डिजिटल अर्काईव्ह

श्री. पु. ल. देशपांडे हे नाव नाही, ही सांस्कृतिक क्षेत्रातली एक राजमुद्रा आहे. पुलंनी मास्तरांच्या कलेचा जो गौरव आपल्या सुश्राव्य भाषणात केला होता त्याची येथे एक झलक मात्र दिली आहे.

मास्तरांचं गाणं याचा अर्थ मला नेहमी असा वाटत आलेला आहे की, दर वेळी नवीन नवीन अशा प्रकारचं रूप घेणारा असा हा प्रतिभेचा विलास आहे. मास्तरांचं गाणं कधी जुन होऊ शकत नाही, याचं कारण हे आहे की, मास्तर आज असे गायले, उद्या आणखी काही गातील, परवा आणखी काही निराळं गातील. 'नवताम् उपैति' हे प्रतिभेचं लक्षण आहे. हे मास्तरांच्या गाण्यामध्ये तुम्हांला सतत अनुभवाला येतं याचं कारण हे जे प्रतिमेचं अलौकिक अशा प्रकारचं देणं आहे ते मास्तरांना मिळालं.

मास्तरांनी भास्करबुवांना दैवत मानणं हे अगदी बरोबर आहे. त्यात काही प्रश्नच येत नाही. परंतु मास्तरांनी भास्करबुवांना दैवत मानताना, या संगीतात पुष्कळ काही करण्यासारखं आहे ही गोष्ट जर विचारात घेतली नसती तर एक विशिष्ट प्रकारचं झापड डोळ्यांवर बांधून ते आयुष्यभर गात राहिले असते. भास्करबुवांबद्दल मला जर संपूर्ण आदर नसता तर संगीताच्या क्षेत्रात उभं राहण्याची माझी छातीच नसती. ज्याची संगीत या विषयावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्याचे 'भास्करबुवा' म्हटल्यानंतर हात जोडले जाणारच. परंतु कुठल्याही माणसानं असं समजण्याचं कारण नाही की, कुठल्याही एका व्यक्तीबरोबर, गाणं काय किंवा कुठलीही कला काय, सुरू झाली आणि त्याच्याबरोबरच ती संपली. हा समुद्र इतका विशाल आहे की, त्याच्या तळाशी जाऊन तुम्ही काढाल तितकी रत्न तुमच्या हाताला लागतील.

मास्तरांनी सगळ्यांत उत्कृष्ट जर कोठली गोष्ट केली असेल तर मला असं वाटतं की, अनेक तऱ्हेच्या सुरांच्या सागरात बुडून त्यांनी रत्नं वर आणली. एकाच जागी जर ते बुडत राहिले असते तर सुरुवातीला एखाददोन रत्नं हातात आली असती पण नंतर शंखच हाती लागले असते. मास्तरांनी प्रेमानं सगळ्यांना गाणं ऐकवलेलं आहे. लहानांना ऐकवलं, मोठयांना ऐकवलं, बायकांना ऐकवलं, पुरुषांना ऐकवलं, जाणत्यांना ऐकवलं, नेणत्यांना ऐकवलं. सगळ्यांना त्यांनी आपलं गाणं ऐकवलं. माझं तेच खरं आणि ऐकायचंच असेल तर असंच ऐका, असा त्यांनी आग्रह धरला नाही. मास्तरांनी समाजातील सगळ्यांची 'राखावी बहुतांची अंतरे' असं म्हणून त्यांची अंतरं तृप्त करीत करीत आपल्या कलेची सेवा केली.

'संगीतकलानिधी' असं आपण त्यांना म्हणतो ते काही उगीच नाही ...

Tags: नाट्यगीते भारतीय शास्त्रीय संगीत संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव पु. ल. देशपांडे पु. ल. Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पु. ल. देशपांडे ( 15 लेख )

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (8 नोव्हेंबर 1919 - 12 जून 2000) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी