डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे केशव देसीराजू यांचे आजोबा (आईचे वडील) होते. स्वतःच्या वंशानुक्रमाविषयी केशव यांच्या मनात सहजभाव होता आणि हेही त्या माणसाचे एक गुणवैशिष्ट्य होते. त्यांना ओळखणाऱ्या कित्येकांना ते कुणाचे नातू आहेत याविषयी काही अंदाज नसे. तरीही, विचित्र परंतु सर्वार्थाने चांगल्या अशा एका योगायोगाने आजोबांच्या जयंतीदिनी त्यांचे निधन झाले. 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणूनही ओळखला जातो. स्वतःच्या कामातून आणि प्रशासनातून केशव यांनी, त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना अधिक गौरवशाली आयुष्य कसे जगावे हे शिकवले. त्याहूनही अधिक वेळा त्यांनी अधिक आनंददायक आयुष्य कसे जगावे हेही शिकवले. प्रशासकीय अधिकारी म्हणून, विद्वान म्हणून, शिक्षक म्हणून, कुटुंबवत्सल माणूस म्हणून आणि एक मित्र म्हणून माझ्या परिचयपरिघातील ही सर्वात आदर्श-अनुकरणीय व्यक्ती होती.

माझे स्वतःचे आयुष्य बहुशः व्यक्तिगत यशाचा पाठपुरावा करण्यासाठीच समर्पित झाले आहे. कदाचित त्यामुळे, इतरांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या व्यक्तींविषयी माझ्या मनात नेहमी एक प्रकारचा अपराधी पूज्यभाव असतो. मला सर्वाधिक प्रभावित करणारा एक लोकसेवक मागच्या रविवारी, पाच सप्टेंबर रोजी निधन पावला. त्यांचे वय 66 वर्षे होते.  सध्याच्या युगात त्यांचे जाणे (विशेषकरून ते कोविडग्रस्त नसूनही) अकालीच म्हणावे लागेल. समाजासाठी आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात अद्याप त्यांना पुष्कळ योगदान देण्याचे बाकी होते. परंतु आजवर त्यांनी जे कार्य केले ते काम पाहता आणि ते त्यांनी ज्या पद्धतीने केले हे पाहता, आपण त्यांच्या अकाली जाण्याविषयी शोक करू नये तर आजवर अनेक अर्थांनी आदर्श म्हणावे असे जे त्यांचे आयुष्य होते ते साजरे करावे असे मला वाटते.

केशव देसीराजू यांना 1988 मध्ये मी पहिल्यांदा भेटलो. उत्तराखंडमधील आम्हा दोघांच्या एका सामायिक मित्राकडून मी त्यांच्याविषयी ऐकले. एक स्थानिक तेलुगु भाषिक आणि केंब्रिज विद्यापीठाचा पदवीधर या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये स्वतःला इतके मिसळवून टाकतो हे पाहून माझा तो मित्र अचंबित झाला होता. केशव पुढे अल्मोरा या ठिकाणी (ज्या प्रदेशाविषयी मी माझ्या संशोधनात लिहिले आहे) जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मी त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटायला गेलो. त्यांचे हिंदी किती प्रवाही आहे, याच्याशी मला तेव्हा कर्तव्य नव्हते; पर्वतांच्या अंतर्भागात दूरच्या मोहिमेवर जाण्याचा त्यांचा उत्साह, आणि पर्वतीय प्रदेशांत शाश्वत विकासाच्या मार्गात असणारे अडथळे यांविषयीची त्यांची सखोल समज यांत मला अधिक रस होता.

उत्तरप्रदेश राज्याचे विभाजन झाले तेव्हा केशव यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या उत्तराखंड विभागाची निवड केली. मी डेहराडून येथे जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो असल्यामुळे तिथे त्यांचे असणे हे त्या नव्या राज्याला भेट देण्याकरता मला अधिकचे प्रलोभन होते.

मला आठवतेय, पुढे बेबंद पद्धतीने वाढणाऱ्या तेहरी गावाजवळून गाडी चालवत फिरायला मला आवडत असे. सुंदरलाल बहुगुणा यांनी तेहरी धरणाच्या विरोधात आंदोलन केले, त्या परिसराला जाताना भेट देत असे आणि परतीच्या प्रवासात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गढवाल प्रदेशातील निळ्या पाईन वृक्षांच्या जंगलातून भ्रमंती करीत असे.

विषयाचे ज्ञान, व्यक्तिगत सचोटी आणि इतरांशी व्यवहार करताना स्वतःच्या पदश्रेष्ठत्वाचा विसर, या गुणांचा समुच्चय असणारे देसीराजू हे कदाचित एकमेवाद्वितीय अधिकारी होते आणि ते आपले उत्तराखंड राज्यातील सचिवालय अतिशय आस्थापूर्वक सांभाळत होते, याचा डेहराडूनमध्ये असताना मी साक्षी होतो.

1998 मध्ये केशव आणि मी मध्यप्रदेशातील आदिवासी प्रदेशांत भटकंतीला गेलो होतो. मानववंशशास्त्रज्ञ वेरियर एल्विन यांनी ज्या खेड्यांमध्ये काम केले तिथे आम्ही भेट दिली. शेवटच्या रात्री अमरकंटक येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका भोजनालयात आम्ही जेवण केले. आधीचे गिऱ्हाईक तिथे एक हिंदी वर्तमानपत्र विसरून गेले होते. ते वाचताना केशव यांना कळले की, एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले आहे. एम.एस. यांच्या ज्या-ज्या मैफिलीला केशव उपस्थित होते त्या प्रत्येक मैफिलीविषयी (वयाच्या आठव्या वर्षी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी पहिली मैफल ऐकली होती) अन्नुपूर ते दिल्ली या आमच्या परतीच्या दीर्घ रेल्वे प्रवासात ते मला सांगत होते. त्या त्या मैफिलीत एम. एस. यांनी गायलेली प्रत्येक रचना त्यांना जवळपास अचूक आठवत होती.

उत्तराखंड येथे काही वर्षे व्यतीत केल्यानंतर देसीराजू यांची केंद्रिय आरोग्य मंत्रालय दिल्ली येथे अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपश्चात पोलिओ निर्मूलनाच्या कार्यामध्ये आणि विकलांग व्यक्तींच्या हक्कासाठी त्यांनी लक्षणीय काम केले. त्या खात्याच्या सचिव पदावर बढती झाल्यानंतर त्यांनी देशाच्या मानसिक आरोग्य सेवेची तरतूद विस्तारली.

भारतीय आयुर्विज्ञान परिषद नियंत्रण असलेल्या भ्रष्ट साखळीच्या विरोधात त्यांनी शूरपणे पवित्रा घेतला, त्या साखळीमध्ये अनेक प्रभावशाली राजकारणी होते. सत्ताधारी युपीए सरकारच्या काळातील त्यांची ही मोहीम आणि तंबाखू लॉबीला असणारा त्यांचा विरोध यांमुळे त्यांना आरोग्य मंत्रालयापासून दूर व्हावे लागले. कारण 2014 ची सार्वत्रिक निवडणूक जवळ येऊन ठेपली होती आणि बेकायदेशीर मार्गाने निधी गोळा करण्याच्या मार्गात एका प्रामाणिक सचिवाचा अडथळा निर्माण झाला होता.

गेल्या काही वर्षांमध्ये, भारतातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उद्दामपणाकरता, राजकीय धन्याची मर्जी संपादन करण्याच्या क्षमतेकरता आणि नीरक्षीरविवेकाच्या अभावाकरता अधिकाधिक ओळखले जाऊ लागले आहेत. केशव देसीराजू यांच्यात मात्र या अवगुणांचा पूर्णतः अभाव होता. त्यामुळेच कदाचित, ज्यांच्या सेवेसाठी निवडले होते त्या लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमादराची भावना होती. हे भाग्य देसीराजू यांच्या अनेक समपदस्थांना लाभलेले नव्हते. देसीराजू हे त्यांच्या पूर्वसुरी के सुजाता राव यांच्याप्रमाणेच दुर्मिळ अशा आरोग्य सचिवांपैकी एक होते. डॉक्टर्स, आरोग्य महाविद्यालयांतील प्राध्यापक, सामाजिक आरोग्यसेवक या सर्वांच्या मनात केशव यांच्यासाठी अतिशय आदराचे स्थान होते. युपीए सरकारकडून त्यांची बदली झाली तेव्हा आरोग्यक्षेत्रांत कार्यरत असलेल्या देशातील अनेक व्यक्तींनी सरकारचा तीव्र जाहीर निषेध केला होता.

केशव आणि मी जसजसे जवळ आलो तसतसे त्यांच्याविषयीची माझ्या मनातील प्रेमादराची भावना व्यावसायिकतेपासून व्यक्तिगततेत विस्तारली गेली. स्वतःच्या भावंडांविषयी त्यांच्या मनात असलेल्या नितांत प्रेमाविषयी मला आदर वाटू लागला. शास्त्रीय संगीताविषयीच्या त्यांच्या ज्ञानामुळे मला त्यांचा आदरयुक्त दरारा वाटू लागला. एम.एस. सुब्बलक्ष्मी यांचे सांगीतिक चरित्र लिहिण्याची त्यांची इच्छा मध्य भारतातून प्रवास करत असताना त्यांनी मला बोलून दाखवली होती. त्यानंतर आठवड्यातील पुष्कळ तास आरोग्य मंत्रालयातील कामांत घालवल्यानंतर, अनेक शनिवार ते नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालयातील एम.एस. यांच्या (निरनिराळ्या ठिकाणच्या, निरनिराळ्या वेळी झालेल्या मैफिलींच्या जुन्या माईक्रोफिल्म्स धुंडाळण्यात व्यतीत करीत.) त्यांना वार्षिक रजा उपलब्ध होई तेव्हा ते लंडनला स्वखर्चाने अभ्यासासाठी जात आणि भारतात उपलब्ध नसणारी अभ्याससाधने ब्रिटिश लायब्ररीत शोधत.

केशव सेवानिवृत्त झाले आणि मग त्याआधी काही दशकांपूर्वी त्यांच्या मनात रुजलेला एम.एस. प्रकल्प फलद्रूप झाला. 2021 या वर्षाच्या सुरुवातीला 'Of Gifted Voice: The Life and Art of M.S. Subbulakshmi'  या नावाचे त्यांनी लिहिलेले पुस्तक हार्पर कॉलिन्स प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. विद्वत्तेचा प्रभावी नमुना असणारे हे पुस्तक ऑलिव्हर क्रास्क यांच्या Indian Sun : 'The Life and Music of Ravi Shankar'  या पुस्तकाच्या बरोबरीने आले आहे. ‘भारतीय संगीतकारांवरील दोन उत्तम पुस्तके’ असे म्हणता येईल. निवृत्तीकाळात केशव यांनी त्यांच्या व्यावसायिक आस्थेचा भाग म्हणून 'Healers or Predators? Healthcare Corruption in India'  या पुस्तकाचे सहसंपादन आणि त्यासाठीचे संशोधनही केले. हे पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रकशित झाले आहे.

केशव यांनी केलेल्या कार्यामुळे मला त्यांविषयी आदर आणि त्यांच्या ज्ञानाविषयी हेवा वाटत आला आहे. स्वतःला नेहरूवादी भारतीय म्हणवून घेणे, आणि आपल्या पहिल्या पंतप्रधानांनी ज्या सर्वसमावेशक, सांस्कृतिक दृष्ट्या बहुलतावादी भारतासाठी लढा दिला त्यासाठी प्रयत्नशील राहणे, आम्हा दोघांनाही आवडत असे. मात्र केशव माझ्याहूनही अधिक गहन अर्थाने नेहरूवादी भारतीय होते. भारताच्या सांस्कृतिक आणि भाषिक श्रीमंतीत ते फार खोल गढलेले होते. भारतीय शास्त्रीय संगीताविषयीचे जबरदस्त ज्ञान त्यांना होते, त्याचबरोबर अभिजात साहित्याबद्दलही त्यांना रुची होती. तेलुगु, तमिळ, हिंदी, इंग्रजी या भाषा ते अस्खलित बोलू शकत आणि त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते. तेलुगु वगळता वरील भाषा ते सहज वाचूही शकत. आणि अलीकडे, निधन होईपर्यंत ते आपल्या मातृभाषेची लिपीही शिकत होते. कारण त्यांना संगीतकार त्यागराज यांच्यावरील पुस्तकासाठी संशोधन करायचे होते. दुर्दैवाने ते काम आता अपूर्ण राहिले आहे.

केशव देसीराजू यांना हिंदुत्वाचा तिटकारा होता. त्यांनी स्वतः जाणलेल्या व आचरलेल्या हिंदू धर्मामध्ये मानवता आणि करुणा होती, तत्त्वज्ञानाची सखोलता होती; आज भारतात रस्त्यांवर हिंसकपणे धावत सुटणाऱ्या स्वयंनियुक्त धर्मरक्षकांना हे समजणे जवळपास अशक्य आहे. भारतीय समाज व सभ्यतेची खोल समज आणि आपल्या परंपरेतील विरूपीकरण करणाऱ्या घटकांविषयीची तीव्र जाणीव त्यांच्यात होती. त्यांना ओळखणारे एक तरुण भारतीय लिहितात, ‘केशव देसीराजू हे खरे देशभक्त होते. आपल्या प्रजासत्ताकाचा पाया असणारी आदर्श तत्त्वे त्यांच्या हाडामांसात दिसत होती.’  

विद्वान हे गंभीर किंवा विनोदाचे अंग नसणारे असू शकतात, प्रशासकीय अधिकारी आढ्यताखोर आणि स्वकेंद्रित असू शकतात. पण जो चोप्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसमधील उत्कृष्ट स्मृतीलेखात म्हटल्याप्रमाणे, देसीराजू या विद्वान- प्रशासकीय अधिकाऱ्याला खोडकरपणा आणि मिस्कीलपणाचेही अंग होते. त्यांना जाऊन केवळ आठवडा लोटला आहे. पण काही तरी विनोदी किंवा प्रहसनात्मक वाचताना ‘हे मी केशव यांनाही सांगितले असते...’ असे मला वाटून गेल्याचे प्रसंग निदान पाच-सहा वेळा तरी आले असतील. संगीत, भाषा, प्रशासन, सार्वजनिक धोरण यांबद्दल जाणून घेण्यासाठी मी पहिल्यांदा ज्यांच्याकडे वळलो अशी पहिली व्यक्ती केशव देसीराजू होते आणि एखादा विनोद किंवा एखादी रंजक सांगोवांगी (गॉसिप) मला ज्यांना सांगावीशी वाटे अशी पहिली व्यक्तीही तेच होते.

या देशबांधवाच्या अनेक संस्मरणीय आठवणी माझ्या मनात आहेत. त्यातली अगदी सुरुवातीची अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. 1988 च्या अल्मोरा सहलीवेळी सामाजिक कार्यकर्ते असित मित्रा, ललित पांडे, केशव आणि मी एका रविवारी बनरीदेवी मंदिराच्या भोवती असणारी पवित्र वनराई पाहायला गेलो. केशव यांच्या विनंतीस्तव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लालदिव्याच्या सरकारी गाडीऐवजी असित यांच्या खिळखिळ्या झालेल्या जीपमधून प्रवास करत होतो. ती अतिशय आनंददायक सहल होती. जिल्ह्यातील सर्वाधिक सत्ता एकवटलेला मनुष्य त्याच्या मित्रांसमवेत अज्ञातवासात अतिशय आनंदात होता. आम्ही ओक वृक्षांनी वेढलेली टेकडी चढून शिखरावरच्या पवित्र ठिकाणी गेलो होतो.

40त्यानंतर 30 वर्षांनी म्हणजे 2018 नंतर एकदा कुमाऊला असताना ही गोष्ट मी समकालीन भारतातील गांधीवादी चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या राधा भट्ट यांना सांगितली. राधा बहेननी त्यांच्याकडचीही एक आठवण मला सांगितली. ती अशी की- जेव्हा अल्मोराचे जिल्हाधिकारी असलेले आमचे हे मित्र कौसानीला जात, तेव्हा ते त्यांच्या ड्रायव्हरला लक्ष्मी आश्रमाच्या टेकडीच्या पायथ्याशी थांबायला सांगत आणि त्या टेकडीविषयी आणि तिथल्या लोकांविषयी सर्वाधिक माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत तास-दोन तास चालत असत.  केशव यांच्या आधी किंवा नक्कीच त्यांच्या नंतरही कुणा जिल्हाधिकाऱ्याकडे अशा प्रकारची एखादी गोष्ट करण्यासाठीची बुद्धिमत्ता किंवा विनम्रता असण्याची दुरान्वयेही शक्यता नाही.

मी हे लिहीत असतानाच केशव देसीराजू यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या एका अभ्यासकाने मला त्यांच्या निधनामुळे अल्मोरा येथील लोक शोक व्यक्त करताहेत अशा बातमीची एक क्लिप पाठवली. त्यांनी या जिल्ह्यात काम केले त्याला तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र तिथे अजूनही प्रेमाने आणि आदराने त्यांचे स्मरण केले जाते आहे. याचे कारण केशव यांनी त्यांच्या पिढीच्या इतर कोणत्याही प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच्या तुलनेत अधिक लोकांच्या जीवनांवर, किती तरी प्रभावी मार्गाने परिणाम केला असेल. 

भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे केशव देसीराजू यांचे आजोबा (आईचे वडील) होते. स्वतःच्या वंशानुक्रमाविषयी केशव यांच्या मनात सहजभाव होता आणि हेही त्या माणसाचे एक गुणवैशिष्ट्य होते. त्यांना ओळखणाऱ्या कित्येकांना ते कुणाचे नातू आहेत याविषयी काही अंदाज नसे. तरीही, विचित्र परंतु सर्वार्थाने चांगल्या अशा एका योगायोगाने आजोबांच्या जयंतीदिनी त्यांचे निधन झाले. 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणूनही ओळखला जातो. स्वतःच्या कामातून आणि प्रशासनातून केशव यांनी, त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना अधिक गौरवशाली आयुष्य कसे जगावे हे शिकवले. त्याहूनही अधिक वेळा त्यांनी अधिक आनंददायक आयुष्य कसे जगावे हेही शिकवले. प्रशासकीय अधिकारी म्हणून, विद्वान म्हणून, शिक्षक म्हणून, कुटुंबवत्सल माणूस म्हणून आणि एक मित्र म्हणून माझ्या परिचयपरिघातील ही सर्वात आदर्श-अनुकरणीय व्यक्ती होती.

(अनुवाद : सुहास पाटील)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके