डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शुटिंग रेंजला जाऊन सराव करायचा यातच माझा आनंद होता!

या वर्षीच्या ऑलिम्पिकची भारतात जोरदार चर्चा झाली. वेगवेगळ्या खेळांत मिळवलेल्या मेडल्समुळे भारताला नवीन हिरो मिळाले. पण, याच क्रीडाक्षेत्रात गेली 10-12 वर्षे महाराष्ट्राचे नाव गाजवणारी व्यक्ती म्हणजे राही सरनोबत. 25 मीटर पिस्तूल या नेमबाजी प्रकारात भारताला 3 सुवर्णपदके व इतर अनेक पदके मिळवून देणारी राही 2012 च्या व या वर्षीच्या ऑलम्पिक चमूमध्येसुद्धा होती. या सुवर्णकन्येचा प्रवास, जय-पराजयाकडे बघायची दृष्टी आणि एकूणातच क्रीडाक्षेत्राबद्दलचे मत जाणून घेण्यासाठी घेतलेली ही मुलाखत.

प्रश्न - या खेळाकडे कसे वळलात आणि हा प्रवास कुठून चालू झाला?

- आठवी-नववीमध्ये मी NCC मध्ये होते. तेव्हाच खरं तर माझी बंदुकीशी पहिली ओळख झाली. एनसीसीमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीचं आर्मी शूटिंग असतं, तेव्हा मी पहिल्यांदा शूटिंग केलं आणि आठवी-नववीपर्यंत मी अगदीच सर्वसामान्य विद्यार्थी होते, परंतु एनसीसीमध्ये नेमबाजी करायला सुरुवात केली, ते मला आवडायला लागलं आणि तेव्हा चांगली नेमबाज म्हणून कौतुकपण होत होतं. पण नववीमध्ये आल्यानंतर प्रश्न पडला की, आता काय? जे मला जमतंय, येतंय, आवडतंय ते मी पुन्हा कसं continue करायचं, कारण नववीमध्येच एनसीसी संपतं, त्यानंतर दहावी असते. आणि नेमकं त्याच वेळेला तेजस्विनी सावंत हे नाव चर्चेत असायचं, तर मला हे वाटायचं की, हेच ते आहे जे मला करायचं आहे. त्यामुळे ती कुठं शूटिंग करते, आपल्याला तिथे काही करता येईल का याचा मी शोध घेतला. तेव्हा दुधाळी रेंजची माहिती मिळाली तिथं मी सरावासाठी जाऊ लागले. रेंजवर गेल्यावर मला असं कळलं की, त्या नेमबाजी (एनसीसीमधल्या) आणि या नेमबाजीमध्ये मोठा फरक आहे. रेंजवर मला दोन पर्याय दिसले : रायफल आणि पिस्तूल. या खेळासाठी प्राथमिक टप्प्यावर आर्थिक दृष्ट्या फार गुंतवणूक करणं मला शक्य नव्हतं. पिस्तूलमध्ये मला काहीच गुंतवणूक करावी लागणार नव्हती, कारण पिस्तुलसाठी महानगरपालिकेची एक योजना होती त्यातूनच ती मिळणार होती. याउलट रायफलसाठी किट वगैरे बेसिक गोष्टी स्वतः घेऊनच सुरुवात करायला लागायची. जे खर्चीक असायचं. त्या दृष्टीने मी पिस्तूल हा इव्हेंट निवडला.

त्यानंतर मी सराव करायला लागले. अजित पाटील म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशिक्षक होते. पहिले सहा महिने त्यांनी मला एकही गोळी चालवायला दिली नाही, कारण ते बेस तयार करत होते. त्यांना माझी एक गोष्ट आवडलेली, जी त्यांनी मला नाही सांगितली. परंतु माझ्या वडिलांना सांगितली होती की, मी या सहा महिन्यांत त्यांना एकदाही विचारलं नाही की, ‘तुम्ही मला गोळ्या कधी चालवायला देणार आहात.’ ते असं मला म्हणाले होते की, ‘पहिल्यांदाच आम्हाला या वयातली खेळाडू भेटली आहे, जिला आतुरता वाटत नाही, जी Impatient होत नाही. जे सांगितलं जातं ते खूप शांतपणे करते.’ त्यामुळे असं झालं की, पहिलीच मॅच मी खेळले ते अगदी कुठलाही गोळ्यांचा सराव नसताना. कारण त्यांनी मला थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवलं होतं. तर तिथं मला सिल्व्हर मेडल मिळालं. त्यानंतर त्यांना असं वाटलं की, माझ्यामध्ये काहीतरी चांगलं आहे. त्यांनी वडिलांना बोलावून सांगितलं की, हिच्यामध्ये स्पेशल qualites आहेत, त्या नेमबाजीसाठी चांगल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तिच्यात इन्व्हेस्ट करू शकता. मग माझ्या वडिलांनी मला नवीन पिस्तूल विकत घेऊन दिलं. मग मी नॅशनल आणि स्टेट लेव्हल स्पर्धा खेळायला सुरू केल्या.

यादरम्यान 2008 मध्ये पुण्यात युथ कॉमन वेल्थ स्पर्धा होत्या तेव्हा महाराष्ट्र शासनाने एक योजना आखली की, यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातील खेळाडू सहभागी झाले पाहिजेत. कारण ही स्पर्धा महाराष्ट्रात पुण्यात होणार होती. मग त्या अंतर्गत त्यांनी शोध मोहीम सुरू केली. तेव्हा मी मुंबईला एका स्पर्धेसाठी गेले होते, आणि तिथं मला मेडल मिळालं होतं. पाटील सरांनी माझी ओळख महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या शैला कनून्गो यांच्याशी करून दिली. त्यांनी विचारलं की तू 25 मीटर मध्ये सहभागी होशील का? आपल्याकडे 25 मीटरमध्ये कोणीही नाही आहे. त्याआधी मी फक्त 10 मीटरमध्येच खेळत होते. मग तेव्हा मला 25 मीटर या प्रकाराची ओळख झाली. मी म्हणाले, ‘चालेल. तुम्ही म्हणत असाल तर करेन.’ त्यावर त्या म्हणाल्या. ‘पण तुला मुंबईला येऊन सराव करावा लागेल. कारण इतर कुठे महाराष्ट्रात रेंज उपलब्ध नाही.’ त्यांनी मला मुंबईला प्रशिक्षण सुरू केलं. तेव्हा त्यांची फी एका दिवसाची हजार रुपये असायची. पण त्यांनी दोन वर्षे मोफत शिकवलं होतं, कारण त्यांना मी आवडले होते. त्या सांगायच्या ते मी प्रामाणिकपणे तिथं सगळं करायचे. आणि युथ कॉमन वेल्थला माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर एका वर्षातच सिनियर टीममध्ये गेले. त्यानंतर त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की, ‘राही, माझ्याकडे जे ज्ञान होतं ते संपलेलं आहे. आता तुझा पुढचा प्रवास सुरू कर.’ तुला जे कोणी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निवडायचे असतील, त्यांची निवड कर. ही जी माणसं आहेत त्यांनी मला खूप कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत केली. आर्थिक अपेक्षा तर ठेवलीच नाही, अजूनसुद्धा आमचे संबंध तेवढेच जिव्हाळ्याचे आहेत. मला कोणतीही इतर गोष्ट किंवा अडचणी असतील, तर त्या सगळ्यांमध्ये आजही त्यांची तेवढीच मदत होत आहे. त्यामुळे या माणसांमुळे या इव्हेंटमध्ये तग धरू शकले असं मी म्हणेन.

नंतर पुढच्या बऱ्याच गोष्टी आपोआप घडत गेल्या. जेव्हा मी लंडन ऑलिम्पिकला पात्र ठरले तेव्हा मला कोणीही प्रशिक्षक नव्हतं. तसा पहिला ऑलिम्पिकचा प्रवास बऱ्यापैकी स्वतःचाच होता. स्वतः शिकण्याचा होता. सिनियरसोबत होणाऱ्या चर्चेतून शिकण्याचाच होता. माझा बराचसा काळ म्हणजे 2010 नंतरचा काळ हा स्व-प्रशिक्षणामध्ये गेला.

प्रश्न - पण जे हे विषय आहेत की, प्रशिक्षक सांगत आहेत ते करत राहणं, फार ambition  न ठेवणं. किंवा एक प्रकारची तटस्थता ठेवणं ही समज एवढ्या लहान वयात कुठून आली असं वाटतं?

- मला असं वाटतं की, यामध्ये माझ्या घरच्यांचासुद्धा सहभाग आहे. त्यांनी मला कधीच हा प्रश्न विचारला नाही की, तू आता हे कधीपर्यंत करणार, याच्यातून तुला काय मिळणार? दुसरं असं की, मला नेमबाजी करणं, सराव करणं एवढं आवडत होतं की, मला असं कधी वाटलंच नाही, याच्यापेक्षा आणखी काही जास्त काही मला मिळालं पाहिजे. माझा आनंद यातच होता की, शूटिंग रेंजला जायचं आणि सराव करायचा. त्याच्यातून आपल्याला मेडल मिळणार, पैसे मिळणार, नोकरी मिळणार हे खरं तर यातील काहीही मिळेपर्यंत मला माहीत नव्हतं. जेव्हा 2010 मध्ये युथ कॉमन वेल्थचं मेडल मिळालं आणि पाहिल्यांदा कॅश ॲवॉर्ड मिळालं तेव्हा मला actually समजलं की, याच्यातून पैसेपण मिळतात. 18 वर्षांची असताना, 2010 मध्ये पहिल्यांदा मला 10 लाख रुपये मिळाले. तरीपण असं मला वाटलं नाही की, यातून पैसेच मिळतात तर आपण आता पैसेच मिळवू असं. यात मला माझ्या घरच्या वातावरणाचे खूप महत्त्व वाटते की, दहा लाख मिळाले म्हणून माझ्या आयुष्यात कोणताही फरक पडला नाही. ते दहा लाख माझ्या घरच्यांनी कुठं तरी गुंतवले. पण माझ्या पॉकेट मनीमधले पाच रुपयेदेखील वाढले नाहीत. ते पैसे माझ्या हातात directly न आल्यामुळे कदाचित असेल. पण त्या वयात हे सगळं ज्ञान उपजत असणं अवघड असतं, कारण त्या वयात आपल्याला पैसे पाहिजे असतात. खरेदी करायची असते, किंवा चांगले कपडे घ्यायचे असतात. अर्थात ते फार नैसर्गिक असतं. पण माझ्या हातात पैसे मिळाले नसल्यामुळे directly मला त्याचा फायदा झाला नव्हता.

प्रश्न - एकूण दहा-बारा वर्षांचं जे तुझं करिअर आहे त्यात तुझा सगळ्यांत हाय पॉइंट कुठला, सगळ्यांत लो पॉइंट कुठला?

 - सगळ्यांत हाय पॉइंट मला एशियन गेम्स वाटतो. एशियन गेम्स ही काही सर्वांत टफ स्पर्धा नाही. पण त्या पदकाला किंवा त्या सामन्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे दुखापतीनंतरचा माझा तो पहिला सामना होता, कमबॅक म्हणता येईल असा आत्मविश्वास देणारा सामना म्हणजे 2018 चा एशियन गेम्स. कारण 2016 मध्ये मी दुखापतीमुळे पूर्णपणे घरी होते, बंदुकीला हातसुद्धा लावला नव्हता. त्या दरम्यान असे बरेच लोक मला भेटले आणि म्हणाले की, आम्हांला असं वाटलं की, तू तर नेमबाजी सोडली आहेस. आता तू परत काही करू शकणार नाही. तेव्हा सतत असं वाटायचं की, नाही- ‘मी संपले’ असं मला नाही वाटत, माझ्या आतलं जे आहे ते संपलय असं मला वाटत नाही. त्यामुळे मला स्वतःला push  करावं लागत होतं. धरून ठेवावं लागलं, तग धरावा लागला मला त्या मेडलपर्यंत. जे सगळे लोक म्हणत आहेत त्याचा कोणताही परिणाम न होऊ देता, मला जे करायचंय त्यासाठी सातत्याने सराव करत राहणं गरजेचं होतं. दुसरं असं की, नवीन प्रशिक्षक होत्या, आमचीपण तशी पहिलीच स्पर्धा होती. अशा बऱ्याच दृष्टीने माझ्यासाठी ती स्पर्धा महत्त्वाची होती. एशियन गेम्सच्या आधी बऱ्याच स्पॉन्सरशिपसुद्धा मी शोधत होते. मागच्या दोन-तीन वर्षांत कोणताही परफॉर्मन्स नव्हता. त्यामुळे माझ्या बाजूने असं काहीच नव्हतं. पण त्या एका मॅचने बऱ्याच गोष्टी बदलल्या. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला. मला स्वतःलादेखील जे वाटत होतं की, बरंच काही शिल्लक आहे. आणि खूप पुढं जायचंय, माझा बराचसा प्रवास अजूनही शिल्लक आहे. अशा बऱ्याच अर्थाने ती मॅच महत्त्वाची होती. भलेही scorewise बेस्ट म्हणता येणार नाही, पण या सगळ्या दृष्टीने मी म्हणेन की बुडत्याला काठीचा आधार असतो असे जे म्हणतात ती काठी मला या सामन्याने दिली. लो पॉइंट म्हणशील तर तो हाच की दुखापतीमुळे मी घरी होते. मी टीममध्ये नव्हते. मला ई-मेल करून सांगावं लागलं की, मी खेळू शकत नाही. याहून एखाद्याच्या आयुष्यात दुसरा काय लो पॉइंट असू शकेल?

प्रश्न - तुम्ही दोनदा ऑलिम्पिक चमूत सहभागी झाला होता, एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात ऑलिम्पिकला नक्की काय स्थान असते?

- कोणत्याही खेळाडूसाठी ऑलिम्पिक ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. आणि कोणासाठीच तो प्रवास एवढा लहान नसतो, त्याला आपण चार महिने, चार वर्षे अशा एवढ्या मर्यादित कालावधीच्या चौकटीत पाहू शकत नाही. कारण दिसताना फक्त हे ऑलिम्पिक दिसत असलं तरी एखाद्या खेळाडूसाठी ऑलिम्पिकला जाणं, तिथं परफॉर्म करणं, सहभागी होणं किंवा पदकाचं स्वप्नं बघणं, हा प्रवास खेळ खेळायला सुरवात केल्याच्या दिवसापासून चालू झालेला असतो. माझ्या बाबतीत तर हा प्रवास गेल्या दहा-पंधरा वर्षांचा आहे. कारण व्यावसायिक दृष्टीने नेमबाजी सुरू केल्यापासून, निव्वळ आणि निव्वळ या एका दिवसासाठी किंवा या एका स्पर्धेसाठी आम्ही सर्वार्थाने प्रयत्न करत असतो, तयारी करत असतो.

अगदी या 2021 च्या ऑलिम्पिकबाबतीत बोलायचं झाल्यास, गेली तीन वर्षं त्या एका दिवसाव्यतिरिक्त मी कशाचाही विचार केला नव्हता. संपूर्णतः प्रत्येक दिवस, प्रत्येक तास सातत्याने त्या दिवसाचीच आठवण असायची, ज्यासाठी मी तयारी करत होते. त्यामुळे मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या म्हणजे सर्वार्थाने स्वतःला एका तासासाठी, एका दिवसासाठी तयार करत होते. आणि तरीदेखील म्हणावं तसं यश न मिळाल्यानंतर एखादा खेळाडू प्रचंड ड्रेन आउट होतो. ही भावना फक्त खेळाडू स्वत:च समजू शकतो, आम्ही ते कितीही सविस्तर सांगायचा प्रयत्न केला, तरी ते इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही.

प्रश्न - तुम्ही म्हणालात तसे या एका क्षणासाठी तुम्ही आयुष्य देत असता, मग असे असताना या वेळी अचानक कोरोनाचे संकट आले, ऑलिम्पिक स्पर्धा पुढे गेली, ती होईल का नाही याबद्दलही शंका होती, अशा वेळी आपण आपल्या मनात जे आडाखे बांधलेले असतात ते सगळे एका क्षणात उद्‌ध्वस्त होतात, या परिस्थितीला कसे सामोरे गेलात?

- ऑलिम्पिक पोस्टपोन झालं हे अधिकृतरीत्या समजायच्या क्षणापर्यंत आम्ही कोणीही उमेद सोडलेली नव्हती. तोपर्यंत आम्ही त्या दिवसाची तयारी करत होतो. मात्र आमचा सराव काही दिवस आधीच थांबला होता. दिल्लीमध्ये कॅम्प चालू असताना अचानकपणे तो कॅम्प थांबवून घरी जावं असं आम्हांला सांगितलं गेलं आणि त्यानंतर अगदी चार-पाच दिवसांतच देशभरात सगळ्यांत पहिला मोठा लॉकडाउन सुरू झाला, त्यामुळे आम्ही आधीच घरी होतो आणि मग मला आठवतं कीपंधरा ते वीस दिवसांनंतर ऑलिम्पिक पुढे गेल्याची बातमी आम्हांला समजली. अर्थातच एक वर्ष पुढे गेल्यानंतर खेळाडूंच्या आयुष्यात, (विशेषतः जे ऑलिम्पिकला सिलेक्ट झालेले आहेत) खूपच फरक पडतो. कारण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी ‘पिरियडायजेशन’ या गोष्टीला खूप मोठं महत्त्व आहे. पिरियडायजेशनमध्ये आमच्या ऑलिम्पिकच्या सायकलमध्ये आमचे जे इंटरनॅशनल फेडरेशन असतात ते चार वर्षांच्या कालावधीसाठी कॅलेंडर ठरवतात. आज मला माहितीये की 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत मी कोणकोणत्या मॅच खेळणार आहे, एवढी मोठी तयारी असते. तेव्हा आमचं प्लॅनिंग करताना आम्ही कोणती मॅच खेळायची, कोणती नाही खेळायची, कधी आम्ही ड्रेन आउट होऊ, किंवा कधी जास्त मॅचेस होतील हे सगळं पाहिलं गेलेलं असतं. तसंच आम्हांला देशांतर्गत कॅलेंडरसुद्धा बघावं लागतं. त्याच्यामध्ये काही स्पर्धा आम्हांला कंपल्सरी खेळाव्या लागत असतात. तर ह्या सगळ्यांच वेळापत्रकाचा विचार करून ऑलिम्पिकसाठी सगळ्या दृष्टीने तयार असू व आपण कुठेही थकलेले नसू अशी तयारी करावी लागते. त्यासाठी मागची तीन वर्षं काही स्पर्धा खेळल्या जातात किंवा खेळलेल्या नसतात आणि या सगळ्या पद्धतीने चार वर्षे घालवून आम्ही एका प्लॅटफॉर्मवर येतो. ते म्हणजे ऑलिम्पिकच्या मॅचच्या दिवशी!

पण जेव्हा असं काही होतं की एक वर्ष आता ना स्पर्धा होणार आहेत, ना सराव करता येणार आहे. ऑलिम्पिक होणारंय की नाही याचीपण अनिश्चितता आहे, तेव्हा खरं तर आम्ही सगळेच हरवून गेलो होतो. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक पोस्टपोन झालं. त्यामुळे त्या वेळच्या लोकांपैकी आता कोणीच आम्हांला सांगायला नाही की, त्यांनी काय केलं, त्यांनी कसा विचार केला. ती परिस्थिती फार वेगळी होती. त्यामुळे कुठेतरी आम्ही सातत्याने हे शोधायचा प्रयत्न करत होतो की, या घटनेला कसे सामोरे गेले पाहिजे. आम्हांला सांगण्यात आलं होतं की, ऑलिम्पिकपर्यंत पुढच्या सहा महिन्यांमध्ये एवढ्या स्पर्धा तुमच्यासाठी आहेत. पण आता त्यातल्या कोणत्या स्पर्धा खेळायच्या आणि कोणत्या नाही हे काहीच माहीत नव्हतं. कारण एक वर्ष कोणताही सराव नाही. मग आपण थकणार की नाही याची कोणतीही कल्पना नाही. बऱ्याचशा स्पर्धा पोस्टपोन झाल्या, बऱ्याचशा स्पर्धांचे लोकेशन बदलले, बऱ्याचशा स्पर्धा वेगवेगळ्या तारखेला झाल्या, अचानक स्पर्धांच्या तारखा बदलल्या. आमच्या पिरियडायजेशनच्या सगळ्या प्रोसेसमध्ये खंड पडला, त्यात बाहेर अनिश्चिततेचं वातावरण होतं. त्यामुळे या एका निर्णयामुळे खरं तर खेळाडूंच्या मानसिक, भावनिक आणि तांत्रिक पातळ्यांवर खूप मोठी उलाढाल झाली. आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही, तर प्रत्येक खेळाडूबाबत घडलं. त्यामुळे आम्हांला प्रयोग करून बघावे लागले की या परिस्थितीत काय काम करावं, आणि कशा पद्धतीने पुढे जायचंय.

दुसरं असं की या लेव्हलला आल्यानंतर म्हणजे ऑलिम्पिक आपल्यासमोर आहे अशा परिस्थितीत निराश व्हायला वेळच नसतो. आधीच आमचा लॉकडाउनमुळे वेळ वाया गेलेला होता, ऑलिम्पिक पुढे गेल्यामुळे जर आम्ही नाराज झालो तर अजून दिवस वाया जातील. त्यामुळे सातत्याने स्वतःला सकारात्मक ठेवणे की, ऑलिम्पिक आहे आणि त्यामुळे त्याच्या तयारीमध्ये कोणताही फरक पडता कामा नये. लॉकडाउनमध्येही मी सराव चालू ठेवला. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर पोलीस विभाग यांनी मला परवानगी दिली होती, कोल्हापूरच्या रेंजवर सराव करण्यासाठी. तो सुरुवातीचा एक महिना सोडल्यास त्यानंतर मी सातत्याने सराव करत होते.

शिवाय  किमान नेमबाजांचं ते शेवटचं ऑलिम्पिक नव्हतं. कारण आमचं एज लिमिट फार मोठं आहे. पण बाकीच्या खेळाडूंच्या बाबतीत मला वाटते आमच्यापेक्षा जास्त आव्हानात्मक राहिला असणार तो कालावधी. विशेषतः जे track अँड फील्डमध्ये विशेषकरून भाग घेतात, त्यांच्या शरीरामध्ये सहा महिन्यांनीसुद्धा बराच फरक पडत असतो.

पण या सगळ्यांमध्ये आमचे फेडरेशन असतील. SAI (Sports Authority of India) असेल, क्रीडा मंत्रालय आहे भारताचं, त्यांनी सातत्याने आम्हांला फोन करून आमची चौकशी केली. काय हवं-नको ते बघितलं. अगदी ट्रेडमिलसुद्धा दिल्लीवरून बऱ्याच लोकांच्या लोकेशन्सवरती पाठवले. एवढी मोठी मदत त्यांनी केली.

प्रश्न - या कठीण परिस्थितीत कदाचित सर्वांत महत्त्वाचा भाग मदतीला असेल तो म्हणजे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ. एक खेळाडू म्हणून प्रशिक्षकाचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व काय असते आणि मग परदेशी प्रशिक्षक का भारतीय प्रशिक्षक, असा खरंच फरक तुम्ही करता का? कारण त्याबद्दलदेखील बरंच वाचलं होतं वर्तमानपत्रात.

 - माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हो मी फरक करते, भारतीय आणि परदेशी प्रशिक्षकांत. आणि मी अजून काही वर्ष तरी तो करणार आहे. याचं कारण असं आहे की माझी जी स्पेसिफिक स्पर्धा आहे, त्या इव्हेंटला ऑलिम्पिकला जाणारी मी पहिली भारतीय नेमबाज आहे. त्यामुळे मग मी कुणाकडे मार्गदर्शनासाठी जायचे? माझ्या आधी असं कोण आहे देशात की ज्यांच्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून मी जाऊ शकेन? त्याच्यामुळे मला असं वाटतं की, अजून काही वर्षे परदेशी प्रशिक्षकालाच प्राधान्य द्यावं लागेल.

पण अर्थातच असे काही इतर इव्हेंट आहेत जसा सुमादीदींचा इव्हेंट आहे, अंजली दीदींचा इव्हेंट आहे, ही सगळी नावं रायफलमधली आहेत. म्हणजे जी नावं भारतीयांच्या तोंडावर आहेत, माहिती आहे, ते सगळे रायफल शूटर्स आहेत. उदा.अभिनव, गगन, सुमादीदी, अंजलीदीदी, तेजस्विनी दीदी ,राजवर्धनसिंग राठोड सगळे जण. पण पिस्तूल शूटिंगची परंपरा भारतात अजून तयार झालेली नाहीये. अर्थात आम्ही सगळे चर्चा करतो, आम्ही सिनियरकडून सल्ला घेतो, प्रश्न विचारतो, सायकॉलॉजीवर चर्चा करतो. पण ऑफिशिअल प्रशिक्षक म्हणशील तर एखाद्या प्रशिक्षकाबद्दल बेसिक क्रायटेरिया असा आहे की तो स्वतः ऑलिम्पिकला गेलेला असावा आणि त्याला एखादे पदक मिळालेले असावे. सध्या तरी दुर्दैवाने परदेशी प्रशिक्षकच हा निकष पूर्ण करू शकतात. अजून आपल्याला काही काळ गेल्या आपल्याला अशा पद्धतीचे प्रशिक्षक भारतातही मिळतील. कदाचित आमची पिढी अजून एक पंधरा-वीस वर्षांनी जेव्हा रिटायर होईल तेव्हा आपल्याकडे पुरेसे प्रशिक्षक असतील आणि तेव्हा आपल्याला परदेशी प्रशिक्षकांकडे जावे लागणार नाही.

प्रश्न - मला इथे हे कबूल करावे लागेल की रायफल आणि पिस्तूलमधला हा फरक मला माहीत नव्हता. तर त्यातून एक स्वाभाविक प्रश्न असा पडतो की, भारतात अजून स्पोटर्‌स कल्चर तयार झालेले नाही का? नुसतेच इव्हेंट आले की आम्हांला उमाळा येतो. पण साध्या बेसिक गोष्टीही माहीत नसतात. गेल्या 15 वर्षांत यात फरक पडला आहे असे वाटते का तुम्हांला?

 - खेळाविषयी आदर वाढलाय किंवा खेळ पाहणं वाढलंय हे नक्की. पण तू म्हणालास तसे जागरूकता वाढली आहे का, या बाबतीत मीसुद्धा साशंकच आहे. लोक मनापासून बघतात आणि त्याचा परिणाम नवी पिढी या क्षेत्रात हळू हळू येण्यामध्ये झाला आहे. पण जागरूकता अजूनही नाहीये. कारण बऱ्याचशा लोकांना बाहेरून खूप छान वाटते की आम्ही खेळतो, आम्ही बाहेर जातो, सहभागी होतो, किंवा पदक मिळवतो. पण अजूनही ते स्वतः किंवा त्यांच्या मुलांना, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हे सगळं करायला पुरेसे प्रोत्साहन देतात असं मला नाही वाटत. म्हणजे प्रत्यक्षात खेळणं आणि खेळाडूंचं अभिनंदन करणं यांत फार फरक असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हांला स्वीकारलं तेव्हा जाईल जेव्हा लोक खेळाला  एक करिअर ऑप्शन म्हणून पाहतील किंवा खेळानेसुद्धा तुमचं पोट भरू शकतं, यावर लोकांचा विश्वास बसेल. लोकांना अजूनही वाटतं की आम्ही फार वेगळ्या ग्रहावरचे लोक आहोत, आम्ही जे करतो ते त्यांना नाही जमणार. हे बदलायला हवं. मीडियामुळे फरक पडतोय पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

 प्रश्न - पण भारतात खरेच क्रिकेट वगळता इतर खेळांत पैसा आहे का?

 - आता सध्या आहे, खरोखर आहे! मी जेव्हा शूटिंग सुरू केलं, तेव्हा फक्त कसेबसे गरजेपुरते पैसे मिळत होते हे खरे आहे, पण आता स्ट्रगल बराच कमी झाला आहे. आता ‘खेलो इंडिया’ सारख्या योजना आल्या आहेत. या मुलांना महिन्याच्या महिन्यालासुद्धा अगदी उत्तम रकमेच्या scholarship मिळतात. यातून अर्थार्जन म्हणण्यापेक्षा किमान तुमचा खर्च जरी निघाला खेळाचा, तरीसुद्धा प्रगतीला फार मोठा वाव आहे. कारण तुमचा सगळ्यांत पहिला प्रश्न सुटलेला आहे, ते म्हणजे तुम्हांला तुमचे इक्विपमेंट किंवा रोजच्या खर्चाचा विचार नाही करायचा आणि हा खेळाडूच्या आयुष्यातला फार मोठा भाग असतो. हा खर्चाचा एक विषय बाजूला झाला तर खेळाचा विचार आपण मोकळेपणाने करू शकतो. त्यामुळे, अर्थार्जन या दृष्टीने किमान तुमच्या सरावासाठी ज्या अपेक्षा आहेत, आपल्या शासनाकडून असतील किंवा प्रायव्हेट sponsor कडून असेल किंवा केंद्रीय मंत्रालयाकडून- तर त्या उत्तम पद्धतीने सध्या तरी पूर्ण होत आहेत असे मी नक्की म्हणेन

प्रश्न - पण तरीही एक प्रश्न उरतो की तुमच्या क्षेत्रात the probability of success is very very less... लाखात एक किंवा कोटीत एक व्यक्ती फेमस बनणार आहे अशा वेळी सामान्य माणसानं का inspire व्हावं?

 - अजूनसुद्धा आपल्या इथे जेव्हा आपण खेळ एक प्रोफेशन म्हणून निवडतो किंवा आता याच्यात आपलं आयुष्य झोकून द्यायचं आहे म्हणून ठरवतो, त्या वेळी आपल्याकडे प्लॅन बी असतोच आणि जेव्हा आपल्याकडे प्लॅन बी असतो, तेव्हा शंभर टक्के आपण प्लॅन्‌ड नसतो हे सत्य आहे. जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत यशाची शक्यता कमीच राहते, कारण तुमच्या back of the mind मध्ये कुठेतरी सतत विचार चालू राहतो की हे नाही जमलं तर काय? आणि खेळाडूच्या आयुष्यातला हा पाया आहे, गाभा आहे की त्याच्या मनात कोणतीही शंका नको. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी आहे. तोपर्यंत प्लॅन ए साशंक राहणारच आहे. त्यामुळे यशाची शक्यता  वाढवायची असेल तर पूर्णपणे, कोणतीही शंका मनात न ठेवता झोकून देणं फारच गरजेचं आहे.

दुसरं असं की बरेचसे खेळाडू फार लवकर निराश होऊन खेळातून बाहेर पडतात. प्रत्येकाला यश कधी मिळेल हे फारच सापेक्ष आहे. कुणाला सहा महिने लागतील, तर कुणाला सहा वर्षे, तेवढा आपला संयम पाहिजे. आणि तिसरं असं की एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडते आणि एखादी गोष्ट आपल्याला करता येते- यांतही फरक आहे. त्याच्यामुळे या दोन गोष्टी एकच आहेत का हे पाहायला पाहिजे तरच यश मिळेल. नशिबाने माझ्या बाबतीत ते आहे जे मला आवडतं, तेच मला येतं. पण असं होऊ शकतं की तुम्हांला एखादा खेळ आवडतो, पण त्यात यशस्वी व्हायला शेवटी नैसर्गिक क्षमता लागतात. आणि त्या तुमच्या वेगळ्या बाबतीत असतील आणि तुम्ही काहीतरी वेगळं करताय तर तो फरक पडेलच ना! आपल्या स्वतःबद्दल या गोष्टी शोधल्या तर हे प्रश्न पटकन सुटू शकतात.

प्रश्न - तू या सगळ्या चक्रातून गेली आहेस, उत्तम यश आणि प्रसिद्धी मिळवली आहेस, तर अपयशसुद्धा पाहिलं आहेस, हे सगळं तू कसं हॅन्डल करतेस?

- ह्या सगळ्याला सामोरे जाताना घरच्यांचं काय मत आहे, याचा खूप मोठा परिणाम होत असतो. कारण खूप कमी वयात खेळाडू खेळ सुरू करतात आणि रिटायरपण खूप लवकर होतात, अगदी तिशीत रिटायर होतात. हा सगळा काळ उमेदीचा असतो. जेव्हा खूप एक्साइट व्हायला होतं, खूप आनंद होतो, खूप दुःखपण होतं, तेव्हा लगेच डिप्रेसही होतो. त्यामुळं सगळ्या पद्धतीच्या भावना अगदी ‘पीक’वरती असतात. विशेष करून आपल्या देशामध्ये आपली अटॅचमेंट आपल्या घरच्या लोकांशी, मित्रमैत्रिणींशी, आजूबाजूच्या लोकांशी खूप असते. ती आपली भारतीय मानसिकता आहे. त्यामुळे मला वाटतं की घरच्यांनी अशा वेळेला neutral राहणं म्हणजे कोणतीही फारशी भावना न दाखवणं आणि सहजासहजी जे असेल ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे. त्यांना प्रत्यक्षात मनातून वेगळं वाटत असेल तरीसुद्धा; कारण खेळाडूंची मानसिकता जपण्यासाठी सुयोग्य वातावरण त्यांच्या जवळच्या लोकांनी तयार करणे महत्त्वाचे आहे.

खेळाडूनेसुद्धा असा विचार केला पाहिजे की हे मेडल माझं पहिलंही नाही आणि शेवटचंही नाही. आणि सगळ्यांत मोठंही नाही!! खरे तर त्या क्षणी ज्या वेळी आपल्याला मेडल मिळतं किंवा मिळत नाही, त्या वेळी हा विचार करणेसुद्धा थोडे अवघड जाते . पण तो करणं खूप गरजेचं आहे.

माझ्या बाबतीत बोलायचं तर मी आखून घेतलेले चौकोन होते की मला एक-दोन मेडलमध्ये समाधानी व्हायचंच नाहीये. मला वीस-पंचवीस वर्षे सातत्याने पदकं मिळवायची आहेत. आणि मग सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की, तो एक काळ होता, जेव्हा राही सरनोबत नेमबाजी करायची किंवा करतीये. एक वर्ष-दोन वर्षांएवढ्या मर्यादित कालावधीसाठी मला स्वतःला बघायचं नाही. हे माझं पहिलं उद्दिष्ट मी ठेवलं होतं. त्यामुळे कुठल्याच पदकाने मला असं वाटलं नाही की चला आता झालं! अजून दहा-पंधरा वर्षं मला स्वतःला खेळायचं आहे. त्यामुळं मोठा विचार, मोठा दृष्टिकोन सातत्याने ठेवणं, रोज ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी कधीही कुठल्याही मेडलनंतर पार्टी केलेली नाही. अजून मला कधीच वाटले नाही की यापेक्षा उत्तम करू शकणार नाही. कायम माझं यश असेल, अपयश असेल ही कायम सामान्य घटना आहे या दृष्टीनेच मी याकडे बघितलं.

प्रश्न - हे सगळं तुम्हाला सांगायला सोपं आहे. पण प्रत्यक्षात हे खूप अवघड आहे. ही maturity नक्की येते कुठून, अनुभवातून येते की ही विचारांची कमाल आहे?

- मला असं वाटतं की, माझ्या वाचनाच्या सवयीचा खूप उपयोग झाला. ही सवय माझ्या आजोबांनी लावली. माझ्या आजोबांसोबत आठवड्यातून दोन-तीन वेळा ग्रंथालयात जायचे. ते मला ग्रंथालयात सोडून त्यांचं काम करायचे. मग घरी येताना मला जे पाहिजे ते पुस्तक  घेऊन यायचे. दोन दिवसांनी मी आजोबांना म्हणायचे की, आजोबा झालं वाचून. आता बदलून आणू. तेव्हा मला वाचताही येत नव्हतं तरीदेखील. पुस्तकांच्या आसपास जायचं आणि पुस्तक घेऊन यायची ती सवय कायमस्वरूपी माझ्यासोबत राहिली. अजूनसुद्धा मी न चुकता पुस्तकाच्या दुकानात जातेच. पुण्यात असो कोल्हापुरात, वर्षातून किमान दहा-बारा पुस्तकं वाचतेच, प्रमाणाबाहेर वाचनासाठी मी माझ्या डोळ्यांचा वापर करू शकत नाही. पण त्या मर्यादेत जेवढे शक्य आहे तेवढे नक्की वाचते. या सगळ्यांचाच मला माझ्या खेळासाठी, चांगलं-वाईट स्वीकारण्यासाठी किंबहुना प्रतिस्पर्ध्यांचा द्वेष न करण्यासाठी नक्कीच फायदा झाला. ईर्षा न वाटणं ही काही सोपी गोष्ट नाही, ती खूप स्वाभाविक भावना आहे. भारताला पदक मिळवायला हवं. पण ते मीच मिळवून द्यायला हवं असं वाटणं हे फार नैसर्गिक आहे. या सगळ्यांमध्ये खूप जास्त ऊर्जा खर्च होते असं मला वाटतं. मानसिक ऊर्जा, भावनिक ऊर्जा आणि ती मला माझ्या खेळात वापरायची होती. मी स्वतःच्या मनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्याचा मला माझ्या खेळासाठी खूप फायदा झाला.

प्रश्न - तुम्ही म्हणालात की, तुम्हाला लाँग टर्ममध्ये एक राही सरनोबत ‘एरा’ उभा करायचाय, तर या प्रवासात तुम्ही कुठवर आला आहात. यापुढचे टप्पे काय असणार आहेत?

- असं वाटतं की, आता पन्नास-साठ टक्क्यांपर्यंत मी तो काळ व्यतित केलेला आहे आणि मनात संमिश्र भावना आहेत. अगदी मला काहीच जमलं नाही, असं नक्कीच वाटत नाही. पण जे मी ठरवलं होतं, ते पण शंभर टक्के झालं आहे असंही मला वाटत नाही. आता अर्थातच या 2021 ऑलिम्पिकच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तिथला परफॉर्मन्स माझ्या मनाला खूप लागलेला आहे, कारण खूप उत्तम तयारीनिशी मी गेले होते, आणि तरीदेखील अपेक्षित असा निकाल नाही आला.

म्हणूनच मला वाटतं की, यातून बाहेर पडणं आणि पुढच्या ऑलिम्पिक सायकलला शिफ्ट होणं, हे माझ्यासाठी गरजेचं आहे. तीन ऑलिम्पिक सायकल माझ्या कालावधीत झाल्या. त्यांपैकी दोन ऑलिम्पिकला गेले, एकाला injured होते. अजून तीन ऑलिम्पिक मी प्लॅन करतीये : पॅरिस, इले आणि ब्रिस्बेन. तर सध्या माझ्यापुढे हाच टप्पा आहे. पुढच्या ऑलिम्पिकला तीनच वर्षे बाकी आहेत. आता ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या कमी करत स्वत:ला तासायचं काम चालू आहे.

मुलाखत व शब्दांकन : विनायक पाचलग
vinayak@vedbiz.com
Mob. 8087216867

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राही सरनोबत,  कोल्हापूर
sarnobatrahi@gmail.com

भारतीय नेमबाज, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके