डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा

जगदीश खेबुडकरांनी या कादंबरीचे सिनेमात रूपांतर करण्यासाठी पटकथालेखन केले आहे. अण्णा भाऊ हे डाव्या विचारांचे पाईक होते, तर जगदीश खेबुडकर हे उजव्या विचारसरणीत वाढले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि सावरकरांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर नकळतपणे  होताच. त्यामुळे मूळ कादंबरीतील आणि कादंबरीविश्वातील सगळेच लाल धगधगते वास्तव काहीसे सौम्य होत गेले आहे. अण्णा भाऊंच्या कादंबरीत सत्तूभोवती गोळा झालेली सर्व पात्रे पारंपरिक अर्थाने गुन्हेगारी विश्वातून आलेली होती, पण त्यांचे गुन्हेगार होणे हा त्यांना लाभलेल्या व्यवस्थेचा परिणाम होता. ही माणसे जगण्यासाठी धडपडत आहेत, सन्मानाने आयुष्य कंठू पाहत आहेत, पण पापभीरूही आहेत. परंपरेने अनैतिक मानलेल्या गोष्टींपासून ते दूर आहेत.

अण्णा भाऊंच्या कथांवर एकूण आठ चित्रपट निघाले आहेत, व्यावसायिक अर्थाने हे चित्रपट कमी-अधिक यशस्वी ठरले. त्यात अनेक व्यावसायिक तडजोडीही होत्या. पण जीवननिष्ठेचा मूळ गाभा त्यातून गमावलेला नाही. ‘फकिरा’ आणि ‘वारणेचा वाघ’ हे या आठ चित्रपटांतील दोन अतिमहत्त्वाचे चित्रपट. ‘फकिरा’ची निर्मिती अण्णा भाऊ जिवंत असतानाच खुद्द अण्णा भाऊ, शाहीर द. ना. गवाणकर व शाहीर अमर शेख यांनी करण्याचा प्रयत्न केला होता, पण पुढे अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत ते मेटाकुटीला आले. यातूनच हा चित्रपट रेंगाळत-रखडत कधी स्मृतिशेष झाला, हेच कळलेच नाही.

‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर  1970 मध्ये आला. या वेळी अण्णा भाऊ दिवंगत होऊन एक वर्ष लोटले होते. मृत्यूच्या एक वर्ष आधी म्हणजे 1968 मध्ये त्यांनी ही कादंबरी लिहिली होती. खरे तर फकिरासोबतच अण्णांच्या मनामध्ये सत्तू हा नायक रेंगाळत होता. फकिरा जसा मांग समाजात जन्माला आला आणि एका शोषित जातीचा वारसा घेऊन क्रांतिकारक म्हणून विकसित झाला, तसाच सत्तूही मूलत: ‘रामोशी’ समाजातीलच एक वीर होता. पण अण्णा भाऊंनी त्याचे नायकत्व रेखाटताना त्याला ‘मराठा’ नायकाचे रूप दिले. याचे कारण कदाचित अण्णा भाऊ  हे ज्या शाहूमहाराजांच्या परिसरात वाढले, यामुळे त्यांचा काही एक प्रभाव अण्णा भाऊंच्या मनावर झाला असावा आणि यातूनच सत्तू भोसले ही शूर मराठा व्यक्तिरेखा वारणेचा वाघ या कादंबरीत जन्माला आली असावी. कारण अण्णा भाऊंच्या काळात शाहूमहाराजांच्या विचाराने प्रेरित अशा अनेक मराठा क्रांतिकारक तरुणांची पलटणच नाना पाटलांपासून, नागनाथ नायकवडी आदींच्या रूपाने कोल्हापूर-सातारा परिसरात या काळात खडी तालीम देत होती. यामुळेच अण्णा भाऊंनी फकिराच्या मदतीला धावणाऱ्या या नायकाला मराठा जातीचा पोषाख चढवला असावा. पण महाराष्ट्रातल्या या मराठ्यांमध्ये कष्टकरी मराठा व राज्यकर्ता मराठा असे दोन भाग स्पष्टपणे दिसतात. अण्णा भाऊंच्या कादंबरीविश्वात हा कष्टकरी मराठा प्रामुख्याने नायकाच्या रूपात, तर राज्यकर्ता मराठा हा खलनायकाच्या स्वरूपात दिसतो. अर्थात अण्णा भाऊंच्या मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी अशा राजकीय दृष्टीला तर हे स्पष्टपणे जाणवत असावेच, शिवाय यातील बऱ्या-वाईटाचा विवेक करण्याइतके त्यांचे कलावंत मन नक्कीच विचक्षण असावे. फकिरानंतर जवळपास दहा वर्षांनी त्यांनी ही कादंबरी लिहिली असली, तरी एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. फकिराच्या निमित्ताने त्यांच्यासमोर पददलित वीर योद्‌ध्यांची मांदियाळी उभी होती. त्या मांदियाळीतील प्रत्येक वीर हा त्यांना नायकरूपातच भावत असावा. त्यांना वेळ व संधी मिळाली असती, तर कदाचित फकिरा आणि सत्तूसारखे अनेक कादंबरीनायक त्यांनी मराठी कादंबरीविश्वात बलदंडपणे उभे केले असते.

‘वारणेचा वाघ’मध्ये  फकिराचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. सत्तू संकटात सापडतो, या वेळी फकिरा त्याला सोडवतो. पण फकिरा जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा मात्र प्रयत्न करूनही परिस्थितीच्या अपरिहार्यतेने फकिराला सोडवण्यात सत्तू अपयशी होतो. अण्णा भाऊंनी या कादंबरीत असे प्रसंग रंगवले आहेत. ‘फकिरा’ ही एकूणच सत्यतेच्या कॅनव्हासवर रेखाटली गेलेली कादंबरी आहे. ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीचा पाया हा सत्याधारित असला, तरी लेखकाच्या कल्पनास्वातंत्र्याचे पंख त्याला लाभूनही कादंबरी थोडी काल्पनिकतेकडे झुकते, हे खरे. पण त्यातूनही जातीयतेपलीकडे जाऊन शोषण व अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या मानसिकतेची अण्णा भाऊंची ओळखच अधिक साक्षेपाने आणि प्रकर्षाने होते.

एकोणीस छोटेखानी प्रकरणांत विभागलेली ही सत्तू नावाच्या वारणेच्या वाघाची गोष्ट. अण्णा भाऊंची रसाळ पण पाल्हाळीक नव्हे अशी शैली आणि शब्द व प्रतिमांची निवड ही कथाविषयाला साजेशी, तलवारीसारखी धारदार, फापटपसारा न होता, आशयाचे नेमकेपण- ही सारी लेखक म्हणून त्यांची वैशिष्ट्ये दिसतातच. पण या कादंबरीत भेटणारे प्रत्येक पात्र हे पुढील कादंबरीचा नायकच आहे, याचीही जाणीव नकळत होत राहते.

कादंबरीचा नायक सत्तू भोसले आहे. त्याच्या बापाने जन्मजात लाभलेल्या मोठेपणाच्या नशेत सत्तूला आणि त्याच्या आईला कष्टकरी वर्गात आणून बसवले आहे. पण अण्णा भाऊंवर शिवराय आणि जिजाऊंचा प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांच्या कादंबऱ्यांतील सर्व स्त्रिया या जिजाऊंच्याच वारसदार आहेत आणि त्या आपल्या मुलाला परिस्थितीच्या विरोधातूनही शिवाजीसारखेच घडवण्याचा प्रयत्न करतात. याही कादंबरीत सत्तूची आई बणाबाई ही त्या शिवरायांच्या जिजाऊंचीच- प्रत्येक खेड्यातल्या कष्टकरी स्त्रियांमध्ये आढळणारी- प्रतिमा आहे. हीच गोष्ट सत्तूची मानलेली बहीण सईची. ती जातीय वर्णवस्थेत दलित आहे. पण सत्तूने आपल्याला जगण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची कशी बरबादी करून घेतली, हे माहीत असल्यामुळे सतत त्याच्या ऋणात असलेली आहे. आपला मुलगा राजा- त्याला वकील करायचंय आणि परिस्थितीने दरोडेखोर झालेला, पण मूलत: पाक असलेल्या सत्तूला या कर्दमातून सोडवेल- या आशेने त्याच्या शिक्षणाची काळजी करते. प्रत्यक्षात तसे घडत नाही. मिशनरी शाळेत शिकणारा राजा ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. फौजदार होतो आणि अखेर त्याच्या गोळीला सत्तू बळी पडतो आणि राजा कादंबरीचा खलनायक ठरतो. ढोबळमानाने जरी असे कथानक असले, तरी अण्णा भाऊंतील लेखक हा पाप-पुण्याचा निवाडा करणारा पारंपरिक न्यायाधीश नाही. अत्यंत साक्षेपाने ते परिस्थितीची गुंतागुंत मांडतात. निरगाठ सोडवीत नेतात. कुणाकडेही मूळ गुन्हेगार म्हणून थेटपणे बोट न करता परिस्थिती आणि व्यवस्था यांचे भयावह स्वरूप दाखवतात.

अण्णा भाऊ एका प्रकरणात सत्तूभोवती गोळा झालेल्या तथाकथित गुन्हेगारांची ओळख करून देतात. गोळा झालेली ही सर्व माणसे माणुसकीपूर्ण जगायची आकांक्षा असतानाही या व्यवस्थेमुळे पराभूत झालेली आणि केवळ नाईलाज झाल्याने परिस्थितीच्या रेट्याने गुन्हेगारीकडे वळलेली आहेत. असे असतानाही परकीय सत्ताधारी आणि देशी शोषकवर्ग अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या इथल्या शोषित दीन-दुबळ्या वर्गाला आपल्या परीने जमेल तेवढी मदत करून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.

लेखकाच्या संवेदनशीलतेने आणि राजकीय कार्यकर्त्याच्या आकलनातून एकूणच या शोषितवर्गाचे चित्र अण्णा भाऊ वाचकांसमोर मांडतात. परिस्थितीने आणि व्यवस्थेने नाडलेल्या या माणसांचे नेमके दु:ख व आंक्रदन वाचकांपर्यंत पोहोचवतात. या व्यवस्थेबद्दल घृणा निर्माण करायचे काम अण्णा भाऊंचे शब्द करतात. या कादंबरीचे महत्तम श्रेष्ठत्व म्हणजे माणूस म्हणून कुणी यात सुष्ट किंवा दुष्ट नाही. व्यवस्थेत वाढलेली आणि व्यवस्थेनेच घडवलेली ही माणसे आहेत. त्यामुळे परिस्थितीने ती खलनायक किंवा नायक बनतात. अण्णा भाऊंच्या आकलनाने जातिव्यवस्था मांडतात. त्याच क्षमतेने ते वर्गव्यवस्थाही समजावून देतात व घेतात. प्रत्येक मनुष्य ही व्यवस्थेने घडवलेली गोष्ट आहे, याचे अण्णा भाऊंचे भान व निरीक्षण केवळ अफलातून आहे. त्याच वेळी स्त्री आणि पुरुष यांच्यामधील मूलभूत फरक ते तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून जाणून आहेत. त्यामुळेच स्त्रीची सहनशीलता आणि सृजनात्मकता याचे त्यांना कमालीचे अप्रूप व भान आहे. याचाच परिणाम म्हणून अण्णा भाऊंच्या साहित्यात स्त्री ही कधी फारशी खलनायिकेच्या स्वरूपात सापडतच नाही. किंबहुना, प्रसंगोपात्त तिच्यावर लादल्या गेलेल्या अध:पतनातही तिच्यातील माणूसपणाची उत्तुंगताच ते दाखवत राहतात. या कादंबरीतील ब्रिटिश मेरी, दलित सई किंवा सवर्ण सोना आणि सत्तूची आईदेखील या दृष्टीने निटसपणे न्याहाळाव्या लागतील. परिस्थितीच्या वरवंट्याखाली सापडूनही या स्त्रिया आपले सत्त्व सोडत नाहीत, माणूसपण हरवत नाहीत. खरं तर अण्णा भाऊंच्या सर्वच कादंबऱ्यांतील आणि कथांमध्ये येणाऱ्या स्त्रीव्यक्तिरेखा या माणूसपणाची कमाल उंची दाखवणाऱ्याच आहेत.

अण्णा भाऊंच्या  सर्वच व्यक्तिरेखा- मग ती स्त्री असो वा पुरुष- एकेका कादंबरीचा विषय आहेत. त्यामुळे जाणवत राहते की, या सक्षम लेखकाने अनेक कथा किंवा कादंबऱ्या एकत्र कोंबण्याचा प्रयत्न केला आहे. ते ज्या परिसरात, ज्या जातव्यवस्थेत आणि ज्या वर्गव्यवस्थेत वाढले, त्यांचे सर्व संस्कार घेऊन, तरीही या साऱ्यापलीकडे उभे असलेले माणसाचे माणूसपण अधोरेखित करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. रशियामध्ये कामगारवर्गात उदयास आलेल्या मॅक्झिम गॉर्की नावाच्या एका महान लेखकाने हेच केले. कष्टकरी वर्गातील स्त्री ही केवळ कष्टकरी नाही, तर संपूर्ण मानवसंस्कृतीची आई आहे- हे जसे गॉर्कीने आपल्या ‘आई’ या कादंबरीत ठळकपणे केले; तेच काम कमी-जास्त प्रमाणात मराठीमध्ये अण्णा भाऊंनी आपल्या स्त्रीव्यक्तिरेखांमधून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांच्या मुख्य व्यक्तिरेखा बहुतांश वेळा स्त्रिया असल्या, तरी प्रसंगोपात्त त्यांनी लिहिलेल्या पुरुष नायकांनाही घडवणाऱ्या या स्त्रियाच असतात आणि त्या नायकांपेक्षाही उंच असतात. ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीचा नायक रूढार्थाने सत्तू असला, तरी वास्तवात त्याच्याभोवती जमा झालेला आणि जात-वर्गामुळे शोषित ठरलेला समूहही आहे, या समूहाला जगण्याची प्रचंड ताकद देणाऱ्या प्रामुख्याने स्त्रिया आहेत, हे महत्त्वाचे.

चित्रपटासाठी कथेमध्ये चित्रमयता आणि नाट्यात्मकता असावी लागते. अण्णा भाऊंच्या लेखनशैलीतच ती खच्चून भरलेली असल्यामुळे त्यांच्या साहित्यावर यशस्वी चित्रपट निघू शकतो. वारणेचा वाघ हा चित्रपट (मराठी चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या मेस्त्री बंधूंचे चिरंजीव) वसंत पेंटर यांनी दिग्दर्शित केला. चित्रपट गीतलेखक म्हणून विशेष नाव असलेले जगदीश खेबुडकर यांनी पटकथा, संवाद व गीतलेखन केले. त्या वेळचा मराठीतील सुपरस्टार सूर्यकांत, पद्मा चव्हाण आणि नवोदित तारका सुशीला यांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला होता. चित्रपटाची निर्मिती शामराव माने यांची आहे. हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी आणि लोकप्रिय ठरला असला, तरी कादंबरीची महत्ता तो गाठू शकला नाही. याचे कारण तंत्रज्ञान हे शब्दांचे सामर्थ्य गाठू शकत नाही. एवढेच नाही; निर्मिती करणारा कलावंत नेमक्या कोणत्या भूमिकेतून जगतो व निर्मिती करतो आहे, यावरही बरेचसे अवलंबून असते.

अण्णा भाऊ तसे शक्तिशाली क्षमतेचे अष्टपैलू लेखक होते, तसेच ते समाज बदलू पाहणारे डाव्या विचारांचे आणि भारतीय समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन असलेले राजकीय कार्यकर्ते होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. लेखक म्हणून आपल्या अवती-भवतीचा माणूस आणि समाज केवळ काळ्या व पांढऱ्या रंगात रंगवणे, इतके त्यांचे आकलन सामान्य नाही. पण त्यांच्या विश्लेषणाला एका शास्त्रीय, राजकीय विचारधारेचाही आधार आहे आणि ही विचारधारा चुकीचा समाज बदलून आदर्श समाज निर्माण करू पाहणाऱ्या आकांक्षेने प्रेरित आहे. त्या दृष्टीनेच कादंबरीतील प्रत्येक शब्द, प्रत्येक घटना आणि प्रत्येक व्यक्ती ते रेखाटतात. हा चित्रपट तयार होताना अण्णा भाऊ हयात नव्हते. त्यामुळे त्यांच्या कादंबरीचे पटकथेत रूपांतर दुसऱ्या लेखकाकडून केले गेले आहे आणि इथेच मूळ कादंबरीतील बंदुकीसारखे धडाधडणारे क्रांतिकारकत्व बोथट होत गेले आहे.

जगदीश खेबुडकरांनी या कादंबरीचे सिनेमात रूपांतर करण्यासाठी पटकथालेखन केले आहे. अण्णा भाऊ हे डाव्या विचारांचे पाईक होते, तर जगदीश खेबुडकर हे उजव्या विचारसरणीत वाढले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि सावरकरांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर नकळतपणे  होताच. त्यामुळे मूळ कादंबरीतील आणि कादंबरीविश्वातील सगळेच लाल धगधगते वास्तव काहीसे सौम्य होत गेले आहे. अण्णा भाऊंच्या कादंबरीत सत्तूभोवती गोळा झालेली सर्व पात्रे पारंपरिक अर्थाने गुन्हेगारी विश्वातून आलेली होती, पण त्यांचे गुन्हेगार होणे हा त्यांना लाभलेल्या व्यवस्थेचा परिणाम होता. ही माणसे जगण्यासाठी धडपडत आहेत, सन्मानाने आयुष्य कंठू पाहत आहेत, पण पापभीरूही आहेत. परंपरेने अनैतिक मानलेल्या गोष्टींपासून ते दूर आहेत. दिसत असलेल्या अन्यायाविरुद्ध व विषमतेविरुद्ध ते पेटून उठतात, त्यातूनच त्यांच्या वाट्याला हे दुर्दैवी आयुष्य आलेले आहे. चित्रपटात मात्र  हे येत नाही. सूत्रनायक आहे म्हणून त्याला आदर्शवादी दाखवले आहे आणि तो ज्या टोळीच्या संपर्कात येतो, ती टोळी मूलत:च गुन्हेगारवृत्तीची दाखवली आहे. सत्तूच्या येण्यामुळे त्यांचे उत्थान होते, असे चुकीचे चित्र रंगवले गेले आहे. ज्या परिस्थितीविरुद्ध ही माणसे लढत आहेत, ती परिस्थिती स्पष्ट करणे पटकथालेखकाच्या दृष्टीने सोईचे नाही; कारण खुद्द तोच ही परिस्थिती लादणाऱ्या वर्गातून आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पडद्यावर माणूसपण नाकारल्या गेलेल्या, तरीही माणूस म्हणून जगतानाही धडपडणाऱ्या या वर्गाचे विकृत चित्रण झाले आहे. कादंबरीमध्ये सत्तू आणि फकिरा यांच्या नात्याचे मनोज्ञ दर्शन होते, पण चित्रपटातून फकिरालाच टाळण्यात आलेले आहे. कादंबरीमध्ये सोनाच्या मनात सत्तूबद्दल उमलत जाणारे प्रेम हळुवारपणे दर्शवले आहे, तर चित्रपटात ते वीरांगनेच्या रूपात आणि आक्रमकपणे येते. सगळ्यात कहर म्हणजे, नाट्यात्मकता म्हणून सत्तूला-  किंचित काळ अंधपणा येऊन जणू नागिणीच्या आगमनाबरोबर तो दूर होतो, अशी प्रचंड विनोदी नाट्यात्मकता दाखवली आहे. तीच गोष्ट दिग्दर्शकाची. दिग्दर्शक वसंत पेंटर हे खरे तर केवळ तंत्रज्ञ होते. कॅमेऱ्यातून सिनेमा कसा दिसेल, एवढ्यापुरतेच त्यांचे दिग्दर्शकीय कौशल्य मर्यादित आहे. दिग्दर्शनामागे बाकी इतर कुठलीही- विशेषत: सामाजिक व राजकीय- भूमिका त्यामुळे जाणवत नाही.

तसाच सत्तूही मूलत: रामोशी समाजातीलच एक वीर, त्याचा वावर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरात होता, त्याच्या मर्दुमकीच्या आणि माणुसकीच्या अनेक कथा या परिसरात प्रसिद्ध आहेत. अण्णा भाऊ साठेंच्या ‘वारणेचा वाघ’मधला सत्तू भोसले हा मूळचा या परिसरातील असावा आणि त्यावरूनच अण्णा भाऊंनी आपला सत्तू हा नायक घेतला असावा असा अंदाज अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.बाबूराव गुरव यांचा आहे.

या कादंबरीत एका तरुण तफडदार, अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या नायकाचे चित्र वाचकांपुढे उभे राहते. सत्तू भोसले हा या कादंबरीचा नायक. तो पिळवणूक करणाऱ्या सावकार, जमीनदार व ब्रिटिशांविरुद्ध बंड करतो. ‘ब्रिटिशांच्या नजरेतून सत्तू हा नायक गुन्हेगार ठरला असला तरी वारणा खोऱ्यातील अनेक स्त्रिया त्याच्या बहिणी होऊन त्याला आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात. या कादंबरीत पराक्रम, शौर्य, बंडखोर प्रवृत्ती आणि प्रेमभावनाही रेखाटली गेली. सत्तूसारखं व्यक्तिमत्त्व रेखाटून लोकनायकाचे गुण त्यात दर्शविले आहेत आणि वारणा खोऱ्यातील तरुणांपुढे आदर्शवादी व्यक्तिमत्त्व उभे केले आहे. जसं सत्तूच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन तसंच वारणा खोऱ्याचा परिसर आणि परिसरातील संस्कृतीचे चित्र या कादंबरीत रेखाटले आहे.

सत्तूचा नायक म्हणून अधोरेखित करता बाकीची पात्रे खलनायक कशी दिसतील, असाच विचार चित्रपटाची पटकथा बनवताना झालेला दिसतो. खुद्द कादंबरीत परिस्थितीने एकत्र केलेली सत्तूची टोळी प्रत्यक्ष सिनेमात मात्र आधीच तयार खलप्रवृत्तीची टोळी म्हणून दाखविली जाते आणि एखाद्या स्त्रीला पळवून आणण्याइतपत ही टोळी खलनायकी टोक गाठते. सत्तू केवळ मूळच्याच श्रेष्ठत्वामुळे या टोळीला अशा दुर्गुणातून मुक्त करण्याला कारणीभूत ठरतो. अण्णा भाऊंच्या लेखात असा एकांगीपणा येत नाही. कादंबरीत ब्रिटिश सत्तेचे जुलमीपण स्पष्ट होते, तर सिनेमात ब्रिटिशांमार्फत मिशनऱ्यांमुळे ख्रिस्ती झालेल्या देशी लोकांचे खलनायकत्व ठळक केले जाते. कादंबरीचा व्यापकपट जो शोषक विरुद्ध शोषित असा आहे, तो चित्रपटात परकीय सत्तेचे रूपक वापरून शोषितांच्या अवनतीचा धार्मिक पाया त्याला जोडला जातो.

तरीही हा चित्रपट सर्वसामान्यांना आवडला, कारण लोकांच्या मनात असलेली अन्यायाविरुद्धची चीड, सत्तूच्या रूपाने नीट पकडली जाते. सत्तूचे नायकत्व श्रमिक वर्गाच्या श्रेष्ठत्वापेक्षा जातीव्यवस्थेच्या मुलाम्याखाली अहंकारित केले जाते. कथेच्या अनुषंगाने खलनायक ठरलेल्या राजा ऊर्फ डॅनियल यांचे ख्रिश्चन होणे अमानुष म्हणून ठसवले जाते. कादंबरीमध्ये अण्णा भाऊ त्याची मानसिकता, त्याची तगमग अतिशय विवेकशीलतेने मांडतात. पण चित्रपटात मात्र ते केवळ धर्मविद्वेषाचे एक प्रतीक ठरते.

एकंदरीत ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीतील क्रांतिकारकत्व चित्रपटामध्ये केवळ धंदेवाईक होते. सत्तूचा समाजव्यवस्थेविरुद्धचा लढा हा चित्रपटात केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा होता आणि वरच्या जातीतला माणूस पददलितांच्या उद्धारासाठीच असतो. असा एक पडदाशीन संदेश पेरला जाता. अण्णा भाऊंनी रंगविलेल्या मूळ नायकाचा रागरंगाचा गडदपणा चित्रपटात कमी झाला असला तरी नष्ट होत नाही. या अर्थाने अण्णा भाऊंचा ‘वारणेचा वाघ’ सर्कशीत आणता आला, पण पूर्णत: माणसाळता आला नाही, असेच म्हणावे लागेल. अण्णा भाऊ साठे हे व्यवस्था बदलू पाहणारे ताकदीचे लेखक होते हेच यातून स्पष्ट होते.

 

(लेखक व कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या महाराष्ट्र, बिहार, ईशान्य भारत या तीन प्रदेशांतील दुर्गम भागांच्या शोधयात्रांवरील तीन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत. सांगली येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Sudhakar Dandade- 07 Feb 2021

    उत्तम समिक्षण

    save

  1. Sushant Patil- 12 Sep 2021

    सत्तु भोसले हे कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भावरून ते स्पष्ट होत.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके