डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मे महिन्यात 17 ते 20 या तारखांना पुणे आकाशवाणीवरून ̔चिंतन' या सदरात श्री. राजा मंगळवेढेकर यांची चार व्याख्याने झाली. बालमन, वृत्ति प्रवृत्ती यांचे नाजुकपणे परिशीलन करणारे हे चवथे आणि शेवटचे व्याख्यान..

̔शाळा आणि शाळेतील नियत अभ्यासक्रम म्हणजेच शिक्षण' अशी, शिक्षणाप्रमाणेच संस्कारांसंबंधीही आपली एक ठोकळेबाज धारणा होऊन बसलेली आहे. अलीकडे तर ‘संस्कार' ह्या शब्दाची वारेमाप उधळपट्टीच चाललेली दिसते. ठिकठिकाणी संस्कारकेंद्रांचे पेव फुटल्यासारखे दिसते. उसाच्या गुऱ्हाळाप्रमाणे संस्कारांची अशी गुऱ्हाळे चालवून संस्कार करता येत नसतात. काळ बदलला, समाज बदलला, घर बदललं, पण जुनेपुराणे व कालबाह्य संस्कार मात्र जतन करण्याची आमची वृत्ती बदलत नाही, बदललेली नाही.

सगळेच संस्कार सार्वकालिक असतात असं नाही. काही थोडे तसे असतात आणि बाकी परिवर्तनशील असतात. म्हणून नव्या बदललेल्या संदर्भात जुन्यातील काही सुसंस्कार उरतील, पण पुष्कळसे कालबाह्य ठरलेले संस्कार निपटून टाकावे लागतील आणि त्यांच्या जागी कालानुरूप नव्या संस्कारांची प्रस्थापना करावी लागेल. पण त्याचीदेखील सहज प्रक्रिया असते, याचंही भान ठेवावं लागेल.
 
̔जे दिले जात नाही आणि जे घेतले जात नाही, ते म्हणजे शिक्षण', अशी शिक्षणाची व्याख्या आणि प्रक्रिया विनोबांनी सांगितली आहे. संस्कारांनासुद्धा हीच गोष्ट लागू आहे. संस्कार ̔करू' म्हटल्यानं करता येत नसतात, ̔घडवू' म्हटल्यानं घडविता येत नसतात. म्हणून जेव्हा काही व्यक्ती किंवा संघटना ̔आम्हाला मुलांवर चांगले संस्कार करायचे आहेत' किंवा ̔आम्हांला चांगली संस्कारी मुलं घडवायची आहेत' अशी भाषा वापरतात तेव्हा त्यांची गंमत वाटते, हसूही येतं. ही ̔घडवाघडवी' आणि ̔बनवाबनवी' काही खरी नाही.

आपणा प्रौढांना मुलांच्या संस्काराबाबत काहीही घडवायचं आणि बनवायचं नाही. जे घडायचं आणि बनायचं आहे, ते ज्यांचे त्यांनीच. म्हणून मुलं भली व्हावीत चांगली व्हावीत, संस्कारी व्हावीत अशा आपल्या सद्हेतूसाठी आपण तेवढ्याच सद्हेतूनं त्यांना तसे घडण्याची, बनण्याची, सर्व तऱ्हेच्या विकासाची संधी आणि माध्यमं उपलब्ध करून दिली पाहिजेत. मुलांच्या संस्कारांच्या संदर्भात एवढंच आपणा प्रौढांना घडवायचं आणि बनवायचं आहे!

संस्कार कसे होतात? यासंबंधी एक दाखला लक्षात घेण्यासारखा आहे. मोगऱ्याची सात-आठ फुलं एखाद्या हातरुमालाच्या घडीत ठेवावीत. काही दिवसांनी ती घडी उघडून पाहावं, तर फुलांचं निर्माल्य झालेलं दिसेल. ते झटकून टाकलं, तरी त्यांचा सुगंध रुमालाच्या घडीला बिलगलेला असतोच. तो दिसत नाही, पण येतो आणि आनंद देतो. चित्तवृत्ती प्रसन्न करून टाकतो.

मोगऱ्याच्या फुलातील सुगंधाचा संस्कार रुमालाच्या घडीनं टिपलेला असतो. संस्काराची खरीखुरी प्रक्रिया अशी असते. मोगऱ्याची सुगंधी फुलं आणि रुमालाची घडी यांच्या साहचर्याच्या परिस्थितीमधून सुगंधाचा संस्कार उरलेला असतो. म्हणून अशा तऱ्हेची संस्कारी परिस्थिती, सान्निध्य, वातावरण, मुलांसाठी निर्माण करून देणं आवश्यक असतं.

शेतकरी जसा शेत नांगरून, तण उपटून, ढेकळे फोडून शेताची मशागत करतो, तशीच मनाचीही मशागत व्हायला हवी. मनाची मशागत म्हणजेच संस्कार यासाठी संस्कारी घर, संस्कारी शाळा, संस्कारी समाज, संस्कारी देश यांचीच गरज असते.

संस्कार केवळ लहानांसाठीच असतात आणि प्रौढांसाठी नसतात अशी एक गैरसमजूत मोठ्यांमध्ये दिसून येते. खरं तर, लहानांवर संस्कार व्हावयाचे असतील, तर मोठ्यांनीच आधी संस्कारसंपन्न असावयास हवं. मोठ्यांनी हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की, आपल्या घरातील किंवा शाळेतील लहान मुलं ही आपल्यावरचे सतत दक्ष असे पहारेकरीच आहेत. म्हणून आपलं वागणं, बोलणं हे सगळं संस्कारीच असावयास हवं. घरात पति पत्नींनी जर एकमेकांचं ऐकलं नाही, तर मुलं त्यांचं कसं ऐकतील? मॉन्टेसरीबाई तर स्वच्छपणानं असं सांगतात की, "मुलांच्या दुर्वर्तनाबद्दल मुलं सर्वस्वी दोषी नसतात, तर आम्ही पालकच खरेखुरे दोषी असतो. कारण आमच्या वागण्याचाच तो परिणाम असतो."

मुलांच्या मानसिक विकासाला पोषक होईल असं संस्कारी वातावरण घरी-दारी सर्वच ठिकाणी असायला हवं. दूषित वातावरणात कुसंस्कारच होणार. समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. ̔पेरावे तैसे उगवते.’ आपण सद्गुणांची सदाचाराची, सुसंस्कारांची पेरणी केली तर त्यांचेच उत्तम पीक हाती येईल. बाजरी पेरून गहू कसे मिळतील?

Tags: सद्गुण मानसिक विकास मुलं संस्कार शिक्षण शाळा virtue mental development children culture education School weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके