डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मे महिन्यात 17 ते 20 या तारखांना पुणे आकाशवाणीवरून चिंतन या सदरात श्री. राजा मंगळवेढेकर यांची चार व्याख्याने झाली. बालमन, वृत्तिप्रवृत्ती यांचे नाजुकपणे परिशीलन करणारे हे दुसरे व्याख्यान…

गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी म्हटलं आहे, "बालकांचं शिक्षण विश्वप्रकृतीमधील उदार रमणीयतेच्या द्वारा उन्मेषित व्हावं. मूल मोठे कल्पनाशील असतं. ते मातीचं एक लहानसं घर बनवतं आणि त्यालाच किल्ला अथवा राजवाडा समजतं. मग गवताच्या काही काड्या मातीत रोवून उभ्या करतं आणि सांगतं की, 'पहा, राजाचं सैन्य येत आहे!'... एका राजाची दुसऱ्या राजाविरुद्ध लढाई दाखविण्याची त्याला जर इच्छा झाली तर ते दुसऱ्या विरुद्ध बाजूला आणखी काही काड्या रोवतं आणि सांगतं, 'पहा, दोन्ही राजांचे सैनिक लढत आहेत!' नंतर वाळूचा ढीग रचून ते म्हणतं, 'हा झाला राजमहाल!'... असं सारखं त्याचं चाललेलं असतं. या करण्यामधूनच नवनव्या कल्पनांचा त्याच्या चिमुकल्या मनात उदय होत असतो. त्यासाठी वाळू, गवत, काड्या इत्यादी मोठ्यांच्या दृष्टीनं क्षुद्र असणाऱ्या वस्तूच त्याला साधनरूप ठरत असतात आणि समाधान देत असतात.

मुलांची ही सगळी धडपड म्हणजे त्यांच्या भावी जीवनाची अभिव्यक्तीच असते. थोडं कळू लागताच मुलांना स्वतःला अभिव्यक्त करावं, प्रकट करावं असं वाटू लागतं. पण स्वतःला अभिव्यक्त, प्रकट करण्यासाठी संधीची व माध्यमांची त्यांना आवश्यकता असते. खेळ, गाणं, गोष्ट, नृत्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प, छंद, भ्रमण... या आनंदाच्या दशपदी माध्यमांचा त्यांना यासाठी फार-फार उपयोग होत असतो. या माध्यमातूनच स्वतःला अभिव्यक्त (Expose) करण्यासाठी ती सदैव धडपडत असतात, उत्कंठित झालेली असतात. तसं पाहिलं तर, सर्वच ललितकलांचा जन्मदेखील माणसाच्या स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या आत्यंतिक मानसिक गरजेतूनच झालेला आहे. ही सांस्कृतिक गरज किंवा भूक आणि तिच्या परिपूर्तीसाठी धडपड, हेच माणसाचं 'माणूस' म्हणून वैशिष्ट्य आहे! 

संस्कार किंवा संस्कृती ही एक मूल्यवर्धक प्रक्रिया आहे. सांस्कृतिक भूक ललितकलांच्या द्वारा भागविताना माणसांमधील कल्पकता व सर्जनशीलता टवटवीत बनून आणखी नवनिर्मिती होत जाते. निर्मितीची किंवा कोणत्याही नवसर्जनाची प्रक्रिया ही मूलतः आनंददायिनीच आहे. म्हणून बालकांनादेखील या कथा संगीत नृत्य-नाट्यादी आनंदप्रवृत्ती आनंदाचा ठेवाच उपलब्ध करून देत असतात! मुलांना प्रत्येक कृती (Action) ही खेळासारखी (Playful) क्रीडानंदानं ओतप्रोत वाटली पाहिजे. अशा कृतीमधूनच त्यांच्या संवेदना तरल, जागृत बनतात आणि ती उदंड, निर्मळ, निरागस, अनुपमेय आनंदाचा आस्वाद घेऊ शकतात.

सुप्रसिद्ध इंग्रज नाटककार बर्नार्ड शॉ यांनी ललित कलांबद्दल मोठा मार्मिक अभिप्राय व्यक्त केला आहे. शॉ म्हणतात, "। am simply calling attention to the fact that art is the only teacher except Torture." *कष्टाशिवाय शिक्षण देणारी एकमेव शिक्षिका जर कोणी असेल तर ती ललितकला आहे, या वस्तुस्थितीकडेच मी आपले लक्ष वेधू इच्छितो!'

डॉक्टर अल्बर्ट थाइत्झर ह्या प्रख्यात प्रयोगशील विचारवंतानं म्हटले आहे, "जो चैतन्याच्या सर्व आविष्कारांशी मैत्री करतो, तोच भला माणूस असतो." चैतन्याचे सगळे आविष्कार निसर्ग आणि निसर्गामधूनच प्रस्फुरित झालेली ही ललितकला म्हणजे आनंदप्रवृत्तीचा आत्माच आहे.

माथ्यावरच्या विशाल निळ्या आभाळाशी दोस्ती करायला, वाहत्या झऱ्याशी आणि नद्यांशी गुणगुणायला, भोवतालच्या हिरव्यागार वृक्षवेलींशी आणि रंगीबेरंगी कळ्याफुलांशी गप्पागोष्टी करायला, तसेच पशुपक्ष्यांशी हितगुज करायला आजची प्रस्थापित शाळा किंवा शिक्षण शिकवीत नाही. त्यामुळे जीवनात मुलांना केवढ्या तरी मोठ्या आनंदाला मुकावे लागत आहे, वंचित राहावं लागत आहे. ही वंचना दूर करण्यासाठी मुलांना प्रत्यक्ष चैतन्यमय निसर्गातच नेलं पाहिजे. तो सुखानुभव त्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यासाठी सकल सृष्टी मुलांपुढं सदैव उघडी खुली असली पाहिजे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची ही खरी गुरुकिल्ली आहे!

Tags: गाणं  खेळ रवीन्द्रनाथ टागोर निसर्ग मुलं Songs Games Rabindranath Tagore Nature Children weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके