डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

राजा शिरगुप्पे यांनी 1 मे ते 20 जून 2011 हे 50 दिवस ईशान्य भारतातील सात राज्यांची प्रत्यक्ष भ्रंमती करून, त्यावर आधारित लिहिलेला लेख 70 पानांचा आहे. त्यापैकी पहिली 44 पाने, साधना वर्धापनदिन विशेषांकात व सहा पाने त्यानंतरच्या अंकात प्रसिद्ध झाली आहेत. उरलेली पाने या व पुढील दोन अंकांतून क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक  

28 मे 2011

आज मणिपूर बंद आहे. सेतापती जिल्ह्यात नागा संघटनांनी ‘माओ’ इथं एक मेळावा बोलावला आहे. स्वतंत्र नागालिमच्या मागणीसाठी.

या मेळाव्याला मणिपूर नागालँडचे मुख्यमंत्री नेईफिऊ रिबो हजर राहणार आहेत. त्यांनी हजर राहू नये म्हणून इथल्या सरकारने त्यांना विनंतीवजा आदेश दिला आहे. पण त्यांनी तो मानला नाही.

संयुक्त मणिपूर समितीने म्हणजे मणिपूरच्या सर्व राजकीय पक्षांनी आणि उग्रवादी संघटनांनीही या मेळाव्याचा निषेध करून संपूर्ण मणिपूर बंदचा आदेश दिला आहे.

इबोसानाचा फोन आला की तो आज या बंदमुळे शहरात येऊ शकत नाही. मग मी फोन करून धनजीतला गप्पा मारायला बोलावलं. धनजीत आला. मग त्याला घेऊन खाली बाजारातून फेरी टाकायला बाहेर पडलो. सगळं शहर पोलीस आणि लष्करी सैनिकांच्या ताब्यात गेल्यासारखं दिसत होतं. माझ्यासारखी हौशी आणि बरीचशी वेळ कसा घालवायचा आणि मणिपूरच्या सातत्याच्या बंदमुळे सरावलेली- मंडळीही टिवल्याबावल्या करत नाक्यानाक्यावर बसलेली किंवा उभी होती. पण दुकानं, हॉटेलं मात्र कडेकोट बंद.

धनजीतला विचारलं, ‘‘इथं विद्यार्थी संघटनांचा राजकारणावर मोठा प्रभाव आहे. तसा तो ईशान्य भारतातल्या बहुतेक राज्यांतही आहे. काय कारण आहे?’’

‘‘इथं मणिपुरी विद्यार्थ्यांच्या जमातनिहाय अनेक संघटना आहेत. आणि मैतेयी विद्यार्थ्यांच्याही आहेत. शिवाय प्रत्येक राजकीय पक्षाची विद्यार्थी संघटना आहेच आणि त्या सगळ्या इथल्या प्रादेशिक आणि जमातीच्या अस्मितांनी भारलेल्या आणि कट्टर आहेत.’’

‘‘तू ज्या ‘ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन’ या संघटनेचं काम करतोस तिचा प्रभाव कितीसा आहे?’’

‘‘यातला अखिल भारतीय हाच शब्द आडवा येतो. इथला विद्यार्थी आधी मणिपुरी आहे आणि तो आपल्या पूर्वीच्या सार्वभौन मणिपुरी राज्याचा अहंकार बाळगून असतो. आम्ही स्वतंत्र आणि राज्यकर्ते राज्य आहोत, ही भावना इतकी कट्टर आहे आणि ती परंपरेतून आली आहे. इथल्या पहाडातल्या ज्या जमाती आहेत ते आपल्या सार्वभौम राज्याचे दुय्यम नागरिक आहेत, असाही इथला मैतेयी अहंकार आहे. त्यामुळे आमच्या संघटनेत फारशी मणिपुरी मुलं येत नाहीत. आता विद्यार्थी संघटनेतून थेट राजकारणात करियर होतं ही भावना इतकी बळकट झाली आहे, त्यातनूही या विद्यार्थी संटघनांत इथल्या राजकीय पक्षांसारखेच गट पडले आहेत. मणिपूरच्या राजाला फसवून भारत सरकारनं आपल्यात विलीन करून घेतलं असा मणिपूरवासीयांचा पक्का समज आहे.’’

‘‘पूर्वी स्वतःच्या स्वातंत्र्याची मागणी होती पण आता नागा बंडखोरांच्यामुळे ती अस्तित्वाची लढाई झाली आहे. कारण मणिपूरच्या एकूण नऊ जिल्ह्यांपेकी पाच जिल्हे पहाडी आहेत आणि सत्तर टक्के भूभाग जो आहे, नागा ही भूमी आपली म्हणून घोषित करताहेत. यामुळे आता यांची बंडखोरी भारतविरोधी न राहता नागाविरोधी झालेली आहे. खरं तर हे नागा नाहीत आणि कुकी इथे बहुसंख्येने आहेत. नागांनी कुकींना आपल्या गटात घालून ते नागाच आहेत असं भासवण्याचा प्रयत्न चालवला आहे.’’

मला आठवलं, नागा स्टुडंट फेडरेशनचा माजी अध्यक्ष किकोन माझ्याशी तावातावाने बोलताना म्हणाला होता, नागांचा प्रश्न सुटला तर या ईशान्य भारतातले उल्फा, बोडो, मणिपूर हे सगळेच प्रश्न निकालात निघतील. त्याच्या या विधानाचा अर्थ आता थोडा मला स्पष्ट होऊ लागला.

‘‘मणिपूरमधल्या महिला संघटना खूप आक्रमक आणि लढाऊ आहेत असं ऐकून आहे.’’

‘‘मणिपुरी महिला याच मुळात खूप लढाऊ आहेत. तुम्ही पाहिला असेल इंफाळमधला ‘इमा’बजार. इमा म्हणजे ‘आई’- हवं. तर मातांचा बाजार म्हणा. इथल्या खेडोपाडी तुम्हांला फक्त माता बाजारच दिसतील. बाजारात सर्व व्यवहार फक्त स्त्रियांच्याच हाती. कारण परंपरेनं इथले पुरुष एक तर शेतात नाही तर रणांगणात असायचे. त्यामुळे घरातला आणि गावातला कारभार हा स्त्रियांच्याच हाती. दुसरी गोष्ट अशी की मणिपुरी स्त्री आपल्या भावांवर किंवा मुलांवर इतकं आंधळे प्रेम करते की त्यांच्याबद्दल वाईट केललंच काय बोललेलंसुद्धा तिला खपत नाही. तो एखादी चूक करेल किंवा दुर्गुणी असेल हे त्यांना मान्यच नसतं मुळी. त्यामुळे त्याला जर काही धोका निर्माण झाला तर त्या रणचंडिकाच होतात.’’

लष्कराच्या गाड्यांना वेढा घालून सैनिकांच्या बंदुकांना न जुमानणाऱ्या या मणिपुरी महामातेची मानसिकता आता माझ्या ध्यानात यायला लागली. प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात इथल्या स्त्रिया कमी पण संघर्षाला मात्र कुणालाच घाबरत नाहीत.

धनजीत एखाद्या विचारवंतांसारखा पण मनातून थोडासा अभिमान बाळगतच सांगतो. ‘‘मणिपूरला सगळ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी, भाजीपाला सोडला तर, आसामवरच अवलंबून रहावं लागतं आणि येणारा सगळा माल हा नागालँडच्या रस्त्यावरूनच आणावा लागतो. त्यामुळे जेव्हाजेव्हा मणिपुरी आणि नागांमधला संघर्ष तीव्र होतो तेव्हा ते हा रस्ता बंद करतात आणि आमची गळचेपी करायचा प्रयत्न करतात. त्यातून वैर आणखीच वाढतं. 2006 साली त्यांनी दोन महिने असा रस्ता बंद केला होता आणि आता तीन महिन्यांपूर्वी काही दिवस. खरं तर जिरीबगमार्गे एक रस्ता थेट आसाममध्ये जातो, त्याची दुरुस्ती झाली तर नागा लोकांची दांडगाई कमी होईल.’’

‘‘पण पूर्वीपेक्षा आता मणिपूरमधला हिंसाचारही कमी झालाय!’’

‘‘होय आणि हळूहळू तो संपतही जाणार हे नक्की, कारण आता भारतीय संसदीय राजकारणाला आमची सगळी मंडळी चांगलीच सरावू लागली आहेत आणि त्यांना त्यातले फायदे चांगले आणि वाईट दोन्ही अर्थांनी कळू लागले आहेत. उदा. भ्रष्टाचाराला इतकं पोषक राजकारण दुसऱ्या व्यवस्थेत असूच शकत नाही, याचीही जाणीव त्यांना होत असावी.’’

‘‘भारतीय लोकशाहीची चेष्टा करतोयस?’’

‘‘नाही सर, अगदी गंभीरपणे सांगतोय. लोकशाही ही व्यवस्था ग्रेट आहेच पण भांडवली लोकशाहीत ती सर्व लोकांना सत्तेच्या प्रक्रियेत सहभागी करून घेते. सत्तेत असल्याचा आनंदही देते. पण त्याच वेळी भ्रष्टाचार नावाच्या भस्मासुरालाही जन्म देते.’’

मी धनजीतच्या एवढ्या लहान वयातल्या एवढ्या मोठ्या आकलनाकडे कौतुकानं पाहिलं.

 ‘‘सर आमच्या विधानसभेत साठ आमदार आहेत. एका आमदाराला निवडणुकीसाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च येतो. दोन खासदार आहेत, प्रत्येकी सत्तर कोटी खर्च येतो. काल इथल्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या. आमच्या पक्षाच्या उमेदवाराला पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले. असा खर्च करावा लागतो आणि असा खर्च करू शकणारा उमेदवारच आम्हांला शोधावा लागला.’’

अरुणाचलमध्ये रिख्खमनं तर नागालँडमध्ये तिथल्या एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं मला हेच दर सांगितले होते. धनजीत मध्येच मला चहा घेणार का? असं विचारतो. रस्त्यावरच चहाचा गाडा लावलेला. त्या बंदच्या दिवशीही गाडावाल्याकडं घेऊन गेला. चहा पिता पिता मी त्या गाडावाल्याला विचारलं, ‘‘अशा दहशतीच्या वातावरणात गाडा लावायला तुला भीती नाही वाटत?’’

गाडावाला चहाचा कप विसळत बेफिकिरीनं पाणी बाजूला फेकत म्हणाला, ‘‘साब, कसली दहशत? ये तो पॉलिटिक्सवालोंका चलता ही रहता है. चाहे सैनिक हो, चाहे पुलीस हो या पॉलिटिशियन, सब एक जैसे है।’’

धनजीतनं आणि मी एकदमच एकमेकांकडे पाहत स्मित केलं. आमच्यापेक्षा खरं राजकारण त्या गाडावाल्यालाच कळलं होतं. धनजीत निघून गेल्यावर जवाहरलाल नेहरू मणिपुरी नृत्य अकादमीकडे गेलो. कालपासून तेथे वर्तमानकालीन मणिपुरी नाटकांचा महोत्सव सुरू झाला होता. अकादमीच्या बाहेर फलक लावला होता की आजचा प्रयोग बंदमुळे उद्या ठेवण्यात आला आहे. रूमकडे परतताना एक मणिपुरी सायकलस्वार भेटला. त्याच्याकडे रस्त्याची चौकशी करीत होतो. तर तो त्याच मार्गाने पुढे जाणार होता. माझ्याबरोबर चालतच निघाला.

चालता चालता त्याने मैतेयी आणि मितेयी यांतला फरक मला सांगितला. तो एका म्युझियमचा डायरेक्टर होता. कंगला पॅलेसच्या शेजारी असलेल्या सनामाही मंदिराचा व्यवस्थापकही. परमेश्वराने जी माणसाची प्रतिमा तयार केली आणि त्याच्यात प्राण फुंकला ते मितेयी तर सूर्यापासून निर्माण होत गेलेल्या जीवसृष्टीतून मैतेयी जन्माला आली. मितेयी भाषेत सतरा मूळाक्षरे आहेत तर मैतेयी भाषेत अडतीस मूळाक्षरे आहेत आणि सध्या या दोन्ही मूळाक्षरांची सरासरी म्हणून सत्तावीस मूळाक्षरे वापरात आहेत. माहिती सूक्ष्म होती पण तेवढीच महत्त्वाची आणि गमतीदार. त्यानं आवर्जून सनामाही मंदिराला आणि म्युझियमला भेटीचं निमंत्रण दिलं.

 31 मे 2011, (इंफाळ)

आताच मोरेवरून -ब्रह्मदेशाच्या सीमेवरून- परतलो. काल सकाळी पुन्हा एकदा रबोसाना आणि आणखी एक शिक्षक मित्र रणीधर सोबत सकाळीच सुमो पकडून मोरेला आलो. भारत आणि म्यानमार यांच्या अगदी सीमेवरच आणि सतत वर्तमानपत्रांध्ये या गावाचं नाव गाजत असलेलं. पर्यटकांसाठी या सीमेवर भारताच्या हद्दीतला मोरे बाजार तर सीमेचं फाटक ओलांडलं की लगेच म्यानमारचा नुफलांग बाजार-तिथल्या अविश्वसनीय स्वस्ताईसाठी प्रिय. म्हणजे चिनी आणि कोरियन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि हस्तकलांसाठी प्रसिद्ध. त्याच वेळी तिथून चालणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीसाठीही प्रसिद्ध. मला त्या स्वस्त वस्तूंपेक्षा या तस्करीचं कुतूहल जास्त होतं. सुमो दरीतून वर चढत चढत पुन्हा एकदा पहाडांत घुसली आणि म्यानमार, भारताच्या सीमेवरचं लांबरुंद दऱ्याखोऱ्यांत पसरलेलं आशियन हत्तींचं जंगल भूल घालू लागलं.

वाटेतल्या एका सैनिक चौकी असलेल्या- तशा त्या ठायी ठायी होत्याच- खेड्यामध्ये एक भलामोठा लष्कराचा फलक दिसला. त्यावर भूमिगत झालेल्या इथल्या बंडखोर भूमिपुत्रांना शरणागतीचं आवाहन केलं होतं. जंगलात उपाशी-तापाशी राहून रोगराईला बळी पडण्यापेक्षा माणसात येऊन चांगलं आयुष्य जगा असं काहीसं निवेदन त्यावर होतं. त्यासाठी भलं मोठं पाच हजार रुपयांचं आमिषही दाखवलं होतं. मदतीचा आकडा या परिसरातल्या बंदूक हाती घेतलेल्या बंडखोराच्या आर्थिक दाखल्याइतका पुरेसा बोलका होता. वाटेत एका घाटात एक ख्रिस्ती प्रार्थनास्थळ आणि रस्त्यावर आणखी एक फलक ‘प्रभू, या वाट चुकलेल्या मेंढरांना क्षमा कर.’ मोरेत पोहोचलो.

एक छोटंसं मितेयी कुकी, कोण्याक, अपांग, अशा वेगवेगळ्या जमातीच्या, आपल्याकडे जसं कुंभारवाडा, लोहार अळी, सुतार गल्ली अशी खेड्याची रचना असते तसंच. गेल्यागेल्या इबोसानानं एक स्वस्त लॉज बुक केलं. आणि मग दिवसभराचा कार्यक्रम सांगितला. इबोसानाशी बोलताना मला नेहमी एक अडचण भासायची कारण त्याचा संवादही स्वगत बोलल्यासारखा असायचा त्यामुळे त्याला काय म्हणायचंय ते मला चौथ्यांदा ऐकल्यावर कळायचं.

तो म्हणाला, ‘‘आपण आता जेवू. आधी अलीकडचा आणि पलीकडचा बाजार फिरून येऊ.’’

लॉजमधून बाहेर पडलो. समोर उंचावर हनुान मंदिर. मग चालत बाजाराकडे निघालो. एक भलारुंद सिमेंटचा पूल ओलांडून पलीकडे गेलो तर मशीद, मंदिर आणि पुलाच्या सुरुवातीलाच चर्चकडे जाणारा फलकही पाहिला होता. सर्वच धर्मांच्या परमेश्वरांनी इथे सीमेच्या रक्षणासाठी ठाण मांडलं होतं. या आदिम जमातींची प्रार्थनास्थळंही डोंगर, झाडं, नदी असतात हे बरंय. नाही तर त्यांच्याही मंदिरांसाठी जागा आरक्षित कराव्या लागल्या असत्या.

पुढे फाटक ओलांडून म्यानमारच्या हद्दीत प्रवेश करत परदेश प्रवेश केला. भारतीय सैनिक इथल्या सैनिकांबरोबर मस्त तंबाखू चोळत गप्पा मारत बसलेले. सीमेच्या या भागातील दोन्ही बाजूंना प्रचंड मोठे हॉल बांधलेले आणि त्यात बहुतांश ‘सारोंग’ म्हणजे लुंगीसारखे वस्त्र गुंडाळलेल्या आणि वरती शर्ट घातलेल्या ब्रह्मी स्त्रियांचेच प्राबल्य दिसत होते. बहुतेक स्त्रियांनी आपल्या चेहऱ्यावर चंदनाचा लेप लावलेला. आणि मेकअपच्या वस्तूपासून कपडे, भांडीकुंडी, रंगीबेरंगी शोभेच्या छत्र्या, पंखे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची दुकानं. बाजार स्थानिक आणि बाहेरच्या म्हणजे आसामपर्यंच्या घाऊक खरेदीदारांनी भरून गेलेला. रणधीर आणि इबोसाना स्वस्ताई एन्जॉय करत खरेदी करत होते. त्यांना घेऊन तसाच आणखी थोडा पुढे चालत गेलो. म्यानमारच्या रिक्शास्टँडवर भारतीय बजाज रिक्षांची वडाप गर्दी.

भारतीय प्रवाशाला आठ तासांसाठी म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आत वीस कि.मी. पर्यंत परवान्याशिवाय जायची मुभा आहे हे कळल्यावर जवळच्या ब्रह्मी खेड्यात- ‘तामो’ला- जाणाऱ्या रिक्षात बसलो. अर्ध्या एक तासात तामूत पोहोचलो तिथेही सिनेमासारखाच चिनी, कोरियन वस्तूंचा बाजार, शिवाय अत्यंत महागड्या इंग्रजी दारू-अविश्वसनीय कमी किंमतीत विकायला ठेवलेल्या. एक ब्रह्मी मनुष्य, बर्म्युडा, टी-शर्टधारी जवळ आला. कुजबुजत्या स्वरात त्यानं इबोसानाला काहीतरी विचारलं, इबोसानानं अक्षरशः थरथरत झुरळ झटकल्यासारखंच झटकलं.

 मी विचारलं, ‘‘काय विचारत होता?’’

इबोसाना पहिल्यांदाच तिरस्कारानं उंच आवाजात म्हणाला, ‘‘बाई हवीय का विचारत होता.’’

आजूबाजूला अधूनमधून पडदा टाकलेली काही दुकानं दिसत होती. त्याचं रहस्य हे आहे तर. परतताना रिक्शावाल्याला म्हटलं इथं अफू गांजाची शेती फार आहे ना रे? रिक्शावाल्याने न बोलता एका बौद्ध विहारासमोर रिक्षा थांबविली.

इबोसानाला मैतेयी भाषेत काही म्हणाला, मग आम्ही तिघांनाही घेऊन विहाराच्या मागे दहा मिनिटं जंगल वाटणाऱ्या झाडीतून चालत नेलं. समोर एक तीन-चार गुंठ्यांचं शेत आलं आणि ते शेत चक्क गांजाच्या झाडांचं होतं. काही न बोलता परत फिरलो. लष्कराला माहीत नाही ते तुला माहिती आहे. त्यानं येडं का खुळं राव या नजरेनं माझ्याकडं बघितलं. मग त्यानं सांगितलेल्या उत्तराचं इबोसानानं भाषांतर केलं.

‘दोन्हीकडच्या लष्करी अधिकाऱ्यांना त्यांचा ठरलेला वाटा जातो. हॉटेलमध्ये आल्यावर हॉटेलमध्ये गेली वीस वर्षं वेटरचं काम करणाऱ्या आसामच्या माळी जातीच्या अजय मालाकारनं माहिती दिली की या अमली पदार्थांना इथं नंबर चार असा कोडवर्ड आहे.

मला दुसऱ्या दिवशी पहाटे पाखरांच्या किलबिलाटात जाग आली. अजय चहा घेऊन आला आणि त्यानं बातमी दिली, गेट नं. 2 वरती लष्कराच्या लोकांनी एका मुलीला गोळी घालून मारलंय. तिच्या मरणाचं दुःख वाटण्याऐवजी पत्रकारी कुतूहलच जाग झालं.  तिघेही उठून गेटकडे पळालो. दोन्ही गेटच्या मधल्या दहा फुटी नो मॅन्स लँडवर त्या पोरीचा मृतदेह ठेवलेला होता आणि दोन्ही बाजूंना बंदुका उचलून दोन्ही देशांचे सैनिक त्या मृतदेहावर जिवंत माणसांना दूर ठेवत पहारा करत होते.

एका सैनिकाला विचारलं तर तो म्हणाला, ‘‘ती एक व्यसनी मुलगी होती आणि कदाचित चीनची हेरही.’’ गंमतच वाटली. एक गरीब, कष्टकरी मुलगी व्यसन करू शकेल पण हेरगिरी कसली करणार? रूमकडे परतताना लोकांच्या कुजबुजण्यातनं जे थोडंफार समजलं त्यावरून त्या मुलीवर बलात्कार झाला असावा आणि तो लपवण्यासाठी तिला व्यसनी केलं असावं. या परिसरात असं नेहमीच घडत असल्यामुळं इथल्या लोकांना सवयीचं होतं. 31, 1, आणि 2 या तारखांना इथला बाजार नियमित बंद असल्यामुळे परत इंफाळला निघालो.

वाटेत ख्रिस्ती प्रार्थनास्थळाजवळ बस थांबली. तिथला धर्मगुरू बसमध्ये चढला आणि गाडीतल्या प्रवाशांचं अतिरेक्यांपासून रक्षण करण्याचं प्रभूला साकडं घालून खाली उतरला. माझ्यातल्या पाखंड्याला या सगळ्या प्रकाराचं हसू येत होतं आणि माझा फोटो घेण्याचा इरादा लक्षात आल्यावर मार्क्सवादी, श्रद्धाळू, हिंदू, इबोसाना आणि रणधीरने मला रोखले. पुढे एका खेड्यात तिथेच आडबाजूला असलेल्या केंद्रीय शाळेची, सुट्टी संपवून परत निघालेली मुलांची एक मोठी बॅच चढली. एवढं मोठं भाडं मिळाल्यामुळे त्या खाजगी बसवाल्यानं इंफाळचा मुख्य रस्ता सोडून आतल्या 10 कि.मी. अंतरावर असलेल्या केंद्रीय शाळेकडं बस वळवली.

वाटेतल्या वस्त्यांवरून लक्षात येत होतं की बहुधा या यंगकूल नागा टोळ्यांधील एका टोळीची ती वसाहत असावी. झोपड्यांच्या भिंतींवर लिहिलं होतं, ‘आम्हांला नागांपासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हे भारता, कुठे आहे तुझी एकात्मता?’ आणि दुसऱ्या बाजूला मणिपूर शासनाच्या ‘मेरा भारत महान’ च्या पाट्याही.

इंफाळमध्ये दुपारी तीन वाजता पोहोचलो.चार वाजता पुन्हा राष्ट्रप्रेमी मणिपुरी साहित्य संघाच्या वतीनं माझा सत्कार होता. पंधरा वीस साहित्यिक-साहित्यिका गोळा झालेल्या. सगळे मैतेयी भाषेत काहीकाही बोलले. केवळ माझ्याविषयी दोनिश्वरनं बढा चढाके जे काही सांगितलं असेल त्यात भारावून ते बोलत होते एवढं मी जाणलं. माझ्या इंग्रजी भाषणात, महाराष्ट्र आणि मणिपूर यांच्या सांस्कृतिक मिलनाचा हा सत्कार आहे, असं नमूद करून पुन्हा एकदा मणिपुरी आतिथ्यशीलतेबद्दल कृतज्ञतापूर्वक आभार मानले. संध्याकाळी एकटाच फिरत आयांच्या बाजारात गेलो. मणिपूर आणि इंफाळमधला हा जगभर प्रसिद्ध असलेला, पूर्णपणे स्त्रियांनी नियंत्रित बाजार. औषधापुरतादेखील विक्रेता म्हणून एकाही पुरुषाला प्रवेश नाही. अगदी हॉटेलपासून धान्य व्यापारापर्यंत आणि सौंदर्यवस्तूंपासून कपड्यांपर्यंत सर्व काही उपलब्ध. रायगडावरील जो उंच चौथऱ्यांचा बाजार आहे, तसेच चौथरे एका छताखाली. प्रत्येक चौथऱ्यावर इम्मा दुकानं व हॉटेलं थाटून बसलेली. एका इम्मासमोर चौथऱ्याशेजारीच ठेवलेल्या स्टुलावर जेवायला बसलो. भात आणि माशाची करी.

जेवता जेवता विचारलं, ‘‘इम्मा, काय करतो तुमचा नवरा?’’ अर्थात हे हिंदीत.

इम्मानंही मोडक्या तोडक्या हिंदीत उत्तर दिलं, ‘‘हम है ना, तो उनको क्या करनेकी जरूरत?’’

मला वाटलं सगळ्या पुरुषांना अशाच इम्मा लाभाव्या असं वाटत असेल. रात्री मायकल भेटायला आला. खूप गप्पा मारत होता. त्याचं नाव जरी मायकल असलं तरी धर्माने तो हिंदूच होता. नावावरून धर्म ओळखता येतो हा माझा समज त्याने खोटा पाडला. इंफाळ सोडण्यापूर्वी इंफाळमधलं आरकेसीएस हे इंफाळच्या राजघराण्याच्या चित्रकाराचं देखणं चित्रम्युझियम आवर्जून पाहायला त्यानं सुचवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच तो आपली स्कूटर घेऊन आला. चित्र प्रदर्शन पाहायला गेलो- राजेंद्रसिंग या राजघराण्याचे चित्रकार असलेल्या राजचित्रकाराचं. आणि आता त्यांचा मुलगाही चित्रकारच आहे. त्याच्या व्यवस्थापनाखाली सदरचं चित्र म्युझियम चालू आहे. एकूण मणिपूरचा इतिहास आणि सांस्कृतिक विश्व सगळ्या चित्रांधून फुलवलं होतं.

मणिपूरचा ब्रिटिशांबरोबरचा स्वातंत्र्यलढा, ब्रिटिश अधिकाऱ्यांना मणिपुरी सैनिकांनी घातलेलं कंठस्नान, राजा त्रिकेंजत सिंग आणि यंगला यांची फाशी, खंबा आणि थांगजाई यांची प्रेमकथा. मणिपूरमध्ये आलेली प्लेगची साथ. अशा मणिपुरी संस्कृती आणि इतिहासाची चित्रमय ओळख असलेल्या गोष्टी.विशेष म्हणजे घोड्यांवरून खेळला जाणारा पोलो हा खेळ, प्राचीन काळापासून इथे कसा खेळला जातो त्यामुळे मूळचा तो मणिपुरी खेळ आहे, असा अहंकार. या प्रदर्शनाचा निरोप घेताना चित्रकारांचा व्यवस्थापक मुलगा माझे हात घट्ट पकडून म्हणाला, ‘‘मणिपूर एक स्वतंत्र आणि समृद्ध संस्कृती आहे आणि ते तुमच्या लिखाणातून तुमच्या लोकांना कळू द्या.’’ थोड्या वेळानं नेहमीप्रमाणे इबोसाना आणि दोनिश्वर माझ्या तैनातीसाठी हजर झाले. आज काही लेखकांशी भेटी ठरल्या होत्या आणि इबोसानाच्या गावी दुपारचं जेवण तर संध्याकाळचं दोनिश्वरकडं.

साहित्य अकादमी विजेत्या इशोपाकसिंगांच्या घरी गेलो. बाहेरच्या बाजूला एक लोहाराचं दुकान, घणाघण आवाजात काम चाललेलं. लाकडी कुंपणातून आत गेलो, पावसानं निसरडं झालेलं अंगण, तोल सावरत आणि सांभाळत कवी महाशयांच्या व्हरांड्यात गेलो तर बनियन-चड्डीमधले कविमहाशय आपलं बागेतलं काम संपवून नळाच्या पाण्याखाली हात-पाय धूत होते. दोनिश्वरला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. मग आत चहाची पेशकश करत ते आमच्यासमोरच्या खुर्चीवर येऊन बसले.

चर्चेला सुरुवात झाली. ‘‘इथल्या अशांत वातावरणाबद्दल तुमचं काय मत आहे?’’

‘‘इथलं अशांत वातावरण हा इथल्या आणि तुमच्या माध्यमांनी केलेला खोटा प्रचार आहे. इथली माणसं मुळातच शांत आहेत. थोड्याफार हिंसाचाराच्या घटना घडल्या; आणि तशा त्या कुठेही  घडतात, पण त्याचा बाऊ करून लोकांना भयभीत करायचं काम माध्यमं करतात.’’

मला आठवलं, काल रात्री मायकल पण मला हेच सांगत होता. काही वर्षांपूर्वी इंफाळ सात वाजताच बंद व्हायचं. पण आता नऊ-दहापर्यंत दुकानं, हॉटेलं उघडी असतात. काही वेळा या अतिरेक्यांच्या नावावर फुकट खायला सोकावलेली पंटर मंडळीही असा असंतोष माजवीत असतात.

‘‘इथं हिंदी बोलायला किंवा चित्रपट दाखवायला स्थानिक लोकांचा विरोध आहे असं ऐकलं होतं?’’ माझा आणखी एक खडा.

खरं तर चित्रपटगृहात मला हिंदी सिनेमे दिसले नसले तरी बाजारात आणि लोकांशी बोलताना हिंदीचा सर्रास वापर होताना मी पाहत होतो.

‘‘तुमचा काय अनुभव? इशोपाकसिंग माझ्याच रिंगणात चेंडू ढकलतात.

मग सांगतात, ‘‘अजूनही सार्वजनिक चित्रपटगृहांत हिंदी सिनेमे लागत नसले तरी घराघरात दूरदर्शनवरची हिंदी चॅनेल्स आणि हिंदी सिनेमांच्या सीडीज पाहणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे.’’

‘‘एकंदरीत मणिपूरच्या समस्या कशा संपतील असं तुमचं मत आहे? स्वतंत्र मणिपूर ही समस्या नाहीच मुळी. कारण त्या तथाकथित सार्वभौत्वाला आता काही मतलब उरला नाही. खरा मुद्दा आहे तो आर्थिक विकासाचा. इथल्या तरुणांना रोजगार मिळण्याचा. कारण सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढत आहे आणि त्यांच्या हाताला काम नाही.’’

चहा देतानाच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं प्रकाशित केलेला आणि त्यांच्या कवितांचा समावेश असलेला ईशान्य भारतीय कवितांचा संग्रह मला भेट दिला. आपल्या कवितांच्या भाषांतराच्या परवानगीसह.

मग मणिपूरचा आणखी एक चर्चित कवी रघू लेईशांगशे यांच्याकडे गेलो. एक्साइज खात्यात नोकरी करणारा हा कवी बालकथा लेखकही आहे. अत्यंत वेगळ्या प्रकारची कविता लिहिणारा- ज्यातून मणिपूरचं वर्तमान प्रकट होतं, असं म्हटलं जातं. त्यांनी एक कविता वाचून दाखविली, त्या कवितेचा आशय लहानपणी आपल्या मुलाला वडील खेळण्यातली बंदूक घेऊन देतात आणि ते मूल कौतुकानं गोळ्यांचा आवाज काढीत सगळीकडं हिंडतं. तरुण झाल्यावर स्वतःच बंदूक खरेदी करतं आणि गोळ्या चालवत माझ्या, जगाच्या छातीवर नाचतं. कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या.. ते लहान मूल आणि ती बंदूक आज, एखाद्या कट्टर मित्रांसारखी एकमेकांसोबत आहेत.

मणिपूरच्या तरुणाईची मानसिकता यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत कशी व्यक्त होणार? रात्री नेहमीप्रमाणे इंफाळमध्ये लाईट नव्हतीच. कंदिलाच्या प्रकाशात दोनिश्वरच्या परिवाराबरोबर मणिपुरी थाटाचं पोट भरून- नव्हे पोट फोडून जेवलो.

उद्या सकाळी मिझोरमला निघायचंय. दोनिश्वरच्या बायकोनं माझ्या बायकोसाठी सुंदर एक शाल दिली. रात्री मी माझ्या डायरीत मणिपूर या शीर्षकाखाली कविता लिहिली.

ही रमणी किती अद्‌भुत सौंदर्यवती

पण ती पुन्हा का न्याहाळते स्वतःला

लोकटाकच्या आरसपानी पाण्यात

तरंगांनी छिन्नभिन्न प्रतिमेवर तिच्या

होत नाहीय का तिचं सौंदर्य एकाग्र?

थोईबीनंच मारलं आपल्या प्रियकराला

वाचवण्यासाठीच त्याला

मणिपूर, माझ्या जाणिवेत पाहातेस तू सुंदरी

तुझ्या भविष्यानिशी

आणि होतोय माझ्यातला कवी असहाय

तुझ्या निर्लेप सौंदर्यासाठी

सगळ्या थोर प्रेमकहाण्यांचा पूर्णविराम मृत्यूतच असतो तर...

3 जून 2011, ऐझॉल (मिझोरम)

इंफाळच्या टॅक्सीस्टँडवर मला निरोप देताना दोनिश्वर म्हणाला, ‘‘तुला मणिपूरची आणखी एक गंमत दाखवतो.’’

त्यानं आपल्या हातातलं वर्तमानपत्रं उलगडलं. मला पहिलं पान दाखवत म्हणाला, ‘‘काही वेगळेपण जाणवतंय?’’

मला अगम्य असलेल्या लिपीकडे मी फक्त निरक्षरासारखा पाहत राहिलो.

मग हसत म्हणाला, ‘‘हा पेपर बंगाली भाषेत आणि बंगाली लिपीत आहे. पण ही मधोमध छापलेली बातमी बघ. मैतेयी लिपीत आहे. जर एक तरी बातमी या लिपीत छापली नाही तर त्या वर्तमानपत्रावर आमचा बहिष्कार. बघ, आहे की नाही आम्हांला आमच्या संस्कृतीचा अभिमान ?’’

‘‘हो. जरा जास्तच मात्रेत आहे.’’

मीही हसत प्रतिक्रिया दिली.

‘‘खर तरं तू दिमापूरकडून गेला असतास तर रस्ता चांगला आहे. आता ज्या जिरीबमच्या रस्त्याने जाणार आहेस, तो भारतातला सर्वांत खराब रस्ता आहे. पण तुझा हट्ट ना, जास्तीत जास्त ग्रामीण भागातून फिरायचा. रस्त्यांवर गायी-म्हैशीच जास्त दिसतील तुला चरताना. ‘‘बरं झालं, अरुणाचलपासून म्हैशीचं दर्शन नाही, बघायला आतुर झालोय. तेवढीच गावाकडची आठवण!’’

दोनिश्वर मणिपुरी कवितांची मराठी आवृत्ती काढायची ठरल्याची आठवण देत निघून गेला. सुमोचा ड्रायव्हर मुस्लिम आणि गप्पिष्ट होता. मणिपूरमधील मुस्लिम बंगालकडून आले असले, तरी त्यालाही आता हजार वर्षं झाली आहेत आणि आपण आता मैतेयीच झालो आहोत असं अभिमानानं सांगत, इथल्या मुस्लिमांना त्यामुळे मैतेयी बांगला मुस्लिम म्हणतात अशी पूरक माहिती दिली.

मणिपुरी रासलीला,  सुमांगलीला इत्यादी लोकनाट्याचे प्रकार पाहिलेत की नाही असं आस्थेनं विचारत आपण रतन थिय्यम, लोकेंद्र अरिंदमचे कसे फॅन आहोत हेही आवर्जून सांगत होता.

रतन थिय्यमनं इथल्या मार्शल आर्टला म्हणजे थांगता या तलवारबाजीच्या कलेला नाटकाद्वारे कसं जागतिक स्तरावर नेलं, सरित सारत या हत्याराविना युद्ध प्रकाराचाच कसा कलात्मक वापर केला, मोरंग, जत्रावली हे घराच्या अंगणात वीस-पंचवीस प्रेक्षकांसमोर फक्त पुरुष कलाकारांनीच, म्हणजे त्यात स्त्री अभिनय करणारेही पुरुष असतात आणि ते पुरुष कलाकारांनीच, म्हणजे त्यात स्त्री अभिनय करणारेही पुरुष असतात आणि ते पुरुष आहेत हे बायकांनाही ओळखता येत नाही (मला स्त्रीवेषात खऱ्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी बालगंधर्व गेल्याची कथा स्मरते.) वगैरे सांगत मणिपूरच्या एकूण कला संस्कृतीवर भाषणच दिलं.

हा ड्रायव्हर आहे की कला समीक्षक या दुविध्यात मी पडलो होतो. सुमो पहाडांतल्या घाटरस्त्याला लागली आणि जागोजागी रस्त्याचं बांधकाम चाललेलं दिसू लागलं. मात्र हे काम आपल्याला अनंत काळ करायचं आहे अशा समजुतीनं चाललं असावं इतक्या मंदगतीने कामावरचे मजूर वावरताहेत असं वाटत होतं.

हसननं माहिती दिली, ‘‘गेली दोन-तीन वर्षं मी बघतोय. काम चाललंच आहे, रस्ता होतोच आहे. त्यांचं खरं कारण असं आहे की मणिपूरमध्ये सर्वांत जास्त म्हणजे तीस-पस्तीस उग्रवादी संघटना आहेत. पण आता भारत सरकारशी त्यांचा युद्धबंदी करार झालाय. त्याच्या बदल्यात त्यांना असे मोठमोठे ठेके दिलेत. बाहेरच्या मजुरांना ते येऊ देत नाहीत. स्थानिक पहाडांतल्याच या टोळ्यांतले लोक मजुरीला आणले जातात. त्यांना फक्त मजुरीशी मतलब. रस्त्याची त्यांची लेखी परंपरेने त्यांना कधीच गरज भासलेली नाही. आणि अतिरेक्यांच्या नावाखाली शासन काम पुरं झालंय की नाही याची कधीच फिकीर करत नाही.

हसनच्या तपशिलात कमीजास्त असेल, पण तथ्यांश नक्कीच होता. या चिखली रस्त्यावर मालवाहू गाड्यांची पण येजा बरीच हाती. अगदी तीव्र चढ, चिखलात फसणारी चाकं, त्यामुळे काही ठिकाणी तर पाठीमागे पोकलॅन लावून ट्रक वर ढकलले आणि चढवले जात होते.

जिरीबम या मणिपूर-आसामच्या हद्दीवरच्या गावात पोहोचल्यावर डांबरी रस्ता लागला आणि सुमोनं हुश्श केलं. पण मी दोनिश्वरला लगेच फोन करून सांगितलं, (इंफाळमध्ये मी नवा मोबाईल घेऊन त्यात किवीनं दिलेलं सिमकार्ड घातलं होतं.) ‘‘तुला जर हा रस्ता भारतातला सर्वांत खराब रस्ता वाटत असेल, तर तू माझ्या प्रगत राज्यात ये. मी तुला पृथ्वीवरले सर्वांत खराब रस्ते दाखवतो.’’

मला खात्री आहे, पलीकडे दोनिश्वरच्या चेहऱ्यावर मणिपुरी अभिमान फुलला असणार.

बराक नदी, आसामची आणखी एक अश्रुपात करायला करायला लावणारी महानदी, ओलांडून सिलचरच्या टॅक्सीस्टँडवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे सात वाजले होते.

टॅक्सी बुकिंग काऊंटरवाला म्हणाला, ‘‘आता आठ वाजता तुम्हांला सुमो आहे.

मी म्हटलं, ‘‘मला सकाळी तिथं पोहोचणारी गाडी हवी म्हणजे दिवसाउजेडी.’’

त्यानं खात्री दिली, ‘‘गाडी जरी आता सुटणार असली तरी ड्रायव्हर ती सकाळीच ऐझॉल मध्ये नेईल.’’

ठीक नऊ वाजता प्रवाशांची भरती झाल्यावर सुमो निघाली. माझ्या शेजारी एक भारतीय लष्करातला मिझो जवान सुटीला गावाकडे निघाला होता. ऐझॉलपासून पुढे आणखी दोनशे कि.मी. पहाडात पेप्सीच्या बाटलीतून रम चाखत माझ्याशी गप्पा मारू लागला.’’ मिझोंचं स्वतंत्र राज्य झालं आणि मिझोंच्या विकासाला एकदम वेग आला. आमच्या राज्याइतकी शांती आता भारतातील कुठल्याच राज्यात नाही.’’

ड्रायव्हर शेजारच्या प्रवाशाबरोबर गप्पा मारताना मी ऐकलं, ‘‘अख्ख्या नॉर्थ-ईस्टध्ये मला फक्त मिझोरमच्या डासांची भीती वाटते. साले चावले की हिवताप नक्कीच.’’

आतापर्यंतच्या प्रवासात कसलंच भय वाटलं नव्हतं. आता मात्र घाबरलो. आसामचा राष्ट्रीय महामार्ग सोडून सुमो मिझोरमच्या हद्दीत घुसली. सैनिक चौकी. एक्साइजवाल्यांची तपासणी. सगळे सवयीचे सोपस्कार उरकून सुटका झाली तेव्हा रात्रीचा एक वाजता होता.

आणखी एक तासभर गाडी हाकल्यावर एका भल्यामोठ्या लाकडी खोका वाटणाऱ्या एका हॉटेलसमोर ड्रायव्हरनं गाडी थांबवली आणि जाहीर करून टाकलं आता दोन तास मी झोपणार.

पण सुमोतल्या बाकीच्या प्रवाशांना या सक्तीच्या थांबण्याची माहिती असावी. त्यामुळे त्यांची चुळबुळ झाली नाही. मलादेखील लवकर पोहोचायची घाई नव्हती पण मिझोरमच्या डासांची भीती प्रवासाच्या सुरुवातीलाच लाभलेली असल्यामुळे जरा अस्वस्थ होतो.

एक प्रश्न मात्र मला सारखा पडत होता की मिझोरमचे हे डास बरोबर मिझोरमच्या हद्दीपुरतेच काम करतात की थोडी हद्द ओलांडतातही.

हॉटेल म्हणजे एक भला मोठा लाकडी हॉल, त्याला लागूनच छोटंस रसोईघर. हॉटेलचे मालक, कर्मचारी छान बाकड्यांवर झोपून टाकलेले. तिथेच एका शेगडीवर चहाची किटली उकळत ठवलेली. ड्रायव्हरपाठोपाठ मी हॉटेलमध्ये शिरलो. ड्रायव्हरनं स्वतःच दोन ग्लास घेऊन त्यात चहा ओतून एक ग्लास माझ्या हातात दिला. मी खूश.

मला वाटलं, मिझोरमचं आतिथ्य सुरू झालं. ड्रायव्हरनं एका बाकड्यावर स्वतःला पसरून दिलं. मीही रिकामं बाकडं शोधून डासांवर लक्ष ठेवण्यापुरतं जागं राहत झोपेची आराधना करू लागलो. चार-साडेचारला बऱ्यापैकी उजाडलं आणि गाडीतला तो मिझो जवान ड्रायव्हरला हाका मारून जागं करू लागला. मीही तोंडावर पाणी मारून रस्त्यावर आलो.

मिझोरमचं पाहिलं दर्शन इतकं आल्हाददायक असेल असं वाटलं नव्हतं. दुतर्फा घनदाट उंच पाईन वृक्ष, पाखरांचा किलबिलाट,रात्री पावसाची सर पडून गेली असावी; कारण झाडांची पानं प्रसन्न निथळत होती. पुन्हा एकदा जाग्या झालेल्या मालकाच्या हातून चहा घेतला. त्यानं रात्रीच्या आणि आत्ताच्याही चहाचे पैसे  माझ्याकडून वसूल केले.

गाडी आता धावू लागली. हळूहळू आपण उंचावर चाललोय याची मला जाणीव झाली. दोन्ही बाजूंच्या लांबरुंद हिरव्यागार दऱ्या पाहताना समजलं की आपण थेट डोंगराच्या शिरावरून चाललेलो आहोत. मध्येच या प्रदेशाचा राजपक्षी पाईड हॉर्नबिल म्हणजे कवड्या धनेश मस्त फडफडत समोरून गेला- जणू माझं मिझोरममध्ये स्वागतच करीत.

वाटेत छोटी छोटी खेडी म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा डोंगराच्या दोन्ही बाजूंना बिलगलेली लाकडी घरं. सातत्याने दोन गोष्टी दिसत होत्या. एक पावसाचं छतावर गोळा होणारं पाणी खाली हौदात साठवण्याची प्रत्येक घराने केलेली सोय आणि चारचाकी मोठा लाकडी गाडा. या लाकडी गाड्याचं प्रात्यक्षिकही वाटेत पाहायला मिळालं. गाड्यात बसून एक मिझो खेडुत गडगडत घाटाच्या उतारावरून खाली चालला होता. त्या लाकडी चाकांच्या गडगडाटानेच छाती धडकत होती.

माझ्या आजोळच्या जोकाईदेवीची आठवण झाली. आजीच्या सांगण्याप्रमाणं एका भक्ताच्या इच्छेखातर देवी आपल्या लाकडी गाड्यावरून गडगडत त्या भक्ताच्या पाठोपाठ गावात येण्यासाठी निघाली. अट एवढीच होती की ती येताना भक्ताने मागे पाहायचं नाही पण त्या गडगडाटाला घाबरून त्यानं मागं पाहिलं आणि देवी तिथंच थांबली. गोष्ट ऐकताना भक्ताचा मूर्खपणाच जास्त जाणवला होता पण आता हा गडगडाट ऐकल्यावर त्याची भयावहता कुणालाही घाबरवून सोडणारीच आहे याची साक्ष मिळाली.

अखेर कोहिमाची आठवण करून देणारं या परिसरातलं आणखी एक देखणं डोंगरमाथ्यावरचं शहर ‘ऐझॉल’ दिसायला लागलं. दोनिश्वरनं मिझोरममधल्या माणिपूर साहित्य परिषदेच्या शाखेच्या अध्यक्षाचा, कांतासिंगांचा संपर्क फोन दिला होता. निघतानाच मी येण्याची कल्पना त्यांना दिली होती.

टॅक्सी स्टँडवर पोहोचलो तेव्हा पोलीस सब इन्स्पेक्टर श्री.कांतासिंग आपल्या मणिपुरी सौजन्याला घेऊन स्मित करत स्वागताला उभेच होते. आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये त्यांनी माझी व्यवस्था लावली. चहा पिता पिता माझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घेतला. आपली पत्नी आजारी असून तिच्या काही तपासण्या चालू आहेत आणि कुठल्याही क्षणी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे त्यामुळे तुम्हांला द्यायला हवा तितका वेळ मी देऊ शकणार नाही. तरीही जास्तीत जास्त मदत करण्याचं आश्वासन मला देत ते सारखे माफी मागत होते.

कांतासिंग मूळचे मणिपूरचे असले तरी मिझोरमध्ये पोलीस खात्यात गेली पस्तीस वर्षं ते नोकरी करताहेत. ऐझॉल आणि मिझोरममध्ये मिळून जवळपास तीन हजार मणिपुरी राहताहेत. पण नवी पिढी मात्र आता आपली भाषा आणि संस्कृती विसरत चालली आहे. या बोचऱ्या जाणिवेने त्यांनी इथं मणिपुरी साहित्य परिषदेची शाखा सुरू केली. दर आठवड्याला तिच्या मार्फत मणिपुरी मुलांसाठी मैतेयी भाषेचे वर्ग चालवले जातात. मणिपुरी साहित्यिकांच्या बैठका आयोजल्या जातात वगैरे वगैरे माहिती खूप आत्मीयतेने त्यांनी मला ऐकवली.

मी म्हटलं, मला आता मिझो साहित्यिकांना भेटायचं आहे. थोडा वेळ विचार करून त्यांनी सांगितलं, इथल्या मिझो विद्यापीठत मिझो साहित्यातला एक मोठा माणूस आहे. लालथोंग लियाना खिंगटे. माझ्याकडं त्यांचा फोन नंबर नाही. पण मी तो मिळवतो आणि त्यांची वेळ घेतो. नंतर आपण इथल्या पत्रकार संघाच्या कार्यालयातही जाऊ. आमच्या पोलीस स्टेशनशेजारीच आहे. मला पुन्हा दोन तासांनी येतो म्हणून हॉस्पिटलकडे निघून गेले. हॉटेलचा व्यवस्थापक त्रिपुराचा होता. बिनय डे असं त्याचं नाव . तो गेली तीस वर्षं ऐझॉलमध्ये आहे. इथली माणसं खूप शांत आणि सभ्य आहेत. पण त्रिपुरींसारखी मोकळ्या मनाची नाहीत. थोडीशी आतल्या गाठीची वाटतात असं त्याचं एक आपलं निरीक्षण होतं.

दुपारी कांतासिंग खिंगटेंची भेट ठरवूनच आले. आणि मग आपल्या मारुतीतून कोहिमासारखंच डोंगराला गोल फेऱ्या घालत एका उंचावरच्या घराजवळ घेऊन गेले. उतरून पुन्हा थोडी चढाई करत चाळीस-पन्नास पायऱ्या चढून एका सिमेंट काँक्रीटच्या घरासमोर उभे राहिलो. दरवाजावर टकटक करून दरवाजा उघडण्याची वाट पाहत थांबलो तर बाजूने जाणाऱ्या एका तरुण मुलीनं सांगितलं, बाजूच्या जिन्यानं वर जा, कारण घराचा दरवाजा तिकडून आहे.

या पर्वत शहरांमध्ये कुणाच्या घरी जाणं हे एखादं शिखर चढण्यासारखंच. खिंगटे साहेबांच्या घराच्या वरच्या टप्प्यावर गेलो. तिथे काम करणाऱ्या मुलीनं मिझो भाषेत कांतासिंगला सांगितलं, सर अभ्यासिकेत आहेत आणि आणखी एका जिन्याकडे बोट दाखवत त्या जिन्याने उतरायला सांगितलं. पुन्हा एकदा शिखरावरून खाली येत आम्ही थेट डॉक्टर साहेबांच्या अभ्यासिकेत कोसळलो. पुस्तकांनी चारही बाजूंच्या भिंती गच्च भरलेल्या. अभ्यासिकेच्या मधोमध एक लिखाणाचे टेबल. तिशीचे वाटणारे पण पन्नाशीतले डॉक्टर खिंगटे बसलेले. चेहऱ्यावर रुंद हास्य पसरत त्यांनी स्वागत केलं.

महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर आपल्या मुंबई, पुण्यातल्या लेखक कवी मित्रांची नावं आठवून आठवून सांगू लागले, डॉ.गणेश देवी, कपिल पाटील, निरंजन उजगरे वगैरे वगैरे. कपिल पाटीलने आपल्या एका पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे हेही अगदी आवर्जून नोंदवलं.

मला मिझो साहित्य संस्कृतीची ओळख करून घ्यायचीय म्हटल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवरचा पुस्तकांचा रॅक दाखवत त्यातलं कुठलंही पुस्तक तुमच्यासाठी खुलं आहे. तुम्हाला हवं ते तिथं मिळेल असं सांगत स्वतः उठून भराभरा पुस्तकं काढत पंचवीस एक पुस्तकं माझ्यासमोर ठेवली. मिझोंच्या लिखित साहित्याला फक्त शंभर-सव्वाशे वर्षं झाली असली (आपल्या ख्रिश्चन धर्मगुरू आजोबांनी पहिला मिझो भाषेत मिझोंचा इतिहास लिहिला असंही थोडं गर्वानंच सांगत मी स्वतः मिझो संस्कृतीचा ॲबॅसिडर आहे हेही ठणकावलं.) इंग्रजी साहित्यावर प्रभुत्व असलेल्या या  माणसाने गेली तीस वर्षं मिझो संस्कृती आणि साहित्य यांचा ध्यास घेऊन खूप संशोधनात्मक काम केलं आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारकडून त्यांना तरुण वयातच पद्‌म पुरस्कार मिळालेला आहे.

‘‘मिझो आदिवासी-’’ माझं वाक्य पुरं व्हायच्या आधीच डॉक्टरसाहेब एकदम उसळले, ‘‘आदिवासी नाही. जमात म्हणा.’’

‘‘का? आदिवासी का नाही?’’ माझा गोंधळलेला प्रश्न.

डॉक्टरसाहेब चेहऱ्यावर थोडा गर्व आणून म्हणाले, ‘‘आम्ही तुमच्या त्या माडिया वा संथाळांसारखे मागास आणि दलित नाही. आमची स्वतःची विकसित अशी संस्कृती आहे, कला आहे, भाषा आहे शिवाय एका स्वतंत्र वंशाचे आहोत. आदिवासी या शब्दाला तुमच्या नागरी संस्कृतीत खूप दुय्यम आणि नकारार्थी अर्थ आहे. त्यामुळे आम्हांला आदिवासी म्हणवून घेणं मान्य नाही. दुसरं म्हणजे आदिवासी शब्दात मूलनिवासीपणही अभिप्रेत आहे. आम्ही ऑस्ट्रोनॉर्डिक वंशाचे आणि थायलंडकडून या भागामध्ये स्थलांतरित झालेलो आहोत. त्यामुळे आदिवासी ही संज्ञा आम्हां जमातींना लागू नाही.’’

डॉक्टर साहेबांनी तात्त्विक खुलासा केला. पण माझ्या संस्कृतीनं आदिवासींकडं नकारात्मक पाहण्याचा किती दृष्टिकोन तयार केला आहे याचीही नकळत जाणीव करून दिली. ‘‘मिझोंची संस्कृती, मानसिकता समजून घेण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग म्हणजे मिझोंच्यात प्रचलित असलेल्या लोककथा आणि लोकगीतं. सर्वच जमातींप्रमाणं मिझोंचा मूळ धर्म किंवा श्रद्धा या निसर्गाधिष्ठितच होत्या आणि आहेत. मिझोंच्या लोककथांध्ये ‘छुरा’ नावाचा लोकनायक, जो मिझोंमध्ये सर्वांधिक प्रिय आहे, त्याच्या कथा अभ्यासायला हव्यात. छुरा हा वरवर मंदबुद्धी, गोंधळलेला असा वाटत असला तरी प्रत्यक्षात समस्या उभ्या राहिल्या की तो ज्या पद्धतीने आणि चतुराईने सोडवतो त्यातून मिझो माणसाचं व्यक्तिमत्त्व प्रकट होतं.’’

सकाळी कांतासिंग मिझोंना आतल्या गाठीचे का म्हणत होते याचा आता थोडा उमज पडला. उद्या सकाळी डॉक्टरसाहेबांच्याबरोबर मिझो विद्यापीठात जायचा कार्यक्रम ठरवून बाहेर पडलो. कांतासिंग ‘ऐझॉल’ शहर फिरवत विधानसभा, राज्यपाल भवन वगैरे दाखवत आपल्या पोलीस स्टेशनजवळ घेऊन आले.

शेजारच्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. दोन मुली दिवाणखान्यात दूरदर्शनवर कोरियन सिनेमा पाहत बसलेल्या. कांतासिंगनं सांगितलं, हे मिझोरम पत्रकार संघाचं कार्यालय आणि संघांच्या अध्यक्षांचं निवासस्थानदेखील. अध्यक्ष कुठेतरी बाहेर गेलेले होते. त्या तरुण मुली कोरियन चित्रपटात इतक्या दंग की आमची त्यांना दखल देखील घ्यावीशी वाटली नाही.

अर्धा-एक तास बसून कंटाळल्यावर कांतासिंगना म्हटलं, ‘‘चला, आपण परत येऊ.’’ कांतासिंगही कंटाळले असावेत. उठले. वाटेत कांतासिंग आपल्या कुटुंबाची माहिती देतात. मुलगा पुण्यात इंजिनिअरिंगला शिकायला तर मुलगी एमबीए होऊन इथेच ऐझॉल मध्ये रिलायन्स कंपनीत नोकरीला आहे.

‘‘इथं कुठल्या स्वरूपाची गुन्हेगारी जास्त आहे?’’ कांतासिंग पोलीस खात्यात असल्यामुळे मी विचारलं.

‘‘चोरी, दरोडेखोरी स्वरूपाची गुन्हेगारी खूप कमी. जवळपास नाहीच. पण बलात्काराच्या केसेस मात्र जास्त आहेत.’’ कांतासिंगने सांगितलं.

‘‘काय कारण? कारण इथं तर स्त्रियांचा, विशेषतः तरुण मुलींचा, अत्यंत मोकळेपणाने वावर दिसतो.’’

‘‘तेच तर कारण आहे. या मिझो मुली नको तेवढ्या मोकळ्या वागतात. या मोकळेपणाचाच गैरफायदा तरुण मुलं घेतात. तंग जीन्स, घट्ट टी शर्ट किंवा मांड्या दाखविणाऱ्या चड्ड्या घालून या पोरी हिंडल्यावर दुसरं काय होणार? मणिपुरी स्त्रिया किंवा मुली तुम्हांला अशा कपड्यात कधी दिसल्या का?’’ कांतासिंग आपल्या सनातनी मणिपुरी भूमिकेतून सांगत होते.

मणिपूरमध्ये पाश्चिमात्य पोषाखाचा वापर तरुण मुलींमध्येसुद्धा कमी आहे हे खरंय पण त्याचा अर्थ इथल्या मुली उथळ आहेत असा होत नाही. पण मणिपुरी संस्कृतीतील टोकाची पुरुषप्रधानता माझ्या लक्षात आली होती. आणि या ट्रायबल्स संस्कृतीतला स्त्री-पुरुष भेद विरहित मोकळेपणा समजून घ्यायला त्यांना एवढी शतकंही एकत्र राहून कमी पडलीत हे नक्की.

कांतासिंगनी विचारलं, ‘‘तुम्ही तुमच्या सरकारला एक गोष्ट सांगू शकाल का?’’

त्यांच्या या प्रश्नानं मी दचकलोच.

गावच्या सरपंचाला मी काही विचारू शकत नाही ते हा गृहस्थ मला थेट राज्यशासनाला विचाराल का म्हणून पृच्छा करतोय. तरीही त्याला काय विचारायचंय हे जाणून घेण्यासाठी विचारलं तर म्हणाला, आमच्या इकडली मुलं तुमच्याकडे शिकायला आहेत पण तिथले पोलीस त्यांना नेमकं वेगळं काढून त्रास देतात. म्हणजे चौकात ट्राफिक पोलीस आमच्याच पोरांना बरोबर हेरून गुन्हा नसतानादेखील पैसे उकळतात. अशा कृतीनं आमच्या मुलांना तिथं असुरक्षित, परकं वाटतं. यातून भारतीय एकात्मता साधायची कशी? तेव्हा पत्रकार या नात्यानं मी यावर माझ्या प्रदेश बांधवांसाठी लिहावं, मुख्यमंत्र्यांच्या कानावर गाऱ्हाणं घालावं अशी त्यांची अपेक्षा. इंफाळमध्ये धनजीतनेसुद्धा दिल्लीच्या लोकांबद्दल हीच तक्रार केलेली मला आठवली. मी मला शक्य ते सर्व या बाबतीत करीन असं आश्वासन देत कांतासिंगना आश्वस्त केलं.

Tags: सनामाही मंदिर कंगला पॅलेस मितेयी मैतेयी नेईफिऊ रिबो मुख्यमंत्री नागालँड मणिपूर Sanamahi Temple Kangla Palace Mitei Maitai Neifu Ribo Chief Minister Nagaland Manipur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके