डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साने गुरुजींनी मुंबई येथून 'साधना' सुरू केली, म्हणून मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गेल्या 4 जून 2००7 रोजी मुंबई येथे एक बैठक आयोजित केली होती; त्यावेळी अपना परिवारातील संस्था व संघटनांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती. त्याच्या स्वरूपाबाबत चर्चा चालू असताना प्रा. रा.ग. जाधव म्हणाले होते, "चर्चासत्राचे गांभीर्य आणि संमेलनाचा उत्साह यांचा समन्वय त्यात साधला जावा." नंतर त्या दिशेने प्रयत्न चालू राहिले. 

साने गुरुजींनी मुंबई येथून 'साधना' सुरू केली, म्हणून मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गेल्या 4 जून 2००7 रोजी मुंबई येथे एक बैठक आयोजित केली होती; त्यावेळी अपना परिवारातील संस्था व संघटनांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती. त्याच्या स्वरूपाबाबत चर्चा चालू असताना प्रा. रा.ग. जाधव म्हणाले होते, "चर्चासत्राचे गांभीर्य आणि संमेलनाचा उत्साह यांचा समन्वय त्यात साधला जावा." नंतर त्या दिशेने प्रयत्न चालू राहिले. 

हा महोत्सव मुंबई येथे भरवणे म्हणजे केवळ गुरुजींना अभिवादन करणे नव्हे. 'साधना'च्या वाटचालीचा गौरव करणे नव्हे; तर साने गुरुजींच्या ध्येयवादी पत्रकारितेचा वारसा निर्धाराने पुढे चालविण्याचे अभिवचन आणि आजच्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून त्यावरील उपाययोजनेचे दिग्दर्शन करणे हे उद्देश ठेवूनच 'साधना समकालीन : 2००7' या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

साने गुरुजींनी 'साधना' सुरू केले तेव्हा कार्यालय नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात 'साधना' अंक प्रेसमधून छापून आणून, त्याच्या घड्या घालण्याचे काम फुटपाथवर केले जात होते. आर्थर रोड जेलजवळील सात रस्त्यावर ते काम गुरुजी व त्यांची धडपडणारी मुले करत असत. म्हणूनच विंदांनी प्रज्ज्वलित केलेली ध्येयवादी पत्रकारितेची मशाल सात रस्त्यावर आणण्यात आली. 

तेथील फुटपाथवर फुले पसरून ठेवली होती, त्यावर 'साधना'चे काही अंक ठेवले गेले. साने गुरुजींचे त्यावेळचे सहकारी आणि सुरुवातीच्या काळात ज्यांनी साधनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली, त्या 92 वर्षांच्या श्रीरंग वरेरकरांची उपस्थिती हे मुख्य आकर्षण होते. त्याच ठिकाणी दिनू रणदिवे, मृणालताई गोरे, विष्णू आंग्रे हेही उपस्थित होते. त्यानंतर ती चेतवलेली मशाल घेऊन अपना सहकारी बँकेच्या सहकाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढली आणि कार्यक्रमस्थळापर्यंत (राजा शिवाजी विद्यालय, दादर) आणली.

22 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता उदघाटन समारंभ सुरू झाला. मोहन धारिया समारंभाचे अध्यक्ष होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. 'साधना'चे कार्यकारी विश्वस्त आप्पासाहेब सा.रे. पाटील, विश्वस्त किशोर पवार, संपादक नरेंद्र दाभोलकर आणि अपना परिवारातील सुरेश तावडे, शंकर शिंदे, सदानंद चाळके हे संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. शाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी 'बलसागर भारत होवो' हे साने गुरुजींचे गीत म्हटले, याच वेळी श्रीरंग वरेरकर, विष्णू आग्रे, आनंद लिमये यांचा 'साधना'च्या वाटचालीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, 'देशातील आणि जगातील प्रश्न सोडवण्याचे काम लोकशाही समाजवादाच्या मार्गानेच होऊ शकेल, असा विश्वास मला वाटतो; पण त्यासाठी स्त्रीमुक्ती, जाती-अंत आणि धर्मनिरपेक्षता या तीन क्षेत्रांत सतत काम करावे लागेल. उदघाटन समारंभानंतर भीमराव पांचाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक आशयाच्या गझलगायनाचा कार्यक्रम सादर केला. 

23 डिसेंबर रोजी सकाळी 1०.3० वाजता पहिल्या सत्रात प्रकाश बाळ व सदा डुंबरे यांची 'ध्येयवादी पत्रकारिता व आजचे वास्तव' या विषयावर भाषणे झाली. प्रकाश बाळ म्हणाले, 'आज ज्या काही चळवळी आहेत, त्या कालसुसंगत नाहीत. म्हणून आता वैचारिक पुनर्माडणीची गरज आहे. हे काम 'साधना' साप्ताहिक करू शकते पण त्यासाठी त्याचे स्वरूप बदलावे लागेल.' साप्ताहिक सकाळचे संपादक सदा डुम्बरे म्हणाले, 'आज सभोवतालची पत्रकारिता धंदेवाईक झाली आहे. म्हणून 'साधना' ने पत्रकारिता आणि ध्येयवाद यांची चर्चा करण्यापेक्षा 'कालकुपी' तून बाहेर पडून, वैचारिक दृष्ट्या स्पष्ट आणि टोकदार भूमिका घेतली पाहिजे, आजच्या पत्रकारितेला ते मोठे योगदान ठरेल.

दुसऱ्या सत्रात, 'आजची प्रसारमाध्यमे : परिवर्तनाला किती तारक, किती मारक?' या विषयावर अवधूत परळकर, अतुल पेठे, पुष्पा भावे यांनी मांडणी केली. अवधूत परळकरांनी सभोवतालच्या बाजारू व्यवस्थेवर टोकदार भाष्य केले. त्याचा संदर्भ घेऊन अतुल पेठे म्हणाले, 'परिस्थिती फार प्रतिकूल आहे, चांगले काही करायला वाव नाही असे मला वाटत नाही. कोणताही वर्तमानकाळ, भूतकाळापेक्षा चांगलाच असतो. तसेच आजच्या वर्तमानाबद्दलही म्हणता येईल. प्रत्येकाला आपली स्वत:ची अशी 'स्पेस' निर्माण करता येते आणि ती वाढवता येते, असाच माझा विश्वास आहे.' पुष्पाताई भावे यांनी आत्मपरीक्षणाची गरज आहे व परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही, अशी मांडणी केली.

तिसऱ्या सत्रात अखिल भारतीय पातळीवरील ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांची मुलाखत सुहिता थत्ते यांनी घेतली. सदानंद वर्दे व यदुनाथ थत्ते यांच्या या दोन कन्यांचा संवाद उपस्थितांना वेगळाच आनंद देऊन गेला.

चौथ्या सत्रात 'सेझ' या विषयावर 'अभिरूप न्यायालय' हा अनोखा कार्यक्रम झाला. सुरेखा दळवी व उल्का महाजन यांच्यावर निळू दामले यांनी फिर्याद दाखल केली होती की, 'या दोघी आणि सेझचे विरोधक देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणत आहेत. बदलते जग समजून न घेता, नीट अभ्यास न करता हे सेझला विरोध करत आहेत. त्याचा बचाव त्या दोघींनी उत्तम केला. गजानन खातू व काही सेझग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या विषयांतील तज्ज्ञ म्हणून हेमंत देसाई यांची साक्ष घेण्यात आली आणि न्यायाधीशाची भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी बजावली. संजय मं.गो. यांनी सूत्रसंचालन केले. 

पाचव्या सत्रात प्रा.रा.ग. जाधव यांचे 'धर्म आणि साहित्य' या विषयावर भाषण झाले. अध्यक्षस्थानी चंद्रशेखर धर्माधिकारी होते. त्यांनी समारोप केला. विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाने 'साधना समकालीन : 2००7' महोत्सवाची सांगता झाली.

Tags: मोहन धारिया ध्येयवादी पत्रकारितेची मशाल 'साधना' 'धर्म आणि साहित्य' प्रा.रा.ग. जाधव 'अभिरूप न्यायालय' weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके