डिजिटल अर्काईव्ह

शिक्षणाचे चिंताजनक चित्र

श्री वासू देशपांडे यांच्या भाषणात ज्यांचा उल्लेख केला आहे ती सरकारी शिक्षणाधिकारी मंडळी कधी क्षणभर आपली राजवस्त्रे उतरून हाडामांसाच्या शिक्षकांशी बोलतात का? विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणाधिकारी ह्यांच्यात नाना तऱ्हेच्या अदृश्य भिंती आहेत. आपले अधिकार विसरून एका माणसाने दुसऱ्यांशी बोलावे तसे आपण बोलतच नाही.

शिक्षण ह्या विषयावर अनुभव किंवा अभ्यास ह्या आधाराने बोलावे असा मला अधिकार नाही, परंतु विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी या ना त्या कारणाने संबंध येतो. सहज बोलणे होते. त्यावरून त्या क्षेत्रातल्या अनागोंदी कारभाराची कल्पना येते. श्री वासू देशपांडे यांचे भाषण वाचल्यावर त्या कारभाराचे चित्र अधिक स्पष्ट झाले. 

मनाच्या मोकळेपणाचा अभाव

‘मोले घातले रडाया' अशी बाब सर्वत्र अवस्था आहे. परोपदेशाची सर्वांना घाई आहे आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्ष दुःखे भोगणारे जे लोक आहेत, ज्यांना शाळांचा दैनंदिन कारभार हाकावा लागतो, त्यांना मात्र कारकुनीच्या ओझ्याखाली संत्रस्त करून ठेवले आहे. मुख्याध्यापक हा ‘मॅनेजर’ केला आहे. मंत्रायातून आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या कचेरीतून येणाऱ्या परिवत्रकांच्या माऱ्याला तोंड देत राहणे हे त्यांचे मुख्य काम झाले आहे. रोजचा दिवस हा सहनशीलतेची नवी कसोटी पाहणारा ठरू लागला आहे. शिक्षणाचे हे असे सरकारीकरण सरकारी कामकाजाच्या पद्धतीतल्या सर्व दोषांसह अध्ययन आणि अध्यापन यांना आवश्यक असणारे मनांच्या मोकळेपणाचे वातावरण निर्माण करू शकणार नाही. 

परस्पर गैर विश्वास हा सरकारी कामकाजाचा पाया 

परस्पर गैर विश्वास हा सरकारी कार्यप्रणालीचा मूलाधार असतो. पाच-सहा निम्न, निम्नतर, निम्नतम सेवकांना सहीत गुंतवल्याची खात्री करूनच उच्चाधिकारी त्या कागदावर आपली सही करत असतात. त्यामुळे जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप होतो तिथे तिथे कामाचा वेग मंदावलाच पाहिजे, अभिसरणाचे बोल अरुंदच होत गेले पाहिजेत आणि कार्य कुजलेच पाहिजे असा प्रकार घडत असतो. माणसाचे स्वत: विचार करून निर्णय घेण्याचे इंद्रिय थंडावून टाकणे, त्या निर्णयाची जबाबदारी स्वतःच्या अंगावरचे त्यांचे साहस नष्ट करणे हा सरकारी नोकरशाहीचा अंगभूत गुण आहे. आपले ‘शिक्षण’ हे या कार्यपद्धतीचा बळी झालेले आहे.

काही प्रश्न

ज्यांनी शिक्षणाला दिशा देण्याचा विचार करावा असे लोकप्रतिनिधी केवळ वेळ मारून नेणारी वक्तव्ये करतात. त्यांना सत्तेचे आसन टिकवून ठेवायचे असते. त्यामुळे अप्रिय आणि पथ्यकर सत्य सांगण्याचे ते कुशलतेने टाळतात. त्यातून आपल्या देशात तर आजपर्यंत कुठल्याच बाबतीत अग्रक्रम आपण ठरवू शकलेलो नाही. मुलांना कुठल्या भाषेतून शिकवावे याचा निर्णय गेली तीस वर्षे आम्ही घेतोच आहोत! समाजात 'शिक्षक' हा घटक नेमका कुठे बसतो? त्याची उपयुक्तता काय? त्याच्या गुणवत्तेची कसोटी काय? त्याचे जीवन सुसह्य करण्यासाठी म्हणजे पर्यायाने उद्याचा समाज अधिक सुदृढ करण्यासाठी कुठल्या उपाययोजनांची आवश्यकता आहे? विद्यार्थ्यांहूनही अधिक प्रमाणात शिक्षकाने शरीराने आणि मनाने ताजे असण्याची किती आवश्यकता आहे? या प्रश्नांची आस्थेने चिता करणारे सत्तेवर आलेल्याच्यात मला फारसे कोणी दिसत नाहीत.

सरकारीकरण ही दया? 

दरिद्री शाळा हा राष्ट्रीय काळिमा आहे, असे आम्हांला वाटतच नाही. गावातले सर्वांत मनोहर स्थान म्हणजे गावातली शाळा! गावाच्या सुसंस्कृततेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे गावातल्या सार्वजनिक मुताऱ्या जाणि जिथे लहानथोर स्त्री-पुरुष एकत्र येऊन संध्याकाळी खेळतात आणि खेळ पाहतात अशी क्रीडांगणे आणि फुलांनी बहरलेल्या सार्वजनिक जागा ही गावाची श्रीमंती, असे आपल्यापैकी किती जणांना वाटते? असल्या ह्या आपल्या देशात 'संस्कृती', ‘शिक्षण' वगैरे शब्दही उच्चारायला लाज वाटते! यावर उपाय शोधला आहे तो सरकारीकरणाचा! म्हणजे रोगापेक्षा उपाय अधिक धोक्याचा! 'मुक्तता' हा ज्या कार्यपद्धतीचा पाया त्या शिक्षणपद्धतीत तिचाच अभाव आहे. सरकारी नियमात शिक्षकाचे इनिशिएटिव्ह (अभिक्रमशीलता)  काढून घेतले आहे जे शिकवण्यात रस नसलेले गुरुजी आणि शिकण्यात रस नसलेले शिष्य यांना एकत्र बाधून ठेवलेले आहे आणि आम्ही शिक्षण देत व घेत आहो अशा भ्रमात राहतो आहोत.

शिक्षणक्षेत्रातील धुडगूस  

प्राथमिक स्तरापासून ते विश्वविद्यालयीन स्तरापर्यंत हेच चालले आहे. रवींद्रनाथांनी 'विश्वभारती'ची कल्पना पाश्चिमात्यांना कळावी म्हणून दुसऱ्या योग्य शब्दांच्या अभावी 'युनिव्हर्सिटी' हा शब्द वापरला आणि त्यांच्या लक्षात आले की भारतातही हाच शब्द वापरला जाणार. शब्द आपापले सहचारी आणि व्यभिचारी भाव घेऊन येतात. त्यामुळे त्यांनी भविष्य केलेली ही 'युनिव्हर्सिटी' झाल्याबरोबर तो अध्यापकांच्या हातातून जाऊन 'सुदक्ष हिशोबनिसांच्यातावडीत जाणार! आज तिथे नेमके तेच झाले. आज त्या विद्यापीठाला प्रसन्न ठेवावे लागते ते दिल्लीतल्या मंत्रालयातल्या सचिवोत्तमापासून ते सचिवालयाच्या खुर्च्यावर ग्रॅण्टच्या थैल्याच्या नाड्या हाती असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना; विद्यार्थी आणि अध्यापकांना नव्हे. म्हणजे शिक्षणक्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्याखेरीज इतरांचाच धुडगूस चालू. शाळांच्या इमारती बांधताना आपले बांधकाम खाते, तिथे ज्याला आयुष्य काढावे लागते, त्या शिक्षकांचा कधी सल्ला घेते का ते सांगा. ज्यांनी कधी प्राथमिक शिक्षक म्हणून खेड्यात काम केले नाही, अडाणी सरपंचाकडून विद्यार्थ्यांसमोर अपमान भोगला नाही, गावातल्या धनिकांचा उन्मत्तपणा सोसला नाही, अशी शिक्षणतज्ज्ञ (?) माणसे प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य ठरवत असतात. मंत्रालये आणि तत्सम सरकारी कचेऱ्यांतल्या टेबलावर बसून खेडयांत नाना तऱ्हेचे रट्टे सोसणाऱ्या शिक्षकांना धडे देत असतात, त्यांचे भवितव्य ठरवत असतात.

राजवस्त्रे उतरवून विचार करा

श्री वासू देशपांडे यांच्या भाषणात ज्यांचा उल्लेख केला आहे ती सरकारी शिक्षणाधिकारी मंडळी कधी क्षणभर आपली राजवस्त्रे उतरून हाडामांसाच्या शिक्षकांशी बोलतात का? विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणाधिकारी ह्यांच्यात नाना तऱ्हेच्या अदृश्य भिंती आहेत. आपले अधिकार विसरून एका माणसाने दुसऱ्यांशी बोलावे तसे आपण बोलतच नाही. एखाद्या शाळेत जाण्याचा मला योग येतो आणि माझ्या लक्षात प्रथम जर काही येत असेल तर एक प्रकारचे भीतीचे वातावरण! प्रत्येकाला अधिकार गाजवायची घाई, पालक मुख्याध्यापकांना सटकावतात, ते दुय्यम शिक्षकांना, शिक्षक मुलांना- मग मुले संघटित रीतीने शिक्षकांना. मी एका शाळेच्या समारंभात पालकांना म्हणालो होतो, "आपल्या मुलाची किवा मुलीची पाठ्यपुस्तके तुमच्यापैकी किती जणांनी वाचली आहेत? हात वर करा." शहरातली- मुंबई उपनगरातली श्रीमंत- मध्यम वर्गीय शाळा. हजार बाराशेतले पंचवीसदेखील हात वर झाले नाहीत! विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शासक अशा ह्या चौकोनाच्या चारी बाजू फक्त एकमेकांवर उलटत आहेत. अशा विपरीत परिस्थितीत चांगले शिक्षक ही दुर्मिळ आशास्थाने. त्यांच्या तळमळीची अधिकारावरील माणसांनी दखल घ्यायला हवी. श्री वासू देशपांडे यांच्या आवाजात आस्था असणारे अनेक आवाज मिसळून त्यातून सामर्थ्य गोळा व्हावे. गांधीजींच्या आवडत्या 'लीड काइंडली लाइट' या आश्रम प्रार्थनेमधील ‘वनस्टेप इनफ फॉर मी' ही माझी आवडती ओळ आहे. 

(श्री वासू देशपांडे यांना लिहिलेल्या खाजगी पत्रावरून संपादन)

Tags: सरकारीकरण इतर कामांचा ताण शिक्षणाची अवस्था आजची शैक्षणिक परिस्थिती शिक्षणविषयक government stress of other work state of education today's educational situation educational weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पु. ल. देशपांडे ( 15 लेख )

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (8 नोव्हेंबर 1919 - 12 जून 2000) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी