डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सर्वच क्षेत्रांत आजोबांचे स्थान अत्युच्च आहे. त्यांच्यामुळेच आमच्या 'फुलंब्रीकर' नावाला सुरेख कोंदण निर्माण झाले आहे. मात्र आजोबाच त्या कोंदणातील तेजस्वी हिरा आहेत. या हिऱ्याचे तेज विरंतन चमकत राहील - अगदी देवाच्या घरासारखे! - हे भविष्य वर्तवीत आहे मास्तर कृष्णरावांची नात.

माझे आजोबा 'मास्टर कृष्णराव' 20 ऑक्टोबर 1974 च्या नवरात्र 'ललिता पंचमी’ ला गेले. त्या वेळी मी 4 वर्षांची होते. पण त्यांची अंत्ययात्रा आजही मला स्पष्टपणे आठवते आहे. शिडीवर चढून आकाशातील चांदण्या वेचायचे, विमानातून परिराज्यात जाण्याचे व काऊs s चिऊच्या गोष्टी ऐकण्याचे माझे वय. ती. बापू मला, एक होती ऊ तिला झाली टू ही गोष्ट तसेच चोरून बोरे खाणाऱ्या कोल्होबाची गोष्ट मोठी रंगवून सांगायचे. काय रे कोल्होबा बोरे पिकली? नाही ग म्हातारे टेरी भाजली! असे म्हटले की फटफजिती होऊन पळून जाणाऱ्या कोल्होबाचे चित्र डोळ्यांसमोर यायचे. माझी मंजूताई 'देवाचे घर बाई उंचावरी' कविता म्हणायची, ती मला फार आवडायची. 

इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे 'देवाचे घर बाई उंचावरी' या कवितेत चमचमणाऱ्या टिकल्यांचे देवांचे घर, त्या भोवती चांदीची झाडे, त्याला सोनेरी पाने, सोनेरी मैना, तिचे सोनेरी गाणे हे वर्णन ऐकून मी फार खूप व्हायची. शिवाय गुलाबाच्या फुलांची लादी व त्यावर ढगांची गादी. त्यामुळे देवाचे घर सुरेख आहे. अशी माझी ठाम कल्पना झाली होती. माझे आजोबा गेल्यानंतर घरात सर्वत्र रडारड सुरू झाली. मोठी माणसे रडताना मी प्रथमच बघत होते. मी खूपच बावरले. आईला म्हटले, 'आई सर्वजण का ग रडतात?' आई म्हणाली, 'प्रियु, आपले बापू देवाघरी गेले.' मला तर काहीच कळेना. बापू तर गादीवर लाल शालीत झोपलेले. लोक हार घेऊन येत आहेत. 

देवाचे घर तर इतके सुंदर, मग रडायचे कशासाठी? मी आईला म्हटले, 'आई मी पण देवाच्या घरी जाणार- मग आईला हुंदका अनावर झाला. मला प्रेमाने पोटाशी धरून ती म्हणाली, 'प्रियु असं बोलायचं नाही हं! खूप म्हातारं झाल्यावर देवाच्या घरी जायचं असतं.' माझ्या आजोबांना एक मोठा सन्मान मिळाला होता. (रत्नसदस्यत्व ललित कला अकादमी) त्या वेळी हार-तुरे घेऊन भरपूर माणसे आलेली होती. त्यांत श्री. पु. ल. देशपांडे, श्री. भीमसेन जोशी, श्रीमती ज्योत्स्नाबाई भोळे, हिराबाई ही सर्व मंडळी होती. त्यांचा परत कुठला तरी सत्कार आहे असेच मला वाटत होते. पण या वेळी हार घेऊन आलेली मंडळी रडत होती. ती का रडत आहेत हे मला समजत नव्हते. 

मी जसजशी मोठी होत गेले तसतसे मला माझ्या आजोबांबद्दल सगळे किती आदराने बोलतात, वेगवेगळ्या गाण्याच्या बैठकांच्या हकीगती सांगतात, ते कळत गेले व आजोबांबद्दलचा अभिमान वाढत गेला. आमचे घर म्हणजे एक छोटेखानी संस्थान आहे. तिथे सकाळपासून रात्रीपर्यंत माणसांचा राबता असतो. भारताचे आद्य घटनाकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर माझ्या आजोबांच्या घरी आले होते तेव्हा ती. बापूंनी 'बुद्धवंदना' गायल्या. कै.ग. दि. माडगूळकर आमच्या हॉलमध्ये आले असताना त्यांना 'धुंद मधुमती' हे कीचकवध मधील काव्य स्फुरले व माझ्या आजोबांनी त्याला अजरामर चाल दिली. 

ना. सी. फडके, अरविंद मंगळूरकर, श्री. के. क्षीरसागर कृ. द. दीक्षित, गोपीनाथ तळवलकर इत्यादी साहित्यिक; सर्व पक्षांतील राजकारणी व्यक्ती तसेच वसंत देसाई, सी. रामचंद्र, सुधीर फडके असे संगीतकार; बाल गंधर्व, गणपतराव बोडस, हिराबाई बडोदेकर, जयश्रीबाई, सरस्वतीबाई राणे ही त्या काळातील थोर कलाकार नटमंडळी माझ्या आजोबांकडे येत असत. आमच्या घरी संगीतापासून साहित्यापर्यंत चर्चा चालत, आमचा दिवाणखाना या सर्व मंडळींच्या आगमनाने पुनीत झालेला आहे. 

मी पेटीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले तेव्हा मला माझे आजोबा किती कल्पक प्रतिभावान गायक व संगीत दिग्दर्शक होते, याची प्रचिती आली. शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, अभंग, भजने, राष्ट्रगीते, बुद्धवंदना या सर्वच क्षेत्रांत माझे आजोबा मातब्बर असून स्वतः काव्यरचनाकारही होते. त्यांचे सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्व उत्तुंग आहे. त्यांच्यामुळेच आमच्या 'फुलंब्रीकर' नावाला सुरेख कोंदण निर्माण झाले आहे. त्या कोंदणातील ते तेजस्वी ‘हिरा' आहेत. या हिऱ्याचे तेज 'आजन्म' चमकणारे आहे- अगदी 'देवाच्या घरासारखे!'

Tags: पु.ल. देशपांडे बाबासाहेब आंबेडकर गोपीनाथ तळवलकर श्री. के. क्षीरसागर कृ. द. दीक्षित अरविंद मंगळूरकर ना. सी. फडके मास्टर कृष्णराव प्रिया माधव फुलंब्रीकर P.L. Deshapande Babasaheb Ambedkar K.D. Dikshit Gopinath Talawalakar S.K. Kshirsagar Arwind Magalurkar N.S. Fadake Mastar Krushnarao Priya Madhav Fulanbrikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके