डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चिंतामणराव देशमुखांचे कनिष्ठ बंधू श्री. दा. उर्फ राम देशमुख यांनी पूर्वीही चिंतामणरावांविषयी लेखन केले. या अंकासाठीही त्यांनी लेख लिहिला होता. तो दीर्घ असल्यामुळे आम्ही त्यातील निवडक भाग संक्षेपाने देत आहोत.

संस्कृत भाषेवर चिंतामणरावांचे गाढ प्रेम होते. पण त्यातही ‘मेघदूत’ म्हणजे त्यांच्या मर्मबंधातली अमूल्य ठेव होती. मेघदूतच का? असा प्रश्न कदाचित कुणाला पडेल. त्याचं उत्तर एकच - त्यांची प्रथम पत्नी रोझिना राहिली इंग्लंडमध्ये. 1939 मध्ये दोघांची ताटातूट झाली. त्या 1949 मधे निधन पावल्या, पण शेवटपर्यंत भारतात आल्याच नाहीत. अधूनमधून परदेश दौऱ्यावर गेल्यावर सी.डी. त्यांना भेटू शकत पण एरवी दशवार्षिक शाप मिळालेल्या यक्षाचा भोगच त्यांच्या वाट्याला आला होता. ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. अधिकारपदाची 5 वर्षे संपल्यावर आपण रोझिनाच्या देशात जाऊन पुन्हा संसार करणार अशी स्वप्न सी.डी. सतत पाहत असत. 

नोकरी खरं तर 1948 साली संपायची होती पण भारत सरकारच्या आग्रहामुळे जून 1949 पर्यंत चिंतामणराव काही तिकडे जाऊ शकले नाहीत. नंतर बाडबिस्तरा घेऊन निघणार तो रोझिना गेल्याची तार आली. यक्ष शापित तो शापितच राहिला.

पुढे त्यांचा दुर्गाबाईशी विवाह 1953 मधे झाला. पण दुर्गाबाईंची मृत्यूपूर्वीची 10 वर्षे व्याधींशी झगडण्यात गेली. शेवटचे दीड वर्ष तर सी.डी. अगदी एकाकी आणि निराधार होते. पण ही विचित्र सजाही त्यांनी धीरगंभीरपणे सोसली.

---

आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीशी भावनेने एकात्म असलेले चिंतामणराव बाह्यतः नखशिखान्त पाश्चात्य वाटत. केंब्रिजच्या त्यांच्या कॉलेजच्या अहवालात त्यांच्यावर ज्याने टिपण लिहिले, त्याने सीडींच्या व्यक्तित्वाचा हा विशेष बरोबर टिपला होता. लग्नसंस्था आणि पत्नी यांच्या पावित्र्याविषयी त्यांची ठाम भूमिका होती आणि गंमत म्हणजे स्त्रीपुरुष संबंधांत पुरुषाने स्त्रीचे मन सदैव जपले पाहिजे याविषयी त्यांचा आग्रह, दुराग्रह म्हणण्याइतका पक्का होता. तसे पाहिले तर ते आणि त्यांची प्रथम पत्नी रोझिना या दोघांतील बौद्धिक आणि शैक्षणिक अंतर केवढे तरी मोठे होते, पण तरीही रोझिनाचा शब्द त्यांनी कधी खाली पडू दिला नाही. इतकेच नव्हे तर रोशझिनामुळे सीडींचे मन पश्चिमेकडे खेचले जात होते. उत्तरायुष्यात दुर्गाबाईंशी विवाहबद्ध झाल्यावर आकर्षणाची दिशा बदलली आणि पश्चिम आणि पूर्व दिशांच्या आकर्षणात सीडींचे दोलायमान मन भिरंगत राहिले.

---

आपल्या मूल्यांबाबत चिंतामणराव नेहमी जागरूक आणि आग्रही असत. दुर्गाबाईंशी विवाह झाल्यानंतर तीन वर्षे ते मंत्रिमंडळात होते. त्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे डोके वर काढू लागली होती. त्यांपैकी काहींमधे पंडित नेहरूंचे काही निकटवर्ती सापडले असावेत असा दाट वहीम होता. अंती महाराष्ट्राच्या जटिल प्रश्नानेही उग्र रूप धारण केले होते. या काळात सी.डी. वाजवीपेक्षा अधिक निकरावर येत गेले असे त्रयस्थांना वाटले आणि असे वाटणे निराधार होते असे म्हणता येणार नाही. या काळात सी.डी. जरा अधिक संयमाने वागते तर देशाच्या इतिहासाला कदाचित वेगळी कलाटणी मिळाली असती.

---

पंडित नेहरूंना चिंतामणरावांबद्दल केवढा आदर वाटत होता याचे दर्शन घडवणारे 1948 मधले एक पत्र - I have been somewhat distressed to learn that you are thinking of retiring from the Reserve Bank and in fact of leaving the country. I am told that you have come to this decision chiefly because of personal and domestic reasons. It is difficult for me to say much when such reasons influence a decision. But nevertheless it is a bit of a shock to feel that you might be leaving. I need not tell you how much all of us, more specially I, have valued your work in the Reserve Bank, Even if you leave the Reserve Bank, which I of course do not want you to do, you are too valuable a person for the country to lose. You know well how difficult it is for us to find first-rate men for any important work. Your departure would make a difference.
- Jawaharlal

हे पत्र वाचताना मन भरून येते. आपला देश सोडून जाणाऱ्या आपल्या एका अधिकाऱ्याला, ‘देश सोडून जाऊ नको रे’, अशी विनवणी करणारा पंतप्रधान आणि ज्याची विनवणी करावी असे पंडितजींना वाटले तो अधिकारी या दोघांबद्दलही अतिशय आदर वाटतो. इंग्लंडमध्ये एका आंतरराष्ट्रीय बैठकीच्या वेळी राणी एलिझाबेथशी ओळख करून देताना सीडींची ओळख पंडितजींनी ‘हे माझे सर्वात तरुण मंत्री’ अशी करून दिली. चिंतामणरावांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि बुद्धिमत्तेवर प्रेम करणाऱ्या पंडित नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात ओढण्याचा प्रयत्न 1959 पर्यंत पुन्हापुन्हा केला. सी.डी. गेले नाहीत. नेहरुंच्या कारकिर्दीतच भ्रष्टाचाराचा शिरकाव वरिष्ठ वर्तुळापर्यंत झाला होता. सीडींचा त्याला प्रखर विरोध होता. पंडित नेहरुंवरही टीका करणे त्यांनी सोडले नाही. पण ही टीका त्यांनी अधिक संयमाने करावयास हवी होती, असे आता म्हणावेसे वाटते.

---

अर्थमंत्रीपद सोडल्यानंतर सीडींनी बहुविध महत्त्वाची पदे, त्या पदांची शान वाढावी अशा शानदारपणे भूषवली. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष, दिल्ली विश्वविद्यालयाचे कुलगुरू ही त्यांतील दोन महत्त्वाची पदे. दुर्गाबाई सोशल वेल्फेअर बोर्डाच्या अध्यक्षा होत्या, पण आंध्र महिला सभा आणि तिच्याभोवती त्यांनी जवळजवळ एकटीच्या हिमतीवर उभ्या केलेल्या असंख्य संस्था यांची दुर्गाबाईंना खरी ओढ होती. आपल्या मार्गदर्शनासाठी आणि साहाय्यासाठी सीडींनीही हैदराबादला यावे, अशी त्यांची इच्छा होती. 

त्याप्रमाणे सी.डी. 1965 नंतर हैदराबादला गेले. याला कोणी नावे ठेवतील पण चिंतामणरावांनी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. पुढे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्षपद, या महत्पदाची संधी चालून आलेली असताना तीही त्यांनी नाकारली. हे त्यांनी योग्य केले का? एका दृष्टीने विद्यापीठ अनुदान मंडळाची मासिक तीन हजारांची नोकरी करण्याऐवजी नाणेनिधीची दरमहा पस्तीस हजार देणारी नोकरी नाकारणे याला त्याग म्हणता येईल, पण आर्थिक नफा नुकसान ही क्षुल्लक बाब असून देशाची इभ्रत महत्त्वाची असेल तर त्यांनी नाणेनिधीची सर्वोच्च जागा नाकारायला नको होती खास!

---

प्रखर मूल्यांची कठोरपणे जपणूक केली हा चिंतामणरावांचा मोठेपणा मान्य करीत असताना, पंडितजींसारख्या भारतीय राजकारणातील जनगण-अधिनायकाला राजकारणात कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याची त्यांनी अधिक जाणीव ठेवावयास हवी होती, हे मान्य केले पाहिजे. अशी संवेदनशीलता त्यांच्या ठायी असती तर त्यांच्या हातून देशाची आणि किती तरी भरीव सेवा झाली असती. बुद्धिमत्ता, प्रभावी व्यक्तित्व, निर्भयता असे बहुविध नेतृत्वगुण असणाऱ्या या थोर पुरुषाने भारताची जी सेवा केली ती मोठीच आहे; पण जी सेवा त्यांच्या हातून होऊ शकली नाही ती त्याहूनही अधिक मोठी ठरली असती! असे राहून राहून मनात येते. Heard melodies are sweet but those unheard are sweeter still!

---

चिंतामणरावांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहिलेली कविता -

कावळ्यास

 काका काळा असशि जरि तु सर्व पक्ष्यांत बांका
 का का का का करुनि जन ते पोचवीतोसि नाका
 तू का लोकां तरि न रुचसी काय सांगू जनां 
 का टाका टाका कवि विनवितो काकविद्वेष टाका

Tags: रिझर्व बँक  अर्थतज्ञ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी राम देशमुख जवाहरलाल नेहरू सी.डी. देशमुख Reserve Bank Economist IMF Ram Deshmukh Jawahrlal Neharu C.D. Deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके