डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कट्ट्याकट्ट्यावरून दगडफेक

जसा रस्ता वळतो तशी त्यावरून चालणारी माणसेही वळतात. रोजच्या रोज आपण हे बघतो, पण राजकारणी तसे चालू लागले म्हणजे मात्र नेहमीच असे घडते असे नाही. कधीकधी ती मंडळी रस्ता सोडूनही चालू लागलेली दिसतात. आडवाट पत्करतात; नवी वाट देखील पाडण्याचा प्रयत्न करतात! जबळजवळ 9-10 महिने हातात हात घालून चाललेली महाराष्ट्राच्या पुरोगामी लोकशाही दलातील मंडळी गेल्या काही दिवसांपासून अशीच आडवाटेला शिरलेली दिसतात, ती का बरे?

जसा रस्ता वळतो तशी त्यावरून चालणारी माणसेही वळतात. रोजच्या रोज आपण हे बघतो, पण राजकारणी तसे चालू लागले म्हणजे मात्र नेहमीच असे घडते असे नाही. कधीकधी ती मंडळी रस्ता सोडूनही चालू लागलेली दिसतात. आडवाट पत्करतात; नवी वाट देखील पाडण्याचा प्रयत्न करतात! जबळजवळ 9-10 महिने हातात हात घालून चाललेली महाराष्ट्राच्या पुरोगामी लोकशाही दलातील मंडळी गेल्या काही दिवसांपासून अशीच आडवाटेला शिरलेली दिसतात, ती का बरे?

इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीला घेराओ करण्यासाठी प्रत्येक जथ्याने आपापल्या ताकदीनुसार मोक्याची जागा पकडण्यासाठी नव्या पाऊलवाटा पाडण्याचे कार्य आरंभिले आहे काय? तसे तर काहीच लक्षण दिसत नाही. पुलोदचा जथा विस्कळित होऊन काहीजण या कट्ट्यावर तर काहीजण त्या कट्ट्यावर बसले आहेत आणि अगदी नेम धरून परस्परांनाच अणकुचीदार दगड मारीत आहेत असे दिसते! 

हे एकाएकी असे का घडत आहे? 

बारगळलेली गरुडभरारी

या बाबतीत काही घटनांचा अनुक्रम धावत्या नजरेखाली घालणे इष्ट होईल. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. आणि 'गरुड-भरारी' मारून पुलोदला खाली खेचण्याचा काँग्रेस, काँग्रेस आयचा मनसुबा हवेतच 'गरुडाचे पंख' छाटले गेल्यामुळे बारगळला. पुलोदला हे जीवदान लाभलेले नव्हते. पुलोदने खंबीर राहून स्वतःच्या ताकदीवर मिळवलेला हा विजयच होता. या विजयानंतर कुणीतरी शरद पवारांची दृष्ट काढण्याची आणि विजयी वीर म्हणून त्यांना ओवाळण्याची आवश्यकता होतीच, ते काम मुकुंदराव किर्लोस्करांनी ‘मनोहर’ चा खास अंक काढून केले! धावता पोल घेऊन सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून श्री शरद पवार यांचा पहिला, श्री सुशीलकुमार शिंदे यांचा दुसरा आणि श्री राजाराम बापू पाटील यांचा तिसरा क्रमांक वाचकांनी लावला असल्याचे जाहीर केले. 

टेलरमेड फॉरमुला 

जनता पक्षातील श्री भाई वैद्य, श्री निहाल अहमद, श्री उत्तमराव पाटील, श्री सदानंद वर्दे यांचेही नंबर लोकप्रिय मंत्रयांच्या यादीत कुठेना कुठे होते आणि शे. का. पक्षाचे एन् डी पाटील यांनाही त्या यादीत स्थान मिळाले होते. दोन दिवसात गडबडीने अंक तयार करावा लागला म्हणून म्हणा अथवा अन्य काही कारण असेल म्हणून म्हणा, अशा धावत्या पोलचे जे विगतवार विश्लेषण देण्याची प्रथा असते ती मुकुंदरावांनी पाळल्याचे दिसुन आले नाही ! खुद्द मुख्यमंत्र्यांनाही हे खटकले असावे. त्यांनी विनोदाने का होईना मुकुंदरावांना चिमटा काढलाच. 'श्री शरद पवार हे मित्र. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते.' इत्यादी मुकुंदरावांच्याच भाषणातील वाक्यांचा धागा पकडून श्री शरद पवार म्हणाले, 'आधी ठरवलं आणि त्याप्रमाणे घडवून आणलं असा हा सगळा मामला दिसतो!' श्री पवार यांच्या मनाचा मोठेपणा हा की, त्यांनी ही लोकप्रियता एकट्या पवारांची नसून सबंध पुलोद मंत्रीमंडळाची आहे असे सांगितले. त्यांचे त्या दिवशीचे सर्व भाषणच मोठे नमुनेदार, रेखीव, आणि मुख्यमंत्री या नात्याने त्यांची प्रतिमा उजळवणारे होते. 

डोक्यापेक्षा शिरपेचाला भाव

श्री शरद पवार नेहमीच द्रुतलयीत बोलतात. लयद्रुत असली तरी पाल्हाळ नसतो आणि वेगामुळे आणखी जी एक छाप श्रोत्यावर पडते ती वेगळीच असते. आपल्या अखत्यारीतील विषयांवर मुख्यमंत्र्यांची पकड चांगली आहे हे त्या वेगामुळे दिसून येते. रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्याबाबत असा विश्वास पूर्वीपासून आजतागायत वाटत आला. मुख्यमंत्र्यांच्या त्या दिवशीच्या वक्तव्याने त्यांच्याबाबतही असाच विश्वास वाटला, पण त्यांचे हे भाषण वृत्तपत्रांतून प्रसिद्धच झाले नाही. आणि सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ही 'मनोहर’ ने दिलेली किताबत तेवढी ठळकपणे छापून आली ! 

वस्तुतः मुख्यमंत्री या नात्याने श्री पवारांनी आम जनतेच्या प्रबोधनासाठी काही चांगले विचार या भाषणात पेरले होते. 'ज्याच्या डोक्यावर सत्तेचा मुकुट असतो त्याने साडे चार तासापेक्षा जास्त झोप घेऊ नये-‘ असे आर्य चाणक्याने आपल्या राजनीतीत सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी त्यांच्या भाषणात स्वतःचा जो दिनक्रम सांगितला तो बघता चार तासांहून अधिक झोप त्यांच्या वाट्यास येत नसावी. 

सकाळी 8 ते 9 न ठरलेल्या आगंतुक भेटी व 9 ते 10 पूर्व नियोजित भेटी, 10 ते 2 पर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका, नंतर पुन्हा भेटी. संध्याकाळी जाहीर कार्यक्रम. रात्री 1 पयंत फायली, हा त्यांचा दिनक्रम. लोकांनी मंत्र्यांना भेटले पाहिजे हे खरे, पण या भेटी अघळपघळ गप्पांच्या नसाव्यात आणि मुद्याचे बोलणे संपले की बोलणे संपले आहे हा मुद्दा विचारात घेऊन निरोप द्यावा हा त्यांचा सल्ला मंत्र्यांच्या भेटीस जाणारे सर्वच जण पाळतील तर आपापल्या खात्याचा अभ्यास करण्यासाठी मंत्र्यांना वेळ मिळू शकेल. 

श्री शरद पवारांचा हा जाहीर सल्ला त्यांनी केवळ स्वतःसाठी दिलेला नसून पुलोद मधील सर्वच मंत्र्यांच्या वतीने दिला आहे असे मानले पाहिजे. अशा भाषणांनी मुख्य मंत्र्यांची प्रतिमा वाढीस लागते आणि तशी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा वाढली तर त्यांना गैर काय आहे? 

पण जनता पक्षातील अनेकांना हे खटकले असावे. या खटकण्याची कारणे दोन संभवतात. एक तर आगामी जिल्हापरिषद व पंचायत निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून श्री शरद पवार यांची प्रतिमा अवास्तव मोठी करण्यात येत आहे, असे वाटून त्यांचे मन त्रस्त झाले असावे आणि जनतापक्षाच्या व शे. का. पक्षाच्या मंत्र्यांना 'ऑल्सो रॅन' वर्गीकरणात ढकलून त्यांचे बुद्ध्याच अवमूल्यन करण्यात येत आहे. असे वाटले असावे.

डोळ्यांत खुपणारी लोकप्रियता

यावर उताराही जनता पक्षीय एका मंत्र्याला लगोलग सापडला. पुलोदही पुरोगामी कार्यक्रमावर अधिष्ठित झालेली आघाडी असता सर्वाधिक लोकप्रिय म्हणून प्रसिद्धी पावलेले श्री. शरद पवार नेमके पुरोगामी कार्यक्रम ते आणि धोरण सोडून पहा हो कसे आडरानात शिरत आहेत, हे ओरडून सांगण्याचा प्रयत्न नगरविकास मंत्री श्री हनू अडवानी यांनी केला! तो त्या क्षणापुरता तरी यशस्वी झाला. बॅकबे रेक्लमेशनवर नव्या इमारती बांधण्पास परवानगी द्यायची नाही असे ठाम धोरण असता महाराष्ट्र वीज मंडळाच्या कार्यालयाची इमारत तेथे होणार, असे मुख्यमंत्री बोलून गेले होते. 

या इमारतीची कोनशिला आधीच बसवण्यात आलेली असल्याने आता ती इमारत तेथे बांधलीच पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद, पण हा युक्तिवाद पटणारा नव्हता. अनेक कोनशिला अशाप्रकारे पुढे इमारती न होता धूळ खात पडलेल्या आहेत, त्यामध्ये खंबीर धोरणापायी आणखी एका कोनशिलेची भर पडली, तर काय बिघडले? बॅकबेवर आता कुसळप्रवेश झाला की आणखी कोणी तरी मुसळप्रवेश करील, पण मंत्रिमंडळात याबाबत अखेरचा निर्णय झालेला नाही आणि श्री. हशू अडवानी यंनी निर्णयबदलास आपण खंबीर हे विरोध करणार हे जाहीर करून टाकले आहे! मुबईकरांच्या दृष्टीने हे हशूभाईंचे निर्वाणीचे बोल लोकाभिमुख वृत्तीचे द्योतक असून त्यांच्या या घोषणेमुळे मंत्रिमंडळातील समांतर काँग्रेसचा गट आणि जनता गट यांच्यातील धोरणविषयक मतभेद उघड्यावर आले. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा त्या प्रमाणात कमी उजळ झाली. 

हम भी मैदान में

यावर प्रतिउतारा हवाच होता. सुंदराबाई हॉलमध्ये श्री गोविंदराव आदिक यांनी जाहीर भाषणात तो देऊन टाकला! ‘जनता पक्ष हा काँग्रेसला पर्यायी पक्ष ठरेल ही आशा आता उरलेली नाही' असा आधात करून त्यांनी पुलोदमधील एका बलिष्ठ घटकालाच नाराज केले. जनता पक्ष हाच काँग्रेसला पर्याय असू शकतो असे मानणारे यामुळे बिथरले. राजारामबापू हे तर सध्या जनता पक्षातील कर्तुमकर्तुम! त्यांना हा आघात कसा बरे सहन व्हावा? सातत्य हा गर्दभाचा गुण, राजकारण्यांनी तो आपल्या अंगी बाणवण्याची खरे तर मुळीच आवश्यकता नाही, असेच बापूंना वाटत असले पाहिजे. त्याशिवाय गेल्या दोन-अडीच वर्षांतील आपले वागणे झटक्यात कसे विसरले असतील? त्यांनी नगर जिल्ह्यातील कोपरगावी आरोळी ठोकून सांगितले की पुलोदमधील सर्वात मोठ्या घटकावर म्हणजे जनता पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे आणि हा अन्याय मुख्यमंत्री दूर करणार नसतील तर मंत्रिपदाची वस्त्रे खाली उतरवून ठेवण्यास आपण मुळीच मागेपुढे बघणार नाही! 

बापू मागे पाहावयास तयार नाहीत एवढेच त्यांच्या या 'दे दणादण' उद्गारांनी दिसून आले. अनेक जण गालातल्या गालात हसले पण तरीही त्यांचा हा ठोसे लगावण्याचा उपक्रम जनता पक्षाने धिक्कारला नाही. एकदा हाणामारी सुरू झाल्यावर ठोसा लगावणाऱ्यात कोण कोण आहेत हेच बघे बघत नसतात. गुद्द्यास प्रतिगुद्दा दिला गेला ना, मग झाले तर असे म्हणून बघे टाळ्या पिटून मोकळे होतात. बापूना मंत्रिपदाचा लोभ आहे की नाही? त्यासाठी कोणकोणती कुपथ्ये त्यांनी केली वगैरे सांगण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर ‘राजकारणात चालायचेच' म्हणून ते मोकळे होतात! 

एका दगडात दोन पक्षी 

हा जनस्वभाव ठाऊक असल्यामुळे म्हणा किंवा या हाणामारीत आपणही एकदोन ठोसे लगावले पाहिजेत, चारदोन दगड भिरकावले पाहिजेत नाहीतर 'भालोद' या उपघटकाशी ती बेइमानी ठरेल असे वाटल्यामुळे म्हणा, श्रीमती शांती नायक यांना ही अवसान चढून त्यांनी एक दगड बापूंच्या दिशेने तर दुसरा श्री. शरद पवार यांच्या दिशेने भिरकावला. आपणास कॅबिनेट मंत्रिपद देऊ नये, राज्यमंत्रीच करावे असे जनता पक्षाने शरद पवारांना कळवले हे सत्य यावेळीवर सांगण्याची काय आवश्यकता होती? 

पुण्यातून आणखी एखाद्या कर्तबगार व्यक्तीला कॅंबिनेट मंत्रिपदी जाण्याची तिची योग्यता असुनही राज्यमंत्रिपदच मिळालेले नाही काय? त्या व्यक्तीने या विरुद्ध कधी ओठतरी हलवला आहे काय? पण श्रीमती शांती नायक यांना ते भान मुळीच राहिले नाही! जनता पक्ष एक संघटित पक्ष म्हणून अस्तित्वात नाहीच हे सर्वांना आता ठाऊक झालेले सत्य आपणही सांगितले पाहिजे, म्हणून श्रीमती नायक यांनी खास पत्रपरिषद बोलावली. राजाराम बापूंना त्यांनी पुण्यवाचनपूर्वक करायचा तो आहेर केलाच, पण मुख्यमंत्री अडचणीत येतील म्हणून रा.स्व.संघाच्या प्रश्नावर ते आपल्याशी मागे काय बोलले हे सांगण्याचे आपण टाळतो, अशी एक औदार्यपूर्ण बतावणी करुन मुख्यमंत्रयाना अडचणीत आणण्याची कामगिरी यथास्थित पूर्ण केली!

एवढ्या बतावणीने लोकांना मुख्यमंत्र्यांच्या उद्गारांचा उमज पडतोच आणि त्या प्रमाणात ते अडचणीत यायचे ते येतातच. म्हणजे एका बाजूने जनता पक्षाच्या नाकावर दगड भिरकावून त्याला घायाळ करण्यात श्रीमती शांती नायक यशस्वी झाल्या तर दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्र्यांना सावरून धरण्याचीच कोशीस आपणाला करायची आहे असे भासवीत मुख्यमंत्र्यांचे रा स्व. संघाबाबतचे विचार काय आहेत हेही सुचित करण्यात त्या यशस्वी झाल्या! एका दगडात दोन पक्षी घायाळ झाले। 

जिल्हा परिषद निवडणुकीतील वाढ

एका बाजूला जनता मित्रपक्ष यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांत सहकार्य करायचे ही भूमिका सतत मांडली जात असता परस्परांवर ही दगडफेक चालू होती. रत्नागिरी, नगर, कोल्हापूर या जिल्हयात जनता व मित्रपक्ष म्हणजे समांतर काँग्रेस, शे. का. पक्ष आदि ‘पुलोद' घटकात सहकार्य होणे कठीण आहे, या वार्ता येतच होत्या. प्रत्येक 'पुलोद' घटकाने आपापले बळ दाखवायचे या इराद्याने उमेदवारांच्या याद्याही तयार केल्या होत्या. पुन्हा एकदा मुख्यमंत्री बाह्या सरसावून गरजले! काही ठिकाणी रूपवते काग्रेसला आपले बळ दाखवावेच लागेल असे ते बोलून गेले! जनताचे श्री बबनराव ढाकणे यांनीही मग आता या हाणामारीत प्रौढ व पोक्त बोलण्याची पाळी आपली आहे हे ओळखले आणि सांगून टाकले की, मुख्यमंत्री बळ दाखवण्याची जी भाषा करतात तिचा जनतापक्षाशी अन्वयार्थ जोडण्यात येऊ नये. मुख्यमंत्र्यांची बलप्रदर्शनाची भाषा स्वर्णसिंग व इंदिरा काँग्रेस यांना उद्देशून होती. आपण मुख्यमंत्र्यांना विचारले तेव्हा त्यांनीच हा खुलासा केला आहे. ते तसे म्हणताहेत तर (पटत नसले तरी) ते आपण पटवून घेतले पाहिजे. 

तूर्त बबनराव ढाकणे यांनी झाकण घालून ही पुलोदमधील अंतर्गत हाणामारी दृष्टीआड केल्यासारखे दिसत असले तरी दमेकऱ्याच्या ऊबळीप्रमाणे ती केव्हा वर डोके काढील हे सांगता येणे अशक्यच आहे. या सर्व हाणामारीने काय साधले, असा प्रश्न सामान्य माणसास पडतो? 

जनता पक्ष महाराष्ट्रात एकसंघ व समजूतदार असल्याचा जो लौकिक होता त्यात भर पडली की खोट आली? रुपवते काँग्रेस अधिक बलवान झाली की झाली नाही? शांतपणे विचार करणारास गेल्या तीन आठवड्यातील या मुक्त विचारांनी जनता पक्षाची महाराष्ट्रातील प्रतिमा सुधारण्याऐवजी कुधारली आहे आणि समांतर काँग्रेसचे अधिक उजळले आहे या निष्कर्षावर यावे लागेल. तर मग यामुळे पुलोदमध्ये मोठी फाटाफूट होऊन पुलोद मंत्रिमंडळाच्या शेवटाचा हा श्रीगणेशा झाला असा निष्कर्ष काढायचा काय ? घाईघाई असा निष्कर्ष कोणी काढू लागेल तर तेही चूक ठरेल. 

कुणी कितीही ओरडून सांगो, मिळालेली मंत्रिपदे सोडून खाली सतरंजीवर येण्याची कुणाचीही इच्छा नाही. प्रत्येक घटकाला हे पूर्णपणे ठाऊक आहे की या घडीला तसा आत्मघात करणे ही राजकीय दिवाळखोरी ठरेल. जिल्हा परिषदांच्या आणि पंचायतीच्या निवडणुकांत जेवढा हात मारायला मिळेल तेवढे बरे हे ओळखून पदरचे व उसने अशी दोन्ही अवसाने आणून ओरडायचे म्हणून ही कट्ट्याकट्ट्यावर बसून दगड फेकण्याची स्पर्धा चालू आहे. जनतेचे मनोरंजन होत आहे. उद्या निवडणुका होऊन जाऊ द्यात. दुसऱ्या क्षणी सगळी शस्त्रे शमीवृक्षावर जातील आणि पुन्हा 40 कलमी कार्यक्रमाचा व तो राबवणाऱ्या मंत्रिमंडळाचा जयजयकार सुरू होईल. 

Tags: महाराष्ट्र राज्यातली पक्षीय राजनीती जिल्हा परिषदेची निवडूक State Party Politics of Maharashtra Election of District Council Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके