Diwali_4 वेदांत मेंदू, इस्लाम भारताचे शरीर!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

वेदांत मेंदू, इस्लाम भारताचे शरीर!

‘आपण त्याला वेदांतवाद म्हणा किंवा इतर कोणताही वाद म्हणा- सत्य हे आहे की, अद्वैतवाद हा धर्माचा शेवटचा शब्द आणि विचार आहे. या विचाराच्या आधारे आपण सर्व धर्मांना आणि पंथांना प्रेमाने न्याहाळू शकतो. मला विश्वास आहे की, अद्वैतवाद हाच भविष्याचा धर्म आहे. मानवतेला तो प्रबुद्ध करील. हिंदू लोक इतर वंशांपेक्षा स्वत: पुरातन असल्याचं, पहिल्यांदा पृथ्वीवर अवतरल्याचं क्रेडिट घेऊ शकतील; हिब्रू आणि अरबांपेक्षा स्वत:ची प्राचीनता सांगू शकतील. पण अजून प्रॅक्टिकल अद्वैतवाद- (जो सर्व मानवांत एकच ब्रह्म, जीव, तेज आहे हे सांगतो) या तत्त्वज्ञानाचा हिंदू माणसांत विकास झालेला नाही... दुसऱ्या बाजूला माझा असा अनुभव आहे की, इस्लाम हा असा एकमेव धर्म आहे, जो अद्वैतवादाला अभिप्रेत समानता सांगतो. म्हणून मला ठामपणे असं वाटतं की, प्रॅक्टिकल इस्लाम व वेदांतवाद या विचारांशिवाय मनुष्यजीवन मूल्यहीन होईल. आपण माणसांना अशा अवस्थेत नेलं पाहिजे, जिथं वेद, बायबल, कुराण यांचा मेळ घालून सर्व धर्मांचा अविष्कार एकच आहे, ही शिकवण सर्वमान्य होईल. मग अशा वातावरणात प्रत्येक व्यक्ती त्याला मानवेल, पचेल असा सर्वोत्तम धर्म वा मार्ग निवडू शकेल.

भारतात किती पराकोटीची विषमता आहे, हे एनएसएसओ रिपोर्टचा 59 वा भाग दर्शवितो. भारतातल्या वरच्या दहा टक्के लोकसंख्येजवळची संपत्ती तळाच्या 10 टक्के लोकांच्या संपत्तीच्या तुलनेत 380 पट जास्त आहे. वरचे दहा टक्के लोक या त्यांच्या संपत्तीवर पुढची 23 वर्षे सुखेनैव जगू शकतात. खालचे दहा टक्के लोक त्यांच्या जवळच्या संपत्तीवर फक्त तीन महिनेच गुजराण करू शकतील. या रिपोर्टनुसार 2012 मध्ये भारतातल्या अरबपतींची संपत्ती देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के होती. ही बकाल असमानता चालू द्यायची काय?

मोदींचा आर्थिक विकासाचा पॅटर्न चालू दिला, तर ही आर्थिक परिस्थिती आणखी बिघडेल. फक्त समाजवादी आर्थिक धोरणच हे बकालीकरण रोखू शकेल. म्हणून विदेशी व भारतीय अरबपती-उद्योजक, त्यांच्या कंपन्या यांच्या अभद्र युतीवर हल्ला करावाच लागेल. त्यासाठी सेक्युलर, पुरोगामी पक्ष, कामगार संघटना, शेतकरी, मजूर यांनी एकत्र होऊन या आव्हानाचा मुकाबला केला पाहिजे.

भारत सरकारजवळ पुढे जाण्यासाठी समाजवाद आणि सेक्युलॅरिझम याशिवाय कोणताही पर्याय नाही. कारण संविधानाने ती जबाबदारी सरकारवर टाकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, ‘संविधानाचा सरनामा सरकारने कोणत्या दिशेने जायचंय ते सांगतोय.’ त्याच्याशी प्रतारणा करणे म्हणजे बोम्मई केसनुसार बाबरी मशीद पाडल्यानंतर जशी नऊ राज्य सरकारे विसर्जित केली होती, त्यासारख्या कारवाईला सामोरे जाणे होय.

सर्वोच्च न्यायालयाने 1983 मध्ये म्हटले होते, ‘संविधानाच्या सरनाम्यातला समाजवाद हा शब्द 1975 मध्ये घटनादुरुस्ती करून समाविष्ट केलेला असला तरी दिशादर्शक तत्त्वांमध्ये समाजवादी ध्येय नेहमीच होते. दुरुस्तीतून फक्त समाजवादाची तातडीची गरज अधोरेखित केली गेली.’

मित्रहो, देशातली वाढती असमानता हे समाजवादापुढचे मोठे आव्हान आहे. थॉमस पिकेटी यांच्या ‘स्टोरी ऑफ अ फ्राइंग कॅपिटॅलिझम’ या पुस्तकात भारताविषयीचे एक विषम वास्तव मांडलेय. ते असे- भारतात 1999 मध्ये अतिश्रीमंतांचं करप्राप्त उत्पन्न 2 टक्के होतं. या अतिश्रीमंतांचं प्रमाण 0.01 टक्के आहे. भारतात 1920 मध्ये राजे, महाराजे, नवाब यांच्या  संपत्तीचं जसं केंद्रीकरण झालं होतं, त्याच्याशी साम्य दर्शविणारं हे आहे. अमेरिका आणि अर्जेंटिनातही अतिश्रीमंतांच्या संपत्तीचं केंद्रीकरण असंच आहे. भारतात 2000 च्या बूमने अरबपती वाढल्याचं सांगितलं जातं. 1999 मध्ये 5 अरबपती होते. त्यांची संख्या 2014 मध्ये वाढून 55 झाली. अरबपतींच्या संपत्तीमुळे जीडीपीमध्ये संपत्तीवाढ होत नाही. ती वाढ असते फक्त 8 ते 10 टक्के. सध्या भारतात 69 अरबपती आहेत. 

आपण 73 व्या घटनादुरुस्तीकडे जास्त लक्ष द्यावं, असं मला वाटतं. कलम 243 ते 243 झेड टी, ही ती दुरुस्ती आहे. थोर समाजवादी नेते डॉ.राममनोहर लोहिया यांनी जी चौखंबा राज्याची कल्पना मांडली होती, त्या दिशेने जायला यातून दिशा सापडू शकेल. या विषयावर मी स्वतंत्र लिहिलं आहे.

मोदी सरकारची सध्याची धोरणं अल्पसंख्याकांवर आक्रमण करणारी आहेत. भाजपने ‘घरवापसी’ या चळवळीला प्रोत्साहन दिलं. बैलमांस (बीफ) विक्रीवर बंदी आणणारा कायदा करून अल्पसंख्याकांच्या रोजगारावर गदा आणली. चर्चेसवर हल्ले करून ख्रिश्चनधर्मीयांना टार्गेट करण्यात आलं. यामुळे अल्पसंख्यांक समूह भयभीत आहे. वातावरण स्फोटक बनतंय. या द्वेषमूलक सांप्रदायिक धोरणाविरुद्ध सोशलिस्ट पार्टीने ताकदीनिशी लढावे. भारताचे सेक्युलर चारित्र्य टिकवलेच पाहिजे. कोणताही धर्म दुसऱ्या धर्मावर हावी होता कामा नये. संविधानाने सर्व धर्मांना समाज स्वीकारार्हता आणि स्थान दिलंय. संविधान सर्व व्यक्तींना नागरिकत्वाचा दर्जा बहाल करते. त्याला धर्माची आडकाठी नाही.

अल्पसंख्याकांना सरकार कसं वागवतं, ही सुसंस्कृत देशाची/राज्याची महत्त्वाची लिटमस टेस्ट असते. आंतरराष्ट्रीय प्रतिज्ञापत्रातल्या नागरी आणि राजकीय हक्क 1966 कलम 27 अन्वये अल्पसंख्याक हक्कांबद्दल मूलभूत भूमिका अधोरेखित करण्यात आलीय. ती अशी...   

‘कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहेत. कायद्याचं संरक्षण देताना कुणालाही पक्षपाती वागणूक देण्यात येणार नाही. कायदा सर्व प्रकारच्या पक्षपाताला बंदी करेल. वंश, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय मतं, देश किंवा सामाजिक स्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर कोणत्याही दर्जावरून व्यक्तीला पक्षपाती वागणूक देऊ नये.’

मुख्य न्यायमूर्ती एस.आर.दास यांनी केरळ शिक्षण बिल 1957 संबंधी नमूद केलंय- ‘भारतीय लोकांनी संविधान स्वत:प्रत अर्पण केलंय. ते काही एखाद्या विशिष्ट समूह, गटाला दिलेलं नाही. आपल्या सर्वांना ते दिलंय. म्हणून संविधान सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षा देतं, तसं बहुसंख्याकांनाही संरक्षण प्रदान करतं. मूलभूत हक्कानुसार आपण आपल्या पवित्र जबाबदारीचा सन्मान केला पाहिजे. ती जबाबदारी आहे, अल्पसंख्याक समुदायांच्या संरक्षणाची. न्यायालयांचीही ती जबाबदारी आहे.’ स्वामी विवेकानंद हे भारतातले एक थोर आध्यात्मिक महापुरुष होते. त्यांनी इस्लाम आणि हिंदू धर्माबद्दलच्या आंतरिक नात्याबद्दल सखोल चिंतन केलं होतं. विवेकानंद सांगतात- ‘हिंदूंनी स्वत:चा धर्म श्रेष्ठ मानू नये. दुसऱ्या धर्माला कमी लेखू नये. स्वत:च्या धर्माबद्दल गर्व बाळगण्यात शहाणपणा नव्हे. दुसऱ्या धर्माबद्दल असहिष्णुता बाळगणं योग्य नव्हे. तसं करणं म्हणजे ईश्वरनिंदाच होय. माझे गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांनी सर्व धर्म सत्य आहेत, हे स्वीकारलं होतं.’’

स्वामी विवेकानंदांनी त्यांचे नैनितालचे मित्र मोहम्मद सर्फराज हुसेन यांना अमेरिकेतील अलमोरा इथून 10 जून, 1898 रोजी एक पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी लिहिलंय...

‘आपण त्याला वेदांतवाद म्हणा किंवा इतर कोणताही वाद म्हणा- सत्य हे आहे की, अद्वैतवाद हा धर्माचा शेवटचा शब्द आणि विचार आहे. या विचाराच्या आधारे आपण सर्व धर्मांना आणि पंथांना प्रेमाने न्याहाळू शकतो. मला विश्वास आहे की, अद्वैतवाद हाच भविष्याचा धर्म आहे. मानवतेला तो प्रबुद्ध करील. हिंदू लोक इतर वंशांपेक्षा स्वत: पुरातन असल्याचं, पहिल्यांदा पृथ्वीवर अवतरल्याचं क्रेडिट घेऊ शकतील; हिब्रू आणि अरबांपेक्षा स्वत:ची प्राचीनता सांगू शकतील. पण अजून प्रॅक्टिकल अद्वैतवाद- (जो सर्व मानवांत एकच ब्रह्म, जीव, तेज आहे हे सांगतो) या तत्त्वज्ञानाचा हिंदू माणसांत विकास झालेला नाही... दुसऱ्या बाजूला माझा असा अनुभव आहे की, इस्लाम हा असा एकमेव धर्म आहे, जो अद्वैतवादाला अभिप्रेत समानता सांगतो. म्हणून मला ठामपणे असं वाटतं की, प्रॅक्टिकल इस्लाम व वेदांतवाद या विचारांशिवाय मनुष्यजीवन मूल्यहीन होईल. आपण माणसांना अशा अवस्थेत नेलं पाहिजे, जिथं वेद, बायबल, कुराण यांचा मेळ घालून सर्व धर्मांचा अविष्कार एकच आहे, ही शिकवण सर्वमान्य होईल. मग अशा वातावरणात प्रत्येक व्यक्ती त्याला मानवेल, पचेल असा सर्वोत्तम धर्म वा मार्ग निवडू शकेल. आपली मातृभूमी ही हिंदू आणि इस्लाम या दोन महान परंपरांचा मिलाफ झालेली भूमी आहे. या मातृभूमीचा वेदांत मेंदू आणि इस्लाम शरीर बनावा. हीच एक उद्याची आशा आहे. वेदांत मेंदू आणि इस्लामी शरीर बनलेला भारत आजच्या सर्व गोंधळातून बाहेर पडेल, वैभवशाली बनेल. हे परिपूर्ण भारताचं भविष्य, स्वप्न मी माझ्या अंतर्मनात पाहतोय.’

आपल्या समाजाच्या संमिश्र सहजीवनाचं चित्र मौलाना आझाद यांनीही अत्यंत चांगल्या शब्दांत मांडलंय. ते असं- ‘‘मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. सर्वांनी आपल्या संयुक्त उद्यमीपणावर शिक्कामोर्तब केलंय. आपण समाजव्यवहारात समान भाषा वापरतो. आपल्या सवयी वेगळ्या, परंपरा वेगळ्या; पण त्यातून एक नवा संयोग निर्माण झाला आहे. कोणतीही चलाख कल्पना किंवा कृत्रिम योजना आपली एकता तोडू किंवा विभागू शकत नाही. भारताच्या भूमीवर इस्लाम हिंदू धर्माइतकाच थोर आहे, ख्रिश्चन धर्माप्रमाणेच महान आहे.’’

मित्रहो, आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांकडेही ताबडतोबीने लक्ष वेधले पाहिजे. निवडणूक सुधारणांवर भर दिला पाहिजे. उद्योगजगताकडून राजकीय पक्षांना मिळणारा निधी हा कळीचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की, असा निधी देण्यावर पूर्ण बंदी हवी. अमेरिकेत अशी बंदी होती; अलीकडे काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात 5 विरुद्ध 4 अशा निर्णयाने हा निधीबंदीचा निर्णय मागे घेतला गेला. कायदा आयोग बैठकीत याविषयी एकमतानं निर्णय होऊ शकला नाही, कारण बहुमत नेहमी कंपन्यांच्या बाजूने असते.

(अनुवाद : राजा कांदळकर)

सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे 22 मार्च 2015 रोजी नवी मुंबईत राज्य अधिवेशन पार पडले. त्यावेळी उद्‌घाटक म्हणून आमंत्रित केले होते, त्या न्या.राजिंदर सच्चर यांच्या लिखित भाषणातील संपादित अंश...

Tags: संविधान भारत राजा कांदळकर राजिंदर सच्चर इस्लाम भारताचे शरीर! वेदांत मेंदू चर्चामंथन Constitution India Raja Kandalkar Rajindar Sacchar Islam Bharatache Sharir! Mendu Vedant Charchamanthan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात