डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इ.स.2000 पासून दरवर्षी एक व्याख्यान ऑस्ट्रेलियात आयोजित केले जाते. या मालेतील पहिले व्याख्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांनी दिले होते आणि त्यानंतरची मायकेल पार्किन्सन (दूरचित्रवाणी समालोचक), रिची बेनॉ (क्रिकेटपटू आणि समीक्षक), ॲलन जोन्स (रेडिओ ब्रॉडकास्टर), जनरल पिटर कोसग्रोव्ह (लष्करप्रमुख), रिकी पॉन्टींग (क्रिकेटपटू), ग्रेग चॅपेल (क्रिकेटपटू), सर टीम राइस (संगीतकार आणि लेखक), यांनी दिली आहेत. या वर्षी राहुल द्रवीडला व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियाबाहेरील व्यक्तीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ होती. 14 डिसेंबर 2011 रोजी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाच्या सभागृहात राहुल द्रवीडने 40 मिनिटांचे भाषण केले. या भाषणात भारत आणि ब्रॅडमन, भारतातील क्रिकेट, क्रिकेटचे बदलते स्वरूप आणि क्रिकेटपटूंचे वर्तन व व्यवहार या अनुषंगाने अनेक मुद्यांचा ऊहापोह केला आहे, काही अपरिचित माहिती पुढे आणली आहे आणि संयत पण परखड भाष्य केले आहे. म्हणून त्या संपूर्ण भाषणाचा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत. राहुल द्रवीडची या प्रकारची ओळख भारतीय क्रिकेटप्रेमींना पुरेशी झालेली नाही. पण स्टीव वॉचे आत्मचरित्र ‘आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन’ 2006 मध्ये प्रसिद्ध झाले, त्याला राहुल द्रवीडची प्रस्तावना आहे आणि हर्षा भोगलेचे ‘द विनींग वे’ हे पुस्तक 2011 मध्ये प्रकाशित झाले, त्याला राहुल द्रवीडची ‘शिफारस’ घ्यावीशी वाटली...

– संपादक

 

ब्रॅडमन यांच्या स्मृतिनिमित्त हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. या निमंत्रणात दाखविण्यात आलेल्या सन्मानाचा आणि सद्‌भावनेचाही मी आदर करतो. गेल्या दहा वर्षामध्ये या स्मृतिव्याख्यानमालेमध्ये भाषण देण्यासाठी आमंत्रित केलेले लोक क्रिकेटच्या क्षेत्रातील नामवंत आहेत याची मला चांगली जाणीव आहे.

सर डॉन ब्रॅडमन हे एक महान क्रिकेटपटू आणि थोर ऑस्ट्रेलियन होते, त्यांच्या कारकीर्दीचे आणि त्यांच्या जीवनाचे गुणग्रहण करण्यासाठी दर वर्षी हे व्याख्यान आयोजित केले जाते. त्यामुळे मी क्रिकेट व या खेळातून उद्भवणाऱ्या समस्या यांच्याविषयी बोलावे असेच अपेक्षित आहे आणि मीही त्याविषयीच बोलणार आहे. परंतु मुख्य विषयाकडे वळण्याआगोदर मला हे सांगितले पाहिजे की, आपण जिथे बसलो आहोत त्या स्थानाच्या माहात्म्यामुळे मी अतिशय लीन झालो आहे. इथे आपल्या आसपास कुठे धावपट्टी, यष्टी, बॅट किंवा चेंडू (जे सारं क्रिकेटसाठी लागतं) यांतील काहीच दिसत नाही. पण मी एका अत्यंत पवित्र आणि आदरणीय अशा स्थानावर उभा आहे हे मला तीव्रतेने जाणवते आहे.

मला जेव्हा हे सांगण्यात आलं की मी जिथे भाषण द्यायचं आहे ते स्थळ म्हणजे राष्ट्रीय हुतात्मा स्मारक आहे, तेव्हा मला क्रिकेट मॅचविषयी बोलताना आपण युद्ध, लढाई, झुंज असे शब्द किती निरर्थकपणे वापरत असतो याची तीव्र जाणीव झाली. आपण क्रिकेट खेळाडू आपल्या प्रौढ जीवनातील बराचसा काळ आपल्या देशासाठी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता यावी, खेळामध्ये टिकून राहता यावं आणि निकराची टक्कर देता यावी याची तयारी करण्यात घालवतो. परंतु ही वास्तू मात्र ज्या स्त्रिया आणि पुरुष युद्ध, लढाई, झुंज इत्यादी खऱ्या अर्थाने जगले; ज्यांनी आपलं सर्वस्व देशाला अर्पण केलं आणि ज्यांचं जीवन अर्धमुर्धंच राहिलं व भविष्य पूर्ण विझलं त्या सर्वांच्या कर्तृत्वाची ओळख सांगते.

आपल्या दोन्ही देशांतील लोकांना असं नेहमी सांगण्यात येतं की भारतीय व ऑस्ट्रेलियन लोकांना क्रिकेट एकत्र आणतं आणि क्रिकेट हे एकच आम्हां दोन्ही ठिकाणच्या लोकांचे सामायिक व्यवच्छेदक लक्षण आहे. स्वतंत्र भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी मालिका 1947 साली नोव्हेंबर महिन्यात खेळली गेली. त्या वेळी भारत स्वतंत्र होऊन तीन महिने झाले होते. परंतु आपल्या दोन्ही देशांचा इतिहास मात्र यापेक्षा बऱ्याच पूर्वीपासून एकमेकांशी निगडित आहे.

क्रिकेटखेरीज आणखी एका बाबतीत आपल्या दोन्ही देशांची भागीदारी आहे. पहिला कसोटी सामना खेळला गेला त्या अगोदर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन सैनिक एकत्रपणे शत्रूशी लढले आहेत. गॅलिपोली या ठिकाणी हजारो ऑस्ट्रेलियन सैनिकांसोबत 1300 भारतीय सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये ऑस्ट्रेलियन सैनिकांबरोबर उत्तर आफ्रिकेतील एल अल्मेन, सीरिया आणि लेबॅनन येथील लढाया, तसेच ब्रह्मदेश आणि सिंगापूर येथील लढायांमध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियन सैनिक एकत्रितपणे लढले आहेत. तेव्हा एकमेकांचे प्रतिस्पर्धी होण्याअगोदर आपण एकमेकांचे सहकारी होतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील या हुतात्मा स्मारकाच्या स्थळी आजच्या संध्याकाळी आपण क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळाडूंचा सोहळा साजरा करीत असताना या दोन्ही देशांच्या अज्ञात हुतात्म्यांचं आदरपूर्वक स्मरण करणं उचित ठरेल.

सर डॉन ब्रॅडमन यांच्या स्मृतिपर भाषण देण्यासाठी ऑस्ट्रेलियाबाहेरून आलेला पहिलाच क्रिकेट खेळाडू माझ्यासारखा एक भारतीय असावा हे मात्र काहीसे विसंगत वाटते. लॉर्डस्‌च्या मैदानावर सर डॉन यांनी जेवणासाठीच्या मध्यंतराअगोदर एक शतक ठोकलं होतं आणि मला मात्र या वर्षी असं शतक करायला संपूर्ण दिवस झगडावं लागलं, एवढं एकच असं वाटण्याचं कारण नाही. आणखी पण बरंच काही आहे. थोडं गंभीरपणे बोलायचं म्हणजे असं की, सर डॉन भारताविरुद्ध अवघ्या पाच कसोट्यांमध्ये खेळले. ती 47-48 साली खेळली गेलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी पहिली मालिका होती आणि मायदेशी खेळण्याचा त्यांचा तो अखेरचा मोसम होता. ते भारतामध्ये कधी खेळलेच नाहीत. आणि भारतात न खेळतासुद्धा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनांमध्ये ज्यांच्याबद्दल अत्यंत पूज्यभाव राहिला आहे असे ते खेळाडू आहेत.

1953 च्या मे महिन्यात एका इंग्रजी वर्तानपत्राला ‘ॲशेस’बाबतचे वृत्त देण्यासाठी (इंग्लंडला जात असताना) ते भारताच्या भूमीवर उतरले होते. त्यांचे विमान कलकत्त्याच्या विमानतळावर थांबले होते आणि तिथे सुमारे 1000 लोक त्यांना अभिवादन करायला जमले होते. त्यांना स्वतःचं खाजगी वैयक्तिक जीवन किती प्रिय होतं ते आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे विमानतळावर उतरताच ते सेनादलाच्या एका जीपमधून कडक बंदोबस्त असलेल्या एका इमारतीत जाऊन बसले. आपण येणार असल्याची बातमी गुप्त न राखल्याबद्दल ते विमान कंपनीवर रागावलेही होते. भारतीयांना त्या वेळी सर डॉन ब्रॅडमन यांचे जे ओझरते दर्शन झाले तेवढेच. परंतु ब्रॅडमन मात्र एखाद्या पौराणिक महान व्यक्तीसारखे भारतीयांच्या मनात कायमचे घर करून राहिले.

त्यांच्या चाहत्यांच्या 1930 च्या दशकामध्ये वाढलेल्या आणि त्या वेळी ब्रिटिशांच्या सत्तेखाली असलेल्या भारतीयांच्या एका संपूर्ण पिढीला ब्रॅडमन म्हणजे क्रिकेटमधील इंग्लंडच्या बाहेर जोपासलेले मूर्तिमंत नैपुण्य होते. क्रिकेटच्या जगतात नव्याने पाऊल टाकणाऱ्या देशाला त्याचे अप्रूप वाटत होते.

इंग्लंडविरुद्ध त्यांना मिळालेले यश त्या वेळेस आम्हाला आमचेच यश वाटत असे. आपणा उभयतांच्या समान शत्रूशी दोन हात ते करत आहेत असे वाटे. किंवा तुम्ही ज्यांना प्रेमाने ‘पॉम्स’ (ब्रिटनमधून कायम वस्ती करण्यासाठी आलेला) म्हणता ते इंग्लंडचे प्रतिस्पर्धी आहेत असे वाटे.

इथे मला दोन गोष्टींकडे तुचं लक्ष वेधायचं आहे. 28 जून 1930 या दिवशी ब्रॅडमन यांनी लॉर्डसच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 254 धावा केल्या; आणि याच दिवशी जवाहरलाल नेहरू यांना पोलिसांनी अटक केली. त्या वेळी नेहरू भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचे नेते होते आणि नंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. के.एन.प्रभू नावाच्या एका तरुणाने या दोन घटनांधील योगायोग ताडला. हा तरुण क्रिकेटप्रेमीही होता आणि राष्ट्रप्रेमीही होता. स्वतंत्र भारतामध्ये तो पुढे क्रिकेटचा भाष्यकार झाला. 30 च्या दशकामध्ये नेहरू कधी आत असत, तर कधी बाहेर असत. त्या वेळी ब्रॅडमन इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणत होते. आणि के. एन. प्रभूंना इंग्रजांचा सूड घेतल्याचा आनंद होत असे.

आणखी एक गोष्ट- 33 सालातील एका दिवसाची. ब्रॅडमन यांच्या कसोटीतील धावांचा उच्चांक वॅलि हॅंड याने 334 धावा करून तोडला अशी बातमी भारतात येऊन थडकली. उच्चांक तोडणे आणि नवीन उच्चांक प्रस्थपित करणे सर्वांना प्रिय असले तरी हॅंड यांच्या उच्चांकाचा मात्र भारतीय क्रिकेटप्रेमींना आनंद झाला नाही.

या बाबतीत असं म्हणतात की, काळ्या फिती बांधून, काही भारतीयांनी ऑस्ट्रेलियाच्या हक्काचा (आणि पर्यायाने भारताचा) उच्चांक तोडला गेल्याचे दुःख व्यक्त करण्याचा घाट घातला गेला होता. तसं प्रत्यक्षात घडलं की नाही हे कळणं कठीण आहे; परंतु काही पत्रकार म्हणतात ही छान गोष्ट सत्य शोधण्याच्या खटाटोपामध्ये कशाला बिघडवून टाकायची?

मी आणि ब्रॅडमन यांच्यामध्ये दुवा साधला गेला तो सर्वसाधारण भारतीयांप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकातून, काही जुन्या व्हीडिओमुद्रणातून आणि त्यांनी काढलेल्या अर्थपूर्ण उद्‌गारातून - आपल्याला ज्या स्थितीत हा खेळ प्राप्त झाला आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या स्थितीस तो पोहोचविण्याबाबत तसेच सकारात्मक वृत्तीने खेळण्याबाबत-जे ब्रॅडमन यांनी रिची बेनॉला (ते स्वतः खेळाडूंची निवड करणारे असताना) 1960-61 सालच्या वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होण्याअगोदर सांगितले होते- तसेच क्रिकेटने प्रेक्षकांना योग्य संदेश देण्याबाबत, खेळाडू म्हणजे या श्रेष्ठ खेळाचे हंगामी विश्वस्त असल्याबाबत... असे अनेक उद्गार.

आम्ही गाठलेले उच्चांक, आमचे स्ट्राइक रेट्‌स, किंवा क्षेत्ररक्षण यांमध्ये थोडंसं साम्य आहे असं मी आज आपणा सर्वांच्या पुढे बोलू शकतो. आणि सर डॉन यांच्याशी माझं काही महत्त्वाचं साम्य आहे ह्याचा मला फार आनंद वाटतो.

माझ्यासारखेच तेही मुख्यत्वे तिसऱ्या क्रमांकावर खेळत असत. तसं हे काम कठीणच असतं. कारण मधल्या फळीतील आमच्या मागून येणाऱ्या फलंदाजीच्या बादशहांचं जीवन आम्हांलाच सुकर करायचं असतं. हे काम ब्रॅडमन यांनी माझ्यापेक्षा जास्त यशस्वीपणे आणि डौलाने पार पाडलं. गोलंदाजांच्या माऱ्यावर चढाई करून ते प्रेक्षकांना आपापल्या जागी खिळवून ठेवत. मी मात्र थोडा जास्त वेळ फलंदाजी करीत राहिलो तर लोक कंटाळून जांभया देऊ लागतात. तरी सुद्धा खूप वेळ बॅटिंग करीत टिकून राहणं छानच असतं. खरं तर चांगल्या फलंदाजीचं हेच महत्त्वाचं लक्षण आहे.

वयाच्या 80 व्या वर्षानंतर सार्वजनिक जीवनातून रजा घेण्याअगोदर ते ऑस्ट्रेलियातील सुनील गावसकरच्या पिढीतील मालिका बघत असत. पण जेव्हा आम्ही हे ऐकलं की, त्यांनी सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना टीव्ही वर पाहिलं; आणि सचिनची फलंदाजी त्यांच्यासारखीच आहे असं त्यांना वाटलं तेव्हा आमच्या आनंदाला उधाण आलं. हे काही केवळ सचिनचं कौतुक नव्हतं. महान डॉनने आपली मशाल सचिनच्या हाती सुपूर्द केल्यासारखं होतं. म्हणजे ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश किंवा वेस्ट इंडीजकडे नव्हे तर आमच्यातल्याच एका भारतीय खेळाडूकडे!

ब्रॅडमन यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली आहे. ती अशी की उत्तम खेळाडूंमध्ये कौशल्याबरोबर आणखी काही महत्त्वाचे गुण असतात म्हणजे त्यांच्या जीवनात प्रतिष्ठा असते; प्रामाणिकपणा असतो; धैर्य आणि नम्रता असते. आणि या सर्व गोष्टी त्यांच्या मते स्वाभिमान, महत्त्वाकांक्षा, निर्धार आणि स्पर्धा यांच्याशी पूर्णपणे सुसंगत आहेत. त्यांचे हे शब्द जगातील क्रिकेटच्या सर्व ड्रेसिंग रूममध्ये ठळकपणे प्रदर्शित करायला हवेत.

डॉन ब्रॅडमन यांचे 25 फेब्रुवारी 2001 रोजी निधन झाले हे आपण सर्वजण जाणताच. त्यानंतर दोन दिवसांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका मुंबई येथे सुरू व्हायची होती. जेव्हा केव्हा क्रिकेटमधील एखादी महान व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा जगभरातील क्रिकेट समुदाय स्पर्धा चालू असताना मध्येच थांबून त्या व्यक्तीचं स्मरण करतात आणि आपल्यासाठी तिचं काय महत्त्व आहे, तिने कशाचा पुरस्कार केला याची चर्चा करतात. या बाबतीत ब्रॅडमन हे शिखरस्थानी होते. सर्व कसोटीवीर फलंदाजांनी या मानदंडाबरोबर स्वतःची योग्यता जोखावी. ब्रॅडमन यांच्या  निधनातंतर दोन दिवसांनी सुरू झालेली ती क्रिकेट कसोटी मालिका पुढे अनेकांच्या मते या खेळातील एक उत्कृष्ट मालिका ठरली. मला वाटतं, ब्रॅडमन यांना ती मालिका पाहतांना खूप मजा वाटली असती.

अखेरच्या कसोटीतील शेवटच्या दिवशी, अखेरच्या सत्रातील शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू आणि बॅट यांच्यात अटीतटीचा संघर्ष चालू होता. आपल्या शक्तीचा दरारा प्रस्थापित करणारा ऑस्ट्रेलियन संघ आणि इतिहासाची नवीन प्रकरणं लिहिण्यास सिद्ध झालेला भारताचा तरुण संघ यांच्यामधला तो मुकाबला होता. भारत अनेक प्रश्नांची उत्तरे देत देत स्वतःच काही प्रश्न ऑस्ट्रेलियाला विचारू लागला. या कसोट्यांसाठी लागणारा - कधी कधी खवचट बोल ऐकविणारा तर कधी कधी सुखावणारा- उच्च दर्जा भारतीय संघाला बरंच काही शिकवून गेला. संघ मोठा झाला, मनाने आणि शरीराने. आम्हा प्रत्येकाला सर्व ताकद पणाला लावून खेळायचे असे सांगण्यात आले होते. आणि आम्ही आमच्या क्षमतेच्या सीमाही पार करून खेळलो.

आता जेव्हा जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असतात तेव्हा लोकांच्या आशा-आकांक्षा खूप वाढतात. पुढच्या दोन महिन्यांमध्ये येणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी खेळताना दोन्ही बाजूचे खेळाडू शक्य तेवढा चांगला खेळ करतील.

आम्ही जेव्हा 2007-08 मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा मला असं वाटलं होतं, ही माझी ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याची अखेरची संधी असणार. सचिन तेंडुलकरबाबतही ऑस्ट्रेलियन लोकांना असंच वाटलं होतं की, तेंडुलकर क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पुन्हा उतरणार नाही. म्हणून जाताना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली होती. पण निवृत्त होण्याच्या वयातील काही खेळाडूंप्रमाणे आम्ही पुन्हा इथे खेळण्यासाठी हजर झालोच! वयाने थोडे वाढून, थोडे जास्त शहाणे होऊन आणि जास्त आशा ठेवून.

पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन जनता सचिनची सन्मानाने पाठवणी करायला सज्ज होऊन उभी राहील. पण मला तुम्हांला एक इशारा द्यावा लागेल, ज्या तऱ्हेने सचिन आज खेळत आहे ते विचारात घेता हा अखेरचा निरोप ठरेल याची काही खात्री देता येत नाही. पण एवढं मात्र खरं की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ही मॅच पाहाण्यासाठी क्रिकेट जगत सारे उद्योग बाजूला सारेल आणि केवळ मॅच पाहात बसेल. 2010च्या ॲशेस मालिकेतील इंग्लंडकडून झालेला पराभव आणि न्यूझीलंड विरुद्ध अनिर्णित राहिलेला सामना हे अपयश धुऊन टाकून पुन्हा एकदा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायची संधी या मालिकेमुळे ऑस्ट्रेलियाला मिळणार आहे. आणि भारताला इंग्लंडमध्ये उन्हाळ्यात झालेल्या मालिकेतील पराभव ही काही नित्याची गोष्ट नव्हे तर तो एक अपघात होता आणि त्यातून आम्ही पुन्हा नव्याने उसळी मारून जिंकू शकतो हे सिद्ध करता येईल. दोन्ही संघांनी 2007-08 मध्ये झालेल्या मालिकेकडे नजर टाकल्यास सिडनी येथील कसोटीत आपण काही वेगळं करायला हवं होतं हे दोघांच्याही लक्षात येईल. पण मला वाटतं की दोन्ही संघ आता तेथपासून बरेच पुढे गेलेले आहेत: आपण भारतामध्ये दोन वेळा एकमेकांविरुद्ध खेळलो. आणि आपल्या दोन्ही संघांमधले संबंध आता पूर्वीपेक्षा बरेच सुधारले आहेत.

आय.पी.एल.मुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू एकाच ड्रेसिंग रूममध्ये एकत्र आले आहेत. शेन वॉट्‌सनला राजस्थानबद्दल वाटणारी आस्था, माईक हसीची चेन्नईधली भूमिका अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचं आम्हा भारतीयांना अप्रूप वाटतं.

आणि आता तर शेन वॉर्नलाही भारत आवडू लागला आहे. गेल्या हंगामात त्याच्यासमवेत राजस्थानमध्ये खेळताना मला खूप मजा वाटली आणि आता मी तुम्हांला खात्रीने सांगू शकतो की तो आता बेक्‌ड बीन्स आयात करून खात नाही. खरं तर त्याच्याकडे पाहून तो काहीच खात नसावा असंच वाटतं.

क्रिकेटर्स आपल्या देशाचे राजदूत असतात असं बऱ्याचदा म्हणतात; पण जेव्हा एखादी मॅच जिंकायची असते अशा वेळी क्रिकेटर्स कडून अशी अपेक्षा करणं सयुक्तिक नसतं. परराष्ट्रासंबंधी काम करणारे अधिकारी त्यांच्यावर जर मालिकेचे यशापयश अवलंबून असेल तर काय करतील? परंतु भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील धागे दोरे मजबूत झाले आहेत आणि आपल्यामधल्या शर्यती पण वाढत आहेत, वारंवार होत आहेत; तेव्हा आम्हा भारतीय खेळाडूंना याची जाणीव होत आहे की, आम्ही वैविध्यपूर्ण आणि अनेकदा अनाकलनीय वाटणाऱ्या आणि सतत भारावून टाकणाऱ्या अशा एका अफाट देशाचे प्रतिनिधित्व करीत आहोत.

या क्षणी भारताबाहेरील जगाला भारतीय क्रिकेटमध्ये दोनच गोष्टी दिसत आहेत. एक पैसा आणि दुसरी सत्ता. पण हा भारतीय क्रिकेटच्या अनेक पैलूंपैकी केवळ एक पैलू आहे. हे काही येथील क्रिकेटचं संपूर्ण चित्र नव्हे. एक खेळाडू आणि भारतीय क्रिकेट टीमचा एक स्वाभिमानी आणि भाग्यवान सदस्य म्हणून मला हे सांगायचं आहे की, हे एकमितीय आणि वारंवार अशाच पद्धतीने रंगवलं जाणारं चित्र म्हणजे खरं भारतीय क्रिकेट मुळीच नाही.

ज्या छोट्यामोठ्या शहरांतून आणि खेड्यांधून आमचे खेळाडू येतात त्या सर्व ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणं, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे शिक्षक व कोच, त्यांचे अनुभवी सल्लागार, त्यांचे सहखेळाडू (ज्यांच्यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकले) या कोणाचीच ओळख करून देणं तर मला शक्यच नाही. तुम्हा सर्वांना भारतात बोलावून तेथील आमच्या खेळाला ज्यांनी आपल्या श्रद्धा, समजुती, संघर्ष, श्रम आणि त्याग वाहिले त्या हजारो लोकांची धडपडही मी तुम्हांला दाखवू शकत नाही. 

पण आज या ठिकाणी भारतीय क्रिकेट आणि त्याची उल्लेखनीय कहाणी तुम्हाला ऐकवणं मला महत्त्वाचं वाटतं. सर्व क्रिकेटप्रेमी देशांनी एकमेकांबद्दल जास्त जाणून घ्यावं, एकमेकांना नीट समजून घ्यावं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये क्रिकेट कोणत्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडतं हे जाणून घेण्याची मोठीच गरज आहे. अखेरीस आपल्या सर्वांचं हे जग फारच लहान आहे.

भारतामध्ये क्रिकेट ही आपल्या भोवती घोंघावणारी आणि गुणगुणणारी, एक जितीजागती चीज आहे. आणि ती एका मोठ्या लक्षणीय कालखंडातून जात आहे. मागील दशकात भारतीय संघ कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंचा आहे; वेगवेगळ्या संस्कृतींतून, वेगवेगळ्या भाषा बोलणारा, वेगवेगळ्या धर्म, जाती, वर्ग आणि समाजांतून आलेला आहे. मी सहज एकदा ड्रेसिंग रूममध्ये किती भाषा बोलल्या जातात ह्याचा अंदाज घेतला. शोना आणि आक्रिकान्स मिळून एकूण 15 भाषा आमच्या ड्रेसिंगरूममध्ये बोलल्या जातात. परदेशातील संघनायक हे ऐकून अवाक्‌ होतील.

परंतु मी जेव्हा भारतीय संघाचं नेतृत्व केलं तेव्हा मला मात्र फार मजा वाटली. त्यांच्यातील फरक, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या वेगवेगळ्या क्षमता, एकच ड्रेसिंग रूम सगळ्यांनी वापरणं, एकमेकांना समजून घेणं, सामावून घेणं आणि आपापसांतील भेदांचा आदर करणं हे सर्व मोठं आश्चर्यकारक असतं. एकमेकांशी अधिकाधिक फटकून वागण्याची वृत्ती जगभर बोकाळत असतांना हा बहुमोल गुण अंगी बाणवणं किती मोलाचं आहे! कारण एकदा अंगी बाणलेला हा गुण आपल्याला आयुष्यभर साथ देतो; इतर लोकांना समजून घेणं त्यामुळे सुकर होतं आणि इतरांचं महत्त्वही ध्यानात येतं. मला माझ्या 19 वर्षांखालील संघातून खेळतानाच्या दिवसांमधली एक गोष्ट सांगायची आहे. भारताचा 19 वर्षांखालील संघ न्यूझीलंडच्या तशाच संघाबरोबर खेळत होता. आमच्या संघात दोन गोलंदाज होते. एक उत्तर प्रदेशचा फक्त हिंदी भाषा बोलणारा. (इंग्रजीपेक्षाही हिंदी ही जास्त बोलली-समजली जाणारी भाषा आहे आणि सर्व भारतीय खेळाडू याच भाषेत एकमेकांशी बोलतात.) तर दुसरा गोलंदाज होता केरळाचा (अगदी दक्षिणेकडचा.) आणि त्याला फक्त तेथील प्रादेशिक मल्याळम भाषाच येत होती. पण दोघेही गोलंदाज असल्याने फारसं काही बिघडत नव्हतं. मात्र एका गेममध्ये ते दोघेही एकाच वेळी बॅटिंगसाठी क्रीजवर आले. एकमेकाची साथ कशी करायची, धाव घ्यायची की नाही हे एकमेकांना कसं कळवायचं याचा ताळमेळ हे दोघे कसा बसवत असतील याविषयी तर्क-वितर्क करताना ड्रेसिंग रूममध्ये आमची हसून हसून मुरकुंडी वळायला आली. एकाला दुसरा काय म्हणतो आहे त्याचा पत्ताच लागत नव्हता आणि दोघेही एकाच वेळी फलंदाजी करीत होते. हे असे केवळ भारतीय क्रिकेटमध्येच होऊ शकते. आणि तरीही त्यांनी 100 धावांची भागीदारी केली. त्यांची सामायिक भाषा, दोघेही समजू शकतील अशी भाषा होती : क्रिकेट! आणि या भाषेने सारं काही व्यवस्थित निभावलं.

दररोज जागोजागी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटची श्रीमंती यातच साठवलेली आहे. तुम्हांला ऐकू येणाऱ्या, करोडोंच्या घरात होणाऱ्या उलाढाली आणि टीव्हीवरील प्रसारणाच्या हक्कांच्या ‘न्यूज’ मधून ही श्रीमंती दिसणार नाही. क्रिकेटमध्ये व्यतीत केलेल्या 25 वर्षांच्या काळानंतर मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा दोन गोष्टी माझ्या ध्यानात येतात. पहिली धोक्याची घंटी वाजविणारी गोष्ट ही की, मी भारतीय क्रिकेटमधला सर्वांत जास्त वयाचा खेळाडू आहे. सचिनपेक्षाही तीन महिन्यांनी मोठा. पण दुसरी जास्त महत्त्वाची गोष्ट- भारतीय क्रिकेटमध्ये आमच्या देशाच्याच या काळातील एकूण प्रगतीचे चित्र रेखाटलेले दिसते. आमच्या राष्ट्रीय ताण्याबाण्याचा क्रिकेट हा एक असा अविभाज्य भाग आहे. भारताचे अर्थकारण, समाज आणि लोकसंस्कृती जशीजशी बदलत गेली तसा तसा हा अत्यंत लोकप्रिय झालेला खेळही बदलत गेला.

खेळाडू म्हणून, भारतीय क्रिकेटच्या आर्थिक सत्तेचे लाभार्थी म्हणून आम्ही त्याचे महत्त्व जाणतो, पण आम्ही केवळ या आर्थिक सत्तेची निशाणी किंवा प्रतीके नक्कीच नाही आहोत. भारताबाहेरच्या जगामध्ये भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचे ‘आम्ही फार लाडावलेले सुपरस्टार्स आहोत’; आम्हांला भरमसाठ पैसा मिळतो, काम फार थोडं आणि जणू काही राजेशाही आणि रॉक स्टार यांच्या संकरातून आम्ही निर्माण झालेले आहोत असे चित्रण केले जाते.

भारतीय संघाला फार मोठा भावनिक पाठिंबा मिळतो हे खरेच आहे आणि त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्रितपणे देशात फिरतो तेव्हा आम्हांला संरक्षण मिळण्याची पण गरज असते. अशा वेळी आम्ही वेळ ओळखून शांत चित्ताने आणि आमच्या प्रतिमेला शोभेल असेच वागतो. आम्ही जेव्हा दौऱ्यावर असतो तेव्हा आमच्या चाहत्यांवर आम्ही कधी हात उगारीत नाही, नशा करीत नाही की दारू पिऊन धिंगाणा घालीत नाही. हे मला मुद्दाम सांगायला हवं. तुम्हांला काहीही बातम्या मिळत असल्या तरी आम्ही मोठमोठ्या महालात राहत नाही आणि आमच्या घरांमधून पोहण्याचे तलाव पण नसतात.

आमच्या क्रिकेटविषयी इतर बातम्यांपेक्षा पैशाच्या उलाढालीच्या बातम्याच फार येत असतात, पण बाहेरील जगाला माहीत नाहीत अशा हजारो गोष्टी आमच्या क्रिकेटविषयी सांगता येतील.

भारतीय क्रिकेटच्या टीव्ही प्रसारणाच्या हक्कांविषयी खूप चर्चा होत असते. या टीव्हीने आमच्यावर काय परिणाम झाला ते मी तुम्हांला सांगतो. आजपर्यंत जो खेळ मुख्यत्वे संस्थानिक आणि  बडे व्यापारी मुंबई, बंगलोर, चेन्नई, बडोदे, हैदराबाद, दिल्ली अशा मोठ्या शहरांमधून खेळत असत त्या खेळातील खेळाडू आता भारताच्या कानाकोपऱ्यांतून येऊ लागले आहेत.

भारतीय क्रिकेटची मिळकत गेल्या दोन दशकांमध्ये मुख्यत्वे टीव्ही मुळे जशी जशी वाढली आहे तसे तसे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली मिळकत देशाच्या अनेक भागांमध्ये खर्च करून जागोजागीची खेळाची मैदाने सुधारली आहेत. क्रिकेट आता खूप ठिकाणी पसरले आहे. आणि ह्या खेळाच्या जागाही आता बदलल्या आहेत. रणजी ट्रॉफी या राष्ट्रीय विजेतेपदासाठी आज देशामध्ये 27 संघ सज्ज झालेले असतात. मागील मोसमात राजवाडे, किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळांसाठीच प्रसिद्ध असलेल्या राजस्थानचा संघ पहिल्यांदाच विजेता ठरला. तसेच राष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांमध्येही पहिल्यांदा विजयी ठरणारा संघ होता झारखंडचा, महेंद्रसिंग धोणी झारखंडमधून आलेला आहे.

टीव्ही वरील क्रिकेटच्या प्रसारणातील वाढ आणि त्याचं प्रमाण यांच्या रेट्यामुळे क्रिकेट खेळाडूंच्या लोकसंख्येतील हा बदल घडून आला आहे. ब्रॅडमन जसा बोरॉलहून आलेला मुलगा होता तसाच भारतीय संघात क्रिकेटपटूंचा ओघ आता भारताच्या कानाकोपऱ्यातून यायला लागला आहे.

झहीर खान हा महाराष्ट्राच्या अविकसित अंतर्भागातून आलेला आहे; अशा एका लहानश्या शहरातून जिथे एखादी क्रिकेटची धावपट्टीही उपलब्ध नव्हती. तो खरं तर एक इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअर व्हायचा, पण टीव्हीमुळे तो क्रिकेटकडे वळला. कपाटाच्या आरशासमोर उभं राहून त्याने गोलंदाजीचा सराव केला आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्याला पहिल्यांदा क्रिकेटचा खरा चेंडू हाताळायला मिळाला. एक दिवस कोण जाणे कसा पण गुजरातेतील एक खेडवळ मुलगा भारताचा सर्वांत जलदगती गोलंदाज म्हणून समोर आला. हा मुनाफ पटेल जेव्हा भारताचा खेळाडू म्हणून नावारूपाला आला तेव्हा त्याच्या खेड्याला जवळच्या रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता सुधारावा लागला, कारण पत्रकार आणि टीव्ही क्रूज यांची त्याच्या गावी ये-जा वाढली. आमच्या सुदैवाने उमेश यादव एक पोलिस शिपाई झाला नाही. पोलिस होता होता तो क्रिकेटकडे वळला, तो आता मध्यभारतातील विदर्भाच्या प्रथम श्रेणीच्या संघामधून कसोटी सामने खेळतो. वीरेन्द्र सेहवाग, दिल्लीच्या पश्चिमेकडच्या एका जंगलमय भागातून आलेला आहे. क्रिकेटची चांगली सोय असलेल्या एका कॉलेजमध्ये तो दाखल झाला, सराव करण्यासाठी आणि मॅच खेळण्यासाठी ह्या मुलाला रोज बसने 84 किमीचा प्रवास करावा लागे.

इथे बसलेल्या आणि भारतीय संघाचा ब्लेझर घातलेल्या प्रत्येक खेळाडूची अशीच काहीना काही सांगण्यासारखी कहाणी आहे. तेव्हा बंधुभगिनींनो, हा आहे भारतीय क्रिकेटचा आत्मा.

भारतासाठी खेळताना आमचं आयुष्यच बदलून जातं. ज्यांनी ज्यांनी आम्ही चांगले क्रिकेटर्स व्हावे म्हणून आपला वेळ, आपली शक्ती आणि संसाधनं खर्च केली त्या सर्वांचं ऋण फेडण्याची संधी आम्हांला या खेळामुळे मिळत आहे. या खेळामुळेच आम्ही आमच्या पालकांसाठी चांगली घरं बांधू शकलो, आमच्या भावंडांची लग्नं थाटामाटात करू शकलो, आणि आमच्या कुटुंबाला आरामदायी जीवन देऊ शकलो.

भारतीय क्रिकेट संघ म्हणजे भारताचीच एक लहानशी प्रतिकृती आहे. जो खेळ प्रथम राजपुत्र, नंतर त्यांच्या हाताखालचे लोक खेळत, त्यानंतर मोठ्या शहरातील प्रतिष्ठित लोक खेळू लागले. आता तो खेळ संपूर्ण भारत देश खेळू लागला आहे. माझ्या 19 वर्षांखालच्या टीममधल्या दोन खेळाडूंनी सिद्ध केलं आहे. त्याप्रमाणे क्रिकेट ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. भारतातील सिनेमांमध्ये सुद्धा त्या त्या प्रदेशाचे लोकप्रिय ‘हीरो’ असतात. दक्षिण भारतात लोकप्रिय असलेला सिनेनट उत्तरेकडे लोकप्रिय नसतो. पण क्रिकेटचा खेळाडू? तो संपूर्ण भारताचा लाडका असतो.

पण या सर्वांबरोबर विकास व्हायला इथलं वातावरण जरा कठीण असतं. टीका फार कडक बोचरी बनू शकते, विजय- पराजयाच्या प्रतिक्रिया फारच तीव्र होतात, खाजगी वैयक्तिक जीवनावर गदा येते, आम्ही हरलो की आमच्या घरांवर दगडफेकही झालेली आहे. या सर्व गोष्टींची सवय होण्यास बराच वेळ लागतो. तीव्र प्रतिक्रियांमुळे संताप होतो. पण हळू हळू प्रत्येक क्रिकेटरला हे उमगतं की भारतीयांचं प्रेम बहुसंख्य क्रिकेटप्रेमींच्या भावना समजून घेण्याने व त्या स्मरणात ठेवण्याने सिद्ध होते. काही थोड्या लोकांनी केलेल्या दगडफेकीतून नव्हे.

एक खेळाडू म्हणून टीमबसमधून भारतात कुठेही फिरत असताना मी बाहेर डोकावून पाहातो तेव्हा मला फार आनंद होतो. आमची बस लोक पाहतात, आमच्यापैकी कोणीतरी पडदा मागे सारून बसलेला त्यांना दिसतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलतो तो अगदी आश्चर्य वाटण्यासारखा असतो. त्यांच्या चेहऱ्यावर लागलीच हसू उमटतं. ते हसू जो खेळाडू त्यांना दिसला त्याच्यासाठीच केवळ नव्हे तर आम्ही जो खेळ खेळतो त्यासाठी असतं; त्यांच्या जीवनात त्याचं काहीतरी महत्त्व असतं. तुम्ही जिंका अगर पराजित व्हा, रस्त्यात भेटणारा माणूस तुम्हाला अभिवादनच करील. या वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर आम्हा खेळाडूंचे एवढे अभिनंदन झाले नाही जेवढे आमचे आभार आम्हांला भेटणाऱ्या सर्व लोकांनी व्यक्त केले. ‘तुम्ही जिंकून आम्हांला सर्व काही मिळवून दिलेत. तुच्या विजयाने आम्हा सर्वांचा विजय झाला आहे’ असे त्यांचे सांगणे होते. क्रिकेट भारतात केवळ एक क्रीडाप्रकार राहिलेला नाही. त्यामध्ये घडण्यासारखं बरंच काही,  अनेक आशा आकांक्षा आणि संधी सामावलेल्या आहेत.

भारतीय संघापर्यंत वाटचाल करताना आम्हांला आमच्या टीममध्ये असे कित्येक खेळाडू भेटून जातात जे आज इथे बसलेल्या खेळाडूंइतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा थोडे अधिक कुशल होते, परंतु ते इथपर्यंत पोहचू शकले नाहीत. मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्या वेळी क्रिकेट म्हणजे सर्वस्व पणाला लावणारा जुगार होता. जिंकलात तर खूप काही मिळेल आणि हरलात तर सगळंच गमवाल. तिथे ‘सेफ्टी नेट’ नसतंच. दुसरी संधीही नाही. ज्यांच्याकडे एखादी कॉलेजची पदवी नाही किंवा पर्यायी व्यवसायाचीही सोय नाही त्यांच्यापुढे भविष्यच उरत नाही. आता मात्र भारतीय क्रिकेटचं जाळं पैशाच्या बळावर चांगलंच विस्तारलं आहे. बऱ्याच खेळाडूंना चांगले पगार मिळू शकतात. अगदी प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्येसुद्धा खेळाडूंची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

आमच्यापैकी जे भारतीय संघामध्ये दाखल होऊ शकले त्यांच्यासाठी क्रिकेट हा केवळ पोटापाण्याचा व्यवसाय नाही. हे आम्हांला मिळालेलं वरदान आहे. ह्या खेळाशिवाय आम्ही अगदी सामान्य माणसंच राहिलो असतो आणि तसंच जगलो असतो. भारतीय क्रिकेटपटू म्हणून आमच्या आयुष्याचं चीज करण्याची एक संधी आम्हांला मिळाली आहे. किती जणांना अशी संधी मिळते? भारतीय क्रिकेटला बहर येण्याचा हा काळ आहे.

एकदिवसीय स्पर्धेमध्ये आम्ही जगात सर्वोत्कृष्ट आहोत. येत्या 12 महिन्यांत ऑस्ट्रेलियाशी, दक्षिण आफ्रिकेशी आणि इंग्लंडशी झुंज देणार आहोत, कोणता संघ सर्वोत्कृष्ट आहे हे ठरविण्यासाठी. पण मला वाटतं की, या वेळी आपण आपल्या खेळाबाबत आत्मनिरीक्षण करायला हवं. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या क्रिकेटच्या खेळाचं. आपल्याला काही धोक्याच्या सूचना आधीच मिळाल्या आहेत. त्यांची वेळीच दखल घेणं यातच शहाणपण आहे. भारतात झालेल्या एकदिवसीय स्पर्धेमध्ये मला काही महिन्यांपूर्वी आश्चर्याचा धक्काच बसला; आमचा खेळ पाहायला प्रेक्षकांची गर्दी नव्हती. म्हणजे स्टेडियम खचाखच भरलेलं असायचं तिथे तुरळक माणसं बसलेली असणं हे काही चांगलं लक्षण नक्कीच नाही. भारतीय संघ पहिला एकदिवसीय सामना नोव्हेंबर 1981 मध्ये खेळला. तेव्हापासून आतापावेतो असे 227 सामने भारतात झाले आहेत. मागच्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच भारताचा संघ खेळत असतानाही प्रेक्षकांनी गर्दी केली नव्हती. या उलट 1998 साली केनियाविरुद्ध आम्ही कलकत्त्यामध्ये एकदिवसीय सामना खेळलो तेव्हा ईडन गार्डन स्टेडियम पूर्ण भरलेले होते. त्यानंतर ग्वालिअरमध्ये दुसरा सामना झाला, रणरणत्या उन्हात 48 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात लोक घामाघूम झालेले असूनही खेळ पाहायला दाटीवाटीने बसले होते. ऑक्टोबरमधली इंग्लंडविरुद्धची मालिका आम्ही वर्ल्ड कप जिंकल्यानंतरची भारतात खेळलेली पहिलीच मालिका होती. आमच्या इंग्लंडच्या- ज्याचं स्मरण करू नये अशा सामन्यातील पराभवाचं उट्ट काढण्याची ही संधी होती असं म्हटलं जायचं. भारत प्रत्येक सामना जिंकत होता तरीही स्टेडियम मात्र तुरळक भरलेलं होतं. आणि विशेष म्हणजे इंग्लंडचा 5-0 असा पराभव झाल्यानंतर पाचच दिवसांनी ‘फॉर्म्युला वन’ रेस झाली ती पाहायला 95,000 लोकांनी हजेरी लावली! त्यानंतर काही दिवसांनी मी कलकत्त्यामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामना खेळलो. आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत कमी प्रेक्षकत्यावेळेस ईडन गार्डनमध्ये उपस्थित होते. अर्थात प्रेक्षक नसले तरी आम्हांला जिंकायचेच होते आणि प्रयत्न मुळीच कमी झाले नाहीत. तरीही अखेरीस आम्ही प्रेक्षकांसमोर आपला खेळ सादर करणारे, त्यांची करमणूक करणारे ‘परर्फॉर्स’ आहोत, आम्हांला प्रेक्षक हवे असतात. आमची प्रत्येक खेळी ते द्विगुणित करतात; जेवढे जास्त प्रेक्षक तेवढा सामना महत्त्वाचा, मोठ्या दर्जाचा आणि तेवढाच भावपूर्ण!

ईडन गार्डनमधल्या आजच्या गर्दीचा विचार करताना 2001 च्या संस्मरणीय कलकत्ता कसोटी सामन्याच्या वेळी जर 50000 प्रेक्षक कमी असते तर आम्हांला काय वाटलं असतं असा विचार माझ्या मनात येतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नुकतेच झालेले कसोटी सामने अत्यंत चुरशीचे होते. दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी त्यापैकी दोन मॅचेसमध्ये तर अत्युत्तम खेळ करून दाखविला. पण दुर्दैव हे की तो पाहायला अगदी तुरळक प्रेक्षक हजर होते. कसोटी सामन्यातील खेळाडूंना प्रेक्षकांची प्रचंड गर्दीच हवी असे नाही. कसोटीचं उत्साहित करणारं वातावरण प्रत्येक खेळाडूला हवं असतं. त्यातून त्यांना ऊर्जा मिळत असते. माझ्या मते प्रेक्षक कमी असण्याचं एक कारण आहे आजकाल मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जात आहे हे. त्यामुळे कदाचित काही प्रेक्षक कंटाळले असावेत. अर्थात हा अगदी बाळबोध तर्क झाला, कारण हे सर्वांनाच उघड दिसत आहे. पण हे एकच याचे कारण नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड ही एकदिवसीय सामन्यांची मालिका तशी संदर्भहीन होती, कारण हे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध काही आठवड्यांपूर्वीच एकदिवसीय सामने लढले होते. यानंतर एक महिन्याने भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामने झाले तेव्हा प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. पण एक फरक होता. हे सामने जिथे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात नाहीत अशा लहान लहान क्रीडांगणांवर खेळले गेले. या गोष्टीतून आपण काही धडे घेऊ शकतो. आणि जास्त सतर्क राहायलाही शिकू शकतो. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातील क्रिकेटला गल्ला गोळा करण्यासाठी किंवा प्रेक्षक जमविण्यासाठी किंवा त्यांच्या  मनात स्थान निर्माण करण्यासाठी इतर कोणत्याही खेळाशी स्पर्धा करावी लागलेली नाही. गर्दी कमी असण्याचा मिळकतीवर होणारा परिणामही तितकासा महत्त्वाचा नाही.

पण गेल्या दोन वर्षांत क्रिकेटबाबतचं वातावरण तेवढं उबदार राहिलेलं नाही हे आपल्याला मान्य करायलाच हवं. याची कारणं काहीही असोत; अजीर्ण होण्याएवढं क्रिकेट असो की प्रेक्षकांसाठी सोयीसुविधांचा अभाव असो. क्रिकेटप्रेमींनी आपल्याला स्पष्ट संकेत दिलेले आहेत आणि त्याकडे आपण योग्य लक्ष दिले पाहिजे. ही केवळ भावुकता नाही. रिकामं प्रेक्षागार टीव्हीवर पाहणं आल्हाददायक नसतं आणि वाईट दृश्यामुंळे ‘रेटिंग’ घसरतं. माध्यमातील आयोजक आणि जाहिराती देणारे प्रायोजक त्याकडे डोळ्यांत तेल घालून बघत असतात. ते ताबडतोब दुसरीकडे वळतील. तसं झालं तर क्रिकेटच्या प्रसारणाचे हक्क मिळविण्यासाठी त्यांची मागील 15 वर्षांत जी चढाओढ दिसली ती राहणार नाही. मग आपण काय करू शकू? इथे मी एखादा अर्थतज्ज्ञ किंवा वाईटच घडण्याचे भाकीत करणारा ज्योतिषी या नात्याने बोलत नाही. केवळ मला जे काही स्पष्ट दिसत आहे ते मी बोलतोय.

आपण सध्याच्या सुखवस्तू परिस्थितीवर खूष राहण्यात किंवा आपल्याला लाभदायक ठरणारे करार आणि हातात खुळखुळणारा पैसा यातच धन्यता मानू नये. पैशामुळे आपण आंधळे बनता कामा नये. ज्या ज्या गोष्टींनी क्रिकेटला क्रीडा जगतात ताकद आणि वर्चस्व मिळवून दिलं आहे त्या सर्वांच्या मुळाशी आहेत ते स्टेडियममध्ये बसणारे प्रेक्षक. त्यांचा मान आपण ठेवलाच पाहिजे; त्यांना गृहीत धरणं अयोग्यच नव्हे तर धोक्याचंही आहे. आपल्या चाहत्यांचा अनादर म्हणजे खेळाचाही अनादरच आहे. हे चाहते सर्व बऱ्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्यामागे ठामपणे उभे राहिले आहेत. आपण जेव्हा खेळतो तेव्हा आपल्याला त्यांचा विचार करायलाच हवा. खेळाडूंसाठी ईर्ष्या आणि प्रामाणिकपणा यामध्ये समतोल राखण तसं अवघड असलं तरी तो ठेवणं आवश्यक आहे. या खेळातील मूळ शिष्टाचार आपण जपले तर आपल्याला त्यातील मोठ्या संकटांना- मग हे संकट म्हणजे झटपट पैसा मिळविण्याच्या क्लूप्त्या असोत लिंवा ‘स्पॉट फिक्संग’चं आणि ‘बेटिंग’मधल्या भागीदारीचं आमिष असो- तोंड देणं सोपं होईल.

क्रिकेटला आर्थिक यश मिळालं म्हणजे बाहेरून येणाऱ्या संकटांनाही तोंड द्यावं लागणारच. गेल्या दोन दशकांमध्ये ह्याचा आपल्याला पुनःपुन्हा प्रत्यय आलेला आहे. इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे धूर्त लोक नेहमीच भ्रष्टाचारविरोधी कायद्यांच्या एक पाऊल पुढेच राहणार. पण खेळाडू म्हणून आपलं पाऊल पुढे राखण्यासाठी आम्हा खेळाडूंनी स्वतःची कोणतीही चाचणी घेऊ देण्यास आणि आपल्यावर देखरेख ठेवू देण्यास तयार राहिले पाहिजे- यामुळे आपल्या हिंडण्याफिरण्याच्या स्वातंत्र्यावर आणि खाजगी आयुष्यावर थोडेफार नियंत्रण येणार असले तरीही. त्यासाठी डोप टेस्ट देण्याची गरज असेल तर आपण ती मुकाट्याने द्यायला हवी, तिला नकार देता कामा नये.

‘लाय डिटेक्टर’ चाचणीची गरज असेल तर आपण ही टेक्नॉलॉजी समजून घ्यावी, तिचा हेतू समजून घ्यावा. ह्या चाचण्या बिनचूक किंवा परिपूर्ण नाहीत, पण निरपराध व्यक्तीस आपण गुन्हेगार नाही हे त्यांच्यामुळे सिद्ध करता येते. त्याबरोबरच आपल्या संपत्तीबाबत तपासणी करू देण्यास आपण अडथळा आणू नये. ज्या वेळेला भ्रष्टाचारविरोधी उपाय पहिल्यांदा अमलात आणले गेले त्या वेळेला आमचे सेलफोन मॅनेजरजवळ ठेवण्यात आणि चाचणी देण्याविरुद्ध आपण थोडी कुरकूर केली. पण आता आपण त्याकडे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेसारखं पाहिलं पाहिजे. हे सर्व आपल्या भल्यासाठीच असतं. ज्या खेळाने आपल्याला बरंच काही दिलं आहे त्यासाठी आपली थोडीशी खाजगी ‘स्पेस’ आणि ऐषोराम यांचा त्याग करायला आपण तयार असायला हवं.

तुम्ही लपविण्यासारखं काही केलंच नसेल तर मग भीती कशाची? क्रिकेटमध्ये घेतलेले भष्टाचारविरोधी उपाय इतर खेळांनीही आता आपला कारभार स्वच्छ ठेवण्यासाठी उचलले आहेत. आणि आपण एका शिस्तबद्ध आणि प्रगतिशील खेळाचे खेळाडू आहोत याचा आपल्याला रास्त अभिमान वाटला पाहिजे. या खेळापुढे सर्वांत महत्त्वाचं आव्हान आहे ते माझ्या मते क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांची योग्य आखणी करून पुढील मार्ग निश्चित करण्याचं आव्हान. प्रत्येक प्रकारामध्ये तेवढेच सामने खेळता येणं अशक्य आहे हे आपल्याला आता कळून चुकलं आहे. असं केल्यास सामन्यांचं वेळापत्रक आणि खेळाडूंचा विकास दोन्हीही रुळावरून घसरतील. तिन्ही प्रकारांना पुरेसा वाव आहे. तीन प्रकारांत खेळला जाणारा क्रिकेट हा एकमेव खेळ आहे आणि क्रिकेटमधलं हे नावीन्य, ही कल्पकता आपण जपली पाहिजे. या तीन प्रकारच्या खेळांसाठी जी वेगवेगळी कौशल्ये लागतात ती त्या प्रकारातूनच विकसित झाली आहेत आणि आता वाढीस लागली आहेत.

गेल्या चार दशकांमध्ये या कौशल्यांमध्ये बदल घडत आहेत आणि त्यांचा एकमेकावर प्रभाव पडत आहे. टेस्ट क्रिकेट- क्रिकेटमधले कसोटी सामने-म्हणजे शुद्ध सोनं. हाच प्रकार खेळायला सर्व खेळाडूंना हवा असतो. 50 षटकांच्या खेळाने गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून होणारी आवक चालू ठेवली आहे. ट्वेंटी 20 हा प्रकार लोकांना आणि आमच्या चाहत्यांना हवा असतो म्हणून आम्ही स्वीकारला आहे. यातून एक मध्यम मार्ग क्रिकेटने शोधला पाहिजे; वर्षाकाठी दोन कसोटी सामन्यांचे दौरे, सात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि भरीला काही ट्वेंटी 20 चे सामने या भरगच्च कार्यक्रमांच्या फिरत्या चक्रामध्ये संघ आणि खेळाडू अडकले आहेत; त्याची गती  आपल्याला कमी केली पाहिजे. कसोटी सामने टिकविणे आवश्यक आहे. त्यांच्यावरूनच जगातील उत्कृष्ट खेळाडू कोण ते ठरवले जाते. आमच्याकडे दोन देशांतील सामन्यांमुळे क्रिकेट इतकं लोकप्रिय झाले. जेव्हा एखादा देश त्याच्या काही उत्कृष्ट खेळाडूंशिवाय खेळतो आहे अशी बातमी कानावर येते तेव्हा त्या खेळाडूंच्या चाहत्यांना काय वाटत असेल असा विचार माझ्या मनात येतो. लोक प्रत्यक्ष खेळ बघायला हजर राहू शकले नाहीत तरी ‘स्कोअर’ किती झाला याकडे ते बघतच असतात. म्हणून कसोटी सामने बघायला 65000 लोक आले नाहीत तरी आपण जोमाने लढलेच पाहिजे आणि जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. आणि त्यातून कसोटीच्या ज्या वातावरणाचा आस्वाद चाहते आणि खेळाडूंना हवा असतो ते वातावरण निर्माण केले पाहिजे. तरीही रिकाम्या मैदानावर कसोटी सामना खेळण्याऐवजी दुसरं काहीही चालेल. म्हणून आपल्याला जे सामने लोक वेळ काढून पाहतील असे कसोटी सामने सादर करायला हवेत.

दिवस-रात्र कसोट्या किंवा विजेपदासाठीच्या अशा कसोट्या रद्दबातल कराव्यात असे मला वाटत नाही. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये मी प्रथम श्रेणीच्या दिवस-रात्रीच्या कसोटीत मेलबोर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) साठी खेळलो. तेथे मला आलेल्या अनुभवावरून असे वाटते की दिवस-रात्र कसोटी या कल्पनेचा जास्त गंभीरपणे विचार व्हायला हवा. काही ठिकाणी काही अडचणींना तोंड द्यावे लागले तरी क्रिकेटचा गुलाबी चेंडू दिसण्याची किंवा तो टिकण्याची अडचण मात्र मुळीच भासत नाही. तसेच कसोटी विजेतेपदासाठी प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू पराकाष्ठा करीत असतो, हाच संदर्भ प्रत्येक खेळासाठी पुरेसा आहे. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवणे म्हणजे देशा-देशांतून वेगवेगळ्या कल्पना निर्माण होणे: क्रिकेट कसोट्या लहान लहान शहरांधून खेळणे; न्यूझीलंडप्रमाणे सामने छोट्या मैदानांवर खेळणे, वेस्ट इंडीजसारख्या काही जुन्या ठिकाणांचा विचार करणे किंवा अर्जेन्टिनासारखा मनोरंजनाच्या मैदानांचा उपयोग करणे अशा कल्पनांचा विचार करता येईल.

मी जेव्हा सात वर्षांचा होतो त्यावेळेस माझे वडील शुक्रवारी सुट्टी घ्यायचे. त्यामुळे आम्ही तीन दिवसांचा कसोटी सामना एकत्र बसून पाहू शकत असू. जेव्हा ते नेऊ शकत नसत तेव्हा मी त्यांच्या एखाद्या मित्राबरोबर सामना पाहायला जात होतो. कसोटी क्रिकेटचा एक एक दिवस अंगात भिनावा म्हणून आणि त्यातील नाट्य हळूहळू उलगडताना पाहता यावं म्हणून. कसोटी सामने 21 व्या शतकाच्या जीवनात कसे चपखल बसवता येतील; त्यासाठीचा काळ-वेळ, वातावरण, जिथे खेळ खेळला जाणार ती जागा इत्यादी कसे निश्चित करायचे याचे मार्ग शोधायला लागतील. आणि या जलद गतीने धावणाऱ्या, अरुंद अवधान कक्षेच्या (ॲटेन्शन स्पॅन) जगातसुद्धा आपण हे करू शकू याची मला अजूनही खात्री आहे. आपल्याला वारंवार असं सांगितलं जातं की, आर्थिकदृष्ट्या कसोटी सामने खेळवणं फारसं शहाणपणाचं नाही. परंतु आजपर्यंत कोणीही व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कसोटी क्रिकेटच्या प्रेमात पडलेला नाही. सर्वच मूल्यवान वस्तू किंमत मोजून मिळत नसतात. सध्या एक प्रस्ताव मांडण्यात येत आहे; 50 षटकांच्या मॅचेस पूर्णतः रद्द करण्याचा. मला हे विशेष पटत नाही. या 50 षटकांच्या मॅचमुळे आम्हांला आमच्या फलंदाजीत नवनवीन फटके व कल्पना सुचल्या आणि मग ते फटके आम्ही कसोटी सामन्यातही उपयोगात आणू लागलो. तसेच क्षेत्ररक्षणाचा दर्जाही 50 षटकांच्या सामन्यांमुळे खूप सुधारला हे सर्व जण जाणतात. भविष्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने इंटरनॅशनल क्रिकेट क्लबने (आयसीसी) आखलेल्या कार्यक्रमांच्या अवतीभोवतीच खेळले जाण्याची शययता आहे; चँपियन ट्रॉफी आणि वर्ल्ड कप सारखे. त्यामुळे या दोन क्रीडासत्रांची तयारी करण्यासाठी 50 षटकांचे सामने उपयोगी ठरतील. त्यामुळे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या थोडी घटेल; परंतु जे खेळले जातील त्या सामन्यांना काही संदर्भ तरी असेल. साधारण 1985 पासून ‘हल्ली एकदिवसीय सामने फार खेळले जातात, त्यातील कित्येकांना काही अर्थच नसतो’ असं अनेक लोक म्हणू लागले आहेत. मला वाटतं आता याबाबत काही तरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

ट्वेंटी 20 बद्दल म्हणाल तर या प्रकाराचे जितके चाहते आहेत तितकेच त्याची निंदा करणारेही आहेत. ट्वेंटी 20 मधला ‘स्ट्राइक रेट’ साधारणपणे 120 एवढा असतो; तेव्हा मीच सगळ्यांच्यापेक्षा त्याबद्दल जास्त तक्रार करायला हवी. या ट्वेंटी 20 च्या सामन्यांना आपण योग्यपणे हाताळलं नाही तर या खेळामध्ये जास्तीत जास्त ‘वैयक्तिक, खाजगी खेळाडू घुसतील; केवळ केकचे काप (इतरांना) देण्यासाठीच नव्हे तर बरेच मोठे काप लाटण्यासाठी सुद्धा! प्रेक्षकांची गर्दी आणि त्यांच्यातून होणारा नफा आपल्याला नेमके हेच सांगत आहेत.

आता जे मी बोललो तेच मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगेन की आपल्याला या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये समतोल साधणं अत्यावश्यक आहे. आतापावेतो आपण जसे कसोटी सामने खेळत आलो तसेच सामने सध्या खेळतो; एक देश विरुद्ध दुसरा, असेच परंतु अतिशय काळजीपूर्वक नियोजन करून. हेतू हा की मोठ्या संख्येने चाहते बघायला यावेत, प्रत्येक कसोटी सामना खेळणाऱ्या देशाला त्याचा कसोट्यांचा वाजवी हिस्सा मिळावा आणि प्रत्येक खेळ विजेतेपद किंवा करंडक मिळविण्याच्या ईर्ष्येने व्हावा, केवळ क्रमवारी ठरविण्यासाठी नव्हे.

50 षटकांच्या सामन्यांचे लक्ष्य असते थोडे परंतु महत्त्वाचे असे आयसीसीने आखलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वचषकासारखे बहुदेशीय सामने. एका विश्वचषक सामन्यानंतर चार वर्षांनी दुसरा सामना येईपर्यंतच्या मधल्या काळात एकदिवसीय सामन्यांचे व्यवस्थित आयोजन करावे-त्यांचे कॅलेंडर निश्चित करावे. आणि या मोजक्या पण महत्त्वाच्या सामन्यांवरून प्रत्येक देशाची क्रमवारी ठरवावी. सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपेक्षा इतर कोणताही पर्याय अर्थपूर्ण ठरेल.

ट्वेंटी 20 च्या प्रकाराला योग्य भूमिका बजावता येईल स्वदेशी चढाओढींमध्ये; याबाबतीत अधिकृत संघ खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या क्रिकेटकडे आकर्षित करतील. यामुळे ज्या देशांमध्ये क्रिकेटला जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आणि जनमानसात क्रिकेटविषयी आस्था निर्माण करण्यासाठी झगडावे लागते तिथेही क्रिकेट टिकाव धरू शकेल. आपणा सर्वांपेक्षा क्रिकेटचा खेळ श्रेष्ठ आहे, म्हणून आजची स्थिती काय आहे याच्या बरेच पलीकडे जाऊन आपल्याला क्रिकेटचा विचार करायला हवा.

2020 साली आपण कुठे असायला हवं? 2027 मध्ये, पहिला कसोटी सामना खेळला गेला या घटनेला 150 वर्षं होतील. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटशी आपली संगत आधुनिक मोटरकार पेक्षाही जास्त जुनी आहे. आधुनिक विमानांनी उड्डाण करायला सुरुवात केली त्याच्याही आधी क्रिकेट अस्तित्वात होते. क्रिकेटच्या भविष्यातील विकासाला क्रिकेटमधून मिळणाऱ्या पैशाची जशी गरज आहे तशीच क्रिकेटच्या परंपरा आणि क्रिकेटच्या चैतन्याचीही गरज आहे. एकाच प्रकारचे क्रिकेट भरमसाठ खेळून आणि दुसरा प्रकार अगदी कमी खेळून आपण परंपरा आणि चैतन्य दोन्ही घालवून देऊ नयेत. व्यावसायिक मानसिकता असलेल्या माझ्या पिढीच्या क्रिकेट खेळाडूंना उच्चप्रतीचं जीवन मिळालं आणि- आम्ही अनेकदा अति श्रम, फार प्रवास किंवा थकवा दूर होण्यास अवधी न मिळाल्याची तक्रार करीत असलो तरी- आम्हांला याची पूर्ण जाणीव आहे.

 आम्ही जेव्हा असा तक्रारीचा सूर लावतो तेव्हा आम्हांला सचिनच्या ब्रॅडमनशी झालेल्या संवादाची आठवण करायला हवी. सचिनने सर डॉन यांना ‘महान खेळासाठी तुम्ही मानसिक तयारी कशी करता? तुमचा नित्याचा कार्यक्रम काय असतो?’ असे विचारले होते. त्यावर सर डॉन म्हणाले, ‘खेळ सुरू होण्याअगोदर बराच वेळ मी काम करीत असतो आणि खेळ संपल्यानंतर मी काम करायला जातो’. जेव्हाजेव्हा एखाद्या क्रिकेटरच्या मनात कुरबूर करण्याचा विचार डोकावेल तेव्हातेव्हा त्याने या दोघा दिग्गजांच्या मधला हा संवाद आठवावा.

माझं भाषण संपवण्याअगोदर मला माझ्या कारकिर्दीमध्ये वारंवार आलेला एक अनुभव आपल्याला सांगायचा आहे. यामध्ये कोणा व्यक्तीचा अगर प्रसंगाचा संबंध नाही. पण तो आपल्याला सांगणं महत्त्वाचं आहे. केव्हाकेव्हा खेळ चालू असताना मी ‘स्लिपशी’ उभा असतो किंवा फलंदाजी होत नसलेल्या टोकाशी आणि मला एकदम जाणवतं की आजूबाजूचं सर्व काही नाहीसं झालंय. आणि त्या क्षणी अस्तित्वात असते ती केवळ स्पर्धा आणि हा खेळ खेळण्यातून मिळणारा आनंद! हा अनुभव एक चिंतनीय अनुभव असतो. त्यातून कैक वर्षांपूर्वी तुम्ही या खेळाशी जोडले गेलात तितक्याच दृढपणे या क्षणी पुन्हा जोडले जाता. जसे तुमच्या पहिल्या चौकाराच्या वेळी, पहिला महत्त्वाचा झेल घेताना, पहिले शतक ठोकल्यावर किंवा पहिल्या मोठ्या विजयाचे भागीदार झाल्यावर हरखून जाता; अगदी तसेच. ही मनाची अवस्था क्षणभरच टिकते, पण हा क्षण अत्यंत मोलाचा असतो आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडूने तो आपल्या उरात जपून ठेवावा असा असतो.

व्यावसायिक क्रिकेटपटूंनी हौशी खेळाडूंसारखे खेळावे अशी अपेक्षा अगदी अवास्तव आहे; पण व्यावसायिकतेबरोबर या हौशी खेळाडूंमध्ये दिसून येणारं- शोध घेण्याचं, नवीन शिकण्याचं, निर्भेळ आनंदाचं, नियमानुसार खेळण्याचं अवसान, चैतन्य- हे मात्र जोपासावं. ते सराव करताना किंवा खेळताना किंवा मैदानावर ‘व्हाइट लाइन फीवर’ची साथ पसरली असली तरीही कायम ठेवावं.

प्रत्येक क्रिकेटपटूमध्ये एक स्पर्धक असतो ज्याला हरणं अजिबात पसंत नसतं. आणि जिंकणं महत्त्वाचं असतं. पण तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा हार-जीत ही एकमेव महत्त्वाची गोष्ट नसते. तुम्ही कसं खेळता हेही प्रत्येक टीमच्या प्रत्येक खेळाडूसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण खेळलेल्या प्रत्येक गेमच्या पाऊलखुणा क्रिकेटच्या इतिहासात उमटलेल्या राहतात. हे आपल्याला विसरून जाता कामा नये.

आम्ही व्यावसायिक खेळामध्ये जे जे करतो ते सर्व फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररण, आव्हान देणं, दाद मागणं, निषेध करणं, वाद घालणं- सारं सारं हौशी खेळाडूंच्या खेळात उतरतं. 2027 सालच्या खेळाडूंमध्येही आपले आणि आपल्या काळाचे प्रतिबिंब दिसणार आहे. आणि आपल्या पन्नाशीमध्ये त्यामुळे आपल्याला राग येईल किंवा आपण खजील होऊ असे ते नसावे.

खेळाचे रखवालदार म्हणून झटपट मिळणाऱ्या फायद्याची (अधोगतीकडे पाऊल टाकणारी) ओढ आपल्याला असता कामा नये.

प्रगतीकडे एक मोठी झेप घेणारी पिढी म्हणून आपण लोकांच्या स्मरणात राहू या.

मला येथे येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल, माझे विचार आपल्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल व माझे विचार शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद.

अनुवाद : सुमन ओक  

Tags: स्पॉट फिक्संग ईडन गार्डन स्टेडियम रणजी ट्रॉफी indian economy भारताचे अर्थकारण सचिन तेंडुलकर के.एन.प्रभू लॉर्डस मैदान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- India vs Australia second world war दुसऱ्या महायुद्ध गॅलिपोली पहिली कसोटी मालिका क्रिकेट स्टीव वॉचे आत्मचरित्र ‘आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन’ कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड डोनाल्ड ब्रॅडमन राहुल द्रविड Spot Fixing Eden Graden Stadium Ranaji Trophy Sachin Tendulkar K. N. Prabhu lords stadium Galipoli First Test match cricket steve watch biography out of my comfort zone Canberra australia prime minister john howard donald bradman Rahul Dravid weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राहुल द्रविड

माजी भारतीय क्रिकेटपटू. माजी कप्तान - भारतीय क्रिकेट संघ. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके