डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजा शिरगुप्पे यांनी 1 मे ते 25 जून या 55 दिवसांच्या काळात ईशान्य भारतातील सातही राज्यांत भ्रंमती करून लिहिलेला ‘शोधयात्रा : ईशान्य भारताची’ हा अंकाची 70 पाने इतका प्रदीर्घ लेख, साधनाच्या 15 ऑगस्ट विशेषांकात व त्यानंतरच्या चार अंकात प्रसिद्ध झाला. या संपूर्ण शोधयात्रेचे पुस्तक डिसेंबर 2011 मध्ये साधना प्रकाशनामार्फत प्रकाशित होईल. - संपादक  

15 जून 2011, मेघालय (शिलाँग)

त्रिपुरातून आमची ‘त्रिपुरेश्वरी’ दुपारी 12 वाजता निघाली. दुपार-संध्याकाळ काही वेळ पुन्हा एकदा आसामच्या हद्दीतून धावली आणि कधीतरी गच्च काळोखात मेघालयाच्या हद्दीत शिरली असावी.

शेजारी अखंड पान चघळत एक आसामी बाई अधूनमधून माझी चौकशी करत ‘‘भाईजी, आसाममध्ये खूप भ्रष्टाचार आहे. सगळ्या देशात आसामचा नंबर पहिला लागेल इतका. आम्हां गरिबांना काही कोणी वाली नाही. राजकारण्यांनी सगळा बट्ट्याबोळ केलाय. सगळ्या गरिबांच्या योजना श्रीमंत आणि बाबूलोकच खाताहेत. बंदूकवाले वर्दीतले आणि वर्दीबाहेरचेही (बार्इंना बहुतेक अतिरेकी म्हणायचे असावे) आम्हा गरिबांच्या जिवावर जगताहेत.’’ अशी आम गरीब भारतीयांची सार्वत्रिक तक्रार पुन्हापुन्हा मला सांगत होती.

मधे कधीतरी पाऊस सुरू झाला. उघड्या खिडकीतून पाणी आत येऊ लागलं म्हणून खिडकी बंद करायला लागलो तर बाई मला अडवत, ‘हवा आने दो भैया’ असं सांगून विरोध करायला लागली. मी म्हटलं, ‘मी भिजायला लागलोय’ तर बाई ऐकेनाच. ‘जरा ठंडा होने दो,’ असाच तिचा जप. वैतागून त्या बाईला माझ्या सीटवर बसायला लावून मी तिच्या जागी बसलो. म्हटलं काय थंड व्हायचं तेवढं हो आणि डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागलो. पाच मिनिटांनी डोळे उघडून हळूच खिडकीकडं पाहिलं तर बार्इंनी खिडकी बंद केलेली होती.

मनातल्या मनात त्या बाईवर धुसत मी काचेवर थडकणारा पाऊस आणि त्या पावसात रस्त्याच्या बाजूची अर्धवट चंद्रप्रकाशात भुतासारखी डुलणारी उंच झाडं पाहत शिलाँगला गाडी कधी पोहोचणार याची वाट पाहत बसून राहिलो.

सकाळी जसजसं उजाडू लागलं तसतसे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरव्यागर्द छोट्याछोट्या टेकड्यांध्ये ओरबाडून काढल्यासारखे काळ्या दगडांचे ढीग दिसू लागले. जणू हिरव्यागार, तजेलदार दिसणाऱ्या शरीरावर मध्येध्ये पडलेलं पांढऱ्या कोडासारखं काळं कोड. लहानपणी या परिसरातल्या विपुल खनिज संपत्तीबद्दल भूगोलात वाचलेलं. खनिज तेलापासून ते दगडी कोळशापर्यंत काळ्या सोन्याने आणि हिरव्या संपत्तीने समृद्ध प्रदेश. मला दिसणाऱ्या या दगडी कोळशांच्या लहान लहान खाणी स्थानिक खाजगी मालकांच्या होत्या.

सिंधुदुर्ग आणि गोवा या हिरवळीनं समृद्ध परिसरास मँगेनीजच्या खाणींनी जे पर्यावरणाचं उद्‌ध्वस्त करणं चालवलं आहे ते इथं दगडी कोळशांच्या. हिरव्यागार परिसरावर दाटून राहिलेलं ते काळेपण एखाद्या अशुभासारखं मला भासत राहिलं.

सकाळी नऊच्या दरम्यान शिलाँग शहराजवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. समोरच्या सीटवर बसलेला आणि या प्रवासात मित्र झालेला एक प्रवासी, उजव्या हाताला एक शिखर दिसत होतं त्याकडे बोट दाखवून म्हणाला, ‘‘सर ते शिलाँगपीक. त्या शिखरावर शिलाँगचा देव ‘यु लेई शिलाँग’ राहतो, आपल्या नऊ कन्यांसहित. या नऊ कन्या म्हणजे नऊ नद्या. त्यांचं उगमस्थान या शिखरावरच आहे. या नद्या शिलाँग व शिलाँगच्या परिसरातून वाहतात. त्यामुळे इथं काही टेलिफोन कंपन्या आपले टॉवर या शिखरावर उभे करायचा प्रयत्न करताहेत, त्याला इथल्या सर्व संघटनांचा कट्टर विरोध होतो आहे. इथलं पावित्र्य भंग पावतंय म्हणून.’’

बस बऱ्यापैकी शहरात आल्यावर शेजारच्या बाई मला पुन्हा पुन्हा सांगू लागल्या, ‘शिलाँग आलं’ आणि मग इथं उतरा, असा आग्रह करू लागली. मलाही वाटलं की बार्इंचं ऐकावं. बसवाल्याला सांगून खाली उतरलो. बस निघून गेल्यावर आजूबाजूला चौकशी केल्यावर मला कळलं की आपण शिलाँगच्या अलीकडे

दहा कि.मी.वर असलेल्या उपनगरात उतरलो आहोत. बाईवर असहाय संतापलो. कुठल्या जन्मीचा सूड ह्या बाई घेत होत्या असा पारंपरिक विचार मनात आला. कदाचित ऊर्वरित भारतीयांकडून मिळत असलेल्या वागणुकीचा या बाई अशा पद्धतीने सूड घेत असाव्यात असा आतापर्यंतच्या एकूण ईशान्य भारतीय प्रवासातून माझ्या मनात आलेला नवा विचार.

एका लष्करी जवानाला विचारून सिटी बसमध्ये चढून शिलाँगच्या मध्यवर्ती पुलिस बझारमध्ये आलो. तिथं मला रहायला चांगलं लॉज मिळेल असं सहप्रवाशांनी सुचवलं होतं. पाठीला हॅवरसॅक अडकवून पुलिस बझारमधून तीन-चार लॉज चढलो आणि उतरलो. कुठेही थारा मिळाला नाही.

मग बीरमंगलनी दिलेला संपर्कफोन काढला. मि.ओबी गुलापीसिंग, मेघालयच्या मणिपुरी साहित्य परिषद शाखेच्या अध्यक्षांचा. माझा आवाज ऐकताच अख्ख्या मेघालयला ऐकू जाईल असं माझं गडगडाटी स्वागत करत तिथेच चौकात उभे राहा, मी सातव्या मिनिटाला तिथं पोहोचतोय इतका गणिती निरोप त्यांनी मला दिला.

मग चौकात शिलाँगला फिरकी घेत गुलापिसिंगांची वाट पाहत उभा राहिलो.

शिलाँग आणि गुवाहाटी. ईशान्य भारतातील ही दोनच शहरं लहानपणापासून माहितीची. मणिपूर आणि त्रिपुरा यांच्याबरोबर बाकी सर्व प्रदेश आणि आसाम त्या काळात नेफा म्हणून ओळखला जात होता. सगळी मुख्य कार्यालयं आणि सत्ताकेंद्रं याच दोन शहरांत होती. शिलाँग तर काश्मीरच्या श्रीनगरइतकंच एक देखणं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध.

दुसऱ्या महायुद्धात इंफाळ आणि शिलाँग यांचाच बोलबाला. इंफाळ हे ईशान्य भारतातलं तसं थंड हवेचं देखणं पर्यटनस्थळ म्हणून राहिलं आहे, तसंच महत्त्वाचं शैक्षणिक केंद्रही. अगदी ख्रिश्चन धर्मगुरू बनविणाऱ्या बिशप संस्थेपासून ‘नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटी’ म्हणजे ‘नेहू’ या विद्यापीठापर्यंत असं काही मनाशी घोळवत त्या चौकात माझी तंद्री लागली होती.

तेवढ्यात समोर एक मारुती व्हॅन येऊन थांबली. ‘हाय राजा’, व्हॅनचा चालक पाहत ओरडला. मी पाहिलं, एक ऑस्ट्रोएशियटिक मंगोल चेहऱ्याचा उंचापुरा स्मार्ट तरुण (तरुण म्हणताना तो साठीतलाही असू शकतो हे आता इथल्या अनुभवानं माझ्या लक्षात आलं होतं.) मला हाकारत होता. जवळ गेलो, दरवाजा उघडून आपल्या शेजारच्या सीटवर मला बसवून घेत, मी गुलापीसिंग ओक्रम- जन्माने मणिपुरी पण आता कर्माने मेघालयी अशी ओळख करून देत चौकाला गिरकी मारून एका लॉजसमोर घेऊन आला.

त्या दहा मिनिटांत गुलापीसिंग अखंड काहीतरी सांगत होत आणि मधेमधे, मी थोडं जास्त बोलतोय का? असंही विचारत होता. मनातल्या मनात एवढं तरी विचारण्यासाठी मधला वेळ का घालवतोस असं विचारावंसं वाटलं, पण हसून ‘नाही बोल तू’ असं म्हणत त्याच्या अखंड वटवटीला ग्रीन सिग्नल दिला.

त्या लॉजमध्ये माझी सहजगत्या व्यवस्था लावून आपली एकूणच शिलाँगमध्ये किती वट आहे याची जाणीव त्यानं मला करून दिली. मग चहा पिताना बहुतेक त्याला आठवलं असावं की, मी माझी काहीच माहिती त्याला दिलेली किंवा त्यानं विचारलेली नाही. मग माझं येण्याचं प्रयोजन वगैरे समजून घेऊन (खरं तर, त्याला ते आधीच त्याच्या मणिपूरच्या मित्रांनी कळवलेलं होतं. अगदी माझ्या चोरीच्या वृत्तांतासहित. मणिपुरी मित्रांनी मी लुटला गेल्याची बातमी बहुधा ‘टॉक ऑफ द नॉर्थ ईस्ट’ केली. ) माझ्या चोरीबद्दल हळहळ व्यक्त करत म्हणाला, ‘‘चोर आसामीच असणार. कारण बाकीच्या राज्यांचं असं चरित्र नाही.’’

मी म्हटलं इथला चोरही नीतिमान असावा. कारण त्याला अनावश्यक आणि मला आवश्यक गोष्टी तो सोडून गेलाय. ऊर्वरित भारतातले चोर आणि ईशान्य भारतीय चोर यांच्यातलं हे व्यवच्छेदक लक्षण असावं.

गुलापीसिंगनं सांगितलं, ‘‘मी खरं तर आज तुझ्यासाठी रजा घेणार होतो. महत्त्वाची मीटिंग असल्याने जमलं नाही, पण इथून दहा कि.मी.वर असलेल्या खेड्यातल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य असलेले माझे आणखी एक मणिपुरी कविमित्र श्री.राजमणी तुझ्यासाठी इथं येतील आणि तुला शिलाँगमधील काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवतील.’’

गुलापीसिंग मेघालय सरकारच्या एक्साइज खात्यात नोकरी करतो. संध्याकाळी ऑफिसमधून लवकर येईन असं सांगून गुलापीसिंग गेला आणि पुढच्या पाचच मिनिटांत मणिपुरीतला जगदीश खेबुडकर माझ्या रूमवर मला शोधत आला. ‘‘मी राजमणी. आताच गुलापीसिंगचा मला फोन आला होता. मणिपूरमधूनही तुझी व्यवस्था करण्याबद्दल काही मित्रांचे फोन आलेत.’’

राजमणी मात्र बऱ्यापैकी वृद्धत्वाकडे झुकलेले दिसत होते. पण इथल्या ईशान्य भारतीय उत्साहाचा सळसळाट मात्र तसाच. मला आपल्या मारुतीत बसवून गाडी सुरू करीत म्हणाले, ‘‘माझी बायको इथे काही कामानिमित्त आलेली आहे. दोन-तीन तास तिला लागतील, तेवढ्या वेळात आपण थोडं शिलाँग भटकू.’’

शिलाँगचा पुलिस बझारचा मुख्य गजबजलेला भाग सोडला तर बाकी शिलाँग अतिशय निवांत, जंगलात वसलेलं शहर दिसत होतं. अधूनमधून होणारा पावसाचा हलका शिडकावा, काळेभोर डांबरी रस्ते, काळ्या आरशासारखे. बाजूच्या कोहिमा, ऐझॉल सारखंच एक डोंगराच्या सुळक्याभोवती गिरक्या-गिरक्यांनी उंचावत पसरत गेलेलं शहर. राजमणींनी ‘लेडी हायडेल पार्क’समोर गाडी थांबवली. कुठल्यातरी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बायकोच्या नावाचा हा ‘झू’, इथल्या हिमालयीन जंगलात सापडणाऱ्या सोनेरी तोंडाच्या माकडांपासून तीन-साडेतीन फूट उंचीच्या घुबडांपर्यंत आणि हिमालयातील हरणं, साप, कोल्हा वगैरेंसारखे छोटे मोठे प्राणी. अगदी हायडेल पार्कमधल्या मुद्दाम तयार केलेल्या तळ्यामध्ये भल्यामोठ्या सुसरी, मुद्दाम तळ्याच्या पायऱ्यांवर कापून ठेवलेल्या माशांचे तुकडे चघळण्यात दंग.

हिरवेगार गवतांचे लॉन आणि फुलांनी बहरलेले वृक्ष. आतापर्यंत पाण्यावर झुलणारी कमळं पाहिली होती. इथं कमळवृक्ष पाहिला. मोकळ्या अवकाशात अनंत हातांनी कुणी कमळं धरलेली असावीत असा भारावून टाकणारा वृक्ष. पावसाच्या बारीक रिमझिमीत राजमणींबरोबर पुऱ्या बागेला फेरी मारली. तेवढ्या वेळात राजमणींनं आपलं कर्तृत्व मला ऐकवलं.

तीन  हजारपेक्षा अधिक भावगीतं त्यांनी आतापर्यंत लिहिलेली आहेत. त्यांच्या गीतांचे अल्बम मणिपुरी भाषेत लोकप्रिय आहेत. एका दिवसात स्वतःच्या भावगीतांचे दहा संग्रह प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. येत्या काही दिवसांत ते अशाच प्रकारे वीस पुस्तकं प्रकाशित करून नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहेत.

मग थोडी चर्चा मेघालयातल्या ट्राइब्सबद्दल निघाली. मेघालय हे राज्यच मुळी खासी आणि गारू या दोन परिसरांतील पहाडी जमातींच्या बहुसंख्येुळे राजकीय पुनर्वसनाच्या गरजेतून झालं आहे. राज्यनिर्मितीच्या वेळी या राज्यासाठी म्हणे तिबेटी ब्रह्मी भाषेला जवळ असलेल्या खासी मधून नाव सुचविण्यात आलं होतं. पण त्या वेळच्या ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला आणि संस्कृत भाषेतल्या मेघालय या नावाला पसंती दिली.

खरोखरीच हा पहाडी इलाका एवढा मेघाच्छादित असतो की जणू ढगांचं घरच. मोजून चार जिल्ह्यांचं हे राज्य. इथल्या खासी आणि गारोंची एकमेकांशी राजकीय स्पर्धा चाललेलीच असते.

राजमणी सांगतात, ‘हे ट्रायबल्स बेभरवशाचे आहेत. यांच्या ओठात एक आणि पोटात एक. त्यामुळे माझा यांच्यावर कधीच विश्वास नाही. गेली चाळीस वर्षं मी इथं नोकरी करतोय, पण निवृत्तीचं आयुष्य काढायला मी पुन्हा इंफाळला जाणार.’

मला वाटलं होतं की ईशान्य भारतातल्या या विविध जमातींच्या संस्कृतींना समजून घ्यायला आपण कमी पडतोय, पण इथं कित्येक शतकं एकत्र राहूनसुद्धा नागरी समाज वन्य समाजांना समजून घ्यायला कमी पडतोय.

मी सांगणार होतो की माझा अनुभव या बाबतीत वेगळा आहे. पण मणिपुरी अहंकाराची मला आता चांगली ओळख झाल्यामुळे गप्प राहिलो. पार्कमध्येच असलेल्या एका छोट्याशा म्युझियममध्ये गेलो. मेघालयाच्या पहाडी जंगलात सापडणाऱ्या विविध प्राण्यांच्या हाडांचे सांगाडे अगदी हत्तींपासून मिथून आणि याकपर्यंत. खासी, गारो यांची झाडांवर बांधलेली घरं. (आता प्रत्यक्षात अशी झाडांवरची घरं राहिलेली नाहीत. माणसं खाली उतरून जमिनीवर राहायला लागलीत. कदाचित जंगलं नष्ट होत असल्याचा हा एक सज्जड पुरावा.) शस्त्रं, कपडे, विविध वनस्पतींचे नमुने असं सारं काही खासी आणि गारोंच्या पुरातन संस्कृतीचं दर्शन घडवणारं तिथं होतं.

पार्कमधून बाहेर पडून पुन्हा शिलाँग शहराला फेरफटका करताना वाटेत विधानसभा, राज्यपाल भवन आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची स्मारकभूमी राजमणींनी दाखविली.

 इंफाळमध्ये 1821 मध्ये ब्रिटिशांविरोधात उठाव झाला. त्यामध्ये काही ब्रिटिश अधिकाऱ्यांची लोकांनी हत्या केली. त्या अधिकाऱ्यांचं दफन या स्मशानभूीत केलं आहे अशी राजमणींनी माहिती दिली.

मग पुन्हा एकदा सर्व मणिपुरींप्रमाणेच आपल्या मूळ धर्माकडे वळत सनामाही आणि देव पाखंबा यांच्यावर भरभरून बोलत पाखंबाचे सात अवतार आणि आता भविष्यातही या जगाच्या उद्धारासाठी तो आठवा अवतार कसा घेणार आहे; त्यासाठी मणिपूर हेच क्षेत्र पाखंबांनी निवडलं आहे असं खात्रीपूर्वक सांगितलं.

 मला एकदम आठवलं, डॉक्टर खिंगटेंनी मला ऐझॉलमधून फिरताना उंच शिखरावर बांधकाम चालू असलेलं एक भव्य चर्च बांधण्यामागचं कारण सांगताना म्हटलं होतं- प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या नव्या जन्मासाठी मिझोरामची निवड केली आहे, असा विश्वास शंभर टक्के ख्रिश्चन असलेल्या मिझोराममध्ये पसरला आहे.

धर्म बदलले तरी संकल्पना मात्र परंपरेतूनच येतात.

शिलाँगच्या सुप्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध गोल्फच्या मैदानावर राजमणींनी गाडी आणली आणि मला मैदानाचा जास्त आनंद घेता यावा म्हणून नेमकी इथंच पंक्चर झाली.

 राजमणीसाहेब लगबगीने खाली उतरले. मी मदत करू का म्हणून लुडबुडायला गेलो तर मैदानाच्या हिरव्यागार लॉनवरून छान फिरून या असा आदेश देत त्यांनी मला हाकललं. हिंदी सिनेमात लहानपणापासून असं हिरव्यागार कुरणाचं, चढ-उतारांचं डोंगरी मैदान, त्यातल्या देखण्या प्रशस्त इमारती असलेल्या शाळा आणि कोट, टाय, पँट अशा युनिफॉर्ममध्ये असलेल्या गोबऱ्या गालांची टवटवीत मुलं पाहिलेली स्वप्नवत वाटायची. आमच्या शाळा आठवून अशा प्रकारची शाळा खरोखरीच पृथ्वीतलावर कुठं अस्तित्वात असेल याबद्दल शंका वाटायची. पण आता शिलाँग फिरताना मात्र तेही एक सत्यच आहे याची खात्री पटली.

मैदानावर दूरवर अनेक तरुण जोडपी शिलाँगच्या त्या सुंदर ताज्या तरुण वातावरणात बिलगून फिरताना पाहून मनात विचार घोळत होता, एवढ्या प्रसन्न, सुंदर वातावरणात इथल्या तरुणांना हातात बंदूक घ्यावीशी का वाटते?

राजमणींना विचारलं, ‘‘आता स्वतंत्र राज्य झाल्यावर खासी गारोंच्या ज्या सशस्त्र संघटना होत्या त्या शांत झाल्या असतील.’’

 राजमणी चाकाचा शेवटचा नटबोल्ट आवळत म्हणाले. ‘‘आता त्यांच्या हिंसक कारवाया खूपच कमी झाल्या आहेत, पण हातात बंदूक असली की काही काम न करता पैसा मिळवता येतो हेही त्यातल्या काही जणांना कळलंय.’’

एका हॉटेलमध्ये छानपैकी चिनी नूडल्स खाऊन राजमणींनी उद्या परत भेटू असं सांगत मला लॉनवर सोडलं.

मी म्हटलं, ‘मला डॉ.रॉबिनसिंग या इंग्रजी आणि मणिपुरीत लिहिणाऱ्या तुमच्या प्रसिद्ध साहित्यिकाला भेटायचंय. ते इथल्या विद्यापीठातच असतात ना?’

राजमणींनी माझ्याकडे थोडं नाराजीनं पाहिलं. ‘‘ते कदाचित इंग्रजीत चांगलं लिहीत असतील पण मणिपुरीत अत्यंत सामान्य लिहितात.’’

मराठी साहित्य जगातातील मला माहीत असलेले लेखकांचे आपापसातले संबंध इतर भाषांतील लेखकांध्येही तसेच असतात हे समजून मला थोडं समाधानच वाटलं. गीतकार मारुतीचा हॉर्न वाजवत निघून गेले.

 पाच वाजता गुलापीसिंग आले. त्यांनी शिलाँग टाइम्सच्या संपादिका पॅट्रिशिया माखिमची भेटीसाठी वेळ ठरविली होती. शिलाँग शहराला वेढे घालत बऱ्यापैकी उंचावर शहराच्या एका बाजूला पोहोचलो. ती संध्याकाळची सातची वेळ होती. निर्मनुष्य वाटणाऱ्या एका भल्यामोठ्या इमारतीसमोर गाडी थांबवली. शिलाँग टाइम्सचं ऑफिस. बाहेरच्या वॉचमननं आत जाऊन आमच्या भेटीसाठी  संपादिका बार्इंची मान्यता घेतली. इथला एकंदर शुकशुकाट पाहून मी थोडा गोंधळलोच होतो, कारण पत्रकार या नात्याने वर्तानपत्राच्या कार्यालयातील ही वेळ कशी घाई गडबडीची, गर्दीची असते हे मी सर्वत्र अनुभवलं होतं. पण इथं तर एकदम शुकशुकाट होता.

संपादिका बार्इंच्या केबिनमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या कॉम्प्युटरवर काही काम करत होत्या. मला बसायला सांगून पंधरा मिनिटं व्यस्त राहिल्या. साधारण चाळिशीतल्या पण तिशीच्या वाटणाऱ्या, पत्रकारितेच्या क्षेत्रातील भारतातील महत्त्वाची पारितोषिकं मागच्या बाजूच्या कपाटात रचलेली, सोबत पद्‌म पुरस्कारही.

गेले दोन दिवस शिलाँग टाइम्स वाचत होतो आणि बाई इथल्या राजकीय प्रश्नावर किती आक्रमकपणे लिहितात याचाही अंदाज आला होता. पंधरा मिनिटांनी हातातला माऊस बाजूला ठेवत आपली खुर्ची फिरवत त्या आमच्याकडे वळल्या.

‘‘महाराष्ट्रातून आलाय. कसं वाटलं नॉर्थ ईस्ट? तुमच्या तिकडचे पत्रकार फार अर्धवट माहितीवर आणि पूर्वग्रहदूषित लिहितात हे पटलं असेल ना तुम्हांला?’’

बार्इंनी एकदम रोखठोकच सुरुवात केली. मग पुन्हा चेहऱ्यावर हास्य पसरवत म्हणाल्या, ‘‘आमचेही राजकारणी त्याच लायकीचे आहेत म्हणा. सांस्कृतिक आणि स्वटोळीच्या हिताची भाषा करत स्वतःची तुंबडी भरताहेत. इथल्या जनतेला आणि ऊर्वरित भारतालाही फसवलं.’’ ‘‘मला नाही तसं वाटतं. कारण थोडी सांस्कृतिक भिन्नता, वांशिक भिन्नता याही गोष्टी आहेतच. शिवाय ईशान्य भारतात आर्थिक विकासाला वेग देणारे मोठे उद्योगधंदे अत्यंत अल्प आहेत. या उद्योगधंद्यांच्या वाढीला वेग द्यायचा जरी प्रयत्न केला तरी इथल्या टोळ्यांच्या सांस्कृतिक परंपरा म्हणजे जमिनींची टोळीनिहाय मालकी, सरकारी मालकीच्या जमिनींचा पूर्णतः अभाव अशासारख्या गोष्टीही कारणीभूत आहेत. पण या टोळीनिहाय असलेल्या सामूहिक मालकीच्या किंवा वंशपरंपरेने आलेल्या जमिनी काढून घ्यायच्या म्हटल्या तर बाहेरचे भांडवलदार इथल्या स्थानिक माणसाला देशोधडीला लावतील. हेही खरं ना?’’

बार्इंनी माझ्याकडं कौतुकानं बघितलं. मग हसतच म्हणाल्या, ‘‘तुम्ही म्हणताय ते चूक नाही, पण त्याचा किती फायदा आम्ही लोकांनी उठवावा हे पण ठरवायला हवं ना. केवळ वन्यजमाती म्हणून आम्ही सवलती आणि अनुदानं मागत राहिलो तर कायमचेच पांगळे राहू. केंद्र शासनाकडून आणि वेगवेगळ्या माध्यमांतून इकडची सगळी राज्ये बाह्य मदतीवरच अवलंबून. ट्रायबल्स म्हणून आम्ही कर भरणार नाही, आमच्या उत्पन्नावर तुम्हाला कर घेऊ देणार नाही, त्याचा नक्कीच विपरीत परिणाम एकूण अर्थव्यवस्थेवर होतो आहे. लोकशाही व्यवस्थेत एक लोकाभिमुख स्वायत्तता असते- जी आम्हांला परंपरा म्हणून हवी आहे. ती मिळत असताना आता बंदुकीच्या जोरावर हिंसाचार करीत राहणं कितपण नैतिक आणि वास्तविक आहे?’’

पॅट्रिशिया बाई आपल्या अग्रलेखांधून नेहमीच इथल्या अतिरेकी संघटनांच्या विभक्त होण्याच्या धोरणाला कडाडून विरोध करत भारताच्या मुख्य प्रवाहात सामील राहण्याचा आग्रह धरून आहेत. त्यांच्या मते ‘‘आता ट्राइब म्हणून स्वतःचं वेगळेपण सांगत समाजात राहण्यापेक्षा भारतीय लोकशाहीचा योग्य तो लाभ घेणं हे जास्त महत्त्वाचं.’’

‘‘खासी आणि गारोंध्ये मातृसत्ताक पद्धती...’’ बाई मला मध्ये अडवत म्हणाल्या, ‘‘मातृसत्ताक नव्हे, त्या अर्थानं इथली व्यवस्था पितृसत्ताकच आहे. मातृवंशप्रधान म्हणा. कुटुंबातल्या सगळ्यांत लहान मुलीकडे संपत्तीचा वारसा जातो आणि तिने सर्व कुटुंबाची काळजी वाहायची असते एवढाच याचा अर्थ. टोळीसंस्कृतीत तुमच्या नागरी संस्कृतीसारखे स्त्रियांवर घरेलू अत्याचार फारसे होत नसले तरी निर्णयाचे अधिकार हे पुरुषांकडेच एकवटलेले आहेत. त्यामुळे इथला अतिरेकी उग्रवाद संपायचा असेल तर पितृप्रधान व्यवस्थेविरुद्धसुद्धा आम्हांला हल्लाबोल करावा लागेल.’’ पॅट्रिशिया बाई या खासी जमातीच्या आहेत.

बाई गंमतीने सांगतात की, खासी म्हणजे ब्राह्मण तर गज्ञाक्षरे म्हणजे क्षत्रिय. ‘‘मग कुकुलसंगमा, पीए संगमा वगैरे...’’ ‘‘अर्थात गारो, आणि मी संपादक, शब्दांशी संबंधित म्हणून खासी’’ बाई समाजशास्त्रही विनोदी भाषेत मांडतात.

‘‘तुम्ही इतक्या आक्रमकपणे या अतिरेकी संघटनांविरुद्ध बोलताय, लिहिताय. तुम्हाला भय नाही वाटत?’’ माझ्या प्रश्नाचा रोख समजून बार्इंनी मला एक हिंदी शेर इंग्रजीत ऐकवला.

‘‘हमको मिटा सके, जमाने मे दम नही.’’

बार्इंना सलाम करीत उठलो. गुलापीसिंग गाडीत बसताना म्हणाला, ‘‘ईशान्य भारतात आता हे हिंसाचाराचं, विभक्त होण्याचं राजकारण करण्याचे दिवस संपलेत.’’

मी रात्री कविता लिहिली...

पहाडांवर, मैदानावर जोवर उमटतो हिरवा रंग

नद्यांतून, आभाळातून जोवर बरसते निळाई

अज्ञातासाठीही जोवर येते माणसाच्या हृदयात करुणा

काहीही करता येणे शक्य नाहीय वाईट.

16 जून 2011, शिलाँग (मेघालय)

‘नेहू’ विद्यापीठात गुलापीसिंगबरेाबर गेलो. डॉ.रॉबिन सिंगना शोधत. या विद्यापीठात कुणी मराठी प्राध्यापक आहेत की नाहीत, तर डॉ.मंगेश रेगेंचं नाव कळलं. गणिताचे प्राध्यापक रॉबिन सिंगच्या आधी विद्यापीठ परिसरातील त्यांचं घर सापडलं. आदल्या रात्री त्यांच्या मणिपुरी बायकोबरोबर फोनवरून चर्चा झाली होती. आपला सासुरवाडीचा माणूस म्हणून त्यांनी खास मणिपुरी आग्रहाने घरी यायचं निमंत्रण दिलं होतं. या स्वतःही इंग्रजीच्या प्राध्यापक.

नेमकं आजच त्यांना गुवाहाटीला एक महत्त्वाची मीटींग असल्यामुळे जावं लागतं, पण मणिपुरी आतिथ्यशीलतेनं त्या आमच्या स्वागताची भरपेट तयारी करूनच गेल्या होत्या.

डॉ.रेगे भेटले. खूप दिवसांनी मराठी बोलायला  मिळाल्याच्या आनंदात. त्यांनी, आपण महाराष्ट्रातले आहोत. सत्तर- ऐंशी सालात निर्माण झालेल्या मार्क्सवादी विचारांची कास धरलेल्या तरुणांनी निर्माण केलेल्या ‘मागोवा’ गटाचा एक संस्थापक सदस्य अशी ओळख सांगितल्यावर पंढरीचा वारकरी काशीमध्ये भेटावा अशी माझी अवस्था झाली.

त्यांनी खूप आस्थेने मागोवा गटाच्या ‘तात्पर्य’ आणि ‘मागोवा’ अंकांच्या जपून ठेवलेल्या प्रती दाखविल्या.

साप्ताहिक साधनाचाही मी वाचक होतो असंही मला आवर्जून सांगत आता साधनासाठी माझी वर्गणी भरून घ्या, अशी विनंती केली. मी त्यांना, वर्गणी नको ईशान्य भारताबद्दल आमच्या अंकासाठी सातत्याने लिहा अशी विनंती केली.

डॉ.रेगे हे मराठी विज्ञान परिषदेचेही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे दर वर्षी मे महिन्यात ते मुंबईला येतात. ईशान्य भारत हा जर सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या समजून घेतला नाही, तर तो नेहमीच आपल्याला परका भासेल असं त्याचं म्हणणं.

इथं एवढी वर्षं राहिल्यानंतर इथल्या बंडखोरीला आपल्या माध्यमांनी आणि विशेषतः हिंदुत्ववादी शक्तींनी अतिशयोक्तच रंगवलं आहे असं त्यांचं ठाम मत. ऊर्वरित भारताचं आणि या भागाचं सर्व प्रकारचं दळणवळण वाढलं तर इथल्या माणसांध्ये असलेली ही वेगळेपणाची भावना खचितच दूर होईल याबद्दल त्यांना डावा अभिमान आहे. ‘‘सर, मी जवळपास सर्व राज्यं हिंडत आलो पण ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘अल कायदा’सारख्या अतिरेकी संघटना ज्या प्रकारे सर्व सामान्य माणसांमध्ये हिंसाचार घडवून आणतात, तसं काही इथं दिसलं नाही. उलट खूप शांततेचं वातावरण सामान्य माणसांध्ये मला दिसलं.’’

मी माझ्या भाषिक आपलेपणाच्या नात्याने रेगे सरांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. ‘‘बरोबर आहे राजाभाऊ, कारण इथली बंडखोरी ही सत्तेशी म्हणजे शासनकर्त्यांविरुद्ध आहे. परंपरेने स्वातंत्र्याबद्दलची जी मानसिकता इथल्या जमातींमधून तयार झाली आहे त्या मानसिकतेने दिलेला नकार आहे. आर्थिक, भौतिक विकासाचं मागासलेपण हेही जरी अनेक कारणांपैकी एक कारण असलं तरी कळीचं कारण नव्हे. त्यामुळे काही ठिकाणी योग्य प्रकारची स्वायत्तता दिल्यावर ही हिंसक बंडखोरी कमी झालेली तुम्ही पाहतच असाल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इराक व्हाया चीनचा मंगोलिया प्रांत ते न्यूझीलंडच्या मावरी आदिवासींपर्यंत अनेक जमाती या प्रांतात येऊन स्थायिक झाल्या. त्यांचं दिसणं, शरीराची ठेवणही बरीचशी मंगोल असल्यामुळं चिनी लोकांशी जवळीक दाखवते. ऊर्वरित भारतामध्ये चिनी माणसाचा चेहरा हा शत्रूचा चेहरा म्हणूनच बिंबवला गेला असल्यामुळे, या माणसांकडे बघण्याची आम्हा भारतीयांची नजर साफ नाही हेही तितकंच खरं. आणखी एक महत्त्वाचं- ब्रिटिशांपासून या लोकांची नैसर्गिक साधनसंपत्ती हडपण्याचीच मानसिकता नागर समाजानं जोपासली आहे.’’

डॉ.रेगेंच्या मुद्‌द्यांना वैचारिक व स्थानिक निरीक्षणांचा नक्कीच आधार होता. बाहेर शिलाँगचा देखणा पाऊस कोसळायला लागला होता. त्या पावसात जवळच असलेल्या पण घनदाट झाडीमुळं लवकर न सापडलेल्या डॉ.रॉबिन सिंगांच्या लाकडी घरात गेलो. रॉबिन सिंगांनी ईशान्य भारताचं अधिकृत पेय म्हणून माझ्यापुरती मी मान्यता देऊन टाकलेल्या लिंबू घातलेल्या काळ्या चहानं स्वागत केलं.

मणिपुरी संस्कृतीवर बोलताना म्हणाले, ‘‘आम्ही मणिपुरी इतिहासात रमलेलो आहोत. आमच्या कला, परंपरा, साहित्य हे थोरच आहे, पण आता जग खूप जवळ येत चाललं आहे. जागतिकीकरणाच्या या घडीला अनेक गोष्टी आपल्यावर प्रभाव टाकताहेत. तुम्ही मणिपुरी लोककलांचा विकास किती झाला आहे हे पाहिलं पण नव्या वर्तमानाची दखल घेणारं, आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचा छेद घेणारं सशक्त नाटक वा कलाकृती निर्माण होत नाही. त्यामुळेच कदाचित आजचं वर्तमान मणिपुरी नाटक हे तुमच्या विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाडपासून ते मोहन राकेश, लक्ष्मीनारायण लाल अगदी शेक्सपियरसुद्धा, यांच्या भाषांतरावर जगण्यात धन्यता मानत आहे.’’

राजमणी रॉबिन सिंगवर का नाराज असावेत याचा बारीक अंदाज आला.

ईशान्य भारत हा एक छोटा भारतच आहे. मोठ्या भारतात जेवढी विविधता आणि वैविध्य आहे तेवढीच इथेही. त्यामुळे मोठ्या भारतात आपली एकात्मता जपण्यासाठी जे काही केलं असेल तेच या छोट्या भारतातही करायला हवं. डॉक्टरसाहेबांचं हे विधान ऐकताना मी प्रांतोप्रांती थैमान घालणाऱ्या प्रादेशिकवादाच्या विचारात बुडून गेलो.

 रात्री गुलापीसिंगने मला एका तीन तारांकित किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला नेलं असावं, कारण तिथल्या झगमगाटाने आणि या जगात दारिद्र्याचा मागमूसही नसावा असं वाटायला लावणाऱ्या गिऱ्हाईकांनी मी दिपून गेलो होतो.

जेवताना गप्पा मारत (अर्थात गुलापीसिंगच एकटाकी बोलत होता) गुलापीसिंगने, आपल्याला डॉक्टर व्हायचं होतं, पण पैसे नव्हते. काही भूमिगत संघटना शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात हे कळल्यावर त्या संघटनेत सामील व्हायची मानसिक तयारी करत होतो. पण त्या संघटनेत एकदा सदस्य झालं की संघटना सोडता येणार नाही या अटीमुळे वेळीच सावध झालो. आपल्या रणधीर नावाच्या पुतण्याचीही अशीच एक गोष्ट त्याने सांगितली. तो त्याच्या विद्यार्थी वयात ‘थ्रिल’ अनुभवण्याच्या आकर्षणाने आणि त्या संघटनेच्या बौद्धिकांतून सतत होणाऱ्या ब्रेनवॉशिंगमुळे आपण अन्यायग्रस्त असून आपल्या समाजाची मुक्तता करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्यावरच आहे, या भावनेने एका कुकी अतिरेक्यांच्या संघटनेकडे झुकू लागला होता. मग मी त्याला इथं माझ्याकडं शिलाँगमध्ये आणून ठेवला. दोन-तीन महिने त्याची समजूत घातल्यावर त्याच्या डोक्यातलं हे खूळ गेलं आणि तो आता मणिपूरमध्ये बँकेत नोकरीला आहे.

मग नागालँडध्ये काँग्रेस पक्षाच्या फाफणेंनी सांगितलेलं आठवलं की, आता या अतिरेकी संघटना त्यांच्या मूळ कारवायांसाठी अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. तर राजकीय कवचाखाली खंडणी उकळणाऱ्या माफियांच्या टोळ्या  झालेल्या आहेत.

दिमापूरमध्ये एका मुस्लिम व्यापाऱ्याचं अपहरण झालं व नंतर खूनही. हे अपहरण एका नागा अतिरेकी संघटनेनं केलं असलं तरी त्याच्यामागचं मास्टरमाइंड एक बिहारी निवृत्त कर्नल होता. डॉ.रेगे सांगत होते की आता इथल्या बंडखोरीचा राजकीय संदर्भ संपल्यात जमा आहे.

17 जून 2011, शिलाँग (मेघालय)

चेरापुंजीला जाऊन आलो, लहानपणी भूगोलात भारतातील सर्वांत जास्त पाऊस पडणारं गाव म्हणून घोटून घोटून पाठ केलेलं. इतकं की चेरापुंजी नाव नुसतं आठवलं तरी डोक्यात पाऊस सुरू होतो.

मी महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणाऱ्या आजरा तालुक्यातला. त्यामुळे खरंखुरं चेरापुंजी पहिल्याशिवाय परतणं शक्यच नव्हतं. मेघालय टूरिझमच्या ऑफिसवर चेरापुंजीसाठी जेव्हा बुकिंग करायला गेलो तेव्हा कळलं, भारतातल्या सर्वोच्च पावसाचा मान आता चेरापुंजीकडं न राहाता ‘मानसिनरम’चा आहे.

शिलाँगमधून देखण्या वाटेनं वीस कि.मी.वरच्या ‘मौकटॉग’ या दरीजवळ पोहोचलो. मिनीबस थांबली. रिमझिम पावसात या दरीचं दर्शन घेण्यासाठी घाटात उभारलो. कोवळ्या पोपटी हिरव्या रंगापासून, काळ्या दाट पक्व हिरव्या रंगापर्यंत दरीत हिरवाईचा एक समुद्रच उसळला होता. त्यावरून हळुवार तरंगणारे ढगांचे पुंजके, जसे पारदर्शक राजहंसच विहरताहेत. सौंदर्याच्या जेवढ्या म्हणून कविकल्पना करणं शक्य आहे आणि त्या जिथं थांबतील तिथून पुढं इथलं सौंदर्य सुरू होतं. असा एक दिव्य अनुभव. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणं ‘‘याचसाठी केला होता सारा अट्टाहास’’ अशी भावावस्था. तो सगळा क्षण जाणिवेमध्ये आणि मेंदूमध्ये गोठून पुढं निघालो. वाटेत दोन-तीन ठिकाणचे मनोहरी धबधबे न्याहाळत नोशिथियांग धबधब्याजवळ म्हणजे समोरच्या कड्यावरून कोसळणारे सात धबधबे व अलीकडील कड्यावरून न्याहाळणारे आम्ही. सगळे ‘सेव्हन सिस्टर्स’, ‘सप्तभगिनी’ असं ओरडत आपला आनंद व्यक्त करत होते. ईशान्य भारतातल्या या सात राज्यांना सप्तभगिनी हे नाव ज्यांच्यामुळं पडलं त्या या ओघवत्या अदिमायांचं दर्शन घेताना मी केवळ विदेही होण्याचंच शिल्लक होतं.

भरपूर पाऊस पडतो म्हणजे भरपूर घनदाट जंगल असणार असा आपला एक भाबडा समज असतो. प्रत्यक्षात मात्र हिरव्या गवतांची शाल ओढून घेतलेल्या आणि कुठेकुठे तेही नसलेल्या उघड्या आणि कधीकधी बोडक्या लांब-रुंद डोंगरांवरून चेरापुंजीजवळ आलो.

चेरापुंजी हे खासी लोकांची वस्ती असलेलं एक छोटंसं गाव. रामकृष्ण मिशनने 1943 साली इथं पहिली शाळा काढून नागरी संस्कृतीचं बीज रोवलंय. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर मिशननं ईशान्य भारतातल्या विविध जमातींची जीवनशैली दर्शविणारं सुंदर म्युझियम उभारलंय.

चेरापुंजीचा नोहकलिक धबधबा बघायला पठारावर आलो. अनेक खासी लोकांची भात किंवा नूडल्स खायला बोलवणारी छोटी छोटी टपरीसारखी हॉटेलं. जरा चालत पुढे गेलो, एकुलतं एक पत्र्याचं छप्पर असलेलं, आपल्याकडे शेतात गाईगुरं बांधण्यासाठी जसा आसरा उभारतात तसं झोपडं. दारातच पोटाशी अपुऱ्या कपड्यांतल्या दोन लहान मुलांसोबत तेवढ्याच फाटक्या कपड्यांतला एक खासी बसला होता. त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. झोपडी आतून पाहू का म्हणून विचारत होतो.

तो नुसतंच ‘खुबलेईऽऽ खुबलेई’’असं म्हणत म्हणत हात जोडत होता. मग मी निर्लज्जपणे त्याच्या झोपडीत फिरून आलो. एक दगडी चूल. मोजून तीन पातेली आणि एका बाजूला लाकडी काटक्या रचलेल्या. असं श्रीमंत दारिद्र्य बघून चूपचाप बाहेर पडलो.

एका खासीच्या हॉटेलमध्ये मॅगीचे नूडल्स खाताना त्याला खुबलईचा अर्थ विचारला. त्यानं आपल्या मोडक्या-तोडक्या हिंदी भाषेत सांगितलं ‘शुक्रिया’. मला प्रश्न पडला तो खासी माझे कशासाठी आभार मानत होता? त्याचं दारिद्र्य पाहायला गेलो म्हणून की माझ्या संस्कृतीनं त्याला दारिद्र्य दिलं म्हणून?

हॉटेलवाल्या खासीला विचारलं, ‘तू हिंदू की ख्रिश्चन?’

पुन्हा एकदा शब्द जुळवत तो उत्तरला, ‘नॉन ख्रिश्चन म्हणजे हिंदूच ना?’

परतताना एका बाजूला बांगलादेशचं पठार दिसत होतं. छोटी छोटी हिरवी, पिवळी भाताची खाचरं. छोटी छोटी चमचमणारी तळी. खूपच भारावून गेलो ते मनोहारी दृश्य पाहून. जणू ‘पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले ’ याचा मूर्त प्रत्यय.

रवींद्रनाथ टागोरांनीदेखील अशाच कुठल्याशा ठिकाणाहून आपल्या बांगला भूमीचं दर्शन घेत ‘आमार सोनार बांगला’ हे सर्वोत्तम गीत लिहिलं असावं.

सोबतचा त्रिपुरा रायफल्समध्ये जवान म्हणून नोकरी करत असलेला झारखंडचा तरुण म्हणाला, ‘भटकल्याशिवाय आपण किती लहान आहोत हे कळत नाही. मी नेहमीच अशी सुट्टी काढून भटकतो आणि मला सगळा भारत पाहायचा आहे.’

‘मग तू बंदूक चालवायचं विसरून कविता लिहायला लागशील.’ मी त्याच्या पाठीवर थाप मारत हसत म्हटलं.

नंतर तो सांगत होता, ‘हे ट्रायबल्स खूप चांगले पण बंगाली मात्र खूप वाईट आहेत.’

 तो तरुण झारखंडधला ओबीसी होता आणि माझ्या तथाकथित सुधारलेल्या संस्कृतीला त्यानं लगावलेली ही चपराक होती.

संध्याकाळी पुन्हा गुलापीसिंगबरेाबर शिलाँगच्या चौकातील बाजारातून फेरफटका मारला. पर्यटनस्थळी ज्या ज्या वस्तू विकल्या जातात, त्या तर तिथं होत्याच पण मेघालयचं बांबूवैभव आणि बांबू हस्तकला कौशल्य दाखविणाऱ्या बांबूच्या विविध वस्तू आणि प्रकार तिथं होते. शिवाय छोट्याछोट्या ओपल्यांतून ससे आणि पांढरे उंदीरही.

रात्री कॉ.संगमांना (लोकसभेचे माजी सभापती आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महाराष्ट्राला माहीत झालेल्या पी.ए. संगमांचे चिरंजीव) फोन केला. सध्या ते मेघालय विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची सख्खी बहीण केंद्रात मंत्री आहे आणि वडील विधानसभा सदस्य.

म्हटलं, ‘तुम्हांला भेटायचं आहे, मी शिलाँगमध्ये आहे.’

तिकडून उत्तर आलं, ‘मी तुर्रामध्ये आहे, माझ्या मतदारसंघात आणि तुर्रा हे शिलाँगपासून मुंबई ते नागपूर एवढ्या अंतरावर आहे.’ कॉमरेड साहेब अस्खलित हिंदीत बोलत होते. मला  वाटलं कुणी उत्तर भारतीयच बोलत आहे. एवढ्या प्रवासात एवढं स्पष्ट आणि स्वच्छ हिंदी बोलणारा ईशान्य भारतीय माणूस भेटला असं समाधान करून घेत फोन बंद केला. आता मेघालयचा निरोप घ्यायला हरकत नाही.

20 जून 2011, रोरी (आसाम)

डॉ.सुनील कौल नवेबोंगाईगावाच्या जवळ असलेल्या रोरी या खेड्यात ‘द अँट’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवितात.

तो सगळा ‘बोडो’ जमातींच्या लोकांचा प्रदेश आहे, असं मला एप्रिल महिन्यात बिकानेरमध्ये सुमिता बोसनं सांगितलं होतं. संपर्क फोनही दिला होता. सुमिताचा नवरा संजय बोस. तोही तिथंच काम करत होता. त्याची ‘बोडो’ अतिरेक्यांनी पळवून नेऊन हत्या केली होती.

खरं तर डॉ.सुनील कौलनाच त्यांना पळवायचं होतं पण अतिरेक्यांचा डाव फसला. डॉक्टरसाहेब मूळचे लष्करातले कर्नल. लष्करातला एकूण कारभार आणि व्यवहार त्यांच्या सामाजिक भान असलेल्या मनाला आणि कविहृदयाला मानवला नाही म्हणून त्यांनी लष्कराचा राजीनामा देऊन आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा लाभ गोरगरिबांना देण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक कामात स्वतःला झोकून दिलं.

आता इथल्या परिसरात ते एक अत्यंत आदराचं आणि श्रद्धेचं स्थान बनले आहेत.

गुवाहटीच्या कामाख्य रेल्वे स्टेशनवर शिलाँगमधून सुमोने पोहोचल्यावर डॉक्टरसाहेबांना फोन केला.

 ते म्हणाले, ‘‘मी गुवाहटीतच आहे. मिटींग संपवून येतो. तोपर्यंत तुम्ही रेल्वेत बसून घ्या.’’ स्टेशनवर भगव्या वस्त्रधारी साधूंची गर्दी. अंगभर पट्टे. काहींच्या हातात त्रिशूल, काहींच्या हातात सर्पाकार दंड, काठ्या. भगव्या रंगात जेवढी भीषणता आणता येईल तेवढे अंग आणि पेहराव हिंस्र केलेले. जटा आणि वेण्या. काही घोळके चिलमीच्या धुरांच्या ढगांत वेढलेले. एका भगव्या कळकट धुरकट घोळक्याजवळ बसलो.

‘‘कहाँ जा रहे हो?’’ मी जटा, दाढी मिशांत हरवलेला चेहरा शोधत विचारलं, ‘‘यही आये है. माताके पास. अंबूबाकी यात्रा है नं?’’

पाठोपाठ मला थोडासा गरगरवणारा भक्ककन धूर.

 ‘‘हो. यात्रा है ना अंबामाताकी, अभी तीन दिन मंदिर बंद. माता ऋतुस्नात हो गयी है.’’ लोट्यातले चणे तोंडात टाकत दुसरा दाढी मिशा जटाधारी. मग चर्चेतून कळत जातं की तीन दिवसानंतर इथल्या नीलांचल पर्वतावरील कामाखा देवीचं देऊळ उघडलं जाईल. मोठ्ठी यात्रा भरते त्या वेळी. दोन-तीन लाखांवर भाविक जमतात.

ही देवी मुख्यतः तांत्रिकांची असल्याने तांत्रिक साधू खूप जमतात इथं. पशुबळी- त्यात बकरी, मेंढ्या आणि कोंबड्या यांच्या मांसाचा खच पडतो साऱ्या मंदिर परिसरात. कामाख्या देवीची मूर्ती म्हणजे स्त्री योनीअंग. निर्मितीचं प्रतीक.

आसामला पूर्वी कामरूप नाव होतं. म्हणजे स्त्री राज्य. किंवा स्त्रीप्रधान राज्य. नवनाथांतले मच्छिंद्रनाथ इथल्या स्त्री राज्यात मोहून गेले, त्याला इथून मोहातून बाहेर काढायला ‘चलो मछिंदर, गोरख आया’ अशी घोषणा देत गोरखनाथ आले.

दाढीमिशाजटाधारीनं सोबतच्या भांड्यातला एक बत्तासा उचलून माझ्या हातात ठेवला. मी भक्तिभावाने नाही, पण भूकभावाने घेतला. गोरखनाथाच्या अलिप्ततेने त्या घोळक्यातून उठलो तेव्हा दोन पावलं उगीचच लडखडल्यासारखं झालं.

समोर नवेबोंगाईगावासाठी ट्रेन लागली होती. गाडीत एक भद्र आसामस्थित बंगाली सांगत होता, ‘बहोत बुरा माहौल होता हैं यात्राके दरम्यान। आदमी कितना गंदा होता है, ये ऐसी जगहपर मालूम पडता हैं। आता अजून वयात न आलेल्या मुलीचा पूजनविधी चालू आहे. देवळात आणि परिसरात. देवीला मासिकपाळी आणि पूजेला पुरुष. हॅऽऽ’

‘‘आपण नास्तिक आहात?’’ माझा नम्र मानभावी प्रश्न.

‘‘छे हो! आपणही देवाला मानतो ना, पण स्त्रीच्या गुप्तांगाची पूजा वगैरे हे सगळं रानटी आहे. आदिवासींच्या मूर्ख कल्पना आहेत.’’

एवढं बोलून तो मग आदिवासी ऊर्फ ट्रायबल्सवर घसरला. आम्हा नागरी लोकांवर हे कसे जळतात, यांना कष्ट करायला नको पण आम्ही कष्ट करून सारं मिळवतो, हे यांना कसं बघवत नाही वगैरे. यांना काम करायला नको, बंदुकीच्या जोरावर सगळं मिळवायला बघतात असं तणतणत होता.

 ‘‘आपलं नाव?’’ मी हळूच विचारलं.

‘‘मोहन गंगोपाध्याय.’’ त्यानं थोडं ताठ्यातच सांगितलं. मी काहीतरी रहस्य समजल्यासारखं स्मित केलं.

मग डॉ.सुनील कौलच्या सूचनेप्रमाणे नवेबोंगाईगाव स्टेशनवर पोहोचल्यावर पादचारी पुलाच्या जिन्याजवळ त्यांची वाट बघत उभा राहिलो. गर्दी नेहमीप्रमाणचं ओसंडून वाहत. त्यातूनही सहा फूट उंचीचा शेलाट्या बांध्याचा, लांब झब्बा आणि सलवार घातलेला एक देखणा तरुण (नंतर कळाल्याप्रमाणे 55 वर्षांचा ) खांद्याला शबनम अडकेली, धाड धाड पायऱ्या उतरून माझ्या पुढ्यात उभा राहिला.

एकाच वेळी ‘आप राजा?’ ‘आप सुनील?’ असं आम्ही एकमेकांना विचारलं आणि खो खो हसायला लागलो.

‘अपने बिरादरी के लोग आसानीसे पहचाने जाते है’ दोघांच्याही मनातली प्रतिक्रिया डॉक्टरसाहेबांनी हसत हसत बोलून दाखवली.

 मोटरसायकल स्टँडवरची बाईक काढून डॉक्टरसाहेबांनी मला पाठीागे बसवत उजेडातल्या नवेबोगांई गावातून अंधारातल्या रोरी गावाकडे दामटली.

अंधाऱ्या वळणावरती बांबूचं कुंपण घातलेल्या एका प्रशस्त आवारात मोटरसायकल आणून उभी केली. ‘‘हे आमचं कार्यालय आणि निवासस्थान देखील.’’ डॉक्टरांनी आधीच संस्थेच्या भोजनालयात आमच्या दोघांचं जेवण राखून ठेवायला सांगितलं होतं. जेवून झाल्यावर डॉक्टरांच्या निवासस्थानातच बराच वेळ गप्पा मारत बसलो. डॉक्टर आपले लष्करातले अनुभव आणि इथलेही अनुभव एखाद्या लेखकाच्या (खरे तर ते लेखक-कवी आहेतच) सराईतपणे सांगत होते.

 ‘‘बोडो अतिरेक्यांचा खूपच मोठा उपद्रव, असंतोष या  इलाख्यात. तुम्हीही अनुभवला असेल. संजयला तर त्यातच मृत्यू.’’ मी विषयाला हात घातला.

डॉक्टर खरं तर नैसर्गिकरित्याच खूप हसतमुख. पण या प्रश्नावर थोडे गंभीर झाले, ‘‘संजयचा मृत्यू हा फार तर अपघात. कारण हे बोडो आक्रमक किंवा हिंसक नाहीत. बोडोच कशाला, सगळ्याच ट्रायबल्सचा हा गुण म्हणता येईल, पण आपल्या तथाकथित नागरी संस्कृतीसारखा, भावना दडपून खोटी सभ्यता दाखवण्याचा त्यांचा स्वभाव नाही. म्हणजे आपल्याला आनंद झाला तर उगीच आपण ओठ दडपून स्मित करू. राग आला चेहऱ्यावर नाराजी दाखवू. पण ही मंडळी बघा, आनंद झाला तर आनंदाने नाचतील, दुःख झालं तर छाती पिटतील आणि राग आला तर थेट लढाईला उतरतील. मी मानसतज्ज्ञ आहे. माणसानं निरोगी तणावमुक्त रहायचं असेल तर आपल्या भावना अशा मुक्तपणे मोकळ्या केल्या पाहिजेत. आपण सभ्यतेच्या नावावर रोगट होत चाललोय. इथल्या पांढरपेशा लोकांनी (मग ते ब्रिटिश असोत, बंगाली असोत) म्हणजे आपल्या नागरी संस्कृतीतून आलेल्यांनी इथल्या गरीब लोकांचं शोषणच केलंय. त्यांच्या स्त्रिया, जमिनी, एवढंच काय त्यांची संस्कृतीदेखील लुटायचा प्रयत्न केलाय. इथल्या उल्फाच्या आंदोलनात नागरी संस्कृतीत तयार झालेल्या स्थानिक अहोमांनी परप्रांतीय आणि बांगलादेशासारख्या परदेशातून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी सशस्त्र आंदोलन सुरू केलं. पण त्यात बळी मात्र स्थानिक बोडो, चकमांसारख्या जमाती आणि काही प्रमाणात मुस्लिमदेखील ठरले. मग त्यांनी स्वतःच्या अस्तित्त्वासाठी शस्त्र हातात घेतलं. तर काय चुकलं?’’

डॉक्टर खूपच तटस्थ सहानुभूतीने बोडोंची कैफियत मांडतात, पण आता बोडोंसाठी स्वायत्तता देऊन बोडोलँड कौन्सिलची निर्मिती झालेली आहे. त्रिपुरातल्या एडीसी सारखी. त्यामुळे थोडसं स्थैर्य आणि सुरक्षितता त्यांना वाटू लागली आहे. परिणामतः बंदुकांचा जोरही कमी झालाय.’’ ‘‘डॉक्टरसाहेब, पूर्ण ईशान्य भारतात इथल्या राजकारणात विद्यार्थी संघटना फार प्रभावी दबावगट आहे असं मी अनुभवतोय.’’

‘‘तुम्ही नागरी समाजातल्या विद्यार्थी संघटनांसारखं या संघटनांचा विचार कराल तर चूक. या वन्य जमाती किंवा आदिवासी संस्कृती असलेल्या गोटुल किंवा मोरंग किंवा आपल्या नागरी भाषेत युवागृह व्यवस्थेबद्दल वाचलं असेल म्हणजे टोळीतील सगळी तरुण मुलं एकत्र रात्री निवास करतात, बुजुर्गांबरोबर चर्चाविनिमय करतात. नाचगाण्यातून सांस्कृतिक मूल्य, परंपरा समजावून घेतात. अगदी आपले जीवनसाथीदारसुद्धा निवडतात अशी व्यवस्था होती. पण त्याचा मुख्य हेतू हे या युवकांचं संरक्षक दल हाच असावा. टोळीच्या संरक्षणासाठी सारे तरुण एकत्र उपलब्ध असावेत हाच प्रधान हेतू. आता बदलत्या परिस्थितीत ही युवागृहाची व्यवस्था नष्ट झाली आणि तिनं विद्यार्थी संघटनेच्या नावानं नवं सामाजिक रूप घेतलं आहे. त्यामुळेच दहा वर्षांच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व तुम्हांला या संघटनेचे सदस्य दिसतील. त्यांचं मुख्य काम आपल्या जमातीचे किंवा टोळीचे हितसंबंध राखणे, सांभाळणं हेच आहे. आपल्या कार्यालयासमोरच अखिल बोडो विद्यार्थी संघटनेच्या इथल्या शाखेचं कार्यालय वजा-वसतिगृह आहे. हवं तर तुम्ही उद्या त्यांना भेटून चर्चा करा. पण मी पाहतोय, अतिशय सुजाणपणे ही विद्यार्थी संघटना स्थानिक बोडोंचे राजकीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यात रस घेते.’’

मला डॉक्टरांचं हे विश्लेषण पटलं आणि या सगळ्या जमातींमध्ये त्यांच्या स्वतंत्र विद्यार्थी संघटना का आहेत आणि त्यांचं नेमकं स्थान किती कळीचं आहे याचंही भान आलं. नागरी विद्यार्थी संघटना राजकारणात प्रभावहीन का होत गेल्या, याचं कारणही लक्षात आलं. ‘‘डॉक्टरसाहेब, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी इथे फुटीरतावाद वाढवला असं आमचे हिंदुत्ववादी मित्र आरोप करतात.’’ माझा खडा.

डॉक्टर आपल्या चेहऱ्यावर छान स्मित आणत उठले. आतून चहाचे कप घेऊन आले. मग माझ्या हातात कप ठेवत म्हणाले, ‘‘माझं मत विचाराल तर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे भारतावर उपकारच आहेत. त्यांनी त्यांना ख्रिस्ती धर्म देऊन मवाळ बनवलं. त्यांची पूर्वीची संस्कृती आणि धर्म- जो आपल्या नागर धर्मापेक्षा नक्कीच जास्त उंचीचा आहे- असता तर ते एवढे मवाळ, भारताशी जुळवून घेण्याइतपत झालेच नसते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मिझोरम. आज भारतातलं एक नंबरचं सभ्य, शांत आणि सुसंस्कृत राज्य म्हणता येईल ते. हे सारं श्रेय मी तरी मिशनऱ्यांनाच देतो. मला एकदम अरुणाचलच्या रिक्खमने सांगितलेला विनोद आठवला, ‘न्यिशींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर ख्रिश्चन धर्मगुरू त्यांच्यासमोर ख्रिस्ताच्या चरित्राचं प्रवचन देत होते. रोमचा सम्राट हेरोदने ख्रिस्ताला कसं छळलं हे सांगत असताना सगळे न्यिशी एकदम भावांकित होत भाले उंचावत म्हणतात, ‘आताच्या आत्ता आपण जेरुसलेमला जाऊन त्या हेरोदचा बंदोबस्त करू या.’

 मी डॉक्टरांकडे पाहत विचार करत राहिलो, ‘या काश्मिरी ब्राह्मणाला आपले हिंदुत्ववादी मित्र हिंदू मानायला तयार होतील का?’

डॉक्टरांनी सकाळी आपल्या एका कार्यकर्त्याबरोबर जवळच असलेल्या भूतानच्या सीमेपर्यंत फिरवून बोडो खेडी दाखवण्याची व्यवस्था केली. सकाळी उठल्याउठल्याच गोजेन ब्रह्मो मला उठवायला आला. मला घेऊन तोच बोडो खेड्यामध्ये जाणार होता. नाष्टा करून त्याच्या मोटारसायकलवर बसलो. काल जिथून गाडी आत वळली होती त्या मुख्य रस्त्यावर आलो. समोर एक मंदिरासारखी इमारत.

गोजेनला विचारलं, ‘‘कसलं मंदिर आहे हे?’’ गोजेननं आपण स्वतः हिंदू बोडो असल्याची ओळख करून देत, हिंदू बोडोंना ब्रह्मो म्हणून ओळखलं जातं अशी माहिती दिली.

‘ब्रह्मो’ म्हणजे ‘अग्निपूजक’. बोडोंमध्ये आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेलेही बोडो आहेत. समोरचं मंदिर हे ब्रह्मो मंदिर. ब्रह्मो मंदिरात मूर्ती नसते. कारण आम्ही मूर्तिपूजक नाही. उत्सवाच्या वेळी इथे फक्त अग्नी पेटवला जातो. गोजेननं नवेबोंगाईगावच्या हमरस्त्यावरून गाडी पुन्हा उत्तरेकडे आत  वळवली. एका मातीच्या रस्त्याला लागलो. सुपारीच्या झाडांनी झावळे टाकून बंदिस्त केलेल्या कुंपणांमध्ये सुपारीच्या, नारळीच्या आणि भाताच्या खाचरांची शेती. मधोमध एकेका कुटुंबाच्या स्वतंत्र खोल्या दाखवणाऱ्या झोपड्यांचं घरकुल.

असं पाहत बरंच आत खूप घनदाट जंगलात नेलं. मला वाटलं होतं आता फक्त जंगलच असेल. गोजेननं स्पष्टीकरण दिलं, बोडो जंगलातच राहतात. त्यामुळे छोट्या छोट्या बोडो कुटुंबांच्या झोपड्या तुम्हांला अधूनमधून दिसतच राहतील. गोजेन संस्थेच्या आरोग्य विभागात काम करतो. या सगळ्या परिसरात त्याचं सातत्यानं येणं आहे. त्यामुळे त्याला ओळखणारेही खूप. शिवाय आरोग्यसाथी म्हणून काम करणाऱ्या वस्तीवस्तीतल्या बोडो आरोग्यसेविकाही भेटत होत्या.

प्रत्येक ठिकाणी ओली सुपारी आणि पान देऊन माझं पारंपरिक स्वागत केलं जात होतं. मधूनमधून बोडो लँडबद्दल आणि इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल त्यांना टोकत जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. पण ‘आता चांगलं आहे, ठीक आहे, पूर्वीसारखा त्रास नाही’ वगैरे वगैरे. उत्तरावर माझी बोळवण होत होती. जागोजागी मात्र ‘अखिल बोडो विद्यार्थी संघटना आमचा देव आहे’ अशा घोषणा मात्र रंगवलेल्या पाहत होतो.

एका आठवडी बाजारच्या गावात पोहोचलो. नेमका बाजारचा दिवस. एका झाडाखाली ग्रामपंचायतीचा एक मनुष्य बाजारकर जमा करत बसलेला. नोटांचा ढीग समोर. त्यात काही नोटा भूतानी चलनातल्याही. गोजेननं खुलासा केला. इथं पलीकडं भूतान देशाची हद्द सुरू होते. आणि तिथले बरेच खेडूत बाजारासाठी इथं येतात.

बिनेन नाझारेन नावाचा बारावीपर्यंत शिकलेला, ‘अँट’मुळे पुढारी कार्यकर्ता झालेला ख्रिश्चन बोडो भेटला. गप्पा मारताना सहज म्हणून गेला, ‘‘माणसांना बंदूक उचलायची इच्छा नसते, त्यांना भाग पाडलं जातं.’’ बिनेनचं हे वाक्य सगळ्याच राज्यकर्त्यांनी गंभीरपणे घेतलं तर...!

परतताना एका नदीजवळ आलो. नदीचं नाव ‘आई’. आसाममधल्या सगळ्याच नद्या भव्य. तशीच ही पण. नदीवर लांबलचक बांबूचा पूल. गोजेन सराईतपणे त्यावरून गाडी चालवत होता. मी मात्र मागे जीव मुठीत धरून. कारण आसामच्या नद्या आसामचे अश्रू म्हणून ओळखल्या जातात आणि मला पोहायला येत नाही.

रात्री डॉक्टरसाहेब बोडोंच्या अंधश्रद्धांबद्दल सांगत होते. खूप अंधश्रद्धाळू आहेत हे लोक, पण सगळ्यात वाईट म्हणजे ‘डायन’ किंवा ‘डायना हत्या’. चेटूक करताहेत या अंधश्रद्धेतून गावातल्या एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला संशयाने निष्ठुरपणे ठार मारलं जातं. यात बहुतेकवेळा स्त्रियांचंच प्रमाण जास्त असतं. या वर्षात पंधरासोळा घटना या प्रकारच्या घडल्या आहेत, पण या हत्या किंवा संपत्तीच्या लोभातून नाही होत. आरोग्याबद्दलच्या अंधश्रद्धाच मुख्यत: कारणीभूत. पण आता बोडो विद्यार्थी संघटनेनं यात गंभीर लक्ष घातलं आहे.

डॉक्टरांना विचारलं, ‘‘आर्मी का सोडली तुम्ही?’’ बराच वेळ डॉक्टर माझ्यावर डोळे खिळवून. मी अस्वस्थ. मग डॉक्टर आत्मचिंतन केल्यासारखे बोलत राहिले. बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले. ‘सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत हत्यारांची गरज नसते, याचा साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष लढाई लढताना. ती बंदुकीची लढाई फक्त दोन सत्तांत चालते. कल्याणकारी राज्यासाठी नाही.’

‘‘एकदा तर मी देशद्रोही होताहोता वाचलो.’’ अचानक डॉक्टर हसत सांगतात.

‘‘मी नाही समजलो.’’ माझी अचंबित प्रतिक्रिया. ‘‘काय झालं, माझ्या हातखालच्या जवानांचं नोकरीत राहण्यासाठी मनोधैर्य, नीतिधैर्य वगैरे टिकवण्यासाठी मी वेगवेगळे उपाय शोधायचो. कारण मध्येच सैन्यातून पळून जायचं प्रमाण फार आहे ना. पण माझे उपाय बहुधा वरिष्ठांना अडचणीत आणणारेच असावेत. मी एकदा जवानांना त्यांच्या रायफलीवर त्यांची नावं कोरून घ्यायला सांगितली. म्हणजे युद्धात शहीद झाले तरी त्यांच्या रायफली म्युझियममध्ये स्मारक म्हणून ठेवल्या जातील अशी समजूत घातली. काही दिवसांनी वरिष्ठांचं बोलावणं आलं. तुला काय देशद्रोही म्हणून अमर व्हायचंय? अशी विचारणा करीत. मग त्यांनी खुलासा केला, उद्या बलुचिस्तानच्या अतिरेक्यांकडे या बंदुका सापडल्या तर बदनामी कुणाची होणार ते समजून घे.’’ डॉक्टर दिलखुलास हसले. पण मला नाही हसायला जमलं.

24 जून 2011, बोकाघाट (आसाम)

डॉक्टर सुनील कौलांचा निरोप घेताना ते ‘मनोरुग्णां’च्या आरोग्य शिबिरात मग्न होते. हसत म्हणाले, ‘‘मला वाटतं, मीच वेडा आहे.’’ भौतिक जगाच्या व्यथापासून दूर गेलेल्यांना मी पुन्हा तिथं आणू पाहतो, हे किती विचित्र आहे ना? मग एकदम गंभीर होत म्हणाले, ‘‘इथली मनोरुग्णता ही आर्थिक समस्यांतून आलेली नाही. सांस्कृतिक विघटनातून आलेली आहे. आपल्या नागरी संस्कृतीनं यांची मूळची. निरोगी संस्कृती बाधित झाली आहे. त्याचा ताण आहे हा सारा.’’

अँटचा कार्यकर्ता देबूबरोबर गुवाहाटीत पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. देबूनं एका साध्याच पण त्याच्या लाडक्या हॉटेलात जेवायला नेलं. मस्त ब्रह्मपुत्री मासा आणि भातावर ताव मारून गुवाहाटीच्या जयपूर भागातील खादी ग्रामोद्योग भांडाराच्या ‘गांधी’ विश्रामधामात विश्रांतीला गेलो. सकाळी नेपाळी बहाद्दूरचा गांधीवादी स्वयंपाक रिचवून बोकाघाटला पूर्व आसामकडे निघालो.

डॉक्टरांनी सांगितलं होतं की वाटेत काझीरंगा हे खास आसामी एकशिंगी गेंड्यांसाठीचं राष्ट्रीय उद्यान लागेल. तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला नजर ठेवून रहा. एखादा ‘एकशिंगी’ दिसेलच तुम्हांला.

आता 15 जून नंतर पावसाळा संपेपर्यंत उद्यान बंद. त्यामुळे तिथं उतरून काही फायदा होणार नाही. अख्ख्या पाच तासांच्या प्रवासात, गुवाहाटी सोडताना तिथल्या स्टेडियमच्या बाहेर उभ्या केलेल्या मशालधारी खेळाडू गेंड्याच्या सिमेंटच्या पुतळ्याचं दर्शन सोडलं तर जिवंत गेंडा काही दिसला नाही. राजकीय पुढाऱ्यांचे भले मोठे कटआऊटस्‌ मात्र जागोजाग.

बोकाघाटच्या एस.टी स्टँडवर पोहोचलो तेव्हा झुंजूमुंजू सांज झालेली. स्टँडशेजारीच अरीफ हुसेनचा मोहल्ला ‘फातिमा मंझिल.’ आणि तिथंच त्याचं घर. म्हणजे नेस्ट या स्वयंसेवी संस्थेचं कार्यालय कम्‌ निवास.

अंगणातच पंख्यानं वारा घेत अरीफ आपल्या दोन कार्यकर्त्यांसह बसलेले. आसामी प्रथेप्रमाणे लाईट नव्हतीच. उकाडा आणि डास. गेल्यागेल्या सर्वांनीच अगदी गेंडा स्वागत करत भरपेट वारा आणि मिठाई खायला घातली.

अरीफबरोबरच्या चर्चेत कळलं, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी खेड्यांचं पुनर्वसन त्याची संस्था पर्यावरणकेंद्री पर्यटन समोर ठेवून करते. म्हणजे या खेड्यात नागर लोक पर्यटनासाठी येतील. इथे त्यांना आदिवासी संस्कृती आणि खाणंपिणं यांचं दर्शन होईल वगैरे. दुसऱ्या दिवशी असं एक खेडं पाहायचं ठरलं.

मग त्यानंतरच्या दिेवशी आणखी एका नागरी खेड्याकडं. दुसऱ्या दिवशी सकाळीच हेमांजली- ही सुतीया जमातीची. नेस्टची कार्यकर्ती आणि पर्यटनाची पदवी घेतलेली- ‘सर’ अशी लाडिक हाक मारत चहा घेऊन आली. सोबत ‘अर्ध्या तासात तयार व्हा.’ अशी प्रेमळ आज्ञा करीत.

सायकल रिक्षातून 7 कि.मी. गावाबाहेर आल्यावर एका वळणानं शेतातील बांध रस्त्यांवरून हेमांजलीच्या नेतृत्वाखाली चालत निघालो. आजूबाजूला म्हैशी बघितल्यावर थोडं गावाकडं आल्यासारखं वाटलं. पूर्वमशागतीची कामं चालू होती. कामं करणारी शेतातल्या बायाबापड्या हेमांजलीशी चांगलेच परिचित असाव्यात. आसामी भाषेत विचारपूस चालू होती. एके ठिकाणी हेमांजली खुद्‌कन्‌ हसली.

मी विचारलं, ‘का गं बाई?’

 ‘नाही, ती माणसं म्हणत होती, म्हातारबाबाला चालवत का नेतेयस? गाडी आणली नाही?’ ती लाजत उत्तरली. मी दचकलोच.

‘या रस्त्यानं गाडी जाते?’ ती हसली, ‘आता नाही पण उन्हाळ्यात आम्ही पर्यटकांसाठी जीप जाईल असा रस्ता तयार करतो. आता पावसाळ्यात नद्यांना पूर आला की आपण आता चालतोय ती ही सारी जमीन तीन-चार फूट पाण्याखाली असते. चार महिने.’

मी आजूबाजूची घरे बांबूच्या कुबड्या घेऊन का उभी आहेत. हे ध्यानात घेतो. गर्द झाडीत ‘धुबाअली बेलगुरी’ या मिसिंग जमातीच्या पुनर्वसित गावात पोहोचलो.

हेमांजलीने धर्मेन्द्र डोलेला आधीच निरोप दिलेला. तो या जमातीतलाच, पण पेशानं शिक्षक. ज्ञानाच्या स्पर्शाने जमातीच्या विकासासाठी धडपडणारा.

गावात शिरतानाच होलीराम पटगिरी भेटला. सत्तरीचा म्हातारा. भेटल्याभेटल्या म्हणाला, ‘मी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता. गावातून परवा पैसे जमवून गुवाहाटीला अण्णा हजारेंच्या सभेला जाऊन आलो. इथं कृषक समाज समितीचा अखिल गोगोई अण्णाचं काम करतोय. आसाम भ्रष्टाचारात एक नंबरला आहे बघा.’

म्हातारा उत्साहाने मग समाजात अनीती किती बोकाळलेय हे आपुंगच्या नशेत सांगतोय हे माझ्या लक्षात आलं.

‘मोरंगधर’ म्हणजे ‘युवागृह’ किंवा समाजबैठकीचं स्थान. तिथं गेलो. बांबूवरच उभारलेलं सभागृह. तोल सावरत सभागृहात गेलो. मधल्या खांबाला, जिथं सभाप्रमुखानं बसायचं असतं, मला बसवलं गेलं. मला जणू ज्ञानोबा माऊलींच्या खांबाला टेकल्यासारखं वाटलं. समोर भली लांबलचक फळी. त्यावर पानसुपारी, चहा आणि ‘आपुंग’सुद्धा. इथं मात्र जरा ज्ञानेश्वरीची आठवण होऊन विरोधाभास वाटला. माझ्या खांद्यावर पांढऱ्या रंगाचं गावच्या महिलांनीच विणलेलं शालीसारखं वस्त्र धर्मेन्द्रनं सन्मानार्थ घातलं. मग बातचीत सुरू झाली.

या परिसरातल्या सगळ्या गावांचं एका ठायीचं आयुष्य तीस-पस्तीस वर्षं. कारण नद्या सारखं पात्र बदलतात त्यामुळे कायम स्वरूपाचं ठाणं नाही. आता मुलं शिकायला लागली. शहरातल्या गोष्टी गावात यायला लागल्यात. आमच्या परंपरा दाखवायला आणि विकायला उरल्यात वगैरे चर्चा.

मंजिल पेतो हा बारावी झालेला मुलगा आपल्या सुंदर हस्ताक्षरात आणि इंग्रजीत मला जमातीच्या सणांची माहिती लिहून देतो. माझ्या राज्यातले पर्यटक घेऊन येण्याचं आश्वासन देत आंबट-तुरट चवीच्या आपुंगचा घोट घेत मी मग गावाचा निरोप घेतला. उरलेली सारी आपुंग हेमांजलीने रितूला आवडते म्हणून भरून घेतली. आपली नृत्यं वगैरे दाखवायची गावकऱ्यांना इच्छा होती, पण सारे शेतावर आणि मुलं शाळेत परीक्षेला.

येताना कुठेच वाहन मिळालं नाही. चालतच दहा कि.मी. अंतर  कापून बोकाहटमध्ये आलो. वाटेत एका मिसिंग गृहिणीनं आपुंग कशी बनवतात हे बघायला बोलवलं. निरोप देताना आपुंगचे दोन लाडूही हातात ठेवले. आपुंग बनवण्याची रीत पुन्हा एकदा नीट समजावून सांगितली. मनातल्या मनात म्हटलं, ‘बाई, माझ्या बायकोला जर मी हे सांगितलं तर मला कायमचं काझिरंगा गेंड्यांबरोबर राहायला लागेल.’

संध्याकाळी गप्पा मारताना अरीफ सांगत होता आवर्जून. जर 73 व्या घटना दुरुस्तीत पंचायत राज बिल आलं असतं तर एवढी सात राज्यं अस्तित्वात यायची काही गरजच उरली नसती. कारण इथल्या जमातीतील जी लोकशाही व्यवस्था आहे त्याचं पंचायत राज हे व्यापक रूप आहे. हा सगळ्या सहाव्या परिशिष्टानं केलेला घोटाळा आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्नाला वगळून सांस्कृतिक कारणांनी फूट पडली. स्वातंत्र्याआधी या परिसराचा लाओस, बीजिंग, म्यॅानमार, थायलंड, सिंगापूर यांच्याशी मुक्त संचार होता. पण स्वातंत्र्यानंतर सारंच आक्रसलं. उल्फा ज्या अखंड आसामचं स्वप्न पाहतंय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसा अखंड भारताचं स्वप्न पाहतो तितकंच दिवास्वप्न आहे.

पण आता नवी पिढी वास्तवाच्या भूमीवर यायला लागली आहे. आसाम खरं तर स्वयंपूर्ण होण्याइतका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. भात हे आसामचं मुख्य अन्न आहे. एके काळी 36 लाख मेट्रिक टन भात आसाममध्ये उत्पादित होत होता, जो आसामच्या सगळ्या जनतेची भूक भागवत होता.

पण आज आसामला पंजाबहून तांदूळ आयात केला जातो. इथलं स्थानिक भाताचं पीक या पंजाब लॉबीनं मारून टाकलंय आणि इथल्या नैसर्गिक भाताला अनारोग्यकारक ठरवत आसामला अपंग करून टाकलंय. हीच स्थिती सर्व बाबतींत आहे.

चार दिवस मुंबईला पावसाचा दणका बसला- पूरमय स्थिती निर्माण झाली- तर सगळ्या जगभर डांगोरा. पाचव्या दिवशी मुंबई पहिल्यासारखी सरळ. इथं आम्ही सात सात महिने पाण्याखाली असतो फिरभी चर्चा नही होती. अरीफ कळवळून आणि तळतळून आसाम आणि आसामचे प्रश्न याबद्दल बोलत होता.

मुख्य प्रवाहात असण्यासाठी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरही असावं लागतं का, असाच त्याचा सवाल होता. अरीफचा हा सवाल ईशान्य भारत आपल्यापासून अलग आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी गंभीरपणे विचारात घ्यायला हवा.

25 जून 2011 , गुवाहाटी विमानतळ

गेले पंचावन्न दिवस ईशान्य भारत फिरतोय. निसर्गाची वेगवेगळी रूपं, वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या संस्कृती. पावलागणिक वेगवेगळेपण. तरीही या सगळ्याला एकत्र बांधणारं पण न उमजणारं काही समान अनुभवतोय.

काल, आज आसाम बंद आहे हे समजल्याबरोबर हेमांजली आणि रितुपर्णानं ज्या आस्थेनं मला बोकाघाटहून बस मिळवून देण्यासाठी धावपळ केली, त्याबद्दल आभार मानायलासुद्धा मला सुचलं नाही.

अरीफ हुसेनच्या ‘नेस्ट’ संस्थेला भेट देताना काझिरंगा परिसरातील मिसिंग जमातीच्या निमित्तानं एक वेगळी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी इतके सुविहित आणि नियोजनपूर्ण प्रयत्न चालेले असतील असं वाटलं नव्हतं.

सरपथारच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या मेळाव्यात भेटलेली रीतादेवी, मूळची झारखंडची पण आता लग्न होऊन आसामी झालेली आणि एका आसामी खेड्याची सरपंचही- माझं हिंदी भाषण ऐकून अगदी गदगदून मला सांगत होती, ‘‘भैयाजी, हिंदी सुनने के लिए कान तरस रहे थे। अपनी भाषा सुनतेही मेरा बचपन लौट आया। बहुत बहुत शुक्रिया।’’

किती हिंडलो, किती लोकांशी बोललो, किती विविध प्रकारचा पाहुणचार अनुभवला, प्रेम मिळालं. येताना या प्रदेशाला अपरिचित होतो. आता निघताना ईशान्य भारतीय म्हणून परततोय.

सकाळी ब्रह्मपुत्रेच्या काठावर उगवता सूर्य पाहत उभा होतो. तिबेटमधून ‘झांगपो’, अरुणाचलमध्ये प्रवेश करताना ‘सियांग’ आणि आता आसाममध्ये ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणून वाहणारी ही विक्राळ नदी, नव्हे ‘नद’- प्रत्यक्ष विश्वनिर्मात्या ब्रह्माचा पुत्रच. अशी भारतीय मानसिकता. अचानक गावाकडली हिरण्यकेशी नदीच डोळ्यांसमोरून वाहू लागली. केशवसुतांची ‘जेथे जातो तेथे माझीच भावंडे मला दिसताहेत.’ अशी घोषणा मेंदूत गुंजू लागली.

अख्खं आसाम आज बंद असताना गांधी आश्रमाचा व्यवस्थापक बहाद्दूरनं खूप प्रयत्न करून रिक्शा ठरवून विमानतळापर्यंत आणून सोडलं. उतरताना, ‘आते रहना भाईसाब.’ म्हणून कवळा घातला.

आता मी इथल्या माणसांना इतका परिचित झालोय की, न्यिशी कोण? अपांग कोण? कोण्याक कोण? अंगामी कोण? मैतेयी कोण? कारबारोक कोण? बोडो कोण? हे सहज ओळखू शकतो आणि त्यांच्याच बिरादरीतला होऊ शकतो याची मला खात्री पटली आहे.

मी स्वप्नाळू, राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी नाही पण या संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणारं समान काहीतरी आहे याची मला या इतक्या भटकंतीनंतर खात्री पटली आहे.

थोड्याच वेळात उडेल हा यंत्रपक्षी

उंच आकाशात, मला पोटात घेऊन

मी खोल ब्रह्मपुत्रेच्या तळाशी त्या वेळी

मुक्तीची जागा शोधत असेन

... आभार : डॉ.नरेंद्र दाभोलकर, विनोद शिरसाठ, पुष्पलता घोळसे, सुभाष विभूते, सिद्धार्थ कांबळे, चंद्रकांत कोंडुसकर, रमेश चव्हाण (महाराष्ट्र), तार रिख्खम (अरुणाचल प्रदेश), किवी (नागालँड), इगोसाना खुर्र्‌, दोनिश्वर सिंग, सलाम तोंबा, डॉ.गोजेंद्र (मणिपूर), कांतासिंग, डॉ.लालतोंगलियाना खिंगटे (मिझोरम), बीरमंगल सिंग, बिडू डे, प्रभिंगतसू दास, राधाचरण देबबर्मा (त्रिपुरा), गुलापीसिंग, राजमणी, डॉ.रेगे (मेघालय), डॉ.सुनील कौल, अरीफ हुसेन (आसाम). या प्रवासासाठी आर्थिक मदत देणारे सर्व माझे सहृदय वाचक.

Tags: राष्ट्रीय उद्यान आसामी एकशिंगी गेंडा काझीरंगा मणिपुरी साहित्य परिषद मेघालय मि.ओबी गुलापीसिंग National Park Assamese Ekanishi Unicorn Kaziranga Manipuri Sahitya Parishad Meghalaya Mi. Obi GulapiSingh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके