डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मास्तरांच्या मैफलीमध्ये आनंदाचेच साम्राज्य पसरलेले असायचे. सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधत ते गायचे त्यामुळे प्रत्येकालाच मास्तर आपल्यासाठीच गात आहेत असे वाटायचे. मास्तरांचे चिरंजीव राजाभाऊ पित्याच्या अवखळपणाच्या आठवणींमधून त्यांचे हसणारे आणि हसवणारे चित्र रेखाटत आहेत.

"हा कृष्णा लहानपणापासून असाच व्रात्य आणि आनंदी स्वभावाचा. गरिबीमुळे चड्डीला ठिगळ असले तरी हा भास्करबुवांनी दिलेली जरीची टोपी झोकदारपणे डोक्यावर घालून बुवांच्या इतर शिष्यमंडळींबरोबर हिंडायचा. रस्त्यातून हसतखेळत व क्वचित भेटलेल्या काही नमुनेदार माणसांची त्यांच्या नकळत खिल्ली उडवत चालायचा. पण हा अवखळपणा भास्करबुवांच्यापुढे तालमीला बसेपर्यंतच असे. एकदा तालीम सुरू झाली की हा अत्यंत एकाग्रतेने मनापासून गाणे शिकायचा"...सांगत होते मास्तरांपेक्षा ज्येष्ठ पण लहानपणापासून त्यांच्या सहवासात असलेले गणपतराव श्रीगोन्देकर. आणि हे ऐकताना आमच्या बरोबर मास्तरसुद्धा खळाळून हसायचे. 

आनंद व विनोद हा मास्तरांचा स्थायीभावच होता आणि कितीही अडचणी, व्याधी आल्या तरी या स्वभावाने त्यांची संगत शेवटपर्यंत सोडली नाही. त्या वेळी मोठ्या श्रीमंत घराण्यांतील मुलांच्या मुंजी लावत असत. अशाच एका घराण्यातील मुलांच्या मुंजीबरोबर मास्तरांची मुंज झाली. ते घराणे म्हणजे बॅ. गाडगीळ स्ट्रीटवरच्या गाडगीळांचे. मुंजमुलांची भिक्षावळ मोठ्या थाटामाटाने वाजत-गाजत निघाली होती. पण कृष्णाची भिक्षावळ कोण काढणार? तेव्हा त्यांच्या थोरल्या बंधूंनी त्याला आपल्या खांद्यावर घेऊन जोगेश्वरी व कसबा गणपतीला नेऊन आणले. मारुतीच्या खांद्यावर राम-लक्ष्मण ज्या रुबाबात बसले होते तशा रुबाबात मी बसलो होतो असे मास्तर आम्हाला सांगायचे. 

मास्तर गेल्यानंतर एकदा विनायकबुवा पटवर्धन आमच्या घरी आले होते. तेव्हा मी विचारले, "बुवा, तुम्ही मास्तरांना पहिल्यांदा कधी बघितलेत?" तेव्हा विनायकबुवा म्हणाले, "माझी थोरली बहीण जोगेश्वरीच्या बोळात सासरी राहत होती. मी तिच्याकडे सुट्टीत मिरजेहून येऊन राहत असे. एका सुट्टीत मी सर्वांबरोबर त्या काळी गाजलेले 'संत-सखू' नाटक बघण्यास गेलो. त्या नाटकात सवाईगंधर्वांबरोबर मास्तरांची 'विठोबा'ची भूमिका असायची व त्यांचे 'भक्तजन सदा' हे पद अतिशय रंगायचे. नाटकाच्या दुसऱ्या दिवशी मी घराच्या खिडकीत उभा होतो तेव्हा 'ॐ भवति भिक्षांदेहि' असा गोड आवाज कानावर पडला. मी धावत जाऊन माझ्या बहिणीला सांगितले, "अगं तो कालच्या नाटकातला छोटा विठोबा कृष्णा आलाय. त्याला माधुकरी वाढ.””

मास्तर घरी रोज चांदीच्या ताटात जेवायचे. त्याचे रहस्य मला नंतर उमगले की, या लहान कृष्णाचे स्वप्न होते - मी पण एके दिवशी अशाच चांदीच्या ताटात जेवीन. मूळच्या सधन घराण्यावर आपत्तीमुळे ओढवलेली गरिबी व त्या अनुषंगाने आलेले अपमानाचे प्रसंग व काही कडवट गोष्टी, पण त्यांच्या स्वभावात कटुता कधीच आली नाही. या सर्व गोष्टींवर त्यांच्या उपजत विनोदी व आनंदी स्वभावाने कुरघोडी केली. मास्तरांच्या व्रात्य स्वभावाचे उदाहरण म्हणजे एकदा पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या गाण्याच्या वेळेला मास्तर तंबोऱ्यावर साथीला बसले. वझेबुवांसारखे सही सही गाऊ लागले. सुरुवातीला बुवांना मोठे कौतुक वाटले. पण थोड्या वेळाने हे जरा अतीच झाल्यामुळे, कृष्णा आपली नक्कल करतोय की काय, असे त्यांना वाटायला लागले. समोर भास्करबुवा बसले होते, ते मास्तरांना हाताने 'नको - नको' अशा खुणा करत होते. गाणे संपले तेव्हा वझेबुवा रागाने पाठीमागे लागले. मास्तर पळून भास्करबुवांच्या मागे जाऊन लपले तेव्हा वझेबुवा भास्करबुवांना म्हणाले, बुवा, "तुम्ही या किशाला फार लाडावून ठेवलेत! बेटा माझी नक्कल करतो काय? आज मी त्याला सोट्याने मारल्याशिवाय राहणार नाही." तेव्हा भास्करबुवा म्हणाले, "जाऊ द्या हो बुवा, किशा जरा अल्लड आहे, एवढे काय मनावर घेता?" उभयपक्षी तडजोड होऊन एक सोटा मारायचे ठरले. मास्तर म्हणाले, "बुवासाहेब, मारा पण चांदीच्या मुठीच्या बाजूने मारा." शेवटी वझेबुवांकडून एक रट्टा खावाच लागला. पण वझेबुवांचे मास्तरांवर फार प्रेम होते. त्यांच्या पुण्यातील मुकामात आठवडयातून 2-3 वेळा तरी ते मास्तरांना भेटायला येत हे मला आठवते. अल्लादियाखाँसाहेब जेव्हा मुंबईला नसायचे तेव्हा केसरबाईंना भास्करबुवा तालीम यायचे. त्यांच्याबरोबर मास्तर असायचे तेव्हा केसरबाईची व मास्तरांची तालीम एकत्र व्हायची. केसरबाई म्हणायच्या, "मास्तर विद्वान पण वात्रट."

मास्तर त्यांच्या हजरजबाबीपणाबद्दल प्रसिद्ध होतेच. एकदा एका संगीतज्ञाने त्यांना अत्यंत गंभीरपणे विचारले की, मास्तर तुम्ही फार चांगल्या चाली देता बुवा! इतक्या चांगल्या चाली तुम्हांला सुचतात कशा? मास्तरांनी तितक्याच गंभीरपणे उत्तर दिले, 'माझ्या चाली चांगल्या असतात, कारण मी मूळचाच चांगल्या चालीचा आहे." मास्तरांचे व्यक्तिमत्त्वच अत्यंत प्रसन्न व आनंद निर्माण करणारे होते. 

प्रा. ना. सी. फडके यांचा आणि मास्तरांचा चांगला स्नेह होता. मधून मधून मास्तर ना. सी. फडक्यांच्या घरी चक्कर मारीत. 'मास्तर आमच्या घरी येत व हास्याची कारंजी उडवून जात', असे कमलाबाई फडक्यांनी त्यांच्या आठवणीत सांगितले आहे. रामभाऊ मराठे म्हणत, “मास्तर मैफलीमध्ये आले की फुलांचा बगीचा फुलल्यासारखा वाटे, इतके प्रसन्न त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.” वेडयावाकडया चेहऱ्याची माणसे मास्तरांना बैठकीत चालत नसत. मग ते रामभाऊंना म्हणत, “तो अक्राळविक्राळ मिशांचा धटिंगण बघ! अशी माणसे गाणे ऐकायला येतात ती येतात, पण अगदी समोर कशाला बघतात कोणास ठाऊक!” मास्तरांच्या मैफलींमध्ये आनंदाचेच साम्राज्य पसरलेले असायचे. 

सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधत ते गायचे त्यामुळे प्रत्येकालाच मास्तर आपल्यासाठीच गात आहेत असे वाटायचे. वृद्धत्वामुळे मास्तर अनेक व्याधींनी गांजत चालले होते, पण मनाने मात्र सदा टवटवीत होते. तारुण्य सोडाच पण त्यांच्या मनाचे बाल्यही कधी संपले नव्हते. ‘देवीकल्याण' रागातील त्यांची स्वरचित बंदिश आहे. काहीसा दुर्गा थाटाचा हा राग आहे. त्या बंदिशीच्या शब्दातून मास्तर जणू त्यांच्या स्वभावाचा स्थायीभावच व्यक्त करत असावेत.

मेरो मन अत उल्हासा!

Tags: वझेबुवा  अल्लादियाखाँ केसरबाई ना.सी. फडके राजा फुलंब्रीकर Vajhebuwua Alladiyakhan Kesarbai N.C.Fadake Raja Fuambrikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके