डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मे महिन्यात 17 ते 20 या तारखांना पुणे आकाशवाणीवरून 'चिंतन' या सदरात श्री. राजा मंगळवेढेकर यांची चार व्याख्याने झाली. बालमन, वृत्ति- प्रवृत्ती यांचे नाजुकपणे परिशीलन करणारे हे तिसरे व्याख्यान…

मुलांना त्यांचं स्वतःचं असं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. पण याची जाण पुरेशा प्रमाणात आपणा प्रौढ पालकांना व शिक्षकांनाही दुर्दैवानं नसते. घरातील एखाद्या मौल्यवान व नाजूक वस्तूची जेवढी काळजी आपण घेतो आणि जेवढी प्रतिष्ठा ठेवतो, तेवढी काळजी आणि प्रतिष्ठा मुलांची ठेवीत नसतो. याचं कारण बहुधा असं असावं की, वस्तूंचं मूल्य आपल्याला ठाऊक असतं. आपण ते मोजलेलं असतं, पण मुलांचे असं मूल्य करण्याचा प्रसंग आपल्यावर कधीच आलेला नसतो.

त्यात पालक म्हणून आपण आपल्या मुलांची जी काळजी वाहतो, ती त्यांच्या शरीराची, देहाची. मुलांच्या शरीरदेहाची, त्यांच्या भरणपोषणाची उत्तम काळजी घेणे, व्यवस्था पाहाणं हे आवश्यकच आहे. त्यांची तहानभुकेची मागणी पुरवणं हे महत्त्वाचंच आहे. परंतु या शारीरिक मागणीच्या पलीकडे त्यांची अशी काही 'मानसिक मागणी' देखील असते, याकडे मात्र आपण लक्ष देत नाही. मुलांना आपण केवळ एक 'शरीरधारी' व्यक्ती म्हणूनच ओळखतो आणि त्यांच्या खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्यांची वा औषधपाण्याची व्यवस्था करीत असतो. पण हे पुरेसं नसून मुलांच्या मानसिक व्यक्तित्वाची सुद्धा दखल घेऊन, त्यांच्या मानसिक गरजाही पुरविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

मुलांचे आरोग्य त्यांच्या शरीराइतकंच त्यांच्या मनावरही अवलंबून असतं. इतकंच नव्हे तर, शारीरिक अस्वास्थ्याहून मानसिक अस्वास्थ्य तर त्यांचे निर्मळ, सुंदर, निरागस, फुलतं, उमलतं असं मूलपणच हिरावून घेत असतं. म्हणून मुलांना प्रथमतः घरातच मूल म्हणून 'प्रतिष्ठित' करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मूल हे पालकांच्या हातातील खेळणं बनता उपयोगी नाही. पुष्कळसे पालक तसं समजतात आणि तथाकथित प्रेमाने व लाडाने तसंच संबोधतात, वागवतातही. खेळण्यात ह्या राजाराणीला, बाहुला- बाहुलीला तेवढीच किंमत असते आणि अधिकार तर काहीच नसतात. सर्व अधिकार पालकांच्या हाती केंद्रित झालेले असतात. मुलांचे व्यक्तित्व हिरावून घेणारं हे प्रेम मुलांच्या विकासाच्या आड येत असतं. ते प्रदर्शनीय ठरतं.

मुलांना आपण मानतोच मुळी चिखलाचा गोळा! आणि या गोळ्याला आकार देणारे आपण पालक-शिक्षक म्हणजे विश्वकर्मा। शिल्पकार!... खरं तर आपली मुलं ही 'आनंदाचा कंद' आणि 'चैतन्याचा कोंभ' आहेत. हे आनंददायी चैतन्य कोंभ हरदिनी, हरक्षणी वाढत असतात. आजूबाजूची रंगीबेरंगी सृष्टी अनेक हातांनी आणि डोळ्यांनी त्यांना खुणावीत असते. नवनवीन आविष्कारांनी ती त्यांच्यापुढे सतत उलगडत असते. भोवतालचे हे सगळे लावण्य, विविध विभ्रम त्यांच्या चिमुकल्या मनात अनेक प्रकारांनी कुतूहल निर्माण करीत असतात. हे काय?... ते काय?... हे कस?,.. ते कसं?'... अशा अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या चिमुकल्या डोक्यात माजलेलं असतं आणि या विलक्षण कुतूहलाच्या पोटीच आपणाला ती अनेक प्रश्न विचारीत असतात, अगदी भंडावून सोडतात. त्यांचं हे कुतूहल व जिज्ञासा पुरविण्यासाठी आपण पालकांनी व शिक्षकांनी स्वतःला समर्थ बनविण्याची गरज आहे.

मुलांशी गप्पागोष्टी करताना त्यांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या हे कळतं, मुलांना गाणं, गोष्ट, खेळ, नृत्य, नाट्य, चित्र, छंद, खटपट, भ्रमण आदी गोष्टी आवडतात. परंतु आपण त्यांना या गोष्टीपेक्षा शाळेतल्या निर्जीव अभ्यासाकडे अधिक खेचत असतो. त्यांच्या आवडत्या गोष्टीपासून परावृत्त करीत असतो. याचं कारण म्हणजे बालांच्या भावजीवनाची आपल्याला हवी तितकी कल्पना नसते. त्यांच्या आवडत्या गोष्टींशी ओळख नसते आणि ह्या गोष्टींपेक्षा शाळेतला अभ्यास उपयुक्त आहे अशी आपली ठाम समजूत असते. शिक्षणाकडे पाहण्याचा आपणा प्रौंढांचा हा परंपरागत दृष्टिकोन फारच सदोष आहे. 'रूढं शालेय शिक्षण' आणि 'मुलांचं व्यक्तिमत्त्व फुलवणारं शिक्षण' या संबंधात आपणा मोठ्यांची बरीच गफलत झालेली आहे. फार मोठी गैरसमजूत आपण उराशी बाळगली आहे.

गाणी गाताना, नाचताना, गोष्ट ऐकताना, नाटक करताना किंवा चित्र काढतानादेखील मूल शिकत असतं, हे आपल्या गावीच नसतं. मुलाची गोष्ट असो किंवा गाणी, चित्र, खेळणी असोत. मुलांना त्या पासून आनंदाबरोबरच नकळत शिक्षण मिळत असतं. रंग, ध्वनी, आकार इत्यादी किती तरी गोष्टी ती मुलं खेळता-खेळता शिकत असतात आणि असं हसतखेळत, नकळत शिक्षण हीच खऱ्याखुऱ्या शिक्षणाची प्रक्रिया आहे.

मुलांची कल्पकता हा त्यांच्या ठायीचा अपूर्व असा एक शक्तिस्त्रोतच असतो. या बळावर ती कल्पनेचं साम्राज्य रचीत असतात आणि धुळीसही मिळवीत असतात. या जोडणी-मोडणीमधूनच मुलांना नकळत आत्मदर्शनाचा लाभ घडत असतो. हा लाभ फार फार महत्त्वाचा असतो. भलं-बुरं, सत्य-असत्य, सुंदर-कुरूप... अशा कितीतरी गोष्टी मूल या खटपटीतून शिकत असतं. या खटपटीत त्यांचे डोळे, हात आणि मन यांचा अपूर्व समन्वय होत असतो आणि जिथं असा समन्वय घडून येतो तिथेच भावजीवनाची समृद्धी होत असते. हेच खरं शिक्षण असतं. हे शिक्षण आनंददायी असतं. मुलांची सारी शिक्षण- प्रक्रिया आनंददायी हवी!

Tags: शिक्षण खेळणी चित्र गाणी गोष्ट मुलं education toys pictures songs story children weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके