डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नेहरूंच्या विचारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन

('नवभारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू' या डॉ.स.रा. गाडगीळ यांच्या ग्रंथास लिहिलेली मौलिक प्रस्तावना)

माझे स्नेही डॉ. स. रा. गाडगीळ यांचा पंडित जवाहरलाल नेहरूंवरील प्रस्तुत ग्रंथ रूढार्थाने नेहरूचरित्र नाही. त्याचप्रमाणे भारतीय राजकारणातील नेहरूयुग म्हणून जो कालखंड ओळखला जातो त्याचा इतिहासही नाही. सन 1929 साली पंडित नेहरू राष्ट्र सभेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी, संपूर्ण स्वातंत्र्य हे यापुढे राष्ट्रसभेचे उद्दिष्ट असेल असे जाहीर केले. तेव्हापासून 1964 साली त्यांचे निधन होईपर्यंतच्या पस्तीस वर्षांच्या कालखंडावर नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा आणि कार्याचा खोल ठसा उमटलेला आहे. शिवाय या कालखंडाचे वैशिष्ट्य असे की त्याचे स्वातंत्र्यलढ्याचा एक आणि प्रशासनाचा दुसरा, असे दोन जवळ जवळ समान भाग पडतात आणि दोन्हींवर नेहरुंचा असाधारण प्रभाव पडलेला दिसून येतो. 

त्यामुळे नेहरुंसारख्या इतिहासपुरुषाच्या जीवनाचे व कार्याचे आकलन आणि मूल्यमापन करण्यासाठी कालखंडाच्या इतिहासाचे नीट आकलन व मूल्यमापन करणे आवश्यक असते. या अर्थाने प्रस्तुत ग्रंथ एकाच वेळी राजकीय चरित्र आणि चरित्रात्मक इतिहास अशा दुहेरी स्वरूपाचा आहे. एकाच्या प्रकाशात दुसऱ्याचे परिशीलन करणे हा त्यामागील हेतू आहे. भारताचा आधुनिक राजकीय इतिहास जसा घडला तसा तो घडण्यासाठी ज्या व्यक्ती, जे विचार आणि ज्या प्रकारचे वातावरण कारणीभूत झाले त्यांत पंडित नेहरूंना मध्यवर्ती स्थान आहे. 

स्वतःवरील इतिहासदत्त जबाबदारीची जेवढी उत्कट जाणीव पंडित नेहरूंना होती तेवढी त्यांच्या समकालीनांना नव्हती. त्यामुळे स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व करीत असतानाच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कशा प्रकारच्या समस्यांना भारताला तोंड द्यावे लागेल याचा ते सतत विचार करीत. त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काही दिशा व कार्यक्रमही स्थूल स्वरूपात का असेनात, त्यांनी मनाशी पक्के केले होते व अनेक प्रसंगी प्रकट चिंतनाच्या रूपाने ते सामान्य जनतेपुढे ठेवून त्यांच्याशी या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्नही नेहरूंनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे केलेला होता. 

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात व्यक्त झालेल्या राष्ट्रीय आकांक्षा आणि स्वातंत्र्यामुळे त्यांची पूर्तता करण्याची मिळालेली संधी यांना जोडणारा दुवा म्हणून पंडित नेहरूंचे भारतीय इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे; आणि या गोष्टीची त्यांना यथार्थ जाणीव होती असे त्यांच्या उक्ती आणि कृतीवरून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे नेहरू आणि नेहरुयुग हे दोन्ही भारतातीलच नव्हे तर जगातील विचारवंतांच्या अभ्यासाचे विषय बनलेले आहेत. याच कारणामुळे नेहरूंसंबंधी आजवर विपुल लिहिले गेले व भविष्यकाळातही भरपूर लिहिले जाईल यात तिळमात्र शंका नाही. अशा कधीही न संपणाऱ्या वैचारिक जिज्ञासेचा एक उल्लेखनीय अविष्कार डॉ. गाडगीळांचा हा ग्रंथ आहे असे म्हणता येईल. 

नेहरू आणि नेहरूयुग यांच्या विश्लेषणासाठी लेखकाने मानसशास्त्रीय दूष्टिकोनाचा आश्रय केला असून नेहरूंच्या यशापयशाची कारणे त्यांच्या मानसिकतेत शोधायला हवीत असे म्हटले आहे. हा विचार मूलतः बरोबर आहे. अनेक प्रकारच्या विरोधाभासांमुळे गुंतागुंतीच्या बनलेल्या त्यांच्या मनाचा वेध घेण्याच्या अशा प्रयत्नांतून नेहरूंच्या सामर्थ्याबरोबरच त्यांच्या दुर्बलतेवरही बराच प्रकाश पडतो. 

नेहरुंचे व्यक्तिमत्त्व कित्येकदा भावनात्मक वादळाच्या उद्रेकात सापडते आणि मग त्यांची अवस्था 'to be or not to be' या हॅम्लेटच्या सुप्रसिद्ध उद्गारांत व्यक्त झालेल्या मनोव्यथेसारखी होते. उदात्त ध्येयाकाशात विहार करणारे नेहरू कठोर वास्तवाला सामोरे जाताना अशा वेळी दिङ्मूढ होऊन जातात आणि आत्मपरीक्षणात मग्न होतात. अशा अंतर्मुखतेमधून कधी अतिशय भव्य, उदात्त आणि तात्त्विक विचार काव्यमय भाषेत व्यक्त होतात तर कधी इतिहास घडवणाऱ्या असामान्य धैर्याची पावले टाकली जातात. यामागे नेहरूंचे मानसिक एकाकीपण आहे. 

कारण कोट्यवधी भारतीयांचे अमाप प्रेम मिळूनही नेहरू अखेरपर्यंत तसे एकाकीच राहिले. सामान्य माणसांच्या भावनांशी त्यांची जवळीक होऊ शकली नाही. याला कारण नेहरूंच्या आचार- विचारांवर झालेले पाश्चिमात्य संस्कार हे होय. त्यांनीच या एकाकीपणाचे प्रांजळपणाने मन हेलावून टाकणाऱ्या भाषेत वर्णन केले आहे. ते म्हणतात, "पूर्व आणि पश्चिम यांचा मी एक विचित्र दुवा आहे. प्रत्येक ठिकाणी परका, कुठेच घरोब्याचा नाही...पाश्चात्य जगात मी तिऱ्हाईत व परकीय असून त्या जगाशी मला समरस होणे शक्य नाही. पण माझ्या स्वतःच्या देशातही कित्येकदा मी निर्वासित आहे असे वाटते." "An aristocrat in love with the masses, a nationalist who represents the culture of the foreigner, an intellectual caught up in the maelstrom (चक्रावर्त) of an emotional upheaval." या त्यांच्याविषयीच्या उद्गारांत नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासाचे मार्मिक चित्रण आहे. 

व्यक्तिमत्त्वातील अनेक विरोधाभासांमुळे नेहरूंचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करताना अनेकदा अडथळे उत्पन्न होतात व त्यांच्यावर परस्परविरोधी आरोप केले जातात. उदाहरणार्थ, त्यांची राष्ट्रवादी आणि आंतरराष्ट्रवादी अशी जी दुहेरी प्रतिमा आहे तिचे ययार्थ आकलन न झाल्याने नेहरूंवर देशहिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरीप केला जातो. अशा आरोपांमागे आणखीही एक कारण असते, आणि ते म्हणजे राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रवाद यांच्यात अनिवार्य द्वैत असते, असे मानण्यात होत असलेली चूक. नेहरू मानवतावादी आणि आंतरराष्ट्रीय होते यांत मुळीच शंका नाही. जागतिक राजनीतीच्या रूढ संकल्पनेला त्यांनी वेगळे वळण लावले. 

द्वेष, शत्रुत्व, सत्तास्पर्धा आणि हिंसा यांची जागा प्रेम, मैत्रीपूर्ण सहकार्य, सहअस्तित्व आणि अहिंसा यांनी घेतली पाहिजे असे कळकळीचे आवाहन युद्धाच्या कड्यावर उभ्या असलेल्या जगाच्या नेत्यांना ते सतत करीत असत. यातून त्यांचा मानवतावाद आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन दिसून येतो हेही खरे. पण तरीही ते प्रथम राष्ट्रवादी होते आणि आपल्या राष्ट्रीय गरजांच्या वास्तव जाणीवेतूनच ते आंतरराष्ट्रवादी झालेले होते ही गोष्ट त्यांचे आक्षेपक लक्षात घेत नाहीत. 

जागतिक शांतता हे जसे त्यांच्या दृष्टीने एक थोर मानवतावादी मूल्य होते तसेच ते भारतासारख्या नवस्वतंत्र देशांच्या अस्तित्वाच्या हमीचे आणि आर्थिक विकासाचे एक अत्यावश्यक साधनही होते. 'India has a vested interest in peace' असे जेव्हा नेहरू म्हणायचे तेव्हा शांततेच्या आग्रहामागे राष्ट्रहिताचाच विचार प्रबळ असायचा. म्हणून नेहरूंचे यथार्थ आकलन करून घ्यायचे असेल तर त्यांच्यामधील राष्ट्रवादी प्रेरणांना दुय्यम स्थान देण्याची चूक आपण करता कामा नये. डॉ. गाडगीळांनी हा मुद्दा अतिशय समर्पक रितीने मांडला असून नेहरूंवरील अनेक गंभीर आक्षेपांना उत्तरे दिली आहेत. उदाहरण द्यायचे तर नेहरूंच्या काश्मीरविषयक धोरणाचे देता येईल. 

काश्मीरबाबत नेहरूंवर त्यांचे टीकाकार दोन आक्षेप घेत असतात. आक्रमकांना संपूर्ण काश्मीरमधून हुसकावून लावण्यापूर्वी काश्मीरचा प्रश्न नेहरूंनी सुरक्षा परिषदेकडे नेण्यात घाई केली. तिथे तो अपेक्षेप्रमाणे शीतयुद्धाच्या डावपेचांचे लक्ष्य बनला व काश्मीरचे दोन तुकडे पडले ते आजवर सांधता आलेले नाहीत हा पहिला आक्षेप. दुसरा आक्षेप हा की नेहरूंनी काश्मीरचे कायमस्वरूपी सामिलीकरण तेथील जनतेचे सार्वमत घेऊन नक्की केले जाईल असे जे आश्वासन दिले ती नेहरूंची फार मोठी चूक झाली व तिचे दुष्परिणाम देशाला आजपर्यंत भोगावे लागत आहेत. 

इथे विरोधकांना असे सुचवायचे असते की नेहरूंनी आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सांभाळण्यासाठी देशहितावर निखारे ठेवले. वरील दोन्ही आक्षेपांना लेखकाने सविस्तर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या संदर्भात समर्पक उत्तरे दिली आहेत. एकतर राष्ट्रा-राष्ट्रांमधले वादग्रस्त प्रश्न संबंधित राष्ट्रांनी सामोपचाराने सोडवावेत नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने सोडवावेत अशी परराष्ट्रधोरणविषयक भूमिका घेतल्यानंतर नेहरूंपुढे संयुक्तराष्ट्रसंघाकडे जाण्यावाचून दुसरा मार्गच नव्हता. हे एकदा मान्य केले म्हणजे मग प्रश्न उरतो तो सुरक्षा परिषदेकडे जाण्यात घाई झाली का एवढाच. ज्या टीकाकारांना घाई झाली असे वाटते त्यांचा असा समज झालेला दिसतो की भारतीय सेना आक्रमकांना हुसकून लावून सबंध काश्मीर मुक्त करण्यात वेगाने यशस्वी होत होती की ते कार्य फत्ते व्हायला फक्त काही दिवसांचाच अवधी लागणार होता. 

तो दिला न गेल्यामुळे भारतीय लष्करात फार निराशा व नाउमेद निर्माण झाली. आपण तोंडघशी पडलो अशी सेनाधिकाऱ्यांची भावना झाली. इथे हे स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे की आक्षेपकांच्या वरील समजाला प्रत्यक्ष रणभूमीवर परिस्थितीचा काही आधार नाही. टोळीवाले व पाकिस्तानी सैनिक यांना हुसकून लावण्याचे काम फार मंदगतीने चालू होते. तशात काश्मीरात हिवाळा सुरू झाला व हिमवर्षावामुळे लष्करी कारवाई जवळजवळ थंडावली. पुन्हा उन्हाळ्यात लढाईला तोंड फुटले पण भारताची चढाई संथ गतीनेच चालू होती. इतका कडवा प्रतिकार शत्रूकडून होत होता. अशा परिस्थितीत हिवाळ्यात सुरक्षा परिषदेकडे केलेली तक्रार आणि उन्हाळ्यात स्वीकारलेला शस्त्रसंधी या दोन्ही निर्णयांना पर्याय नव्हताच ही सत्यस्थिती आहे. 

उरलेला आक्षेप सार्वमताला मान्यता दिल्याबद्दलचा. जर आक्षेपक थंड डोक्यांनी व वस्तुनिष्ठतेने अभ्यास करतील तर त्यांच्या असे लक्षात येईल की संस्थानांच्या सामिलीकरणावरचा अंतिम शब्द संस्थानिकांचा असेल प्रजेच्या इच्छेचा त्यात संबंध नाही, अशी भूमिका भारत कधीही घेऊ शकला नसता. एक तर तसे करणे राष्ट्रसभेच्या आजवरच्या जाहीर धोरणांशी विसंगत ठरले असते. ते राष्ट्रहिताच्या दृष्टीनेही धोक्याचे ठरले असते. कारण मग काश्मीरच्या महाराजांचा शब्द तेवढा अंतिम पण जुगानढच्या नवाबाचा, हैद्राबादच्या निजामाचा किंवा त्रावणकोरच्या महाराजांचा शब्द मात्र अंतिम नाही, अशी उघडउघड विसंगत आणि कोणालाही पटणार नाही अशी भूमिका घ्यावी लागली असती. 

शिवाय सार्वमत घेण्यापूर्वी पाकिस्तानने अनेक अटी पूर्ण करावयाच्या होत्या. त्यात टोळीवाल्यांसह संपूर्ण काश्मीरमधून माघार, काश्मीरमध्ये पूर्ववत् शांतता, सार्वमताचे वेळी धार्मिक आवाहनांवर बंदी आणि सार्वमतात पाकिस्तानला कोणतीही भूमिका नाही, यांसारख्या अटी होत्या. त्या पाकिस्तानने कधीच मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता सार्वमताचा प्रश्न निकालात निघालेला आहे हे जगाला कळून चुकले आहे. त्यामुळेच सार्वमताचे तुणतुणे पाकिस्तान वाजवीत राहिले तरी त्याकडे जग लक्ष देत नाही. 

डॉ. गाडगीळांनी आपल्या ग्रंथात नेहरूंच्या भूमिकेची पूर्वपीठिका तपशीलवार दिली असून नेहरूंचे धोरण त्या वेळच्या परिस्थितीत कसे योग्य होते ते साधार दाखवले आहे. 

नेहरूंच्या परराष्ट्रधोरणाची इतर अपयशे म्हणजे भारत-चीन संबंध, अलिप्ततावादामुळे जगात भारताला निःसंशय आपला म्हणता येईल असा मित्र नसणे आणि एकीकडे अलिप्त असल्याचा दावा करीत असतानाच सोव्हिएत युनियन व एकूण साम्यवादी जग यांच्या बाजूने झुकते माप देणे व त्यामुळे अलिप्ततेच्या आग्रहामागील विश्वासार्हता गमावणे वगैरे अन्य आक्षेप नेहमी घेतले जातात. त्या बहुतेकांचा परामर्श लेखकाने अतिशय समर्थपणे घेतला आहे. 

"स्वातंत्र्यसंग्रामाचे अंतिम पर्व" आणि "दुसरे महायुद्ध आणि नेहरूंचा आंतरिक संघर्ष" ही ग्रंथातली अत्यंत वाचनीय प्रकरणे आहेत. पहिल्यात 1942 च्या "भारत छोडो" आंदोलनापासून सिमला परिषद, त्रिमंत्रीयोजना व शेवटी माउंटबॅटन यांची विभाजनासह स्वातंत्र्याची योजना यांची चिकित्सक चर्चा असून सत्तासंक्रमणाकडे जाणारे हे कधी रोमांचक तर कधी कारुण्यपूर्ण नाट्य कसकसे उलगडत गेले, त्यात काम करणारे नट कोण व त्यांच्या भूमिका काय होत्या हा सारा इतिहास डॉ. गाडगीळांनी मोठ्या तन्मयतेने लिहिला आहे; आणि वस्तुनिष्ठता न सोडता परखडपणे गुण-दोषांचे माप पदरात टाकले आहे. गांधी, नेहरू, पटेल, आझाद, जीना, अ‍ॅटली व माउंटबॅटन यांपैकी कोणीही त्यांच्या कठोर परीक्षणातून सुटलेला नाही. 

"दुसरे महायुद्ध आणि नेहरूंचा आंतरिक संघर्ष" हे असेच उठावदार उतरलेले व नेहरूंच्या मनातील वैचारिक तशाच भावनिक संघर्षाचे यथार्थ चित्रण करणारे महत्त्वाचे प्रकरण आहे. 1933 नंतर युरोपात नाझीझम, फॅसझमचा उदय झाला. लोकशाही व हे नवे अमानुष हुकुमशाही तत्त्वज्ञान यांचा संघर्ष पेटणार व त्याचे पर्यवसान जगाला व्यापून टाकणाऱ्या भीषण महायुद्धात होणार हे नेहरुंना स्पष्ट दिसू लागले. जर्मनी, इटली व जपान यांनी सशस्त्र आक्रमण करून एक एक देश पादाक्रांत करायला प्रारंभ केला त्याबरोबर नेहरू अधिकाधिक अस्वस्थ होत गेले. लोकशाहीवादी व स्वतंत्र राष्ट्रे त्यांच्या टाचांखाली चिरडली जाऊ लागली तसतसा नेहरूंपुढे "आधी भारताचे स्वातंत्र्य की लोकशाही राष्ट्रांचा बचाव" असा प्रश्न उभा राहिला. 

ब्रिटनची अडचण ती आपली संधी असे भारताने मानावे याला त्यांचा विरोध होता व त्यामुळेच "भारत छोडो" सारखे आंदोलन आत्ताच सुरू करून इंग्लंडच्या अडचणीत भर टाकावी याला प्रथम त्यांचे मन तयार होत नव्हते आणि काही अटींवर युद्धसहकार्य द्यायला भारताने तयार असले पाहिजे असे त्यांना वाटत होते. या आंतरिक संघर्षाचे स्पष्ट प्रतिबिंब डॉ. गाडगीळांच्या या प्रकरणातून वाचकाच्या मनात उमटते, इतके त्याचे लेखन उत्कटतेने झालेले आहे. 

भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले. स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करीत असताना ज्या राष्ट्रीय आकांक्षांचा अविष्कार त्यांच्या मुखावाटे झाला त्यांची पूर्तता करण्याचे आव्हान व संधी त्यांना आता मिळाली होती. देशाच्या सुदैवाने त्यांचे नेतृत्व भारताला पुढील 17 वर्षे लाभले व त्यांच्यामुळेच देश त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आत्मविश्वासाने पावले टाकू लागला. भोवतालच्या जगाकडे नजर टाकली म्हणजे नेहरूंनी भारताला त्याचे स्वातंत्र्य, भौगोलिक ऐक्य, आर्थिक विकास आणि परिवर्तन यांच्या दिशेने प्रवास करण्याचा निर्धार व शक्ती देऊन किती असाधारण ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे हे ध्यानात येऊन मनात कृतज्ञतेची भावना उचंबळून येते. 

या अर्थाने नेहरूंना आधुनिक भारताचे युगप्रवर्तक म्हणणे अगदी रास्त होईल असा विश्वास वाटतो. राष्ट्रीय जीवनाचे असे एकही अंग नाही जे नेहरूंच्या नेतृत्वामुळे उजळून निघाले नाही. त्यासाठी नेहरूंनी संविधान बनवण्यात, संसदीय लोकशाहीच्या नाजुक रोपंट्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात, जलद आर्थिक विकासासाठी नियोजनाची संकल्पना साकार करण्यात आणि या खंडप्राय देशातल्या विविध धर्मीय लोकांना परस्परांवरील विश्वासाने शांततेचे जीवन जगता यावे यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे अधिष्ठान राजकारणाला देण्यात केवढी दूरदृष्टी आणि व्यावहारिक शहाणपण दाखवले याचा विचार मनात येतो. 

एक स्वप्नाळू आणि कविमनाचा भला पण भाबडा माणूस असे संबोधून त्यांना दुषण लावणे म्हणजे त्यांच्या जीवनकार्याचे व त्यामागील प्रेरणांचे स्वतःला अजिबात आकलन झालेले नाही याची कबुली देण्यासारखेच आहे. अशांना डॉ. गाडगीळांच्या प्रस्तुत ग्रंथाचे परिशीलन खूप उद्बोधक ठरेल यात शंका नाही. नेहरूंबद्दल खूप सहानुभूतीने पण अंधभक्तीचा स्पर्श होऊ न देता लिहिलेला हा ग्रंथ वस्तुनिष्ठ मूल्यमापनाचा एक वस्तुपाठच देऊन जातो असा त्यांना अनुभव येईल. 

पंडित नेहरूंची थोरवी शेवटी कशात आहे? इतिहासातील त्यांच्या शाश्वत स्थानाचे नेमके स्वरूप काय आहे? सर्वस्वाकडे पाठ फिरवून मातृभूमीला दास्यमुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामातले क्लेश सहन करणारे पृथ्वीतलावर असंख्य देशभक्त होऊन गेले किंवा मुत्सद्दी म्हणून प्रशासनाची जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडणारे आणि देश एक बलशाली आणि आधुनिक राष्ट्र बनावा यासाठी त्याला स्थिर असा संस्थात्मक पाया घालून देणारे व निकोप लोकशाही परंपरा सुरू करण्याबाबत कटाक्षाने आग्रह धरणारे प्रशासक देखील अनेक होऊन गेले. 

वरील गुणविशेष तर नेहरूंच्यात होतेच पण त्यांच्या विश्वमानव्यात त्यांची खरी थोरवी आहे. आधुनिक प्रबोधन युगविशेषांचा परिचय सनातन भारतीय समाजाला करून देत असतानाच त्यांनी विश्वातील समस्त जनतेवर निर्व्याज प्रेम केले व त्यांचे हित चिंतिले. थोर विचारवंत आणि इतिहासज्ञ अनॉल्ड टॉयन्बी यांनी त्यांच्या मोठेपणाचे रहस्य खालील शब्दांत वर्णिले आहे ते फार मार्मिक आहे. पंडित नेहरूंना जगाच्या इतिहासात अढळ स्थान का रहाणार आहे याची कल्पना त्यावरून करता येते. टॉयन्बी म्हणतात : "For Nehru himself, his political career, eminent though it was, was not, I believe, the most important thing in his life because, for him, it was not an end in itself. For him, it was a means of serving his fellow human beings -- his Indian fellow countrymen in the first place, but not them alone; for his feeling for his fellows embraced the whole of mankind. He did care intensely for mankind's welfare and destiny, and his vision of this will be the thing in him for which he will be remembered by posterity, if the verdict of history faithfully reflects the fundamental truth about him."

Tags: अरनॉल्ड टॉयन्बी. नाझीवाद युरोप काश्मीर आंतरराष्ट्रीयवाद स्वातंत्र्यलढा नेहरुयुग स.रा.गाडगीळ राम जोशी Arnold Toyanbee. #साहित्य Nazism Europe Kashmir Internationalist Freedom struggle Nehru era S.R.Gadgil Ram Joshi Literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके