डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांची कारकीर्द पूर्ण वर्षाचीसुद्धा नाही. पण या कारकिर्दीत त्यांनी अनेक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. आपल्या कारकिर्दीचा अहवाल ते देत आहेत प्रख्यात पत्रकार प्रीतिश नंदी यांना.

श्री. गुजराल यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द अवघी 10 महिन्यांची. औट घटकेचे राज्यच ते, परंतु त्यांच्या वा अल्पजीवी सरकारनेसुद्धा काही चांगली कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रसिद्ध पत्रकार श्री प्रीतिश नंदी यांनी घेतलेली गुजराल यांची खालील मुलाखत खूप बोलकी आहे. श्री. गुजराल यांनी दिलखुलासपणे आपले मनोगत व्यक्त केले आहे. हा संमित्र सरकारचा प्रयोग यशस्वी व्हावयास पाहिजे होता म्हणजे सध्याच्या अत्यंत अस्थिर, भ्रष्ट व धूसर राजकारणात एक आशेचा किरण चमकला असता व फक्त देशहितच डोळ्यांसमोर ठेवून सर्वसंमतीने व दिलजमाईने केलेल्या राज्यकारभाराचा एक आदर्श निर्माण झाला असता. पण हे घडले नाही. कालाय तस्मै नमः ।
 
प्रश्न- तुमच्या छोट्याशा कारकिर्दीचे मोठयात मोठे यश कोणते ? 

उत्तर- माझ्या मते या कारकिर्दीत पंतप्रधानाच्या दफ्तराची शान वाढली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकानेही माझ्यावर किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या इतर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. राज्यकारभारात पक्षपद्धती प्रचलित असल्यामुळे बहुमतवाल्या पक्षाने राज्य करावयाचे ही नेहमीची चाकोरी सोडून आम्ही मात्र समिश्र सरकारचा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे चालविला. आमच्या सरकारात अनेक पक्ष सामील झाले असतानासुद्धा आमच्या कॅबिनेटचे सर्व निर्णय एकमताचे असत. त्यांत कोठेही विरोधी सूर ऐकू आला नाही. 

प्रश्न-तुमच्या सरकारची काही वैशिष्टये... आकडेवारी देऊन सांगता येतील का? 

उत्तर- आमचे सरकार बरखास्त होत असताना आमच्या खजिन्यात 31 बिलियन डॉलर्सचे (3100 लाख) परकीय चलन शिल्लक आहे. अगदी बिनचूक बोलावयाचे तर 28 बिलियन डॉलर्स शिल्लक आहेत, कारण त्यांतील 3 बिलियन डॉलर्स रुपयाची मजबुती वाढविण्याकरिता खर्ची पडले आहेत. मागील कोठल्याही सरकारने एवढे परकीय चलन कधीही शिल्लक टाकले नव्हते. हे भारताच्या मजबूत अर्थनीतीचे द्योतक आहे. दक्षिणपूर्व आशियातील सर्व देशांची आर्थिक स्थिती ही ढेपाळत असताना आमचा आर्थिक पाया भक्कम आहे. हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. राष्ट्रीय रस्ते व ऊर्जा यांवर आम्ही भर दिला. आम्ही औद्योगिक प्रगतीचा वेग अतिशय चांगला म्हणजे 7 टक्क्यांपर्यंत नेला. महागाई आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांत बऱ्याच अंशी यशस्वीही झालो. 

सगळ्यांत चांगली गोष्ट म्हणजे आम्ही सर्व ठिकाणी एकमताने, एकदिलाने कामे केली. एकमताचा कारभार हे आमच्या सरकारचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. राजकीय क्षेत्रात एकवाक्यता, अर्थनीतीत सर्वसाधारण सहमती, इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापरात सर्वसंमत स्वातंत्र्य ह्या सर्व भूमिका आम्ही फार चांगल्या तहेने वठविल्या हे तर आमच्या सरकारचे निव्वळ यश! प्रसारभारतीची कल्पना जुनी आहे. प्रत्येक सरकारतर्फे त्याबाबत उच्चरवाने बोलले जाई, परंतु आम्ही मात्र प्रसारभारतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. 

प्रश्न- कोठल्या बाबतीत तुम्हांला अपयश आले? 

उत्तर- अपयशाच्या बाबतीत बोलावे तर पार्लमेंटमधील स्त्रियांच्या राखीव जागांबाबत जर आम्ही विस पास करून येऊ शकलो असतो तर ते आम्हांला पाहिजे होते, त्यात आम्हाला खूप समाधान मिळाले असते, परंतु ते घडले नाही. दक्षिण आशियाई देशांमध्ये आणखी सामंजस्य आणण्याचे आम्हाला जमले नाही. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या आमच्या शेजारी देशांचे आणि आमचे संबंध व्हावे तेवढे सुदृढ झाले नाहीत. हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात दिलजमाई होऊ शकली नाही. आम्हांला आणखी काही काळ सत्ता वापरावयास मिळाली असती तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो असतो. 

समाजाचा मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हांस बदलवयाचा होता पण यास वेळ अपुरा पडला. प्रीतिश... पण खरे बोलायचे तर आमच्या कारभाराबद्दल मी खूपच समाधानी आहे. आम्हांला मिळालेल्या मुदतीत जेवढे म्हणून करणे शक्य होते तेवढे आम्ही निश्चित केले आहे. खंत एवढीच की हे सारे पूर्णत्वास न्यावयास आम्हांस वेळ कमी पडला.

प्रश्न- काँग्रेसने तुमच्या पायाखालची सतरंजी ओढून घेऊन तुम्हाला पाडले असे तुम्हाला वाटते का ?

उत्तर- याचे कारण म्हणजे नवीन निवडणुका झाल्या तर त्यांत आपली परिस्थिती सुधारेल असा त्यांना उगाचच विश्वास वाटत होता. परंतु त्यांचे ते नुसतेच स्वप्न ठरले. वा निवडणुकांचे निकाल जर तुम्ही बारकाईने तपासलेत तर सर्व ठिकाणी काँग्रेसची पिछेहाटच झाल्याचे तुम्हाला आढळून येईल. त्यांच्या जागा तर वाढल्या नाहीतच परंतु ज्या ठिकाणी पूर्वी ते मजबुतीने उभे होते तेथेसुद्धा त्यांच्या पायांखालची वाळू बरीचशी सरकली आहे. ओरिसा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 

प्रश्न- पण महाराष्ट्रात त्यांची परिस्थिती खूपच सुधारली आहे! 

उत्तर- बरोबर. परंतु राष्ट्रीय पातळीवर जर तुम्ही हिशोब मांडलात तर त्यांची खर्चाचीच बाजू फुगलेली आढळून येईल. उत्तर प्रदेशात ते कोठेही नाहीत. गुजरातमध्येही ते आणखीच घसरले आहेत. बिहारमध्येही त्यांची स्थिती यथातथाच आहे. तामिळनाडूमध्ये त्यांनी आपली संधी हुकवली आहे. बांगलामध्येही ते नेहमीप्रमाणे उखडले गेले आहेत. असे सर्व असताना एक महाराष्ट्र सोडला तर यशाने त्यांच्याकडे बहुतेक ठिकाणी पाठच फिरविलेली दिसत आहे. निधर्मी राज्याबद्दल एवढे ते बोलत होते परंतु शेवटी त्यांनी आम्हाला दगा दिला आणि भाजपाला मात्र सत्ताग्रहणाची संधी दिली.

प्रश्न- परंतु पार्लमेंटमधील भाजपाचे संख्याबळ पाहता ते वा देशाला एक स्थिर सरकार देऊ शकतील असे तुम्हाला वाटते का ? 

उत्तर- खरे सांगायचे तर नाही. पार्लमेंटमध्ये जागांची इतकी समान वाटणी झाली आहे की कोठल्याही पक्षाजवळ स्थिर सरकार देण्याची क्षमता नाही. याचा राज्यकारभारावर फार परिणाम होतो. अशा परिस्थितीत राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांना एकमेकांवर कुरघोडी करण्याची नामी संधी प्राप्त होते.

प्रश्न- मग नजिकच्या भविष्यकाळात या ठिकाणी काय घडणार असे तुम्हाला वाटते?

उत्तर- राष्ट्रीय प्रश्नावर एकमत न झाल्या कारणाने या ठिकाणी पुन्हा लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार. निवडणुकांवर होणारा प्रचंड खर्च जरी आपण दुर्लक्षिला तरी त्यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटणार. नुकत्याच अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांवर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतीचे उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील राजकीय अस्थिरतेमुळे ही सगळी संकटे गहरीच होत जाणार आहेत. अर्थात अटलबिहारी वाजपेयींनी यांत काही चावी फिरविली आणि स्थिर सरकार दिले तर मात्र परिस्थितीत सुधारण होण्याची शक्यता आहे. 

प्रश्न- ते तसे करू शकतील असे तुम्हांला वाटते ? 

उत्तर- का नाही ? सहमतीने राज्यकारभार करण्यात तर ते वाकबगार आहेत. परंतु नुसते त्यांच्यावर हे सर्वस्वी अवलंबून नाही. त्यांना त्यांच्या पक्षाला व त्यांच्या दुसऱ्या साथीदार पक्षांनाही बरोबर घेऊन जावयाचे आहे आणि हेच फार मोठे कठीण कर्म आहे. आमच्या कारकीर्दीबद्दल तुम्ही भारतातल्या सर्व प्रांतीय सरकारांना विचारा. आमच्याबरोबर काम करताना त्यांना कोठलीही अडचण आली नाही व त्रास झाला नाही अशीच तुम्हाला ते ग्वाही देतील. एक रोमेश भंडारी प्रकरण सोडले तर आपापसांत किती सहमतीने व एकदिलाने काम केले याबद्दलही ते सांगतील. या काळात कोणी कोणाचे पाय खेचण्याचे काम केले नाही. आणि याचा परिणाम देशाला एक प्रकारे मजबूती व बळकटी प्राप्त होण्यात झाला. मला तर वाटते संमिश्र सरकार कसे असावे याचा एक नवा आदर्शच आम्ही निर्माण केला व तो जगापुढे ठेवला.

प्रश्न- अगदी बरोबर, आणि या बाबतीतच तुमच्याविषयी अशी एक तक्रार आहे की आम्ही किती गोडीगुलाबीने काम करतो हे जगाला दाखवण्याचे कामच तुम्ही तुमच्या कारकिर्दीत प्रामुख्याने केलेत. तुम्ही या देशाचे पंतप्रधान असताना तुमचे सर्व वर्तन मात्र एखाद्या परराष्ट्र मंत्र्यासारखे होते. अनेक वेळा तुम्ही परराष्ट्रांत दौरे काढलेत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतीत सतत चर्चा केलीत, त्यामुळे आपल्या देशासमोरील प्रश्नांच्या बाबतीत मात्र विचार करावयास तुम्हांला फारसा वेळ मिळाला नाही ?

उत्तर- नाही, नाही. हे तुमचे विधान मात्र माझ्यावर अन्याय करणारे आहे. जागतिक परिस्थितीचा व तेथील राजकारणाचा प्रत्येक देशाच्या आर्थिक व संरक्षणात्मक बाबींवर फार मोठा असर पडत असतो. या परिस्थितीचा तुमच्या प्रगतीशी व खुशालीशीही अगदी जवळचा संबंध आहे. कुठल्याही राष्ट्राला याकडे दुर्लक्ष करून नुसत्या स्थानिक प्रश्नांवरच लक्ष देणे हे ह्या नव्या युगात तरी परवडण्यासारखे नाही. या देशाचा नागरिक किंवा कोठलीही जमात ही आता नुसती त्या देशाचीच न राहता सर्व जगाची झाली आहे. आणि आम्ही खऱ्या अर्थाने आता जागतिक बनलो आहोत. आमच्या येथील प्रसारमाध्यमांनी हे लवकरच ओळखले पाहिजे. आता ओळखावयाचे राहिले बाजूला, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे असे मला वाटते. 

प्रश्न- तुमच्या दृष्टिकोनातून चालू राजकारणातील सर्वांत मोठ्यांत मोठी निराशाजनक गोष्ट कोणती?

उत्तर- सध्याच्या राजकारणात विश्वास, देशप्रेम, स्वार्थत्याग या गोष्टींना मुळी कोठे थाराच उरला नाही. उलट सर्वत्र पराकोटीचा स्वार्थ व चंगळवादाचीच चलती दिसून येते. यामुळे आपल्या देशातील लोकांना राजकारणाची आता घृणा येऊ लागली आहे. त्यांना नैराश्याने ग्रासले आहे आणि माझ्या दृष्टीने ही बाब खरोखरच मोठी चिंताजनक झाली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकांवर तुम्ही जर एक नजर टाकलीत तर तुम्हाला असे आढळून येईल की मतदारांनी त्यांचा उमेदवार निवडताना भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांचा विचारच केलेला दिसत नाही.

प्रश्न- तुमचा रोख जयललिता, सुखराम किंवा लालूप्रसाद यांच्यावर आहे काय?

उत्तर- मी राजकारणात भरून राहिलेल्या नैराश्याविषयी बोलतो आहे. त्याबद्दल मला वाईट वाटते.

प्रश्न- आणि आता पंतप्रधानपद सोडावे लागणार याबद्दलही तुम्हांला वाईट वाटत असणार!

उत्तर- या पदावर येणाऱ्या प्रत्येकालाच केव्हाना केव्हा तरी ते पद सोडावे लागते, परंतु मोठ्या सन्मानाने मी ते पद खाली करत आहे, यातच मला खरा आनंद आहे!

(संदर्भ : 'टाइम्स ऑफ इंडिया' वरून स्वैर)
स्वैर अनुवाद: बाळ बर्वे

Tags: टाइम्स ऑफ इंडिया संमिश्र सरकार पंतप्रधान बाळ बर्वे प्रीतिश नंदी इंद्रकुमार गुजराल times of india president bal barve pritish nandi indrakumar gujaral weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके