डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘चांडाळ’ म्हणजे फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला फासावर चढवणारा माणूस. माणसांना फासावर देणारा चांडाळ हाच या कथेचं मुख्य पात्र आहे. आपल्या जातीचा आणि व्यवसायाचा कंटाळा आलेला चांडाळ या कथेत मी उतरवला आहे. चांडाळ असल्यामुळं त्याला समाजात प्रतिष्ठा नाही न्‌ व्यवसाय पोट नीट भरू शकेल इतक्या लायकीचा नाही. या दोन्ही कारणांनी त्याला चांडाळकीतनं सुटायची, मोकळं व्हायची इच्छा आहे. त्याला त्यातून सुटता येत नाही; पण तो ठरवतो, की आपण अडकलो असलो या चांडाळकीत, तरी आपली पुढची पिढी यात  ठेवायची नाही. मुलाला शिकवायचं न्‌ त्याला चांडाळकी करू द्यायची नाही, असा कथेचा मुख्य विषय आहे.

‘चांडाळ’ ही माझी मला स्वत:ला महत्त्वाची वाटलेली कथा. साधारण 1983-84च्या काळातच मी ती लिहिली. लेखकाला एखादी कथा आपण कुठल्या अवस्थेत बसून लिहिली, हे ती कथा आठवताना आठवत असतं. मला आठवतं, ‘चांडाळ’ ही कथा मी पोटावर पालथं झोपून लिहिल्याचं. केडगाव नावाच्या दौंड तालुका, जिल्हा पुणेतल्या गावात असताना मी ही कथा लिहिली. त्याआधी ओतूरला असताना मी रंगाऱ्याचं काम करायचो. त्या वेळी आमच्या आईनं कुठल्या हौसेनं कुणास ठाऊक, पत्र्यांच घडी घालता येणारं एक मेज आणि तशीच घडी घालता येणारी एक खुर्ची घेतली होती. आम्ही खरं तर जमिनीवर बसणारी माणसं. सगळा कारभार जमिनीवरचाच. खाणंपिणं, उठणंबसणं, झोपणं निजणं सगळं जमिनीवर. घरात एखादी खाट. ती फक्त भरपूर आणि पायात आडवा येणारा पसारा साठवून ठेवायला किंवा बिछाने रचून ठेवायला. किंवा आलाच कधी एखादा पाहुणा तर त्याला झोपायला मानाची जागा द्यायला. अशा अवस्थेत आईनं ती मेज-खुर्ची का घेतली हा प्रश्नच. त्या वस्तूंचा आमच्या घराला काहीच उपयोग नव्हता. आईचे वडील साहेब. पण तेही कधी खुर्चीत बसलेत, असं दृश्य मला आठवत नाही. त्यांचंही सगळं उठणंबसणं गावरान जमिनीवर. ती मेज खुर्ची उगीचच जागा अडवून पडलेली. ओतूरात त्या मेजाचा मी माझ्या रंगारी कामासाठी फलक, पाट्या चितारण्यासाठी वापर केला न्‌ रंगाच्या फराट्यांनी त्या मेजाची वाट लावली. कधी कधी ओतूरच्या घराच्या साातही ती खुर्ची टाकून तिच्यात मी बसायचो लिहायला, वाचायला. पण थोड्याच वेळात अवघडून आपली कायमची भुई धरायचो. भिंतीला टेकून बसूनच बुडावर घसरतच लिहायवाचायला खरी मजा यायची. खरं तर मेज-खुर्ची घेण्याची आमची ऐपत नव्हती न्‌ त्या चाहतीचे लोकही नव्हते घरात. पण आई कधीकधी आमच्या घराला न साजेसे प्रयोग करायची. त्याला विशेष कारण नसायचं. त्या काळी मेज-खुर्च्यासारखं लोखंडी वस्तू घेऊन मद्रासकडचे लोक यायचे. ते दिवसाला दोन रुपये अशा हफ्त्यावर तशा वस्तू विकायचे. आईनं तशा पद्धतीनं मामेज-खुर्चीचं जुगाड केलं. पण रोज दोन रुपये देण्याची ऐपत तिनं कुठनं मिळविली, हे मला ज्ञात नाही. (आई स्वत: एक एक अक्षर लावून बाळबोध भाषेतलं काहीतरी वाचणारी बाई. घरातले बाकीचे समदे पदव्या बिदव्या धारण केलेले लोक. पण त्यातल्या कुणाला दैनिक वर्तमानपत्र घरात घेण्याची अक्कल नाही. आमच्या अल्पाक्षरी आईनं मात्र आम्ही पानशेतला असताना घरात रोजचं वर्तमानपत्र घेण्याची पद्धत सुरू केली. तोही प्रयोग तिनं कुठल्या हौसेखातर केला न्‌ पैशांची फारशी कुवत नसताना काकेला, तिचं तिलाच माहीत.)

ओतूरवरनं आम्ही केडगावला आलो. एका ख्रिश्चन माणसाच्या घरात भाडेकरू म्हणून राहिलो. अतिशय छटाकभर दोन खोल्या. आत स्वैपाकघर, बाहेरच्या खोलीत खाट आणि पसारा. दाराशीपाण्याचा हापसा न्‌ घरात किंवा बाहेर खाली बसावं अशी धडकीजागाच नाही. ओतूरला असताना कुठंही बसून लिहा अशी मुबलक जमीन. मी तर कित्येकदा वह्या-पुस्तकं घेऊन दूरदूरच्या कुणाच्या ही शेतवावरात जाऊन झाडांना टेकून किंवा केळीच्या बागांमध्ये बसून लिहायचो-वाचायचो. केडगावला ती नजाकत नाही. धूळभरलं गाव. सततची एक उपरीउदासी आणि मरगळ. सांस्कृतिक उल्हास असा काहीच नाही. मुळात कुठं बसून लिहावं, निवांत व्हावं अशी शीतळ जागाच नाही; घरातही आणि बाहेरही. मग मी तिथं घराबाहेर जंगली मेंदीचं कुंपण होते, त्यात दोन्ही पाय खुपसून, खुर्चीवर बसून लिहायचो. मला मेजावरकधीच लिहिता आलं नाही. कुठंही, अगदी खुर्चीत बसलो तरी कागदं मला मांडीवरच लागतात. ही माझी लिहिण्याची गावरान किंवा शाळकरी सवय कधीच गेली नाही. मेजावरचं ‘साहेबी’ मला कधी लिहिता आलं नाही. कधी कधी तर केडगावच्या शेजारी बोरमलनाथाच्या टेकड्या होत्या , त्यांच्यावर मोठमोठी दगडंच दगडं होती, सगळं जणू दगडांचं रान, तर त्या रानात घुसून कुठल्या तरी दगडावर बसून निर्जनतेत संध्याकाळी लिहीत बसायचो.

पण खुर्चीत बसून लिहायचा कंटाळा यायचा. बूड अस्वस्थ व्हायचं न्‌ त्याला मुंग्या यायच्या. त्यामुळं काही वेळ खुर्चीचं समाधान म्हणून तिच्यावर लिहीत बसलो तरी, अल्पवेळातच बेचैनपणे उठायचो आणि बसायला संयुक्तिक जागाच न सापडल्या नं सरळ खाटेवरच्या पसाऱ्यात स्वत:ला झोकून देऊन पालथा पडून, पालथ्यानंच वाकडंतिकडं होत, कधी झेंड्यासारखे हवेत पाय उभारून, हातांवर तणाटे देऊन लिहीत राहायचो. ‘चांडाळ’ची माझी आठवण अशी पालथं पडून लिहिल्याची आहे.

आता लक्षात येतं, पालथं पडून वाचायचं-लिहायचं पण एक वय असतं. आणि ते बहुधा वयात येण्याचंच वय असतं. त्या नंतरच्या वयात सहसा पालथं पडून लिहिणं-वाचणं केलं जात नाही. किमान मी तरी नंतर कधी पालथ्यानं लिहिणं-वाचणं केलं नाही.

‘चांडाळ’ ही मला वाटतं, त्या विषयावरची मराठीतली एकमेव कथा असावी. मी तरी चांडाळांच्या विषयी मराठीत आणि मराठी माणसापर्यंत येणाऱ्या इतर भारतीय भाषांमध्ये कथा, कादंबरी असं काही वाचलेलं नाही.

ते माझं भाबडं वय होतं. (अर्थात आज ते प्रगल्भ झालंय, असं अजिबात नाही.) त्या वयात दिसेल त्या विषयावर, डोक्यात येणाऱ्या कुठल्याही वाक्यावर किंवा कल्पनेवर काहीतरी लिहावं अशी खुमखुमी असायची. आपण लेखणी नाही चालवली तर हा विषय, ही कल्पना किंवा डोक्यातलं वाक्य वाया जाईल असं वाटायचं. आणि प्रत्येक कल्पनेवर कच्चंपक्कं काहीतरी लिहिण्याची धडपड व्हायचीच. आणि माझा तो काळ असा की,डोक्यात आलेल्या कल्पनेवर चर्चा करायला, खल करायला भोवती कुणीच नाही. तेव्हाच्या केडगावात लिहिण्या-वाचण्याची परंपरा नाही. साधं वाचनालयसुद्धा नाही गावाला. (नंतर मी दौंडच्या नगरपालिकेचं वाचनालय लावलं. तिथं मी रेल्वेनं येऊ न-जाऊन पुस्तकं बदलायचो.) घरात माझ्या लिहिण्या-वाचण्याबद्दल आस्था नाही. उगी वेळ वाया घालवतो अशी घरच्यांची धारणा. 81 साली माझी पहिली कविता नगरच्या ‘आदिम’च्या अंकात छापून आली होती, तर लेखनाचा किंचित अनुभव असलेल्या वडिलांनी तो अंक- मी कौतुकानं दाखवायला गेलो असताना- भिरकावून दिला न्‌ सुनावलं, ‘असले पोचट उद्योग करण्यापेक्षा काहीतरी कमवायचं बघा...’ त्या नंतर मी माझ्या लिहिणं या विषयापासून वडील पूर्णपणे आणि कायमचे टाळलेच. आईला माझ्या लिहिण्यात काही गम्य नव्हतंच. पण त्यातल्या त्यात तिचं समाधान एवढंच की, पोरगं उंडारक्या करण्यापरास किंवा बाहेरची खेंगटी घरी आणण्यापरास कोपरा धरून काहीतरी लिहीत बसतंय,  तेच बरं... या कोपरा धरून राहण्यामुळं मी त्या माऊलीच्या नजरेत नेहमीच सान ठरलो. भावंडं लहान, त्यांच्याशी काम बोलणार लिहिण्यावाचण्याचं? (तरीही कधी कधी मी नेटानं लहान्या बहिणींना जोरकसपणे माझ्या कविता वाचून दाखवायचोच. काही कळो न कळो, त्याही माऊल्या मुकाट ऐकायच्या. त्यांच्या सहनशीलतेनं आज मी चकित होतो.) बाहेर सतत भंकस आणि भुक्कड गप्पा मारणाऱ्या पोरांच्या टोळ्या. त्यांना मी लिहितोबिहितो हे कळण्याच्या बाहेरचं न्‌ त्याच्याशी त्यांना घेणंही नाही.

अशा कोरड्या आणि भकास वातावरणात मला ‘चांडाळ’ ही कथा लिहावीशी वाटली. आज मी चांडाळ पुन्हा वाचतो ते व्हायला त्या कोरड्या आणि भकास वातावरणाचं सावट त्या कथेवर पडलंय असं (कदाचित उगाचंच) वाटत राहतं. किंबहुना आज तर मला असंही वाटतं की, ती कथा मला लिहायला नीट जमलेली नाही. तिच्यात एक तुटकपणा आहे;  काही बालिशपणासुद्धा आहे आणि कथा लिहिण्याचा उरकलेपणासुद्धा आहे. मला असंही वाटतं, की आज जर मी ती कथा लिहिली असती, तर अधिक सकस, अधिक संदर्भांसहित, अधिक रसाळपणे आणि प्रवाहीपणे लिहिली असती. तिच्यात कथात्यकतेची अधिक गंमत आणली असती. पण आता तीच कथा पुन्हा लिहिण्याचा जोम नाही आणि असंही वाटतं, की ती कथा माझ्या त्या काळाची खूण म्हणून आहे तशीच राहू द्यावी. तिच्यात जो काही कच्चेपक्केपणा असेल तो एक लेखक म्हणून आपण काम होतो, कसे होतो हे जाणून घेण्यासाठी तरी तिच्यात काही बदल करू नये अन्‌ ती नव्यानं लिहू नये.

‘चांडाळ’ म्हणजे फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला फासावर चढवणारा माणूस. उत्तर भारतात प्रेतं जाळणारांनाही चांडाळ म्हणतात. भारतातल्या सर्व प्रकारच्या जुन्या वाङ्‌मयात पात्र म्हणून चांडाळ हमखास आढळतो. मृत्यूशी संबंधित खतरनाक माणूस म्हणूनच त्याचा उल्लेख येतो न्‌ बहुधा तो खलनायक असतो. चांडाळ ही शिवीसुद्धा झालेली आहे. आणि आपल्या भारतीय घाण जातव्यवस्थेत ती स्पष्टपणे जात सुद्धा झालेली आहे. महाराष्ट्रात मांग जातीतील लोकांकडं फाशी देण्याचं काम सोपवून हळूहळू त्यांची चांडाळ नावाची पोटजात तयार करण्यात आली. (देशातल्या इतर राज्यांमध्ये कुठल्या कुठल्या जाती चांडाळकी करतात, त्यांची मादी केली पाहिजे.)

माणसांना फासावर देणारा चांडाळ हाच या कथेचं मुख्य पात्र आहे. आपल्या जातीचा आणि व्यवसायाचा कंटाळा आलेला चांडाळ याकथेत मी उतरवला आहे. चांडाळ असल्यामुळं त्याला समाजात प्रतिष्ठा नाही न्‌ व्यवसाय पोट नीट भरू शकेल इतक्या लायकीचा नाही. या दोन्ही कारणांनी त्याला चांडाळकीतनं सुटायची, मोकळं व्हायची इच्छा आहे. त्याला त्यातून सुटता येत नाही. पण तो ठरवतो, की आपण अडकलो असलो या चांडाळकीत, तरी आपली पुढची पिढी यात  ठेवायची नाही. मुलाला शिकवायचं न्‌ त्याला चांडाळकी करू द्यायची नाही, असा कथेचा मुख्य विषय आहे.

माझ्या त्या काळात चांडाळ, त्याचा व्यवसाय, व्यवसायाचे बारकावे मिळवणं हे कठीण काम होतं. मुळात मराठी वाङ्‌मयात‘चांडाळ’ या विषयाची फारशी माहितीच उपलब्ध नाही. तेव्हा तर मला फार पुस्तकंही मिळत नव्हती. खिशात पैसे असले तर वर्तमानपत्रं, नियतकालिकं घेतली जायची. त्यात ज्ञान जिज्ञासा भागेल असा मजकूर कमी आणि वर्तमान राजकारण, क्रिकेट, गुन्हेगारी, चित्रपटसृष्टीच्या मजकुराची भरताड. त्यावेळच्या वर्तमानपत्रात कुठल्या तरी गुन्हेगाराला फाशी देणार अशी बातमी आली न्‌ अकलेचे तारे चमचम करीत उठले. फाशी देणारा माणूस या विषयावर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे असं वाटून गेलं न्‌ मी चांडाळाची माहिती गोळा करण्याच्या मागं लागलो. (त्यावेळी आपण प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊनच लिहिली पाहिजे असंही वाटायचं न्‌ एकदा माझ्या मनात आलं, की फाशी जाणारा जो माणूस आहे, त्याच्या वर आपण स्वत: अनुभव घेऊन गोष्ट लिहिली पाहिजे. प्रत्यक्ष फासावर जाताना मनात काम येतं, शरीराचं काम होतं हे साक्षात अनुभवता आलं पाहिजे, तेच लिहिता आलं पाहिजे. मग लक्षात आलं, की आपण स्वत:फासावर गेलो तर मागं त्याची गोष्ट लिहायला कोण जिवंत राहणार?) पण चांडाळाची माहिती मिळण्याचे स्रोत अतिशय थिटे, अपुरे आणि बऱ्याचदा चुकीची माहिती देणारेच. सिनेमा, नाटकात फाशी गेट न्यायालय वगैरे गोष्टी पाहिलेल्या, पण त्यांच्यातलं काही खरं नसतं, तर फिल्मी असतं ही जाणीव भारतीय  सिनेमांनी दांडगी वाढवलेली, त्यामुळं त्यांची दृश्मंविश्वासार्ह नाहीत!

मग अक्षरश: चुकीच्या , बरोबर अशा कोणत्या ही भेटणाऱ्या माणसाशी मी चांडाळ, फास देणं, फाशी गेट वगैरे मुद्यांवर सतत बोलत राहिलो. अर्थात त्यात तज्ज्ञ कुणीच नव्हतं. सगळा अडाण्यांचाच बाजार. भोवतीची माझ्या सारखीच सामान्य ज्ञान, माहितीबद्दलची सामान्य माणसं. प्रत्यक्ष एखाद्या चांडाळाला भेटावं तर तो दूरदूरपर्यंत कुठंच उपलब्ध नाही. पोतराजकी घरात असलेला एक मांग मित्र होता जुना, पानशेतचा त्याला आणि लहानपणापासूनचे काही मांग सवंगडी होते, घरोब्याचे लोक होते, त्यांना विचारलं चांडाळांबद्दल. तर ते किळसेनं म्हणाले, ‘आमचा त्यांचा संबंध नाही. आमचं-त्यांचं जुळत नाही,  आम्ही त्यांच्या घरचं पाणीबी पीत नाही.’ हा धागा नंतर माझ्या कथेत आला.

गंमत म्हणजे फाशीशी फारसा संबंध नसलेल्या असंख्य माणसांनी मला त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार, भ्रमानुसार पण फार अधिकारानं, जणू तेच त्या विषमाचे तज्ज्ञ असल्याच्या थाटात फाशी जाताना होणारी माणसाची तडफड, त्याची जीभ आणि डोळे बाहेर येणं, फासाचा दोर, त्याच्या गाठी, त्या दोराची मशागत, फाशी देण्याची प्रत्यक्ष जागा, तुरुंग, फाशीचा खटका वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्याच गोष्टी काहीशा साधक-बाधक, पण बऱ्याचशा भंगड आणि कपोल कल्पित होत्या. पण या तमाम गोष्टींमधूनच चाळूनगाळून माझी फाशीबद्दलची संकल्पना तयार होत गेली. पण त्यात चांडाळाबद्दलची माहिती कुणाजवळच नव्हती. चांडाळाचं आर्थिक दारिद्रय, मांगांचे व्यवसाय, चांडाळाचा माणूसपणा या गोष्टींसाठी मला कुठंही जावं लागलं नाही. माणूस आणि त्याची गरिबी, त्याची आपण प्रतिष्ठित होण्याची न्‌ मोठं होण्याची इच्छा, शिकण्यानं आपली परिस्थिती बदलेल अशी आस, जाती-जातींचा एकमेकांशी हिणकसपणा या गोष्टी मला भोवतीच्या वातावरणातून आपोआपच ज्ञात होत्या. त्यासाठी नवे शोध घेण्याची गरज नव्हती. त्या गोष्टी तेवढ्याच आपोआप कथेत आल्या. पण पुन्हा चांडाळ, त्यांच्या प्रथा या गोष्टी उरल्याच. तर त्या बाबतीत पुन्हा लोकांच्या तोंडाळ कथाच कामी आल्या. आश्चर्मकारकपणे, शाळेला बुट्‌ट्या मारूनमारून आणि नंतर शाळा कायमची सोडून दिलेली माझी आई मदतीला आली. तिनं तिच्या लहानपणी, तिच्या माहेरी, रस्त्यावरून येता-जाता एका माणसाला सरकारी पद्धतीनं फाशी देताना पाहिलेलं होतं. तेव्हा तिनं चांडाळाबद्दल काही लोककथा ऐकलेल्या होत्या न्‌ त्या तिनं मला अतिशय पद्धतशीरपणे सांगितल्या. (अखेर ती लेखकाचीच आई!) ती फारच अद्‌भुत माहिती होती. त्यात चांडाळ फास देण्याआधी फासावर जाणाऱ्या माणसाची माफी मागतो असा महत्त्वाचा संदर्भ होता.

अशा सगळ्या मातामातीतून माझी ‘चांडाळ’ ही कथा उभी राहिली आणि माझा दावा असा आहे, की ही कथा चांडाळाच्या संदर्भांच्या बाबतीत अगदी अचूक आहे. ती कथा एकदाच लिहिली न्‌ नंतर मी तिच्यात दुरुस्ती केली नाही. ती त्या वेळी 84-85 च्या कुठल्या तरी वर्षीच्या ‘रसिक’च्या दिवाळी अंकातछापून आली. नंतरच्या आयुष्यात मी चांडाळ, फाशी देणं यागोष्टींची माहिती मिळविली. ती माझ्या कथेशी तंतोतंत जुळणारी होती. लोकांची तोंडं आणि माझं डोक्यांच्या संकरातून ही ‘मेंदूगढंत’ कथा जन्माला आली. तिनं मला नेहमीच मराठी साहित्यात वेगळी कथा, किमान वेगळ्या विषयावरची कथा लिहिल्याचं समाधान दिलं.

मराठी साहित्याचा परिसर अतिशय बारका आहे. त्यात एखादी साहित्य कृती गाजणं हे आणखीनच बारकं असतं. तशा माझ्या काही गोष्टी बारक्या पद्धतीनं गाजल्याचा अनुभव मी घेतला. पण ‘चांडाळ’ मात्र तेवढ्या बारक्या पद्धतीनं सुद्धा अजिबात गाजली नाही. तिच्यावर मला कधी एकही पत्र आलं नाही. समोर भेटून बोलणारांनी सुद्धा कधी या कथेविषयी काही उरलं नाही. मला त्याची नेमकी कारणं माहीत नाहीत. कदाचित ती ‘रसिक’सारख्या अल्प छपाई- आज्ञा असलेल्या अंकात आणि मर्यादित वाचक असलेल्या अंकात छापून आल्यामुळं फार वाचली गेली नसेल. (या ‘रसिक’मध्ये मी 84-85 पासून सतत लिहितोय आणि माझ्या मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी त्यात छापून आल्यात.) कदाचित वाचणारां नाती फार महत्त्वाची वाटली नसेल. पुढं ती कथा 2006 साली निघालेल्या माझ्या ‘किंबहुना’ या कथासंग्रहातही आली; पण तिच्यावर आजपर्यंत माझ्याशी कुणीच काही बोललं नाही. पण त्याचं दु:ख मला अजिबात नाही. उलट, एक वेगळी कथा लिहिल्याचं समाधान मात्र निश्चितच आहे.

Tags: कथा मराठी साहित्य राजन खान कथेमागची कथा चांडाळ marathi literature marathi sahitya marathi story kathemagchi katha rajan khan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन खान

लेखक, कादंबरीकार 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके