मी स्वतः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. 'अंनिस'ची चळवळ पूर्णतः अहिंसक पद्धतीनेच चालवावी, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. लोकशाहीचा स्वीकार केलेल्या देशात संविधानाच्या मूल्यांचा आदर करून कुठलीही चळवळ चालवायची असल्यास ती अहिंसकच असायला हवी.
क्रिकेटला अवास्तव महत्त्व
सापेक्षता सिद्धांताच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, 'साधना' 31 डिसेंबरच्या अंकातील अतिथी संपादकांचे विचार व डॉ.सुभाषचंद्र भेलके (तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, पुणे विद्यापीठ) यांनी या सिद्धांताच्या ज्ञानमीमांसीय निष्पत्तीचा घेतलेला मागोवा म्हणजे एखादा विषय सोपा करून वाचकांपर्यंत कसा न्यायचा, याचे उत्तम उदाहरण आहे. जवळजवळ असाच विचार (पण वेगळा विषय) डॉ.पंडित विद्यासागर यांचे 'न कळणारे विज्ञान' वाचताना येतो, अशा प्रकारचे दर्जेदार वाचनीय लेख साधना शिवाय इतरत्र कुठेही आढळत नाहीत.
"साधना’चे 10 व 31 डिसेंबरचे अंक एकाच दिवशी मिळाले व ‘स्वागत नाही, शुभेच्छाही नाहीत!' हे संपादकीय (10 डिसें.) व त्यावरील वाचकांचा प्रतिसाद (31 डिसें.) त्याच वेळी वाचण्याचा योग आला. तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला यश मिळाले व क्रिकेट खेळाबरोबर पैसा दिसू लागला हे संपादकीय निरीक्षण बरोबर आहे. क्रिकेटकडे निव्वळ खेळ म्हणून पाहणाऱ्यांनी त्यांचे विचारपूर्वक व अगत्याने स्वागतच केले पाहिजे. खिलाडू वृत्तीशी संबंध नसलेल्या मॅच फिक्सिंग, बेटींगसारख्या प्रवृत्तीमुळे या खेळास अर्थपूर्ण स्वरूप आले असून सध्या क्रिकेट रसिकांच्या भावनेशी प्रतारणा करणारा तो एक खेळ होऊन बसला आहे. त्याला बाऊ कसे म्हणता येईल? दक्षिण आफ्रिकेच्या क्रोनिए या खेळाडूद्वारे याचे विदारक स्वरूप पुढे आले आहे, हे पत्रलेखक श्रीयुत गजानन प्रधान यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. अलीकडेच पुण्यात झालेला क्रिकेट सामना हा खेळाच्या कोणत्याही विक्रमामुळे गाजला नसून तो केवळ बोगस तिकिटविक्रीमुळे गाजला, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
इतर क्षेत्रांत पारदर्शकता कुठे असते, असा सवाल करणे, म्हणजे चुकीच्या पद्धतीला प्रोत्साहन देऊन खेळातील गंमत घालविण्याप्रमाणे आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या 'भारतीय क्रिकेट संघ' म्हणून खेळणारा संघ 100 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाचे नेतृत्व करीत नसून, तो संघ स्वायत्त अशा क्रिकेट नियामक मंडळाचा संघ आहे. हे त्याच मंडळाच्या कार्याध्यक्षांचे विचार ही संपादकीयातून मांडलेली वस्तुस्थिती आहे. 2004 व अलीकडे 2005 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने केलेल्या दैदिप्यमान कामगिरीची दखल प्रसिद्धीमाध्यमांनी किती घेतली? क्रिकेटची जन्मभूमी इंग्लंडमध्ये या खेळाचे फाजील कौतुक होत नसताना आपण त्या खेळास प्राण म्हणून अवास्तव महत्व कशासाठी देत असतो?
काही वर्षांपूर्वी क्रिकेट करंडक व स्मृतिचिन्हे यांची मुंबईत तोडफोड केली गेली, त्यावर किती क्रिकेटप्रेमींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती? भररस्त्यावर उभे राहून व घरातही आपले कामधंदे सोडून क्रिकेट सामना पाहणारे असंख्य चाहते जर क्रिकेटप्रेमाचा मापदंड समजले जात असतील, तर गतवर्षात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत झालेल्या नैसर्गिक प्रकोपात, मुंबईत व महाराष्ट्रात इतरत्र झालेल्या प्रलयात किती क्रिकेटवीरांनी मदतीसाठी धावून येऊन त्या प्रेमाची परतफेड केली? या संकटात सापडलेल्यांत त्यांचे चाहते नव्हते असे म्हणायचे काय? इतकेच कशाला महाराष्ट्र शासनातर्फे मोफत दिलेल्या मोक्याच्या भूखंडावर भविष्यातील क्रिकेटवीर घडवणाऱ्या नियोजित अॅकॅडमीचा उपक्रम राबविण्यासाठी क्रिकेटप्रेमी क्रिकेटवीरच उपलब्ध नाहीत असे म्हणायचे का?
डॉ. श्रीकांत परळकर, दादर, मुंबई
----------
युद्ध-अंधश्रद्धा नव्हे; 'अपरिहार्यता'
24 डिसेंबरच्या 'साधना'मध्ये दत्ता शिंदे यांचा 'युद्ध-एक अंधश्रद्धा अन् प्रगतीच्या मार्गातील धोंड' हा लेख वाचला. त्यांच्या लेखातीत काही मतांशी मी सहमत नाही. अहिंसक सैनिकांनी बंदुकीऐवजी चरखा हाती घ्यावा असे दत्ता शिंदे म्हणतात; पण काश्मीरमध्ये आतंकवादी लहान बालकांसह अनेक निरपराध माणसांची हत्या करीत असताना, देशाच्या संसदेवर हल्ला करीत असताना त्यांचा प्रतिकार चरख्याने कसा करायचा, ते दत्ता शिंदे यांनी स्पष्ट करावे. आत्यंतिक अहिंसेचे तत्त्व हे अव्यवहार्य आहे. कुत्रा पिसाळला असता त्याला ठार मारणे, हाच एकमेव उपाय ठरतो; त्याच्यासमोर अहिंसेचा उद्घोष करून तो माणसाला चावणे सोडणार नाही. त्याचप्रमाणे मानवतेची सर्व मूल्ये विसरून जेव्हा आतंकवादी निरपराध माणसांची हत्या करतात; देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाला आव्हान देऊ इच्छितात. तेव्हा त्यांच्याविरुद्ध शस्त्र उचलणे आवश्यक व अपरिहार्य ठरते.
देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना जत्रेच्या दिवसाचा ‘बळीचा बकरा,' असे म्हणून शिंदे त्यांच्या हौतात्म्याचा अपमान करीत आहेत. गरीब घरातील सामान्य सैनिक रोजगारासाठी सैन्यात जातो हे खरे असले तरी सैन्यातील अधिकारी दर्जाचे अनेक हुशार तरुण जाणीवपूर्वक देशसेवेसाठी सैन्यात जातात, ही वस्तुस्थिती आहे परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळणे शक्य असतानाही हे कुशाग्र बुद्धीचे तरुण आपल्या ज्ञानाचा, सामर्थ्याचा उपयोग देशसंरक्षणासाठी करत असताना त्यांना 'बळीचा बकरा' म्हणणे, हा त्यांचा अपमान आहे. तुमच्या मनात जर त्यांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता बाळगण्याचा, त्यांच्या कुटुंबीयांची मदत करण्याचा समंजसपणा नसेल, तर निदान त्यांच्या बलिदानाचा असा अपमान तरी करू नका.
आत्यंतिक हिंसेप्रमाणे आत्यंतिक अहिंसेचे तत्त्वही अव्यवहार्य व असमंजसपणाचे आहे. खरी गरज आहे ती हिंसा आणि अहिंसा यांचा वापर कुठे करायचा, यासंबंधीच्या विवेकाची. मी स्वतः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. 'अंनिस'ची चळवळ पूर्णतः अहिंसक पद्धतीनेच चालवावी, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. लोकशाहीचा स्वीकार केलेल्या देशात संविधानाच्या मूल्यांचा आदर करून कुठलीही चळवळ चालवायची असल्यास ती अहिंसकच असायला हवी. देशाच्या, समाजाच्या उन्नतीसाठी ते अत्यावश्यक आहे. पण जेव्हा परकीय शत्रू देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतो; आतंकवाद्यांना प्रोत्साहन देऊन 'प्रॉक्सी वॉर' चालू ठेवतो, तेव्हा त्याविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो, हे वास्तव आहे. अहिंसावाद्यांनी ते समजावून घ्यावे.
डॉ. प्रगती पाटील, धुळे
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या