डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मे महिन्यात 17 ते 20 या तारखांना पुणे आकाशवाणीवरून 'चिंतन' या सदरात श्री. राजा मंगळवेढेकर यांची चार व्याख्याने झाली. बालमन, वृत्ति प्रवृत्ती यांचे नाजुकपणे परिशीलन करणारी ही व्याख्याने क्रमाने देत आहोत.

एकदा अशीच एक आई मॉन्टेसरी बाईंकडे आली आणि म्हणाली, "परवा माझ्या दोन वर्षांच्या मुलानं खोलीतल्या टेबलावरचा पाण्यानं भरलेला जग घेतला आणि तो पळत-पळत निघाला. त्याच्या शक्तीच्या मानानं जग मोठा होता आणि भरलेला होता. पण त्यानं खटपट करून तो उचलला आणि पेलवत नसतानादेखील खाली पडू नये म्हणून, त्याची काळजी घेत तो पळत होता, ते माझ्या धाकानं आणि घडलंही तसंच. जग घेऊन पळताना पाहून मी झटकन धावत पुढे झाले आणि त्याच्या हातून जग काढून घेतला, उंच जागी सुरक्षित ठेवला. यात माझ्या मुलाला फार फार अपमान वाटला. तो रडायला लागला. मला वाईट वाटलं. दुःख झालं. खरं तर, तो जग उचलताना त्याला त्रास पडू नये, शीण होऊ नये, असाच माझा उद्देश होता."

मॉन्टेसरीबाईंनी ही हकीकत लक्षपूर्वक ऐकली आणि त्यांच्या चटकन् लक्षात आले की, आई मुलाच्या साहाय्यासाठी जी धावली ती त्याच्या विषयीच्या सहानुभूतीच्या भावनेतून नव्हे तर मायेच्या मोहभावनेतून ती धावली होती. कारण मुलाच्या हातून पाण्याने भरलेला तो जग जर खाली पडला, तर खाली जमिनीवर अंथरलेला भारी किमतीचा गालिचा खराब होईल अशी भीती तिच्या मनात उभी राहिली होती. गालिच्याचा मोह तिच्या मनात होता.

मॉन्टेसरीबाईंनी त्या आईला असा सल्ला दिला की, "एखादी चिनी मातीची किमती आणि देखणी फुलदाणी मुलाला हाताळण्यासाठी टेबलावर ठेवून द्या."

आईने तसे केले आणि त्यातून जो अनुभव आला तो तिने बाईना येऊन सांगितला, “टेबलावर ठेवलेली सुंदर चिनीमातीची फुलदाणी माझा मुलगा खटपटीने उचलून घेऊन जाऊ लागला तेव्हा माझ्या मनात परस्परविरोधी अशा दोन भावना जागल्या होत्या. एका बाजूने मला ह्या चिंतेने ग्रासले होते की, माझी ही सुंदर फुलदाणी त्याच्या हातून खाली पडून फुटली तर? आणि दुसऱ्या बाजूनं मला जो फार आनंद वाटत होता, तो माझ्या मुलाच्या ती फुलदाणी उचलण्याच्या खटपटीचा!"

आईच्या कथनातील पहिली भावना मोहाची होती, तर दुसरी भावना माँटेसरीबाईच्या शिक्षणपद्धतीमुळे लाभलेली होती. कारण ती आई बाईच्या शिक्षणपद्धतीशी परिचित होती.

आम्ही मोठी माणसे आपल्या गरजेनुसार एखादी वस्तू उचलतो, तेव्हा आम्ही वस्तू कशी उचलावी हे जाणत असतो. परंतु मूल जेव्हा त्याच्या आंतरिक गरजेनुसार वस्तू उचलते तेव्हा वस्तु कशी उचलावी हे ते शिकत असते. छोट्यांचे शिक्षण आणि मोठ्याचे जाणणे यांत विरोध निर्माण होत असतो.

मूल आपल्या आंतरिक गरजेतून किंवा कुतूहलातून वस्तु उचलण्याची क्रिया करीत असते आणि त्याच वेळी शिकत असते. हे आमच्या प्रौढांच्या लक्षात येत नाही. आम्हाला एवढेच कळत असते की, मुलांनी किमती वस्तूंना हात लावू नये, त्या उचलू नयेत, त्या फोडू नयेत, मोडू नयेत. कधी-कधी तर आम्ही मुलांच्या ह्या खटपटीला 'विध्वंसक' किंवा 'विनाशकारी' शक्ती असे अती प्रौढ भाषेत म्हणतो. आणखी वरती मुलांच्या ठायी असणाऱ्या ह्या दुष्ट प्रवृत्तीला आळा घालणे हे आपले कर्तव्यच आहे, असे मानून कर्तव्यपूर्तीचे समाधानही लुटत असतो. पण त्या आईप्रमाणे दुसऱ्या प्रकारच्या भावनेने मिळणारा आनंद मात्र दवडत असतो.

वस्तू उचलण्यात, ती हाताळण्यात मूल जे शिकत असते, त्या शिकण्यासाठी जे प्रयत्न, खटपट, श्रम करत असते आणि त्यासाठी आपली जी बालबुद्धी वापरत असते, त्याचे मूल्य आम्हाला ठाऊकच नसते! आम्हा बहुसंख्य पालकांचे बालकांच्या या क्रियेविषयी घोर अज्ञान असते. हे अज्ञान आम्ही प्रौढ पालक लपवतो आणि कर्तव्यपूर्तीच्या नावाखाली किमती वस्तूंबद्दलचा मोह जपत असतो. या मोहात आणखीही एक मोह दडलेला असतो आणि तो म्हणजे प्रतिष्ठितपणाचा! अशा भारी किमतीच्या, कथित दुर्मिळ, सुंदर वस्तू आपल्याकडे आहेत ही वावही सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाची मानण्यात येते.

या मोहलोभामुळे पालकांचा कसा आणि किती फायदा होतो हे ठाऊक नाही, पण मुलांचे मात्र अपरिमित नुकसान होत असते, हे निश्चित. मोठ्यांच्या असल्या हव्यासापायी छोट्यांचे समग्र भावविश्व उस्कटून जात असते. त्यांची विकासक्रिया कुंठित होत असते आणि आपल्याच घरात एखाद्या वस्तुपुढे आपण 'नगण्य' आहोत, ही दुःखभावना त्यांच्यात नसलेले 'न्यून' उत्पन्न करीत असते. मोठ्यांच्या मोहलोभाचा हा भयंकर परिणाम निष्पाप छोट्यांना निष्कारणच भोगावा लागत असतो.

अशा कितीतरी, आपणा प्रौढांच्या मोहलोभापायी, आपण आपल्या मुलांना निर्मळ आनंदापासून वंचित करीत असतो. तर हे टाळू या! मुलांचे मूलपण जपू या!

Tags: पालक लोभ मोह मुलं राजा मंगळवेढेकर parents greed temptation children Raja Mangalvedhekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके