डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजा शिरगुप्पे यांनी 1 मे ते 20 जून 2011 हे 50 दिवस ईशान्य भारतातील सात राज्यांची प्रत्यक्ष भ्रंमती करून, त्यावर आधारित लिहिलेला लेख 70 पानांचा आहे. त्यापैकी पहिली 44 पाने, साधना वर्धापनदिन विशेषांकात व 14 पाने त्यानंतरच्या दोन अंकांत प्रसिद्ध झाली आहेत. उरलेली पाने या व पुढील अंकात प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक

4 जून 2011, ऐझॉल (मिझोरम)

‘‘डॉक्टरसाहेब, कालच मी बातमी वाचली. मिझोरमच्या तुमच्या प्राध्यापक संघटनेने व विद्यार्थी संघटनेने इथली दारुबंदी उठवायची मागणी केली आहे. जरा विचित्रच वाटतंय.’’ डॉक्टर साहेबांच्या गाडीतून शहरापासून वीस कि.मी. असलेल्या मिझो विद्यापीठाकडे जाताना डॉक्टरांना मी प्रश्न केला.

‘‘नागालँडसारखी इथंही कायमस्वरूपी दारुबंदी आहे, तरीही नेहमीप्रमाणं कायद्याला चुकवून चोरून दारुविक्री चालूच असते. त्यातून अनेक गुन्हे घडतात. त्यापेक्षा दारुबंदी उठवली तर या प्रकारचा छुपा भ्रष्टाचार बंद होईल आणि दारू ही इथल्या जमातींची पारंपरिक सवय आहे या भूमिकेतून या संघटनांनी ही मागणी केली आहे. परंतु मला स्वतःला ही भूमिका मान्य नाही. कारण ख्रिश्चॅनिटीप्रमाणं दारू मुळातच अनैतिक गोष्ट आहे. आणि तिला कायदेशीर बंदी असल्याने किमान बंधन समाजावर राहतं. त्यामुळे या संघटनांची ही भूमिका मला व चर्चला मान्य नाही.’’ डॉक्टर इथल्या चर्चचे एक महत्त्वाचे सल्लागार आहेत.

मिझोरम हे जवळपास शंभर टक्के ख्रिश्चन धर्मीय आहे आणि इथल्या समाजावर चर्चचा मोठा पगडा आहे. इतका की मिझोरमच्या मुख्यमंत्र्यासाठी चर्चचं एक स्वतंत्र सल्लागार मंडळ आहे. डॉक्टर खिंगटे हे कट्टर सश्रद्ध कॅथॉलिक आहेत. जेवढे मिझो अभिमानी तेवढेच कॅथॉलिक अभिमानी.

विद्यापीठात पोहोचलो. अत्यंत देखणा परिसर. बऱ्यापैकी विस्तीर्ण असा. पहाडावरती पसरलेला. डॉक्टर साहेबांच्या डिपार्टमेंटला गेलो. तिथं डॉक्टरसाहेबांच्या पीएच.डी.च्या काही विद्यार्थिनी त्यांची वाट पाहत बसलेल्या. डॉक्टरसाहेबांनी त्यांची ओळख करून दिली. आणि थोडा वेळ बोलत बसायला सांगून आपल्या कामासाठी निघून गेले.

मिझोरममधून ग्रामीण भागातूनच आलेल्या त्या मुली होत्या. प्रचंड कुतूहलाने त्या महाराष्ट्राबद्दल आणि भारताबद्दल विचारत होत्या. मुंबई, दिल्लीपासून किती जवळ आहे आणि पुण्याला बर्फ पडतो का? इथपर्यंत त्यांचे विविध प्रश्न ऐकताना आपल्या शिक्षण-व्यवस्थेत भूगोल हा विषय नेमका कशा पद्धतीनं शिकवला जातो याबद्दल माझ्याच मनात शंका तयार व्हायला लागली.

त्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांमध्ये एक प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला.

‘‘तुमच्याकडे पुरुष स्त्रियांना खूप मारझोड करतात हे खरं आहे का?’’ या प्रश्नानं मला अस्वस्थ केलं. कारण स्त्रियांना मारझोड केल्याची संकल्पनाच त्यांच्या संस्कृतीत नव्हती.

डॉक्टरसाहेब आल्यानंतर त्यांनी हिंदी विभागाच्या बनारसच्या डॉ.शर्मांना माझ्याशी खास हिंदीत बोलण्यासाठी बोलवून घेतलं. एक बऱ्यापैकी स्थूल व्यक्तिमत्त्वाचे तिशीचे गृहस्थ आले. चर्चेतून कळलं, त्यांनी डॉ.खिंगटेचे मिझो संस्कृतीवरचे अनेक लेख हिंदीत भाषांतरित केलेले आहेत.

डॉ. शर्मांच्या मते मिझो संस्कृती आणि मिझो माणसं ही अतिशय स्वागतशील, विकसनशील व नव्या परिस्थतीशी जुळवून घेणारी आहेत. त्यामुळे संपूर्ण ईशान्य भारतात मिझोरम हे आता प्रगतीच्या आणि समृद्धीच्या दिशेने अव्वल आहे. शिवाय भारतीयत्वाच्या प्रवाहात अग्रेसर आहे. एके काळी सार्वभौत्व मागणाऱ्या या मिझोंनी आता आपलं भारतीयपण स्वीकारलं आहे.

विद्यापीठाच्या कँटीनमध्ये जेवण घेताना देसाई मॅडम भेटल्या. मूळच्या चेन्नईच्या. लग्न करून  गुजराती झाल्या. आता नोकरीसाठी मिझोराममध्ये आल्या. म्हणाल्या, ‘‘मी ईशान्य भारतातल्या अनेक जमातींच्या व्यक्तींना भेटले आहे. पण मिझोंइतके समजदार, सहनशील आणि शांत व्यक्तिमत्त्वाचे लोक कुठे पाहिले नाहीत.’’

ऐझॉलकडे परतताना डॉक्टरसाहेबांना विचारलं, ‘‘तुमच्या बऱ्याच लोकांच्या आडनावात लाल शब्द आहे. म्हणजे तुमचे मुख्यमंत्री लालठाणवाला किंवा तुमचं नाव लालथोंग लियाना. ही लाल काय भानगड आहे?’’

डॉक्टरसाहेब हसले. ते म्हणाले, ‘‘लाल ही पदवी गावप्रमुखाची आहे. जसे तुमच्याकडे पाटील तसे आम्ही गावचे, किंवा टोळीचे लाल. त्यामुळे ज्यांच्या नावामध्ये लाल आहे याचा अर्थ गावप्रमुख किंवा त्या दर्जाचे.’’

गावात माझ्या हॉटेलजवळ सोडून डॉक्टरसाहेबांनी माझा निरोप घेतला. बाजारपेठेत फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. एके ठिकाणी साऊथ इंडियन पदार्थांची जाहिरात असलेलं हॉटेल दिसलं. चला, खूप दिवसांनी काहीतरी इडली-डोसा खायला मिळेल म्हणून आत शिरलो.

आतल्या पदार्थांच्या नावांची यादी वाचली. अंडाडोसा, चिकन डोसा. भिरभिरलोच. मांसाहारी डोश्याच्या नुसत्या कल्पनेनेच दक्षिण भारतातले अण्णा आणि अम्मा घेरी येऊन पडले असतील. तरी नेहमीच्या सवयीनं अनुभव घेण्यासाठी अंडाडोसा मागविला. खाताना एवढं कळलं की डोश्यामध्ये दक्षिण भारतीय चवीपेक्षा मिझोरामच्या अंड्यांची चव जास्त आहे.

फूटपाथवरून चालत खोलीकडे परतत होतो. नुकतीच शाळा सुटलेली आणि हायस्कूलची मुलं घराकडं परतत होती. अचानक मुलांच्या घोळक्यातल्या एका मुलानं माझ्या दाढीला हात घालून खेचायचा प्रयत्न केला. मी पटकन त्याचा हात धरला. माझा हात हिसडून पळायचा त्याचा प्रयत्न. अवतीभवती गर्दी जमलेली.

मी एवढंच म्हटलं, ‘‘हे कृत्य करून माझा नाही, तुझ्याच भूमीचा अपमान केलायस. मिझो हे अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य आहेत असं मला सांगितलं जात होतं. पण तू मला नव्यानं हे तपासून घ्यायची वेळ आणलीस.’’

तेवढ्यात एक मध्यमवयीन मिझो स्त्री पुढं आली तिनं फाडकन त्या मुलाच्या थोबाडीत मारली.

रागाने म्हणाली, ‘‘तू अख्ख्या मिझो जमातीला बदनाम केलंस.’’ आणि बरंच काही ताडताड बोलत राहिली. शेवटी मीच तिची समजूत घालून विषय थांबवला.

वाटेत ऐझॉलच्या राज्य म्युझियमची इमारत लागली. तीन ते चार मजल्यांचं ते म्युझियम पाहताना आता नऊ जिल्ह्यांत विभागलेल्या मिझोरम भूमीचं आणि तिच्या संस्कृतीचं चांगलंच दर्शन घडलं. मिझोंचे पारंपरिक कपडे, हत्यारे, शेतीची पद्धती आणि भुताखेतांवरच्या श्रद्धा या साऱ्यांचीच तिथं बहारीनं मांडणी केली होती.

प्रियकराची वाट पाहणाऱ्या चिंगतारा आणि मिझो लोककथांचा नायक छुरा यांच्या कथांची दृश्यमालिका हे या म्युझियमचं वैशिष्ट्य. समोरच्या शाळेत चाललेल्या क्रीडा स्पर्धा पावसामुळे थोड्या खोळंबल्या होत्या ती संधी साधून अनेक मुलं म्युझियम पाहायला म्युझियममध्ये आली.

एका मुलीला विचारलं, ‘‘तुला महाराष्ट्र माहिती आहे का?’’

‘‘हो, शिवाजी महाराज तिथलेच ना?’’

‘‘उडालोच! कोण म्हणतंय ईशान्य भारत भारतापासून अलग आहे?

8 जून 2011, त्रिपुरा (आगरतळा)

तब्बल चार दिवसांनी आज दैनंदिनी लिहितोय. ऐझॉलहून सहा तारखेच्या रात्री सुमोतून सिल्चरला आलो. कांतासिंग मणिपुरी स्नेहाने निरोप घ्यायला हजर होतेच. रात्रभर पहाडातून प्रवास करून सकाळी सहाला आसाममधल्या सिल्चर या शहराच्या रेल्वेस्टेशनवर आलो.

स्टेशनच्या आवारात प्रवेश केल्यावर हे स्टेशन आहे की गुरांचा गोठा आहे; असा प्रश्न पडावा इतक्या गायी आणि शेणाचा सडा सगळीकडे पसरलेला आणि हवेत प्रचंड ऊष्मा. आगरतळाला जायचं आणि तेही रेल्वेनं असं ठरवून इथं आलो. पैसे वाचवणं आणि ‘‘रेल का हर डिब्बा एक छोटा भारत’’ हे अनुभवण्यासाठी.

आसामच्या या अगदी पूर्वेकडील जिल्ह्याच्या शहराचा अनुभव घ्यावा हा उद्देशाने रस्त्यावर आलो. पण जोराचा पाऊस सुरू झाला म्हणून पुन्हा स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये एका फॅनखाली निमूट बसून राहिलो. वेटिंग रूममध्ये सुट्टीवर निघालेल्या नुकत्याच भरती झालेल्या जवानांचा एक घोळका मोबाईलवर नव्या हिंदी सिनेमांची गाणी लावून चक्क डान्स करत होता.

शेजारी बसलेल्या एका जवानाला विचारलं, ‘‘लष्करातली नोकरी ही कॉलेजकुमारांसारखी असते का? त्यानं दिलेलं उत्तर खूपच अंतर्मुख करणारं होतं.

तो म्हणाला, ‘‘साबजी, तिथं कायम हातात बंदूक घेऊन साहेब इशारा करील तिकडं तोंड करून भुंकायचं एवढंच स्वातंत्र्य आम्हांला असतं. तो ताण आम्ही असा मोकळा करतो.’’

अजूनही मीटरगेज असलेल्या आगगाडीचं पस्तीस रुपयांचं तिकिट काढून साडेअकराला सुटणाऱ्या गाडीत साडेबाराला बसलो. मग खिडकीतून अवती-भवतीचा पावसाने भिजलेला आसामचा ग्रामीण भाग निरखत प्रवास सुरू झाला.

उंच नारळीची- सुपारीची झाडं, भातांची खाचरं, बांबूच्या खुंटाळ्यावर उभी असलेली लाकडी घरं, समोरच्या छोट्या छोट्या पुष्करिणी किंवा स्थानिक भाषेत ‘पोकुरी’ असं नेहमीचं सवयीचं झालेलं पाहत यात्रा सुरू झाली. मग चहाचे लांबरुंद डोंगरभर पसरलेले मळे. मनातल्या मनात त्यांच्या आकारांवरून मालकांच्या श्रीमंतीचं गणित करीत मी वेळ घालवीत होतो.

रात्री अकरा-सव्वा अकरापर्यंत त्रिपुरामध्ये आगरतळ्यात रेल्वे पोहोचेल असं सहप्रवाशांचं सांगणं होतं. आसाम संपवून त्रिपुराची हद्द सुरू व्हायला बहुधा अंधार पडायला सुरुवात झाली होती. रेल्वेत फिरते विक्रेते खाद्यपदार्थ विकत फिरत होते.

माझ्या डब्यात एकजण जोतपुरी, जोतपुरी असं ओरडत आला. माझ्या डब्यातल्या  सहप्रवाशांनी त्याला थांबवून त्याच्याकडून जोतपुरी विकत घेतलं. त्या वेळी मला समजलं जोतपुरी म्हणजे ‘कोरडी भेळ’. मग मीही भूक नसतानाही केवळ हौस म्हणून भेळ घेतली.

समोर नुकतंच लग्न झालेलं एक तरुण जोडपं बसलेलं. आपण पळून जाऊन कसा प्रेमविवाह केला आहे याची रसभरित कहाणी मला ऐकवत त्यांनी मला आपल्याकडली मिठाई खायला दिली. मीही त्यांच्या मधुर प्रेमात गुंग होऊन मिठाईचा आस्वाद घेतला.

‘‘उठो, उठो, साले पीते है और सो जाते है’’ असं काहीतरी बडबडत काही पोलीस मला उठवत होते. खाकी ड्रेस बघून गडबडीने जागा झालो. क्षणभर मी कुठं आहे याचंच मला भान येत नव्हतं. हळूहळू शुद्धीवर आल्यासारखं भान येत गेलं आणि त्या पोलिसांच्या सांगण्यावरून कळलं की रात्रीचा एक वाजला आहे आणि गाडी आगरतळा स्टेशनमध्ये उभी आहे.

मी हडबडून वरच्या रॅकवर ठेवलेली माझी बॅग घ्यायला गेलो तर तिथं बॅग नव्हती. अवतीभवती पाहिलं. कुठं दिसत नव्हती. गडबडीनं खिशाला हात लावला तर खिसा कापलेला. विजारीचा आतला खिसाही टरकावलेला.

क्षणार्धात मला वस्तुस्थितीची जाणीव झाली. आपण पुरे लुटले गेलोय. अंगावरचे कपडे कदाचित चोराला कापता न आल्यामुळे बचावले असावेत. माझ्या चष्म्यासहित चोरांनी सर्व काही चोरलंय. शबनम मात्र ते सोडून गेलेले होते. कदाचित मला भिकारी केल्यानंतर भीक मागायला माझ्याकडे काहीतरी झोळी असू द्यावी या भावनेनं.

समोरच्या रेल्वे पोलिस इन्स्पेक्टरला वस्तुस्थिती सांगितल्यावर त्याने विलक्षण दयेच्या नजरेनं माझ्याकडं पाहत स्टेशनवरच्या पोलीस चौकीत तक्रार नोंदवायला सांगितली. मी शबनम उचलून एका पोलिसाबरोबर चौकीकडं निघालो. शबनममध्ये माझा पासपोर्ट, मतदान ओळखपत्र आणि ए.टी.एम. कार्ड आणि माझ्या आवडत्या कवीचा ‘वर्डस्वर्थ’चा कविता संग्रह सोडून गेला होता. कम्युनिस्टांच्या राज्यात पाऊल टाकताच मला चोराने ‘सर्वहारा’ करून टाकलं होतं, पण आपल्याला निरुपयोगी आणि माझ्या उपयोगी वस्तू अत्यंत नैतिकतेने मागे सोडून. त्या क्षणी त्या स्टेशनवरचा सगळ्यांत भिकारी कदाचित मीच असेन.

पोलिस चौकीवरच्या हवालदारानं माझ्याकडं तिरस्कारानं पाहत आता कम्प्लेंट घ्यायला वेळ नाही, सकाळी घेऊ असं म्हणत मला बाहेर हाकललं.

मग सकाळी सहापर्यंत ‘‘ह्या एवढ्या चांगल्या प्रवासात असं झालंच कसं’ असा विचार करत वेटिंग रूममध्ये एकशे ऐंशी मिनिटांची अठराशे मिनिटं अनुभवत वेळ काढला. सकाळी सहा वाजता पुन्हा पोलीस कार्यालयात गेलो. विनंती करून एक स्थानिक फोन करण्याची परवानगी मागितली. बीरमंगलजींना फोन लावला.

सौ.बीरमंगलजींनी फोन घेऊन बहुधा पतिराजांना झोपेतून जागं केलं असावं. फोनवरून त्यांना मी कुठल्या परिस्थितीत सापडलोय ते कळवलं. पंधरा मिनिटांत बीरमंगल स्टेशनवर आले. पोलीस कार्यालयात येऊन तिथल्या पोलिसाला आपल्या नम्र आणि मधुर आवाजात सस्मित मुद्रेने (त्यांचा चेहरा कायमच प्रसन्न आहे हे नंतर माझ्या लक्षात आलं.) माझी तक्रार लिहून घ्यायची विनंती केली.

त्यानंही स्थानिक भाषेत ऐकल्यामुळे तत्परतेने मला तक्रार लिहिण्यासाठी कागद दिला, मी आठवून आठवून सगळ्या वस्तूंची यादी केली. जवळपास वीस हजार रुपयांपर्यंत दोन मोबाईल, एक कॅमेरा, प्रवासातील टिपणवही, संदर्भ पुस्तकं, एकूण एक कपडे वगैरे.

एकदम लक्षात आलं, सगळ्यात महत्त्वाचं आपण गमावलं ते कॅमेऱ्यांतले फोटो. जवळपास चारशे दुर्मिळ क्षण माझ्या कॅमेऱ्यात मी बंदिस्त केले होते. ते सगळे क्षण आता परत कधीच भेटणार नाहीत. त्या क्षणी मला खऱ्याखुऱ्या अर्थाने काही काळ पोरकं झाल्यासारखं वाटलं.

बीरमंगलजी हे त्रिपुरास्थित मणिपुरी. त्यांच्या चार-पाच पिढ्या त्रिपुरातच गेलेल्या. त्रिपुरा शासनाच्या प्रसिद्धी विभागात संपादक म्हणून काम करताहेत आणि मणिपुरी साहित्य क्षेत्रातले एक प्रसिद्ध कथाकार शिवाय साहित्य अकादमीच्या मणिपुरी भाषेचे सल्लागार. तक्रार नोंदवून बीरमंगलनी थेट आपल्या घरी नेलं.

गेल्यागेल्या वाट पाहत असलेल्या वहिनींनी आपला नवऱ्याकडून माझी कथा सहानुभूतिपूर्वक चुकचुकत ऐकून घेतली. मी त्यांना भाभी म्हणून संबोधताच पटकन उत्तरल्या, ‘‘नही, नही, भाभी नही, बहन’’ आणि क्षणार्धात त्यांनी मला आपल्या परिवाराचा एक जिवलग सदस्य करून टाकलं.

मग मला आपले कपडे देण्यापासून ते नाष्टा म्हणून जेवणच घालण्याइतका पाहुणचार झाल्यावर आगरतळ्याच्या चौनी बाजारात गेलो. मंडईतल्या कपडे विभागातल्या एका दुकानात दोन झब्बे आणि विजारी खरेदी केल्या. अंतर्वस्त्रं घेतली. दररोजच्या आन्हिकांना लागणाऱ्या एकूण एक वस्तू खरेदी केल्या. चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्म्याचीही ऑर्डर दिली. खऱ्या अर्थाने ‘त्रिपुरी’ झालो.

विनोदजींना फोन करून घटनेची कल्पना दिली तर ते म्हणाले, ‘‘तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रात एक बातमी द्या या भल्या चोरासाठी. कदाचित पोलीस तपास करून वस्तू देतीलही.’’ मला त्यांची कल्पना पटली.

9 जून 2011, आगरतळा (त्रिपुरा)

‘दै.संवाद’च्या कार्यालयात गेलो. तिथं दिवाकर देवनाथ या हजर असलेल्या वृत्तसंपादकानं माझं स्वागत केलं. अख्खा भारत फिरलो पण पहिल्यांदाच या एकुलत्या एका कम्युनिस्टांच्या राज्यात आलो आणि लुटला गेलो. दिवाकर मनमुराद हसला.

मग महाराष्ट्रातल्या आणि एकूण देश पातळीवरच्या घसरत चाललेल्या माध्यमांच्या विश्वसनीयतेबद्दल खंतावून बोलत राहिला.

मी म्हटलं, मला त्रिपुरातील अशांतीबद्दल म्हणजे इथल्या उग्रवादी संघटनांबद्दल समजून घ्यायचं आहे.

त्यावर त्याचं म्हणणं असं की या कम्युनिस्ट शासनाने इथला उग्रवाद्यांचा प्रश्न बऱ्यापैकी काबूत  आणून त्रिपुराला एक शांतिप्रिय राज्य बनवलं आहे.

अधिक चर्चेसाठी त्यानं कम्युनिस्ट पक्षाने चालविलेल्या ‘देसेर कथा’ या वर्तमानपत्राचे संपादक गौतम दास यांना भेटायला सांगितलं. बीरमंगलबरोबर त्यांच्या कार्यालयात गेलो.

आपल्या सहकाऱ्यांची ओळख करून दिली आणि गृहस्थ माझ्याबरोबर मग प्रचंड ओढून ताणून इंग्रजीत गप्पा मारू लागला. अगदी लहानपासून कम्युनिस्ट चळवळीत बिधुदा वाढले. त्यासाठी त्यांनी शिक्षणही अर्धवट सोडलं, पण आपल्या वेळच्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या निष्ठा जशा प्रामाणिक होत्या तशा त्या आज राहिलेल्या नाहीत. याबद्दलही एक पिळवटलेपण त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होतं.

जरी आज कम्युनिस्ट पक्षाचं शासन चांगलं असलं तरी 1978 सालच्या नृपेन चक्रवर्तींच्या निःस्पृह शासनाइतकं ते चांगलं नाही अशीही त्यांची बोच होती. त्यामुळे कृतिशील राजकारणापासून अलिप्त राहून त्यांनी आता केवळ कविता आणि नोकरी यातच लक्ष गुंतवलंय, असं ते पुन्हा पुन्हा सांगत होते.

बाहेर पडताना बीरमंगल म्हणाले, हा गृहस्थ कधीच कुणाशी फारसं बोलत नाही. पण तुमच्याशी मात्र तळमळून बोलत होता, हे आश्चर्यच.

संध्याकाळी प्रभिंगतसू दास या आशू पोतदारनं सांगितलेल्या, कठपुतळ्यांचा खेळ करणाऱ्या, त्रिपुरामध्ये प्रसिद्ध असलेल्या कठपुतळीकाराकडे गेलो. नेताजी चौकातल्या एका रस्त्याने एका अरुंद बोळात तीन मजली घर होतं त्याचं. त्याचे वडीलही त्रिपुरातले प्रसिद्ध कठपुतळीकार होते. त्यांचीच परपंरा चालवत हा तरुण नवे सामाजिक आशय कथानकात आणून पपेट्रीच्या विकासासाठी धडपडत होता.

त्याचा आणखी एक सहकारी त्याच्यासोबत मला वेगवेगळ्या बाहुल्या, त्यामागची कथानकं आणि कठपुतळ्यांचे विविध शैलींतले प्रकार याचीही माहिती देत होता.

मूळचे बांगलादेशातल्या एका गावातले आणि प्रभिंगतसू त्रिपुरा दूरदर्शनवर कार्यक्रम अधिकारीदेखील आहे आणि कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय कार्यकर्ताही. पण लवकरच नोकरी सोडून पपेट्रीसाठी पूर्ण वेळ देण्याचा त्याचा मानस आहे. मुख्यमंत्र्यांसकट सगळे आपले जवळचे स्नेही आहेत. या कलेबद्दल माझं कौतुकही करत असतात पण या कलाप्रकाराच्या विकासासाठी सक्रिय मदत मात्र फारशी नाही ही त्याची खंत होती.

दर रविवारी आपल्या संस्थेचे सगळे कार्यकर्ते एकत्र जमतो. त्यात 70 वर्षांपासून 15 वर्षांपर्यतच्या सर्व वयोगटांतले आहेत. तुम्ही त्या दिवशी या म्हणजे आपल्याला खूप विस्ताराने गप्पा मारता येतील अशी त्याची सूचना.

रात्री बीरमंगलजींबरोबर जेवताना त्यांनी उद्या आपण आपल्या भाच्याबरोबर एडीसीच्या म्हणजे ऑटोनॉस डिस्ट्रिक्ट कौन्सिलच्या मुख्य कार्यालयात जाऊ या असा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम जाहीर केला.

10 जून 2011

भारतात विलीन होण्यापूर्वी त्रिपुरा हे स्वतंत्र सार्वभौम संस्थान होतं. देववर्मा किंवा देवबर्मन हे इथलं राजघराणं आणि याच वंशातील इथले स्थानिक लोक- ज्यांना त्रिपुरी म्हणून ओळखलं जातं.

हिंदू होण्यापूर्वी इथला धर्म इतर टोळ्यांप्रमाणे निसर्गाधिष्ठित आणि कारबोरोक या नावाने ओळखला जात होता. खरं तर इथल्या त्रिपुरींचं खरं नामाभिधान कारबोरोकच आहे. मणिपुरी राज्याप्रमाणेच त्रिपुरीही आपला सनातन अभिमान मिरवतात. 184 राजांची वंशावळ सांगतात.

बंगाली लोकांच्या वाढत्या प्राबल्यामुळे मूळचे स्थानिक त्रिपुरी अल्पसंख्य होत गेले. इथल्या बाजारावर, संस्कृतीवर बंगाल्यांचं प्रभुत्व वाढायला लागलं. त्यातून या स्थानिकांध्ये अस्वस्थतेची ठिणगी पडली. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातून आणि नंतर बांगलादेशातून निर्वासितांचे लोंढे त्रिपुरात गर्दी करू लागले आणि ही अशांती टोकाला पोहोचली.

ईशान्य भारतातल्या जमातीय आणि टोळी संस्कृतीला अनुसरून याचा हिंसक उद्रेक व्हायला लागला. शांतिपूर्ण जगणारं त्रिपुरा बंदुकीच्या गोळ्यांनी दणदणू लागलं. गरज होती ती स्थानिक त्रिपुरींच्या मनात स्थैर्याची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची.

काँग्रेस पक्ष बंगाली लोकांनी दत्तक घेतला होता तर स्थानिक आगरतळ्यात आणि त्रिपुराच्या पहाडात राहणाऱ्या आदिवासींचा ताबा कम्युनिस्ट पक्षाने घेतला. गंमत म्हणजे या पक्षाचं नेतृत्व बंगाली होतं आणि आहे. पण इतर ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष असे नाव असलेला हा पक्ष त्रिपुरी अस्मिता जपण्यासाठी त्रिपुराचा कम्युनिस्ट पक्ष झाला आहे, ‘कारबोरोक’ बरोबरच बांगलादेशातून आलेले बौद्ध धर्मीय ‘चकमा’, ख्रिश्चन धर्मीय ‘रियाँग’ वगैरे इथले रहिवासी आहेत आणि त्यांचेही स्वतंत्र अस्तित्वाचे प्रश्न आहेत.

पण नृपेन चक्रवर्ती आणि आता विद्यमान मुख्यमंत्री माणिक सरकारांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाने स्वतंत्र स्वायत्त जिल्हा समिती निर्माण करून त्यांना मुख्य सरकारइतकाच दर्जा व अधिकार देऊन त्रिपुराचा बहुतांश आदिवासीबहुल भाग त्यांच्या नियंत्रणाखाली आणला आहे.

या कौन्सिलवर निवडून येणारे सर्व सदस्य हे या आदिवासी गटातीलच असल्यामुळे ते अधिक मोकळेपणाने आपल्या विकासाचे निर्णय घेऊ शकतात. त्यातून या सर्व जमातींमध्ये आता पुरेशा प्रमाणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, ‘देसेर कथा’चे संपादक गौतम दास यांच्याशी झालेल्या चर्चेतून माझ्या ज्ञानात एवढी भर पडली.

शिवाय सचिनदेव, राहुल देव बर्मन ही मंडळी इथल्या देवबर्मा राजघराण्यातलीच आहेत आणि देव हा शब्द त्यांच्या नावाशी नाही, बर्माशी जोडलेला आहे. हाही माझ्यासाठी एक नवा शोध होता.

बीरमंगलच्या घरात नाष्टा करून शेजारीच राहत असलेल्या त्यांच्या भाच्याकडे गेलो. तो एडीसीमध्ये शिक्षण विभागाचा संचालक आहे- तयार होऊन आमची वाटच पाहत बसला होता. त्याच्या मारुती जिप्सीतून आगरतळ्यापासून दहा किमी. वर असलेल्या एडीसी च्या मुख्य कार्यालयात गेलो.

आज  एडीसीची सीईएम बरोबर सर्व निर्वाचित सदस्यांची मासिक बैठक होती. सीईएम म्हणजे जवळपास सीएमचा दर्जा असलेल्या एडीसीचा मुख्य. विजयकुमारनं- बीरमंगलच्या अधिकारी भाच्याचं नाव- आपल्या कार्यालयात आम्हांला बसवलं आणि बैठकीला निघून गेला. कार्यालयात कॉम्प्युटरवर एक तरुण काम करत बसला होता. जमेतिया या मूळ जमातीचा पण आता ख्रिश्चन धर्मीय झालेला. त्यानं सांगितलं, हिंदू आणि ख्रिश्चन असे दोन्हीही धर्मीय आता या सर्व जमातींतून सापडतील. तो तरुण स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याच्या प्रयत्नात होता. एडीसीमुळे ते शक्य होतंय असं त्यांचं म्हणणं.

बीरमंगलबरोबर कार्यालयाबाहेर पडून समोरच बनवलेल्या एका सुंदर देखण्या बागेत बसलो. त्रिपुरातील भव्य आकाराची वेगवेगळी सुंदर फुलझाडं, हिरवीगार गवताळ कुरणं, आणि एके ठिकाणी चक्क सुरू. आकर्षक पद्धतीने दगड रचून केलेली दगडांची बाग.

त्रिपुराच्या अशांततेबद्दल पूर्वी खूप वाचून, ऐकून होतो पण आता त्रिपुरा या बागेसारखंच एक सुंदर राज्य म्हणून विकसित होतंय, त्याची ही एक प्रकारे काव्यमय सूचकताच वाटली. तिथून कारबोरोक भाषेच्या आणि साहित्याच्या संशोधन विकास केंद्राकडे. त्याला लागूनच कारबोरोक संस्कृतीचं दर्शन घडवणारं एक म्युझियमही होतं.

विकास केंद्राचे संचालक बिनयकुमार देवबर्मा भेटले. आपण वीस वर्षं राबून कारबोरोक भाषेचा कसा शब्दकोश तयार केला आहे हे अभिमानानं सांगत त्यांनी एक शब्दकोश मला भेट दिला. या आदिवासी भाषा आपल्या भाषांपेक्षासुद्धा किती समृद्ध आहेत याची उदाहरणे ते उत्साहाने सांगत होते. उदाहरणार्थ, काळा या रंगाच्या पंधरा छटा सांगणारे वेगवेगळे शब्द कारबोरोक मध्ये आहेत. किंवा आपल्या मागच्या आणि पुढच्या आठ पिढ्या सांगणारी स्वतंत्र संबोधने आहेत.

म्युझियम पाहायला हॉलमध्ये शिरलो. त्रिपुरींचे कपडे, शस्त्रे, भांडीकुंडी यांची वैशिष्ट्ये न्याहाळत होतो. तेवढ्यात सीईएम ना भेटायची इच्छा आहे असा निरोप आला. घाईघाईनं सीईएमच्या केबिनमध्ये शिरताना प्रतीक्षागृहात ताटकळत बसलेले लोक आपल्याकडे असूयेने पाहताहेत याची नोंद घेत आत शिरलो.

सीईएम साहेबांनी उठून हस्तांदोलन करत बसायला सांगितलं. म्हणाले, ‘‘तुमची बातमी वाचली मी आज- आमच्या राज्यात तुमचं असं स्वागत झालं याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. रेल्वेस्टेशनच्या पोलिसांना आम्ही कसून तपास करायला सांगितलं आहे.’

‘‘गेल्या दहा वर्षांत तुमच्या पक्षानं अतिशय योग्य धोरणं राबवून त्रिपुरातली अशांती संपवली याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून तुमचं महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन.’’

मीही महाराष्ट्राचा राजदूत असल्याच्या आविर्भावात त्यांना ऐकवलं.

‘‘खरं तर बंगालमधला गोरखालँडचा प्रश्नही तुम्ही असाच संपवू शकला असता.’’ सीईएम साहेब माझ्या प्रश्नाचा रोख ओळखून थोडेसे गंभीर होत म्हणाले, ‘‘आता जो ममता बॅनर्जींनी या गोरखालँडच्या प्रतिनिधींबरोबर करार केला तो यापूर्वीच आमच्या पक्षाने त्यांच्यासमोर मांडला होता. पण केवळ विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस पक्षानं कावेबाजपणे त्यांना तो नाकारायला लावला.’’

बंगालमधल्या पराभवाचं विश्लेषण करताना सीईएम साहेबांनी सांगितलं, ‘‘पक्षाच्या धोरणांनी पक्षाचा पराभव झालेला नाही, तो नोकरशाहीनं आपल्या निगरगट्टपणानं केलेला आहे. सरकार आणि पक्ष आणि जनता यांच्यात सगळ्यांत मोठा अडथळा नोकरशाही झाली. इथं त्रिपुरामध्ये आम्ही या धोक्याची वेळीच काळजी घेतली म्हणून यशस्वी झालो.’’ लिंबू घातलेल्या काळ्या चहानं आमचं तोंड गोड करीत सीईएम साहेबांनी निरोप दिला.

दुपारी बिनयकुमारांबरोबर एका साध्या वाटणाऱ्याच, पत्र्याचं छप्पर असलेल्या झोपडीवजा हॉटेलमध्ये जेवायला नेलं. मला स्थानिक खाणं आवडतं म्हणून, ताटभरून भात, मासे, डुकराचं मांस असं त्रिपुरी साग्रसंगीत जेवण. वाढपी कुठलीतरी एक स्थानिक चटणी घेऊन आला. त्या दोघांना वाढून मला न वाढताच परत निघाला. मी त्याला हाक मारून मागं बोलावलं. चटणी वाढायला सांगितली. बिनयकुमार माझ्याकडं लक्ष ठेवून होते. बीरमंगलला म्हणाले, ‘‘हा मनुष्य जगात कुठंही उपाशी राहणार नाही.’’ त्यांना वाटलं होतं, ही खूप तिखट चटणी मी खाणार नाही. त्या बिचाऱ्यांना काय माहीत, कोल्हापूरची लवंगी मिरची किती झणझणीत असते ते!

संध्याकाळी पुन्हा एकदा ‘देसेर कथा’च्या कार्यालयात गेलो. गौतम दासनी एडीसीचे संचालक राधाचरण देवबर्मांना फोन करून मला त्यांच्या ‘मंडोई’ या खेड्यात घेऊन जाण्याची विनंती केली. राधाचरण त्याच मतदारसंघातून एडीसीवर निवडून आलेले आणि मला एक तरी त्रिपुरी खेडं पाहायचं होतं.

13 जून 2011, आगरतळा (त्रिपुरा)

राधाचरणनी सांगितल्याप्रमाणे सकाळी आठ वाजताच त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. बाहेर लाल दिव्यांची गाडी, सोबत एस्कॉर्ट म्हणजे लष्करी जवानांचं संरक्षक दल. मंत्रीसाहेब खाली उतरून येण्याची वाट पाहत होते.

मी दिवाणखान्यात गेल्यावर त्यांनी आत्मीयतेने स्वागत करत चहा दुधाच की बिनदुधाचा- चौकशी करत माझ्या इच्छेप्रमाणे लिंबू पिळलेला चहा मागवला. भिंतीवर गौतम बुद्धाचे तीन-चार प्रकारचे फोटो आणि बरीचशी त्रिपुरी कलाकुसर असलेल्या कारबोरोक हस्तवस्तू ठेवलेल्या होत्या. समोरच्या फायलींवर भराभर तासांत सह्या केल्या मग पेन मिटवत ब्रीफकेस उचलली.

हसत म्हणाले, ‘‘सर, राज्यकारभारातला सगळ्यांत मोठा अडथळा म्हणजे या फायली. आणि लोकांत काम करणाऱ्या माणसाला या फायली भिंतीसारख्या वाटतात.’’ मंत्रीसाहेबांच्या या विधानाला सहमती देत खाली उतरलो.

गाडीत बसता बसता राधाचरण म्हणाले, ‘‘एक पाच मिनिटं आपण मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊ.’’ गाडी संरक्षक दलासहित मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर थांबली. राधाचरणजी मला घेऊन  लगबगीने बंगल्याच्या दिवाणखान्यात आले. मीही माणिक सरकार या ज्योति बसूंसारख्याच साध्या, नि:स्पृह पण कुशल मुख्यमंत्र्याला भेटायला आणि बघायला उत्सुक होतो.

खादीचा कुर्ता आणि धोतर नेसलेले सत्तरीतले माणिकदा दिवाणखान्यात आले. राधाचरणांनी माझी ओळख त्यांना करून दिली. आपण डीवायएफच्या एका अधिवेशनाला मुंबईत येऊन गेल्याची आठवण सांगितली. काही मुंबईतल्या कॉ्रेडस्‌ची नावंही सांगितली. मी चहा नको म्हणत असताना ‘मैने खुद के हाथों से बनायी है’ असं आग्रहानं सांगत चहा प्यायला लावलाच. मला चहा बनवता येतो की नाही असा मिश्किल प्रश्न त्यांनी मला विचारला. मीही त्याच मिश्किलतेनं त्यांना उत्तर दिलं ‘आप तो राज्य भी बढियाँ चला रहे हैं।’

माणिकदांनी छान स्मित प्रत्युत्तरदाखल केलं. चाळीस कि.मी. वरच्या खूप आत जंगलात असलेल्या ‘मंडोई’ गावात आलो. तिथल्या एका शाळेत एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने स्थानिक पक्ष शाखेने स्त्रियांचा आणि बालकांचा आरोग्य मेळावा भरवला होता. ‘जमातिया’ या जमातीचं बाहुल्य या गावात होतं.

खूप वर्षांपूर्वी हे गाव अख्ख्या भारतभर गाजलं होतं कारण तीनशे बंगाली माणसांची कत्तल या गावात झाली होती. पण त्या विषारी घटनेच्या खुणांचा मागमूसही आता इथं राहिलेला नाही. गावापासून दीड कि.मी. अंतरावर या कत्तल झालेल्यांची स्मारकभूमी गावाने उभी केली आहे.

पक्ष कार्यालयात काही वेळ बसलो. राधाचरणनी एका छोट्या मुलीला पाहून हाक मारली आणि जवळ बोलावून माझ्याशी ओळख करून दिली. ही आमची सायना नेहवाल. त्रिपुरा राज्यातील या वर्षीची बालगटातली बॅडमिंटनची चँपियन. एवढ्या खेड्यात अशी खेळाडू तयार होते आहे यावरूनच तुमच्या लक्षात येईल की एडीसी किती मजबूत काम या समाजगटांच्या विकासासाठी करते आहे.

शाळेच्या सभागृहात पारंपरिक पद्धतीने मंच सजवलेला होता. त्रिपुरी पद्धतीने मडक्यावर मडके रचून एक समईसारखी उतरंड तयार केलेली. समोर अडीच-तीनशे लाभार्थी महिला व बालकं. आरोग्य मेळ्यासाठी आलेल्या डॉक्टर. राजकीय पुढारी, राधाचरणसहित मंचावर स्थानापन्न झाले. राधाचरणनी मलाही आपल्या शेजारी बसवून घेतलं.

सभागृहाला माझी ओळख करून देताना सांगितलं की महाराष्ट्रातून आपल्या कामाची पाहणी करण्यासाठी यांना पाठवलेलं आहे. मी माझ्या उत्तराच्या भाषणात सांगितलं, ‘‘मी पाहणी करण्यासाठी आलेलो नाही. आपल्याकडून महाराष्ट्रासाठी काहीतरी शिकायला आलोय. माझे भारतीय बांधव कुठेकुठे आणि कसेकसे राहतात हे समजून घ्यायला आलोय असं म्हणा हवं तर.’’

कार्यक्रम संपल्यावर राधाचरणजी स्थानिक पक्ष कमिटीच्या सचिवावर माझी जबाबदारी सोपवून पुढच्या गावातल्या एका मीटिंगसाठी निघून गेले. मग त्या सचिवांनी रिंकू जमातिया नावाच्या एका बर्म्युडाधारी तरुण मुलाकडे मोटारसायकल देऊन आसपासचा परिसर फिरवून आणायला सांगितलं.

रिंकूच्या मागं बसून मग रिंकूला म्हटलं, ‘ तुला जिकडं न्यावंसं वाटेल तिकडं ने.’ मग गावातून आणखी आतल्या गावांकडं असं रिंकूबरोबर फिरलो. वाटेत नव्यानं लागवड होत असलेले अनेक रबराचे मळे दिसत होते. रिंकू सांगत होता. लवकरच त्रिपुरादेखील केरळसारखंच रबर उत्पादक राज्य होईल. रिंकू बारावी झालेला आहे. नोकरीच्या शोधात आहे. खूप गरिबी आमच्या राज्यात आहे आणि भ्रष्टाचारही. पण आता बंदुकीनं प्रश्न सुटणार नाहीत याचीही तरुण पोरांना खात्री व्हायला लागली आहे. त्यामुळे उग्रवादी संघटनेत सामील व्हायला आता मुलं फारशी तयार नसतात, असंही त्यानं गंभीरपणे मला सांगितलं.

परतताना वडाप टॅक्सी त्यानं पकडून दिली. त्या टॅक्सीनंच आगरतळ्याच्या अलीकडेच चंद्रपूर बस स्टेशनवर उतरून शिलाँगसाठीचं दुसऱ्या दिवशीचं तिकिट खरेदी केलं. संध्याकाळी मणिपूर साहित्य परिषदेच्या त्रिपुरा शाखेत लेखक म्हणून माझा सत्कार आयोजित केलेला.

आभारादाखल म्हणालो, ‘‘मी अशांत त्रिपुरा पाहायला आलो होतो कारण माध्यमांनी तेच चित्र माझ्या मनात उभं केलं होतं. आता निघताना मात्र त्रिपुराइतकाच मी शांतचित्त आहे. खूप सुंदर भावना सोबत घेऊन जातो आहे.’’

रात्री, बिधुदा गप्पा मारायला आले. 1971 मधल्या बांगलामुक्ती संग्रामाच्या आठवणी सांगण्यात रमले होते. बांगला निर्वासितांचे कॅम्प्स्‌ कसे इथल्या शाळांधून उभे केले होते; पलीकडच्या चौकातच मुजीबूर रेहमानांचं बांगलादेशचं पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं , वगैरे वगैरे. जाताना त्यांनी एक कविता बंगाली भाषेत लिहिलेली, माझ्या हातात दिली, मला म्हणाले ही कविता त्रिपुरा आणि महाराष्ट्र यांना एकत्र बांधणारी कडी आहे एवढं लक्षात ठेव.

आज सकाळी रेल्वे पोलिसांना फोन केला. चोरीचा काही तपास लागला का? पलीकडून उत्तर आलं, ‘धर्मनगर ते आगरतळा चार रेल्वेस्टेशन्स्‌ आहेत. तुम्ही जरा त्या स्टेशनांवरती चौकशी करा.’’

द.मा.मिरासदारांची ‘माझी पहिली चोरी’ ही कथा स्मरून फोन बंद केला. प्रभिंगतसू माझी चोरीची बातमी ऐकून खूप हळहळला होता.

त्या वेळी मी कविता लिहिली,

खरंच खंत नाहीय मला मी काही गमावल्याची

कारण त्याहीपेक्षा काही अक्षय

मी मिळवतोय तुझ्या भूमीत हिंडताना...

 

दहा वाजलेत. बीरमंगल निरोप देण्यासाठी येईल. सामान भरायला हवं. शिलाँगसाठी सुटणारी गाडी साडेअकरा वाजता आहे.

Tags: त्रिपुरा मणिपूर साहित्य परिषद शिलाँग आगरतळा  बांगलामुक्ती संग्राम Tripura Manipur Literature Council Shillong Agartala BanglaMukti Sangram weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके