आमच्या मागण्या ऐकून घ्या
मागतो ते ते आम्हाला द्या
भूक भूक खूप खूप भूक लागली
आम्हाला खायला पायजे
खेळून मातीत अंग मळली
धो धो पाणी पाहयजे
हूहू कुड कुड थंडी वाजली
कपडे पांघरूण पाह्यजे
भी भी फार फार भीती वाटली
छानसं घरकुल पाहयजे
खूप खूप शिकायला शाळा पायजे
ऊ ऊ बाऊ झाला औषध पाह्यजे
खाऊ द्यायला बाबा पाह्यजे
लाड करायला आई पाह्यजे
सगळे द्यायला तुम्ही पाह्यजे
मागू ते ते दिलं पाह्यजे!
आमच्या मागण्या ऐकून घ्या
मागतो ते ते आम्हाला द्या!सरिता पदकी
यंदाच्या सव्वीस जानेवारीला छोट्या मुलांसाठी एक मोठी गोष्ट पुण्यात घडली. दरवर्षी 26 जानेवारीचा दिवस नेमेचि येतोच. पहाटेपासूनच सिनेसंगीताच्या उल्फतनफरतीच्या रेकॉर्ड्स दणकायला लागतात. सुट्टी असल्यामुळे नोकरदार लोक आणि ते म्हणून त्यांच्या गृहिणी आळसावलेल्या असतात. अर्थात झेंडावन्दनाला नाही आले तर ज्यांची एका दिवशीची गैरहजेरी मांडली जाते असे लोक, मंत्री वगैरे राजकारणी आणि सक्ती असल्यामुळे शाळेतले शिक्षक व काही विद्यार्थी जुलमाचा रामराम भारतीय प्रजासत्ताकाला करतात. येऊ नये पण असे यान्त्रिक, निर्जीव स्वरूप आपल्या या राष्ट्रीय सणाला आलेले आहे.
तर या निष्प्राण कर्मकांडात जीव भरला यंदा प्रजासत्ताकदिनी नेहरू क्रीडांगणावर जमा झालेल्या तीन हजार हसऱ्या-बागडत्या शिशुंनी! त्यांच्याबरोबर वाजत असलेला पोलीस बँड आणि पेरू गेट भावेस्कुलच्या मुलांच्या बॅंडनं!
हा मेळावा कल्पना सुचली नूतन बाल-शिक्षण संघाला. श्रीमती शान्ताबाई आठवले, शान्ताबाई ब्रह्म, मालिनीबाई परांजपे, कोल्हटकर इत्यादी अनेक भगिनींच्या विश्वातून ही कल्पना निघाली. नूतन बाल-शिक्षण संघाच्या अनेक शिशुशाळा पुण्यात आहेत. त्या शाळांनी तर या मेळाव्यात भाग घेतलाच पण इतर अनेकही शाळांच्या चालिकांना ही कल्पना आवडून त्याही या आनंदमेळाव्यात सहभागी झाल्या. दोन-एक महिने तरी या कार्यक्रमाची आखणी आणि पूर्वतयारी चालली होती.
अखेर सव्वीस जानेवारीची सुखशीतोष्ण सकाळ उजाडली. निळ्याभोर आभाळात मेघखंड इतस्ततः विखुरलेले, हव्याहव्याशा गार वाऱ्याच्या झुळका. लोक आपला निष्प्राण सव्वीस जानेवारी उरकतायत तर सारसबागेपाशी चिमण्या हजारो शिशुंचा किलबिलाट! लोक खाडकन जागेच झाले. या सुशांत डेक्कन जिमखान्याच्या पाँश मंटिसरीतली मुले जशी होती तशी झोपडपट्टीतल्या गरीब बालवाडीतही होती. साऱ्यांचाच उत्साह! हासरा नाचरा! आपापल्या गणवेषांत आलेल्या या मुलांच्या हातांत हिरवी, पिवळी, तांबडी अशी छोटी- छोटी कागदी निशाणे होती. त्यावर होते भारतीय बालक वर्षाचे चिन्ह. ही निशाणे आपापले चिमुकले हात वर करून तो मुले नाचवू लागली को हजारो रंग नाचु लागल्याचा भास होत होता आणि मुलांच्या हातात मागण्यांचे फलकही 'आमचे हात बांधू नका,' ‘आम्ही बाल छोटे, काम करू मोठे' असे! ही मुले आपल्या घोषणा देत देत, आपापल्या शिक्षिकांबरोबर, सारसबागेतून नेहरू क्रीडांगणाकडे यायला निघाली तेव्हा रंगांचा नि चिमण्या आवाजांचा जल्लोष उडाला! ज्या पालकांनो ते दृश्य पाहिले असेल त्यांना बाळकवर्ष पक्के ध्यानात राहिले असेल!
मिरवणुकीने हे तीन हजार शिशू बॅंडच्या संगतीत नेहरू क्रीडांगणावर पोचले. कोवळी उन्हें तिथल्या हिरवळीवर येऊ बघत होती. सारी बालमंडळी आपापल्या निशाणांसह हिरवळीवर बसली. त्यांच्यासमोर, रंगमंचावर नूतन बालशिक्षणाचे कार्यकर्ते आणि आकाशवाणीचे तंत्रज्ञ आाणि मुख्य पाहुण्या सरिता पदकी होत्या. रंगमंचदेखील रंगीबेरंगी पताका व फुग्यांनी सुशोभित केला होता. पाहुण्यांना जे बॅजेस लावले त्यावर एका बाजुला अन्तरराष्ट्रीय नि दुसऱ्या बाजूला भारतीय बालकवर्ष चिन्ह होते. या सात्यातच आयोजकांची औचित्यपूर्ण सौंदर्यदृष्टी दिसत होती.
मग झाले झेंडावंदन! त्याला हजारो शिशुंनी सलामी दिली. मुलांच्या बँडवर जनगणमन वाजले. आणि मग शिक्षकांनी मुलांना घोषणा दिल्या, गाणी सांगितली. मुले एका आवाजात ती गाणी म्हणत होती. वेगळाल्या शाळेतली असली तरी!
मग मुख्य पाहुण्यांना गोष्ट सांगायला सांगितले. त्यांनी आधी एक झेंड्याचे गाणे सांगितले. 'झेंडा आमचा उंच उंच-ताठ ताठ आमची मान' अशा सोप्या शब्दांतले ते गाणे मुलांनी आपलेपणाने उचलले आणि मग सांगितले मुलांच्या मागण्यांचे गाणे. 'आमच्या मागण्या ऐकून घ्या-मागतो ते ते आम्हाला द्या’ हे ते गाणे तीन हजार शिशुंनी मुठी वळून हात उंच करून जोषाने म्हटल्यावर काय बिशाद आहे कोणाची त्या मागण्या मान्य न करण्याची! मग पाहुण्यांनी छोटू हत्तीची गोष्ट सांगितली. तीही मुलांनी अगदी रंगून ऐकली.
मग शिक्षणप्रमुख श्री वि. वि. चिपळूणकर समारंभाला आले. त्यांना बोलण्याची विनंती करण्यात आली. 'पण निदान बालक वर्षात तरी मुलांना भाषणांनी न पीडण्याचं आपण ठरवू या.' असे म्हणून त्यांनी भाषणाचा साफ आणि ठाम नकार दिला. मग शेवटचे गोड काम-खाऊ वाटण्याचे. मेळाव्यात जमा झालेल्या सर्व शिकांना खाऊ देण्यात आला. निदान या शिशुंच्या, त्यांच्या शिक्षकांच्या, पालकांच्या, संयोजकाच्या नि पाहुण्यांच्या दृष्टीने हा प्रजासत्ताकदिन चैतन्यमय झाला. ही कमाई नसे थोडकी!
Tags: सरिता पदकी आमच्या मागण्या प्रजासत्ताक दिन जागतिक बालक वर्ष Sarita padki Our Demands Republic Day World Children's Year weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या