डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

21 तारखेस सकाळी नानासाहेब लंडनला रवाना झाले. आदल्या दिवशी संध्याकाळी महापौर श्री राजाभाऊ चिंचुलकर यांच्या निवासस्थानी मुंबईकरांच्या अनौपचारिक मेळाव्यात नानासाहेबांनी केलेले हितगूज भारतातील पन्नास दिवसांच्या धावपळीत त्यांनी काय केले याचा आढावा घेणारे होते. दीड महिन्यापूर्वी ते भारतात आले. त्यावेळी भारताचे जे चित्र होते त्यात आता आशादायी बदल होण्याची लक्षणे दिसत आहेत. पुन्हा लंडनला परत जाताना मनाला दिलासा देणारी ही भावना सांगाती घेऊन आपण परतजात आहोत, हे त्यांनी सूचित केले.

पन्नास दिवसांचे जनजागरण

एखादा आठवडा असा उगवतो आणि असा मावळतो की त्या सबंध सात दिवसांवर एकाच व्यक्तीने आपल्या विचारांची छाप उठवून दिली आहे असे दिसते. ब्रिटनमधील भारताचे राजदूत श्री नानासाहेब गोरे यांनी 13 जानेवारी ते 20 जानेवारी या काळात मुंबई आणि मुंबईचा परिसर यावर अशी छाप उठवली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

21 तारखेस सकाळी नानासाहेब लंडनला रवाना झाले. आदल्या दिवशी संध्याकाळी महापौर श्री राजाभाऊ चिंचुलकर यांच्या निवासस्थानी मुंबईकरांच्या अनौपचारिक मेळाव्यात नानासाहेबांनी केलेले हितगूज भारतातील पन्नास दिवसांच्या धावपळीत त्यांनी काय केले याचा आढावा घेणारे होते. दीड महिन्यापूर्वी ते भारतात आले. त्यावेळी भारताचे जे चित्र होते त्यात आता आशादायी बदल होण्याची लक्षणे दिसत आहेत. पुन्हा लंडनला परत जाताना मनाला दिलासा देणारी ही भावना सांगाती घेऊन आपण परतजात आहोत, हे त्यांनी सूचित केले. त्यांच्या या पन्नास दिवसांच्या दौऱ्याचे संयोजन करणारे श्री किशोर पवार म्हणाले, 'नानासाहेब रजेवर आले होते हे खरे, पण रोजगार हमीवर काम करणाऱ्या एखाद्या तरुणाप्रमाणे या पन्नास दिवसांत आम्ही आम्हाला हवी होती ती कामे नानासाहेबांकडून करून घेतली. सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत आणि पुन्हा दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत रोज किमान पाच ठिकाणी तरी आम्ही त्यांना सद्य:स्थितीवर मार्गदर्शन करावयास लावले. इलाजच नव्हता. जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणीच प्रचंड होती.

नानासाहेबांच्या दौऱ्यामुळे जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ठायी ठायी मेळावे झाले. काही ठिकाणी तर गेल्या सबंध वर्षांत प्रथमच असे मेळावे भरले होते. पुरोगामी लोकशाही आघाडीतील फक्त एका मंत्र्याने नानासाहेबांचे विचार तळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याची पद्धतशीर धडपड आपल्या मतदार संघात केली. बाकीच्यांनी त्यांच्या आगमनाची फारशी दखलही घेतली नाही. मुंबईची जनता पार्टी सर्व देशात आघाडीवर असते असा तिचा लौकिक येथल्या जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी व मुंबईतील सामान्य जनतेसाठी नानासाहेबांच्या दौऱ्याची आखणी करताना मुद्दाम एक दिवस राखून ठेवला होता, पण मुंबईतील जनता पक्षाने मुंबईत त्यांची एकही जाहीर सभा भरवली नाही किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे खाजगीतदेखील भाषण आयोजिले नाही, हे मला अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे! अमरहिंद मंडळ, दादर किंवा चर्चगेटचा सुंदराबाई हॉल येथे नानासाहेबांची जाहीर सभा झाली असती तर पक्ष कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ती फायदेशीर ठरली असती." 

आता श्री. किशोर पवारांनी ही व्यथा व्यक्त केल्यानंतरही असे म्हणावेसे वाटते की, मुंबई जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलेली ही चूक अंशत: भरून काढण्याचे प्रयत्न मुंबई मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि नाथ पैंची स्मृती जागवणारी व्याख्यानमाला या तीन संस्थानी केले व आमनेसामने बसून नानासाहेबांचे विचार ऐकता आले. पत्रकार संघात काय किंवा अन्यत्र काय, नानासाहेब आपल्या खास शैलीने बोलले. ही खास शैली म्हणजे अहिंसक बोली, निर्भयपणे सत्य तर सांगायचे, पण ज्याला ते जाणवावे त्याला बोचकारल्यासारखे, रक्तबंबाळ केल्यासारखे वाटू नये, अशा पद्धतीने सांगायचे, ही नानासाहेबांची शैली, खास त्यांची. या शैलीचा प्रत्यय पत्रकार संघात कसा आला याची एक दोन उदाहरणे येथे देणे अप्रस्तुत ठरू नये.

जनता पक्षात निर्माण झालेल्या व्यक्तिस्तोम कलहात आपल्यासारखा मध्यस्थ काही अर्थपूर्ण इलाज करू शकणार नाही काय, असा प्रश्न विचारला जाताच नानासाहेब हसत हसत म्हणाले, 'माझं महत्व अजुन सर्वांना पटलेलं नाही!' आणि मग ज्यांना या उत्तरातील बारकावे ठाऊक होते त्यांना वेदनाच झाल्या. या उत्तराने पत्रकार खळखळून हसले याचे कारण या वाक्याची दुसरी बाजू पत्रकारांना ठाऊक नाही. ती ठाऊक असती तर नानासाहेब जनता पक्षाचे अध्यक्ष होते तर पक्षाला गेल्या दीड वर्षात वेगळे रूप, वेगळा आकार देऊ शकले असते असे ते पुनः पुन्हा लिहिते. नानासाहेबांनी पक्षाची धुरा वहावी असे आपापले पक्ष विसर्जित करून जनतात आले त्यांच्याहिपैकी काही अन्य मातब्बर मंडळीना वाटत होते, पण ते घडले नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करणे बरे नव्हे म्हणून त्याला इथेच विराम देणे योग्य होईल. लोकशाही संकेताच्या मर्यादेत मासपार्टीत राहून काम करायचे म्हटल्यावर हे सर्व ओघानेच येते. राजदूत म्हणून काम करीत असताना नानासाहेबांनी मोकळेपणाने मतप्रदर्शन करावे ही कित्येकांना खपत नाही. यासंबंधात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नानासाहेब म्हणाले, सर्व प्रश्नांवर मोकळेपणाने विचार मांडावेत असा सिद्धांत वगैरे मी बनवलेला नाही. मला जे सांगावेसे वाटते ते मी सांगत असतो. आणि हेच खरे आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात उद्योगपतींच्या उपस्थितीत त्यांना जे सांगायचे होते ते हातचे राखून न ठेवता त्यांनी सांगितले. औद्योगिक व कामगार आघाडीवर आज जे घडत आहे (बँक संप, प्रीमियर ऑटोमोबाईल्स संप, गोद्रेज यांच्यावरील हल्ला वगैरे नानासाहेबांना अभिप्रत असावे.) त्याविरुद्ध भांडवलदार वर्गाकडून मोठी हाकाटी करण्यात येत आहे, पण हे करण्यापूर्वी आपण स्वतः आतापर्यंत काय केले व आतासुद्धा काय करीत आहात, याचा विचार करावा, असाच सल्ला त्यांनी उद्योगपतींना दिला. ट्रेड युनियन्स जबाबदार नेत्यांकडून धंदेवाईक दादांच्या हाती कोणी सोपवल्या? ही सुरवात कोठून झाली? हे सवाल हसत हसत त्यांनी उद्योगपतींना विचारले आणि याच संदर्भात जेव्हा राष्ट्रीयीकरणाचा प्रश्न ह्याबाबत केंद्रीय उद्योग खात्याची नवी आकर्षक घोषणा याबद्दल आपले मत नोंदवण्याची वेळ आली तेव्हा नानासाहेबांनी राष्ट्रीयीकरणाकरता राष्ट्रीयीकरण नको, हीच स्वच्छ, निर्लेप, अनाकर्षक, पण समतोल राखणारी अशी भूमिका घेतली.

नानासाहेबांनी हे मत व्यक्त करायला नको होते, असे पुढे दोन दिवसांनी अनौपचारिक नागरिकांच्या मेळाव्यात एका जबाबदार व्यक्तीने म्हटले तेव्हा नानासाहेब म्हणाले, माझे यात काय चुकले? मी काही राष्ट्रीयीकरणाच्या विरुद्ध नाही. अजिबात कोठेही, कधीही उद्योगांचे राष्ट्रीयीकरणा नको, ही माझी भूमिका नाही, पण सर्व सरकारी बंधने, अटी वगैरे पाळून एखादा उद्योग व्यवस्थित चालला असेल तर त्याला राष्ट्रीयकृत केलेच पाहिजे हा आग्रह कशासाठी धरायचा?' या प्रतिसवालावर प्रश्नकर्त्यापाशी काही चोख उत्तर नव्हते!

डबाबंद अन्नाच्या प्रदेशात नानासाहेब सध्या राहात असूनही विचार देताना मात्र डबाबंद, गोठवलेला असा देत आहात, हे त्यांचे वैशिष्ट्य यावेळी जेथे तेथे दिसून आले. साम्यवाद असो, समाजवाद असो, ट्रेड युनियनिझम असो. आपले सर्व विचार ज्या ब्रिटनकडून आपण जसेच्या तसे उचलले, तेथेही पहिले विचारांचे कपडे तोकडे पडताहेत, असे दिसून आल्यावर नवे विचारमंथन सुरु झाले आहे आणि पगारवाढीच्या प्रश्नावर मजूर पक्षाचे पंतप्रधान व त्याच पक्षाच्या कामगार संघटना यांच्यात मतभेद असता हुजूर पक्षाचे पंतप्रधान एडवर्ड होथ हे राष्ट्रहिताचा विचार करून पंतप्रधान कलहन यांना पाठिंबा देत आहेत, हे सांगताना आपल्याकडेही राष्ट्रहिताचा विचार प्रामुख्याने स्वीकारला गेला पाहिजे, हेच त्यांना सुचवावयाचे होते.

स्वर्गीय नाथ पै स्मृतिनिमित्त जी व्याख्यान माला गुंफण्यात आली तिचे उद्घाटन त्यांनी केले आणि त्यावेळी दिल्लीत चालू असलेल्या द्यूताचा उल्लेख त्यांनी ज्या पद्धतीने केला त्याचा परिणाम म्हणूनही आठवडाअखेर दिल्लीतील वातावरण निवळून फासेपटूंनी कासे आणि सोंगट्यांचा पट गुंडाळून ठेवला नसेलना, अशी रास्त शंका येते. त्यांचे हे उद्घाटनाचे भाषण इंदिरा गांधींच्या राजकारणाचा वसा घेतलेल्यांनाही आवडलेले दिसून आले! सर्वच वृत्तपत्रांनी ते विस्ताराने दिलेले असल्याने त्याची पुनरुक्ती करण्याची आवश्यकता नाही. ठाणे आणि वसई येथेही नानासाहेबांची भाषणे झाली आणि ठाण्याबाबत तर असेही समजले की सबंध वर्षात प्रथमच जनता पक्षाची अशी ही पहिली सभा झाली!

मराठवाड्यातील नानासाहेबांचा दौरा कसा झाला याचे उत्तर नानासाहेबांनी महापौरांच्या हिरवळीवर दिले. ते म्हणाले, “मराठवाड्यातील ताज्या हिंसाचाराने सवर्ण आणि दलित यांच्यामध्ये उभी राहिलेली भिंत मी पाडू शकलो नाही हे खरे, पण काही विटा ढासळल्या आहेत एवढे मी सांगू शकतो." 'लोकशाहीतील आचार विचार' या विषयाने स्वर्गीय नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले आणि नानासाहेबांच्या त्या भाषणाची दखल वृत्तपत्रांनी जशी विस्ताराने घेतली तशीच प्रा. मधु दंडवते यांच्या या मालेतील समारोपाच्या भाषणांचीही घेतली जावयास हवी होती पण जागेचा अभाव म्हणून असेल अथवा दंडवत्यांच्या 'सुपर फास्ट' वक्तृत्वाबरोबरची घोडदौड जमली नाही म्हणून असेल, दंडवत्यांनी विवेचिलेली भारतामधील 'संसदीय लोकशाही' हजारो वाचकांपर्यत विस्ताराने पोचली नाही. (या अंकात पान 5 वर त्याचा गोषवारा दिला आहे) कारूळ येथे 'नाथ पै ज्ञानप्रबोधिनीचे रोपटे' लावून दंडवते मुंबईत विमानाने आले होते. त्या ज्ञानप्रबोधिनीच्या वातावरणात त्यांनी इतरांना प्रभावित केलेले असणारच, पण ते स्वतः अपरंपार प्रभावित झालेले होते. दिल्लीची कामे सोडून रात्रीच्या प्रवासाचे दिव्य पत्करून आपण कोकणच्या लाल मातीत का जातो हे त्यांनी चंद्रशेखर व मोरारजींना ज्या शब्दांत सांगितले त्याच शब्दात सर्वांना जाहीर करणे योग्य होईल. 'इथे दिल्लीत आमच्या कामाचा काही प्रकाश पडत असेल तर त्याचे पॉवर हाऊस कोकणच्या लालमातीत आहे आणि म्हणून रात्रीचा प्रवास करून तेथे जावे लागले तरी त्याचा शीण वाटत नाही.' असे त्यांनी सांगितले.

कारूळला बेचाळिशी क्रांतीतील हुतात्मा कर्णिक यांचे स्मारक आहे आणि तेथेच आता नाथ पैं चे स्मारक होत आहे! दोन स्मारकांचा हा संगम गंगा-यमुनांच्या स्मारकाइतकाच पवित्र आहे, असे ते म्हणाले. या ज्ञानप्रबोधिनीसाठी ज्या जाहिराती स्वीकारण्यात येणार आहेत त्यांचे वैशिष्ट्य, त्यांची अभिनवता अगदी वेगळी आहे. दंडवत्यांनी जाहिरातदारांना सांगितले, 'वुइ शाल नॉट प्रिंट युवर अॅडव्हर्टाइसमेंटस्, वुइ शाल प्लँट देम'-आम्ही तुमच्या जाहिराती छापणार नाही, आम्ही त्याची रोपे लावू!' एकेका जाहिरातदाराच्या नावे एकेक रोपटे! त्या रोपट्यावर त्याच्या नावाचा फलक असेल. त्यामुळे कारुळला जी गर्द झाडी तयार होईल त्या झाडीच्या छायेत, त्या झाडीच्या सळसळण्यातून नाथची आठवण राहील, असे दंडवते म्हणाले.

Tags: कोकण मधू दंडवते महाराष्ट्र पत्रकार संघ नाथ पै ब्रिटन मुंबई जनता सरकार नानासाहेब गोरे Konkan Madhu Dandawate Maharashtra Patrakar Sangh Nath Pai Britain Mumbai Janta Government Nanasaheb Gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके