डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

"चांगला माणूस' इतिहासकाळात नव्हता, वर्तमान काळात नाही आणि भविष्यकाळातही असेलसे वाटत नाही." जाधवांचे हे वाक्य अनाकलनीय आहे. 'चांगला माणूस' म्हणजे जाधवांना नेमके काय म्हणायचे आहे? आम्ही तर चार-सहाच नावे घ्यायची तर, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, महात्मा गांधी, आंबेडकर यांना चांगली माणसे मानतो.
 

'धर्म आणि साहित्य' हा प्रा.रा.ग.जाधव यांचा लेख सुमारे चार महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे धाडस मी आपण होऊन कधी केले नसते, संपादकांनी अगत्यपूर्वक पत्र व अंक पाठवून प्रतिक्रिया लिहिण्यास सुचवले, म्हणून मी हा प्रयत्न करीत आहे. जाधवांचा लेख त्यांच्या कीर्तीला साजेसा आहे, विचारांनी तो भरलेला आहे. त्यावर बांधेसूद प्रतिक्रिया लिहिणे मला अवघड आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे मला हा लेख लिहिण्यास उशीरही झाला आहे.

जाधव यांचे म्हणणे थोडक्यात असे आहे... 'धर्म आणि साहित्य हे युगानुयुगाचे सहप्रवासी आहेत. या सहप्रवासात दोहोंनी एकमेकांपासून खूप काही दिले-घेतले आहे. आज मात्र हा सहप्रवास खुंटला आहे. माणसाने काय करावे, काय करू नये याबद्दल आदेश देण्याचे कार्य आजवर धर्माने केले. मात्र यापुढे धर्माने काय करावे, काय करू नये हे सुचवण्याचे इतिहासदत्त कार्य साहित्याला करावे लागेल. ते करण्याचे त्याच्याजवळ प्रभावी साधन आहे, ते भाषामाध्यमांचे. आज-उद्याच्या काळात धर्म व साहित्य यांच्यातील देण्या-घेण्याच्या खेळात चेंडू साहित्याच्या कोर्टात पडलेला आहे. प्रतिभावंत साहित्यिकांना टोला परतवण्याचे आव्हान पेलता यावे, अशी जाधव यांची इच्छा आहे.

जाधव पुढे म्हणतात, 'धर्म ही सामान्यतः संस्थाही आहे आणि सत्ताही आहे; पण साहित्य हे संस्था नाही, फक्त सत्ता आहे. अलौकिक, इहातीत, अगम्य अशा शक्तींवर धर्माची श्रद्धा असते, साहित्य अशी श्रद्धा स्वीकारत नाहीत. साहित्याची प्रवृत्ती व ध्येये इहवादी असतात, जाधव यांना पुष्कळदा वाटते, की 'धर्मभावना ही धर्माहून काहीएक वेगळी बाब आहे. 'धर्म भावना' म्हणजे परंपरागत धर्म व धर्मकल्पना यांचे शुद्धीकरण केल्याने निर्माण झालेली ‘मनुष्यभावना' अशा प्रकारच्या धर्मभावनेशी (म्हणजेच मनुष्य भावनेशी) साहित्यिकांचा संबंध असतो.

जाधव यांचा व्यासंग फार मोठा आहे. त्याला साजेसे वरील विचारांचे विवेचन त्यांनी लेखात केले आहे. माझा व्यासंग त्या मानाने अल्प आहे. तेव्हा माझे पुढील विचार एका सामान्य वाचकाचे आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पहावे.

जाधव यांच्या लेखनात मला एक दोष वाटतो तो असा की, सुरुवातीला 'साहित्य' म्हणजे 'काव्य, नाटके, कथा आणि त्यांचे सर्व प्राचीन-अर्वाचीन प्रकार' अशी विस्तृत व्याख्या केल्यावर नंतरच्या लेखनात त्यांनी अनेकदा 'साहित्य' हा शब्द वर दिलेल्या साहित्याच्या अनेक प्रकारांपैकी फक्त एखाद्या विशिष्ट प्रकाराला उद्देशून वापरला आहे. त्यामुळे वाचकाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ पृ.9.2 येथील शेवटच्या परिच्छेदाच्या सुरुवातीस जाधव म्हणतात; "साहित्य हे अलौकिकावरील श्रद्धा स्वीकारत नाही" इथे 'साहित्य' या शब्दाने जाधव यांना कोणते नेमके साहित्य अभिप्रेत आहे, ते त्यांनी सांगितलेले नाही.

त्यामुळे वरील वाक्य वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग अशांसारखे साहित्यप्रकार येतात आणि या साहित्यात अलौकिकावर श्रद्धा नाही असे जाधव कसे म्हणतात, असा प्रश्न त्याला पडतो. जाधव पुढे म्हणतात; "तोच (म्हणजे माणूसच) जगाचा नियंता आहे, तोच जगाची नियती आहे, तोच जगाचे कारण, कार्य आणि साफल्यही आहे". संतसाहित्यात माणसाची सुख-दुःखे, व्यथा-वेदना भरभरून वाहिली असली तरी ते साहित्य जाधव म्हणतात त्याप्रमाणे माणसाला जगाचा नियंता वगैरे मानत असेल असे वाटत नाही. माणूसच जर जगाचा नियंता असेल तर त्याने त्याच्यासाठी दुःखे, व्यथा-वेदना का निर्माण केली? जाधव यांच्या वरील वाक्यात त्यांना 'नियती' शब्दाने नेमके काय अभिप्रेत आहे कळत नाही. सामान्यत: त्याचा अर्थ दैव, पूर्वी केलेल्या कृत्यांचे संचित, असा होतो असे वाटते. त्याअर्थी वरील वाक्यात नियती शब्द बसत नाही. पृ.1० वर पहिल्या संतसाहित्याच्या संदर्भात जाधव लिहून जातात "माणूसच परमेश्वराला बाद करतो, अगदी क्लीनबोल्ड." संतांनी परमेश्वराला क्लीनबोल्ड केले, असे कोणी म्हणेल असे मला वाटले नव्हते. जाधव यांच्याकडून या वाक्याचा खुलासा अपेक्षित आहे.

जाधव यांनी त्यांच्या लेखनात काही महत्त्वाच्या ठिकाणी एखादे उदाहरण देऊन थोडा खुलासा करायला हवा होता. उदाहरणार्थ पृ.11.2 येथे शेवटच्या परिच्छेदात ते म्हणतात; "विद्यमान काळात धर्माचे सूक्ष्म व स्थूल या दोन्ही स्वरूपात राजकीयीकरण झालेले आहे." जाधवांना या वाक्यात काय म्हणायचे आहे, हे मला तरी कळले नाही. नेमके काय झाले आहे ते सोदाहरण सांगायला हवे होते. 

तसेच धर्म आणि साहित्य यांनी एकमेकांपासून काय दिले-घेतले आहे, याचे उदाहरण देऊन थोडे स्पष्टीकरण आवश्यक होते. पृ.9.1 वरील तिसर्या परिच्छेदात जाधव म्हणतात; "तत्त्वतः तरी मानवी साहित्यनिर्मिती (निदान मौखिक अशा भाषापूर्व अवस्थेतील)..." प्रश्न असा पडतो की 'भाषापूर्व' अवस्थेत कोणतीही साहित्यनिर्मिती होणे कसे शक्य आहे? साहित्यनिर्मितीला भाषेची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांनीच म्हटले आहे, साहित्याजवळ प्रभावी साधन आहे ते भाषामाध्यमांचे. जाधवांना 'मौखिक'पासून एक भिन्न अवस्था अभिप्रेत असल्याने 'लेखनपूर्व' अवस्था असे म्हणावयाचे असावे असे वाटते. 

मानवी साहित्यनिर्मिती ही कालदृष्ट्या धर्माच्या आधीची आहे हे जाधवांचे म्हणणे प्राचीन इराणी आणि वैदिक धर्मापुरते स्वीकारता येत नाही. इतर धर्मांच्या बाबतीत मी सांगू शकत नाही. प्राचीन इराणी आणि वैदिक भारतीय जेव्हा इराणात एकत्र राहत होते तेव्हा त्यांचा परंपरागत एक सामायिक धर्म होता, बहुधा तो जशाच्या तसा भारतीय शाखेने भारतात आणला आणि ऋग्वेदादि मंत्रांची रचना इथे भारतात आल्यावर झाली. म्हणजे ती साहित्यनिर्मिती पूर्वी अस्तित्वात असलेल्या धर्माच्या नंतरची आहे. 

इराणमध्ये झरथुश्त्रने परंपरागत धर्मात काही बदल केले आणि त्याने सिद्ध केलेला धर्म प्राचीन बृहद्-इराणात पसरला. झरथुश्त्राच्या गाथा आणि त्याच्या नंतरच्या काळात निर्माण झालेली अवस्था साहित्य हे त्या धर्माच्यानंतरचे आहे. नवव्या पृष्ठाच्या पहिल्या स्कंधातील जाधवांची बरीच वाक्ये विवाद्य आहेत. वर काही सांगितली. आणखी दोन आहेत.

'बायबल, कुराण, भगवद्गीता, ग्रंथसाहेब इत्यादी आद्य प्रमाणग्रंथांना...' हे वाक्य दोन दृष्टींनी सदोष आहे. एकतर बायबल, कुराण, ग्रंथसाहेब हे त्या त्या धर्माचे एकमेव धर्मग्रंथ असल्याने त्यांच्या बाबतीत 'आद्य' या विशेषणाची आवश्यकता नाही आणि दुसरे या ग्रंथांच्या जोडीला भवगद्गीतेचा उल्लेख अयोग्य आहे. भगवद्गीता हिंदू धर्माचा 'आद्य' धर्मग्रंथ नाही आणि तो एकटाच प्रमाणग्रंथ नाही.

दुसरे विवाद्य विधान असे; "धर्मग्रंथ हे काव्य साहित्यच आहे. कारण काव्य साहित्य म्हणूनही ते वाचले जातात; समजले जातात. धर्मभावनेपेक्षा वेगळ्या अशा धर्मनिरपेक्ष कलात्मक प्रत्ययाचा लाभही करून देतात". बायबल, कुराण, या ग्रंथाविषयी मी सांगू शकत नाही. परंतु पारशी समाज अवेस्ता, हिंदू समाज यजुर्वेद, अथर्ववेद (यांना काव्यसाहित्य म्हणायचे?) ऋग्वेद हे ग्रंथ काव्यसाहित्य म्हणून वाचत नाहीत. मुळात या ग्रंथांचा अर्थच लोकांना नीटसा कळत नाही, तसा कलात्मक प्रत्ययाचा लाभ त्यांना कसा मिळणार? वर एकदा म्हटल्याप्रमाणे साहित्यातला एखादा विशिष्ट प्रकार डोळ्यासमोर ठेवून जाधवांची विधाने असतात. प्रस्तुत विधान हे त्यांनी असेच ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ डोळ्यासमोर ठेवून केले आहे.

याच पृष्ठावर स्तंभ 1-2 येथे जाधव म्हणतात, 'साहित्य संस्था नाही, पण सत्ता, नैतिक सत्ता आहे. या सत्तेला कोणत्याही संघटनेची, राजवटीची आवश्यकता नाही. ती स्वयंभू आहे. यासाठी त्यांनी महाभारत, रामायण या ग्रंथांची उदाहरणे दिली आहेत.' जाधव म्हणतात ते ठीक आहे, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवायला हवे की साहित्य ही सत्ता धर्मासारखे आदेश देत नाही. मम्मटाच्या काव्यप्रकाश ग्रंथात त्याने म्हटल्याप्रमाणे काव्य 'रामदिवद्वर्तितव्यं, न रावणादिवत्' असा कांतेसारखा उपदेश करते, अर्थात आदेश नाही. 

आदेश पाळावाच लागतो, उपदेशाप्रमाणे मनुष्य वागेल, अथवा न वागेल. 'सत्यंवद' हा आदेश झाल्यास 'सत्यान्त प्रमदितव्यम्' हा उपदेश झाला. ही दोन वाक्ये समानार्थी नाहीत. म्हणूनच तैत्तिरीय उपनिषदात जिथे (1.11 ) ही बाक्ये आहेत त्यांच्या अखेरीस 'एषआदेश:' हे पहिल्या प्रकारच्या वाक्यांना उद्देशून, तर 'एषउपदेश: ' हे दुसर्या प्रकारच्या वाक्यांना उद्देशून म्हटले आहे, 'वर' आणि 'आशीर्वाद यांच्यात जो फरक, तोच आदेश आणि उपदेश यांच्यात आहे. वर हा खरा होतोच, आशीर्वाद ही एक शुभेच्छा असते.

पृ.9-1० स्तंभ 2-1 यात जाधवांनी माणूस हाच साहित्याचा आद्य व अंतिम विषय असतो हे नाना परीने चांगले स्पष्ट केले आहे. त्यांचे भाषाप्रभुत्व येथे नजरेस येते. विवेचनाच्या ओघात ते एकदा म्हणतात; "थोड्याशा अलंकारिक रीतीने बोलायचे, तर साहित्याची ज्यावर श्रद्धा आहे, ते अलौकिक म्हणजे माणूसच!" पण लगेच पुढच्या परिच्छेदाची सुरुवात करताना ते म्हणतात; "खरे तर, 'माणूसपण' हेच प्रचंड गुंतागुंतीचे, गूढरम्य अलौकिक आहे!" या वाक्याला सुरुवात 'खरे तर अशी करून जाधवांनी प्रथम माणसाला 'अलौकिक' म्हणताना जो अलंकारिकतेचा आडपडदा घेतला होता तो बाजूस सारला आहे. माणसाला अलौकिक म्हणायचे तर 'नराचा नारायण' व्हावा लागतो आणि या भाषेत अलौकिकावर श्रद्धा डोकावते.

जाधवांच्या लेखनात काही ठिकाणी फार मोठी अतिशयोक्ती झाली आहे. पृ.1०.1 येथे ते म्हणतात; "संतसाहित्य तर धर्माचे निधर्मीकरण करणारे 'मानवतावादी' साहित्य आहे." संतसाहित्य 'मानवतावादी' आहे हे खरे, पण ते धर्माचे निधर्मीकरण करते, हा म्हणण्यात फार अतिशयोक्ती आहे असे वाटते. पृ.9.2 येथे ते म्हणतात की 'प्रत्येक प्रमुख धर्मात पंथोपपंथांची जी बंडे झाली त्यात अलौकिकावरील श्रद्धेची मूळ चौकट अबाधित ठेवूनच इतर सुधारणा केल्याचे दिसून येईल." हे जर खरे तर मग संतसाहित्य धर्माचे निधर्मीकरण करणारे साहित्य आहे, असे कसे म्हणता येईल? 'शुद्धीकरण' करणारे असे म्हणणे ठीक झाले असते असे वाटते. (पहा पृ.11.1 : 'मनुष्यभावना' कल्पना).

तसेच जाधव म्हणतात की धर्म आणि साहित्य हे युगानुयुगांचे सहप्रवासी होते, आजही आहेत. 'युगानुयुगे' म्हणजे कृत-त्रेता- द्वापर-कलि अशा चार युगांची अनेक आवर्तने आपल्याला सध्या चालू असलेल्या कृत-त्रेता-द्वापर या तीन युगातील साहित्याची पुसटसुद्धा कल्पना नाही, मग त्यापूर्वीच्या आवर्तनांतल्या साहित्याची गोष्टच सोडा. आणि कलियुगातसुद्धा हिंदू धर्माच्या वैदिक काळातले साहित्य आजपासून सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचे आणि झरथुश्त्री धर्माचे. काहींच्या मते इ.स.पूर्व सहाव्या, तर काहींच्या मते इ.स.पूर्व हजार वर्षांपूर्वीचे माहीत आहे. मग या कालखंडाला उद्देशून 'शतानुशतके' म्हणायचे की 'युगानुयुगे'? 

याच संदर्भात सांगायचे तर.. "चांगला माणूस इतिहासकाळात नव्हता, वर्तमान काळात नाही आणि भविष्यकाळातही असेलसे वाटत नाही." जाधवांचे हे वाक्य अनाकलनीय आहे. 'चांगला माणूस' म्हणजे जाधवांना नेमके काय म्हणायचे आहे? आम्ही तर चार-सहाच नावे घ्यायची तर, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, महात्मा गांधी, आंबेडकर यांना चांगली माणसे मानतो.

प्रा.जाधव यांचे प्रतिपादन आहे; "माणसाने काय करावे, काय करू नये... याबद्दल आदेश देण्याचे कार्य, आजवर धर्माने केले. यापुढे मात्र धर्माने काय करावे व काय करू नये हे सुचवणारे इतिहासदत्त कार्य साहित्याला करावे लागेल." (पृ.12.1). या वाक्यात मला शाब्दिक कसरत वाटते. आजवर धर्माने काही केले नाही आणि साहित्यानेही काही केले नाही, केले ते सारे मानवाने मानवासाठी. मानवसंबंधरहित धर्म आणि साहित्य असू शकत नाही. समाजव्यवस्था निर्माण झाली तेव्हापासून मानवाने कसे वागावे, कसे वागू नये याविषयीचे नीतिनियम मानवाने बनवले आणि त्यापुढच्या पिढ्या त्याप्रमाणे वागत राहिल्या. 

पुन्हा केव्हातरी या परंपरागत धर्मात मानवतेबद्दल केले; या क्रियांचे चित्र साहित्यात त्यावेळी दिसू लागले. यापुढेही हे कार्य असेच चालू राहणार आहे. परंपरागत चालीरीतीला मर्यादा घालण्याचे काम मानवाने केल्याचे एक उदाहरण महाभारतात नमूद आहे. पांडूपासून कुंतीला अपत्य होण्याची शक्यता नाहीशी झाली, तेव्हा पांडूने कुंतीला नियोग पद्धतीने अपत्योत्पादन करण्यास सुचवले. त्यास कुंती नाराज होती म्हणून तिला निरनिराळ्या प्रकारे समजावताना पांडूने तिला महर्षि उदालक आरुणि आणि त्याचा मुलगा श्वेतकेतू यांची हकीकत सांगितली.

(1.113.4-2०) पूर्वी स्त्रियांवर समागमाविषयी कोठलीच बंधने नव्हती. त्या 'कामाचारविहरतरिण्यः' होत्या. त्याला कोणी अधर्म म्हणत नसे, तो धर्मच होता. परंतु काही काळापासून स्त्रियांच्या स्वैर वर्तनावर बंधन आले. अनेकदा श्वेतकेतू, त्याचे वडील आणि आई यांच्या समवेत बसला असताना एक ब्राह्मण तिथे आला, त्याने श्वेतकेतूच्या आणि उदालकाच्यादेखत श्वेतकेतूच्या आईचा हात धरला आणि 'चल म्हणाला' (गच्छाव इतिचाब्रवीत्). ते पाहून श्वेतकेतूला संताप आला. त्याला वाटले आईला एक परका पुरुष जणू जबरदस्तीने आपल्याबरोबर नेत आहे. त्याचा अनावर झालेला राग पाहून उदालक त्याला शांतपणे म्हणाला, "रागावू नकोस. 

सर्व वर्णांच्या स्त्रिया 'अनावृत्त' असतात. त्यांचे गायीसारखे वर्तन हा सनातन धर्म आहे." श्वेतकेतूला हा धर्म रूचला नाही, त्याने सर्व स्त्री-पुरुषांच्या संबंधावर बंधन आणले (चकारचैवमर्यादाय). तेव्हापासून स्त्रियांच्या पूर्वीच्या अमर्याद वर्तनांवर मर्यादा आली आहे. मर्यादा अशी की यापुढे स्त्री किंवा पुरुष कोणालाही विवाहबाह्य संबंध ठेवता येणार नाही. तसा संबंध ठेवल्यास भ्रूणहत्येचे पातक त्यांनी केल्यासारखे होईल. मानवाने माणवांसाठी धार्मिक बंधने घातली, हे या उदाहरणावरून लक्षात येते.

जाधवांचा निष्कर्ष असा आहे की, धर्म व साहित्य यांचा सहप्रवास एका अबोल टप्प्यावर येऊन ठेपला आहे. यापुढे धर्माने काय करावे ते साहित्याला सांगावे लागणार आहे. तरीही टेनिसचा खेळ डोळ्यासमोर ठेवून ते म्हणतात, "धर्म-साहित्य खेळातील ,, चेंडू साहित्याच्या कोर्टात पडलेला आहे" आज-उद्याच्या प्रतिभावंत साहित्यिकांना चेंडू परतवण्याचे आव्हान पेलता यावे अशी जाधवांची अपेक्षा आहे.

जाधवांच्या प्रतिपादनाप्रमाणे माणसाने काय करावे याविषयीचे आदेश आजवर धर्माने दिले, आता यापुढे धर्माने काही करावयाचे नाही. तो निष्क्रिय राहणार आहे. यापुढे धर्माने काय करावे हे सुचवण्याचे कार्य साहित्याने करावयाचे आहे. म्हणजे पूर्वी केवळ धर्म काहीतरी करत होता, आता ते काम, करायचे थांबला. इतके दिवस साहित्य काही करत नव्हते, आता त्याने उद्योगाला लागायचे आहे. वस्तुस्थिती अशी असेल तर जाधव टेनिसच्या भाषेत सांगतात ते अयोग्य वाटते. धर्म आणि साहित्य हे दोन गडी टेनिस खेळत आहेत असे जाधवांनी कल्पिले आहे. टेनिसच्या खेळात दोन्ही गडी सतत कार्यरत असतात, एकेकटा असत नाही. चेंडू साहित्याच्या कोर्टात आहे, तो परतवण्याचे आव्हान साहित्याने एकदा केले की मग धर्माने तो चेंडू परतवण्याचे काम करायचे आहे की नाही? का खेळ तिथेच संपला?

जाधव एके ठिकाणी (पृ.12.1 वरची ओळ) म्हणतात. धर्माबद्दल खराखुरा अभिमान वाटावा, असे आज काय आहे?' त्यानंतरच्या त्यांच्या वाक्यांवरून स्पष्ट होते की, त्यांनी हा प्रश्न हिंदू धर्माला डोळ्यासमोर ठेवून केला आहे. पण ख्रिश्चन धर्माकडे पाहिले, तर मदर तेरेसांनी केलेले माणुसकीचे दर्शन घडवणारे कार्य अभिमान वाटावा असे नाही का?

जाधव हे भाषाप्रभू असल्याने त्यांना सामान्यतः एकाच अर्थाचे अनेक शब्द योजण्याचा मोह होतो. (पृ.9.2) येथे 'अलौकिक, पारलौकिक, इहातीत, अगम्य, अगोचर, अतंद्रिय' असे सहा शब्द तर (पृ.11.2) शेवटची ओळ येथे 'माणुसकीची, मानवतेची, मनुष्यधर्माची' असे तीन शब्द योजिले आहेत.

मला वाटते मी व्यक्त केलेली प्रतिक्रिया माझे म्हणणे समजण्यास पुरेशी आहे. माझी प्रतिक्रिया बव्हंशी जाधवांच्या लेखनपद्धतीस अनुलक्षून आहे. तिच्यात त्यांच्या मुख्य विषयाला धर्म आणि साहित्य यांचा संबंध- स्पर्श अनुषंगाने झाला आहे.

Tags: प्रा.जाधव संतसाहित्य 'सत्यंवद' साहित्यप्रकार 'धर्म आणि साहित्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके