डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चम्पारणमधील युरोपियनांनी गांधींकडे कसे पहिले

चम्पारणमधील मळेवाल्यांनी अतिशय तीव्र स्वरूपाचा विरोध गांधीजींना केला; परंतु तिथे काम करणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गांधीजींच्या कामाविषयीचे आकलन अधिक निर्दोष होते. गांधीजी चम्पारणमध्ये गेल्यानंतर बेट्टिया येथील प्रांताधिकाऱ्यांनी असे लिहिले की, मळेवाल्यांना असे वाटते की गांधीजी हे त्यांचे नैसर्गिकरीत्याच शत्रू आहेत. युरोपीय जरी गांधीजींकडे आपापल्या भूमिका नुसार आदर्शवादी, क्रांतिकारक किंवा वेडेपणा करणारे अशा कोणत्याही दृष्टिकोनातून पाहत असले, तरी येथील लोकांना मात्र ते मुक्तिदाता वाटतात. लोकाना असे वाटते की गांधीजींकडे अतींद्रिय शक्ती आहेत.  

गांधीजींना 1917 च्या उन्हाळ्यातील चम्पारणच्या सत्याग्रहामुळे काय अनुभव आले आणि काय शिकता आले, याविषयी मागच्या लेखात लिहिले होते. या लेखात आपण गांधीजींच्या तेथील कामाला विरोध करणाऱ्या व्यक्तींकडे दृष्टीक्षेप टाकणार आहोत. गंमत म्हणजे, गांधीजींना विरोध करणारे हे ब्रिटिश (जे सर्व पुरुष होते) त्यांच्या कामाकडे कसे पाहत होते? 

गांधीजींच्या चम्पारणमधील कामामुळे सर्वाधिक नुकसान हे निळीच्या मळ्यांवर मालकी आणि व्यवस्थापन असणाऱ्या ब्रिटिशांचे होणार होते. पूर्व भारतातील हे मळेवाले वकील, सैन्यातील अधिकारी आणि धर्मगुरू अशा वर्गातून आलेले होते. त्यांचे शिक्षण पब्लिक स्कूल्स - मधून झालेले होते. (त्यांच्यापैकी फारच कमी जण हे विद्यापीठात शिकण्यासाठी गेले होते.) जरी इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांपेक्षा त्यांचा सामाजिक दर्जा कनिष्ठ मानला जात असे. तरी अशा मळेवाल्यांचे राहणीमान या अधिकाऱ्यांपेक्षा चांगले होते. मळ्यांच्या व्यवस्थापकांना त्यांच्या पगाराबरोबरच नफ्यातील काही वाटा मिळत असे, तसेच या व्यवस्थापकांना खाद्य तेल आणि इंधन व कित्येकदा धान्य व भाज्यासुद्धा फुकटात मिळत असत. आजूबाजूच्या जंगली भागातील वाघ आणि बिबट्या यांची शिकार करणे आणि हरणे व तितर खाण्यासाठी मिळणे हे - सुद्धा व्यवस्थापकांच्या जीवनाचे घटक होते. 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीत बनणाऱ्या सिंथेटिक रंगांमुळे नैसर्गिक रीत्या तयार होणाऱ्या निळीची मागणी कमी झाली होती. सन 1914 मध्ये सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धात जर्मनी आणि ब्रिटन एकमेकांच्या विरोधी लढत होते. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांशी असलेले आर्थिक संबंध तोडून टाकले. त्यामुळे बिहारमध्ये तयार होणाऱ्या निळीची मागणी पुन्हा वाढली. तिची किंमत तिपटीने वाढली आणि पुन्हा एकदा उत्पादनात वाढ व्हायला सुरुवात झाली. वाढत्या मागणीचा फायदा घेण्यास उत्सुक असलेल्या मळेवाल्यांनी शेतकऱ्यांवर अधिकाधिक नीळ पिकवण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. निळीच्या लागवडीखाली 1914 मध्ये केवळ 8100 एकर जमीन होती. दोनच वर्षांत ते प्रमाण 21900 एकरपर्यंत वाढले. गांधीजी चम्पारणमध्ये आले, तेव्हा निळीच्या उत्पादनातून येणारी सुबत्ता किती काळ टिकेल, असा 

प्रश्न समोर आला होता. शेतकऱ्यांवरील सक्तीच्या नीळ लागवडीचा कायमचा शेवट करावा याच हेतूने ते चम्पारणमध्ये आले होते. गांधीजींच्या आगमनानंतर काहीच दिवसांनी मळेवाल्यांच्या संघटनेच्या - बिहार प्लांटर्स असोसिएशनच्या - सचिवाने जिल्हाधिकाऱ्यांना चिडून पत्र लिहिले की, मिस्टर गांधी यांचे खरे हेतू काहीही असले तरी दुर्दैवाने त्यांच्याबरोबर अप्रामाणिक व देशद्रोही असे लोक आहेत. युरोपियन डिफेन्स असोसिएशन या संघटनेच्या स्थानिक सदस्यांनी असा ठराव पारित केला की, गांधीजींच्या चम्पारण जिल्ह्यातील आगमनाबरोबरच अशांतता आणि गुन्हेगारी यांचेही आगमन झाले आहे. तसेच त्यांच्या येथील वास्तव्यामुळे चम्पारणमधील युरोपियन लोकांच्या आणि एकूण जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने घातक आहे. 

बेट्टिया राज या नावाच्या मोठ्या मळ्याचा व्यवस्थापक गांधीजींच्या कामाकडे संशयाच्या दृष्टीनेच पाहत होता. त्याने असे लिहिले की, गांधीजी हे स्वतः प्रामाणिक असू शकतील; मात्र दक्षिण आफ्रिकेत मिळालेले यश त्यांच्या डोक्यात गेले आहे. आपल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात यासाठी गांधीजी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. अतिशय सहजपणे त्यांना शहीद बनवता येईल आणि सहजपणे गांधीजींना रोखता येणार नाही. डब्ल्यू. एस. आयर्विन हा मळेवाला अतिशय सातत्याने गांधीजींच्या विरोधी भूमिका घेत होता. ब्रिटिश राज्याच्या बाजूने असलेल्या वृत्तपत्रांत अनेक लेख त्यांनी गांधीजींच्या विरोधी लिहिले. त्यांचे असे म्हणणे होते की, ब्रिटिश मळेवाल्यांनी धोकादायक जंगलाचे रूपांतर एका सुपीक शेती प्रदेशात केले आहे. गांधीजी येण्यापूर्वी चम्पारणमधील शेतकरी समाधानात होते. असाही दावा आपल्या लेखनात त्यांनी केला होता. गांधीजींवर कडक टीका करणाऱ्या एका लेखात त्यांनी असे लिहिले होते की, गांधीजींच्या कामाची पद्धत जर इतकी नाटकी नसती, तर गांधीजींच्या हेतूंविषयी फारच जास्त प्रमाणात शंका घेतली असती. इंग्लंड आणि पाश्चात्त्य जगातील इतर देश इथे मिळणाऱ्या सुखसोर्इंशी परिचय असूनसुद्धा इथे ते डोके झाकणारे काहीही घालत नाहीत, त्यांच्या पायात बूट नाहीत. ते जमिनीवर बसतात, स्वतःचे जेवण स्वतःच बनवतात आणि दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या त्या (गौतम बुद्ध नावाच्या) थोर माणसासारखे वागायचा प्रयत्न करतात. जर योग्य त्या पद्धतीने हाताळले असते, तर हे आंदोलन कधीच संपले असते. प्रशासनात नसलेल्या युरोपीय लोकांना जिल्ह्यातून बाहेर घालवून देणे आणि येथील जनतेला वकील व स्थानिक नेते यांच्या ताब्यात देणे, हाच या आंदोलनाचा खरा हेतू आहे. 

कस्तुरबा गांधी 1917च्या उत्तरार्धात चम्पारणमध्ये त्यांच्याबरोबर राहायला आल्या. त्यामुळे आयर्विन यांचा तिळपापड झाला. त्यांनी ‘स्टेट्‌समन’मध्ये रागाने लिहिले की, गांधीजींनी जिल्हाधिकाऱ्यांना जरी असे वचन दिलेले असले की ते कोणत्याही इतर सार्वजनिक कामात सहभाग घेणार नाहीत तरी ते गोहत्याबंदी आणि हिंदू - मुस्लिम संबंध यावर वादग्रस्त स्वरूपाची भाषणे देत आहेत. दरम्यान, आयर्विन यांनी असाही दावा केला की, होमरूल लीग आणि तशाच इतर कामांमध्ये गांधीजी गुंतल्यामुळे अशाच स्वरूपाचे सल्ले देत असतात. तसेच एका शाळेच्या उद्‌घाटन करण्याच्या नावाखाली त्यांनी एका गावात एक बाजार भरवला आहे. शेजारील दोन गावांमध्ये कारखान्यातर्फे बाजार चालवले जातात ते बंद पडावेत, यासाठीच हा बाजार भरवण्यात आला आहे. असे वर्तन करणाऱ्या गांधीजींनी सरकारला दिलेले आश्वासन पाळले आहे असे म्हणता येईल का? 

गांधीजींनी त्याला अखेर ‘स्टेट्‌समन’ मध्येच पत्र लिहून उत्तर दिले. त्यांनी असे लिहिले की - धार्मिक तणाव कमी करावा यासाठी त्यांनी ती भाषणे दिली होती. मळेवाल्यांनीसुद्धा या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन गांधीजींनी केले. त्यानंतर कस्तुरबा यांच्याविषयी त्यांनी असे लिहिले की, त्या बिच्चाऱ्या स्त्रीला हे कधीच कळणार नाही की तुमच्या वार्ताहराने तिच्यावर किती अन्याय केला आहे. जर आयर्विन यांची कस्तुरबा यांच्याशी ओळख करून दिली गेली तर त्यांना लगेचच असे लक्षात येईल की, त्या अतिशय साध्या, अगदी निरक्षर वाटाव्यात अशा असून आयर्विन यांनी उल्लेख केलेल्या बाजारांविषयी त्यांना काहीच माहिती नाही. चम्पारणमध्ये त्या शिक्षकांसाठी जेवण बनवणे आणि स्त्रियांना औषधे देणे हे काम करत असून भाषणे देणे किंवा वर्तमानपत्रात पत्रे लिहिणे हे त्यांना अजून येत नाही, असेही गांधीजींनी उपरोधाने लिहिले. 

चम्पारणमधील मळेवाल्यांनी अतिशय तीव्र स्वरूपाचा विरोध गांधीजींना केला; परंतु तिथे काम करणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गांधीजींच्या कामाविषयीचे  आकलन अधिक निर्दोष होते. गांधीजी चम्पारणमध्ये गेल्यानंतर बेट्टिया येथील प्रांताधिकाऱ्यांनी असे लिहिले की, मळेवाल्यांना असे वाटते की गांधीजी हे त्यांचे नैसर्गिकरीत्याच शत्रू आहेत. युरोपीय जरी गांधीजींकडे आपापल्या भूमिका नुसार आदर्शवादी, क्रांतिकारक किंवा वेडेपणा करणारे अशा कोणत्याही दृष्टिकोनातून पाहत असले, तरी येथील लोकांना मात्र ते मुक्तिदाता वाटतात. लोकाना असे वाटते की गांधीजींकडे अतींद्रिय शक्ती आहेत. ते खेडोपाडी फिरत असून लोकांना आपली गाऱ्हाणी मांडायला सांगतात. येथील अडाणी जनतेची मने गांधीजी लवकरच येऊ पाहणाऱ्या मुक्तीच्या शक्यतेने रोज भारून टाकत आहेत. 

चम्पारणमधील तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांधीजी नेमके काय करू पाहत आहेत हे अगदी अचूकपणे ओळखले होते. गांधीजी जितका काळ तिथे राहिले तितके त्यांचे गांधीजींविषयीचे आकर्षण वाढत गेले. त्यांनी गांधीजींशी संवाद साधला. इतरांशी ते गांधीजींविषयी बोलले होते. गांधीजींनी अगदी दक्षिण आफ्रिकेत असताना लिहिलेली पत्रके त्यांनी मिळवून वाचली होती. आपल्या या प्रतिस्पर्ध्याविषयी ते जिल्हाधिकारी असे लिहून गेले, गांधीजींच्या विचारात पूर्व आणि पश्चिम यांचे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. रस्किन आणि विशेषतः टोलस्टोय यांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव आहे. याच्याच जोडीला त्यांच्याकडे जशी योग्यांकडे असते तशी विरक्ती आहे. त्यांच्यावर केवळ पूर्वेच्या विचारांचा प्रभाव असता, तर आपल्या मतांचे वैयक्तिक आयुष्यात पालन करून ते इतरांपासून बाजूला होऊन, समाधानात राहू शकले असते; परंतु पाश्चिमात्य प्रभावामुळे ते सक्रिय सामाजिक कार्यात उतरले आहेत. 
गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, काम आणि कार्यशैली यांचे हे फारच अचूक आकलन आहे. त्या वेळी चम्पारणमध्ये जिल्हाधिकारीपद सांभाळणारा हा प्रशासकीय अधिकारी दीर्घ काळ विस्मृतीत गेला होता. आता चम्पारण सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना त्यांचे नाव समोर आणायला हवे. डब्ल्यू. बी. हेकॉक या नावाचे ते अधिकारी होते. त्या काळातील इतर युरोपीय लोकांनी गांधीजींच्या कामाला राग, संताप, भीती आणि वांशिक गर्व या स्वरूपाची जी प्रतिक्रिया दिली, त्यापेक्षा ते आपल्या आकलनामुळे वेगळे ठरतात. 
 

Tags: Ramchandra Guha. Chmparnyamadheel eruopiyanani Gandhijikade kase pahile रामचंद्र गुहा Kaalparva चम्पारणमधील युरोपियनांनी गांधींकडे कसे पहिले कालपरवा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके