डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'राष्ट्रीय एकात्मता' ही संकल्पना आपण का टाकली कळत नाही. ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना आपल्याला मान्य आहे असा याचा अर्थ होतो. राष्ट्रवादामुळे राष्ट्राराष्ट्रांतील माणसांमध्ये भेद निर्माण होतो. शत्रुत्वाची भावना रुजते. राष्ट्रवाद जोपासल्यास धर्मांधता जोपासली जाते.

खरंच, तमाशा वाईट आहे?

‘साधना’मधील अवधूत परळकर यांचा 'सुरेखा पुणेकर आणि आम्ही मुंबैकर' हा लेख वाचला. 'सोळा हजारांत देखणी'चा प्रयोग पाहून त्यांनी हा लेख लिहिला आहे. 'देखणी'चा प्रयोग 'देखणा' असल्याचे कौतुक पत्रकारांनी केले आहे. 'तसा' परळकरांच्या लेखात उल्लेख आहेच. पण हा ‘देखणी’चा प्रयोग पाहून घरी गेल्यानंतर त्यांनी ‘शांतं पापं...शांत पापं’ म्हणत शॉवर बाथखाली सचैल स्नान केले असावे. कारण 'तमाशा' हा प्रकार हीन दर्जाचा असून तो उच्चभ्रू लोकांनी पाहू नये, किमान सुरेखा पुणेकरसारख्या उच्चभ्रू समाजातील मुलीने कंबर लचकत, नजरफेक करीत यात नाचू नये, लावणी म्हणू नये; ते सुसंस्कृतपणाचे लक्षण नव्हे. त्यासाठी विठा, रंगू, शेवंता आहेतच. तमाशा म्हणजे ब्ल्यू फिल्मची ‘सॉफ्ट पोर्नो’ फिल्म! मराठी माणसाच्या लैंगिक मानसिकतेला मानवेल असा हा प्रकार आहे, असे परळकर म्हणतात.

तमाशा ही लोककला फार जुनी आणि पूर्वी होती तशीच आजही आहे. गणगौळण, बतावणी, वग या पूर्वीच्याच साच्यात ती सादर केली जाते. अगदी आडवळणी खेड्‌यातसुद्धा! त्यात काडीचा फरक नाही. तमाशातील नाची देहप्रदर्शन करीत नाही. तिच्या शरीराला पुरुष कलाकार हातसुद्धा लावणार नाही. जे काही असेल ते दुरूनच! नाचीचा पदरसुद्धा ढळणार नाही. लुगडे, पातळातच त्या असतात. परळकर शेवटी म्हणतात, "उद्या लावणीशाळा निघाल्या तर त्यात आपट्‌यांची कविता, गोडबोल्यांची नंदिता जाणार नाही… तर त्यांनी दीक्षितांची माधुरी, कुलकर्ण्यांची ममता व्हावे असे तर परळकरांना सुचवावेसे वाटत नसेल ना?

धों. म. मोहिते. मोहित्यांचे वडगाव, जि. सांगली.

----------

राष्ट्रीय एकात्मता संकल्पनेत काय अभिप्रेत आहे?

प्रबोधन मोहिमेच्या निमित्ताने लिहिलेले संपादकीय वाचले. धर्मांधतेला विरोध, धर्मनिरपेक्षतेचा आग्रह यासाठीचे आपले अभियान योग्यच आहे. परंतु त्यात 'राष्ट्रीय एकात्मता' ही संकल्पना आपण का टाकली कळत नाही. ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना आपल्याला मान्य आहे असा याचा अर्थ होतो. राष्ट्रवादामुळे राष्ट्राराष्ट्रांतील माणसांमध्ये भेद निर्माण होतो. शत्रुत्वाची भावना रुजते. राष्ट्रवाद जोपासल्यास धर्मांधता जोपासली जाते. पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी जेव्हा एक झाले तेव्हा पूर्व जर्मनीतील किंवा पश्चिम जर्मनीतल्या लोकांच्या 'राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेला तडा गेला, का त्यांना त्याचा अभिमान वाटला?

सोव्हिएत युनियनचे अनेक देशांत तुकडे झाले तेव्हा तेथील प्रत्येक देशातील लोकांना राष्ट्रीय एकात्मता का महत्त्वाची वाटली नाही? उद्या समजा भारताच्या शेजारची सर्व राष्ट्रे एकत्र येऊन एक राष्ट्र करावयाचे म्हटले तर राष्ट्रीय एकात्मतेचा कोणता अर्थ आपण लावाल? किंवा भारताचे पुन्हा छोटे-छोटे तुकडे होऊन महाराष्ट्र एक स्वतंत्र राष्ट्र झाले तर महाराष्ट्राच्या 'राष्ट्रीय एकात्मते’साठी अभियान चालवणे योग्य होईल काय? हिंदुत्ववादी संघटनांनी 'राष्ट्रीय एकात्मता’ ही संकल्पना हजारो वेळा वापरून इतकी घट्टपणे आपणा सर्वांच्या मनावर बिंबवली आहे की या संकल्पनेमधील फोलपणा आपल्या लक्षात येत नाही. आपणांसारख्या पुरोगामी मंडळींनी याचा गांभीर्याने विचार करून या संकल्पनेस लवकरात लवकर तिलांजली द्यावी.

टी. बी. खिलारे, पुणे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके