डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुलांना मी मनापासून शिकवीत होतो. सर्वच्या सर्व मुले गरिबाघरची असल्यामुळे त्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्चपदस्थ व्हावे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांना शिकवीत होतो. पहिलीचा वर्ग असल्यामुळे मुलांचा पायाच भक्कम व्हावा, ही भावना होती.

मी शिक्षक म्हणून विटे गावात रुजू झालो होतो. विटे हे तालुक्याचे गाव होते. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतील लोकांची ऑफिसच्या कामानिमित्त रोज गर्दी असायची. त्यामुळे बाजारपेठा लोकांनी रोजच गजबजलेल्या असायच्या. सोमवार हा बाजारचा दिवस. या दिवशी तर बाजारपेठेत लोकांचा महापूर यायचा. माझी शाळा जिल्हा परिषदेची होती. इतर खासगी संस्थांच्या दोन-तीन शाळा होत्या. श्रीमंताची मुले खासगी संस्थांत जायची. गोरगरीब कामगार, मजूर, शेतमजूर यांची मुले आमच्या शाळेत यायची. माझ्याकडे इयत्ता पहिलाचा वर्ग होता. पहिलीच्या वर्गाच्याही तीन तुकड्या होत्या. एका वर्गात साधारणत: चाळीस-पंचेचाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनी होत्या. मुलांना मी मनापासून शिकवीत होतो. सर्वच्या सर्व मुले गरिबाघरची असल्यामुळे त्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्चपदस्थ व्हावे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांना शिकवीत होतो.

पहिलीचा वर्ग असल्यामुळे मुलांचा पायाच भक्कम व्हावा, ही भावना होती. काही मुले माझ्या शिकवण्याला चांगली दाद देत होती. ज्यांचे पालक थोडे शिकलेले आहेत किंवा ज्या माता- भगिनींना आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे असे वाटे, असे पालक मुलांच्या शिकवण्याकडे लक्ष देत होते. त्यांचा उतारा पूर्ण करून पाठवत होते. मुलांना अभ्यासाची आणि शाळेची गोडी लागावी म्हणून भरपूर गाणी गायला शिकवीत होतो, त्याचबरोबर गाण्याप्रमाणे नाचायलाही शिकवीत होतो. या गाणे गाण्यात, अभ्यास करण्यात एक मुलगा भलताच चुणचुणीत आणि हुशार वाटला. प्रत्येक गोष्ट तो व्यवस्थित लक्ष देऊन करीत होता. गजानन विष्णू लोखंडे असे त्याचे नाव होते.

सर्व जण त्याला गजा म्हणायचे. पोशाख जुना, परंतु नीटनेटका असायचा. विशेष म्हणजे, इस्त्रीची कोच काढलेली टोपी तो घालायचा. वर्गात दंगा मस्ती करताना आपल्या टोपीला, पुस्तकांना आणि दप्तराला तो फार जपायचा. वर्गातील इतर मुलांची पुस्तके फाटलेली, दप्तरात कशीही कोंबल्याने त्यांचे कान-पाने दुमडलेली असायची, पण गजा लोखंडेचे दप्तर आणि पुस्तके वरून कव्हर घातलेली आणि व्यवस्थित सांभाळून ठेवलेली असायची. तो आपल्या पुस्तकाला किंवा दप्तराला इतर मुलांना हातदेखील लावू द्यायचा नाही. इतर मुलांबरोबर त्याची भांडणे व्हायची ती दप्तरावरूनच. तसा तो भांडखोर या सदरात मोडणाराच मुलगा होता; पण मला तो आवडायचा त्याच्या हुशारीवरून, त्याच्या नीटनेटकेपणावरून. त्याचे हस्ताक्षरही सुंदर होते. त्याची प्रकृतीही सुदृढ होती. त्यामुळे माझ्या वर्गाचा सेक्रेटरी त्यालाच केलेला होता. मी वर्गाच्या इतर कामात असेन तेव्हा तो मुलांकडून पाढे म्हणवून घ्यायचा, वाचन करून घ्यायचा. मी मुलांना कबड्डी, खो-खो तर मुलींना लगोर शिकवायचो. यातही तो सर्वांत पुढे असायचा. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या इन्स्पेक्शनला तर त्याने एवढी हुशारी दाखवली की, आलेले भागशिक्षण अधिकारीही माझ्या वर्गावर जाम खूष झाले. पहिलीत गजाचाच नंबर पहिला आला.

माझा वर्ग इयत्ता दुसरीतही जोमाने/उत्साहाने काम करू लागला. या वर्षी  आमच्या वर्गाची एक नाटिका आम्ही बसवली. बाजी प्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्यावर आधारित ‘तोफेचा आवाज’ असे नाटिकेचे नाव होते. चौथीच्या वर्गातील इतिहासाच्या पुस्तकातील धड्यावरूनच आम्ही ही लघुनाटिका बसवली होती. पावनखिंडीत शत्रूंना अडवून शिवाजीमहाराज जोपर्यंत विशाळगडावर पोहोचून तोफेचा आवाज करीत नाहीत तोपर्यंत बाजी खिंड लढवतात आणि तोफेचा आवाज कानी पडताच शांतपणे आपला देह ठेवतात, अशी ही छोटी नाटिका होती. गजा लोखंडेने बाजी प्रभूचे काम उत्तम केले. तालुक्यात आमच्या नाटिकेला नंबरही मिळाला.

आमच्या मुलांना महागडी ड्रेपरी आणून ऐतिहासिक प्रसंग हुबेहूब करणे परवडणारे नव्हते. आम्ही शाळेतच कागदाच्या सैनिकी टोप्या, शिवाजी महाराजांचा मुकुट बनवला होता. यात्रेतील धनुष्य- बाण, तलवारी असे साहित्य जमवले होते. शिवाजी महाराजांचे काम करणाऱ्या मुलाचे पालक हौशी होते. त्यांनी त्याला सुरवार आणि पांढरा अंगरखा शिवला होता. बाकी मुलांना लांब पांढऱ्या विजारी, नेहरू शर्ट शिवायला लावून आम्ही कमरेला ओढण्या बांधून हातात तलवारी, भाले दिलेले होते. आम्ही तालुक्यात नंबर घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी (जिल्हा परिषद, सांगली) गेलो. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून दोन-दोन संघ असे दहा-बारा संघ आणि त्यांची बालनाटके आलेली होती. त्यांची ड्रेपरी छान होती. मोठी मुले-मुली एवढी सुंदर नाटके सादर करत होती की, आमच्या नाटकाचा उत्तेजनार्थ म्हणून सुद्धा नंबर आला नाही. मात्र तालुक्यात शैक्षणिक शिबिर व गणपती उत्सव यात हे मुलांचे नाटक मी तीन-चार ठिकाणी लोकांना दाखवले.

आमचा वर्ग चौथीत गेला. मी स्कॉलरशिपची तयारी सुरू केली. या वर्षी ‘माझ्या वर्गातील चार-पाच मुले तरी मी स्कॉलरशिपमध्ये बसवणारच’ असा मला आत्मविश्वास होता. गजा लोखंडेला तर राज्यात नंबरात आणायचेच, हा माझा निश्चय होता. शाळा सुरू होऊन पहिली टर्म संपली. आमचा स्कॉलरशिपचा अभ्यास नेटाने सुरू होता. दीपावलीची सुट्टी संपवून शाळा सुरू झाली, पण गजा शाळेत आला नाही.

 तीन-चार दिवस वाट पाहून मी मुलांना गजाची चौकशी करायला सांगितले. मुले म्हणाली, ‘गुरुजी, तुम्हाला ठाऊक नाही?’ ‘नाही.’ ‘ गजाच्या आईला तुरुंगात घातलेय, म्हणून गजा शाळेत येत नाही.’ ‘का? काय केले त्याच्या आईने?’ एक मुलगा माझ्याकडे पाहण्याचे टाळून म्हणाला, ‘त्याची आई धंदा करते... म्हणून तिला पकडले.’ त्या चौथीच्या मुलाने ‘धंदा’ हा शब्द असा उच्चारला की, त्यातून गजाची आई वेश्याव्यवसाय करते, हे माझ्या ध्यानी आले. मी इतर शिक्षकांकडे चौकशी केली, तेव्हा मला समजले की; त्याची आई वेश्याव्यवसाय करते आणि स्वत:चे पोट भरते. ती माऊली शाळेत कधीही आली नव्हती किंवा आपल्या या उद्योगाची आच तिने गजाला लागू दिली नव्हती. पोलिसांनी रेड टाकून तिला पकडले होते.

नंतर पंधरा दिवसांनी गजा शाळेत आला. तेव्हा तो विमनस्क दिसत होता. कोच नसलेली गबाळी टोपी त्याने डोक्याला घातली होती. मी त्याला त्याच्या आईबद्दल किंवा तो शाळेत का आला नव्हता याबद्दल काहीच विचारले नाही. एवढेच म्हणालो, ‘अरे गजा, आपला स्कॉलरशिपचा अभ्यास बराच बुडला; आता तू आजपासून अभ्यासाला जोरदार सुरुवात कर. आपण बुडालेला अभ्यास भरून काढू.’ चार दिवसांनी गजा शाळेत पुन्हा आला नाही. मी त्याची वाट पाहिली. मुलांना गजाला बोलवायला त्याच्या घरी पाठवले. गेलेली मुले मोकळी परत आली आणि म्हणाली, ‘गजा, त्याची आई आणि घरातील सर्व लोक हे गाव सोडून गेले.’ मी अवाक्‌ झालो. कुठून तरी गजाची दाखला मागणी येईल आणि ते कुटुंब गेले त्या गावी गजा पुन्हा शाळेत जाईल, असे मला वाटत होते; पण ती माझी आशा फोल ठरली. त्याची दाखला- मागणी कधीच आली नाही. तो कुठल्या गावी गेला, हेही समजलेच नाही.  

रघुराज मेटकरी यांची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून पु.ल. देशपांडे यांनी १९९१ मध्ये एक लाख रुपयांची देणगी त्यांच्या संस्थेला दिली होती. दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या, राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या या शिक्षकाने त्यांच्या कारकिर्दीतील १६ विद्यार्थ्यांविषयी लिहिलेल्या लेखांची मालिका, प्रत्येक महिन्यात दोन लेख याप्रमाणे पुढील आठ महिने प्रसिद्ध होईल. - संपादक    

Tags: माझे विद्यार्थी गजा गजानन विष्णू लोखंडे रघुराज मेटकरी maze vidyarthi gaja gajanan Vishnu lokhande raghuraj metkari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके