणता नमस्कार का करता? हे या प्रतिक्रांतिवाद्यांचे प्रश्न असत!

सम्यक सांस्कृतिक क्रांती

प्रा. कांबळे शेवटी म्हणाले, आम्हाला जी सम्यक सांस्कृतिक क्रांती हवी ती या देशातील कोणताही राजकीय पक्ष करू शकणार नाही, अशी आमची धारणा आहे. या लढ्यात राष्ट्र सेवा दल, युक्रांद आणि दलित यांनी खांद्यास खांदा लावून लढले पाहिजे. दलितांचा विश्वास वृद्धिंगत होईल असे काही तरी घडले पाहिजे. राज्यगृह मंत्री ना. भाई वैद्य यांना खूप वेळ तिष्ठत ठेवून मी भाषण केले, पण त्यांनी हे सहन करावे. आम्ही नाही का इतकी वर्षे सहन केले?

भाई वैद्य यानंतर म्हणाले, प्रा. अरुण कांबळे यांचे विवेचनपूर्ण भाषण झाले आहे. मी अधिक काही बोलायला पाहिजे असे नाही. शक्य तेवढ्या थोड्या वेळात माझे विचार सूत्ररूपाने मांडणार आहे. खरे विचाराल तर या देशात स्वातंत्र्यलढा अद्यापि झालेलाच नाही! 57 चे समर काय, बेचाळीसचा लढा काय ही सारी बंडे होती. ज्यात आरपार सामाजिक अभिसरण व्हायला पाहिजे असा हा लढा अजून व्हायचाच आहे. तो अखेरचा स्वातंत्र्यलढा जेव्हा होईल तेव्हा तो समतेचाच लढा असेल; जातीनिर्मूलनाचा लढा असेल.

आपली परंपरागत कुशलता

या देशाची एक कुशलता आहे. जसे कित्येक जण मिळेल त्या शस्त्राला धार लावण्यात पटाईत असतात तसे आपण कोणतेही शस्त्र, कोणतेही तत्त्वज्ञान बोथट करून दाखवण्यात पटाईत आहोत. मग हे भगवान बुद्धाचे असो; डॉ. आंबेडकरांचे असो की डॉ. लोहियांचे असो स्वत:ला समतावादी समजणारा जातीवादी कसा असू शकेल, असे आपल्याला वाटते, पण तो असतो! मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे ना, ‘एक जिप्सी आहे. माझ्या मनात दडून’ आपलीही तशीच स्थिती असते. ‘एक जात आहे माझ्या मनात दडून’ 

जातीनिर्मूलन

वर्गलढा आणि वर्णलढा एकत्र येऊ शकत नाही वर्गयुध्दातून वर्ग नष्ट होऊ शकतात. हाती सत्ता घेता येते. सर्वात छोट्या जाती आहेत त्यांना घेऊन जातीयुध्द केले तर जाती पक्क्या होतात. जातींच्या लढ्यात मिळालेल्या जातींना घेऊन सत्ता घेता येत नाही, म्हणून जाती निर्मूलन हा सर्वात अंतिम लढा. जात विसरणे हे सर्वांत कठीण काम आहे. आताच नाही का प्राध्यापक अरुण कांबळे यांनी मला ‘सहन करण्यावरून टोकले!’ कॉ. डांगे यांच्यासारखा निखळ मार्क्सवादी माणूस, पण त्यांचीही लगेच जात आठवते! तेव्हा लढा करायचा आहे तो जातीनिर्मूलनाचा. हा लढा केवळ दलितांचा नाही, तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे. जातीव्यवस्थेने हे चार मजली घर ज्यात सर्वांत वरच्या मजल्यावर ब्राह्मण, त्याखाली क्षत्रिय, त्याखाली वैश्य आणि तळमजल्यावर क्षुद्र. पण हे घर असे आहे की, एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्या-येण्यास जीनाच नाही! या जातीव्यवस्थेला उखडून टाकणारे तत्त्वज्ञान अजून निर्माण झालेले नाही आणि समतेच्या लढ्याचे हेच खरे दुःख आहे!

परिसंवादाच्या शेवटी मुंबई सेवा दलाचे अध्यक्ष भाई सदानंद बंदरकर यांनी आभार मानल्यावर हा कार्यक्रम संपला.

Tags: जातीनिर्मूलन डॉ. लोहिया राष्ट्र सेवादल बिहार सोशलिस्ट कम्युनिस्ट सत्याग्रह तुकाराम ज्ञानेश्वर रामदास दिनकर साक्रीवार ख्रिश्चन गौतम बुद्ध चीन ब्राह्मण भाई वैद्य अरुण कांबळे वर्णभेद वर्गभेद दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई समतेचा लढा दुसरे स्वातंत्र्य Eradicate Cast Dr. Lohia Satraseva Dal Bihar Socialist Communist Satyagrah Tukaram Dnyaneshwar Ramadas Dinakar Saakriwar Christian Gautam Buddha China Bramhin Bhai Vaidya Arun Kambale Class Discrimination Racial Discrimination Dadasaheb Gaikwad Dr. Babasaheb Ambedkar Mumbai Fight for Equality Second Freedom Fight weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके