डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

भारतीय माणसं कमकुवत मनोवृत्तीची असतात, ती जगाला दिपवणारं उत्तुंग कार्य करीत नाहीत, नवे महान शोध लावत नाहीत. ती वर्तानाच्या वास्तवाऐवजी सारखी इतिहासातच रमलेली असतात, ती सारखी एकमेकांवर रागावलेली असतात,. एकमेकांचे जीव खात असतात. ती सर्वांसमोर नैतिकतेचं ढोंग करतात, पण मनानं अनैतिक आणि भ्रष्ट असतात. ती स्त्री-पुरुषांत भेद करतात, जाती-धर्माचे भेद करतात, कर्तबगारीसाठी ज्ञान, साधनं यांची उसनवारी करतात, मोठं होण्यासाठी आडमार्ग आणि गैरमार्ग अवलंबतात. या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं आपण जे बालवाङ्‌य वाचतो किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकतो तेच जास्त कारणीभूत आहे.  

परवा बायको थोरल्या चिरंजीवाला माझ्यासमोर घेऊन आली न्‌ गालात हसत म्हणाली,

‘‘तुझा पोरगा काय विचारतोय बघ.’’

‘‘काय रे छबड्या?’’ मी पोराला विचारलं.

त्याचं वय दहा-अकरा. हातात लहान मुलांच्या गोष्टीचं पुस्तक.

‘‘एका शब्दाचा अर्थ सांग मला.’’ पोरगा म्हणाला, ‘‘रजस्वला म्हंजे काय?’’

मी क्षणभर अवाक. मग म्हणालो,

‘‘तुला कुठं सापडला हा शब्द?’’ ‘

‘या गोष्टीच्या पुस्तकात.’’ त्यानं हातातलं पुस्तक पुढं केलं.

‘‘हे तर लहान पोरांचं पुस्तकय ना?’’

‘‘हो. छानय. पण या शब्दाचा अर्थच मला कळत नाही. राजकन्या रजस्वला झाली असं लिहिलंय, म्हंजे काय झाली?’’

बायको पुन्हा गालात हसत म्हणाली.

‘‘पोरगा मला विचारायला आला होता. म्हटलं, तुझा बाप लेखकय, त्याला विचार.’’

मी पोराच्या हातून पुस्तक घेतलं. नाव वाचलं त्याच्यावरचं. ‘सोनेरी पंखांची राजकन्या’ असं त्यावर नाव. पुस्तकातली अक्षरं लहान पोरांसाठी म्हणून जुनाट रिवाजानुसार मोठी ठेवलेली न पुस्तकाचं माप मात्र छटाकभर.

काही वेळ मी पुस्तक पाहण्याचं नाटक करत राहिलो न्‌ पोराला काय अर्थ सांगावा याचा विचार करत राहिलो आणि मनात त्याचवेळी एक प्रश्नही उभा राहिला, लहान पोरांच्या पुस्तकात असा शब्द? तोही एवढा कठीण? सोप्या मराठीतला एखादा पर्यायी शब्द नाही का सुचला लेखकाला? आणि मुळात राजकन्या रजस्वला झाली असं बालवाचकांना सांगण्याची त्याला का गरज पडली? ती गोष्टीत लिहिण्याएवढी आवश्यक गोष्ट आहे का? प्रौढवाङ्‌यात एक वेळ ठीकय, पण बालवाङ्‌यात?

‘‘सांग ना रे बाबा.’’ पोरगा वैतागून म्हणाला.

पोराला थातुरमातुर काही तरी सांगावंसं वाटेना, म्हणून म्हणालो,

‘‘अरे, मुली वयात येतात ना त्याला रजस्वला होणं म्हणतात.’’

‘‘वयात येतात म्हंजे?’’

‘‘म्हणजे मोठ्या होतात.’’

‘‘मग मुलं रजस्वला होत नाहीत का?’’

तर बायको बेदम हसत सुटली. माझ्या हसण्याची कोंडी झाली.

पोरानं बावचळून विचारलं,

‘‘का हसतेस?’’

बायको हसतच नकारार्थी मान हलवत राहिली न्‌ स्वैपाकघरात निघून गेली.

‘‘काय झालं माईला?’’ पोरानं विचारलं.

‘‘काही तरी विनोद आठवला असेल.’’ मी म्हणालो.

‘‘मला सांग, मला सांग विनोद.’’ पोरगं टणाटणा उड्या मारत बायकोच्या मागं पळालं.

मी विचारात पडलो, अशी गोष्ट कशी समजावून सांगायची पोरांना? मग मला प्रश्न पडला, आपल्या स्वत:च्या आयुष्यात हा शब्द पहिल्यांदा नेमका कधी आडवा आला? या शब्दाचा अर्थ आपल्याला कसा माहीत झाला? कुणी सांगितला? मला आठवलं, या शब्दाचा अर्थ मी आजवरच्या आयुष्यात कधीही कुणाला विचारला नाही. आईवडिलांना नाही, इतर वडीलधाऱ्यांना नाही, गुरुजनांना नाही, कुणालाच नाही. नेमक्या कोणत्या वयात तो शब्द मला आडवा आला ते आठवत नाही, पण त्याचा अर्थ मला आपोआप कळत गेला. नेमक्या कोणत्या वयात तो अर्थ मला कळला तेही आठवत नाही, पण आजच्या माझ्या वयाला त्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे.

नंतरच्या एका निवांत क्षणी मी बायकोला विचारलं,

‘‘तुला आयुष्यात रजस्वला हा शब्द पहिल्यांदा कधी कळला?’’

‘‘आठवत नाही.’’

‘‘कुठं कळला?’’

‘‘इथंतिथं कुठं तरी वाचनातच.’’

‘‘त्याचा अर्थ कधी कळला?’’

‘‘तेही आठवत नाही. वाचतानाच आपला आपणच लावत गेले मी अर्थ.’’ वर बायको म्हणाली, ‘‘मुळात हा शब्द बोलताना कुणीही कुठेही वापरत नाही. तो फक्त पुस्तकाच आढळतो आणि जास्त करून लहान पोरांच्याच पुस्तकात आढळतो. मोठ्यांच्या पुस्तकात नेहमीच्या वापरातलेच शब्द किंवा व्याख्या आढळतात. पाळी येणं, तांब्या उपडा, कावळा शिवणं किंवा वयात येणं वगैरे. हा शब्द सर्वसामान्य नाहीच.’’

मला प्रश्न पडला, जो शब्द अजिबात सर्वसामान्य आणि नेहमीच्या वापरातला नाही तो पुस्तकात का टिकून राहिलाय? आणि गंभीर प्रश्न असा की, लहान पोरांच्या पुस्तकात का सर्रास वापरला जातो? लहान मुलांचे लेखक तो शब्द वापरून काय क्रांती घडवू इच्छितात? तो शब्द लहान पोरांच्या पुस्तकात असावाच का? आणि मुळात (पुन्हा तोच प्रश्न) लहान पोरांच्या पुस्तकात या शब्दाचा उल्लेख असावाच का?

मला मग आठवलं, मी आयुष्यभरात वाचलेलं सगळं बालवाङ्‌य आणि माझ्या लक्षात आलं की, आपलं बहुतेक उपलब्ध छापील बालवाङ्‌य हे नुस्त्या ‘रजस्वला’ या शब्दाबाबतच नाही, तर एकूणच त्याचे विषय, कथावस्तू, मांडण्या, याबाबत अतिशय निरर्थक आणि नालायक असंच आहे. बालांच्या वयाला साजेसं असं बालवाङ्‌य दुर्मीळच आहे. भारतातली राजेशाही संपून काळ झाला, पण अजूनही आपल्याकडच्या बालवाङ्‌याचा मुख्य विषय राजपुत्र, राजकन्या, राजवाडे, राजे, राण्या हाच आहे. किंवा मग राक्षस, भुतं, चमत्कार, जादू हेच आपल्या बालवाङ्‌याचे आधार आहेत. अवास्तव, अतर्क्य आणि आयुष्यात कधीही न भेटणाऱ्या, अजिबात उपयोगी न पडणाऱ्या गोष्टींचा खजिना म्हणजे आपलं बालवाङ्‌य. मुलांसाठी गोष्टी लिहायच्या तर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत, त्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे, त्यांचं मनोरंजन तर झालंच पाहिजे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही झाला पाहिजे हा खरा उद्देश.

आपले बालवाङ्‌य उचकून पहा, किती पुस्तकं या उद्देशांप्रती पोहोचतात हा प्रश्नच आहे. जगात माणसाच्या उपयोगाची एवढी आधुनिक शास्त्रं आहेत, ज्ञानविज्ञानाचे एवढे विषय आहेत, पण त्यावर बालवाङ्‌य सापडणं मुश्किलच. मी वाचलेल्या बहुतेक बालकथांचे प्रारंभ असे असायचे... एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती आणि एक नावडती... ज्या वयात लग्न, संसार या गोष्टींचा संसर्ग नसतो, त्या वयात मुलांना काय शिकवायचं? तर दोन राण्या करायच्या, त्यातली एक आवडती ठेवायची, दुसरी नावडती. द्विभार्या प्रतिबंधक कायद्याच्या काळात दोन दोन बायकांचे आणि त्यातल्या एका बायकोवर अन्याय करण्याचे संस्कार! किंवा बहुतेक गोष्टींचे शेवट असे असायचे... आणि त्यांनी लग्न करून ते सुखी झाले... त्यातही पुन्हा लग्न करण्याचा नको त्या वयातलाच धडा. माझं मत झालंय की, आपलं बालवाङ्‌य मुलांवर चांगले संस्कार करण्याऐवजी आणि त्यांचं वास्तव ज्ञान वाढवण्याऐवजी त्यांच्यावर कुसंस्कार करायला आणि त्यांची आयुष्यं कुजवायला उपयोगी पडणारं आहे. या बालवाङ्‌यामुळं मुलं सुकृत होण्याऐवजी विकृतच जास्त होतात. थोतांड, भ्रामक कविकल्पना, स्वप्नात आणि अवास्तवात जगायला मुलांना हे बालवाङ्‌य उद्युक्त करतं. चमत्कारांची अपेक्षा करायला शिकवतं. स्त्री-पुरुष नात्यांच्या बाबतीत तर एकमेकांना विकृतच करतं. कष्टावरचा विश्वास वाढवण्यापेक्षा दैवाधीन आळशी आणि कर्महीन जगण्याची शिक्षणं देतं.

बालपण हे म्हणे वास्तव कळू देण्याचं वय नसतं. मान्यय! पण म्हणून काय बालपणात त्यांना विकृत्या शिकवायच्या का? पुस्तकं वाचून आणि तोंडी गोष्टी ऐकून मोठी होणारी भारतीय माणसं आयुष्यभर स्वप्नरंजनात जगतात, आपल्या आयुष्यात चमत्कार घडतील अशी जुगारी प्रवृत्तीची होतात आणि जगण्याचा सगळा हवाला दैवावर सोडत राहतात याला कारण, मला वाटतं, आपलं हे वाचीव आणि ऐकीव, बालवाङ्‌मयच आहे. पुन्हा हे बालवाङ्‌मय माणसाची मनोवृत्ती स्त्री-पुरुष नात्याच्या बाबतीत निकोप घडवण्याऐवजी अश्लील घडवतं. स्त्री ही माणूस नाही तर उपभोग्य वस्तू आहे, स्त्रीनं मर्यादित जगायचं असतं तर पुरुषानं बेछूट जगायचं असतं, आणि अंतिमत: जगणं माणसाच्या हाती नसतं तर देव, भुतं, नशीब, चमत्कार, जादू यांच्या हाती असतं असं या गोष्टी शिकवतात. भारतीय माणसं कमकुवत मनोवृत्तीची असतात, ती जगाला दिपवणारं उत्तुंग कार्य करीत नाहीत, नवे महान शोध लावत नाहीत. ती वर्तानाच्या वास्तवाऐवजी सारखी इतिहासातच रमलेली असतात, ती सारखी एकमेकांवर रागावलेली असतात,. एकमेकांचे जीव खात असतात. ती सर्वांसमोर नैतिकतेचं ढोंग करतात, पण मनानं अनैतिक आणि भ्रष्ट असतात. ती स्त्री-पुरुषांत भेद करतात, जाती-धर्माचे भेद करतात, कर्तबगारीसाठी ज्ञान, साधनं यांची उसनवारी करतात, मोठं होण्यासाठी आडमार्ग आणि गैरमार्ग अवलंबतात.

या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं आपण जे बालवाङ्‌य वाचतो किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकतो तेच जास्त कारणीभूत आहे. आपल्याकडं चांगला, खरा, निकोप, निष्कपट, निर्मळ, दमदार, भक्कम मनाचा माणूस घडवणारं सक्षम बालवाङ्‌य नाही. आपलं सगळंच्या सगळं बालवाङ्‌य पूर्णपणे बदलल्याशिवाय भारतीय माणसाचा आणि देशाचा खरा विकास होणार नाही. तोवर देश आणि माणूस सुखी होणार नाही.

 

Tags: balkatha बालकथा goshti गोष्टी rajan khan राजन खान apala balvangamay आपलं बालवाङ्‌य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन खान

लेखक, कादंबरीकार 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात