डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

काळाच्या पुढचे पाहणारा लेखक

पण अण्णा भाऊ साठे, भाऊ पाध्ये हे दोन्ही लेखक मुंबईतच वास्तव्यास होते. एक जन्माने मुंबईकर होते, तर दुसऱ्यांना भूक मुंबईला घेऊन आली होती. या दोन्ही लेखकांचा वावर त्या वेळच्या प्रतिष्ठित छावण्यांत होता. भाऊ पाध्ये काही काळ समाजवाद्यांच्या कळपात होते. अनियतकालिकांची चळवळ चालविणाऱ्यांच्यातही त्यांची ऊठबस होती. अण्णा भाऊ तर कम्युनिस्ट पक्षाचे कार्डहोल्डर होते. डांगेंनी त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना दिली होती. बाबूराव बागुल, नारायण सुर्वे यांच्यासोबत ऊठबस होती. असे असताना दोघांच्याही साहित्याला फारशा गांभीर्याने घेतले गेले नाही. त्यांच्या वाट्याला फारसे चांगले प्रकाशक आले नाहीत.

अण्णा भाऊ साठे हे नाव उच्चारलं की मनात येते, लेखकाची कुंडली कोणी मांडू नये- तो जिवंत असताना किंवा तो या विश्वात नसतानाही. त्याच्या साहित्याला सततच नवनव्या कालखंडात तपासणारे, अभ्यासणारे भेटत असतात. ते त्या-त्या काळाच्या कसोटीवर त्या लेखकाला तपासण्याचा प्रयत्न करत असतात. नव्याने आकलन होत असते. ही प्रक्रिया सातत्यपूर्ण असते. कोणत्याही लेखकाचे आकलन परिपूर्ण कधीच होत नसते. त्यामुळे वाङ्‌मयाच्या आस्वादकांनी, समीक्षकांनी सावधपणेच विधाने केलेली बरी असतात. कधी-कधी काही लोक आततायीपणे बोलतात. अमुक-अमुक लेखक संपला, आता त्याच्याकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तोवर तो लेखक काही तरी भव्य-दिव्य लिहून जातो आणि आततायी बोलणाऱ्याच्या मुस्काटात खाऽड्‌ऽऽकन्‌ बसते. तसंच अमुक एक लेखक युगप्रवर्तक आहे म्हणायला जावं, तर थोड्याच कालावधीत त्या लेखकाचं काहीच उरलेलं नसतं. त्यामुळे लेखकांबाबत बोलताना-लिहिताना समीक्षक किंवा इतर तत्सम इसमांनी फार जबाबदारीनंच बोललं-लिहिलं पाहिजे. पण याचे भान असणारे फारच कमी लोक सापडतात. उलट आजच्या काळात बेदरकार, आततायी विधाने करण्याची स्पर्धाच चाललेली दिसते. मूल्यमापनाची तर इतकी घाई झालेली आहे की, त्याबाबत न बोललेलंच बरं.

अमुक लेखकाचे साहित्य जागतिक दर्जाचे, तमुक लेखकाचे साहित्य जातीय स्वरूपाचे- असल्या बाळबोध विधानांची बजबजपुरी आता शिगेला पोहोचलेली आहे. स्वतःला प्रेषिताचे अवतार समजणारे प्रत्येक काळात असतातच. त्यांनी दोन-चार इंग्रजी ग्रंथांची प्रस्तावना फक्त वाचून, अवघड मराठीत लिहून-बोलून स्वतःचे व्यक्तिमाहात्म्य प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो. त्या आधारावर तुटपुंज्या शिदोरीवर शंकराचार्य बनून मूल्यमापनाचा निर्णायक अधिकार आपल्याकडेच आहे, अशी आवई उठवण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो. त्या आधारावर ते कलाकृतींबाबत पूर्वग्रह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे सारं फार काळ टिकणारं नसतं. काळाच्या पसाऱ्यात हे सारं कुठल्या कुठं उडून जात असतं. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रात अंतिम असतो, तो फक्त काळ. तोच घेत असतो मूल्यनिर्णय. बाकी सगळ्यांचे चाललेले प्रयत्न हे अळवावरचे पाणी असते. पण हे सांगणार कोणाला? कारण, हे भुसा भरलेले शंकराचार्य हातात तराजू घेऊन हैदोस घालत असतात, वाङ्‌मयीन पर्यावरणात. यांना माहितीच नसतं की, केंद्र आणि परिघ हे वाङ्‌मयीन पर्यावरणात बदलतही असतात.

 कधी काळी आपल्याकडे फडके-खांडेकर यांच्या साहित्याने सगळा अवकाश व्यापून टाकलेला होता. त्यांचे साहित्य आणि त्यांचे तंत्रकौशल्य केंद्रस्थानी होते. पण नंतरच्या काळात गंगाधर गाडगीळ-व्यंकटेश माडगूळकर-शंकर पाटील यांच्या लेखनाने खळबळ माजवली आणि फडके-खांडेकर परंपरेतील साहित्य परिघावर फेकले गेले. मर्ढेकरांच्या कवितेने पूर्वपरंपरेला जोरदार धक्का दिला. संपूर्ण वाङ्‌मयीन पर्यावरणाच्या केंद्रस्थानाचा मौजपरंपरेतील कलाकृतींनी ताबा घेतला. कातीव टोकदारपणाला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. मौजमध्ये छापणे ही थोरपणाची कसोटी बनली. या वेळी समीक्षेच्या परिभाषेने नवे रूप धारण केले. पण हे सारे फार काळ टिकले नाही. अनियतकालिकाच्या चळवळीने मौजेची ही सद्दी संपुष्टात आणली. त्यामुळे काळानुसार केंद्र-परिघ या संकल्पना आपोआपच बदलत असतात. काळ अनंत आहे, हे नीट ध्यानात ठेवले नाही की, गुंते तयार होतात. अण्णा भाऊ साठे यांच्याबाबतही असेच काही घडून गेले. अण्णा भाऊ साठे हयात होते तोवर त्यांच्या आयुष्याचा पाठपुरावा दारिद्र्याने सोडला नाही. त्यांच्या साहित्याचा विचार तत्कालीन साहित्यव्यवहाराने पुरेशा गांभीर्याने केला नाही. असे का व्हावे? याची सर्व कारणे तत्कालीन वाङ्‌मयीन व्यवहारात सहजपणे मिळून जातात. हा कालखंड मौजेच्या फूटपट्टीने झाकोळलेला होता. अण्णा भाऊंना शाहीर म्हणून मान्यता मिळत होती, पण लेखक म्हणून मात्र त्यांच्या लेखनाची दखल घेतली गेली नाही.

- 2 –

मराठी साहित्यविश्वात फक्त अण्णा भाऊंचीच दखल घेतली गेली नाही, असे नाही. मराठी साहित्यात उपेक्षेची दीर्घ परंपराच असल्याचे दिसते. आंग्लसंपर्कानंतर हे उपेक्षेचे, अनुल्लेखाचे तंत्र वाङ्‌मयीन व्यवहारात प्रस्थापित झाल्याचे दिसते. ही उपेक्षा पहिल्यांदा महात्मा फुले यांच्या वाट्याला आली. पण त्या काळात सत्यशोधकीय साहित्याची पर्यायी परंपरा विकसित झाली. यासाठी सत्यशोधकीय पत्रकारिता खंबीरपणे पाय रोवून उभी राहिली. कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, नारायण मेघाजी लोखंडे, धोंडिराम कुंभार, वासुदेव बिर्जे, तुकारामतात्या पडवळ, गोपाळराव वलंगकर अशी लेखक-परंपरा निर्माण झाली. पण नंतरच्या काळात ही संपूर्ण परंपराच अनुल्लेखाने बाजूस सारली गेली.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात ही सत्यशोधकीय परंपरा किती तरी वर्षे अंधारातच राहिली. हीच गोष्ट कृष्णराव अर्जुन केळुसकरांची. गुरुवर्य केळुसकरांनी पहिले शिवचरित्र लिहिले. तुकारामबुवांचे चरित्र, गौतम बुद्धांचे चरित्र लिहिणारे केळुसकरगुरुजी हे नाव हा मराठी माणूस विसरून गेला. चाळीस-पंचेचाळीस महत्त्वाचे ग्रंथ लिहिणाऱ्या या लेखकाच्या वाट्याला वाङ्‌मय इतिहासात एक ओळही आली नाही. हे नजरचुकीने झाले असे म्हणता येत नाही. केळुसकरगुरुजींच्या पुढाकाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला सत्कार करण्यात आला. त्या वेळी आपले गौतम बुद्ध चरित्र बाबासाहेबांना भेट दिले. तेव्हा त्यांचा बौद्ध धर्माशी परिचय झाला. अशा गुरुवर्य केळुसकरांच्या पदरी उपेक्षाच आली. अजूनही केळुसकरांचे कार्यकर्तृत्व सामान्य माणसाला पुरेसे परिचित झालेले नाही. याबाबतच्या कारणांचा समाजशास्त्रीय शोध अद्यापपर्यंत घेतला गेलेला नाही.

हीच गोष्ट महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बाबतीत दिसेल. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले आयुष्य दलितोद्धारासाठी खर्ची केले, पण त्यांच्या कार्याची पुरेशी नोंद कोणीच घेतली नाही. त्यांचे वाङ्‌मयीन कार्य उच्च दर्जाचे असूनही त्यांच्या कार्याची दखल घ्यायला 1990 चे दशक उजाडावे लागले. जगण्याचा बहुतेक कालखंड सेवाभावी वृत्तीने घालवलेल्या या महात्म्याच्या पदरी महाराष्ट्राने काय टाकावे? तर उपेक्षा! त्यांच्या कार्याचे यथायोग्य मूल्यमापन अद्याप झाले नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य तर अद्याप अनुल्लेखानेच मारले जात आहे. याबाबतची कारणे सरळ-सरळ जातीय आहेत, हे सांगायला कोणत्याच भविष्यवेत्त्याची गरज नाही. साहित्याच्या क्षेत्रात असे अनेक लेखकांचे कार्य अनुल्लेखाने मारले गेले. यामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे नाव अगक्रमाने घ्यावे लागते. अण्णा भाऊंनी आपल्या हयातीत विपुल लेखन केले. पण त्यांच्या कार्याची यथायोग्य दखल घेण्यासाठी फारशी फुरसद कुणाला मिळाली नाही. यामागच्या कारणांचा शोध घेऊ जाता, उपेक्षेचे मानसशास्त्र उलगडत जाते.

- 3 –

बहुजन समाजातील कर्त्या विचारवंतांच्या, लेखकांच्या कर्तृत्वाचा शोध 1960 नंतर जाणीवपूर्वक घेतला जाऊ लागला. याला कारण दलित साहित्याची चळवळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्व हेच आहे. अनियतकालिकाच्या चळवळीने मराठी साहित्यात आत्मभान निर्माण करणारी चळवळ उभी केली. याच काळात दलित साहित्याच्या चळवळीचा उगम झाला. डॉ.बाबासाहेबांच्या ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ या शिकवणुकीचे प्रत्यक्ष उपयोजन सुरू झाले. दलित समाजातील नवनवे लेखक आपले जीवनानुभव अभिव्यक्त करू लागले. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची आक्रमक चळवळ महाराष्ट्रात उभी केली. या चळवळीने बहुजन समाजात नवे आत्मभान निर्माण केले. साहित्यातून विद्रोह प्रकट होऊ लागला. परंपरागत लादलेल्या गुलामीला जोरदार नकार आणि स्वातंत्र्य-समता-बंधुता या मूल्यांचा स्वीकार करणारे आवाज अधिक ठळक बनत गेले. प्रथम कविता, नंतर आत्मकथन, कथा, कादंबरी, नाटक या माध्यमातून परंपरागत साहित्याच्या आशयालाच नकार देत सामान्य, दलित, शोषित यांच्या जगण्याला स्वर प्राप्त झाला. बाबूराव बागुलांनी दलित साहित्याचे क्रांतिविज्ञान मांडून भक्कम वैचारिक भूमिका प्राप्त करून दिली.

दलित साहित्याची निर्मिती आणि दलित साहित्याची चळवळ सर्वदूर पसरत गेली. शब्दांना सुरुंगाचे स्वरूप प्राप्त झाले. प्रस्थापितांनी पहिल्यांदा नापसंपतीदर्शक स्वर प्रकट करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर या नव्या क्रांतिकारी साहित्याचा स्वीकार त्यांना अगतिकतेने का असेना, पण करावा लागला. मराठीचे वाङ्‌मयीन पर्यावरण ढवळून निघाले. या साऱ्याचा परिणाम असा झाला की- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहूमहाराज यांच्या विचारांना व्यापक अधोरेखन मिळाले. फुले-शाहू-आंबेडकर ही विचारप्रणाली केंद्रवर्ती आली. यातून नव्या उजेडात महात्मा फुले व त्यांची सत्यशोधकीय परंपरा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचे परिशीलन सुरू झाले. दलित साहित्याच्या चळवळीने सर्वांनाच खडबडून जागे केले. यातूनच पुढे ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी, ख्रिस्ती, मुस्लिम, स्त्रीवादी अशा विविध साहित्य चळवळी उभ्या राहिल्या. या साऱ्या चळवळी आपापले वैचारिक अधिष्ठान शोधू लागल्या. त्यामुळे महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, मार्क्स यांच्या विचारांचे नव्याने संशोधन सुरू झाले. वेगवेगळे ग्रंथ निर्माण होऊ लागले. मराठी वाङ्‌मयीन पर्यावरणच बदलून गेले. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ग्रंथांचे नव्याने प्रकाशन सुरू झाले. कोणी सत्यशोधकीय पत्रकारिता शोधायला सुरुवात केली, तर कोणी मुंबईतील नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान, तमिळ लोकांचे योगदान असे शोध सुरू केले. जाति-अंताची चळवळ नव्याने आकार घेऊ लागली. या साऱ्याचे पडसाद साहित्यात आपोआप पडू लागले. या वेळी राजा ढाले, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम आदी विचारवंतांनी धारदार मांडणी करायला सुरुवात केली. बाबूराव बागुलांनी या मांडणीला सैद्धान्तिक चौकट देण्याचा प्रयत्न केला. अनेक विचारवंत हा वैचारिक प्रवाह समृद्ध करण्यात अग्रेसर राहिले. दलित साहित्याने स्वतःचा असा दणकट अवकाश प्रस्थापित केला. महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय पर्यावरणच बदलून गेले.

असे असले तरी दलित साहित्याच्या निर्मिती कालखंडापूर्वीच अण्णा भाऊ साठे यांनी बक्कळ काम करून ठेवले होते. त्यांची नोंद या साऱ्यातही फारशी घेतली गेली असे नोंदविण्यास फारसे पुरावे सकृत्‌दर्शनी सापडत नाहीत. एखादा परिच्छेद, एखादी ओळ अण्णा भाऊंच्या वाट्याला येत गेली. पण त्यांच्या साहित्याची, पोवाड्यांची, वगनाट्यांची दखल तितक्या गांभीर्याने घेतली गेली नाही. अण्णा भाऊंनी दलित साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केलेल्या भाषणाची चर्चाही अलीकडच्या काळात सुरू झालेली आहे. हे वर्तमान तपासले पाहिजे. यातून नव्याच गोष्टी आपल्यासमोर येतात.

- 4 –

मराठी साहित्यात काही लेखकांची भक्कम कामगिरी असूनही त्यांच्या लेखनाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. अशा लेखकांचा स्वतःचा वाचकवर्ग आहे. त्यांनी संख्येने विपुल निर्मितीही केलेली आहे. पण त्यांच्या साहित्याचा विचार तथाकथित समीक्षक मात्र पुरेशा गांभीर्याने करत नाहीत. यामध्ये अण्णा भाऊ साठे, भाऊ पाध्ये, महादेव मोरे, वसंत नरहर फेणे, मनोहर शहाणे, मनोहर तल्हार अशी बरीच नामावली देता येईल. या लेखकांच्या वाट्याला मराठी समीक्षा जात नाही. यातील महादेव मोरे, मनोहर मल्हार, मनोहर शहाणे हे तत्कालीन प्रतिष्ठित वाङ्‌मयीन केंद्राच्या बाहेर होते. मोरे निपाणी, तर शहाणे नाशिक, तल्हार नागपूर. पण हे तिघेही निष्ठेने लेखन करत होते. पण यांच्या लेखनाची दखल घेतली पाहिजे, असे कोणास वाटले असे दिसत नाही. त्यांच्या लेखनावर समीक्षा सोडाच, चर्चाही करावीशी वाटली नाही. त्याचे एक सोपे कारण- ते तथाकथित महाराष्ट्रात राहत नव्हते. तो तथाकथित महाराष्ट्र पुणे-मुंबईपुरताच मर्यादित होता. तेथे असणे म्हणजेच लेखक असणे, अशी रूढ धारणा होती. त्यामुळे शिवाजी सावंत, शंकर पाटील, आनंद यादव असे किती तरी लेखक आपले घर, गाव सोडून पुण्यात येऊन स्थायिक झाले. खानोलकरांनी मुंबई गाठली.

पण अण्णा भाऊ साठे, भाऊ पाध्ये हे दोन्ही लेखक मुंबईतच वास्तव्यास होते. एक जन्माने मुंबईकर होते, तर दुसऱ्यांना भूक मुंबईला घेऊन आली होती. या दोन्ही लेखकांचा वावर त्या वेळच्या प्रतिष्ठित छावण्यांत होता. भाऊ पाध्ये काही काळ समाजवाद्यांच्या कळपात होते. अनियतकालिकांची चळवळ चालविणाऱ्यांच्यातही त्यांची ऊठबस होती. अण्णा भाऊ तर कम्युनिस्ट पक्षाचे कार्डहोल्डर होते. डांगेंनी त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना दिली होती. बाबूराव बागुल, नारायण सुर्वे यांच्यासोबत ऊठबस होती. असे असताना दोघांच्याही साहित्याला फारशा गांभीर्याने घेतले गेले नाही. त्यांच्या वाट्याला फारसे चांगले प्रकाशक आले नाहीत. भाऊ पाध्ये यांनी तर कोणालाही पुस्तके छापायला दिलेली दिसतात. ‘ऑपरेशन छक्का’ हे नाटक तर स्वतःच प्रकाशित केले. अण्णा भाऊंचे प्रकाशक तर महाराष्ट्रभर विखुरलेले. या दोघांच्याही पुस्तकांची मुखपृष्ठे भडक, बटबटीत. सामान्य वाचकास भुरळ घालणारी. कदाचित त्यामुळेही त्यांच्या साहित्याची गणना रंजक साहित्यात केली गेली असावी.

अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ला राज्य पुरस्कार मिळाला. भाऊंच्याही कादंबरीस राज्य पुरस्कार मिळाला. पण साहित्याच्या परंपरेत मात्र त्यांना बेदखल केले गेले. असे का व्हावे? मला सकृत्‌दर्शनी जाणवणारे कारण म्हणजे, या लेखकांच्या साहित्याचा विशाल व्यापक पट आणि सामान्य माणसाला आस्थेच्या केंद्रवर्ती आणण्याची आकांक्षा. भाऊ पाध्ये यांनी आपल्या साहित्यात मुंबई महानगरीचा उभा-आडवा छेद घेतला. मुंबईतील वेश्यावस्ती, गुन्हेगारी विश्व, सामान्य माणसाचा जीवघेणा संघर्ष, रिकामटेकड्या वास्तूंचे विश्व, जागेची समस्या, कामगारवस्ती, कामगार चळवळी, उच्चभ्रू समाजाचे जगणे, तेथील अनैतिक व्यवहार हे पाध्ये यांनी सूक्ष्म तपशिलासह आपल्या कथा, कादंबऱ्यातून चित्रीत केले. अण्णा भाऊंनी मुंबईतील झोपडपट्टी तर साहित्यात आणलीच, पण बरोबरच गावगाडा आतला आणि बाहेरचा आपल्या कथा-कादंबरीतून दमदारपणे चित्रित केला. यात सामान्य शेतकरी जमीनदार, आलुतेदार, बलुतेदार, गावाबाहेरचे दलित, शोषित, भटके, फिरस्ते या साऱ्यांना आपल्या आस्थेच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या वेदनांना शब्द दिला. या दोन्ही लेखकांनी स्त्रियांच्या कमालीच्या शोषित जगण्याला कथा, कादंबऱ्यांतून मोकळा अवसर प्राप्त करून दिला. स्त्रियांच्या शोषणाच्या विविध परी सूक्ष्म तपशिलांसह चित्रित केल्या. हे दोन्ही लेखक विशिष्ट एका जातीविषयी, वर्गाविषयी, धर्माविषयी न लिहिता ‘माणसा’विषयी लिहीत गेले. ते स्वतःच जात, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे पोहोचले होते. त्यामुळेच त्यांना आपल्या साहित्यात माणसांचे गाणे गाता आले. ते माणसांचे समग्र जगणे साहित्यातून मांडत होते, हीच बहुतेक समीक्षकांची अडचण असावी. त्यामुळेच त्यांच्या साहित्यावर त्यांना लिहिता आले नसावे.

मुंबई-पुणे म्हणजे महाराष्ट्र- ही ज्यांची धारणा होती, त्यांना गावगाडा आतला आणि बाहेरचा, स्त्रीविश्व याची जाणीव असण्याची शक्यताच कमी. मध्यमवर्गात वावरणाऱ्यांना वालपाखाडी, वारणेचे खोरे कसे काय आकळणार? त्यामुळे त्यांनी या लेखकांना अनुल्लेखानेच बाजूस सारले. मराठी साहित्यात आजवर समीक्षाक्षेत्रात जात पाहून समीक्षा करण्याचे चुकीचे पर्यावरण स्थिरस्थावर झाले होते. ज्या जातीचा लेखक, त्या जातीचाच समीक्षक. तोच त्याची तळी उचलून धरणार, त्याचे वाङ्‌मयीन माहात्म्य अधोरखित करणार- असा पायंडा प्रस्थापित होता. जातीने जातीच्या लेखकाचा गौरव करणे यातच ही समीक्षा धन्यता मानत होती. अशा वेळी संपूर्ण मानवजात आस्थेच्या कवेत घेणाऱ्या, व्यापक सहानुभाव आणि समूहभावाने आस्थापूर्वक लेखन करणाऱ्या लेखकाला समीक्षक भेटणार कुठून? सगळे जातीच्या खुराड्यात बंदिस्त झालेले.

भालचंद्र नेमाडे यांनी   1980 नंतर मराठी कादंबरीवरील निबंधात भाऊ पाध्ये यांचा उल्लेख महत्त्वाचा कादंबरीकार असा केला आणि पाध्ये यांच्या साहित्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या कथा-कादंबरीतील चित्रविश्वाबाबत गांभीर्याने लिहिले-बोलले जाऊ लागले. अण्णा भाऊंना मात्र त्यांच्या जातीने आपला ‘नायक’ म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर चर्चा सुरू झाली. ज्या सगळ्यातून अण्णा भाऊ बाहेर पडले होते, तेच त्यांच्या मृत्यूनंतर वाट्यास आले. त्यामुळे त्यांच्या आकलनाला पुन्हा मर्यादा प्राप्त होतात का, असे संशयाचे वातावरण निर्माण झाले.

- 5 –

अण्णा भाऊ साठे समग्र मानवी जीवन आपल्या आस्थेच्या कवेत घेऊ शकले, याचे कारण त्यांचे गावगाड्याबाहेरचे जन्मणे आणि कामगार म्हणून मुंबईत लढणे. त्यांनी आतला आणि बाहेरचा गावगाडा साक्षात जगून घेतलेला होता. तिथल्या जातीय उतरंडीत त्यांनाही भरडून जावे लागले होते. मुंबईत तर झोपडपट्टीतल्या नरक-यातना वाट्यास आल्या होत्या. गावात गावाच्या बाहेर, तर मुंबईत मुंबईच्या बाहेर. दोन्ही ठिकाणची जगण्याची लढाई वेगवेगळ्या पातळीवरची. हे सर्व जगणे अंगावर घेत असताना शोषणमुक्तीच्या विचारांना नवी दृष्टी प्राप्त झाली. नवी सजगता निर्माण झाली. अख्खी मुंबई महाराष्ट्रभरच्या खेड्यापाड्यांतील गरीब मजुरांनी उभी केलेली. त्यांचे रक्तच मुंबईच्या धमन्यांतून वाहत असलेले. अशा मुंबईत अण्णा भाऊ कामगार चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आयुष्यभर वावरले. त्यांच्यातील अस्वस्थ कार्यकर्ता त्यांना सततच कार्यप्रवण करत गेला. अशातच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू झाले आणि त्यांच्या शाहिरीला बहर आला. मुळातच शाहिरी रक्तात भिनलेली. बालपणातल्या तमाशाने व्यापलेली. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्राला सळसळत ठेवण्यात अण्णा भाऊंच्या शब्दांनी मोलाचे काम केले. त्यांनी चळवळीला आवाज दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णा भाऊंच्या योगदानाचा विचार तरी नीटपणे कुठे केला गेला? त्यांची वगनाट्ये, पोवाडे, छक्कड आणि चळवळीची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी पोवाडा हा काव्यप्रकार कसा वैश्विक केला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पोवाडे आणि अण्णा भाऊंचे पोवाडे यांच्यातील रचनाबंध तपासला, तर एखादा प्रतिभावंत आपल्या निर्मितीने पारंपरिक रचनाबंध कसा उन्नत करतो याचे भरीव पुरावे मिळतील. पोवाडा फक्त वीररसपूर्ण रचना नसून, ती परिवर्तन घडविणारी लवचिक आणि तीव्र लाघवी रचना कशी आहे, याचा प्रत्यय अण्णा भाऊंचे पोवाडे वाचताना येतो.

अण्णा भाऊ हे मौखिक परंपरेला घट्ट जोडलेले अद्वितीय कलावंत होते. त्यांची संपूर्ण घडणच या मौखिक परंपरेने केलेली होती. त्यामुळे त्यांच्या कथेत, कादंबरीत, वगनाट्यात, पोवाड्यात या मौखिक परंपरेतील रचनाबंधाच्या भरभक्कम तंत्रखुणा वावरताना दिसतात. मौखिक परंपरा आणि अण्णा भाऊंचे साहित्य असाही त्यांच्या साहित्याचा अभ्यास करायला हवा. पण असे अभ्यास होताना दिसत नाहीत. उलट, अण्णा भाऊंची विभूतिपूजा मांडणारे अभ्यास होताना दिसत आहेत. हे सगळ्यात घातक आहे. यापूर्वी अण्णा भाऊंच्या साहित्याची परंपरागत अभ्यासकांनी उपेक्षा केली, त्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व समाजासमोर नीट आले नाही. आता विभूतिपूजक अभ्यासक त्यांच्या साहित्याला अतिगौरवाने आणि दंतकथांनी मारतील, अशी भीती वाटायला लागलीय. एकूण, अण्णा भाऊंच्या पाठीमागचं उपेक्षेचं शुक्लकाष्ठ नजीक तर संपेल असं वाटत नाही. अशा अर्थानं त्यांना ‘सर्वश्रेष्ठ शापित कलावंत’ असे म्हणावे लागेल! 

(कथा, कादंबरी व ललित लेखन हे तिन्ही प्रकार मोठ्या ताकदीने हाताळणारे मराठीतील आघाडीचे साहित्यिक म्हणून राजन गवस यांना ओळखले जाते, ते अहमदनगर येथे झालेल्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर त्यांनी पीएच.डी. केली आहे.) 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात