डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

त्याने पानावर लिहिले होते, ‘सुगंधा सोनावणे मला खूप आवडते. किती छान आणि सुंदर मुलगी आहे! तिचा चेहरा माझ्या घरातील लक्ष्मीच्या फोटोसारखा देखणा आहे. ती बोलते किती गोड! ती अभ्यासासाठी माझी पुस्तके मागून घेते, तेव्हा मला फार आनंद होतो. तिने घेतलेली पुस्तके मला परत मागावीशी वाटत नाहीत. तिचे वडील खूप दारू पितात याचे मला फार वाईट वाटते. मी मोठा झाल्यावर सुगंधाशीच लग्न केले असते, पण माझी आणि तिची जात आडवी येते. तिला सुंदर सुंदर कपडे घेऊन द्यावेसे वाटतात, पण नकोच! भीती वाटते की, ती ते कपडे घेणार नाही... तिचे आईवडील काय म्हणतील? ही ब्यादच नको. फक्त सुगंधाकडे पाहत बसणे चांगले.’ 

माझी बदली कळंबी (ता. खानापूर, जि. सांगली) या गावी झालेली होती. तिथे सातवीपर्यंत शाळा होती. माझ्याकडे पाचवी, सहावी, सातवी या वर्गांचे इंग्रजी व गणित हे विषय होते. इयत्ता पाचवीचा मी वर्गशिक्षक होतो. पाचवीच्या वर्गात एकूण पस्तीस मुले होती. वर्ग खूपच चांगला होता. गोसावी नावाच्या मुख्याध्यापिका होत्या, तर आबासाहेब कुंभार नावाचे कामसू शिक्षक गावात फारच लोकप्रिय आणि माणुसकी सांभाळणारे होते. वर्गातील सर्वच्या सर्व मुलांचे गणित चांगले होते. सर्वच्या सर्व मुलांना लिहिता-वाचता येत होते. पण त्या सर्वांत उठून दिसत होता तो गोरक्षनाथ महादेव पाटील हा विद्यार्थी. 

सर्व वर्गात अत्यंत हुशार मुलगा होता. वर्गातील मुले त्याला मान देत असत. इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आलेला होता. त्याबद्दल सांगली जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षक बँक या संस्थांनी त्याचे व शिक्षकांचे सत्कार केले होते. गोरक्ष पाटील याचे वैशिष्ट्य असे होते की, तो एकपाठी होता. जे वाचेल ते तो जसेच्या तसे लक्षात ठेवायचा. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, विजयालक्ष्मी पंडित हे लोक एकपाठी होते, असे पुस्तकातून मी यापूर्वी वाचलेले होते; पण गोरक्ष पाटीलला मी प्रत्यक्ष पाहत होतो. 

एक धडा त्याने एकदा वाचला, तर तो ध्यानात ठेवी. तोच धडा त्याने दोन-तीन वेळा वाचला तर तो स्वल्पविराम, पूर्णविराम यांसह ध्यानात ठेवी. पुस्तक हातात न घेताही तो धडेच्या धडे तोंडपाठ म्हणे. गोरक्ष पाटील हा आम्हा शिक्षकांचा चर्चेचा विषयच झालेला होता. शाळेत कोणीही पाहुणा अगर इतर शाळेतील शिक्षक आले, तर आम्ही गोरक्ष पाटलाच्या बुद्धिमत्तेचा चमत्कार त्यांना दाखवायचो. ‘हा मुलगा तुमच्या गावाचे, शाळेचे आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करील यात शंका नाही’... अशी आलेला पाहुणा तोंडभर स्तुती करून जायचा. 

गोरक्षचा मेंदू म्हणजे कॉम्प्युटरच होता. त्याला कितीही मोठ्या आकड्यांच्या बेरजा आणि वजाबाक्या सांगितल्या तरी कॅल्‌क्युलेटरवर करायला वेळ लागेल त्याच्यापेक्षा कमी वेळात तो बेरीज, वजाबाकी, गुणाकार सहज करून  सांगायचा आणि तो बरोबर असायचा. या मुलाच्या समोर शिक्षकाला अभ्यास करूनच उतरावे लागायचे. काही चुकीचे सांगितले, तर तो निरागसपणे शिक्षकांच्या चुका दाखवून द्यायचा. एक्स्ट्रा-ऑर्डिनरी, ब्रिलियन्ट या शब्दांनीच त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे लागेल. गोरक्षचे मूळ गाव होते आमच्याच तालुक्यातील वेजेगाव. कळंबी हे त्याचे आजोळ होते. त्याच्या वडिलांचे केरळ प्रांतात सोने-चांदी आटवून नवे दागिने घडवून द्यायचे दुकान होते. 

गोरक्षचे आई-वडील, इतर बहीण-भाऊ तिकडे नेल्लोर या गावी असायचे. त्याचा मामाही तिकडेच दुकानात असायचा. घरी फक्त आजी आणि आजोबा दोघेच राहायचे. आजी-आजोबा वृद्ध, पण काटक शेतकरी होते. विशेष म्हणजे ते दोघेही अशिक्षित होते, पण गोरक्षला अभ्यासाचे विलक्षण वेड होते. नवीनवी पुस्तके वाचण्यात त्याला आनंद वाटायचा. पेपरमधील कोडी सोडवणे त्याला खूप आवडायचे. तो फक्त अभ्यासात हुशार होता असे नाही, तर खेळातही तो पुढे असायचा. वक्तृत्वाची त्याच्या गटाची तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बक्षिसे आम्हीच जिंकायचो. 

आमच्या तालुक्यात खानापूर हायस्कूलमध्ये आणि विटे गावात क्रांतिसिंह विद्यालयात मोठ्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या. या ठिकाणी प्रतिवर्षी गोरक्षच पहिला असायचा. प्रकृतीनेही तो सुदृढ व देखणा होता. तो इयत्ता सहावीत असताना कोणा पाहुण्यांच्या लग्नाच्या निमित्ताने त्याचे आई-वडील कळंबी गावी आले. गोरक्षच्या शिक्षकांना भेटण्यासाठी ते शाळेत आले. शाळेच्या ऑफिसचे टेबल जुने-पुराणे, फक्त मुख्याध्यापकापुरती खुर्ची. जिल्हा परिषदेने साहित्य ठेवण्यासाठी काही लाकडी पेट्या पुरवल्या होत्या. त्या आम्ही ऑफिसमध्ये मांडून ठेवल्या होत्या. बाकीचे शिक्षक त्या पेट्यांवरतीच बसायचे. 

आम्ही गोरक्षच्या आई-वडिलांना बोलावले. त्या दोघांच्या अंगावरून सोन्याचे दागिने ओसंडून वाहत होते. श्रीमंतीचे तेज त्या दोघांच्या चेहऱ्यांवर, अंगावर दिसत होते. गोरक्षच्या वडिलांच्या दोन्ही हातांच्या आठ बोटांत दहा-दहा ग्रॅमच्या अंगठ्या होत्या. गळ्यात करंगळीसारखी जाड चेन होती. उजव्या हातात सोन्याचे जाड ब्रेसलेट होते, तर डाव्या हातातील घड्याळ सोन्याचे आणि त्याचा पट्टाही सोन्याचा होता. गोरक्षच्या आईच्या अंगावर स्त्रियांचे जेवढे दागिने असतील तेवढे घातलेले होते. एवढे असूनसुद्धा त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र वाटला. अहंकाराचा लवलेशसुद्धा दोघा पती-पत्नींच्या स्वभावात नसावा, असे मला वाटले. 

वर्गात येताच ते म्हणाले, ‘‘गुरुजी, टेबल-खुर्च्या फारच जुन्या झाल्यात. आता बदलायला हव्यात.’’ आबा कुंभार गुरुजी म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेने जे साहित्य पुरवले, तेच आम्हांला वापरावे लागते.’’ ‘‘ग्रामस्थ आणि सरपंच यांचे तुमच्याकडे लक्ष नाही असे दिसते. सहज आमच्या गावची- म्हणजे वेजेगावची शाळा बघून या; आम्ही ग्रामस्थांनीच शाळा नवी बांधून दिली आहे.’’ गोरक्षची आई म्हणाली, ‘‘काय म्हणतोय आमचा गोरक्ष? अभ्यास-बिभ्यास करतो का? न्हायी तर इथे आजी-आजोबा अडाणी. हा बसायचा खेळत.’’ ‘‘नाही. गोरक्ष हा अत्यंत चांगला मुलगा आहे. अभ्यासात सर्वांत पुढे आहे.’’ कुंभार गुरुजी म्हणाले. 

मी म्हणालो, ‘‘गोरक्ष एवढा हुशार आहे, तो सहज डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा मोठा शास्त्रज्ञ होईल.’’ त्याचे वडील म्हणाले, ‘‘गुरुजी, आम्ही गोरक्षला सातवी पास झाला की दुकानाकडे केरळला नेणार आहोत. तिथे आम्हाला त्याची गरज आहे.’’ ‘‘अहो, मुलगा फारच हुशार आहे. दुकानाकडे नेऊन आपण त्याचे फार मोठे नुकसान कराल.’’ मी म्हणालो. गोरक्षचे वडील यावर पट्‌कन म्हणाले, ‘‘गुरुजी, तुमचा वकील, डॉक्टर, इंजिनिअर महिन्याला किती पैसे कमावतोय ... अंदाजे सांगा?’’ आमची चर्चा सुरू होती. तेव्हा एक लाख रुपयांना फार किंमत होती. मी म्हणालो, ‘‘चांगला डॉक्टर, चांगला वकील महिन्याला पन्नास साठ हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत कमाई करीत असेल.’’ 

गोरक्षचे वडील पट्‌कन म्हणाले, ‘त्याच्या दसपट रक्कम माझ्या दुकानात आज माझी कमाई आहे.’ यापुढे काय बोलावे? पण एक चांगला हुशार मुलगा, ज्याने शिक्षण घेतले असते तर भविष्यात भारतदेशाची सेवा करणारा मोठा माणूस झाला असता. पण पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या या लोकांना ते पटायचे नाही, असे मनात म्हणून मी गप्प बसलो. गोरक्षच्या वडिलांनी त्याच दिवशी आमच्या शाळेला पाच-सहा प्लॅस्टिकच्या चांगल्या खुर्च्या आणि एक गोदरेज टाइप लोखंडी कपाट भेट दिले. इयत्ता सहावीत असताना मी गोरक्षला पुण्यातील भारती विद्यापीठ घेत असलेल्या इंग्रजी व गणिताच्या परीक्षांना बसवले. म्हणजे, सारा वर्गच बसवला. सर्व वर्ग पास झाला. गोरक्ष ठरल्याप्रमाणे गणितात भारती विद्यापीठात पहिला आला. इंग्रजी विषयातही चांगले मार्क्स मिळाले, पण पहिल्या तीनमध्ये तो आला नाही. (कदाचित संपूर्ण पेपर त्याने सोडवला नसेल.) 

कळंबी शाळेतील पाचवी-सहावी-सातवी या वर्गांचा दर्जा चांगला होता. या कळंबी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावाचा बराचसा भाग पाण्याखाली आहे. त्यामुळे ऊस, हळदी, मिरच्या यांसारखी पिके शेतकरी सतत घेतात. त्यामुळे सारे रान हिरवेगार असते. त्यामुळे या रानात मोर  या पक्ष्यांची सर्वांत जास्त वस्ती आहे. आमच्या शाळेतील एका शिक्षिकेच्या घरी कोंबडीची पिल्ले काढायची होती. मधल्या सुट्टीत सहज चर्चा झाली की कोंबडीच्या अंड्यांत जर मोराची अंडी ठेवली आणि पिल्ले काढण्यासाठी कोंबडी बसवली, तर मोरांच्या अंड्यांना कोंबडी उबवते व त्यातून मोराची पिल्लेसुद्धा निघतात. 

शाळेतील धनवडे मॅडमनी सहावीच्या वर्गात सहज विषय काढला. ‘‘मुलांनो, मोराची अंडी कुठे मिळतील का रे?’’ ‘‘बाई, आमच्या शेतात खूप अंडी आहेत मोराची. ओढ्याकाठी आमचे शेत आहे, त्यात खूप मोर आणि भरपूर लांडोऱ्या आहेत.’’ गोरक्षने ताबडतोब सांगितले. ‘‘मग मोराची अंडी सापडतील का?’’ ‘‘हो!’’ गोरक्ष म्हणाला. या दिवशी शनिवार होता. रविवारी सुट्टी. सोमवारी गोरक्ष अक्षरश: मोराची वीसेक अंडी पिशवीतून घेऊन आला. एवढी मोठी-मोठी मोराची अंडी आयुष्यात प्रथमच पाहिली. धनवडे मॅडम तर फार आनंदित झाल्या. त्यांनी त्यांच्या घरी कोंबडी बसवून ती अंडी कोंबडीच्या अंड्यांसमवेत ठेवली आणि कोंबडीने ती उबवलीसुद्धा. 

मोराची दहा-बारा पिल्ले निघाली. कोंबडीची दहाएक पिल्ले आणि मोराची दहाएक पिल्ले पाहताना आमच्या मनाचे मोर पिसारा फुलवून नाचू लागले. तालुका अंतर्गत कबड्डीच्या, खो-खोच्या, धावण्याच्या विविध स्पर्धा असायच्या. कबड्डी आणि खो-खोच्या टीममधून गोरक्ष खेळायचा. त्यातही त्याच्या बुद्धीची चुणूक दिसायची. जन्मत:च त्याला सहज बुद्धिमत्ता होती. इयत्ता सातवीला केंद्राची परीक्षा असायची. नानासाहेब म्हमाणे नावाचे कडक स्वभावाचे शिक्षणाधिकारी त्या वेळी जिल्हा परिषदेवर आलेले होते. त्यांनी आपल्या अनेक कारनाम्यांमुळे जिल्ह्यातील शिक्षकांना ‘नको ती नोकरी’ असे करून सोडले होते. त्यांनी इयत्ता सातवीच्या मुलांना केंद्राची परीक्षा देण्यासाठी या तालुक्यातील सुपरवायझर दुसऱ्या तालुक्यात नेमले आणि पेपर दुसऱ्याच तालुक्यातील शिक्षकांना तपासायला लावले. 

परीक्षा अत्यंत कडक घेतली. पेपरही तसेच तपासले. काही शाळांचे निकाल अत्यंत कमी लागले. ज्या शाळेचे निकाल कमी लागले, त्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या गैरसोईच्या ठिकाणी केल्या. चोवीस-चोवीस वर्षे एकाच शाळेत शिकवणारे शिक्षक तालुका बदलून दूरच्या डोंगरदऱ्यांतील शाळांत बदलून घालवले. नानासाहेब  म्हमाणेविरुद्ध सर्व शिक्षक खवळून उठले. त्यांनी आपापली बायका, मुलेबाळे घेऊन जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यापुढे मोर्चा काढून निदर्शने केली. नानासाहेब म्हमाणे जास्तच चिडले. कायद्यात असतील तेवढ्या कारवाया ते शिक्षकांवर करू लागले. 

या वादळात माझ्या शाळेचा विद्यार्थी गोरक्ष महादेव पाटील सातवीत होता. त्याला सर्व विषयांत पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. शिक्षण अधिकारी नानासाहेब यांच्या नजरेतून ही गोष्ट कशी सुटेल? त्यांच्या मनात पाल चुकचुकलीच. त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना पेपर पाहायला मागितले. गटशिक्षण अधिकारी पेपर घेऊन सांगलीला गेले. पेपरमधील एवढे सुवाच्च अक्षर, काना, मात्रा, वेलांटी, स्वल्पविराम, पूर्णविराम जिथल्या तिथे पाहून ते अचंबित झाले. पण कुणाचे कौतुक करतील, ते नानासाहेब कसले! त्यांना शंका आलीच. कदाचित या मुलाचे सर्वच पेपर शिक्षकांनी लिहिले नसतील कशावरून? त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले, ‘‘संबंधित विद्यार्थ्याच्या गृहपाठाच्या वह्या- मागील परीक्षांचे पेपर आणि इतर लिखाणाच्या वह्या, ज्यामध्ये तो उतारा वगैरे लिहीत होता त्या वह्या घेऊन, त्याच्या वर्गशिक्षकास माझ्याकडे ऑफिसमध्ये पाठवा.’’

गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तसे पत्र मला दिले. त्यांनी ‘फक्त सोमवारीच या’ म्हणून सांगितले होते. मी गोरक्ष पाटीलचे जुने पेपर, गृहपाठाच्या वह्या घेतल्या, त्याच्या घरी जाऊन त्याच्या रोजच्या लिखाणाच्या तीन-चार विषयांच्या वह्या घेतल्या आणि सोमवारी सांगली गाठली. एसटीतून जाताना मी गोरक्षच्या वह्या सहजपणे चाळत होतो. त्यातील मराठी विषयाची वही चाळता-चाळता एका मजकुरावर माझे लक्ष केंद्रित झाले. पानभर हा मजकूर लिहिला होता आणि नंतर त्यावर पूर्ण पानभर फुली मारली होती व मजकूर खोडला होता. त्या पानावर लिहिले होते, ‘सुगंधा सोनावणे मला खूप आवडते. किती छान आणि सुंदर मुलगी आहे! तिचा चेहरा माझ्या घरातील लक्ष्मीच्या फोटोसारखा देखणा आहे. ती बोलते किती गोड! ती अभ्यासासाठी माझी पुस्तके मागून घेते, तेव्हा मला फार आनंद होतो. तिने घेतलेली पुस्तके मला परत मागावीशी वाटत नाहीत. 

तिचे वडील खूप दारू पितात याचे मला फार वाईट वाटते. मी मोठा झाल्यावर सुगंधाशीच लग्न केले असते, पण माझी आणि तिची जात आडवी येते. तिला सुंदर सुंदर कपडे घेऊन द्यावेसे वाटतात, पण नकोच! भीती वाटते की, ती ते कपडे घेणार नाही... तिचे आईवडील काय म्हणतील? ही ब्यादच नको. फक्त सुगंधाकडे पाहत बसणे चांगले.’ असा पानभर मजकूर लिहिला होता व पुन्हा खोडलाही होता. सुगंधा ही माझ्याच वर्गातील म्हणजे, इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी होती. तीही देखणी आणि हुशार होती. दोघांचेही वय १४ वर्षांचे होते. 

शिक्षणाधिकारीसाहेबांनी पेपरमधील आणि वह्यांतील हस्ताक्षर पाहिले. जुने पेपर पाहिले. गृहपाठ लक्षपूर्वक पाहिले. नानासाहेब म्हमाणेसाहेब फार खूष झाले. त्यांनी माझे अभिनंदन केले. हा मुलगा किती हुशार आहे, हे मी त्यांना सांगितले. त्यांनाही कौतुक वाटले. त्यांनी क्लार्कला बोलावून मुख्याध्यापकांच्या नावे, वर्गशिक्षक म्हणून माझ्या नावे, इतर विषयशिक्षकांच्या नावे आणि गोरक्ष पाटील याच्या नावे अभिनंदनाचे एकेक पत्र टाईप करायला सांगितले आणि माझ्याशी हस्तांदोलन करून ती पत्रे माझ्या हातात दिली. गोरक्ष सातवीच्या केंद्र परीक्षेत जिल्ह्यात पहिला आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेतही जिल्ह्यात पहिला आला. शाळेला अभिनंदनाची पत्रे शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर) यांनी पाठवली. त्याने सातवी पास होताच विटे येथे हायस्कूलात ॲडमिशन घेतली. तेथे तो कसाबसा सहा महिने शिकला. पुढे त्याचे आई-वडील त्याला घेऊन केरळ राज्यात निघून गेले. एका हुशार मुलाचे शिक्षण अर्धवट राहिले याची चुटपुट मात्र माझ्या मनाला लागून राहिली.
 

Tags: रघुराज मेटकरी गोरक्ष पाटलाची गोष्ट माझे विद्यार्थी raghuraj metkari goraksha patalachi goshta majhe vidyarthi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके