डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जेव्हा पहिल्या दिवशी नवीन वर्गात नवीन शिक्षक येतील तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी, भिंतीवर चमकत असतील आपल्या गँगोजची ‘स्वागतपत्रं’ आणि सर्व वर्गासाठी असतील ‘शुभेच्छापत्रं!’’ आपला वर्गच असा नटवायचा की पहिल्या दिवसापासूनच सगळीकडे नुसता उत्साह सळसळू लागला पाहिजे.

जून महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे शाळेची तयारी. शनिवारी रोहन, पालवी, नीता, सई आणि संजय जमले. आता सुटी संपून शाळा सुरू होणार. या वेळी पण शाळेची तयारी करायची.... पण जरा हटके... बिलकुल अलग... अंऽऽ काय-काय करता येईल... गँगोजचा आयडिया जनरेटर सुरू झाला.

सगळ्यांनी मिळून वह्यांना कव्हरं घालू या.

आपले शाळेचे गणवेश चकाचक धुवून ठेवू या.

पुस्तकाचा खण आवरणं वगैरे कामं...

आपण असं काही करू या ज्यामुळे आपल्या संपूर्ण वर्गाला फायदा होईल.

किंवा असं काही करू या की ज्यामुळे आपला वर्ग शाळेतला ‘टॉप वर्ग’ होईल.

आणि असंही करू या की ज्यामुळे सारे शिक्षक आपल्या वर्गावर खूष होतील!

हे ऐकताच सगळ्यांनी आपापले हात उंचावले व एका हाताने एकाला व दुसऱ्या हाताने दुसऱ्याला जोरात टाळी देत गँग ओरडली, ‘‘फंडेका फंडू, अपनी गँग गोंडू!’’ सगळे गँगोज जवळ आले. हलक्या आवाजात कुजबुजू लागले आणि यातूनच एक भन्नाट योजना तयार झाली. मग त्यांनी अगदी हळू आवाजात काही गोष्टी ठरवल्या. अंधार पडायच्या आत सगळे गँगोज बागेतून छू झाले.

रविवारी सकाळी सगळे गँगोज पालवीच्या घरी जमले. त्यांनी येताना ड्रॉर्इंग पेपर, रंगीत स्केच पेन्स, रंगीत खडू, जलरंग व ब्रश पण आणले होते. कालच गँगोजचा प्लॅन ठरला होता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची ‘भिंतीवर लावायची स्वागतपत्रं व शुभेच्छापत्रं तयार करण्याचं ठरवलं होतं. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वांच्या आधी वर्गात जायचं आणि वर्गातील मुलांच्या मदतीने पण वर्गशिक्षक येण्याच्या आधी ही ‘स्वागतपत्रं व शुभेच्छापत्र’ भिंतीवर लावायची. जेव्हा पहिल्या दिवशी नवीन वर्गात नवीन शिक्षक येतील तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी, भिंतीवर चमकत असतील आपल्या गँगोजची ‘स्वागतपत्रं’ आणि सर्व वर्गासाठी असतील ‘शुभेच्छापत्रं!’’ आपला वर्गच असा नटवायचा की पहिल्या दिवसापासूनच सगळीकडे नुसता उत्साह सळसळू लागला पाहिजे.

नीता म्हणाली, ‘‘भिंतीवरचं स्वागतपत्रं कसं तयार करायचं?’’ फिरसे जनरेटर सुरू...

मोठ्या कागदावर डाव्या बाजूला टवटवीत हसऱ्या ताज्या फुलांचा एक मस्त गुच्छ काढू या आणि बाजूला लिहू या- ‘‘आमच्या वर्गात शिक्षकांचं मनापासून स्वागत. या कागदाला सुंदर नक्षीदार बॉर्डर काढू या. काऽऽय? कशी आहे आयडिया?’’ सईने असं म्हणताच सगळ्या गँगोजनी एकमेकांना टाळ्या दिल्या.

मला आणखी एक कल्पना सुचते आहे, ‘‘एका कागदावर निरनिराळ्या विषयांची व खेळांची चित्रं काढू या...’’

पालवीचं बोलणं थांबवत रोहनने विचारलं, ‘‘पण विषयांची चित्रं कशी काय काढणार?’’ संजय वैतागला. म्हणाला- ‘‘अरे, आधी तिला पूर्ण बोलू तर दे. मग विचार.’’

‘‘विषयांची चित्रं म्हणजे, तो विषय सुचविणारी चित्रं. उदा. पृथ्वीचा गोल म्हणजे भूगोल, किल्ला म्हणजे इतिहास, बेरीज, गुणाकार यांची चिन्ह म्हणजे गणित या प्रकारे. असे वेगवेगळ्या विषयांचे व खेळांचे आयकॉन्स काढू या आणि मध्यभागी लिहू या. 'चला शोधू या... अभ्यासातला आनंद आणि आनंदातला अभ्यास'! ही आयडिया पण सर्वांना आवडली.

‘‘आपल्या वर्गातल्या भिंतीवर काही सुंदर चित्रं चिकटवूनसुद्धा आपण वर्ग सजवू शकू?’’ असं रोहन म्हणताच नीता म्हणाली, ‘‘अरे यासाठी आपण आधी मुख्याध्यापकांची परवानगी घेऊ, मग चित्रं चिकटवू.’’

आता गँग फूल टू कामाला लागली. त्यांना आपल्या वर्गासाठी भिंतीवरची स्वागतपत्रं, तयार करायची होती. चित्र काढताना रोहनने जुना टूथब्रश घेतला. तो वेगवेगळ्या रंगात बुडवत त्याचे तुषार कागदावर उडवले. कागद सुकवून त्यावर लिहायला सुरुवात केली.  पालवीने रंगीत कागदांचे तुकडे चिकटवून एक निसर्गचित्र तयार केलं. मग त्याच्या बाजूला लिहिलं...सईने बादलीभर पाण्यात चार थेंब ऑईलपेंट टाकला. पाणी ढवळलं आणि कागद पटकन्‌ पाण्यात बुडवून बाहेर काढला. कागदावर मार्बल प्रिंट उठले होते. कागद सुकवून आता ती त्याच्यावर रंगाने लिहिणार.

प्रत्येकाची वेगळी पद्धत, वेगळे रंग आणि लिहिण्याची स्टाइल पण वेगळी.

असं लिहिता लिहिता अचानक संजय एकदम ओरडला, ‘‘एऽऽ वॉऽऽव! आमच्या शाळेत एकूण आठ वर्ग आहेत. मी आठ स्वागतपत्रं तयार करणार! तुम्हीऽऽ?’’

तुम्हांला काय वाटतं, या सर्व गँगोजनी किती स्वागतपत्रं तयार केली असतील? शाळेच्या पहिल्या दिवशी, शिक्षक तुमच्या वर्गात आल्यानंतर त्यांनी तुमचं ‘स्वागतपत्र’ पाहिलं. तर अधिक आनंद कुणाला होईल... तुम्हांला की शिक्षकांना? मला सांगाल? तुमच्या गँगला पण होता येईल का, शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करून आनंदी? शाळेचा पहिला दिवस आनंदी होण्यासाठी, तुमची गँग आणखी काय काय करू शकेल? तुमच्या ‘आनंदपत्रांच्या स्वागताला’ मी उत्सुकच आहे. वाट पाहतो.

पालकांसाठी गृहपाठ- ‘‘आता शाळा सुरू होईल... कळलंय ना...’’ हे वाक्य मुलांसमोर उच्चारण्याअगोदर थांबा. आधी आरशासमोर उभे रहा आणि हे वाक्य उच्चारा. आरशातील व्यक्तीने तोंड वाकडं केलं तर तुमचंच काहीतरी चुकतंय असं समजा. आरशातील व्यक्ती हसरी होईल तेव्हाच मुलांना जवळ बोलावून शाळेची जाणीव करून द्या. ‘शाळेविषयी बोलताना प्रेमाने बोललात तर मुलांत शिकण्याची गोडी रुजते’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

गँग गंमत- भिंतीवरची स्वागतपत्रं किंवा शुभेच्छापत्रं तुम्हांला तुमच्या मित्रांच्या वाढदिवसाला पण करता येतील. गावातल्या वाचनालयात, स्नेहसंमेलनात, मंगलकार्यात किंवा आई-बाबांच्या वाढदिवशी तुम्ही ती ‘चकित शुभेच्छापत्रं’ म्हणून पण वापरू शकाल.

प्रिय गँगोज- इतरांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कल्पना लढवाल याची मला खात्रीच आहे. कारण जे नवीन गोष्टी शिकायला उत्सुक असतात तेच इतरांचं मनापासून स्वागत करू शकतात. तुम्हांला नवनवीन गोष्टी समजू देत.

​​​​​​​(या लेखाबरोबरच ‘गँग’ ही लेखमाला समाप्त होत आहे. - संपादक)

Tags: बालकथा कथा गँग राजीव तांबे balkatha story greeting card gang rajiv tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके