डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पी.डब्ल्यू. खांडेकर साधना त्या वाटेने चालू लागली आहे' म्हणून हा खटाटोप- या लेखामध्ये म्हणतात, हिंदुत्ववादी शक्तींबद्दल 'साधना'चा असलेला दुष्ट भाव, हे एक कारण त्यांनी 'साधना'शी घेतलेल्या काडीमोडीचे आहे. आजपर्यंत साधनेने कोणाबद्दलही दुष्टभाव ठेवलेला नाही. मतभेद व्यक्त करणे म्हणजे दुष्ट भाव ठेवणे असे म्हणणे हेच दुष्ट भावाचे आहे.a

'साधना'ची वाट ठरलेली आहे...

पी.डब्ल्यू. खांडेकर साधना त्या वाटेने चालू लागली आहे' म्हणून हा खटाटोप- या लेखामध्ये म्हणतात, हिंदुत्ववादी शक्तींबद्दल 'साधना'चा असलेला दुष्ट भाव, हे एक कारण त्यांनी 'साधना'शी घेतलेल्या काडीमोडीचे आहे. आजपर्यंत साधनेने कोणाबद्दलही दुष्टभाव ठेवलेला नाही. मतभेद व्यक्त करणे म्हणजे दुष्ट भाव ठेवणे असे म्हणणे हेच दुष्ट भावाचे आहे. कुठल्याही विचारप्रणालीला अस्पृश्य ठरवणे मला खपत नाही, असे त्यांचे म्हणणे म्हणजे एक प्रकारचा भोंगळपणा आहे. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे भाजप व रा.स्व.संघ या महत्त्वाच्या शक्ती आहेत. राजकारणात त्यांना विशिष्ट स्थान आहे, तर मग त्यांना टीकेचे वावडे का असावे?

'साधना' स्वतंत्र विचारांचे साप्ताहिक आहे. याचा अर्थ ती उद्दिष्टहीन नाही. तिला एक उद्दिष्ट आहे, ते साधनाच्या संपादकीय सदरात स्पष्टपणे दर्शवले आहे. 'स्थापण्या समता शांती, ठेवुनी शुद्ध साधना करिती साधना, त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना'. साधनाने नवीन विचार, विचारातील वैविध्य, देशात चाललेल्या सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक व धार्मिक चळवळीचा वेध घेणे, त्यावर निर्भीड लिखाण प्रसिद्ध करणे हे बंदच झाले होते असा आक्षेप मा.खांडेकरांनी घेतला आहे. साधनाने नुकतेच साधनेतील लेखांचे आठ खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यातील लेखांचे वाचन केल्यास त्यांचे हे म्हणणे किती निरर्थक आहे, हे त्यांच्या ध्यानी येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीतूनच भाजपचे नेतृत्व साकारले असताना, भाजप नेत्यांना सल्ला देण्याची क्षमता, अनुभव व राजकीय कौशल्य संघाच्या नेत्याकडे नाही, असे म्हणणे म्हणजे वदतो व्याघात आहे.

भाजपामुळे हिंदू समाज मूलतत्त्ववादाकडे वळत नाही, असे खांडेकरांचे मत आहे. भाजपाने आजपर्यंत रामजन्मभूमीसाठी यात्रा काढल्या, अलीकडचा रामसेतू प्रकल्पाचा विरोध काय दर्शवतो. भाजपाने आजपर्यंत आर्थिक विषयावर कधी चळवळ केल्याचे उदाहरण नाही. भाजपा हिंदूंना मूलतत्त्ववादाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे, हे सिद्ध होते. तमधील दंग्याबाबत भाजप निर्भीडपणे बोलतो काय? आपल्याप्रमाणेच मुसलमान हे या देशाचे नागरिक आहेत हे सुजाण हिंदूंना कळायला लागले आहे असे खांडेकर म्हणतात. 

भाजपा मात्र अजाणपणे 'हिंदुस्थान हिंदुका, नही किसी के बापका व पाकिस्तान जला दो' अशा घोषणा मुद्दाम मुस्लिम बस्तीतून देत मिरवणुका काढत होता. निवडणुकीत मुसलमानांचा पाठिंबा मिळाला नाही तरी त्यांची (भाजपाची) प्रखर व सततची शत्रुता परवडण्यासारखी नाही हे भाजपला कळून आले.' असे खांडेकर म्हणतात. ही भूमिका भाजपाने विचाराच्या पातळीवरून घेतलेली नाही तर निवडणुकीच्या मतांच्या राजकारणासाठी ही घेतलेली आहे. 

खांडेकरांचा आणखी एक आक्षेप असा आहे की, साधनाने मुसलमानाबद्दल कितीतरी कमी लिहिले आहे. साधनाने मुसलमानासंबंधी जेवढे लिहिले आहे तेवढे मराठीतील कोणत्याही अन्य नियतकालिकाने लिहिल्याचे आढळून येणार नाही.

मुसलमानांतील त्यांच्यातील दोषाबाबत लाखभर संख्येने रस्त्यावर यावी अशी अपेक्षा खांडेकर करतात. मात्र हिंदू धर्मातील उच्च- नीचता आदी दोषाबाबत लाखो हिंदू रस्त्यावर का येत नाहीत, याबद्दल ते मौन बाळगतात. साधना आपल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी अखंड वाटचाल करीत राहील.

-वि. रा. भागवत

---------

सविस्तर भूमिका प्रसिद्ध करावी

पी.डब्ल्यू. खांडेकर यांचा 2० ऑक्टोबरच्या अंकातील 'साधना त्या वाटेने चालू लागली आहे, म्हणून हा खटाटोप' हा लेख वाचला. त्या वाटेने म्हणजे कुठल्या तर लेखात शेवटी म्हटले आहे की, 'विचारवंतांच्या'. अहो साधना नेहमीच 'विचारवंताच्या वाटेने चालत आली आहे. पत्रलेखकाला त्या वाटेने म्हणजे जरा वेगळेच म्हणावयाचे आहे. ते खरे म्हणजे संपादकांनाही कळते आहे. पण अशी पत्रे छापताना (ज्यात संपादकांबद्दल उघड मत मांडले असता) संपादकांनी त्वरेने खाली उत्तर द्यायला हवे होते. कारण Silence amounts to consent असे व्हायला नको.

साधनाचा मीही अनेक वर्षे वाचक आहे. यापूर्वी साधनात मुस्लिमांविषयी बऱ्याच अंकातून लेख प्रसिद्ध झाले आहेत. काँग्रेस पक्ष व काँग्रेस सरकार याही देशातील महत्त्वाच्या शक्ती आहेत. अनेक वर्षे त्यांचे देशाबर राज्य आहे. त्या पक्षावर त्या पक्षातील नेत्यांवर अत्यंत शिवराळ भाषेतही अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिक टीका करतात. अगदी साधनातूनही काँग्रेसवाल्यांची अनेकवेळा भंबेरी उडवली आहे. परंतु काँग्रेसवाले 'आमच्याबद्दल 'दुष्टभाव' होतो आहे' असे कधी म्हणत नाहीत. (अपवाद आणीबाणीचा- अर्थात आणीबाणीची बंधने झुगारून त्या काळातही जनजागृती करण्याचे काम फक्त 'साधना नेच केले हे सर्वश्रुत आहे) डावे, आंबेडकरवादी, समाजवादी, काँग्रेसजन कामगार, महिला या सर्वांच्या विचाराला साधनाने नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या वाटेचा' उल्लेख झालाच असल्याने आता तरी संपादकांनी सविस्तर भूमिका प्रसिद्ध करावी.

-फुलचंद सांकला, कोथरूड, पुणे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके