डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आगामी निवडणुकीत माहितीचा हक्क घटनेत समाविष्ट करण्यासाठी डोळस प्रयत्न करण्याचे वचन देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून देण्याचा विचार लोकांनी आता करायला हवा.

नरदे यांच्याशी सहमती

साधना 27 मार्च 99 मधील अजित नरदे यांचा लेख वाचला. त्याच्याशी मी 100% सहमत आहे. मी जीवशास्त्राचा शिक्षक आहे. टर्मिनेटरबद्दल इंग्रजी/मराठीत सोप्या भाषेत काही माहिती असेल तर मला हवी आहे.

ना. द. बाडदेकर मुंबई.

----------

सुखद धक्का

मे 1999 च्या पहिल्या अंकापासून साधना साप्ताहिकाची चार पाने वाढवण्यात येणार असल्याची आनंदवार्ता वाचून एक सुखद धक्का बसला. 'साधना' साप्ताहिकाची पाने कमी झाल्याची खंत फार दिवस मनात होती. स्वावलंबी होण्यासाठी ‘साधने’ची धडपड चालू असताना ही विस्तारवार्ता इतक्या लवकर वाचायला मिळेल, असे वाटले नव्हते. आता साने गुरुजींचे जन्मशताब्दीवर्ष चालू आहे. या वर्षातच गुरुजींना प्रिय असलेल्या साधना साप्ताहिकाची विस्तारवार्ता वाचायला मिळावी हा योग अपूर्वच म्हटला पाहिजे. साधना परिवार तर या विस्तारवार्तेने एकदम खूश आहे. आपण घेतलेला 'साधना' विस्ताराचा निर्णय धाडसी आणि अभिनंदनीय आहे. 99 अखेर 'साधना' स्वावलंबी झाल्याची आनंदवार्ता वाचायला मिळो, अशी ज्ञानराजांच्या विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना.

अ‍ॅड. पां. बा. कोल्हापुरे, वाई

----------

मौलिक माहिती पुरवणारा परिपूर्ण लेख 

3 एप्रिल 1999 च्या ‘साधना’तील सत्यरंजन साठे यांचा ‘माहितीचा अधिकार’ हा लेख अत्यंत मौलिक माहिती पुरविणारा आहे. माहितीचा हक्क आपल्या भारतीय घटनेत पुरेशा प्रमाणात नसल्याची जाणीव होऊ लागल्यामुळेच तसा हक्क असण्याविषयीची चर्चा होऊ लागली आहे. वस्तुतः लोकशाही समाज-शासनपद्धतीत समाज आणि शासन यांच्यातील परस्परपूरक संबंध माहितीच्या आधारेच अधिक परिणामकारक होऊ शकतात. पण गुप्ततेच्या नावाखाली शासन पातळीवर चालणाऱ्या अनेक समाज-विघातक कारवायांची माहिती सतत दडविली जाते. गुप्ततेचे कारण देऊनच भ्रष्टाचाराविषयक आरोप निष्प्रभ केले जातात. यातली मेख अशी की मंत्रिपदापर्यंत निवड झालेली व्यक्ती मुळात लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आलेली असतानाही ती व्यक्ती अगदी जाहीरपणे शासकवर्गाशी बांधिलकी सूचित करणारी गुप्तता पाळण्याची शपथ घेते आणि तीदेखील घटनेच्या साक्षीनेच! तंत्रज्ञानाची प्रगती आजतागायत अचंबित करणारी ठरली.

आता मात्र या तंत्रज्ञानाने माहितीचे महाजाल उभे केल्यामुळे जे घटनेने साध्य करता आले नव्हते ते माहिती तंत्रज्ञानाच्या पसाऱ्यामुळे सहजप्राप्य झाले आहे. पण आर्थिक क्षेत्रातील विकासविनिमयासाठी या माहिती महाजालाचा उपयोग होत असला, तरी राजकीय क्षेत्रातील मक्तेदारी (अर्थात भ्रष्टाचार, संपत्तीसंचयन, कुरणे इत्यादी) मोडून काढण्यासाठी माहितीचा हक्क मूलभूत नागरी हक्क म्हणून उपलब्ध होण्याची गरज आहे. श्री. साठे यांनी नमूद केल्याप्रमाणे समाजातील निरक्षरता, अंधश्रद्धा, जातिभेद, धर्मांधतेचा प्रभाव इत्यादी समस्यांची खरोखरच पूर्तता करायची असेल तर अशा क्षेत्रातील उपेक्षितांना माहिती हक्काविषयीची माहिती आणि त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जाणीव’ करून देण्याची निकड आहे. स्वातंत्र्यपूर्व तसेच नंतरच्या काळात प्रबोधनाच्या पारंपरिक माध्यमाद्वारे विचार आणि व्यवहार यांच्यातील सांगड घालण्याचा सतत प्रयत्न झाला. यात प्रामुख्याने सत्तेत नसलेल्या साम्यवादी-समाजवादी विचारवंतांचा समावेश होता. पण वाचीव विचार वा तात्त्विक मांडणी करण्यापलीकडे कुणालाच जाता आले नाही. परिणामी, विचारांचे व्यावहारिक महत्त्व संपल्यात जमा झाले.

व्यापक माहितीचा अभाव आणि उपलब्ध माहितीचे कल्पक व्यवस्थापन व वितरण (प्रबोधन) करण्याविषयीची उदासीनता ही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. ही जाणीव अलीकडे होऊ लागली असून त्याबद्दल विज्ञान-तंत्रज्ञानाचेच आभार मानले पाहिजेत! आगामी निवडणुकीत माहितीचा हक्क घटनेत समाविष्ट करण्यासाठी डोळस प्रयत्न करण्याचे वचन देणाऱ्या उमेदवारांनाच निवडून देण्याचा विचार लोकांनी आता करायला हवा. त्याकरिता श्री. साठे यांचा हा परिपूर्ण लेख महाराष्ट्रातील प्रमुख तसेच जिल्हास्तरीय वृत्तपत्रांसाठी उपलब्ध करून दिल्यास वा पुनर्मुद्रण करू दिल्यास त्या दिशेने योग्य असे पाऊल पडण्याची शक्यता व आशासुद्धा आहे.

प्रदीप देशपांडे, मुंबई,

Tags: वाचक प्रतिक्रिया reader’s view weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके