डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सुमारे दोन वर्षांपूर्वी भाभींची पुण्यात अँजिओग्राफी झाली. त्या वेळी आवश्यक ती कागदपत्रे भरून देताना सोबत असणाऱ्या माझे नाव त्यांनी ‘स्वत:चा मुलगा’ म्हणून नोंदवले होते. माझ्यासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. भाभींचा आणि माझा स्नेह इतका गडद होता की, त्यांच्या अनेक खासगी गोष्टी त्या केवळ माझ्याशी शेअर करीत असत. अखेरच्या टप्प्यात तर अनेक छोटे-मोठे निर्णय त्या माझ्याशी सल्लामसलत करूनच घेत असत. सन 1999पासून डॉक्टर म्हणून भाभींच्या प्रत्येक आजारात सेवा करणारे डॉ.अभिजित वैद्य आणि  हमीद दलवाई यांचे भाऊ फिरोज यांची पत्नी नजमा या दोन व्यक्तीदेखील भाभींच्या हृदयात स्थान मिळवून होत्या. 

मेहरुन्निसाभाभींशी माझा परिचय अनेक वर्षांचा असला, तरी गेल्या सात-आठ वर्षांत आमची ओळख घनिष्ठ स्नेहात रूपांतरित झाली. निमित्त होते हडपसर येथे झालेल्या हमीद दलवाई पुरस्कार वितरण समारंभाचे. भाई वैद्य यांच्या सूचनेवरून मी या कार्यक्रमासाठी भाभींना सहकार्य केले, त्यानंतर आमचा स्नेह वाढत गेला.

हमीद दलवाई यांच्यासोबत संसार करताना भाभींना सुरुवातीला प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. याबाबतचे अनेक तपशील त्यांच्या आत्मचरित्रात आढळतात, परंतु त्या काळातही आणि आता त्या काळाकडे पुन्हा पाहताना भाभींनी तक्रारीचा सूर कधीही लावला नाही. उलट, ‘आपल्या आयुष्यातील ते सोनेरी दिवस होते’ अशी भावना त्या अनेकदा व्यक्त करीत.

पुरोगामित्वाची, समतेची पताका खांद्यावर घेऊन चालत राहिलेल्या हमीद दलवाई यांचे जीवन अनेक संघर्षांनी भरलेले होते, हे आपण जाणतोच. हमीद यांच्यानंतर त्यांच्याकडून बॅटन घेऊन पुढे निघालेल्या भाभींनाही मूलतत्त्ववाद्यांचा प्रखर विरोध अनेकदा सहन करावा लागला. परंतु, यत्किंचितही न डगमगता त्यांनी  आपली वाटचाल अखेरपर्यंत चालू ठेवली.

शाहबानो प्रकणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यासाठी काढलेला कोल्हापूर-नागपूर तलाक मुक्तिमोर्चा असो, चिपळूण येथील अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हमीद दलवाई यांच्या मिरजोळी येथील घरापासून चिपळूणपर्यंतच्या नियोजित ग्रंथदिंडीला (हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही समाजांतील) मूलतत्त्ववाद्यांकडून झालेला विरोध असो, रुबिना व ईला या आपल्या दोन्ही कन्यांचे झालेले आंतरधर्मीय विवाह असोत; या प्रत्येक संघर्षात, आंदोलनात भाभींचे कर्तृत्व अतिशय ठामपणे सिद्ध झाले. भाभींच्या जीवनाला चांगली शिस्त होती. त्यांची राहणी नीटनेटकी होती. स्वत:च्या खाण्याकडेही त्यांचे चांगले लक्ष होते. त्यांनी छोट्या-मोठ्या आजारांशी सामना केला, आपली प्रकृती आणि आरोग्य अखेरपर्यंत उत्तम राखण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. यापलीकडे त्यांनी आपले व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन साधेपणाने व्यतीत करण्याचा प्रयत्न केला.

अखेरच्या दहा वर्षांत अंधेरी/वसई-पुणे-चिपळूण या त्रिकोणात त्यांनी अधिक प्रवास केला. प्रत्येक वेळी साध्या  एसटीने, एशियाडने किंवा रेल्वेत दुसऱ्या वर्गाने प्रवास केला आहे. सहज शक्य असताना आणि जवळच्या अनेकांनी आग्रह धरला असतानाही त्यांनी साध्या प्रवासाचा, साध्या राहणीमानाचा आपला हट्ट सोडला नाही. अखेरच्या दोन वर्षांत तर म्हातारपणामुळे प्रकृतीला त्रास होत असतानाही त्यांनी एसटीचा प्रवास कायम ठेवला.

विश्वस्त संस्था व प्रशासन यातील मला असलेली सखोल माहिती त्यांच्या लक्षात आली; तसेच माझ्यावरील विश्वास वाढत गेला. यामुळे माझा प्रवास हमीद दलवाई इस्लामिक रीसर्च इन्स्टिट्यूटच्या सचिवपदापर्यंत झाला. इन्स्टिट्यूटच्यावतीने होणाऱ्या उपक्रमांसाठी लागणारा खर्च काटकसरीने करण्याकडे त्यांचा कटाक्ष होता.

हमीद दलवाई यांच्या पुस्तकांची प्रकाशकांकडून मिळणारी रॉयल्टी, त्यांच्या स्वत:च्या पुस्तकाची रॉयल्टी, हमीद यांना मिळालेले पुरस्कार- या साऱ्यांच्या रकमा त्यांनी प्रत्येक वेळी इन्स्टिट्यूटमध्ये देणगी म्हणून जमा केलेल्या आहेत. सामाजिक कार्यातील योगदानासाठी त्यांना स्वत:लादेखील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ‘मी भरून पावले आहे’ या त्यांच्या आत्मचरित्रालाही पुरस्कार मिळालेले आहेत. या सर्व रकमादेखील त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये जमा केल्या आहेत. यापलीकडे आपल्या पेन्शनमधून आणि बचत केलेल्या रकमेमधून दर वर्षी काही ना काही देणगी त्यांनी इन्स्टिट्यूटला दिलेली आहे.

हमीद दलवाई यांच्या मिरजोळी-चिपळूण या गावातच हमीद यांच्या विचारांना प्रखर विरोध झाला. त्यांच्या ‘इंधन’ या अतिशय गाजलेल्या कादंबरीच्या विरोधात मोर्चे निघाले. परंतु याबद्दल कुठलाही राग किंवा आकस मनात न ठेवता मिरजोळी-चिपळूण परिसरात प्रबोधनाचे कार्य सातत्याने झाले पाहिजे, या हेतूने भाभींनी मिरजोळी येथे ‘हमीद दलवाई स्मृती भवन’ उभारले आहे. आता या स्मृती भवनात सामान्य नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिरे भरविली जातात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्वस्पर्धा प्रतिवर्षी आयोजित केल्या जातात. हमीद दलवाई यांच्या संग्रहातील पुस्तके आणि श्री.जे.बी.पाटील यांच्या उदार देणगीतून मिळालेली पुस्तके, यांच्यासह स्मृती भवनात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या स्मृती भवनाच्या उभारणीसाठी भाभींनी स्वत:च्या काही लाख रुपये निधीचा विनियोग केलेला आहे.

यापलीकडे राखून ठेवलेली काही व्यक्तिगत रक्कम बँकेत ठेवींच्या स्वरूपात आहे. काही मुदत ठेवींवर नॉमिनी म्हणून माझे, तर कुठे अन्वर राजन, मुसा, इस्माईल यांचे नाव नोंदवून ठेवल्याचे लक्षात आले. आपल्या मुलींची परिस्थिती आता चांगली असल्याने, त्यांच्यापेक्षा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करणाऱ्या आम्हाला किंवा तुलनेने साध्या परिस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या कार्यकर्त्यांना सहयोग देता यावा, असा भाभींचा उदात्त हेतू यातून दिसून येतो.

सुमारे दोन वर्षांपूर्वी भाभींची पुण्यात अँजिओग्राफी झाली. त्या वेळी आवश्यक ती कागदपत्रे भरून देताना सोबत असणाऱ्या माझे नाव त्यांनी ‘स्वत:चा मुलगा’ म्हणून नोंदवले होते. माझ्यासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. भाभींचा आणि माझा स्नेह इतका गडद होता की, त्यांच्या अनेक खासगी गोष्टी त्या माझ्याशी शेअर करीत असत. अखेरच्या टप्प्यात तर अनेक छोटे-मोठे निर्णय त्या माझ्याशी सल्लामसलत करूनच घेत असत. सन 1999 पासून डॉक्टर म्हणून भाभींच्या प्रत्येक आजारात सेवा करणारे डॉ.अभिजित वैद्य आणि हमीद दलवाई यांचे भाऊ फिरोज यांची पत्नी नजमा या दोन व्यक्तीदेखील भाभींच्या हृदयात स्थान मिळवून होत्या.

दि. 7 जूनला रात्रभर झोप आलेली नाही, उठून बसण्याएवढी शक्ती अंगात नाही, छातीत दुखते आहे, अस्वस्थ वाटते आहे... अशा स्थितीत भाभींनी चौदा-सोळा तास काढले असावेत. मला किंवा डॉ.अभिजित वैद्य यांना अवेळी त्रास देऊ नये, म्हणून 8 जूनला सकाळी सव्वादहा वाजता त्यांनी मला फोन केला. डॉ.अभिजित यांच्याकडून औषध घेऊन मी तातडीने भाभींजवळ पोहोचलो खरा, पण.... ग्लानीमधून बाहेर येत अखेरचे घोटभर पाणी व औषध घेत, समाधानाचे हसू चेहऱ्यावर आणत भाभी दूरच्या प्रवासाला निघून गेल्या....

Tags: हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट मेहरुन्निसा दलवाई हमीद दलवाई नजमा फिरोज दलवाई डॉ.अभिजित वैद्य राजेंद्र बहाळकर mehrunnisa dalwai Hamid Dalwai Njama Firoj Dalwai Dr. Abhijit Vaidya Rajendra Bahalakar Companionship weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजेंद्र बहाळकर
rajendrabahalkar@gmail.com

सामाजिक कार्यकर्ता
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके