डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अत्यंत प्रामाणिक मुलगा होता. तो अभ्यासातदेखील हुशार होता. घरची गरिबी होती, पण हा रोजचा अभ्यास न चुकता करायचा. त्याला इयत्ता पाचवीत ए बी सी डी शिकवली. दुसऱ्या दिवशी बरीच मुले चुकली, पण गणू अजिबात चुकला नाही. सारी अक्षरे त्याने अचूक लिहून दाखवली.

माझी बदली सुळकाई डोंगराच्या कुशीत वसलेल्या वासंबे या गावी झालेली होती. एस.टी.ची बरीच गैरसोय असलेले हे गाव माझ्या घरापासून अवघ्या सात मैल अंतरावर होते. डोंगराला वळसा घालून या गावी जावे लागायचे. एका बाजूला सुळकाईचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला भांबर्डेचा विशाल तलाव, यांच्या मधून वासंबेला जायला रस्ता होता. तलावाच्या गारव्यामुळे निसर्ग सदैव फुललेला असायचा. नाना तऱ्हेचे पक्षी रोज दृष्टीस पडायचे.

सैबेरियातून आलेली बदके, चक्रवाक पक्षी, क्रौंच पक्षी प्रवास करता-करता या तलावात उतरायचे. तलावावरच्या रस्त्यावरून जाताना दाट जंगलातून आपण जात आहोत, असे वाटायचे. रस्त्याच्या कडेला एवढी घनदाट झाडी असायची. त्यात मेंदीची झाडे (हीना) व टाकळीची झाडे ठिकठिकाणी होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये मेंदीच्या झाडांना फुलांचा बहर यायचा आणि सारा रस्ता हीना अत्तराच्या सुगंधाने भरून जायचा, तर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये टाकळीच्या झाडाला चांदणे फुलल्यासारखी पांढरी नाजुक फुले लागायची आणि अक्षरशःदोन मैलांचा परिसर सुगंधाने भरलेला असायचा.

मी या गावी शिक्षक म्हणून नऊ वर्षे नोकरी केली. ज्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे अनेक विद्यार्थी मला इथे भेटले, त्यांतील एक विद्यार्थी होता गणू गुजले. गुजल्यांच्या वस्त्या डोंगरात होत्या. तेथून गणू यायचा. त्याच्या पांढऱ्या शर्टावर, खाकी विजारीवर आणि पांढऱ्या टोपीवर अनेक डाग पडलेले असायचे. एकदा विचारले, ‘‘गणू, कसले डाग पडलेत  कापडावर? या डागांमुळे पांढरा शर्ट नक्षीदार झालाय!’’

गणू म्हणाला, ‘‘गुरुजी, काल सुट्टी होती. घरातल्या शेळ्या हिंडवायला डोंगरात गेलो होतो. तिथे हुंबराला लई दोड्या लागल्या होत्या. (औदुंबर वृक्षाची कच्ची फळे) शेरडांना लई दोड्या पाडल्या. शेरडं गपागप दोड्या खात्याती. जाताना दोड्या घरी न्हेऊन शेरडांना घालाव्यात म्हटलं तर जवळ पिसवी, टावेल, धडपा काहीच न्हाय. मग शर्ट काढला, त्यात दोड्याचे गठुळे बांधले आणि डोक्यावरून घरी न्हेले. हुंबराचा चीक साऱ्या शर्टला लागला आणि त्याचे डाग पडलेत.

गुरुजी, कवळ्या कवळ्या दोड्याचे आईने कालवण केले. एवढे झकास लागत होते! तुम्हाला कालवणासाठी दोड्या आणू का?’’ असा हा भाबडा, पण अत्यंत प्रामाणिक मुलगा होता. तो अभ्यासातदेखील हुशार होता. घरची गरिबी होती, पण हा रोजचा अभ्यास न चुकता करायचा. त्याला इयत्ता पाचवीत ए बी सी डी शिकवली. दुसऱ्या दिवशी बरीच मुले चुकली, पण गणू अजिबात चुकला नाही. सारी अक्षरे त्याने अचूक लिहून दाखवली. मी म्हटले, ‘‘गणू, तुला कशी काय सारी मुळाक्षरे लिहायला जमली रे?’’ ‘‘काल घरी गेल्यावर कंदिलाच्या उजेडात पाटीवर शंभर वेळा सारी अक्षरे लिहिली आणि पुसली. बघितली तर सव्वीस अक्षरे. शंभर वेळा सव्वीस अक्षरे लिहिली तर येणार न्हाईत का? आपसूक आली.’’ गणूने उत्तर दिले.

खरे तर गणूचे कुटुंब वासंबे गावचे नव्हते. ते होते शेजारच्या गावचे, रेणावीचे. पण वासंबे हद्दीजवळ डोंगरात त्यांची शेती होती. गणूला रेणावीची शाळा घरापासून जेवढी दूर होती तेवढीच वासंबेची शाळा दूर होती. गणूने पहिलीत रेणावी शाळेत नाव घातले होते. तो काही दिवस तेथील शाळेतही जात होता; परंतु त्याने तिथे शिक्षकांची भीती घेतली की विद्यार्थ्यांनी त्याला काय केले कोण जाणे, पण तो एकटाच वासंबे शाळेत येऊन बसू लागला आणि याच शाळेत रमला.

आम्ही त्याचा दाखला रेणावी शाळेतून मागवून घेतला. गावचे पालक आणि शिक्षक गणूवर नेहमी वैतागलेले असायचे, कारण मुला-मुलांची भांडणे लागली तर मुलांना गणू खूप मारायचा. पालकांच्या तक्रारी सतत यायच्या.  त्यामुळे शिक्षक वैतागायचे. पण मला माहीत होते, तो मुद्दाम कुणाच्या वाटेला जायचा नाही; पण कोणी त्याची खोड काढली, तर त्याला सोडायचा नाही. त्याच्या या स्वभावामुळे गणूच्या तक्रारीत सहभागी होऊन मला पालकांची समजूत प्रत्येक वेळी काढावी लागायची. प्रत्येक वेळी मूळ चूक गणूची नसायचीच.

त्याने त्याच्यासारखेच आणखी काही धीट, टवाळखोर मित्र जमवले होते. दररोज मधल्या सुट्टीत हे पाच-सहा जण दुपारचे जेवण भरभर करायचे आणि शाळेच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्यात उतरायचे, ते शाळा भरायची घंटा झाल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी शाळेत यायचे. हेडगुरुजी त्यांना छडीचा प्रसाद रोज द्यायचे, पण त्यांचा दिनक्रम चुकायचा नाही. एक दिवस मी ठरवले- हे ओढ्यातून कुठे जातात, हे प्रत्यक्ष जाऊन पाहायचे. ओढ्यात कुठल्या दिशेला ते गेलेले आहेत, यावर मी लक्ष ठेवले.

आमचा जेवणाचा डबा संपवला आणि एका शिक्षकाला सोबत घेऊन मी गणूची गँग गेली त्या दिशेने चालत गेलो. दोन-तीन फर्लांग चालत गेलो तर एका ठिकाणी हे मित्र बसलेले आढळले. त्यांनी काटक्या जमवून जाळ केलेला दिसला. जवळ जाऊन पाहिले तर, या पाच जणांनी तीन व्हले (कबुतराच्या जातीचे पक्षी) मारलेले होते. कोंबडी सोलल्यासारखे सोलले होते आणि जाळात ते भाजत होते. मी काहीही न बोलता परत आलो. थोड्या वेळाने ते सर्व जण शाळेत परतले.

मी त्यांना बोलावले आणि म्हणालो, ‘‘इथे जगण्याचा अधिकार  सर्वांना आहे. तुम्हाला, आम्हाला आहे तसाच तो रानातल्या पशुपक्ष्यांनाही आहे. पक्ष्यांना आपण मारले तर, सृष्टीतील पाखरे कमी होत चालली आहेत ती आणखी कमी होतील... ज्या पाखरांना मारलेत, त्यांनी तुमचे काय नुकसान केले होते? आपल्या मनातील ही राक्षसी वृत्ती नष्ट व्हावी, म्हणून तर आपण शाळेत शिक्षण घेतो.’’ ते चौघेही काही बोलले नाहीत, पण दुसऱ्या दिवसापासून ते मधल्या सुट्टीत जेवण झाल्यावर शाळेच्या आवारातच कबड्डी खेळत राहिले.

त्यानंतर अवघ्या चार-पाच दिवसांनी गायकवाड नावाचे एक शेतकरी शाळेत आले. त्यांनी ऊस खाऊन टाकलेल्या दोन पोती वाळलेल्या चुईट्या सोबत आणलेल्या होत्या. ते म्हणाले, ‘‘गुरुजी, बघा ... तुमच्या शाळेतील काही मुले मधल्या सुट्टीत उसात शिरतात आणि एका आंब्याच्या झाडाच्य बुडक्यात बसून उस खातात. त्यांनी खाऊन टाकलेल्या उसाच्या चुईट्या मी आणलेल्या आहेत. अशा साऱ्या चुईट्या सर्व रानात पडल्यात. त्या पोरांनी माझ्या उसाचे फार नुकसान केलेय.’’

आम्हा शिक्षकांना ठाऊक होते, हे काम कुणाचे आहे. आम्ही आलेल्या गायकवाड या शेतकऱ्याला शब्द दिला, ‘‘इथून पुढे तुमच्या उसाचे अगर शेतात पिकलेल्या कोणत्याच भाजीपाल्याचे नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.’’ आम्ही हा शब्द खात्रीशीर दिला, कारण गुजले आणि त्याच्या मित्रांनी दुपारच्या सुट्टीत रानात जायचे बंद केलेले होते. एक दिवस आमची शाळा तपासण्यासाठी जिल्ह्याच्या उपशिक्षणाधिकारी सौ.शेट्टी मॅडम आल्या. शाळा तपासली. त्या वेळी माझ्याकडे सहावीचा वर्ग होता. मुले हुशार आणि अभ्यासू होती. मॅडमनी अनेक प्रश्न विचारले, मुलांनी उत्तरे दिली. उत्तरे देण्यात गुजले पुढे होताच.

मॅडमनी वर्गातील मुलांचे खूप कौतुक केले. जाताना त्या म्हणाल्या, ‘‘या परिसरात येताना मला सीताफळाची खूप झाडे दिसली. सीताफळे इथे भरपूर पिकत असतील?’’ मी म्हणालो, ‘‘हो मॅडम ... या परिसरात सीताफळाची खूप झाडे आहेत. इथे सीताफळाच्या झाडांना फार सिताफळे लागतात.’’ मॅडम म्हणाल्या, ‘‘हो... का...? मग एकदा सीताफळाच्या सीझनमध्ये तुमच्या शाळेला भेट दिली पाहिजे. मला सीताफळे खूप आवडतात.’’ मॅडम वर्गातून गेल्या. त्यांनी शाळेबद्दलचा अत्यंत चांगला शेरा शेरेबुकात लिहिला.

मॅडम म्हणाल्या त्यात तथ्य होते. वासंबे गाव आणि परिसरातील डोंगरात सीताफळाची खूप झाडे आहेत. त्याचे कारण म्हणजे सीताफळाचे बी पडेल तिथे उगवते. त्याच्या उग्र वासामुळे कोणतेही जनावर त्याच्या पानांना तोंड लावत नाही आणि त्यामुळे ती झाडे जिथे उगवतात तिथे आपल्या कलाने वाढत राहतात अन्‌ त्यांना भरपूर सिताफळे लागतात.

शेट्टी मॅडमचे बोलणे मी विसरून गेलो होतो. पण एक दिवस गुजले शाळेत लवकर आला. आपल्या मित्रांना सोबत घेऊन ओढ्यात उतरला आणि शंभर-दोनशे सीताफळे तोडून शाळेत घेऊन आला. मोठी मोठी, पिकण्यास योग्य अशी ती कच्ची सीताफळे होती. मला भेटून त्याने सांगितले, ‘‘गुरुजी, आपली शाळा तपासायला शेट्टी मॅडम आल्या होत्या ना, त्यांना देण्यासाठी ही सीताफळे आणलीत. तुम्ही तेवढी त्यांना पोहोच करा.’’

मला समजेना, तो काय सांगतोय ते! मी म्हणालो, ‘‘शेट्टीमॅडमचा तसा निरोप आला आहे का... कुणाजवळ?’’ ‘‘अहो, त्या आपल्या शाळेत आल्या होत्या तेव्हा म्हणाल्या होत्या की, मला सीताफळे फार आवडतात. म्हणून मी त्यांच्यासाठी सीताफळे आणलीत.’’ गणू गुजलेने आणलेली ती सीताफळे मी सांगलीत मॅडमना पोहोचवली व त्यांनी वर्गात बोललेले वाक्य ध्यानात ठेवून गुजलेने ही भेट आणल्याचे सांगितले.

मॅडम म्हणाल्या, ‘‘तुमच्या गणू गुजलेला मला भेटलेच पाहिजे.’’ त्या वेळी आतासारखी पुस्तके शासनाकडून मिळत नव्हती, विद्यार्थ्यांनाच पुस्तके विकत घ्यायला लागायची. गणू सहावीत असताना त्याच्याकडे भूगोलाचे पुस्तक नव्हते. समाजशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांनी ‘पुस्तक नाही म्हणून’ गणूला जरा दरडावून भूगोल आणायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी दुपारी गणूची म्हातारी आजी जरमलची दोन-तीन भगुली (छोटी भांडी) घेऊन शाळेत आली आणि समाजशास्त्राच्या शिक्षकांना भेटून म्हणाली, ‘‘गुरुजी, यांतलं कोणतं भगुलं तुम्हाला पाहिजे? गणू  सकाळी भगुलं पाहिजे म्हणून रडकुंडीला आला होता. मी म्हटलं, दुपारी मी भगुलं घेऊन शाळेत येते, तवा तो शाळेत आलाय. म्हणून मी भगुली घेऊन आलीय.’’ म्हातारीच्या हातातील भगुली पाहून आम्हां शिक्षकांना हसू फुटले, पण तिच्यापुढे हसताही येईना. मी शाळेतील जुने पुस्तक शोधून गणूला दिले. पण हा भगुल्यांचा किस्सा सर्व शिक्षकांच्या आठवणीत कायमचा राहिला.

एकदा मी एका मासिकात छापून आलेली रानकेळींची माहिती मुलांना सांगत होतो- कमरेएवढ्या उंचीच्या रानकेळी जंगलात उगवतात. त्यांना छोटी-छोटी केळी लागतात, ती खायला खूप गोड असतात. गणू म्हणाला, ‘‘गुरुजी, इथे रेवणसिद्धच्या फुलबागेतून जे पाणी खाली दरीत वाहत येतं तिथे अशा केळींची झाडे ढीगभर उगवतात. आतासुद्धा उगवलीत.’’ मी अविश्वासाने म्हणालो, ‘‘गणू, खरे सांगतोस? अशी केळी खरंच आपल्या डोंगरात उगवतात?’’ मी त्याला मासिकात छापून आलेला रानकेळींचा फोटो दाखवला.

तो म्हणाला, ‘‘हो गुरुजी. डिक्टो अशाच केळी उगवतात. आम्ही रोजच त्याची केळी खातोय.’’ एक दिवस शनिवारी सकाळी शाळा भरून दुपारी सुट्टी झाल्यावर मी, काही उत्सुक मुले आणि गणू त्या दरीत उतरलो. गणू आम्हाला केळी जिथे उगवतात त्या ठिकाणी घेऊन गेला. तेथे सततच्या वाहत्या पाण्यामुळे भरपूर गवत वाढलेले होते. वासंबे आणि रेणावी गावच्या गुरांनी वाढलेल्या गवताचे शेंडे खाल्लेले होते तरीही गवतात फूट-दीड फूट पाय बुडत होते. शंभराच्यावर लहान लहान दोन फूट, तीन फूट उंचीच्या रानकेळींची झाडेच झाडे उगवली होती.

गुरांनी, माकडांनी केळी मोडलेल्या होत्या. काही केळींना कोके (फुले) आली होती. काही केळींना केळ्यांचे लहान-लहान घड लागलेले होते. गणूचे वडील तेथे म्हशी, गाई, बैल आणि शेळ्या घेऊन हिंडवायला आलेले होते. आम्हाला पाहून जवळ आले. मी रानकेळी पाहायला आलो आहे, असे सांगताच त्यांना हसूच आले. ते म्हणाले, ‘‘इथे पहिल्यापासून केळीची झाडे आपोआप उगवतात. पहिली बनंच्या बनं होती, आता ती कमी कमी व्हायला लागलीत. श्रावण-भाद्रपद महिन्यात रेणावी गावातील, वासुंबे गावातील आणि आजूबाजूच्या खेड्यांतील लोक सत्यनारायणाच्या पूजेसाठी इथल्या केळींचे खुंट कापून नेतात. पहिली पाच-पंचवीस माणसं पूजा घालायची, आता शेकड्यांनी खुंट कापले जातात. त्यामुळे या रानकेळी हळूहळू संपत चालल्या आहेत.’’

छोट्या-छोट्या हिरव्यागार रानकेळी त्या दरीत डुलत होत्या. वाऱ्यावर त्यांची पाने हलत होती. गुजलेचे वडील म्हणाले, ‘‘गुरुजी, गवतातून जपून पाय टाका. गारव्यामुळे सापही गवतात थांबलेले असतात.’’ मी माझ्याबरोबर आलेल्या सर्व मुलांना जागीच थांबवले. काही अंतरावरूनच केळी पाहिल्या आणि परत फिरलो. दरीच्या वरच गणूचे घर होते. गणूने घरी यायचा आग्रह धरला. गणूच्या घरी गेलो.

साधे दगड-मातीचे, वर बेंगलोरी कौले असलेले गणूचे घर छोटे पण टुमदार होते. सभोवती लिंब, नीलगिरीची उंच झाडे वाढलेली होती. अंगण आणि घर शेणाने सारवलेले होते. बाहेर एका पत्र्याच्या डब्यात तुळस लावलेली होती, ती भरभरून वाढलेली होती. बाहेर बाजले टाकलेले होते. मी त्यावर बसलो. गणूच्या आईने भुईमुगाच्या शेंगा आणल्या. मी व मुलांनी त्यांवर ताव मारला. तोवर गणूच्या आईने पिकून सोन्यासारख्या पिवळ्याधमक झालेल्या रानकेळींचे एक दुरडी भरून घड बाहेर आणले.

अगदी छोटी-छोटी रानकेळी फण्यांना लागलेली होती. मी सर्व मुलांना केळी वाटली. पिकलेली रानकेळी साखरेपेक्षाही गोड लागत होती. गणूची आजी म्हणाली, ‘‘पहिली किती केळीचं घड लागायचं. आम्ही केळी खाऊनच लहानाचं मोठं झालोय, पण आता लोकच लई वाढल्याती... कोण आता केळीचे घड तिथे ठेवीतच न्हाईत.’’ त्या डोंगरात उमललेल्या फुलासारखे दिसणारे गणू गुजलेचे ते घर आणि त्यातील पाहुणचार मनात साठवीत आम्ही निरोप घेतला.

गणू सातवी पास झाला. पुढेही शाळा शिकला. तो बी.ए. झाला आणि नंतर मिलिटरीमध्ये भरती झाला. माझी वासंबेहून दुसरीकडे बदली झाली. एक दिवस गणू मला भेटायला माझ्या घरी आला. त्या वेळी त्याने अंगावर मिलिटरीचा ड्रेस घातलेला होता. तो आता मेजर झालेला होता आणि जम्मूमधला सुकामेवा मला भेट देण्यासाठी घेऊन आला होता.

Tags: वासंबे रानकेळी रघुराज मेटकरी गणू गुजले माझे विद्यार्थी : ३ vasambe rankeli raghuraj metkari ganu gujale maze vidyarthi :3 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात