येत्या 10 मेच्या मेळावाप्रसंगी प्रकाशित होणार असलेल्या पुस्तकातून दिलेला हा वानवळा...
कविवर्य Bee यांनी आपल्या 'दीपज्योतीस नामक भावरम्य व विचारसंपन्न कवितेत सर्व प्रकारच्या विषमतेचा निषेध करून समतेचे स्तवन केलेले आहे. अर्थात समतेचे स्वागत सहज सुलभपणाने होत नसते, तर त्यासाठी दुष्ट रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रचंड बंड करावे लागते. 'दारी बंड! घरात बंड! अवधे ब्रह्मांड बंडे भरे । अशा सर्वकष बंडाची महती कविवर्यांनी प्रतिपादिलेली आहे. असे बंडवालेही त्या त्या समयी निर्माण झालेले आहेत, हे सांगून 'डंका' नामक कवितेत कविवर्य Bee यांनी अग्रेसरत्व देताना उल्लेख केला आहे तो असा या बड्या बंडवाल्यांत 'ज्ञानेश्वर' माने पहिला’ तेराव्या शतकात मराठी मुलुखात हा 'बडा बंडवाला' होऊन गेला.
जनसामान्यांच्या कणवेतून त्याने संस्कृतातले ज्ञानभांडार फोडून प्राकृत-मराठीत आणण्यासाठी बंडाचे निशाण उभारले, त्या काळी समाजातल्या मूठभर शास्त्री-पंडितांनाच संस्कृत भाषा अवगत होती. इतरांना ती प्राप्त करून घेण्याची संधीही नव्हती. त्यामुळे या उच्चवर्णीयांकडेच ज्ञानाची मिरासदारी आलेली होती. ‘भगवद्गीता हा जीवनाचे महान तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ संस्कृत भाषेत असल्यामुळे बहुजन समाज त्यातील ज्ञानधनापासून शतकोनशतके वंचित राहिलेला होता. त्यांची ही वंचना ज्ञानदेवांना अस्वस्थ करती जाली. त्या अस्वस्थेमधूनच बहुजन वंचितांसाठी भगवद्गीतेवर मराठी भाषेत टीकाभाष्य लिहिण्याचा संकल्प त्यांनी केला आणि भावार्थदीपिका म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी' नामक अलौकिक ग्रंथ निर्माण केला.
ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीची थोरवी काय, किती आणि कशी वर्णावी! आज सातशे वर्षे उलटून गेली तरी ज्ञानेश्वरीची महत्ता आणि लोकप्रियता लेशभरही उणावलेली नाही, तर उलट दिवसेंदिवस ती वर्धिष्णुच होत राहिली आहे! तेराव्या शतकातील समाजस्थिती लक्षात घेता, ज्ञानेश्वरीची मराठी रचना हे एक बंडच होते! असे बंड पूर्णत्वास नेऊन ज्ञानदेवांमधील 'बडा बंडवाला' थांबलेला नाही, तर त्याने पुढे 'पंढरीच्या वाळवंटात आपल्या या समतेच्या बंडाचे निशाण मोठा आवेशाने फडकावले! ज्ञानदेवांनी आपल्या समकालीन अशा अठरापगड संतमंडळींना चंद्रभागेच्या काठी गोळा केले आणि एक 'संतमेळा’ च भरवून समताप्रधान अशा 'भागवत’ धर्माची प्रस्थापना केली! आध्यात्मिक लोकशाहीची ध्वजा उंच उभारली!' समता वर्तावी, अहंता खंडावी' अशा ब्रीदाने हा संतमेळा दुमदुमून सोडला! या संतमेळ्यात शिंप्याचा नामदेव, सोनाराचा नरहरी, कुंभाराचा गोरा, माळ्याचा सावता, न्हाव्याचा सेना अशा भिन्न भिन्न जातीजमातींमधली संतमंडळी तर होतीच, पण त्याशिवाय त्यांच्याबरोबर महाराचा चोखामेळा चांभाराचा रोहिदास, बंका ही शुद्र समजली जाणारी संतमंडळी जशी होती, तशीच निवृत्ती, ज्ञानदेव व सोपान यांची धाकटी बहीण मुक्ताबाई आणि नामदेवाची दासी जनाबाई या दोघी महिलाही होत्या;
आणि ही मोठी लक्षणीय बंडाचीव बाब होती! कारण बहुजन समाजालाच केवळ नव्हे, तर शूद्र आणि स्त्रिया यांना शास्त्राधारे ज्ञानप्राप्तीचा अधिकारच ठेवलेला नव्हता. ही फारच मोठी वैषम्यकारक गोष्टी होती. म्हणून ज्ञानदेवांनी त्या विरुद्धदेखील बंड पुकारले. स्त्री-शूद्र यांच्यासह भिन्न भिन्न जाती-जमातींमधील संतांची त्यांनी एक मांदियाळीच बसविली! अशा प्रकारे तेराव्या शतकात, ज्ञानेश्वरनामे बडा बंडवाल्याने पंढरीच्या वाळवंटात एका समाजपरिवर्तनाचे प्रस्थान ठेवून सामाजिक क्रांतीची पाउले मोठया निष्ठेने आणि धैर्याने टाकलेली होती! परंतु ही क्रांतिकारी पाउले दुर्दैवाने तेराच्या शतकात पंढरीच्या वाळवंटांतच थबकून राहिली होती. तेराव्या शतकात पंढरीच्या वाळवंटात थबकून राहिलेली ही पाउले विसाव्या शतकाच्या मध्यास, 1947 साली, अशाच एका आणखी समाजपरिवर्तनवादी बंडवाल्याने पुढे नेण्याचा प्रयत्न जिवाच्या आकांताने केला. त्या बंडवाल्याचे नाव होते- साने गुरुजी!
साने गुरुजी हे शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातले जसे 'गुरुजी 'आचार्य' होते तसेच तत्कालीन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक क्रांतिकारक सेनानीदेखील होते. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाला विविध प्रकारचे पैलू होते. लेखक-कवी-पत्रकार, लोकसाहित्याचे शोधक संग्राहक, किसान कामगारांच्या चळवळीचे संघटनाकार, मनोरंजनातून मुलांचे व्यक्तिमत्त्व हळुवारपणे फुलविणारे मातृहदयी बालमित्र, आंतरभारतीचे स्वप्नद्रष्टे.... अशा बहुमुखी आयामांचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते आणि त्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वातच परिवर्तनाचा ध्यास असलेले झुंजार क्रांतिकारकत्व प्रखर होते. असा क्रांतिकारक, सर्वांगीण समतेचा उद्गाता आणि सर्वसमर्पणवादी वृत्तीवा असावा लागतो.
साने गुरुजी म्हणत असते, "When I give I Give all-- अशी एका अमेरिकन कवीची ओळ मला फार फार आवडते. कारण देण्याच्या वेळी सर्वस्वाचे दान द्यावे असे मला वाटते. अशा वेळी हातचे राखून देण्याची मनोवृत्ती मला मानवत नाही!" साने गुरुजींनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळी असे देण्याचे प्रसंग त्यांच्यापुढे उभे ठाकले, त्या त्या वेळी त्यांनी याच सर्वस्वसमर्पण भावनेने देण्यासाठी, प्रसंगी आपले प्राण फेकण्यासाठीही, ते पुढे सरसावले! अशा वृत्तीच्या क्रांतिकारकांमध्ये, अशी एक प्रकारची अती उत्कटताच असते. त्यामुळे त्यांना अशा प्रसंगी थांबण्यासाठी धीर नसतो, एक प्रकारची घाई आणि उतावीळच त्यांच्या ठायी असते. हिंदू समाजातील अस्पृश्यता पाहून त्यांच्या मानवतावादी मनाला अत्यंत क्लेश होत असत.
हिंदू धर्मावरचा हा कलंक पुसला पाहिजे आणि अस्पृश्य बांधवांना 'माणूस' म्हणून प्रतिष्ठेने जगता आले पाहिजे, यासाठी त्यांचे मन सदैव तळमळत असे. आपल्या परीने देशाचे व समाजाचे कार्य करीत असताना अस्पृश्यता निवारण्याचेही काम ते निष्ठेने करीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या हाती झाडूही घेतला होता. सफाईचे काम सफाईदारपणे केले होते. ते मोठे लेखक कवी होते. त्यांनी अनेक प्रकारची ग्रंथरचना केली. वृत्तपत्रे चालवली. प्रबोधनाचे फार मोठे कार्य साहित्य- निर्मितीच्याद्वारा केले; पण तरीही ते अंतरीच्या उत्कटतेने म्हणत असत. "लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडूचे लालित्य अधिक प्रिय आहे!" स्वातंत्र्याच्या लढ्यात ते अग्रेसर राहिले. अनेक वेळा तुरुंगवास भोगला. भूमिगत राहूनही क्रांतिकार्य केले.
अनेक तरुणांना स्वातंत्र्याची प्रेरणा आणि स्फूर्ती दिली. 'येणारे स्वातंत्र्य कसे असेल व कोणासाठी असेल,' असा विचारही त्यांच्या मनीमानसी जागा असे. येणारे स्वातंत्र्य किसान कामगारांचे प्रामुख्याने असेल अशी भाषा त्यावेळी चालत असे. गुरुजी किसान कामगारांच्या लढ्यात होतेच, पण राहून राहून त्यांना उद्याच्या स्वातंत्र्यात दीन-दलित अस्पृश्यांना प्रतिष्ठेचे जीवन व माणुसकीचे अधिकार लाभणार की नाही, याची चिंता वाटत असे. स्वातंत्र्यात अस्पृश्यता राहता कामा नये; शिवाशिव, उच्च-नीच-भेदभाव उरता कामा नये, असे त्यांना तीव्रतेने वाटे. या प्रश्नावर ते सदैव व्यथित-व्याकुळ असत आणि म्हणूनच 1946 साली विनोबाजींच्या एका उद्ग्रावरून आणि खानदेशातील काँग्रेसमधील त्यांचे एक शेतकरी सहकारी श्री. सीतरामभाऊ चौधरी यांच्या एका पत्रावरून ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे, ह्या प्रश्नाचे निमित्त घेऊन, आपल्या प्राणाची कुरवंडी करण्यासाठी सिद्ध झाले.
‘धीर माझ्या मना, नाही आता नारायणा' अशी तुकारामी अवस्था त्यांची झाली होती. गुरुजींनी आपल्या प्राणांतिक उपोषणाच्या आधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन, आपली भूमिका समजावून देऊन, लोकमत तयार केले होते. परंतु पंढरीच्या मंदिराचे विश्वस्त बडवे-उत्पात व वर्णाश्रमधर्मी सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधामुळे, तसेच लोकभावना त्यांनी पायदळी तुडवल्यामुळे गुरुजींना अखेर 1 ते 10 मे 47 रोजी पंढरीत उपोषण करावे लागले. या सर्व तत्कालीन घटनांचा आता इतिहास झाला आहे. परंतु साने गुरुजींच्या त्या वेळच्या उपवासामुळेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी उघडले गेले, हे सत्य आहे.
मला वाटते, तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी पंढरीच्या वाळवंटात सुरू केलेली व तिचेच थबकलेली सामाजिक क्रांतीची पाउले साने गुरुजींनी आपले प्राण पणास लावून, समाजपरिवर्तनाची घंटा पंढरीत घणघणती ठेवून, विठुरायाच्या मंदिरात त्याच्या चरणांपाशी नेऊन पोहोचवली! पुढे मंदिर-प्रवेशाचा कायदाही झाला. मंदिर प्रवेशाच्या संदर्भातली अस्पृश्यता बऱ्याच अंशी कमी झाली, पण संपूर्णपणे नष्ट झाली नाही. आजही काही मठांतून, मंदिरांतून, आश्रमातून अस्पृश्यांना व स्त्रियांना प्रवेशबंदी आहेच. गुरुजींनी तर समग्र जीवनातली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पंढरपूरचे मंदिर एक प्रतीकरूप मानले होते.
या दृष्टीने तर आजही अनेक खेड्यापाड्यांतून ती नांदते आहे. बाह्य व्यवहारात कायद्याच्या बडग्याने तिचे उग्ररूप सौम्य झालेले दिसले, तरी अनेक सवांच्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतून बसलेली अस्पृश्यता गेलेली नाही, हे खरेच आहे. तथापि साने गुरुजींच्या उपोषणाने या प्रश्नाला जोरदार गती लाभली, सत्वर कायदा झाला, पुष्कळच लोकशिक्षण झाले, बऱ्याच मोठ्या प्रमाणात समाज परिवर्तनाला संधी लाभली आणि शहरी-शिक्षित सामाजिक जीवनातली अस्पृश्यता नष्ट झाली, नष्ट होण्याच्या मार्गाला लागली. हेही खरेच!
पंढरीस वाजे घंटा
लेखक : राजा मंगळवेटेकर
मंजुल प्रकाशन,
426 सोमवार पेठ,
पुणे 411001.
Tags: महाराष्ट्र पंढरपूर सीतारामभाऊ चौधरी ज्ञानदेव साने गुरुजी राजा मंगळवेढेकर Maharashtra Pandharpur Sitarambhau Choudhari Dyanadev Sane Guruji Raja Magalwedhekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या