साने गुरुजींच्या मोठेपणाचे एक वेगळेपण असे की त्यांच्यापेक्षा भिन्न वृत्ती प्रवृत्तीच्या माणसांनाही त्या मोठेपणाचे भान होत असे आणि त्यांच्या अपूर्व व्यक्तित्वाने ते भारावून जात. याचे ठसठशीत उदाहरण म्हणजे अत्रे. स्वभावाने अवखळ आणि बहिर्मुख असणाऱ्या अत्र्यांनी मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी हा सुंदर लेख लिहून साने गुरुजींना भावपूर्ण आदरांजली वाहिली. हे दुसरे उदाहरण पु. ल. देशपांडे यांचे. नाटककार, संगीताचे मर्मज्ञ आणि सहज सुंदर विनोदाचे जनक असणारे पु. ल. देशपांडे यांची सानेगुरुजींच्या ठायी असणारी भक्ती फार मोठी तर आहेच पण ती डोळस आहे हे त्यांच्या अमळनेर नगरपालिकेत 1984 मध्ये दिलेल्या व्याख्यानावरून प्रत्ययाला येते...
आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये भगवंतापेक्षा भक्ताला महत्त्व जास्त आहे. आपण पंढरपूरची पालखी जाताना पाहिली असेल तर विठ्ठलाचे नाव जितक्या वेळा घेतले जाते त्याच्या दसपट ‘ज्ञानोबा तुकाराम’ म्हटले जाते. पंढरीच्या पालखीत ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणायचे नाही असा जर एखादा निर्बंध कोणी काढला तर ती पालखी ओस पडेल, याची मला खात्री आहे. कारण भक्ताच्या नावाच्या नादामध्ये शेकडो मैल चालले जाता.त मला हा मान मिळालेला आहे, याचे कारण मी साने गुरुजींचा भक्त आहे. या भूमिकेतूनच मला मिळालेला मान आहे, हे मी ओळखले आहे.
देवाच्या भक्तीत मला काही फारसा रस नाही, परंतु देवत्वाच्या भक्तीमध्ये मला अतिशय रस आहे आणि असे देवत्व जीवनामध्ये सहसा आढळत नाही. पण मी एका अशा जमान्यामध्ये वाढलो- तरुण होतो, त्या काळामध्ये- जिथे नजर टाकावी तिथे देवत्व असलेली माणसे आहेत, असा विश्वास वाटावा, अशी माणसे आयुष्यामध्ये पाहायला मिळाली. त्यांच्यामध्ये आपल्या अद्वितीय तेजाने तळपणारी असे साने गुरुजी होते, तसे जीवन म्हणजे आपली समिधा आहे अशा रीतीने वागणारे सेनापती बापट होते. बोरकरांची एक कविता आहे
जीवन त्यांना कळले हो,
मीपण ज्यांचे पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो।
तरी ज्यांचे ‘मी-पण’ पक्व फळापरी सहजपणाने गळले, अशी माणसे माझ्या आयुष्यात मी पाहिली आहेत. त्यांच्यात साने गुरुजींच्या तुलनेचे दुसरे मला कोणीही आढळलेले नाही. स्वतःला इतके वगळून जीवनामध्ये दूसर्यासाठी जगणे, ही किमया या पृथ्वीतलावर होऊ शकते असे जर कोणी अनुभवाला आणून दिलेले असेल, तर ते साने गुरुजींनी अनुभवाला आणून दिले. साने गुरुजींच्या भाषेमध्ये व्याकरणामध्ये ‘मी’ नावाचा शब्दच नसावा असे मला वाटते. ते ‘आम्ही’ याच भावनेने जगले. त्यामुळे त्यांचा आनंद, त्यांचे चैतन्य, त्यांचे तारुण्य, त्यांचे कारुण्य, त्यांचे साहित्य, हे साने गुरुजींचे साहित्य न होता आपल्या सगळ्या हजारो लोकांची वाचा साने गुरुजींच्या लेखणीतून बाहेर पडली आहे. साने गुरुजींनी मी साहित्यिक आहे असे कधीच म्हटले नाही. ते म्हणायचे मला काही लिहिता येतच नाही; ज्याला उत्तम लिहिता येते तोच असे धैर्याने सांगू शकतो की, मला काही लिहिता येत नाही नाहीतर त्याला अर्धीमुर्धी चारोळी कविता सुद्धा लिहिता येत नाही, तो साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या मागे लावलेला असतो की मी कवी आहे मला स्टेजवर चान्स द्या. साने गुरुजींनी हजारो कविता लिहिल्या, पण साहित्य संमेलनात जाऊन कविता वाचाव्यात असे त्यांना कधीच वाटले नाही. कारण त्यांची धारणा अशी होती की, ‘इदम् न मम,’ ‘हे माझं नाही आहे.’ भारतीय तत्वज्ञानात अत्यंत सुंदर वाक्य कुठले असेल, तर जीवनामध्ये जगताना ‘इदम् न मम,’ ‘हे माझं नाही आहे,’ या भावनेने जगायचे. साने गुरुजी इदम् न मम या भावनेने जगले. साने.गुरुजींच्या साहित्याचा मूळ स्त्रोत विचाराल तर तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे-
फोडिले भांडार,
धन्याचा हा माल
मी तो हमाल भारवाही
या भावनेने साने गुरुजींनी लोकांच्यासाठी लिहिले. साने गुरुजींनी साहित्यिक होण्यासाठी साहित्य लिहिले असते, तर ते फार तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन दुसऱ्या वर्षी विसरले गेले असते; परंतु त्यांनी साहित्यिक, ग्रंथकर्ता म्हणून साहित्य लिहिले नाही आणि तसे न लिहिण्याची या भारतामध्ये परंपरा आहे. ही परंपरा आपण विसरतो. भारतातील परंपरा अशी आहे की आपण उत्तम काही केले तर शक्य तितके नामानिराळे व्हावे. मी तुम्हाला या अजिंठ्याच्या परिसरातल्या लोकांना सांगावे असे नाही. अजिंठा, वेरूळला उत्कृष्ट शिल्प आहे, पण एकाही शिल्पकाराने आपले नाव लिहिलेले नाही. पहायला येणारे लोक मात्र आपली नावे तिथे लिहितात. ‘गायकवाड गुरुजी, सातवी अ, अमुक शाळा.’ पण इथली अलिप्त राहण्याची परंपरा आहे. हा कोण आहे याच्याशी तुम्हाला काय करायचेय?
साने गुरुजींचा विचार अगदी साधा होता की, यथार्थपणे जगायचे असेल तर दुसऱ्यासाठी जगा. हा इतका साधाच उपदेश होता. साने गुरुजींनी जीवनामध्ये सगळ्यांत जर विचार कसला केला असेल तर तो दुसऱ्याचा केला आणि संस्कृती याचा अर्थ मी असा करतो की, दुसऱ्याचा विचार प्राधान्याने करणे म्हणजे संस्कृती. या जगामध्ये मला जगायचा हक्क आहे, तसा हक्क असणारे कोट्यवधी लोक आहेत, हे मानणे म्हणजे संस्कृती. याला इंग्लिशमध्ये ‘रूल्स ऑफ द रोड’ म्हणतात. मीच डाव्या बाजूने का चालायचे? जर सगळ्यांनीच मधून चालायचे ठरवले, तर असंख्य मुडदेदच रस्त्याला दिसायला लागतील! माझा जरी नसला, तरी माझ्या जवळच्या माणसाचा दिसेल; म्हणून मला हे पाळले पाहिजे. याचे कारण काय? तर माणुसकीचा पहिला धर्म साने गुरुजींनी सांगितला तो हा की, तर प्राण्यांना न मिळालेली अशी एक देणगी मनुष्य प्राण्याला मिळालेली आहे; ती म्हणजे दुसर्या विषयीची सहानुभूती. एका माणसाने एखाद्या दुसऱ्या कुत्र्याला दगड मारला तर कुत्र्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले मी पाहिले नाही. किंवा बैलगाडी ओढताना एका बैलाला फटका मारला तर बाजूचा बैल संपावर गेला, असे काही आपण ऐकलेले नाही. संपावर माणसे नेहमीच योग्य कारणासाठी जातात, असे होत नाही. पण तरीसुद्धा असा गेला आहे, असे होत नाही. तो तक्रार करीत नाही; पण आपल्याला मात्र दुसर्याचे दुःख पाहून, त्याला झालेल्या वेदना पाहून, आपल्यालाही त्या व्हाव्यात, अशी योजना निसर्गाने केलेली आहे आणि अशी योजना करून देताना एक प्रचंड अशी काही निर्मिती मी याला निर्मितीच म्हणतो- निसर्गाने आपल्यामध्ये ठेवलेली आहे. या निर्मितीलाच ‘अश्रू’ असे म्हणतात. इतकी सुंदर निर्मिती या जीवनामध्ये दुसरी कुठलीही नाही! माणसाचे माणूसपण सगळ्यात जास्त त्याच्या डोळ्यातून झरणार्या आसवांतून प्रकट होते. म्हणून आईचे मोठेपण सांगताना गडकल्यांनी इतके सुंदर लिहिले आहे की,
हे हृदय कसे आईचे, मी उगाच सांगत नाही,
जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई?
आनंदानेही तिच्या डोळ्यांतून पाणी येते. ते पाणी दिसायला लागते आपल्याला, त्या वेळी मनाला स्नान घडते. त्या वेळी ते आलेले आसु, हे तीर्थ म्हणून आलेले असतात. पाणी आणि तीर्थ यांच्यातला फरक तरी काय? पाणी हे आपल्या शरीराला स्नान घालते आणि तीर्थ हे आपल्या मनाला स्नान घालते. मनाला जे द्रव स्नान घालते, त्यालाच आपण तीर्थ म्हणतो आणि अशा प्रकारचे ‘अश्रु'-तीर्थ जसे धारा तीर्थ असते, वरूण-तीर्थ असते, अरूण तीर्थ असते, काशी तीर्थ असते. अशा प्रकारच्या पवित्र अश्रु-तीर्थमध्ये साने गुरुजींनी आपल्या साहित्यातून आपल्याला उभे केले आहे. ज्यांना सानेगुरुजी कळले नाहीत, ते गधडे म्हणाले की, साने गुरुजींचे वाङ्मय रडके होते! ज्या माणसांना जीवनातल्या आसवांचे महत्त्व कळलेले नाही, त्या माणसांना केवळ आणखी दोन पाय नाही म्हणून माणूस म्हणायचे! सानेगुरुजी रडके नि हे शहाणे! साहेबांचे बूट चाटत ज्यांचे आयुष्य गेले, त्यांनी साने गुरुजींना अशक्त, बुइक, दुबळे म्हणावे! सानेगुरुजींचे सौम्य दर्शन पुष्कळांना झालेले असेल, तर साने गुरुजींचे विश्वरूपदर्शन ज्यांना झाले, त्यांना सौम्य आणि विश्वरूप यांच्यातला फरक त्यावेळेला पाहायला मिळाला.
मला एक प्रसंग आठवतो. एरवी साने गुरूजींना मी लहान मुलांना गोष्टी सांगताना पाहिले. त्या गोष्टी सांगताना त्या मुलांत लहानात लहान मूल जर कोणी असेल, तर साने गुरुजी हात मनुष्य होता! ही मुले मोठी वाटावेत इतके गुरुजी छोटे वाटायचे. हे साने गुरुजी परळला कामगार मैदानावर उभे राहायचे. मला तो प्रसंग अजूनही आठवतो आहे, आम्हांला साने गुरुजींचे दर्शन असे झालेय. कामगार मैदानावरती भाषणबंदीचा हुकूम सानेगुरुजीवर बजावला गेला. भाषणबंदीचा हुकूम बजावल्यानंतर तो हुकूम हातात घेऊनच साने गुरुजी स्टेजवर चढले. आणि तुम्हाला खरोखर सांगतो की एखादे चंदनाचे झाड जळाल्यानंतर काय होईल? आगही दिसेल आणि सुगंध ही आपल्याला येईल. अशा प्रकारची त्यांची ती वृत्ती पाहिल्यानंतर वाटले. उभी राहिले नि म्हणाले, ‘भाषणबंदी. आमच्या देशातले हजारो लोक फासावर गेलेत, तुरुंगात गेलेत, जन्मठेपेवर गेलेत आणि जो मूलभूत हक्क मिळावा आम्हाला मुक्तपणाने बोलण्याचा- ज्यासाठी आम्ही झगडलो- तो आमचा हक्क स्वातंत्र्य हिरावून घेणारा हा हुकूम आहे! आणि त्या दिवशी त्यांनी भाषण केले. स्वातंत्र्य म्हणजे काय आहे या जगात त्यासाठी कोणी कुठे काय काय हाल-अपेष्टा सहन केल्या यासंबंधी अप्रतिम तेजस्वी निरूपण केले! असे वाटले की, काल गच्चीवर लहान मुलांना गोष्टी सांगणारे सानेगुरुजी, ते हेच सानेगुरुजी आहेत काय? आणि असे करता करता शेवटी- मी जरा नाटकाचा मनुष्य असल्या मुळे शेवटची नाट्यमय घटना ही माझ्या लक्षात राहिली. त्यांनी असे केले की,‘ असले जे हुकुम येतात याची आम्ही काय परवा करतो, ते मी आपल्याला दाखवतो,’ म्हणून त्यांनी टर्रकन स्टेजवरतीच तो हुकूम फाडला! त्यानंतर त्यांना पकडायला आलेला जो पोलिस अधिकारी होता, त्यालाही कर्तव्य पालन करणे भागच होते. तो- तुम्हाला खरेच सांगतो- ‘आयुष्यातले महत पाप मी करतो आहे,’ अशा चेहऱ्याने गुरुजींना म्हणाला, ‘मला तुम्हाला या गाडीत बसवून नेले पाहिजे!’ गुरुजी ताबडतोब त्याच्या मागे जाऊन शांतपणाने गाडीत बसले. त्याच्यावर मोहित रागावले नाहीत. असे रागावणे ही मुळी त्यांच्या स्वभावातच नव्हते. आपल्याला माहीत असेल की बेचाळीसच्या चळवळीमध्ये त्यांना एकदा पळवून न्यायच्या इराद्याने ससून हॉस्पिटलमध्ये आजारी म्हणून आणले होते. त्यांना तेथून मग निसटायचे होते. तब्येत बरी नाही या बहाण्याखाली तिथे त्यांना आणून ठेवले. अन चौथ्या, पाचव्या दिवशी ते लोक आलेले नि म्हणाले, ‘गुरुजी, आता निसटायचे.’ ‘नको रे बाबा’ ते म्हणाले, ‘म्हणजे त्याचे काय झाले आहे, माझ्यावर जो पहाऱ्याला हवालदार नेमला आहे ना, त्याची नि माझी चार दिवसात ओळख झाली आहे. त्याची लहान लहान मुले आहेत.
मी जर पळालो तर त्याच्या नोकरीवर गदा येईल.’ कटबीट खलास! कुठला कट? तो हवालदार नि त्या मुलांसाठी त्यांचे अंतकरण रडत होते! त्यासाठी ते तुरुंगातल्या हाल अपेष्टा सहन करायला तयार झाले. तुम्ही सांगा, असे ‘अश्रू’ आपल्या डोळ्यातून येण्याचे भाग्य तुमच्या-माझ्या पैकी किती जणांना लाभले आहे? हास्य फुटण्याचे भाग्य लाभते, त्यापेक्षा सुद्धा सहानुभूतीने डोळ्यातून ‘अश्रू’ येण्याचे भाग्य हे जास्त महत्वाचे आहे. सानेगुरुजी काय स्वतःसाठी रडले? सानेगुरुजी स्वतःच्या मुलीचे लग्न होत नाही म्हणून वैतागले होते काय? साने गुरुजी आपल्याला वरची बढती मिळत नाही म्हणून चिडले होते की, साने गुरुजी आपल्याला अजून पद्मभूषण केले नाही या चिंतेत होते? ते कसल्याही चिंतेत नव्हते. त्यांना एकच कळत होते की हा देश, जोपर्यंत या देशातील लहान मुल आनंदी दिसत नाही, तोपर्यंत हा देश राहणार. म्हणून साने गुरुजींनी आपले लक्ष एखाद्या निष्णात माणसाप्रमाणे योग्य जागी ठेवले. त्यांनी या देशातल्या सगळ्यात महत्त्वाचा बिंदू काय मानला होता? तर साने गुरुजींनी लहान मुल हा देशातला महत्त्वाचा बिंदू मानला होता. उपाशी लहान मुल ही देशाची बदनामी मानली. आपले पाप मानले. म्हणून त्यांनी एक मोठा मंत्र आपल्याला सांगितला.
करी मनोरंजन जो मुलांचे।
जडले नाते प्रभूशी तयाचे।।
त्यांनी पूजा कोणाची केली? तर लहान मुलांची केली. लहान मुलांना आनंदित ठेवणे हे कर्म कठोर असे काम आहे. लहान मुले सर्वांनाच आवडतात. जोपर्यंत हसत असतात, नाचत असतात, तोपर्यंत सर्वांनाच आवडतात; पण रडणारे मुल फक्त आईचेच असते! रडणाऱ्या मुलाला आईशिवाय कोणी जवळ घेत नाही. साने गुरुजी हे जीवनभर असे ‘आई’ होऊन राहिले आणि आई या सारखी पदवी दुसरी कुठलीही नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही विठ्ठलाशी ज्या वेळी अगदी सलगी करतो- पंढरपूरच्या- त्यावेळी आम्ही विठाई म्हणतो. त्याला आपण विठ्ठलराव साहेब वगैरे असे काही म्हणत नाही! विठ्ठलरावजी साहेब- हल्लीच्या राजकीय पद्धतीच्या प्रमाणे त्या ‘राव’ला आणखी एक ‘जी’जोडावा लागतो! तो विठ्ठल म्हणजे विठाई माऊली. ‘माउली’ ही सर्वात मोठी पदवी आम्ही मानतो. ज्ञानेश्वराबद्दल जेव्हा आम्हाला म्हणायचे तेव्हा मी ज्ञानोबा माउली म्हणतो. ज्या मुलाचे नाव ज्ञानेश्वर असते, तिथे आमच्याकडे सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये पंढरपूरला त्याला ज्ञानेश्वर अशी हाक मारीत नाहीत. त्याला ‘माउली’ अशी हाक मारतात. म्हणजे तो पुरुष असतो पण त्याला हाक मारतात ‘माउली’ अशीच! कारण ज्ञानेश्वर म्हणजे माउली! सगळ्यात मोठे मानाचे स्थान दिले असेल आम्ही तर ‘माउली’ हे विशेषण वापरले.
माऊली होणे ही गोष्ट काही तितकी सोपी नाही. मुलांना जन्म देते ती माउली असते असे मला वाटत नाही. मुलांना जन्म देणे ही निसर्गाने घडविलेली क्रिया आहे. त्यात बाईचे कर्तुत्व आहे असे नाही, परंतु जी बाई आपल्या जीवनाचे सर्व सार हे रोपटे वाढवणे असे मानते, तेथे अहंपण फळाप्रमाणे गळलेले असते. आपल्या आईचे सर्वात सुंदर दर्शन आपल्याला कुठे होते? आपण थोडे दुष्ट असतो तरी ते कुठे होते ते सांगतो आपल्याला. मोठ्या हौसेने तिने स्वयंपाक केलेला असतो आणि आपण नंतर आई जेवायची आहे, हे विसरून सगळे संपवलेले असते आणि ज्या वेळी आई नुसत्या लोणच्याबरोबर भात खाते, त्या वेळी जर आईला म्हटले की, ‘आई, अग तुला काही राहिलेले नाही;’ तर ती म्हणते, ‘अरे, बाबांनो तुम्ही एवढे जेवलात तेव्हाच पोट भरले माझे.’ हे जिचे होते तीच आई! मुलाला जपणे याचा अर्थ वेडे-वाकडे लाड करणे एवढेच नव्हे! नवऱ्याला जपणे किंवा पतिदेव मानणे म्हणजे कसेही चालवून घेणे असा अर्थ नव्हे. तर या भूमिकांमध्ये यायला तुम्हांला काही तरी द्यावे लागते. साने गुरुजींनी आई होऊन हे दिले. तुम्हांला ठाऊक असेल की जगातल्या कुठल्याही क्रांतीकारकाच्या इतिहासात तुम्हांला असे आढळणार नाही, की क्रांतिकारक म्हणून जमलेली पोरे, ती गावाहून जाऊन आल्यानंतर भुकेलेली असतील म्हणून त्यांना कुणी करून वाढले; पण साने गुरुजी स्वतः पोळ्या तयार करून वाढत असत. ही आई, याला आई म्हणायचे!
आई, पत्नी, सौभाग्यवती वगैरे शब्द इतके सहज आणि चुकीचे आज आपण वापरतो की, लग्न झाले की ती त्याची बायको होते. या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. ती त्याची बायको म्हणून व तो नवरा म्हणून एकमेकांची कर्तव्ये काय हा प्रश्न आहे. नवऱ्याने पाचशे रुपयेच पगार असताना पाच हजार रुपयांचा हिऱ्याचा दागिना आणला, तर हे पाच हजार रुपये तुमच्याकडे कोठून आले ते आधी सांगा, तरच हे हिऱ्याचे दागिने मी घालीन, असे म्हणणारी जी बायको, ती बायको! नाहीतर हिऱ्याचे दागिने घालते आणि कधी एकदा शेजारणीला जाऊन गळा दाखवते, असे जिला झाले ती बी पत्नी नव्हे. ती मादी आहे. ती स्त्री नाही. पुरुषाला जर मोठे व्हायचे असेल, तर त्याला नवरा व्हावे लागेल, त्याने नुसते नर होऊन भागायचे नाही. मी तर नेहमी म्हणतो की, जर बाई हातात जळके लाकूड घेऊन उभी असेल, अन नवऱ्याला म्हणेल, ‘हरामखोरा! अगोदर ही नोटांची चवड कोठून आणलीस सांग! नाहीतर माझे कुंकू एका हाताने पुसून दुसऱ्या हाताने तुला पेटवते मी!’ तर या देशात तुम्हाला अनाचार ऐकू येणार नाही. कारण सगळे लबाड नवरे म्हणतात, ‘आम्ही काय करणार! आमच्या वाईफला ते पाहिजे होते.’
तुमच्या वाईफला सगळे पाहिजे. तुमच्या वाईफला दुसरा हसबंड पाहिजे असता तर आणून दिला असता का? बायकांच्यावर सगळ्यात मोठा अन्याय जर कुठे होत असेल तर तो इथे होतो. बायकांसाठी म्हणून नवरे पैसे खातात ही जी समजूत होते, तिथे मातृत्व आणि पितृत्व हे शब्दच मुळी चुकीचे व्हायला लागतात. साने गुरुजींनी या शब्दांचा खरा अर्थ काय, मातृत्व या शब्दाचा खरा अर्थ काय, हे दाखवून दिले. वेड्या-वाकड्या कुठल्याही मार्गाने का होईना माझ्या मुलाला तेवढा मोठा कर म्हणणे म्हणजे मातृत्व नव्हे. माझा मुलगा असेल, पण त्याच्यापेक्षा स्वयंपाकिणीचा मुलगा, त्याचा पहिला नंबर आला असेल, तर त्याचे कसे होईल, याची चिंता जिच्या डोळ्यांमध्ये आहे, ती खरी माता. म्हणजे ती मातृत्वाचा धर्म पाळते आणि दुसरी फक्त निसर्गधर्माने आई झालेली. जाणीवेच्या धर्माने माता होणे ही सोपी गोष्ट नाही. साने गुरुजी हे अशा प्रकारची माता झाले. म्हणून त्यांना जिथे तिथे स्त्रियांच्या दुःखाचे कढ दिसले, स्त्रियांचे अश्रू जेथून वाहताना दिसले, त्या अश्रूंची गाणी त्यांनी जिथे पहिली, तिथे, महाराष्ट्रात हिंडून आयाबायांच्याकडून ती गाणी त्यांनी गोळा केली. मराठीतील तो एक उत्कृष्ट संग्रह आहे.
महाराष्ट्रातील स्त्रियांच्या मनाचे कुठल्याही कादंबरीकाराला, निबंधकाराला न रेखाटता आलेले चित्र कुठे पहायचे असेल तर ते आमच्या बायकांनी लिहिलेल्या ओव्यांत आहे. या ओव्या साने गुरुजींनी घरोघर जाऊन गोळा करून त्यांचे दोन खंड प्रसिद्ध केले. त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्त्री-मानसाची पहिल्यांदा गाठ घालून दिली. ते लोकवाङमय आहे, की लोक-साहित्य आहे, की फोक लिटरेचर मध्ये त्याचे स्थान केवढे आहे, असे लिहून त्यावर पीएच.डी मिळवणे, याला माझ्या मते काही अर्थ नाही. आम्ही विद्यार्थी होतो त्या वेळी वाचत होतो. त्या वेळी आमच्या पहिल्यांदा लक्षात आले की, आपली आई म्हणजे ’तळहाताचा पाळणा, डोळियांचा केला दिवा’ अशी जी आहे, ती माझी आई. असे म्हटल्याबरोबर फरकच पडला. किती सुंदर सुंदर ओव्या. ओव्या हे समृद्ध धन आहे. तर साने गुरुजींनी त्या ओव्या गोळा केल्या. छोट्या छोट्या टिपा लिहिल्या आहेत, त्याला तोड नाही. दुर्दैव असे की, रहस्यकथा खपण्याच्या काळामध्ये अंत:करणात जाऊन तिथले सौंदर्य पाहण्याची कुणाला घाई आहे? गरजही नाही.
आज साने गुरुजींची पुस्तके मिळत नाहीत बाजारात आणि पुस्तके मिळत नाहीत म्हणून या लहान मुलांना केवढ्या आनंदाला आपण पारखे करीत आहोत! मला एका लहान मुलाने विचारले होते की, ‘व्हाट इस धिस श्यामची आई?’ सांगणार होतो त्याला, पण म्हटले आईबद्दल त्याचे मत वाईट होईल, म्हणून सांगितले नाही. म्हटले असते, ‘तुझ्या घरी, देअर आर टू शेम्स; एक युवर फादर इस अ ब्लडी शेम आणि दुसरे, युवर मदर इज टू ब्लडी शेम!’ श्यामच्या आईचे पुस्तक मराठी माणसाला माहित नाही असे ज्याने म्हटले, त्याला महाराष्ट्रीय म्हणून जगण्याचा अधिकार नाही, असे म्हटले पाहिजे. ‘श्यामची आई’ हे वेदोपनिषद आहे.
कौटुंबिक जीवनात तर आई ही साक्षात अशा प्रकारची मूर्ती आपल्यापुढे आलेली आहे की, कुटुंब म्हणजे काय, त्याचे लागेबांधे म्हणजे काय, याचा समाजशास्त्रीय अभ्यास जरी करायचा असेल, तरीसुद्धा साने गुरुजींचे श्यामची आई बारकाईने वाचायला पाहिजे. लहान मुलाला आईबद्दल वाटणारी आस्था, आईला लहान मुलाबद्दल वाटणारे प्रेम, काळजी, चिंता, बाप, भावंडे, त्यांचे दारिद्र्य, हे सारे आपल्या महाराष्ट्रातले एक कौटुंबिक ‘युनिट’ आहे. त्याच्यामध्ये हे फार सुंदर आलेले आहे. साने गुरुजींचे वाङमय याचा अर्थ जगातले जेवढे काही सुंदर सुंदर आहे ते त्यांनी मराठीत आणलेले आहे. साने गुरुजींनी चटकन मोठे होण्यासाठी न लिहिल्यामुळे त्यांना दुसऱ्यांचे मोठेपण चटकन दिसत होते. स्वतःच्या मोठेपणात गर्क असणाऱ्या माणसाला आरसा यापलीकडे दुसरे काहीच लागत नसते. त्याला स्वतःचेच तोंड पाहावेसे वाटत असते हे खरेच आहे. ग्रुप फोटो जर आला, तर त्यात दुसऱ्याचा फोटो न पाहता आपण आपला फोटो पहिल्यांदा पाहतो, मग बाकीच्या सगळ्यांचे पाहतो. हा मनुष्यस्वभाव आहे, पण त्याला काही मर्यादा असते. साने गुरुजींचे वाङमय म्हणजे टॉलस्टॉय मिळाला आम्हांला वाचायला. ‘ला मिझरेबल’ वाचायला मिळाले जगातला उत्तम ‘एन्शंट मरिनर’ वाचायला मिळाला. जगातले उत्तम साहित्य वाचायला मिळाले. अशा प्रकारचा आनंद मरठीतून मिळाला आणि कुणाच्या मराठीतून तर साने गुरुजींच्या! ज्यांचे मराठी म्हणजे एका शब्दाला जास्त शब्द झाला तर कदाचित त्या ओळीला वजन होईल, या भीतीने त्यांनी शब्द बाजूला ठेवलेला. इतक्या नाजुकपणाने मराठी त्यांनी लिहिलेली! ही सुंदर अशा प्रकारची शैली. इतक्या सुंदर प्रकारचे लिहिलेले ते मराठी! भाषेचा आदर्श म्हणून मुलांपुढे जायला हवे.
अश्रुंचे महत्व म्हणजे काय असते जीवानामध्ये, जिव्हाळ्याने एकत्र येणे म्हणजे काय, दुसऱ्यासाठी मन ओलावणे म्हणजे काय, याचा कुठेतरी साक्षात्कार आजच्या जगामध्ये, जिथे फक्त मी-मी-मीचा आग्रह चलला आहे, त्या जगामध्ये दिसेल? साने गुरुजी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत ‘आउट ऑफ डेट’ कधीच होणार नाहीत. साने गुरुजी ‘आउट ऑफ डेट’ झालेत असे म्हणणे म्हणजे, माणसातला चांगुलपणा ‘आउट ऑफ डेट’ झाला, पावित्र्य ‘आउट ऑफ डेट’ झाले, असे म्हणण्यासारखे आहे! सात्त्विकता नाहीशी झाली जगातली’ असे म्हणण्यासारखे आहे! दुसऱ्यासाठी जगणे, श्रमणे, दुसऱ्यासाठी काहीतरी करावे असे वाटणे, हा माणसाचा विचार नाहीसा झाला असे म्हणण्यासारखे आहे! साने गुरुजी ‘आउट ऑफ डेट’ झालेत याचा अर्थ मानवताच ‘आउट ऑफ डेट’ झाली असे म्हणण्यासारखे आहे. इतके ते मानवतेच्यामध्ये रमलेले, आत घुसलेले होते.बरे हे घुसलेले असतना, नुसते शब्दांचे घन लोकांच्यावर टाकून नाही, स्वतः त्यांच्यासाठी कष्ट केले, मुलांना बरोबर घेऊन गेले, स्वतः: जग दाखवले. चांदण्याची शोभा दाखविली. साने गुरुजींच्या जीवनामध्ये त्यांनी जसे अश्रू पाहिले तसे एक निसर्गाचे स्वरूपही. साने गुरुजींनी दु:खितांचे जीवन पहिले, त्यांच्याबद्दल लिहिले. धडपडणारी मुले या देशामध्ये व्हावीत याची चिंता वाहिली.
उत्तम तत्वज्ञानाचा, गीतेसारखा ग्रंथ, त्याच्यावरचे भाष्य फुकट गेले असते, जर साने गुरुजींनी जेलमध्ये ते लिहून ठेवले नसते तर! ‘गीता प्रवचने’ सारखा अमोल ग्रंथ आज आपल्याला वाचायला मिळाला नसता. एक दुय्यम भूमिका घेऊन विनोबांच्या जवळ बसून त्यांनी ते केले. साने गुरुजी व विनोबा यांच्यांत श्रेष्ठ कोण नि कनिष्ठ कोण हे ठरविताच आले नसते, इतके ते दोघेही मोठे आहेत, तितक्याच तोलाचे आहेत, असे माझे मत आहे. अशा वेळेला जाणून बुजून दुय्यम भूमिका घ्यायची आणि एखाद्या स्टेनोग्राफरसारखे, ते बोलतात ते सर्व लिहून काढायचे. अर्थात एक गोष्ट खरीच आहे की, विनोबा बोलताना बरोबर लिहून घ्यायला साने गुरुजीच पाहिजेत. कृष्णाला जर सांगितले असते की पु. ल. देशपांड्यांना गीता सांग, तर घाबरला असता श्रीकृष्ण! तुम्हांला सांगतो, त्याला अर्जुन होता तिथे म्हणून सुचले सांगायला. त्याला शिष्यही त्याच तोलाचा लागतो. ऋजुता असावी लागते. घेणारे पात्र एवढे मोठे असावे लागते. आम्ही करवंटी घेऊन जाणार आणि खीर वाढा म्हणून सांगणार! वाढणाराला सुद्धा ‘अरे, मी सुंदर केली आहे खीर अन् कशात वाढतो आहे,’ असे वाटावे. तर साने गुरुजींनी लिहून घेतलेला तो तत्वज्ञानाचा ग्रंथ हे सर्वस्वी मराठीतील धन आहे.
साने गुरुजींचा एक विचार होता. तो आजच्या काळात तर मला फार महत्वाचा वाटतो तो म्हणजे, ‘आंतरभारती’चा विचार. या वेळेला रोजचे वर्तमानपत्र आम्हांला सांगते आहे किम ‘भारत तोडो, भारत तोडो.’ त्या वेळेला राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता, सत्तेची महत्वाकांक्षा न ठेवता, केवळ भावनेच्या दृष्टीने या देशावर प्रेम करणाऱ्या, भावनेच्या दृष्टीने सगळ्या भारताने एकत्र यावे, असे सांगणारे साने गुरूजी! त्या काळाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्हांला साने गुरुजींच्याकडे गेल्याशिवाय गत्यंतरच नाही. तिथेच आम्हांला आमचे चैतन्य, आम्हांला आमची स्फूर्ती सापडणार आहे. या विचाराला हसतात. ‘हा म्हातारा विचार आहे, हल्ली कोण एकतो,’ असे म्हणणारा मनुष्य स्वतः ऐकणारा नसतो, म्हणून तो असा वागतो. आजच्या काळात मी इतका निराश नाहीच. अजूनसुद्धा मला कित्येक तरुण खेड्यापाड्यांत जाऊन काम करताना दिसतात. संस्था चालवताना दिसतात. सरकारी अधिकारी त्यांना आडवे आलेले असतानासुद्धा ते पर्वा करीत नाहीत. काही सरकारी अधिकारी आडवे न येत, उभे सुद्धा येणारे आहेत. तेही चांगले आहेत. त्यांची मदत घेतात. असे कार्य चाललेले आहे. माणूस इतका वाईट झालेला आहे, हरामखोर झालेला आहे, असे मला स्वतःला कधीही वाटलेले नाही आणि ज्याक्षणी माझा माणूस नावाच्या गोष्टीवरचा विश्वास संपेल, त्या दिवशी मी लेखक, कलावंत म्हणूनही संपलेला असेल. म्हणून माझा माणसावर विश्वास आहे. माणसे चांगले करतील म्हणून विश्वास आहे. म्हणून तर मी लिहित असतो-- म्हणून तर मी संवाद साधत असतो.
माणसाचा माणसाशी संवाद साधणे सुटेल, त्या दिवशी सारे संपेल. साने गुरुजींनी कशासाठी लिहिले? त्यांना जे भावत होते, ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी. हा मुली सर्व साहित्याचा, कलांचा उगमच आहे. निसर्ग साने गुरुजींनी किती बारकाईने पहिला आहे, पाहा! कोकणात पाऊस सुरू झाला की काय होते? गुरुजींनी वर्णन केले आहे-
‘झरे वाहायला लागलेत, रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर रोहिणीचे खळखळ झरे वाहायला लागले; पण ते पऱ्हे, नाले, पुढे सुकले, वाळले. थोडे कुठे कुठे पाणी आहे एवढेच. पूर येऊन गेला. साकवावर पाणी आले होते. (साकव म्हणजे जो लाकडी पूल केलेला असतो, गावातले लोक त्याला साकव म्हणतात, पूर आला तर त्याच्याव्र्थी नुसता आडवा एखादा माड टाकून देतात. म्हणजे जो पूल तयार होतो, त्याला साकव म्हणतात.) पौंडेवरच्या पऱ्ह्यातून मुलगा वाहून जाताना वाचला. त्याच्या पाण्याला ओढ फार आहे. अहो, गावात पऱ्हे किती? (म्हणजे साने गुरुजींनी हे पाणी वाहत वाहत गावात कुठे चालले होते हे किती बारकाईने पहिले आहे पाहा. हा पऱ्हा असतो लहान. ओढ्याला पऱ्हा म्हणतात कोकणात.) सोनार आळीतला, खोंड्यातला, खेराच्या आळीतला, तो शिरवळचा. हा खोंडकडचा, कितीएक ओहोळ. प्रत्येकांचे निराळे नाव. प्रत्येक ओढ्याचा निराळा नाद. एका कवीच्याच कानाला ऐकू येईल, अशा प्रकारचाच हा आहे. एवढेच नव्हे तर, तोच ओढा सर्वत्र तीच भाषा बोलत नाही.
आपल्या खोंड्यातला पऱ्हा आहे ना तिथल्या मढीवरल्या शेताजवळ आला की निराळीच गुणगुण करतो. निराळा नाद एवढेच नव्हे, तर तोच ओढा सर्वांकडे तीच भाषा सगळीकडे जाताना बोलत नाही. दगडावरून उड्या घेत येतो, त्यावेळेला तो खो=खो-खो हसतो, पुढे गंभीर होतो, जणू काही त्याची समाधी लागते. नदीजवळचा तो अवखळ खो-खो हसणारा उड्या मारणारा, गडबड करणारा, तोच का हा प्रवाह? तर हा मोठा लबाड आहे हो! कुळकर्ण्यांच्या साकवाजवळ संधपणा धारण करणारा हा प्रवाह पुढे ओकांच्या शेताजवळ गेला की, गाणे म्हणायला लागतो. निरनिराळ्या प्रवाहांचे हे निरनिराळे विविध संगीत ऐकणे मोठे मजेचे आहे.’
साने गुरुजींनी हे असे निसर्गाचे संगीत ऐकले. त्याला आपण पारखे झालेले असतो. आपल्याला संगीत ऐकायचे म्हटले तर ती कळ दाबल्याशिवाय संगीत ऐकायला मिळणार नाही असे वाटते. निसर्ग आपल्यासाठी गात असतो,निसर्ग आपल्यासाठी हजारो चित्रे काढीत असतो. आकाशात सिनेमा दाखवीत असतो. एकदा गांधीना कुणीतरी म्हणाले की, ‘महात्माजी, तुम्ही इथे आलेले आहात तर गिरसप्पाचा धबधबा बघायला या.’ तर गांधी म्हणाले, ‘तिथे काय आहे?’ तर म्हणे वरून पाणी पडते! किती फुटावरून पडते?’ तर म्हणे पाचशे फुटांवरून पाणी पडते. तर गांधी म्हणाले, ‘एवढेच! मी आकाशातून पाच हजार फुटांवरून पाणी पडताना पाहत असतो. तेवढा तर नाही न तो धबधबा?’ हे गांधींचे सोडून द्या. तुम्ही जीवनामध्ये असे खूप पहिले. या पहिल्याची साक्ष, माणसाचे मोठेपण, त्यांनी काय पाहिजे आणि काय आपल्याला सांगितले, याच्यावर आहे. सगळी माणसे हैराण होतात. जर विचारले कुठे गेला होता? काल पुण्याला गेलो होतो. तर काय पहिले? ‘काय गर्दी हो!’ गाढवा, एवढेच पाहिलेस? तुला ती कुठूनही दिसणारी पार्वती दिसली नाही? तुला सिंहगडचा तो किल्ला दिसला नाही? तुला इतर डोंगर दिसले नाहीत? तुला रात्रीचे चांदणे दिसले नाही तुला? ते जीवनदृष्टीवर अवलंबून आहे.
साने गुरुजींची दृष्टी ही बरी नाही, असे कुणाला वाटणार? ज्याची स्वतःची दृष्टी अधू आहे त्याला. तो त्यांना नावे ठेवणार! आमच्याकडच्या एक बाई ताजमहाल पाहायला गेल्या. ताजमहाल! मुलगा रेल्वेत असल्यामुळे आईला फुकट पास होता. त्यामुळे मातृभक्ती वाहून जायला लागली त्याची. फुकट पास होता म्हणून आईलाही घेतले. चला, यापलीकडे काही नाही. बरे मातोश्री त्यांच्या त्याच योग्यतेच्या होत्या. तर केवळ एखादी बाई आई असते, म्हणून मोठी असते, यावर माझा विश्वास नाही. महामूर्खही असतात. मुलाचा सत्यानाश करणाऱ्याही असतात. मी असे घाऊक मग कोणाबद्दल देणे बरे नाही. तर त्या तिथे त्यांनी नेले आपल्या आईला, ताजमहाल दाखवायला. मातोश्रीच त्या. पुण्यातल्या कुठल्यातरी सदाशिव पेठेतल्या वाड्यात राहिलेल्या. त्यांनी तो ताजमहाल पहिला नि म्हणाल्या, काय म्हणाल्या; ‘एवढा खर्च केला? पण स्वयंपाकघरच नाही!’ आता त्या बाईला ताजमहाल पाहणारे गाढवच वाटणार की नाही? तसे या माणसाला ‘अश्रू’चे मोल कळत नाही, त्यात गुरुजी रडकेच वाटणार. त्यांना काय कळणार? ‘आंधळ्यासी जन अवघेची आंधळे.’ त्याला साने गुरुजींचा दोष्ण अहि. साने गुरुजींना अधिक चांगले दिसले. अधिक औदार्य काय आहे ते कळले. मनाचा मोठेपणा म्हणजे काय? जगाची विशालता म्हणजे काय हे कळले. जगातल्या सर्व ठिकाणी भारत स्वतंत्र होऊन मोठा व्हावा अशा प्रकारची महत्वाकांक्षा त्यांना वाटली. सगळ्या भारतातील लोक एकत्र यावेत यासाठी ते धडपडले. ही त्यांची चूक आहे का? ज्या वेळी दुसऱ्या प्रांतामध्ये जातो, आंतर भरतीची कल्पनामी तेव्हा सांगतो. ते थक्क होतात! ‘तुमच्याकडे चाळीस पन्नास वर्षापूर्वी ही कल्पना निघाली होती?’ ‘हो.’ ही कल्पना केवळ सरकार शिरेपर्यंत अत्यंत पवित्र आणि छान होती. ते शिरले अन सगळा गोंधळ करून टाकल त्यांनी! मग अधिकारी आले, पगार आले, इन्क्रिमेंट आले त्यांच्यात. पण भाषेचे प्रेम नावाचा जो महत्वाचा धागा आहे तो नष्ट झाला.
हॉस्पिटलमध्ये –सरकारी हॉस्पिटलमध्ये रोग्यावर्ती प्रेम करावे आणि रोग्याला बरे करावे, हा विचार सोडून बाकी सगळे विचार असतात. तेवढा एकच विचार नसतो के, ‘रोगी बरा झाला पाहिजे. ‘तो डॉक्टरचा डीन केव्हा होईल, असिस्टंट डीनला बाजूला हाकून याला ती जागा कशी मिळेल, याच विचारांत असल्यामुळे रोगी नावाचा कुणीतरी आलाय हा विचार नसतो - असे होते आपले. पण असे न होऊ देणे आणि जगवणे हे जगल्याचे काम, अशा प्रकारचे साहित्यिक करीत असतात. ते आपल्याला तुम्ही कुठे आहात ते दाखवीत असतात. ते तुमचे स्थान बरोबर काय आहे, ते कळवीत असतात. अशा प्रकारचे हे प्रचंड कार्य साने गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये शांतपणाने तेवणाऱ्या नंदादीपासारखे केले. त्यात कुठे प्रसिद्धीचा झगमगाट नव्हता.
नेतृत्वाचा अर्थ काय तो साने गुरुजी, सेनापती बापट, वगैरेंनी आम्हाला समजावून दिला. ज्याचा, त्याच्याकडे काही सत्ता नसताना सुद्धा आपल्याला धाक वाटतो तो नेता! त्यांच्याकडून स्वार्थ साधावयाचा नाही, काही नाही.मला सिगरेट ओढू नये असे का वाटायचे? तर साने गुरुजींना ते कळले तर वाईट वाटेल म्हणून. साने गुरुजी काय आमच्या कानफटात मारणार नव्हते की काही करणार नव्हते. परंतु त्यांना वाईट वाटेल असे आपल्या हातून घडता कामा नये, सेनापतींनावाईट वाटेल असे आपल्या हातून घडता कामा नये. गांधीजींच्यासमोर आपण पोचतच नाही, पण पोचलोच तर त्यांच्या लक्षात येणार नाही ना असे. लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेला तुरुंगात गेले. तेव्हा गडकरी म्हणाले होते की, लोकमान्य विडी विझवून टाकावी असे वाटावे असा पुण्यात कोणीच मनुष्य राहिला नाही! म्हणजे ही जी एक आदराची भावना आहे, अशा प्रकारची भावना त्यांनी आपल्या मनात निर्माण केली म्हणजे तुम्हांला त्यांनी अधिक चांगले केले. एखाद्या माणसाच्या मनात ही मुल्ये, ही आदराची भावना वगैरे विचार असणाऱ्या त्या माणसांनाच कळणाऱ्या गोष्टी आहेत. एखाद्या माणसाला म्हणजे जसे ‘भूत सुकृताची जोडी, म्हणुनी विठ्ठले आवडी’ असे म्हटलेले आहे. त्याप्रमाणे चांगले-वाईट असे वाटणे हि सुद्धा बहुत सुकृताची जोडी कळायला लागते. तो आनंद कळायला लागल्यानंतर वाममार्गाने जाऊ नये, दुष्ट मार्गाने द्रव्यसंचय करू नये, हे विचार सांगायला तिसरा कोणी येऊन उपयोगी नाही. आपले आपल्यातच परिवर्तन होते.
पंढरपूरची आठवण सांगतो. त्या वेळी केलेली कविता आठवते.
हरिचे प्यारे हरिजन आम्ही आलो हरिचरणी
पंढरिराया राउळि तुमच्या बसू धरून धरणी
चोखा मेळ्याच्या भक्तिची शक्ती आम्हांला
मीराबाईचे घुंगुर चरणी सखुच्या करताला
तुक्याची वाणी मुखामधि निश्चय नाम्याचा
बंडखोर आम्ही म्होरक्या ज्ञानदेव अमुचा
शिणली गा पाउले विठ्ठला तीष्ठुनिया दारी
उघडा दरवाजे नका हो घालवु माघारी
चोखामेळ्याला ज्यांनी दुष्टपणे छळले
ह्या बडव्यांहुनि का दयाळा मन अमुचे मळले?
कान्होपात्रेला ठरवुनी नीच त्याज्य पतिता
अनाचार करिती राउळी तुझ्याच भगवंता
कठीण तुज वाटे दयाळा भक्तांची खंत
तुझ्याहि दरबारि जाहला न्यायाचा अंत?
दूर लोट वा पोटी घेई केला निर्धार
वेदा-शस्त्रांचा असो वा नसोच आधार
महाराष्ट्राच्या रे सावळ्या विठ्ठला महाराजा
तुटले मस्तक तरिहि तुटेल चरणावरी तुझ्या.
अशा प्रकारचे हे गाणे शेवटपर्यंत म्हणत म्हणत आम्ही सर्व सेवादलातील मुले पंढरपूरला गेलो होतो आणि गुरुजींनी त्या दिवशी तिथे जे प्रवचन केले, दारात उभे राहून ‘वेदा-शस्त्रांचा असो व नसोच आधार’ म्हणजे काय, या ओळीवर तिथे ते तासभर बोलले होते. कसल्या बाबतीत वेदाचे नि शास्त्राचे मानायचे अन कुठे ते झिदाकारायचे- या विषयावरती ते बोलले होते. माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा गौरवाचा क्षण आहे, असे मला वाटते. त्यानंतर काही मला कमी गौरव मिळाले असे नाही. लौकिक गौरव ज्याला म्हणतात ते पुष्कळ तऱ्हांचे मिळाले त्याच्यानंतर. मागे न जाता! ‘न मागे तयारी रमा होय दासी’ अशा रीतीने मिळाले. परंतु जीवनामध्ये ज्या वेळी आपल्या मनाला धन्यता वाटावी असा तो जीवनातील एक क्षण होता!
[अमळनेर नगरपालिकेतील व्याख्यान : दि. 11जून 84]
Tags: भाषण स्वातंत्र्य चले जाव चळवळ मराठी साहित्य संत ग्यानबा-तुकाराम ज्ञानेश्वर मानवता पंढरपूर साने गुरुजी Freedom of speech Quite India Movement Marathi literature Saint Gynaba-Tukaram Dnyaneshvr Humanity Pandharpur Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या