डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुले विट्याला गेली तेव्हा सर्व मुलांना लिहिता-वाचता येत होते. गणिते सोडविता येत होती. शिल्पा तर सर्व वर्गात हुशार होती. हे कुटुंब इथेच राहिले तर शिल्पा पाचवीत जाताच तिला नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला बसवायचे, पास झाली तर दऱ्याबाला समजावून सांगून ही मुलगी नवोदय विद्यालयात पाठवून तिचे पुढील शिक्षण केंद्र सरकारकडून करून घ्यायचे, असे विचार मी व हेडगुरुजी करीत होतो. पण दऱ्याबाने कुटुंबच विट्याला हलवले.

मी रेवणगाव येथे शिक्षक होतो. डोंगरमाथ्यावरचे हे गाव. त्या वेळी मारुतीच्या मंदिरात शाळा भरत असायची. गावकऱ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यालगत चार खोल्या ओढलेल्या, त्यांत एकेक वर्ग भरायचा. या गावात चव्हाण नावाचे कुटुंब आले. कुटुंब घिसाडी समाजाचे होते. मंदिराच्या बाहेर रस्त्याच्या कडेला त्यांनी पाल उभे केलेले. पालाबाहेर भाता ठेवलेला होता. भात्यावर दोरी ओढीत म्हातारा, कधी म्हातारी, तर कधी दऱ्याबा चव्हाणाची आडवे कुंकू कपाळाला लावलेली पत्नी भाता ओढीत बसायची. दऱ्याबा घिसाडी ऐरणीवर लोखंड ठोकीत बसलेला असायचा.

भात्याच्या पुढे ठेवलेल्या कोळशातून भाता हलू लागला की अंगार फुलायचे. त्यात ठेवलेले लोखंड लाल इंगळासारखे तापायचे. ते चिमट्याने धरून दऱ्याबा त्यावरती हातोडीचे ठोके घालायचा आणि लोखंडाला  हवा तो आकार द्यायचा. यात त्याचे फार मोठे कसब होते. लोखंडाच्या पट्टीचे तो खुरपे, विळा. कोळण्याच्या फासी बनवायचा. कुळवाची पट्टी बनवायचा. बैलगाडीच्या चाकाच्या धावा बनवून द्यायचा. कुऱ्हाडी, हातोडे बनवायचा.

शाळेत जायच्या वयाची चार मुले या घिसाड्याच्या पालात होती. आमची शाळा भरायची तेव्हा तर ही मुले पालाच्या बाहेर येऊन मुलांकडे पाहत बसायची. दऱ्याबा चव्हाण बयत्यावर ही हत्यारे बनवून द्यायचा. शेतकरी कुटुंबाला खुरपी, विळा, कुऱ्हाडी, शेतीची अवजारे अत्यावश्यक असायची; त्या कामाचे बयते तो उकळायचा. सहा-सात पोती धान्य जमवायचा. प्रतिवर्षी चांगले महिना-दोन महिने त्याचा तळ गावात असायचा. त्याची एक गाय, म्हैस व एक बैल आणि बैलगाडी होती. आपले पाल ठोकायचा, त्याच्या जवळपास ही जनावरे बांधायचा.

म्हातारा, म्हातारी किंवा त्याची पत्नी तर कधी स्वत: दऱ्याबा वेळ मिळेल तशी जनावरे हिंडवायला जायचे. या गावात तीन-चार महिने झाले की, तो आपला बारदाना शेजारच्या गावी हलवायचा. एका बैलाची गाडी जुंपून भाता, कोळसे व धान्य भरून पुढल्या गावी जायचा. त्याचा सर्व कुटुंबकबिलाही पुढल्या गावाला चालत जायचा. एक दिवस मुख्याध्यापकांच्या मनात काय आले, कोणास ठाऊक! त्यांनी मला सोबत घेतले आणि आम्ही त्या दऱ्याबाच्या पालासमोर गेलो. दऱ्याबा, त्याचा म्हातारा, म्हातारी, पत्नी आपले काम थांबवून आमच्याजवळ आली.

हेडगुरुजी म्हणाले, ‘‘दऱ्याबा, आम्ही आलोय ते तुझी मुले शाळेत घेण्यासाठी. तू सगळ्या मुला-मुलींची नावे आमच्या शाळेत नोंदव आणि आजपासून मुलांना शाळेत पाठव.’’ ‘‘गुरुजी, आम्ही फिरस्ती माणसं. आज हा गाव, तर उद्या तो गाव. कुठली आमच्या नशिबात शाळा? एक ना अनेक गावं आम्ही भटकणार.’’ ‘‘होय, तुझे खरे आहे, पण त्यामुळे तुझे खूप मोठे नुकसान झालेले आहे. तुला कुणाला पत्र लिहिता येत नाही, कुणाचे पत्र वाचता येत नाही. एसटीचा बोर्ड वाचता येत नाही, हिशेब लिहून ठेवता येत नाही. ज्याला लिहिता-वाचता येत नाही तो अडाणी माणूस आणि डोळे असून दिसत नाही असा आंधळा माणूस सारखेच आहेत.’’

‘‘हां... हे बाकी खरे आहे.’’ ‘‘शिक्षण न घेतल्यामुळे तुझे खूप नुकसान झाले; आता मुलांचे नुकसान तरी करू नकोस. त्यांना शाळेत घाल. तू, तुझी बायको कुठेही धंदा करीत फिरा; पण गावात एक खोली भाड्याने घेऊन म्हातारा, म्हातारी ठेवा इथे. ही गाय, म्हैस पण ठेव इथे. मुलांना त्यांच्याजवळ ठेव. तू त्यांच्याकडे येऊन-जाऊन करीत जा. स्थायिक झाल्यामुळे मुलांना शाळा शिकता येईल. कमीत कमी त्यांना लिहितावाचता, हिशोब करता तरी येईल. कुठेही असली तरी मुले तुला पत्रे पाठवतील. तुझी कागदपत्रे जपून ठेवतील, मुलांच्या आयुष्यात तरी उजेड निर्माण होईल.’’

‘‘गुरुजी, तुमचे सारे म्हणणे पटते मला. आम्ही विचार करून सांगतो.’ दऱ्याबा म्हणाला. दुसऱ्या दिवशी दऱ्याबा, त्याची बायको, म्हातारे आई-बाप सर्व जण शाळेत आले. त्यांच्याबरोबर त्यांची चार मुलेही आलेली होती. थोरली मुलगी दहा वर्षांची असावी. दुसरी आठ वर्षांची, तिसरा मुलगा सहा वर्षांचा आणि सर्वांत लहान दोन-तीन वर्षांचा मुलगा होता. हेडगुरुजींनी पहिली तीन मुले दाखल करून घेतली. ‘धाकट्याला यांच्याबरोबर बसू देत, पुढील वर्षी त्याला दाखल करू. या वर्षी त्याचे वय भरत नाही’ म्हणून सांगितले.

दऱ्याबा त्याच दिवशी बारा-चौदा मैलांवरील विटे गावी गेला. मुलांना नवी कपडे, दप्तरे, पाट्या, पुस्तके, पेन्सिली घेऊन आला. सर्व मुले वर्गात बसविण्यात आली. थोरल्या मुलीचे नाव होते शिल्पा, दुसरीचे नाव होते साधना, तिसऱ्या मुलाचे नाव होते श्रीरंग आणि धाकटा होता वसंत. शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेलेले होते. आम्ही प्रतिज्ञापत्रे भरून मुलांच्या नावांची नोंद केली.

थोरली मुलगी शिल्पा बुद्धीने चांगली होती. कदाचित वयाने मोठी असल्यामुळे तिच्या बुद्धीची ग्रहणशक्ती थोडी जास्त असावी. आणखी विशेष लक्ष देऊन शिकवल्यामुळे दीपावलीच्या सुट्टीपर्यंत मुले इतर मुलांच्या बरोबरीत आली. रेवणगावातील कामे संपताच दऱ्याबा चव्हाण व त्याची बायको भाता व पाल गाडीत भरून दुसऱ्या गावी निघून गेली. म्हातारा, म्हातारी व मुले शाळेजवळच एक रिकामे घर भाड्याने घेऊन त्यात राहू लागली. दीपवाली सुट्टीनंतर शिल्पाला वर्गाची सेक्रेटरी केली. 

फळ्यावर अंक, अक्षरे लिहून दिली की शिल्पा वाचायची आणि इतर मुलांकडून वाचून घ्यायची. अंक म्हणून घ्यायची. ती मुळातच वक्तशीर आणि अभ्यासात हुशार व तरबेज होती. तिचे हस्ताक्षर सुंदर होते. कोणतीही गोष्ट सांगितली, तर ती अंगी बाणवण्याची वृत्ती होती. त्यामुळे लवकरच ती इतर चांगल्या श्रीमंत घरांतील मुलींसारखी अंघोळ करून, केस व्यवस्थित विंचरून, गंध-पावडर करून व स्वच्छ कपडे घालून शाळेत येऊ लागली. ती आपल्या भावंडांना स्वच्छ ठेवायची आणि शाळेत अभ्यासही वेळच्या वेळी करायची.

शिल्पा व तिची भावंडे दोन-तीन वर्षे रेवणगावात राहिली. एवढ्या अवधीत जिद्दीने काबाडकष्ट करून दऱ्याबाने विटे शहरात गावाच्या लगत दोन-तीन गुंठे जागा विकत घेतली आणि तिथे लहानशी पत्र्याची शेड मारून त्याने आपला व्यवसाय तेथे सुरू केला. सर्व मुले, म्हातारा, म्हातारी त्याने विट्याला नेली. विट्याच्या शाळेत सर्व मुले घातली. मुले विट्याला गेली तेव्हा सर्व मुलांना लिहितावाचता येत होते. गणिते सोडविता येत होती. शिल्पा तर सर्व वर्गात हुशार होती.

हे कुटुंब इथेच राहिले तर शिल्पा पाचवीत जाताच तिला नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला बसवायचे, पास झाली तर दऱ्याबाला समजावून सांगून ही मुलगी नवोदय विद्यालयात पाठवून तिचे पुढील शिक्षण केंद्र सरकारकडून करून घ्यायचे, असे विचार मी व हेडगुरुजी करीत होतो. पण दऱ्याबाने कुटुंबच विट्याला हलवले.

काही वर्षांनंतर... रेवणगावाजवळच रेणावी नावाचे गाव आहे. तेथे रेवणनाथांचे प्रसिद्ध मंदिर आहे. एक दिवस मंदिरात देवदर्शनासाठी गेलो होतो. दर्शन घेऊन बाहेरच्या मंडपात बसलो होतो, तेवढ्यात एक पोरगेली तरुण मुलगी आणि तसलाच तिचा नवरा माझ्याजवळ आले. माझ्या पाया पडले. कोण आहे, हे मी भांबावून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतोय तेवढ्यात मुलगी म्हणाली, ‘‘गुरुजी, ओळखलंत का?... मी शिल्पा आहे चव्हाणाची- दऱ्याबाची मुलगी.’’ पट्‌कन माझ्या मेंदूत ओळख शिरली. ‘‘अरे वा! शिल्पा तू... एवढी मोठी झालीस?’’ ‘‘हो. माझे लग्न झाले गेल्या महिन्यात. हे आहेत माझे मिस्टर.’’ शिल्पाने ओळख करून दिली. पोरगा सावळा पण देखणा होता.

मंदिराबाहेरच्या हॉटेलात दोघांना नेऊन चहा दिला. शिल्पा म्हणाली, ‘‘सातवी पास झाले. अण्णांनी काही ऐकले नाही, माझे लग्न लावून दिले. हे त्यांचेच भाचे आहेत. माझी शिकायची इच्छा होती, पण आई- वडिलांच्या पुढे आपले काय चालते?’’ मी मुलाला विचारले, ‘‘उद्योग काय करता?’’ तो म्हणाला, ‘‘मी टू व्हीलरचा मेकॅनिक आहे.’’ मी म्हणालो, ‘‘छानच की... तुम्ही गाडीचे डॉक्टर आहात तर...!’’ मुलगा छान हसला. ‘‘गाडीच्या धंद्यात पैसे मिळतात, पण संगतीने व्यसने जडतात, त्यापासून सावध रहा!’’ मी म्हणालो. ‘‘दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू... यांना हात लावायचा नाही तरच मी लगीन करते, असं पयलं वचन घेतलंय आणि मगच लग्नाला होकार दिलाय मी. यातल्या कशाला बी हात लावला तर माझी मी माहेरी निघून येणार!’’ शिल्पा ठसक्यात बोलली. तिचा नवरा फक्त हसला.

या शिल्पाच्या भेटीला दहा वर्षे उलटून गेली... विट्यात मी ‘मुक्तांगण’ वाचनालय सुरू केले. श्रेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे व सुनीता देशपांडे यांनी या वाचनालयास एक लाख रुपयांची देणगी २६ जानेवारी १९९० रोजी दिली. आम्ही वाचनालयाच्या संचालक मंडळींनी विटे शहरातून आणखी सात लाख रुपये जमवले. आठ लाखांची वाचनालयाची भव्य देखणी इमारत उभी केली. साहित्यिक पु.ल.देशपांडे आणि मुंबईचे आमचे स्नेही कमलाकर म्हेत्रे (सी.ए.) यांच्या सूचनेवरून सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्र पिंगे आमच्या वाचनालयास भेट द्यावी, आमचे काम पाहावे; त्या निमित्ताने विट्यासभोवतीचा परिसर पहावा, म्हणून आम्हाला कळवून विट्याला आले. वाचनालयात त्यांचे व्याख्यान झाले.

परिसरातील रेवणसिद्ध, खरसुंडीसिद्ध वगैरे तीर्थालये त्यांना दाखवली. विट्यापासून जवळच देवराष्ट्रे नावाचे गाव आहे. तेथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे जन्मस्थान आहे. धों.म.मोहिते या स्वातंत्र्य-सेनानींनी उभारलेले अभयारण्य आहे. रवींद्र पिंगेसरांना ते पहायचे होते. आम्ही एक जीप भाड्याने करून देवराष्ट्रे पहायला गेलो. सागरेश्वर अभयारण्य, यशवंतराव चव्हाण यांचे  (डॉ.पतंगराव कदम यांनी बांधलेले) स्मारक पाहून आम्ही यशवंतरावांचे घर पहायला गेलो. तिथे रस्त्याच्या कडेला वडाच्या मोठ्या झाडाखाली आमची गाडी उभी केली आणि आम्ही यशवंतराव जन्मले ते घर पहायला गेलो.

पिंगेसरांनी घराला साष्टांग नमस्कार घातला. म्हणाले, ‘‘हिमालय वाचवायला सह्याद्री पर्वतासारखे धावून जाणारे, अफाट कर्तृत्व लाभलेले हे थोर पुरुष ज्या घरात जन्मले, ते घर पहायचा योग मला लाभला, हे माझे सद्‌भाग्य आहे.’ घर पाहून घराची माती कपाळाला लावून आम्ही परत गाडीजवळ आलो. तिथे चार तरुण हातात दांडकी घेऊन उभे होते. चौघांनीही ‘टाकलेली’ असावी. म्हणाले, ‘‘ओ साहेब, कुणाची गाडी आहे? या गाडीखाली आमची कोंबडी घाऊन मेलीय. तिची भरपाई द्या, नाही तर आम्ही गाडी पुढे जाऊ देणार नाही.’’ मी विचारले, ‘‘कुठाय कोंबडी?’’ त्यांनी एक मेलेली कोंबडी दाखविली. तिच्यातून लाल रक्त ठिबकत होते.

पाहुण्यांच्या समोर तमाशा नको म्हणून मी म्हटले, ‘‘किती पैसे द्यायचे बाबांनो?’’ ते म्हणाले, ‘‘शंभर रुपये द्या.’’ त्यावेळी शंभर रुपये जास्तच होते. तरीही काहीही न बोलता मी खिशातून पाकीट काढून शंभर रुपये देणार एवढ्यात कोपऱ्यातून एक जबरी आवाज आला- ‘‘अहो गुरुजी, थांबा. पैसे देऊ नका...’’ एक तरुण मुलगी जवळ आली. तिने बांगड्या मागे सारल्या आणि त्या तरुण मुलांना म्हणाली, ‘‘ए भाड्यांनो... कुणाला पैसे मागता रे...? माहीत आहेत का हे कोण आहेत ते? हे माझे गुरुजी आहेत. मेल्यांनो, ही गुंडगिरी बंद करा... कोंबडी सकाळी मोटारसायकलखाली घाऊन मेलीया... लाल शाईची दौत कोंबडीवर ओतताहेत आणि सकाळपासून येईल ती गाडी अडवून पैसे उकळताहेत. गुरुजी याला पैसे देऊ नका.

कडेगाव पोलिसांना फोन करा. अशाने परगावचा कोणी माणूस यशवंतराव साहेबांचं घर पाहायला यायचा न्हाय. पैसे काढतायत आणि दारू ढोसतायत...’’ त्या मुलीच्या या कडक शब्दांबरोबर ते चौघेही दारूडे कोंबडी घेऊन पळून गेले. मी कृतज्ञतेने त्या माझ्या विद्यार्थिनीकडे पाहिले, ती दऱ्याबा चव्हाणाची शिल्पा होती. म्हणाली, ‘‘गुरुजी, माझ्या घराजवळ आला आहात, आता माझ्या घरी चला. इथे पलीकडेच मी राहते.’’ शिल्पाच्या अचानक येण्याने, रणचंडिकेचे रूप धारण करून त्या पैसे मागणाऱ्या चार गुंडांना पळवून लावण्याने आम्ही भारावून गेलो होतो. शिल्पाच्या घरी गेलो. तिने चार खोल्यांचे घर बांधून घेतलेले होते. ती, पती, दोन मुले, दीर, जाऊ, तिची दोन मुले, सासरे, सासू एवढे लोक त्यात राहत होते.

नवरा आणि दीर जवळच्या ताकारी स्टेशनवर दुचाकी गाड्यांचे गॅरेज चालवत होते. मी म्हटले, ‘‘शिल्पा, तुझे चांगले चालले आहे ना?’’ ती म्हणाली, ‘‘गुरुजी, माझे फार चांगले चाललेले आहे, याला कारण तुम्ही आहात. तुम्ही शाळेत शिकवत होता- व्यसनांना जवळ करू नका, कष्ट करायला लाजू नका; मग पाहा- पैसाच पैसा मिळतो. त्याप्रमाणे वागते. नवरा, दीर, सासरा यांना दारूला शिवूही देत नाही. सासूसासऱ् यांना आई-वडील मानले आणि जावेला धाकटी बहीण. त्यामुळे संसार गुण्यागोविंदाने चालला आहे.’’ आम्ही सर्वांनी तिच्या घरी चहा घेतला आणि विटा गाव जवळ केले. कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी सावळ्या रंगाची, मोठ्या डोळ्यांची शिल्पा आमच्या मनात घर करून राहिली होती.

Tags: रघुराज मेटकरी शिल्पा दऱ्याबा चव्हाण माझे विद्यार्थी sangali. vita raghuraj metkari shilpa daryaba chavhan 4 maze vidyarthi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके