डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

इथलं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सामाजिक स्तर... एकमेकांचा गुंता पक्का करून आधी मी गोष्ट पक्की करून घेतली. मला त्यात टिपिकल हीरो नको होता. ‘नुस्ता कोयता गरगर फिरवला की, माणसाचं मुंडकं तोडावं असं काही तरी...’ उसाच्या ओळीच्या ओळी एका झटक्यात तोडायच्या नव्हत्या. त्या खरंच कष्टानं तोडणारेच पाहिजे होते. मला अख्खा समूहच एकजीव हवा होता. तो रंगमळाच्या रूपानं जवळच होता. अवती-भवतीची माणसंच मजूर असल्यानं मला त्या वेदना चांगल्या माहीत, त्यामुळे मला रिसर्च करायला कुठं चंद्रावर, मंगळावर जायचं नव्हतंच किंवा तासन्‌ तास लायब्ररीत जाऊन त्यांच्या कष्टाचा अभ्यासही करायचा नव्हता. अनुभवविश्वात ते एखाद्या गाडीच्या शोरूमसारखं तयार होत होतं, बस्स.

‘चिवटी’ हा सिनेमा फेस्टिव्हलसाठी पाठवला, आणि जीव भांड्यात पडला. ताकदीचा अंदाज न घेता उचललेलं शिवधनुष्य कसं कसं पेललं, ते सगळंच झरझर नजरेसमोर आलं.

तसा मी नाटकवाला. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे परिचयात थोडी भर पडली. नाटक वगळता सिनेमाशी माझा संबंध फार तर अभिनयापुरताच. मीच लिहिलेल्या ‘आकडा’ या एकांकिकेवर नंदू माधव सरांनी एक शॉर्टफिल्म केली. एकांकिकेत मीच काम केलेलं असल्याने त्यांनी मलाच त्या फिल्ममध्ये लीड म्हणून घेतलं. एरवी नाटकातील त्या भूमिकेसाठी तीन-चार ठिकाणी मला बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मिळाला. पण फिल्ममध्ये काम करताना माझी पुरती दमछाक झाली. प्रत्येक शॉटला मी जरा बोलायचो  आणि थोडी माती खायचो. शेवटी कसंबसं शूटिंग पूर्ण केलं आणि एकदाचं ठरवलं की, इथून पुढे सिनेमाच्या नादी लागायचंच नाही... पण कसा कुणास ठाऊक, ‘देऊळ’ सिनेमा करताना उमेश कुलकर्णीच्या तावडीत सापडलो आणि परत एकदा पिळून निघालो! तिथं तर करडी गाय माझ्यापेक्षा भारी भरली. वन टेक ओके देऊन पळून गेली. माझे मात्र सहा वेळा रि-टेक झाले. पुन्हा एकदा ठरवलं- आपण आपल्या इज्जतीचा पंचनामा पुन्हा नाही करून घ्यायचा, आता फक्त नाटकच!

असं म्हणत-म्हणत ‘तुकाराम’, ‘नागरिक’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, या चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका कराव्याच लागल्या. मधे-मधे लेखन चालूच होतं. या भूमिका करत असताना कुठं तरी वाटायचं, आपणही एखादा सिनेमा लिहावा. तसा चार-दोनदा प्रयत्नही केला; पण मी ज्या दिग्दर्शकासाठी सिनेमा लिहायचो, त्याला तो आवडायचाच नाही. मग मी थोडा नाराज झालो. एकीकडे माझं नाट्यलेखन स्वीकारलं जातं, तर दुसरीकडे सिनेमा आवडत नाही. मग असं वाटलं की, प्रॉब्लेम त्यांच्या ‘आवडण्या’पेक्षा जर ‘कळण्या’चा असेल तर? आपल्याला जे सांगायचं आहे, ते जर त्यांना कळतच नसेल तर, आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचणार कसं? त्यांना आवडो न आवडो- लोकांना काय वाटतं, हे कुठं आपल्याला माहीत आहे? आपण थेट लोकांपर्यंत जायला पाहिजे. पण सिनेमा ही गोष्ट इतकी सोपी नाही. वावरात पेरता-पेरता एखाद्या पाट्याला जर मूठभर बी कमी पडलं, तर ते मिळवण्याचीसुद्धा आपली मार्केटमध्ये पत नाही आणि आपल्याला सिनेमा करायला कोण सांगणार! नाही तर उगी आपला शिवा व्हायचा...

गेवराईला शाळेत जाताना वाटेत लागणाऱ्या कब्रस्तानमध्ये ॲक्शन म्हणून शिवा एकटाच फाईट खेळायचा. शाळेतून परत आलो, तरी त्याचं पॅकअप व्हायचं नाही. नंतर कळलं, त्याला सिनेमानं हे झालं होतं... त्यामुळं सिनेमाचा विषय डोक्यात घेऊन उगीच मेंदूत अनावश्यक गर्दी करूच नये, म्हणून मी तो विषय बाजूला ढकलला. पण मधे-मधे एक विषय घेऊन एका मित्रासोबत चर्चा चालू होतीच. त्यानं तो विषय मला लिहायला सांगितला. पण मी त्याला सांगितलं, ‘‘भाऊ, मला दुसऱ्याच्या इथं औत हानायचा लै कंटाळा आलाय. जे काही करीन ते स्वतःच करीन.’’ तर तो लगेच तयार झाला. मला कळत होतं, तोही आपल्यासारखाच. ‘खिशात नाही आना अन्‌ चलो जालना!’ पण म्हटलं- चला, या निमित्तानं लिहून तरी होईल. आणि मी लिहायला लागलो.

मी अगदी सकाळीसकाळीच दुकान उघडून बसावं तसं वही घेऊन लिहायला बसू लागलो. गोष्ट आवडीची आणि माझ्या विचाराशी जुळणारी असल्यानं मी अगदीच मन लावून लिहू लागलो. पण बिनपावसाचे उन्हाळखरडे तरी किती घालावेत, म्हणून मी लिखाणाचा स्पीड थोडा कमीच केला. एके दिवशी लिहीत असतानाच संजय बिंगलेंचा फोन आला, ‘‘सर, भेटायला यायलो.’’ आणि ते चक्क निर्माता अजिनाथ ढाकणेंना घेऊन आले. तसं पाहता क्षणी मन बसावं असं व्यक्तिमत्त्व अजिनाथचं नाही. माझ्यासारखंच... पाहिल्यापाहिल्या भावना न बसणारंच...

माझा मित्र हर्षाची चार वर्षांची जिवी नावाची गोड मुलगी जेव्हा भारतात आली, तेव्हा मी तिला कुतूहलाने भेटायला गेलो. हर्षाने तिला माझा परिचय रायटर म्हणून करून दिला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ‘हाऊ पॉसिबल?’ म्हणताना जे भाव तरंगले, ते अजूनही जसेच्या तसे माझ्या डोळ्यांसमोर तरळत आहेत. त्यामुळे कुणावरही संशय घेताना मी स्वतःला आरशात पाहतो.

ऊसतोड मजुरावर सिनेमा करायचं खूळ डोक्यात घेऊन अजिनाथ आणि संजय अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून इथपर्यंत आले होते. त्यांना ऊसतोड मजुरांवरच सिनेमा करायचा होता. एक-दोन कादंबऱ्याही पिशवीत टाकून आणल्या होत्याच. त्यासोबत ओव्हरफ्लो कॉन्फिडन्सही घेऊन आले होते. मराठीतले मोठमोठे देव (दिग्दर्शक) पाहून आलेला माणूस माझ्यावर विश्वास ठेवतो, यात मला थोडी शंका होतीच. ते आपल्याला खिशात घालतील असं अजिनाथला वाटत होतं, की यांना विषयातलं काय कळतं असं वाटत होतं- कुणास ठाऊक? पण त्या सगळ्यांना सोडून ते माझ्याकडं आले, म्हणून मी त्यांना सावध प्रश्न विचारला, ‘‘तुम्हाला मी काय करावं, असं वाटतं?’’

त्याचं एक कारण असं होतं की, मी स्वतः ऊसतोड मजूर जरी नसलो तरी एक शेतकरी होतो, हे माझ्या ‘बोलण्या-चालण्या’वरून त्यांना लगेच जाणवलं. त्यात बाकीच्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की, ‘तुम्ही तुमचं बजेट सांगा; आम्ही तुम्हाला तो बनवून देऊ.’ पण रेडिमेड घर विकत घेण्यापेक्षा बांधून घेण्यात कुणालाही जास्त  आनंद मिळतो, कारण रचना आपल्या मनासारखी करता येते. शिवाय याआधी ते ज्यांच्याकडे गेले होते, ते सगळे शहरी असल्याने विषयाला किती न्याय देतील हा संशय त्यांना होता, एवढं खरं. एवढं फिरून ते माझ्याकडे आलेले असल्यामुळं मी त्यांना प्रश्न विचारला, ‘‘माझ्याकडून काय अपेक्षा आहेत?’’ तर ते लगेच म्हणाले, ‘‘सर्वच!’’ मी थोडा सरकून बसलो. माझ्यासमोर त्यांनी पुस्तकं टाकली. मी धावती नजर टाकली. पण नजर थांबावी असं एकही पुस्तक मला त्यात दिसलं नाही.

एखादी गोष्ट मला आवडली नाही तरी ती अपायकारक नसेल तर मी सांगत नाही की, ती मला आवडलेली नाही. पण ते मोठ्या विश्वासाने ‘त्याच पुस्तकावर सिनेमा करायचा’ म्हणून आले होते. अजिनाथने तोपर्यंत माझं नाटक किंवा लेखन काहीच पाहिलेलं नव्हतं. त्यामुळं मी संभाला बोलावून घेतलं. प्रकरण माझ्या आवाक्यापलीकडे वाटलं, तर मी संभाला बोलावतो. तो तसा बेधडक. संभाजी (तांगडे) आला; त्यानं रंगरूप पाहिलं, पुस्तक पाहिलं आणि म्हणाला, ‘‘आम्हाला गोष्ट आवडली तरच आम्ही हे करू. नाही तरी आमचं काही तरी करायचं चाललंच होतं.’’

तोपर्यंत बोलता-बोलता मी अजिनाथला क्रिएटिव्हमधलं स्वातंत्र्य अगोदरच मागून घेतलं. ज्याच्यासाठी गांधीबाबासारख्यांनी आयुष्य खर्ची घातलं, तेच मला निर्माता म्हणून अजिनाथनं पहिल्याच शब्दांत दिलं. ‘‘मी व्यवहारात हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही क्रिएटिव्ह कामात करायचा नाही.’’ आणि आमचं जमलं! संभानं आणि मी हेही तपासलं की, या पठ्‌ठ्याला हीरो- गिरो तर व्हायचं नाही ना? तसं काही जाणवलं नाही. मग मी त्यांना जालन्यातलेच माजी आमदार डॉ.नारायणराव मुंढे यांची एक कादंबरी सांगितली. त्यात एक प्रश्न हृदयभेदक होता. त्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून गोष्ट रचायची ठरली आणि मी लेखनाला सुरुवात केली.

गोष्ट ऊसतोड मजुराची करण्यापेक्षा साखरेची केली तर जास्त व्यापक होईल, असं संभानं सुचवलं. साखर प्रत्येकाच्या आयुष्यात येते. ऊसतोड मजूर ज्याने पाहिलेला नाही, त्याने साखर तरी नक्कीच पाहिलेली असते. गोड साखर तयार करण्याचा प्रवास किती कडवट आहे, हे त्यात महत्त्वाचं दिग्दर्शक राजकुमार तांगडे आणि निर्माते अजिनाथ ढाकणे  होतं. फक्त ऊसतोड मजूरच नाही तर शेतकरी, राजकारणी, सामान्य माणसं- हे सगळं चक्रच त्यात आलं पाहिजे, अशी लेखनाला सुरुवात केली. नाटकात काम करणारी मुलं अवती-भवती होतीच. त्यांना नजरेसमोर ठेवूनच लिहायला सुरुवात झाली. लेखनाचा अनुभव होताच. लिहून होत होतं. ‘पण पुढे?’ म्हणजे दिग्दर्शन कसं करायचं? म्हणजे दंड-बैठका काढल्या, दूध प्यायलो-पचवलं- इथवर ठीक आहे; पण समोरच्या गड्याला पाडायला डावपेच तर यायला पाहिजेत ना!

माझा दिग्दर्शनाचा अनुभव शून्य होता. अजिनाथने ‘संत भगवानबाबा’ नावाचा सिनेमा पूर्वी काढला होता. पण तो झाला निर्मितीचा अनुभव; दिग्दर्शनाचं काय त्यात? मग काय करायचं? सिनेमा कसा करतात ते कुणाला विचारायचं? मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं? अवती-भवती सिनेमाची जाण असणारं तर सोडा, सिनेमाबद्दल माहिती असणारंसुद्धा कुणी नव्हतं. जेवढा दूर स्वर्ग, तेवढाच दूर आमच्यासाठी सिनेमा! कल्पनेच्या पलीकडे. कारण माझ्या घरच्यांचा सोडाच, पण आमच्या आडनावाच्या लोकांचासुध्दा सिनेमाशी कुठंच संबंध लागणार नाही. आमचा संबंध असलाच तर फक्त हंगामी प्रेक्षकापुरताच.

‘हरहर महादेव’ हा मी पाहिलेला आयुष्यातला पहिला सिनेमा. तो आमच्या जांबाच्या जत्रेत आईच्या मांडीवर झोपून मी पाहिला, असं ती सांगते. त्यानंतर एकदा वडिलांबरोबर मामाच्या गावाला जात असताना वाटेत माजलगावमध्ये मुक्काम पडला. तेव्हा ते कुठल्या तरी सिनेमाला घेऊन गेले होते. पण त्याचं आत्ता काहीच आठवत नाही. पुन्हा एकदा यात्रेत आपण ‘संतोषीमाता’ पाहिला, असं ताईने सांगितलेलं. तेवढंच आठवणीत. मनावर प्रभाव पडावा असा- ‘जागतिक’ नाही म्हणता येणार, पण धार्मिक असल्यानं- ‘ब्रह्मांडातील ग्रेट सिनेमा’ कुठलाच पाहण्यात नव्हता. एवढा पक्का पाया असणारा माणूस सिनेमाचं दिग्दर्शन करायला निघाला.

दिग्दर्शन मीच करावं, हे अजिनाथचंदेखील मत; पण माझा अनुभव शून्य. लेखनाच्या बाबतीत मी गोष्ट मारून नेली होती. म्हणजे कुठलंच ॲकॅडमिक न शिकता मी आणि ‘शिवाजी’सारखं नाटक लिहिलं, ते उत्स्फूर्तच. आता दिग्दर्शन करायला उतरलोय. कसोटी लागणार ती कल्पकतेची, एवढं निश्चितच होतं. जसं डॉक्टरी पेशात डिग्री असल्याशिवाय रुग्णावर उपचार करता येत नाहीत. डिग्री नसताना उपचार केले, तर त्याला बोगस डॉक्टर म्हणतात. तसं समाजमाध्यमाचं नाही. आपल्याला वाटलं की- आपल्यात क्षमता आहे, तर आपण त्यात काम करू शकतो. रूग्णसेवेत फाजील आत्मविेशास कामाचा नसतो, कारण आपण माणसाच्या जिवाशी खेळत असतो. तुम्हाला प्रमाणपत्र नसेल, तर माणसाची चिरफाड करायचा अधिकार मुळीच नाही. हां.. पण माध्यमातून समाजाची चिरफाड करायला मात्र तुम्हाला औपचारिक शिक्षणाची अट नसते. त्यामुळेच मी हा सिनेमा दिग्दर्शित करायचा निर्णय घेतला.

पण मला याचं पूर्ण भान होतं की, रुग्णसेवेइतकंच गंभीर असतं व्यवस्थेचं ऑपरेशन. डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर, कुटुंबावर होतो; पण एका कलावंताच्या चुकीचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. त्यामुळे हे न शिकता जरी केलं, तरी समाजभान न बाळगता मात्र मुळीच केलं नाही आणि ते करताही येत नाही. याचं कारण असं- काम केल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र समाजाकडून घ्यावंच लागतं. ते आता मला तुम्ही देणार आहात!

इथलं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सामाजिक स्तर... एकमेकांचा गुंता पक्का करून आधी मी गोष्ट पक्की करून घेतली. मला त्यात टिपिकल हीरो नको होता. ‘नुस्ता कोयता गरगर फिरवला की, माणसाचं मुंडकं तोडावं असं काही तरी...’ उसाच्या ओळीच्या ओळी एका झटक्यात तोडायच्या नव्हत्या. त्या खरंच कष्टानं तोडणारेच पाहिजे होते. मला अख्खा समूहच एकजीव हवा होता. तो रंगमळाच्या रूपानं जवळच होता. माझ्या अवती-भवतीची माणसंच मजूर असल्यानं मला त्या वेदना चांगल्या माहीत. माझे काही मित्रही तोडणीला जातात. त्यामुळे मला रिसर्च करायला कुठं चंद्रावर, मंगळावर जायचं नव्हतंच किंवा तासन्‌ तास लायब्ररीत जाऊन त्यांच्या कष्टाचा अभ्यासही करायचा नव्हता. माझ्या अनुभवविश्वात ते एखाद्या गाडीच्या शोरूमसारखं तयार होत होतं, बस्स. जशी गाडी स्टार्ट करताच माणूस ब्रेक वगैरे चेक करतो तसं जगणं तपासलं, त्यात स्वानुभवाची फोडणी टाकली की, तयार होणार होतं- ॲक्टर आणि दिग्दर्शकाकडून.

मी नवा असल्यानं माझ्यात अभिनेत्याला ऊस तोडायचा अभिनय करायला लावायचं कसब नव्हतंच. मला तंत्रापेक्षा विचाराची जास्त काळजी असते. तंत्र चुकलं तरी चालेल, पण विचार चुकता कामा नये. तंत्रात चुकला तर दिग्दर्शक जिम्मेदार- जो मी नाहीच; पण विचारात चुकलो तर मी जिम्मेदार- जो मी आहेच. तंत्र हे शिकून मिळवता येतं, पण विचार हे जगल्याशिवाय कलाकृतीत उतरतच नाही. माझ्या जगण्याचं प्रतिबिंब त्यात पडणार असल्यानं तयारी सुरू केली.

मी काही ऊसतोड मजूर कुटुंबातला नाही. पण त्या कुटुंबाशी नातं असणारा आहेच, म्हणून नव्यानं संवाद साधायला आम्ही एक दौराच काढला. त्यात संभा, अश्विनी आणि आमच्या रंगमळाची मैत्रीण वीणा जामकर- आम्ही सगळ्यांनीच भाग घेतला. आम्हाला त्यांच्या मनातलं काढून घ्यायचं होतं. उद्या जर सिनेमा तयार झाला आणि एखाद्या ऊसतोड मजुराने पाहिला, तर त्याच्यावर ‘हा मी नव्हेच’ असं म्हणायची वेळ येऊ नये. त्याचं, त्याच्या समस्यांचं, सुख-दुःखाचं, प्रश्नांचं प्रतिबिंब त्याला त्याच्यात दिसलंच पाहिजे, म्हणून हा खटाटोप. वीणाशी व अश्विनीशी महिला दिलखुलास बोलत; तर आमच्याशी पुरुष व वयस्कर महिला छान शेअर करत.

भेटीगाठी, जगणं पाहत, न्याहाळत, ताडून-पडताळून बघत फिरत असताना कधी कधी लोक आम्हाला सरकारी पथक समजून रिॲक्ट व्हायचे. कधी ‘आमच्याकडं बघा’ म्हणायचे, तर कधी आपल्याला काय काय सुविधा हव्या आहेत त्याची यादीच वाचून दाखवायचे. अशीच एकाने लेखी दिलेली लिस्टच मी माझ्या काही मागण्या टाकून सिनेमातील एका सीनमध्ये कामगारनेत्याच्या मागे बॅनर करूनच लावली. एकूण, यांच्या समाजाकडून, सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा  कळत गेल्या. त्यातून अनेक कॅरेक्टर्स मिळाली.

आम्ही बीडमधला आष्टी, पाटोदा, शिरूरसह निर्माते कैलास सानप व अजिनाथचा गाव परिसर पिंजून काढला. त्यांचं अन्‌ आमचं कल्चर, दुःख, जगणं जरी एक असलं तरी आमची बोली एक नव्हती. बऱ्याच शब्दांत खूप फरक होता. सिनेमाला भाषा महत्त्वाची असते- मग बीडची वापरायची की जालन्याची? प्रश्न तिथंच सुरू झाला. चुट्टी, चुईटी का चिवटी? कुठे चुईटी म्हणतात, तर कुठे चिवटी म्हणतात. अर्थ तोच. ऊस खाऊन फेकून दिलेला भाग. प्रश्न पुन्हा तोच- लोकांना कळेल का? पुन्हा विचार केला, लोक आपल्यापेक्षा तर नक्कीच हुशार आहेत.

मला आठवतो देव-देवतेतर माझ्या पाहण्यात आलेला पहिला सिनेमा. नेमकीच दादाची दहावीची परीक्षा झाली आणि मी पाचवीत असताना आमच्या जांबाच्या यात्रेत सिनेमा पाहायला घरून निघालो. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याजवळ आलो. तो मला मशिदीजवळच्या बोळीतून घेऊन चालला असता मी त्याच्या हाताला धरून ओढत म्हटलं, ‘‘तिकडं टेकडीवरच्या टाकीला नगं. तिथं दीड रुपाय तिकीट आहे.   इकडं मारोती मळ्यात आबाच्या टाकीला पांडवप्रतापला एक रुपायचं तिकीट.. आपुन इकडं जाऊ...’’ मी त्याला सगळ्या वाटंनं सांगत होतो ‘‘दादा, ते हिंदीत हाई, मला समजत नाही.’’ दादा मला तसंच पुढं रेटत घेऊन आला. म्हटला, ‘‘तू चल. तू नीट ध्यान देऊन पाह्यला तर कळंन.’’ तिथं होता ‘कानून मेरी मुठ्ठीमें है’ नावाचा सिनेमा. कुणाचा वगैरे काहीच माहीत नव्हतं, तरी पाहिला. विशेष म्हणजे, मला भाषा येत नसतानाही मन लावून पाहिल्यानं मला तो सिनेमा खरंच समजला. तेव्हाच हे शिकलो की, चित्राची स्वतःची एक भाषा असते. ती कळली की, सिनेमा तुम्हाला आपोआप कळतो.

सिनेमात भाषेपेक्षा जगणं महत्त्वाचं असतं. ते मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पारगाव असो का पॅरिस- माणसाच्या दुःखाचा हुंकार एकाच जागेवाटे निघतो. दु:खाची एकच बोली आहे, ती डोळ्यांतून डोळ्यांना कळते. चेहऱ्यावर दिसते. फक्त ते कनेक्ट होण्यासाठी प्रेक्षकाच्या मेंदूला हृदयाची अर्थिंग मिळायला हवी आणि ती बोलीतून पोचते. म्हणून मी नीट व्यक्त होण्यासाठी माझी स्वतःची बोली निवडली...

सिनेमा करताना फक्त ऊसतोड मजूर-मजूर करायचंच नाही. ते काही आईच्या पोटातून येतानाच कोयता हातात घेऊन येत नाहीत, तर ते आधी माणूस असतात. पण ज्यामुळे ते त्या मार्गाला जातात, ती कारणं नेमकी काय असतात, त्यांचा शोध सिनेमात घ्यायचा. आणि तो समाजाला पटला पाहिजे, हा आग्रह मनाशीच होता. त्याचा अनुभवही मी या सिनेमाच्या चालू प्रोसेसमध्येच घेतला. माझा एक मित्र सुनील मजूर-कम-शेतकरी. लहानपणापासून आमच्यासोबत. आमच्या नाटकाच्या तालमीला रोज येणारा. ज्यांना उशीर झाला, त्यांना बोलवून आणणारा. तालमीच्या ठिकाणी लाईट लावायचं काम त्याचंच. मनानंच दूध आणून चहा करून पाजायचं काम तो करायचा. नंतर शेतकरी संघटनेत काम करताना पुढेच. पॅम्पलेट वाटणं असो की, अगदी उपोषणात-मोर्चात नाही तर आंदोलनात माझ्यासोबत जेलमध्ये- सगळीकडं सोबत. एवढंच काय, कापसाचं गाठोडं डोक्यावर घेऊन तीन-तीन किलोमीटर फाट्यावर दोघं विकायला जाताना पण संगंच.

पुढं त्यानं टमटम घेतली. आम्ही अगदी ‘शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाला जाताना- येताना तो आम्हाला आणून-नेऊन सोडणार. उत्साही तर इतका की, एकदा आम्हाला त्या टमटमध्ये प्रयोगाला पुण्याला (375 कि.मी.) घेऊन जाण्याची तयारी केली! इतका कष्टाळू... पण ह्या पठ्‌ठ्याला त्याच्या रिक्षाला जर कोणी टमटम म्हटलं की, राग यायचा. तो आम्हाला दरडावून सांगायचा, ‘‘टमटम-रिक्षा म्हणून तुम्ही मही इज्जत नका घालत जाऊ.. गाडी म्हणीत जा...’’ इतका स्वाभिमानी. ‘चिवटी’तही त्यानं छोटा रोल केला. पंधरा दिवस सेटवरच होता. तसा तो अंगठेछाप, पण थम्ब सिस्टीम येण्यापूर्वीपासूनच तो कुणाला बोलू देत नव्हता. सगळं गाव त्याला मंत्री म्हणतं, एवढा हुशार. पण सततच्या दुष्काळानं गेल्या वर्षी त्यालाही गाव सोडून ऊसतोडीला जावं लागलं.

सुनील ऊसतोडीला गेल्याचं मला दोन महिन्यांनी कळलं. मी त्याला फोन लावला. मी म्हटलं, ‘‘का गेलास?’’ तर तो म्हणाला, ‘‘तुम्हाला माहिती नाही व्हय?’’ मला त्याच्या जाण्याचं कारण खरंच माहिती नसल्यानं मी त्याला म्हटलं, ‘‘सुनील, मला खरंच माहिती नाही, तू का गेलास ते...’’ तो जरा चिडूनच बोलला, ‘‘एवढा सिनेमा केला राव अन्‌ म्हणता माहिती नाही!’’ माझी मलाच चूक कळली. त्याच्या ऊसतोडणीला जाण्याचं मी व्यक्तिगत निमित्त का शोधत होतो... नंतर मी आठ- पंधरा दिवसांनी त्याला फोन करायचो. एकदा पंढरपूरजवळ नाटकाचा शो होता. त्या निमित्तानं तो मला तिथं भेटायला आला. मला एकट्याला गाठून माझ्याजवळ येऊन, हातात हात धरून म्हणाला, ‘‘राजाभाऊ... लई अवघड हे राव... हे तुम्ही मांडलं तसंच मह्या आयुष्यात घडायलंय... कालच एका जणानं त्याच्या रानात गेलोत म्हणून आम्हाला उठाबस्या घालायला लावल्या... मला कसंतरीच झालं.’’

मी काही वाल्मीकी नाही. मी लिहिलं आणि त्यांच्या आयुष्यात घडायलं.. खरं तर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी मी लिहिल्या, त्या पुन्हा घडू नयेत म्हणून... कारण त्यांचंही सुनीलसारखंच एक विश्व असतं. कोळसा कामगार, मिल कामगार, ऊसतोड कामगार. तो एक व्यवसाय आहे. त्यात कोळसा, ऊस, कापड बाजूला काढलं की, उरतो कामगार आणि काम बाजूला काढलं की, दिसतो आपल्यासारखाच माणूस. नातं जपणारा, राजकारण करणारा, हेवे-दावे, आपुलकी, माणुसकी, स्पर्धा.. सगळं आपल्यासारखंच. त्यांचंही एक विश्व असतं, गाव असतं, मान असतो, सन्मान असतो.

सुनील माझ्या गावातल्या मानकरी कुटुंबातला. बैलपोळ्याचं तोरण असो की होळीची पूजा, पालखीचा मान त्याच्याच घराला.. जगरूपी जंगलातलं तेही एक झाड असतं- फळा-फुला-पानांबरोबर टांगलेल्या खोप्याचंही. पण जेव्हा कामानिमित्त गावच्या गाव स्थलांतर करतं, तेव्हा सालोसाल वाढलेलं एखादं झाडं उपटून दुसरीकडं लावताना कातळातून पाताळात गेलेल्या मुळ्यांबरोबरच त्यांचा स्वाभिमानही त्याच जुन्या गावाच्या मातीत तुटून जागेवरच कुजून पडतो आणि माणसासारख्या माणसाला सुनीलसारख्या मानकऱ्याला देश बदलला की, ‘गबाळे’ म्हटलं जातं... हेही सिनेमात आलं पाहिजे. आपल्या समाजाला त्यांनाच उलटतपासणीत प्रश्न विचारण्याचा किंवा शहाणपणा शिकवण्याचा अधिकार नाही. की, तिकडे गेल्यानंतर असं काय आभाळ कोसळतं? जगण्यासाठी तर कष्ट कुणालाही करावेच लागतात. नाही तर मग हे सगळं सोडावं ना? त्यांना कोण जा म्हणतं? या सगळ्यांची उत्तरं आपल्याला हवी असतील, तर त्यांचं जगणं आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण प्रत्येक जणच ते काही अनुभवू शकत नाही; म्हणून माझ्यासारख्याचं कर्तव्य आहे की, कलाकृतीतून त्यांच्या जगण्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना देणं. त्यातून आपल्याला उत्तरं आपोआप मिळतील. अशासाठी मला गोष्ट सांगायचीय.

मला एकानं खूप गंभीरपणे सल्ला दिला, ‘‘राजकुमार, तू जो विषय निवडलायस ना, तो असा वैश्विक नाही रे... फार तर तुमच्या मराठवाड्यातल्या- त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातल्या, त्यातल्या त्यात काही तालुक्यांतल्या काही गावांचा... त्यातही काही लोकांचा. म्हणजे तुमचा तालुका ऊसतोड मजुरांचा आहे म्हणून तिथला तहसीलदार नाही जात ऊस तोडायला. ग्रामसेवक, शिक्षक, कापड दुकानदार ही मंडळी नाही जात. हा विषय जगानं का बघायचा? मी का बघू हा विषय? तू असा एखादा विषय निवड ना, जो पूर्ण जगाला कवेत घेईल.’’

मी क्षणभर शांत झालो आणि बोललो, ‘‘मी तुझ्या घरी आलो, तर तू काय करशील?’’

‘‘बसायला सांगेन. पाणी विचारीन.’’

 ‘‘आणि तुझ्या माठात पाणी नसेल तर?’’

‘‘का नाही, हे विचारीन.’’

‘‘तुझ्या घरच्यांनी सांगितलं, ‘आलंच नाही...’ तर?’’

‘‘दुसरीकडून आणीन.’’

‘‘दुसरीकडे नसेल तर.’’

‘‘मी नगरपालिकेला फोन करेन, जाब विचारेन.’’

‘‘ते म्हणले, शहरातच नाही तर?’’

‘‘धरण, नदी असं करत-करत पावसापर्यंत जाईन.’’

‘‘तुला पाणी नाही मिळालं तर तू शोधत-शोधत पावसापर्यंत जाशील. तसंच तुझ्या जेवणात आणि जीवनात गोडी आणणाऱ्या साखरेच्या शोधात जायला पाहिजेस ना? ज्यानं तुला थेट काहीच दिलं नाही, जो कुठे आहेच का नाही, माहीत नाही- त्या देवाच्या शोधात निघतोस. वा रे माणूस... आणि ज्यानं तुला खरोखर हे सगळं दिलंय... एवढी सेवा दिली, त्याचा नाही शोध घेणार? आपण सेवादात्याला विसरतो. त्याची प्रतारणा करतो. मला नाही ते करायचं. माझा बाप-आई सेवा दाता आहेत. त्यांची वेदना मला माहिती आहे, म्हणून मला करायचंय हे.’’ परत माझं नेहमीचं एक वाक्य त्याला सुनावलं, ‘‘मी कुणाची करमणूक करायला जन्मलेलो नाही; पण माझ्या कामातून कुणाची करमणूक होत असेल, तर त्याला माझी हरकत नाही.’’

हा सिनेमा करत असताना मला एक जाणवलं- ऊसतोड मजुराचं जगणं पाहायला सहज, लिहायला सोपं; पण जगायला खडतर, तेवढंच दाखवायला खर्चिकही. आपल्या डोळ्याला सहज दिसणारी आणि नेहमी घडणारी एक घटना मी त्यात लिहिली. ‘रस्त्यावरून जाताना ऊसतोड मजुरांचा ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झालेला दिसतो. त्यात संसार अस्ताव्यस्त पांगलेला दिसतो.’ पण नंतर त्या कल्पनेचा मलाच त्रास झाला, म्हणून मी ते कॅन्सल केलं. त्यांची वेदना सांगताना निर्मात्याला वेदना होतात, हे क्षणभर विसरूनच गेलो होतो. एका दृश्यात एक पात्र ते कुठे उभं आहे, हे फोनवरून समोरच्याला सांगतं. तेव्हा ‘जग कुठल्या भ्रमात जगतं, हा संदेश द्यायचा म्हणून कॅमेरा अमुक-अमुक ठिकाणी शोध घेत येतो’ हे मी सहज लिहिलं. मला त्यात प्रेक्षकांना चकवा पण द्यायचा होता. म्हणून मी दोन ओळींत लिहिलं- आपल्याला नद्या-नाले, डोंगरकडा, समुद्र दिसतो; पण ते दृश्यात उतरायला किमान आठ दिवस शूट करायला लागणार होते. मी सढळ हाताने लिहीत गेलो, तेव्हा मला कुणी अडवलं नाही.

असंच होतं. त्यांच्या आयुष्यातही मोठमोठ्या घटना घडतात, पण कुणीच त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. एरवी आपण माणुसकी पावलोपावली जपतो. एखादी शाळा रोडवर असेल, तर दहा-वीस मीटर आधीच बोर्ड लावतो- ‘पुढे शाळा आहे. वाहने सावकाश चालवा.’ त्यात आपण गतिरोधकही टाकतो. आपली मुलं जरी त्या शाळेत शिकत नसली तरी आपण काळजीपूर्वक गाडी चालवतो, कारण ते आपलं भविष्य आहे. तशी काळजी आपण वर्तमानाची घेत नाही. ज्याला आपण कधीच पाहिलेलं नाही, त्या ईश्वराला आपण क्रेडिट आणि धन्यवाद देतो, ‘तुझ्या कृपेनेच हे सर्व मिळाले!’ आणि ओरिजनल ज्या सेवादात्याने आपल्या आयुष्यात व तोंडात गोडवा निर्माण केला, त्याला नका का सन्मान देईनात; पण अवमानाचा धनी ठेवू नये, याची जाणीव आपण ठेवत नाही. हेच मला या सिनेमातून हसतखेळत सांगायचं आहे.

निर्मात्यानं मला लिहायला कधीच आडकाठी आणली नाही. लिहिताना बजेटचा विचार जर केला, तर सिनेमाच लिहून होणार नाही. ‘तुम्ही मोकळेपणानं लिहा’ असं सांगणारे निर्माते अजिनाथ आणि कैलास सानप हे तसे टिपिकल निर्माते नव्हतेच. पंचविशी-तिशीतली सामान्य शेतकरी कुटुंबातली मुलं. अजिनाथ तर स्वतः ऊसतोड मजुराचा मुलगा. खरं तर हे वय प्रेमाबिमात झपाटलेलं, हीरोगिरीने पछाडलेलं असतं. दादा-भाऊंचा भक्त होण्याचं, कानाला मोबाईल लावून एक तंगडं वर करून हात हलवत अभिवादन करणारा फोटो मार्केटच्या गावाच्या चौकात लावायचा कसा याचा विचार करणारं, कुठं तरी टपरीवर उभा राहून ‘बस का भावा..’ म्हणत समोरच्याला टाळी द्यायचं... कैलास सानप तर अशाच वयात निर्माता झाला, ज्या वयात समोरच्याला इंप्रेस करायला जे आपल्याजवळ नाही तेही दाखवायची तयारी असते. पण हा पठ्‌ठ्या निर्माता आहे, हे अर्धा सिनेमा होईस्तोवर मलाच माहिती नव्हतं. तो अगदी स्पॉटबॉयचंही काम करायचा. मला त्याचा कामसू स्वभाव आणि प्रामाणिकपणा खूप आवडला. मग आमची छान गट्टी झाली आणि नंतर मला धक्काच बसला. हा तेविशीतला छोकरासुद्धा एक निर्माता आहे! या मुलांना असलेलं सामाजिक भान कशातून आलं, हे मी कुतूहलाने आजही शोधतोय.

मी संहिता लिहिताना माझं सामाजिक, राजकीय,  सांस्कृतिक आकलन कुवतीप्रमाणे त्यात पेरलं खरं; पण ती संहिता पुढे मला सिनेमा करायला साथ देणाऱ्या माझ्या त्या सहकाऱ्यांनाही ऐकवायची होती, ज्यांना शेती-मातीबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यातल्या काही जणांनी तर आयुष्यात ऊसही खाल्ला असेल की नाही, अशी शंका होती. (मी ‘रसवंतीवरचा रस’ म्हणत नाही) त्यांना उसाची, ऊसतोड मजुराची गोष्ट सांगायची; तीही आवडली पाहिजे, तरच उपयोग. बरं, मला ‘निर्मात्याला गोष्ट आवडेल का?’ ही शंकाच नव्हती. पण तंत्रज्ञ मंडळींना मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यात प्रामुख्यानं होते, डीओपी देवेंद्र गोलतकर. देवाला मी ‘नागरिक’पासून मानतो, कारण अतिशय प्रामाणिक माणूस. त्यात शांत. मला शांत माणसं आवडतात. पण हुशार. त्यामुळे मी देवाला अगोदरच टिपून ठेवलं होतं. माझे सहकारी निवडण्याचा अधिकारही मलाच होता.

मी आयुष्यात कधी कुणाला पटवायचा प्रयत्न नाही केला- अगदी त्या देवालासुद्धा. पण ‘या’ देवाला पटवायचं म्हणून खूप सराव केला. तो खूप निरखून-पारखून काम करतो, हे माहिती होतंच. त्याला गोष्ट आवडली तर तो नाही म्हणणार नाही, याची मला खात्री होतीच. पण ती आवडावी म्हणून गोष्ट सांगायचा नीट सराव केला, तो असा -

 मी पहिला बंदिस्त टाकीवरचा सिनेमा जालन्यात पाहिला, तो सातवीत असताना. आमच्या सरांबरोबर जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्यानं गेलो होतो, तेव्हा. तिथंही सरांना मी म्हटलं, ‘‘सर, पिक्चर नगं.. मला फोटो काढायचा...’’ पण सर मला आणि माझा वर्गमित्र उद्धव खाडेला पिक्चरला घेऊन गेले. तेही दोन विरुद्ध एक मतानं ठरल्यानं. उद्धव पिक्चरच्या गाण्याचा शौकिन. त्यानं अगदी चौथीत असतानाच ऐन प्रार्थनेच्या वेळी ‘तंदाना तंदाना तानधिन तंदाना’ हे गाणं म्हणून मार खाल्ला होता. तो अजूनही तसाच आहे. त्याचं सलून आहे. तो आजही जावळापासून ते दशक्रियाविधीचे केस एकाच मूडमध्ये कापतो. (त्याच्याच नावाचं एक पात्र मी ‘चिवटी’त घेतलं.) असा हाडाचा शौकिन असल्यानं त्याचं मत सरांच्या पारड्यात पडलं. तिथं आम्ही पिक्चर पाहिला तो सुनील दत्त यांचा ‘मंगलदादा’. सुनील दत्त खासदार आहेत, हे सरांनी सांगितल्यावर आणखी अप्रूप वाटलं. पुढं बरेच  दिवस मी संधी मिळेल तेव्हा त्या पिक्चरची स्टोरी उद्धवच्या साथीनं मित्रांना सांगत होतो. त्यामुळं मला बऱ्यापैकी स्टोरी टेलिंगचा सराव झाला. ‘मंगलदादा’च्या दिग्दर्शकापेक्षा जास्त वेळा ती स्टोरी मी मित्रांना सांगितली असेल. तो अनुभव आत्ता कामी आला.

मी देवेंद्रला चार-पाच तास साभिनय गोष्ट ऐकवली. देवाला ती छान दिसली. देवानं शेवटाबद्दल सुचवलं. एखादा माणूस तयार होत असेल, तर आपण काहीही ‘हो’च म्हणतो. बस्स्‌- तसंच झालं. मी देवाला म्हटलं, ‘‘हो! आपण करू...’’ मला देवाला निवडताना आणखी एका गोष्टीचं भान होतं. आपण तंत्र शिकलेलो नाही. आपल्याला किमान तंत्रात बसवणारे सहकारी पाहिजेत. देवा एफटीआयआयचा विद्यार्थी. तंत्रवाले अडाण्यांना खूप चांगलं सांभाळून नेतात, याचा अनुभव मी दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात घेतला होता. मी एका कामानिमित्त मंत्रालयात गेलो होतो. एक अल्पशिक्षित नाही म्हणता येणार, पण शाळेतच न गेलेले मंत्री महोदय ‘प्रति आणि प्रेषक यातला फरक’ आपल्या पीएकडून समजून घेत होते. मला कौतुक वाटलं. त्यांची शिकण्याची जिद्द अजूनही संपलेली नव्हती. विशेष म्हणजे, ते आम्हाला लाजले नाहीत. त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की, हे यांनाही येत नसावं. आपल्यामुळे तेही शिकतील. पी.ए. बिचारे अदबीनं वाकून कानात सांगत होते.

मीही मग त्यांचा आदर्श घेऊन माझे पाच डिपार्टंमेंटचे सहकारी एफटीआयआयचे निवडले. आर्ट डिरेक्टर- तृप्ती चव्हाण. साऊंड- महावीर साबन्नावार, आदित्य. एडिटर- गोरक्ष खांदे, तर ॲक्टर म्हणून खास एनएसडीचे मिलिंद शिंदे, खुद्द मास्तर डॉ. दिलीप घारे, शंभू पाटील, योगेश शिरसाट, भगवान मेदनकर आणि संभासहित आमचा रंगमळा. रंगमळाला तर पाहायचंच काम नव्हतं. आपल्या घरी लग्न असल्यासारखेच सगळे झटत होते. त्यामुळं माझं काम खूप हलकं होत होतं. सिनेमा बनवायला खूप पेशन्स लागतात, याचा अनुभव लहानपणीच घेतला होता. तसा हा माझा लौकिक अर्थाने पहिला, पण खरं तर दुसरा सिनेमा...

लहानपणी जत्रेत मी एक सिनेमा बनवून पाहिला होता. काहीही तयार व्हायला वातावरणच लागतं- अगदी दळणातले किडे असोत की पावसाळ्यातले पंखांचे घोडे! ज्याचा-त्याचा मोसम असतो. तसा यात्रेच्या हंगामातच आमच्याकडे सिनेमाचा ज्वर चढायचा. माझी काही मोठी चुलत भावंडं मला कधी-कधी राजेश खन्ना म्हणायची. खन्ना, कपूर ही मला दादा, अप्पा, भाऊसारखी टोपणनावं वाटायची. इतकंच काय- नव्या साड्यांच्या, पातळांच्या पॅकिंगवर जेव्हा श्रीदेवीचा फोटो आला, तेव्हा मला वाटलं- हिच्या डोक्यावर मुकुट घालायचा विसरला असेल, म्हणून मी पेनानं तिच्या डोक्यावर मुकुट काढला. तीच कल्पकता चिवटी करताना माझ्या उपयोगाला आली. (अशोक देवकर जेव्हा सीनसाठी उभा राहिला, तेव्हा याच्या हातात दुधाचा कॅन आणि मेळवणीचं टोपलं पाहिजे, असं वाटलं.)

यात्रेतल्या सिनेमात आमचं दर वर्षी वर्कशॉपच व्हायचं. संध्याकाळी पिक्चर संपला की, जणू काय आम्हाला प्रोजक्ट दिलाय, असं डोक्यात घोळायचं. यात्रेत एक दुकान यायचं. पंधरा पैशाला पुंगळी. ज्या नावाची पुंगळी निघेल, ती वस्तू तो दुकानदार द्यायचा. त्यात मोठमोठ्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. घड्याळ, गाडी, विमान, फोटो. माझा मित्र घडीच्या आशेने ते खेळण्यासाठी थांबला, तर त्याला फिल्मचं एक बंडल लागलं. त्यात पंचवीस फिल्म होत्या. मी ‘बघू दे’ म्हणून त्याच्या हातातून घेतलं. त्याच्यात वेगवेगळ्या हीरो-हिरोईनचे चित्र. मी पटकन खाली खेळायला बसलो. पण मला फिल्मऐवजी नको असलेल्या गोष्टी मिळाल्या. मी त्या दुकानदाराला म्हटलं, ‘‘मला याच्याऐवजी त्या फिल्म द्या.’’ तर तो खऊट माणूस माझ्यावर वसकला. मग मी माझ्या त्या मित्राला म्हटलं, ‘‘मला त्या फिल्म दे,’’ तर त्याला दुकानदार आणि माझ्यातल्या संवादाने आपल्या हातात कोहिनूर-गिहिनूर लागला असं वाटलं की काय, कुणास ठाऊक? तो मला फिल्म द्यायला तयार नव्हता. सेम अनुभव आम्हाला चिवटीच्या एका लोकेशनच्या वेळी बीडला आला. एका व्यक्तीचं घर पसंत पडलं, पण तो शूटिंग म्हटल्यावर देईना. त्याला आमच्याकडून घर विकत मिळेल इतक्या पैशाची अपेक्षा होती. लहानपणी त्या फिल्मवाल्या मित्रानं असंच केलं होतं. मग मी त्याला दोन वस्तू देऊन त्यातल्या अर्ध्या फिल्म घेतल्या.

यात्रेतून आणलेल्या त्या फिल्ममधलं सगळं मोठ्या पडद्यावर बघायचं होतं. त्यात मी शॉर्ट झालेला बल्ब शोधायला लागलो. खरं तर आई फुटलेला- शॉर्ट झालेला बल्ब घरात ठेवणं सोडा, साधं उकिरड्यावरसुद्धा कधीच टाकून देत नव्हती; खत शेतात नेताना काच हाता-पायात घुसतात म्हणून. मग बल्बचा ठरलेला विसर्जन पॉइंट म्हणजे  कायमच्या दुष्काळानं बेरोजगार झालेली नदी. मी शोधतशोधत नदीकडं गेलो. तिथं मात्र मला हवे तसे बल्ब मिळाले. मी त्यांना सन्मानाने घरी आणलं. त्यांचं काळं डांबर काढलं. त्यात पाणी भरलं. मी त्याला फिल्म लावून पाहिली, पण मला हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मी अंधाराच्या शोधात लागलो. घरातले दोन आरसे गोळा केले. त्यातला एक फुटलेला असल्यानं माझं काम अगदीच सोप्पं झालं. मी त्यांना चौकटमुक्त केल्यानं प्रत्येक जण स्वतंत्र झाला.

तेव्हाचे हे आरसे म्हणजे माझे सहकारी, तेही असेच पाच-सात होते आणि मी माझ्या सोईनं सूर्याचं ऊन माळवदावरून खोलीत नेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण एक टप्पा आरसा कमी पडत होता. काय करावं, सुचत नव्हतं. आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याच्यातल्याच एका तुकड्याचे दोन करावेत का, असं वाटलं पण पुन्हा धस्सं झालं. असा मुद्दाम गुन्हा करण्याइतपत धाडसी मी कधीच नव्हतो. मी आरशाच्या स्टेप बदलल्या आणि आहे त्या उपलब्ध तुकड्यांत सूर्याचा प्रकाश खोलीत आणला. ही गोष्ट एका दिवसात झाली असं नाही, तर अख्खा उन्हाळाभर हाच कार्यक्रम चालला.

तेव्हा तरी आई होती ओरडायला, ‘उन्हात खेळू नका’ म्हणायला. पण चिवटीच्या वेळी आम्हाला कुणाचाच धाक नव्हता. दुष्काळी मराठवाडा दाखवायचा म्हटल्यावर, मराठवाड्याची जानपहचान असणारा उन्हाळा- तोही ‘मे’मधला. त्यात माळरानात, म्हणजे सूर्याचं तापमान. तव्यावर पापड भाजावा अशी माणसं भाजत होती. खास करून मुंबईहून आलेली टीम. डिरेक्शन टीमचा हेड सूरज हा खासा मुंबईहून आलेला गोरागोमटा, पण आमच्यात राहून तोही आमच्यासारखाच झाला. त्याला आम्ही गमतीने म्हणायचो, ‘तू जर घरी गेलास तर आई विचारेल, कोन चाहीए?’ कदाचित इंग्रजही उन्हाच्या भीतीपोटीच मराठवाड्यात आले नसतील. इथं राहिले तर तिकडचे यांना काळे समजायला लागतील! अशा वातावरणात काम सुरू होतं. वातावरण सगळं भारलेलं आणि भाळलेलं.

बीड परिसरात पहिल्यांदाच शूट होतंय आणि तेही आपलीच मुलं करताहेत म्हटल्यावर सहकार्याला सीमाच नव्हती. सिनेमात लग्नाचा एक सीन होता. वंजारवाडीला शूट होतं. गावात आम्ही आदल्या दिवशी सांगितलं, ‘‘उद्या लग्नाचा सीन आहे, तर तुम्ही वऱ्हाडी म्हणून पाहिजे आहात.’’ दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल टाइमला टीम पोचली तर तोपर्यंत शे-दोनशे माणसांचं वऱ्हाड अगदी गोवर्धन मुहूर्ताला रेडी...! लग्नाचं शूट दोन दिवस चाललं. किमान दोन हजार लोक तरी या सोहळ्याला हजर असतील- अगदी सजून. त्यात कुतूहल या गोष्टीचं की, एक ताई नवऱ्या मुलाला आतओवाळणीही घेऊन आली होती. ती बिचारी मंडपाच्या दारातून दिवसभर हटलीच नाही. तेच जर एखादा ॲक्टर असेल, तर थोडाही विलंब लागायला की लगेच विचारणार, ‘माझं झालं का? मी जाऊ का?’ किंवा ‘माझं नसताना मला का बोलावलं.’ तिथे ना तर कमर्शिलपणा होता, ना चमकण्याची हौस होती.

कमालीचं सहकार्य त्या भागातली माणसं करत होती. एक प्रसंग मला कमालीचा हलवून गेला. वंजारवाडीत शूट चालू होतं. सिंकसाऊंड असल्याने टेकच्या वेळी सगळ्यांना गप्प बसवलं जायचं. अगदी दुसऱ्या गल्लीत काही चाललं असलं, तरी ते शांत व्हायचे. असाच एकदा सीन सुरू असताना एक ताई तिच्या छोट्या लेकराला मांडीवर घेऊन दारातूनच शूट पाहत होती- माझ्या मॉनिटरच्या अगदी हाकेच्या अंतरावरून. मधेच तिचं बाळ रडायलं, तसा बाऊन्सरने ‘सायलेन्सऽऽ’ म्हणून मोठ्याने आवाज दिला. तसा तो आवाज बंद झाला. माझ्या मनात काय आलं, कुणास ठाऊक की- हा आवाज एकदम बंद झाला कसा? म्हणून मी त्या दिशेला सहज वळून पाहिलं, तर तिचा हात बाळाच्या तोंडावर होता! मी ओरडलो, ‘‘तोंड सोडऽ’’. एरवी सेटवर एकदम शांत असणारा मी एवढा कुणावर ओरडलो, म्हणून सगळेच बघायले. कुणाच्याच लक्षात येईना. पण त्या ताईनं माझ्याकडं पाहिलं आणि ते बाळ पुन्हा रडायला लागलं. मग मी ते शांत होईस्तोवर थांबलो.

बीड परिसरात शूट चालू असताना एक सात-आठ वर्षांचा मुलगा रोज शूटला यायचा. पहिले दोन-तीन दिवस तो शूट पाहण्यात गुंगला. नंतर तो माझ्याकडे मॉनिटरजवळ येऊन बसायला लागला. सुरुवातीला बाऊन्सर त्याला तिकडे येऊ देत नव्हते, पण माझं लक्ष गेल्यावर मग मी ‘त्याला येऊ द्या’ म्हणून सांगितलं. मला तो वेगवेगळे प्रश्न विचारायचा. मला अगोदर वाटलं, तो याच गावचा असेल. नंतर कळलं, तो माजलगावहून यायचा. त्याला विचारलं, ‘‘कुणाबरोबर आलास?’’ तर तो म्हणाला, ‘‘आपल्याच बरोबर.’’ दुसरे आलेले म्हणाले शूटिंग पाहायला? तर  म्हणाला, ‘‘नाही, काम करायला आलो.’’ जेवणाची वेळ झाली तेव्हा त्याला मी ‘जेवायला चल’ म्हटलं तर तो म्हणाला, ‘‘डब्बा सोबत आणलाय’’ आणि खरंच ‘लंचब्रेक’ म्हणताच त्याचा डब्बा घेऊन एक मुलगा आला. तो थोडा मोठा होता. त्याच्याकडे चौकशी केली असता असं कळलं, त्या छोकऱ्याच्या तैनातीत एक स्कॉर्पिओ, दोन माणसं होती. ती त्याला रोज शूटला घेऊन यायची. पॅकअप झालं की, घेऊन जायची.

मला त्याच्या आई- वडिलांचं कौतुक वाटलं. नाही तर आपला बाप थोडं काही वेगळं करायचं म्हटलं तर डायरेक्ट ‘भिकं मागतान’ म्हणून शाप देऊन मोकळा होणार. मी त्याला सांगून त्याच्या आई- वडील दोघांनाही शूटवर बोलवलं आणि त्या छोट्या राज जगतापला एका सीनमध्ये घेतलं.

बीड परिसर आपलाच असल्यानं मजा यायची. काम जरी मराठवाड्यात करत असलो, तरी वेळ बंबई टाइम. वेळ इतका पाळून की, मी शाळेत असताना प्रार्थनेवेळी कायम गैरहजर, पण शूटच्या वेळी पहिल्याच दिवशी कॉल टाइम चारचा होता. मी पहाटे तीन अठ्ठावनला हॉटेलच्या खाली. त्यात तारा जुळणं म्हणजे काय असतं, याचा प्रत्यय मला आणि गोलतकरांना आला. ते हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहायचे आणि मी खालच्या. पहिल्या दिवशी मी पहाटे तयार होऊन दरवाजा उघडला, तर गोलतकर समोरून जात होते. दुसऱ्या दिवशीही सेम तसंच. दरवाजा उघडला, गोलतकर हजर आणि तिसऱ्या दिवशीही दरवाजा उघडला तर ते पायऱ्याच उतरताना दिसताच तेवढ्या पहाटे आम्ही दोघेही हसायला लागलो.

डिरेक्शन टीममधली मुलं भारी होती. मी लगान टीमच जमा केलेली. माझ्यासहित सगळी अडाण्याची फौज. पण प्रचंड हुशार. सगळे वेगवेगळ्या विषयांचे उच्चशिक्षित. जगातलं काही माहीत नाही, असं नाहीच. वेशभूषाकार गीता गोडबोले तशा आमच्यात सगळ्याच बाबतीत सिनिअर. पण मॅडम कशा बेमालूम मिसळल्या, ते कळलंच नाही. एखादा सहकारी साखर कारखाना उभारावा, तसं आम्हाला चिवटीसाठी सगळ्यांचं सहकार्य.

शूट सुरू होण्यापुर्वी मला निर्माता अजिनाथची भाषाच कळेना. नीट कम्युनिकेशन होईना. म्हणून मला अडचण निर्माण व्हायची वेळ आली, तेव्हा संदेश भंडारेसर खास पुण्याहून येऊन सेटवरच हजर राहिले आणि आमच्यातील भाषेची अडचण दूर झाली. काम सुरळीत सुरू झालं. खरं तर कुठलंही काम सलग सुरू राहिलं तर सोपं जातं, पण सिनेमाचं तसं नाही. आपल्याला वेगवेगळे मोसम दाखवायचे असल्यानं वेगवेगळ्या मोसमाची वाट पाहावी लागली. त्यात ऊसतोडणीचा हंगाम हा गरजेचाच. पण कारखाना कसा मिळवावा, या विवंचनेत असतानाच ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पेसरांची आठवण झाली. पुढे सर म्हणजे आमच्यासाठी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्गच ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, लेखणीचा अवघा महाराष्ट्र चाहता. त्यांनी आमची लोकेशन पाहणीच्या निमित्तानं टूरच काढली. अवघा पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक फिरवला आणि पसंतीक्रम देण्यास सांगितलं.

मला परत तेच वाटलं- नुसतं लोकेशनच नाही, तर विचारही जुळले पाहिजेत. म्हणून मी सा.रे.पाटलांच्या विचारांनी दरवळलेला आणि गणपतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या दत्त कारखान्याची निवड केली. सरांच्या शब्दावर दादांनी आमच्या कल्पनेच्याही पलीकडे लाखोंचं मोल फिक्कं पडावं असं काम केलं. दादांसारखा सहकारातला निर्मळ माणूस माझी काही मतं बदलायला कारणीभूत ठरला. दत्तच्या कॅन्टीनची बेसन- भाकरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला बोलावून घेऊन आवडीने खाऊ घातली. तेव्हाच लक्षात आलं, या मातीत सहकाराच्या गंगेला खांडडोह का नाहीत; ती अव्याहत का वाहते!

सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर आपण जसे हुंदडायचो- बस! तसंच चिवटीचं सेकंड शेड्यूल आम्ही शिरोळच्या दत्त कारखान्यावर केलं. शेड्यूलच्या नेमके आधी चार दिवस नोटबंदी लागली होती. पण आमच्यावर त्याचा शून्य परिणाम होता. म्हणजे आमच्याजवळ बंडलं येऊन पडली असं नाही, पण आम्हाला भक्कम पाठबळ होतं. आम्हाला कारखान्यानं सगळंच उपलब्ध करून दिलं होतं. आम्ही वीस दिवस तिथं शूट केलं... तिथली माणसं खूप मायाळू. शेखर कलगी हे आमच्या व्यवस्थेसाठी दादांनी खास आमच्याकडे पाठवले. शेखर कलाकार. स्वतःचा आर्केस्ट्रा. आमची पत म्हणजे शिरगुप्पेसर आणि शेखर सावलीसारखे आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्या सावलीतच हे सगळं केलं.

सिनेमा तीन टप्प्यांत पूर्ण झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाच महिन्यांचं अंतर. तिसऱ्या टप्प्यात तब्बल दोन वर्षांचं अंतर. महापुरानं दुथडी वाहणारी एखादी नदी भेदताना ऐन धारेत दम कोता पडावा, तशी अवस्था  आमच्या अनुभवशून्य टीमची झाली. निर्माता आजिनाथ आणि कैलासची पुरती दमछाक झाली. मी झीरो क्रेडिटचा. मंदिर झालं, फक्त मूर्तीला पैसे नाहीत म्हणून रखडलं. शिरगुप्पेसर आणखी जोमानं कामाला लागले. आम्हाला चार ठिकाणी घेऊन गेले. पण मजुराचा विषय म्हटल्यावर कुणीच करायला धजत नव्हतं. ती त्यांची पैशाची गणितं मांडत. रिकव्हरीचं बोलत. समाज रिकव्हरीचं बघतो. मला का कुणास ठाऊक, पण वाटायचं- बालाजीच्या झोळीत गुप्त दान टाकताना हा विचार सुटतो. सिनेमाची टीम संयम ठेवून होती. हितचिंतक प्रयत्न करत होते. आम्ही जे काही हातात अर्धवट होतं, ते लोकांना दाखवत फिरायचो. कैलास सानपनं तर सिनेमासाठी गाव सोडलं आणि सिनेमा दाखवत, कुठे काही होतंय का ते पाहत फिरायला सुरुवात केली. आम्ही एवढ्या तणावातही हँसी-मजाकमध्ये म्हणायचो - ऊसतोड मजुरांचे प्रश्न मांडताना आपण आपल्यापुढं प्रश्न उभा करून बसलो! इतके पैसे खर्चून जर ऊसतोड मजुरांचा पक्ष काढला असता, तर त्यांचे प्रश्न नका का सुटायनात; आपल्यासमोर तर प्रश्न उभे नसतेच राहिले, उलट आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्रश्न सुटले असते.

शेवटी काही तरी हालचाल करावी म्हणून आम्ही पुन्हा प्रयत्न केले. अजिनाथने नरेंद्र भिडेंचा डॉन स्टुडिओ गाठला आणि एमजेएम भिडेसरांना सिनेमा आवडला. त्यांनी विषयासाठी आम्हाला बऱ्याच सवलती बहाल केल्या. सरांनीच त्याचं पार्श्वगीतही केलं आणि इकडे एमजेएममध्ये सिनेमाशी संबंधित स्कूल उघडलंय. तिथे शिव कदम काम करतात. गेल्या वर्षी मला एक शॉर्टफिल्म करायची होती, त्यासाठी प्रदीपदादा मला एमजेएमचे सचिव अंकुशराव कदमसरांकडे घेऊन गेले. ‘शिवाजी अंडर ग्राऊंड’मुळे मला ते ओळखत होते. मी त्यांच्याकडे सकाळी अकराला गेलो. तीनदा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण होईपर्यंत- म्हणजे आम्ही साडेसहा वाजेपर्यंत बसलो. मला त्यांना शॉटफिल्मला मदत मागता आली नाही. बाहेर आल्यावर प्रदीपदादा खूप चिडले माझ्यावर. पण पुन्हा म्हणाले, ‘‘मला वाटत होतं, मी म्हणू का? पण माझाही तोच प्रॉब्लेम!’’

शेवटी बाहेर पडताना काम चालू असलेलं डिपार्टमेंट  शिवने दाखवलं आणि म्हणाला, ‘‘आता लवकरच इथे पूर्ण सिनेमा बनणार, इथे सगळं अव्हेलेबल असणार.’’ मी तेवढंच कुठं तरी डोक्यात घेऊन गेलो आणि परत आलो, ते शिवला भेटायला. शिवने कदमसरांकडे नेलं. मी दिसताच ते म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला शोधतो आणि तुम्ही पुढे पळता!’’ हा त्यांचा मोठेपणा. मी विषय त्यांच्या कानावर घातला आणि म्हटलं, ‘‘थोडं शूट बाकी आहे. डिपार्टमेंटची मदत हवी. शेवटचा दरवाजा म्हणून आलोय.’’ ते म्हणाले, ‘‘पहिला का नाही’’ आणि त्यांनी सांगितलं, ‘‘यांना हवी ती मदत करा.’’ शूट पूर्ण झालं.

विनायक पवारने लिहिलेल्या लावणीला शकुंतला नगरकरांसारख्या अनुभवी कसलेल्या कलावंताने कोरिओग्राफ केलं, तर बेला शेंडेच्या आवाजात आशुतोष वाघमारे यांनी संगीतबद्ध केलं. शीतल साठेचा काळजाला चिरणारा आवाज सिनेमाची उंची वाढवताना काळजात खोल घुसतो. उमेश घेवरीकर आणि डॉ.सूरज अर्दड यांसारखे मदतीचे खूप सारे हात लागल्याने बुडत्याला काडीचा आधार मिळाला. आमच्या रंगमळ्याची मैत्रीण प्राची पिंगळेने सबटायटलला मदत केली आणि सिनेमा पूर्ण झालाय.

पहिलाच बॉल बाउंड्रीपार म्हणावं, तसं पहिली एंट्री ‘मामि’ला पाठवली आणि त्यांचा मेल आला,Congratulations. मला इंग्रजी नीट वाचता येत नसल्यानं खात्रीसाठी देवेंद्रला मेसेज फॉरवर्ड केला आणि कळलं, आपली निवड ‘मामि’च्या इंडिया स्टोरी डिपार्टमेंटला झाली. डिक्लेअर होईपर्यंत कुणाला सांगायचं नाही म्हणाले. तरी कुणालाच नको सांगू म्हणू-म्हणू पाच-पंचवीस जणांना सांगितलं... कधी कधी स्वतःचंच स्वतःला कुतूहल वाटतं, तर कधीकधी हसू येतं. त्यासाठी स्वतःकडं पाहायला वेळ द्यावा लागतो. मात्र स्वतःत गुंतायचं नसतं. आज या ‘चिवटी’च्या निमित्तानं सहज क्षणभर स्वतःकडं पाहावं वाटलं तर.

एक वेळ... आमचं सिनेमा पाहायचं ठिकाण पहिलं- जत्रा आणि दुसरं- फिरती टुरिंग टॉकीज. सिनेमा पाहण्यापेक्षा जास्त आकर्षण तो कसा बनत असेल याचं होतं. लहानपणी तर हे लोक रिळात कसे शिरले असतील... रथ, गाड्या, घोडे, बैल, आपल्यासारखी छोटी-छोटी मुलं... त्यांना पिक्चर संपल्यावर त्या रिळात राहायला करमत असेल का... आता काय करत असतील... म्हणून सकाळीच उठून टॉकिजकडं गेलो होतो. सकाळी-सकाळी पडद्यावर असल्यानं काहीच दिसलं नाही. मग त्यांच्या राहुटीत डोकावून पाहिलं- तर रात्रभर जागून तिकीट विकणारे, भोंगा घेऊन अनाऊन्समेंट करणारे- सगळेच गाढ झोपलेले दिसले. मग एकानं सांगितलं की, हे सगळं शूटिंगच्या वेळी एकदाच जमवावं लागतं. परत हे घेऊन गावोगावी फिरायची गरज नसते. तिथेच कुणी तरी मला एक कटलेली फिल्म दाखवली. नंतर कळलं, हे फोटोसारखच असतं. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न केला.

आमच्या जांबाच्याच जत्रेत मला त्या फिल्मचं वेडच लागलं. पिक्चरची टाकी उठून गेल्यानंतर काढलेल्या रीळ शोधायला मी यात्रेत गेलो. पण तिथं माझ्या अगोदरच बरेच भावी दिग्दर्शक ते आधीच गोळा करत होते. मी जरा जास्तच बारकाईने पाहिल्याने अर्धवट मातीत पुरल्या गेलेल्या चार- दोन फिल्म सापडल्या. पण मी तिथं हे शिकलो की- सिनेमाला नुसता ध्यासच असून भागत नाही, तर सूक्ष्म नजरही लागते. लोकांच्या नजरेतून सुटलेलं आपण शोधून लोकांच्या नजरेत आणायचं असतं, तेही तुमच्या मातीतलं. कदाचित त्या मातीतली फिल्म उचलायला मला थोडीही शंका, शरम वाटली नाही; म्हणूनच कदाचित ‘चिवटी’सारखा मातीतला विषय हाताळताना मनाला संकोच वाटला नाही...

Tags: film Sugar factory sugarcane labourers Marathwada Devendra Golatkar Kailas Sanap Ajinath Dhakane Chiwati cinema drama Rajkumar Tangade ‘Chiwati’magchya gosti Sadhana Diwali issue 2019 weekly Sadhana चित्रपट साखर कारखाना ऊसतोडकामगार मराठवाडा देवेंद्र गोलतकर कैलास सानप अजिनाथ ढाकणे चिवटी सिनेमा नाटक राजकुमार तांगडे ‘चिवटी’मागच्या गोष्टी साधना दिवाळी अंक 2019 साप्ताहिक साधना weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजकुमार तांगडे
rajkumar.tangade@gmail.com

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात